Thursday, 29 December, 2011

अंक १ला, ५ जानेवारी २०१२

विशेष संपादकीय *
८९व्या पर्षात पदार्पण!
किरातच्या ८८व्या वर्षाचा वर्धापनदिन वेंगुर्ले येथील भक्त निवास सभागृहात गेल्या १४ मोठ्या दिमाखाने साजरा झाला. या निमित्ताने कै. भाऊ आंबर्डेकर यांच्या दुर्मिळ हस्तलिखित, नव्याने संगीत शिकणा-यांसाठी उपयुक्त अशा ‘स्वरमाया‘ या पुस्तकाचे प्रकाशन सध्याचे आघाडीचे संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरविद पिळगांवकर, सरोदवादक दत्ता प्रभू तेंडोलकर, बाळ आंबर्डेकर यांच्या गायनाची मैफलही झाली. भाऊ आंबर्डेकर यांची कन्या मायादत्त आंबर्डेकर आणि कुटुंबियांचा या कार्यक्रमात मोठाच सक्रीय सहभाग होता. हा कार्यक्रम अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.
या अंकापासून ‘किरात‘ ८९व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात ‘किरात‘चे दिवाळी विशेषांकासह एकूण ४७ अंक प्रसिद्ध झाले. दिवाळी विशेषांक २०० पृष्ठांचा कोकणातील गुढ रहस्ये उलगडणारा होता. नेहमीच्या आकारातील ४६ अंकांची पृष्ठ संख्या ४१२ होती. या वर्षभरात विविध विषयांवर संपादकीय, अधोरेखित या सदरांबरोबरच अनेक जाणकार मान्यवरांचे लेख अनेक विषयांसंदर्भात प्रसिद्ध केले. ‘उद्योग भरारी विशेष‘ या २८ पृष्ठांच्या विशेषांकातून मूळच्या कोकणातील मुंबई व अन्यत्र जाऊन मोठा व्यवसाय उभारुन प्रगती केलेल्या काही उद्योजकांच्या मुलाखती, लेखांद्वारे कोकणच्या मराठी उद्योजकांची ओळख झाली. यामुळे दरवर्षी असा एखादा अंक प्रसिद्ध करावा अशा सूचना आल्या. पृष्ठमर्यादेमुळे त्यावेळी उद्योग भरारीमध्ये ब-याच उद्योजक, व्यक्तींचा परिचय देता आला नव्हता. यावर्षीच्या अंकात ती उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न राहील.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प देशभर गाजला. त्या प्रश्नाचे राजकीय भांडवलही करण्यात आले. ‘किरात‘ च्या टीमने जैतापूर येथे जाऊन परिसराची पाहणी करुन लोकांशी संवाद साधला. तेव्हा प्रकल्पग्रस्तांची योग्य ती बाजू प्रसारमाध्यमांनी फारशी मांडली नसल्याबद्दल त्यांनी खत व्यक्त केली. या विषयावर समीरण सावंत व तज्ञ लेखकांनी लेखमाला लिहिली, स्थानिकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये अणुउर्जा कशी बनते? अणुउर्जेला पर्याय, या प्रकल्पाचे आर्थिक पैलू अशा बाबी होत्या. या संपूर्ण माहितीच्या लेखांसह एक पुस्तक प्रसिद्ध करावे अशा अनेकांच्या आणि मुख्यतः जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या सूचना आल्या. त्यानुसार ‘किरात‘ ट्रस्टतर्फे ‘जैतापूरची रणभूमी‘ हे पुस्तक प्रसिद्ध केले आणि सहा महिन्यातच त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध करावी लागली. इतका या पुस्तकाला प्रतिसाद मिळाला.
दोडामार्ग तालुक्यातील खजिन प्रकल्प, रेडी - विजयदुर्ग या बंदरांचा खाजगीकरणातून विकास, यामुळे तेथे पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरही ‘किरात‘ने अचूक शरसंधान केले आहे.
२०११ मध्ये प्रत्येक महिन्यात स्वतंत्र विषय घेऊन चार अंक परिपूर्ण माहितीने देण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव व्यवस्थापन विशेष, जैतापूरची रणभुमी, महिला दिन विशेष, शिक्षण विषयक समस्या, आरोग्य विशेष, विवाह विशेष, करिअर विशेष, गुढ विशेष आणि कोकणातील जत्रौत्सव असे विविध विषय किरातने मांडले. या विशेष अंकांचे अतिथी संपादक म्हणून डॉ. सुविनय दामले, सौ. सुमेधा देसाई, समीरण सावंत, संयोगिता करंदीकर यांनी जबाबदारी सांभाळली.
किरातचे संपादक म्हणून काही वर्षे जबाबदारी सांभाळलेले भूतपूर्व संपादक कै. के. अ. मराठे यांचे स्नेही कै. विष्णुपंत गणेश नाईक यांचे यंदाचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा परिचय देणारे लेख असलेला विशेषांक प्रसिद्ध केला. कै. विष्णु पंतांचे कुटुंबीय श्री. सगुण उर्फ आबा नाईक त्यांचे बंधू व भगिनी यांनी या शताब्दी वर्षानिमित्ताने वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पीटलला अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करुन देऊन आपल्या आई वडिलांच्या स्मृती चिरंतन केल्या आहेत. नाईक कुटुंबियांच्या या उपयुक्त देणगीमुळे सेंट लुक्सला अन्य व्यक्तींकडूनही देणग्या येऊ लागल्या आहेत. याकामी प्रसिद्धीच्या रुपाने किरातचाही सहभाग आहे हे नमूद करण्यास आम्हाला अभिमान वाटतो.
डॉ. मधुकर घारपूरे यांनी ‘मध्वानुभव‘ हे नवीन रंजक सदर सुरु केले. त्यांच्या यापूर्वीच्या ‘ससुली‘ प्रमाणेच हे सदरही लोकप्रिय झाले. ‘ससुली‘ पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावे अशा सूचना आल्या. लवकरच ते प्रसिद्ध कराण्याचा आमचा प्रयत्न आहे. तळेबाजार - देवगड येथील सौ. सुमधा देसाई याही विविध विषयांवर लिहित असतात. त्यांनी प्रसिद्ध समाजसेविका सिधुताई सपकाळ यांची घेतलेली मुलाखत विशेष उल्लेखनीय होती. शिक्षणतज्ञ श्रीराम मंत्री (मुंबई), प्रा. श्री. मनोहर जांभेकर (पुणे) यांनीही शिक्षण व्यवस्थेवर लिहिलेले लेख उल्लेखनीय होते. ज्येष्ठ पत्रकार व उद्योग सल्लागार म्हणून या जिल्ह्या काम केलेले किशोर बुटाला हे कोकण विकासावर सातत्याने विविध लेख देत असतात.
बाळशास्त्री जांभेकर स्मारक गोलमाल प्रकरणातील नियोजन मंडळाचे प्रताप, वाचनालयाचा बोजवारा ओंकार तुळसुलकर यांनीच किरातच्या माध्यमातून प्रथम प्रकाशात आणले. कोकणात दूध व्यवसाय कसा वाढेल यावरील माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. याखेरीज पर्यटन, कोकण रेल्वे, घाट रस्त्यांची दुरावस्था, जिल्ह्यातील लहान-मोठे खड्डेमय ग्रामीण रस्ते यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला निधी पुरेसा खर्ची न पडता परत का जातो? या विषय सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये खेदाने नमूद करावेसे वाटते की, नियतकालीकांनी विकासाचा पैसा परत का व कसा जातो या विषयी काहीही लिहिलेले नाही किवा शोधपत्रकारिताही केलेली नाही.
पर्यटनाविषयी ‘किरात‘ गेली सुमारे पंचवीस वर्षे सातत्याने लिहित आहे. अनेक वृत्तपत्रांनीही ते लेख पुनर्मुद्रित केले. याशिवाय बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी सिधुदुर्ग १५ वर्षापूर्वी पर्यटन जिल्हा जाहीर झाला. तेव्हापासून सातत्याने या विषयावर लेखणी चालविली आहे. ‘किरात‘च्या माध्यमातून यावर्षी आम्ही शाश्वतीचे पर्यटन लोकांच्या पुढाकारातून (शा.प.लो.पु.) हा एक वेगळा विचार मांडला. त्यासाठी कुडाळ येथील जॉर्ज जोएल यांचे लेखन आणि प्रायोजकत्व लाभले. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी खास चार पृष्ठे आम्ही त्यासाठी दिली आहेत.
मे २०११ मध्ये सा. किरातचे प्रकाशन अधिक आकर्षक, जास्त पृष्ठांचे करता यावे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम चालविता यावेत यासाठी किरात ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सा. किरातचे प्रकाशन करणे हे या ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. याखेरीज ट्रस्टने यावर्षी सुरु केलेले उपक्रम खालीलप्रमाणे -
१) ५वी ते ७वी च्या मुलांसाठी तथापी ट्रस्ट, पुणेच्या मदतीने शरीर साक्षरता हा १२ सत्रांचा उपक्रम वेंगुर्ले परिसरातील तीन शाळांमध्ये राबविला जातो. पुढील शैक्षणिक वर्षापासून अत्यंत गरज असलेल्या या उपक्रमाचा २० शाळांमध्ये विस्तार करण्याचा मनोदय आहे.
२) विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी रेशीमगाठी हा उपक्रम ज्योतिषी मायाताई आंबर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा मराठे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यामध्ये विवाह जुळवून देणे हे टारगेट नसून वधु-वरांमध्ये विवाह विषयक अवाजवी समज-गैरसमजांचे समुपदेशनाने (क्दृद्वदद्मड्ढथ्थ्त्दढ) ने दूर करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. किरातचा प्रत्येक महिन्यातील दुस-या आठवड्यातील अंक विवाह विशेष म्हणून प्रसिद्ध होतो. यामध्ये लेखनाची जबाबदारी सुमेधा देसाई, वंदना करंबेळकर यांनी स्विकारली आहे.
३) पर्यटनाविषयी केवळ लिखाण न करता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम म्हणून वायंगणी गावामध्ये जॉर्ज जोएल यांच्या संकल्पनेतून कासव जत्रा या उपक्रमाचे २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजन केले होते. या उपक्रमाला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी येथील ६२ कुटुंबांनी नोंदणी करुन सहभाग घेतला होता. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करणा-या सुहास तोरसकर आणि त्यांच्या सहका-यांना तसेच वायंगणी गावाच्या पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम निश्चितच पूरक ठरेल.
यापुढे किरात ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किरात साप्ताहिकाच्या नियमित प्रकाशनासाठी कायम ठेव निधी उभारण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी अधिकाधिक देणगीदारांनी निधी संकलनाला मदत करावी.

विशेष *

यशस्वी सहजीवनासाठी
स्वातीला घेऊन तिचे आई-बाबा माझ्या क्लिनीकमध्ये आले. तिच्या चेह-यावर धुमसणारा राग, वैताग, चिडचिड, हळवेपणा स्पष्ट दिसत होता. ‘‘डॉक्टर आता तुम्हीच काय ते समजावून सांगा हिला. अहो, ऐकतच नाही! चार महिने झाले नाहीत लग्नाला, तर अचानक सामान घेऊन निघून आली. आता परत जाणारच नाही म्हणते. काय करायचं? कसं समजवायचं? आमचे सगळे मार्गच खुंटलेत. तुम्हीच काय ते करा....‘‘
तिच्या आई-वडिलांनी बांध फुटावा तसं मनातलं बोलून टाकलं. सविस्तर बोलणं झाल्यावर मी म्हटले, ‘‘मी तुला काहीच समजावणार नाही. फक्त मला एक सांग की, तुझा तुझ्या आई-वडिलांवर विश्वास आहे का?‘‘ ती म्हणाली, ‘‘हो.‘‘ मग म्हटलं, ‘‘आता लग्न, संसार, घटस्फोट, नवरा, सासू, नणंद सगळं बाजूला ठेव. विचारही करु नकोस या सगळ्याचा आणि शांतपणे कुठलाच विचार न करता आई-बाबांकडे सुट्टीवर आल्यासारखी एक महिना रहा. एक महिन्यानंतर पुन्हा भेटू. मग पुढचं काय ते ठरवू!‘‘
त्या दिवसापासून तिस-या आठवड्यात ती व तिचे आई-बाबा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आले. म्हणाले, ‘‘स्वतःच जाते म्हणाली. नव-याला फोन केला. नवरा आला आणि काहीच झाले नसल्यासारखा तिला घेऊन गेला. चार दिवस झाले. तिथून तिचा फोनही आला.‘‘

का होत असं? हे एक हॅपी एंडींग उदाहरण होतं. पण सर्वच लग्न एवढी नशिबवान ठरतात असं नाही. एकतर हल्ली लग्नाला उशीर होतो आणि बारीकसारीक गोष्टींनी ते तुटायला मात्र अजिबात उशीर होत नाही! आणि मग घटस्फोटाचे प्रमाण वाढते आणि आपण सर्वजण भांबावल्यासारखे स्त्री-स्वातंत्र्य, व्यक्ती-स्वातंत्र्य, नोकरी करणारी स्त्री, स्त्री-पुरुष समानता या असंबद्ध गोष्टींचा उहापोह करुन या सर्वांची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करत बसतो. असंबद्ध अशासाठी की, लग्न हा माझ्या मते मुळात दोन माणसांचा अतिशय खाजगी विषय आहे.
मुळात लग्न मोडणे किवा घटस्फोट याचा फक्त त्या त्या व्यक्तीचा समजुतदारपणा, बदल समजावून घेण्याची क्षमता, वैयक्तिक नातेसंबंध, नाती जोपासण्याची कला, जबाबदारीची जाणीव या गोष्टींशी संबंध असू शकतो. पण मग ज्याअर्थी घटस्फोटांचे प्रमाण वाढलेलं दिसतंय याचा अर्थ हल्ली सर्वच मुला-मुलींमध्ये समजूतदारपणा आणि इतर गोष्टी पूर्वीपेक्षा कमी आहेत, असं समजावं का? नाही, बिल्कूल नाही! मला असं वाटतं की हे सर्व गुण बहुतेकांमध्ये असतात. पण आजकालच्या वेगवान जीवनपद्धतीमुळे होणा-या घाईमुळे हे गुण बाजूला होतात आणि लग्नाचा बळी जातो.
एकतर आजकाल उशीराने म्हणजे मुलगा आणि मुलीचं पूर्ण शिक्षण होऊन नोकरी वगैरे लागून आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्याची भावना झाल्यावरच लग्नाचा विचार होतो. त्यामुळे हे सगळे होईपर्यंत एकतर स्वभाव घट्ट बनलेला असतो. ‘व्यक्तिमत्वाच्या मर्यादा‘ ब-याच प्रमाणात ठरुन गेलेल्या असतात आणि मग घाई-गडबडीत किवा ‘झालं बुवा एकदाचं‘ या आनंदाच्या भरात मुला-मुलीला लग्नाच्या बंधनात टाकलं जातं आणि एखाद्याला कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक पाण्यात फेकून दिलं तर त्याची जी भांबावलेली, घाबरलेली, श्वास कोंडलेली अवस्था होईल तशी झाल्यामुळे ‘बाकी सगळं जाऊ दे, आधी पाण्यातून मला बाहेर काढा.‘ असी मानसिकता निर्माण होते आणि मग स्वातीसारखं अचानक ‘लग्नातून बाहेर‘ पडण्याची मानसिकता तयार होते.
मग काय करायचं आता ह्या सगळ्यावर? मुळात लग्न हा आयुष्यातला फार परिणामकारक बदल आहे. त्यामुळे तो बदल होण्यापूर्वी जर पूर्वतयारी केली, चर्चा केली, सल्ला-मसलत केली, एक मानसिक पाया निर्माण केला, ज्यावर संसाराची इमारत मजबूत उभी करता येईल, तर बराच चांगला परक पडेल.
आधीच म्हटल्याप्रमाणे लग्न हा एक ‘मोठ्ठा‘ बदल निश्चितच आहे आणि त्याला ‘मोठ्ठा‘ म्हणायचं कारण म्हणजे अचानक आपल्या भूमिकेत बदल होतो. मुलगा, दादा, वडील, दीर होण्याएवढे नवरा होणं सोपं नाही. नव-याची भूमिका समजूतदारपणे पार पाडावी लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी! कोणीही, कितीही, काहीही म्हटले तरी आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तो आपल्या समाज मनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे बायको कितीही कर्तबगार, हुशार असली तरीही समाज, कुटुंब, नातेवाईक, शेजारी हे एखाद्याच्या बायकोच्या भल्याबु-यासाठी नव-यालाच जबाबदार धरणार! हे खरेही आहे. त्यामुळे लग्न झाले म्हणजे एक नवीन वस्तू आपल्या आनंदासाठी घरात आणणं असं नसून एक नातं निर्माण करणं की ज्यात आपण आणि आपली पत्नी ही निम्मे-निम्मे वाटेकरी आहोत, म्हणजेच ती दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. एकमेकांच्या भल्यासाठी समान जबाबदारी हा दृष्टीकोन ठेवला तर बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणोत, नवरा मुलगा ‘टेन्शन‘ घेणार नाही! मग ह्या गोष्टीबरोबर उत्तरदायीत्व आलं! पूर्वीसारखं कुणलाही न सांगता २ तास उशीरा घरी येणं शक्य नाही. कुणीतरी तुमच्याबद्दलची माहिती जाणण्याचा प्रयत्न करणारा समान हक्कदार घरी बसलाय हे लक्षात ठेवावं. अर्थात प्रेम ही जादुई वस्तू असेल तर या गोष्टीचा वेगळेपणाने विचारच करायची गरज नाही.
आता मुलीच्या बाबतीत मुळात मला असं वाटतं की, आई-बाबांचं घर सोडून दुस-या माणसाच्या घरात जाणं आणि पुढे हेच आपले घर असं मान्य करुन राहणं ही एक फारच कठीण, असह्य, ताणकारक गोष्ट आपल्याकडच्या मुली लिलया करत असतात. बायकांसाठी मात्र नवरा, दिर, सासू, सासरा, नणंद वगैरे ही नवीन गोष्टीची लिस्ट जरा मोठीच असते आणि परत ह्या सर्वांच्या नजरेत ती सुद्धा नवीन व्यक्ती म्हणजे ह्या सर्वांच्या एकूणच ह्या लग्नापासून पर्यायाने नवीन सून, वहिनी, असेलच तर काकू वगैरे... यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, नव-याच्या अपेक्षा आणि त्या मुलीच्या स्वतःच्या ह्या सर्वांकडून असलेल्या अपेक्षा ह्यांची सांगड घालून तिला पुढे जायचे असते.
सर्वसामान्यपणे निरागस मुलीच्या मनात जे आदर्श चित्र असतं ते असं की, सासू-आईसारखी, सासरा - वडीलांसारखा आणि नवरा - मित्रासारखा! पण होते असे की, अशी निरागस अपेक्षा ब-याचदा कठोरपणे मोडून गेल्याचा अनुभव मुलींना येतो आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होतात. अस का होत? ह्या अशा अपेक्षा करणे चूक आहे का? बिलकूल नाही, पण ज्याप्रमाणे तिचे खरे आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र यांना प्रत्येकाला ती व्यक्ती म्हणून जशी पूर्णपणे ओळखून, त्यांचं व्यक्तीमत्व मान्य करुन मग नातं मान्य होऊन स्थिर झालेलं असतं. तसं ह्या नात्यांकडून नवीन किवा अपेक्षित नात्यांकडून लग्नाच्या दुस-या दिवशीच होईल. अशी अपेक्षा करणे मात्र निश्चितच त्रासदायक आहे. त्यासाठी आधी ती माणसं एक माणूस म्हणून कशी आहेत हे ओळखणे, मग ती ती माणसं जशी आहेत तशी मान्य करणं ह्या प्रक्रियांना भरपूर आणि योग्य तो वेळ दिला गेला पाहिजे तो फार वेळ दिला जात नाही आणि अपेक्षा करण्यात घाई होते. बरं हे करताना त्या मुलीला अजून एक जबाबदारी पार पाडायची असते ते म्हणजे ह्या सर्वांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांना सुद्धा तडा जाऊ द्यायचा नसतो आणि त्यांनीसुद्धा तिला एक माणूस म्हणून ओळखणे, मान्य करणे ह्या प्रक्रियेत कोणत्याही अपेक्षा करण्यापूर्वी पुरेसा वेळ देणं महत्वाचं असंत. नवीन जाऊ, नवीन सून, नवीन भावजय, नवीन वहिनी, नवीन नवरा, नवीन बायको, नवीन सासू, नवीन सासरा, नवीन नणंद, नवीन घर ह्या सर्वाबद्दल कोणतीही ठाम मतं बनविण्यापूर्वी पुरेसा कालावधी जाऊ दिला तर सर्वांच्या अपेक्षा योग्य प्रमाणात पूर्ण व्हायला निश्चितच मदत होईल आणि ही सर्व नाती ओझं न वाटता रोजचीच होऊन जातील.
नकारात्मक निर्णय घेण्यात केलेली हेतुपरस्पर चालढकल, विनाकारण किवा नात्यातील अपरीपक्वतेमुळे तुटणारी ‘लग्न‘ निश्चितच वाचवू शकतो!
- डॉ. कौस्तुभ लेले, सावंतवाडीविवाहपूर्व तयारी - स्वतःची!
विवाह.... आयुष्यातल्या एका नव्या अध्यायाची सुरुवातच जणू! अशी नवी-नवी सुरुवात करण्यासाठी कोणती व कशी पूर्वतयारी करावी, ही हुरहुर प्रत्येक विवाह इच्छुक मनामध्ये दाटत असते. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी, दुःख निम्मे करण्यासाठी आणि खरे तर आपल्या निसर्गातल्या अस्तित्वाचा अर्थ जगण्यासाठी जेव्हा, ‘मला लग्न करायचंय‘ असा विचार मनात रुजतो आणि पक्का होतो तेव्हा या अज्ञात प्रदेशाची माहिती देण्यासाठी आपण अनेक आप्तस्वकीयांशी हितगुज करु लागतो. त्यातून या पूर्वतयारी विषयी बरीच उत्तरंही मिळू लागतात. मग कधीकधी होतं काय की अनेकांकडून ऐकलेले अनेक विचार मनात सुसूत्रतेने बांधले न गेल्याने विचारांत गोंधळ निर्माण होतो आणि कुठूनशी एखादी महत्वाची माहितीसुद्धा दुर्लक्षित होते. या सर्व शक्यतांचा विचार मनात गृहीत धरुनच हा लेखप्रपंच. सप्तपदी चालण्यापूर्वी कोणत्या पायघड्यांवरुन जायचं असतं हे आता जाणून घेऊयात-
मनावर कायमचा ठसा उमटविणा-या आणि मनुष्याच्या व्यक्तिमत्वातील हर एक पैलू विकसित करणा-या हिदू संस्कृतीतील १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कारे - विवाह संस्कार! हे संस्कार अगदी पुरातनकाळापासून आपापल्या मुलांवर आई वडील करीत आले आहेत आणि त्यात इतर वडीलधारी मंडळींनीही मोलाचा वाटा उचलला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या अपत्यांचा विवाह लावून देणे ही केवळ वडीलधा-यांची जबाबदारी होती, पण आजच्या विज्ञान आणि तंत्रयुगातील स्वतंत्र विचारांची तरुण पिढी ही स्वतःच्या विवाहाविषयी अधिक विशाल दृष्टिकोन बाळगत सजग झाली आहे. त्यामुळेच की काय स्वतःच्या विवाहाच्या पूर्वतायारीत ती स्वतःलाही अधिक समंजसपणे सामील करुन घेत आहे. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्यभराकरिता सुयोग्य साथीदार मिळवणं-निवडणं ही त्यांची स्वतःची मोलाची जबाबदारी आहे. आजच्या या आधुनिक युगात यासाठी परदेशांमध्ये घ्द्धड्ढद्रठ्ठद्यठ्ठद्यत्दृद ढदृद्ध थ्र्ठ्ठद्धद्धत्ठ्ठढड्ढ सारखे कोर्सेस चालविले जातात आणि आता तर भारतातही विवाहपूर्व समुपदेशन करणा-या संस्था आपले कार्य करीत आहेत. शहरी भागातील अनेक उच्चविद्याविभूषित तरुण-तरुणी याचा लाभही घेत आहेत.
माझ्या विवाह इच्छुक सखी आणि मित्रांनो, आपण येथे या सर्व विवाहपूर्व स्वतःच्या तयारीच्या पैलूंचा बारकाईने विचार करुया.
शारिरीक पातळीवरचा विचार-
विवाहपूर्व स्वतःची तयारी करताना जोडीदाराची निवड करणे त्यासोबत विचार होतो तो विवाहाकरिता स्वतःची अनुकूल अशी शारिरीक, मानसिक व आर्थिक पातळीवर तयारी करण्याचा.
स्वतःचा जोडीदार निवडणं ही भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची जबाबदारी असते. म्हणूनच येथे भावनिक होऊन नकळतपणे चुकीचा निर्णय न घेता थोडा दूरदृष्टिकोन बाळगूनच पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा. जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपण आपला भावी जोडीदार म्हणून विचार करीत असतो तेव्हा केवळ प्रेम व आकर्षणाची पट्टी डोळ्यांवर जर बांधली गेली असेल तर त्या विशिष्ट व्यक्तिविषयी आपल्याला जे पहायला आवडणार नाही ते आपल्याकडून पाहूनही न पाहिल्यासारखे केले जाते आणि अर्थातच निर्णयात वास्तवापासून फारकत घेतली जाते. अशावेळेस एकच विचार सर्वप्रथम मनात आणावा की उद्या या व्यक्तीला आपण आपला जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात स्थान देऊ तेव्हा आपलं आयुष्य आपल्याच नजरेतून स्वतःला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कैक पाय-या उंचीवर जाणवलं पाहिजे. कारण आपण समोरच्याच्या फक्त शरीराशी नव्हे तर त्याच्या/तिच्या विश्वाशीसुद्धा विवाहबद्ध होत असतो.
याची सतत जाणीव ठेवावी की विवाहानंतर एकमेकांवर सर्वांत मोठी जबाबदारी असते ती घर सांभाळण्याची व घर चालवण्याची. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी अर्थातच आपले आरोग्याचे बाहूही तितकेच मजबूत हवेत. यासाठीच विवाहापूर्वी मुलाने व मुलीने विश्वासार्ह आरोग्यतज्ज्ञांकडून स्वतःच्या रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
तसेच दोघांच्या घरी एखाद्या अनुवंशिक आजाराचा इतिहास आहे का हेही विवाहापूर्वी जाणून घ्यावे. मुळातच दोघांनाही शक्यतो कोणतेच व्यसन असू नये आणि असल्यास ते विवाहापूर्वीच सोडले जाईल याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कारण कोणत्याही व्यसनांचे दुष्परिणाम हे त्यांच्या तीव्रतेनुसार पुढील चार-पाच पिढ्यापर्यंत जनुकांमार्फत पोहोचवले जातात.
पालकांचे आरोग्य जितकं उत्तम असतं तितकंच उत्तम आरोग्य होणा-या संततीला लाभतं. सध्याच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जगात बाळाला समर्थपणे उभं करायचं असेल तर विवाहीत जोडप्याने देहशुद्धी व पर्यायाने बीजशुद्धी करुन घ्यावी. त्याकरिता आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीनुसार पंचकर्मासहितचे विविध उपाय करावेत.
विवाह ठरविताना केवळ शारिरीक सौंदर्याचे निकष लावू नयेत. शरीरापेक्षाही अनेक पटीने अधिक महत्वाचं ठरतं मनाचं सौंदर्य, जे चेह-यावरच्या स्मितहास्यातून आणि नजरेतल्या आनंदी भावातून स्पष्टपणे जाणवतं. शारिरीक सौंदर्याचा विचार हा दुय्यम पातळीवरच ठेवावा. केवळ ‘शारिरीक सुखांचा विचार करुन विवाह करणं‘ हे उथळ मनाचे लक्षण आहे. असे विवाह अर्थातच भविष्यात दुःखदायी होतात. विवाह म्हणजे स्वैराचार नव्हे, तर विवाह म्हणजे जबाबदारीचं भान ठेवून उपभोगलेला विवाहातील स्वातंत्र्याच्या अत्तराचा सुगंध सहजीवनाला पुलकित करतो.
अजून एक मुद्दा आहे - वयाचा. हे सर्वमान्य आहे की लग्नाच्या वेळी मुलाचे वय मुलीच्या वयाच्या ३-४ वर्षांनी अधिक हवे. कारण मुलीची शारिरीक वाढ ही मुलांच्या शारिरीक वाढीपेक्षा ३-४ वर्षे लवकर पूर्ण होत असते आणि त्यामुळे तिची मानसिकता ही मुलाहून अधिक प्रगल्भ असते. मुलीचे वय जर अधिक असेल तर हे जरुर पाहावे की ती मुलगी मनाने (मानसिकतेने) व उत्साहाने वयाच्या मानाने अधिक तरुण आहे का आणि तो मुलगाही त्याच्या समवयीन मुलांहून मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व आर्थिकदृष्ट्या सबळ आहे ना!
मानसिक पातळीवरचा विचार-
विवाहपूर्व तयारी करताना संयम, सहनशीलता, क्षमाशीलता, आनंदी वृत्ती, आधार देण्याची वृत्ती अशा सर्व गुणांची जोपासना करावी. आपल्याला आपला जोडीदार जितका गुणवान हवा तितके गुण आपल्याकडेही आहेत का ते पाहावे. निवडलेल्या जोडीदारासोबत समंजस चर्चा करुन विवाह अधिक सुखकर करण्यासाठी एकमेकांचे गुण जपत दोष दूर करण्याचे उपाय अंमलात आणावेत.
विवाह करण्यासाठी शारिरीक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता असणे आवश्यक आहे. विवाह करताना आयुष्यातील इतर प्राधान्यक्रमांची निश्चिती असणे, व्यावसायिक ध्येय व उद्दिष्ट ठरवलेले असणे व शिस्तीचा अवलंब करत ते मिळविणे आणि मुख्यतः विवाहाच्या मूळ उद्देशाबाबत जागरुक असणे. यामुळे मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता निश्चितच विकसित होते. यासाठी विवाह म्हणजे समर्पण, वचन याची जाणीव असणे महत्वाचे असते.
आता जसे वरील गुण आवश्यक आहेत तसेच पुढील दोष टाळणेही तितकेच महत्वाचे आहे. समोरच्याच्या बारीक-सारीक चुकांवर लक्ष ठेवून असणे, जोडीदाराचा अपमान करणे, सतत बदलणा-या मुडमुळे समोरच्याला दुखावणे, साशंकता, हटवादीपणा, हेकेखोरपणा, हुकूमत गाजवणे, कुत्सितता, असूया, अहंकार, भावनाहिनता हे ते दोष होत.
म्हणूनच एकमेकांना गृहीत न धरता एकमेकांच्या गुणांची व मदतीची जाणीव ठेवणे व ती खुल्या मनाने बोलून दाखवणे, मतभेद होण्याअगोदरच स्वतःहून वेळीच माघार घेणे, एकमेकांपासून कोणतीही वैयक्तिक गुपिते न ठेवणे (केवळ व्यावसायिक गोपनीयता सोडल्यास) या सर्व छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण कृतींचा अवलंब विवाहातील व सहजीवनातील विश्वासार्हता जपण्यास खूप मदत करतो. एकमेकांना योग्य त-हेने वेळप्रसंगी सांभाळून घेणे, आवश्यकता असताना मायेची उब देणे जरुरीचे आहे, हे जोडीदाराला जाणवून देणे या सर्व गुणांमुळे सहजीवनात आनंद टिकवता येतो आणि पती-पत्नीचं हे नातं नेहमीच टवटवीत राहतं.
एक वेगळा विचार येथे आवर्जून मांडावासा वाटतो. विवाह करताना शक्यतो स्वतःशी समकक्ष वैचारीक पातळी असणा-या व्यक्तीबरोबरच विवाह करावा. कारण थोडा नीट विचार केला तर असे आढळून येते की जेव्हा-जेव्हा दोघांना एखाद्या महत्वाच्या निर्णयाप्रत यायचे असते तेव्हा वैचारिक समानता असेल तर एकमेकांशी समान पातळीवरची चर्चा करुन एकमताने निर्णय घेता येणे सोपे जाते. कधी कधी होते काय की, आपला जोडीदार जेव्हा त्याच्या कामाबद्दलच्या समस्या आपल्याला सांगत असतो तेव्हा आपल्याकडून त्याला त्याच्या बौद्धिक पातळीनुसारचे निराकरण, सहानुभूती आणि समजूतदारपणा साहजिकच अपेक्षित असतो. त्याला हवा असतो त्याच्या विचारांना पटेल असा सल्ला. समविचारकक्षा असतील तर हा नैतिक पाठिबा आपण नक्कीच देऊ शकतो आणि त्या महत्वाच्या क्षणांनी आपले सहजीवन अधिकच आनंदी व समाधानी बनवू शकतो. अशा प्रकारे या वैचारीक समकक्षतेमुळे सर्व कुटुंब सुखी बनतं. आता पुन्हा एकदा विवाहपूर्व तयारीतील काही भाग जाणून घेऊयात.
शक्यतो लग्नाअगोदर एकमेकांच्या घरी व मित्रपरिवारात थोडे मिसळून पहावे, कारण आपला साथीदार समाजात कसा वावरतो हे त्यामुळे कळतेच, शिवाय त्याचे अज्ञात गुणही समजू लागतात. मुलीने हे पहावे की मुलाला त्याच्या आईविषयी आदर व प्रेम आहे की नाही. कारण असा मुलगा स्वतःच्या पत्नीविषयीही आदर व प्रेम बाळगणारा असतो आणि मुलाने हे पाहावे की मुलीला लहान मुलांविषयी ओढ व माया आहे का नाही. कारण अशी मुलगीच उत्तम माता बनू शकते. लक्षात ठेवावे की आपण आपल्या समोरच्यामध्ये केवळ चांगला जोडीदारच नाही तर एक उत्तम आई-वडीलही शोधत असतो.
आर्थिक पूर्वतयारीचा विचार-
लग्न करण्यापूर्वी दोघांनीही बचत करण्याची सवय जाणीवपूर्वक जोपासण्याची गरज असते. कारण विवाहानंतर येणा-या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, आजारपणातील खर्च, अचानक उद्भवणारे खर्चाचे प्रसंग, घर चालवणे आणि तरीही यातून आनंद मिळवण्यास कधी गृह सजावट तर कधी ट्रिप्स काढणे या सर्वांसाठी पैशांची अगोदरच बचत करणे आवश्यक असते. काटकसर जरुर करावी. पण कंजूषपणा नको आणि यासाठीच हॉटेलिग, सिनेमा यांसारख्या महागड्या गोष्टींची सवय असेल तर ती जरुर दूर करावी. लॉटरी, सट्टा अशी व्यसनं तर पूर्णपणे टाळावीत.
थोडक्यात सांगायचं झालं तर, लग्नासाठी सुयोग्य असा जोडीदार निवडणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यासाठी सर्वकष पूर्वतयारी करणंही महत्वाचं आहे. अशी पूर्वतयारी करणं हे लग्नाच्या निमित्ताने जणू आजवर जगलेल्या आयुष्याचं सिहावलोकन करुन स्वतःचं शारिरीक आणि मानसिक सौंदर्य, आरोग्य आणि प्रगल्भत्व वृद्धिगत करण्यासारखंच आहे. होय ना?
- डॉ. अनुराधा वा. थिटे

आद्य मराठी पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण‘ या वर्तमानपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्यास १७० वर्षे झाली. बाळशास्त्रींचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या खेडेगावात झाला. वडील व्युत्पन्न ब्राह्मण. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण, वेदाध्ययन, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास गावीच झाला. पुढे मुंबईत आल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला मोठा वाव मिळाला. महाराष्ट्रातील पहिले आद्य पत्रकार म्हणून आजची पीढीही त्यांचा गौरवाने उल्लेख करीत असली तरी ते इतर अनेक विषयात प्रकांड पंडित होते. भारतातील पहिले गणिताचे प्राध्यापक, इतिहासकार, भूगोलतज्ञ, एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ७ संस्थापकांपैकी एक, समाज सुधारक, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अशा विविधांगी पैलूंचे दर्शन त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमधून दिसते. त्यांच्या जांभेकर कुटुंबातील गणेश गंगाधर जांभेकर यांनी ‘पश्चिम भारतातील नवयुग प्रवर्तक आचार्य बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर‘ या नावाने चार ग्रंथ लिहिले आहेत. ते ४ जानेवारी १९२८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाच्या प्रास्ताविकात इंग्रजी, मराठी आणि संस्कृतमध्ये श्लोक स्वरुपात ८ चरणांमध्ये बाळशास्त्रींची जी महती कथन केली आहे ती त्या काळच्या मराठी भाषेच्या शैलीत येथे दिली आहे.
आङ्ग्लसत्ताधिष्ठि महाराष्ट्र देशात बाळ गंगाधरशास्त्री नामक राष्ट्रोन्नतिसाधक थोर नरवीर निर्माण झाला ।।१।।
ह्या जांभेकर कुलश्रेष्ठाला ‘बालबृहस्पती‘, ‘आद्याचार्य‘ असे संबोधिले आहे ।।२।।
हा अतुल गणिती व निष्णात ज्योतिषी होता; प्राच्य व पाश्चात्य शास्त्रे यांस अवगत होती आणि याला बारा भाषा येत होत्या ।।३।।
हा शिकविण्यात अत्यंत कुशल, दानशील, समदर्शी व सज्जन होता. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, केरु नाना छत्रे, दादासाहेब तर्खडकर हे याचे प्रसिद्ध शिष्योत्तम होत ।।४।।
ह्याने व्याकरण, भूगोल, इतिहास, शून्यलब्धिगणित इत्यादी विषयांवर ग्रंथरचना केली आणि मराठी गद्याला योग्य वळण लावणारा ग्रंथकार म्हणून हा सर्वमान्य होता ।।५।।
हा ‘दर्पण‘चा व ‘दिग्दर्शन‘चा निर्माता असून आपल्या उपदेशाने महाराष्ट्राला जागे करणारा हाच पहिला मान्यवर संपादक होय।।६।।
प्राचीन लिपिलेख लावणारा व नाना राष्ट्रेतिहास जाणणारा आद्य भारतीय पुराणेतिहास संशोधक म्हणून याची गणना आहे।।७।।
हा संस्कृत भाषेत निपुण असून स्वभाषा व स्वधर्म यांचा पुरस्कर्ता होता. पाठभेदयुक्त ज्ञानेश्वरी यानेच प्रथम प्रकाशित केली, अशी याची ख्याती आहे ।।८।।
वरील परिच्छेदातून बाळशास्त्रींचे व्यक्तिमत्व केवढे विशाल होते याची कल्पना येते. एवढ्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा बालबृहस्पती मराठी भाषेला लाभला हे मराठीचे भाग्यच होय.
बाळशास्त्रींना इंग्रजी, मराठी, संस्कृत याबरोबरच गुजराती, पार्शी, बंगाली या भाषाही अवगत होत्या.
दर्पण वृत्तपत्र काढण्यामागची त्यांची प्रेरणा ही स्वदेशाभिमान हीच होती. त्याचबरोबर समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी दर्पणद्वारे केले. हे वृत्तपत्र त्यांनी मोठ्या स्वार्थत्यागाने चालविले. परंतु आर्थिक अडचणींमुळे ते १८४० साली बंद करावे लागले. नंतर त्यांनी ‘दिग्दर्शन‘ नावाचे मासिक सुरु केले. लोकशिक्षणाच्या दृष्टीने या मासिकाचा त्याकाळी फार उपयोग झाला.
अशा या प्रकांडपंडित बालबृहस्पतीचा मृत्यू आकस्मीक आजाराने १८ मे १८४६ ला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी झाला. एवढ्या लहान वयात त्यांनी केलेले लेखनाचे आणि प्रबोधनाचे काम प्रचंड आहे. या थोर आद्यपत्रकाराला कोटी कोटी प्रणाम!
पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी त्यांच्या वंशजांकडून उपलब्ध झालेल्या जागेवर एक सभागृह त्यामध्ये बाळशास्त्रींचा अर्धपुतळा अशा स्वरुपाचे स्मारक ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी‘ या फलटण येथील संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे उभे राहिले आहे. या संस्थेचे कार्याध्यक्ष रविद्र बेडकीहाळ यांनी या कामासाठी आपल्या पत्रकार सहका-यांच्या मदतीने निधी उभा करुन हे स्मारक उभारले आहे. दरवर्षी ६ जानेवारीला याठिकाणी पत्रकार दिन साजरा केला जातो.
या गावी जाण्यासाठी चांगला रस्ताही नव्हता. तेथील ओढ्यावर पूल बांधून आता तरळा-विजयदुर्ग मार्गावर एक बाजूला असलेल्या या पांभुर्ले गावातील बाळशास्त्री स्मारकापर्यंत जाता येते.
पत्रकार कल्याण निधीला या कामी महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे तसेच शासनाचेही सहकार्य लाभले. ग्रामस्थांचे आणि जांभेकर कुटुंबियांचेही चांगले सहकार्य या कामी मिळाले.
बाळशास्त्रींच्या द्विशताब्दीनिमित्त तरळे-विजयदुर्ग मार्गाला बाळशास्त्रींचे नाव देण्याची मागणी
बाळशास्त्री जांभेकर यांची २०० वी जयंती १६ फेब्रुवारी २०१२ रोजी येत आहे. त्यानिमित्ताने तरळे-विजयदुर्ग या राज्यमार्गाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन पुणे येथील ‘जांभेकर प्रतिष्ठान‘ या संस्थेतर्फे शासनाला देण्यात आले आहे.

माझ्यातला ‘मी‘
समाजामध्ये वावरतांना जो तो स्वतःमधला ‘मी‘ जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. या ‘मी‘ पणाला धक्का लागू नये म्हणून तो सदैव जागरुक असतो. ‘मी‘पणा शाबूत ठेवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करण्याची त्याची तयारी असते.
कुटुंबात जेव्हा मी मोठा असतो तेव्हा आपसूक माझा मीपणा जोपासला जातो. कुटुंबातील लहानथोरांमधला सहभाग, सुखदुःखाचे क्षण, यशापयशाची गोळाबेरीज, अनेक कौटुंबिक समस्या, कर्तव्ये, नैमित्तिक समारंभाची आखणी अशा विविध घडामोडींमधून सर्वांशी समरस होऊन कौटुंबिक स्वास्थ आणि सौख्याचा आनंद घेऊ शकतो.
या उलट माझ्यातला ‘मी‘ संकुचित झाल्यास मात्र आफत ओढावते. संकुचितपणामुळे एकाकी पडून कौटुंबिक सुखांना पारखा होतो. समाजातून जनप्रवाद निर्माण होतात.
‘मी‘ पणाची बाधा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाभारतात धृतराष्ट्राचा ‘मी‘ पणा आडवा आला. आत्मकेंद्रीत धृतराष्ट्र आणि त्याचे उद्दाम पुत्र यामुळे संकुचितपणा वाढला. पर्यायाने दग्धयोगाची व्याप्ती वाढून महाभारताचे युद्धपर्व लादले गेले.
मी समाजाचा आणि समाज माझा या व्यापक वृत्तीने वावर असल्याने सामाजिक बांधिलकीपासून ‘मी‘ मागचा अर्थ उमगण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील किती तरी बोलकी उदाहरणे उपलब्ध होतील.
माझ्याकडे घरकाम करणारी सालस स्वभावाची बायजा. अठराविश्वे दारिद्रय, दारुडा नवरा आणि पदरी चार पोरांचे लोढणे घेऊन निगुतिनं संसार रेटायची. अपार कष्ट अन् दारुड्या नव-याकडे दरगुजर करुन गुजराण करायची.
सणासुदीला काही गोडधोड खायला दिलं की ते बायजेच्या घशाखाली उतरत नसे. मोठ्या आत्मियतेने ते गोडधोड घरी नेऊन सर्वप्रथम नव-यावा वाटा वेगळा काढून मुलांना भरवायची आणि नंतर उरल्यास एखादा घास तोंडात टाकायची. बायजेमधल्या ‘मी‘ तिच्या स्वतःपुरता कधी मर्यादित नव्हता. तिचा मीपणा अवघ्या कुटुंबात सामावला होता.
या उलट तिचा नवरा ऐदी, ऐषारामी. दारुमुळं तर्रर्र झालेल्या त्याच्या डोळ्यांना बायकोचे कष्ट कधी दिसलेच नाहीत. उपाशी मुलांच्या अगतिक नजराही त्याला वितळू शकल्या नाहीत. बायकोला धुत्कारुन, मारझोड करुन पैसे हिसकावणे हाच त्याचा पुरुषार्थ. संकुचित ‘मी‘ पणाचं एवढं ज्वलंत उदाहरण पुरेसं आहे.
रंगभूमी गाजवलेले एक प्रसिद्ध नटवर्य विदर्भात नाटकाच्या दौ-यावर होते. पहिला प्रयोग सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचा मोबाईल किणकिणला. मातोश्रींच्या दुःखद निधनाची बातमी होती. क्षणभर ते विचलीत झाले असतील. दुस-याच क्षणी पडदा वर गेला अन् त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. नंतरचे तीन तास नेहमीप्रमाणे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. नाटक संपताच रात्री सर्व मंडळी जेवायला बसली असता नटवर्यांनी कटाक्षाने सारे गोड पदार्थ बाजूला सारले. सर्वांना अचंबा वाटला. खोदून विचारलं असता नटवर्य शांतपणे म्हणाले, ‘तासाभरापूर्वी माझ्या मातोश्री गेल्याचा फोन आला. त्यामुळे या क्षणापासून माझं अशौच सुरु झालं. पण मी प्रयोगात खंड पडू देणार नाही. माझ्यावरल्या लोभापोटी नाट्यगृहात गर्दी करणा-या प्रेक्षकांचा हिरमोड कदापी करणार नाही. माझ्या मातोश्री वृद्ध होत्या. व्हायचं ते झालं.‘ नटवर्यांचा ‘मी‘पणा व्यापक होता. त्या व्यापकतेमुहे नाट्यगृहातला प्रेक्षकवर्ग त्यांच्यामध्ये सामावून गेला होता.
संकुचित ‘मी‘ पणाची मुबलक उदाहरणं सापडतील.
सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत असलेली उच्चशिक्षित पती-पत्नी, दोघांनाही भरपूर पगार. त्यामुळं आर्थिक सुबत्ता. तथापी, दोघांच्याही कामाच्या वेळा अलग अलग. सकाळी कामाला गेलेली ‘ती‘ तिन्हीसांजेला घरी परतणार तोवर संध्याकाळी ड्यूटीवर जाण्याकरीता पतिराज सिद्ध. दोघांनाही मोकळेपणा मिळेना. एकत्र येणे तर अशक्य. हळुहळू दुरावा निर्माण होऊन दोघांमधले दर्पित उद्गार, ताणतणाव वाढीला लागले. क्षणोक्षणी उफाळून येणा-या ‘मी‘पणामुळे दोघांमधला सुसंवाद संपुष्टात येऊन संसाराला ग्रहण लागले.
एकत्र कुटुंबात ‘मी‘ कधीही हरवत नाही इतका तो व्यापक असतो. कुटुंबातील लहानथोर सदस्यांमध्ये सर्वदूर सामावलेला असतो. ‘मी‘ पणाच्या समानशीलतेमुळे कौटुंबिक वातावरण पोषक अन् मोकळंढाकळं असतं.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ या उक्तीनुसार भरल्या कुटुंबात देखील एखाद्याचा ‘मी‘ संकुचित असल्यास समस्या निर्माण होतच राहतात. त्याला पायबंद घालणे हे कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य ठरते. संकुचित वृत्तीच्या अन् तोकड्या विचाराच्या व्यक्तीने अंतरंगात डोकावून स्वतःच्या ‘मी‘ पणाचा शोध घ्यायला हवा म्हणजे ‘मी‘ पणाचे सावट चुटकीसरशी दूर होईल.
अरुण सावालेकरविशेष बातम्या *
नगरपरिषद सभापती निवड बिनविरोध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत असलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. नियोजन, पर्यटन, पर्यावरण समिती सभापतीपदी - प्रसन्ना कुबल, सदस्य -अवधुत वेंगुर्लेकर, सौ. फिलोमिना मॅक्सीमन कार्डोज, आरोग्य, क्रीडा, ज्येष्ठनागरिक कल्याण समिती सभापतीपदी - मनिष अनंत परब, सदस्य-शैलेश गुंडू गावडे, सौ.पद्मिनी जगन्नाथ सावंत, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी डॉ. सौ. पूजा राजन कर्पे व उपसभापतीपदी सौ. अन्नपूर्णा नार्वेकर, सदस्य- सौ. चेतना विलास केळुसकर, पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमण शंकर वायंगणकर, सदस्य - वामन धोंडू कांबळे, सौ. सुलोचना शशिकांत तांडेल याप्रमाणे निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरविद वळंजू यांनी काम पाहिले.स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष सौ. नम्रता नितीन कुबल या समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असून उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, सभापती - प्रसन्ना कुबल, मनिष परब, पूजा कर्पे हे पदसिद्ध सदस्य आहेत. नगरपरिषदेचा बांधकाम विभाग या समितीकडे राहील.

सभापती निवडीत सावंतवाडी, मालवण राष्ट्रवादीकडेच
सावंतवाडी नगरपरिषदेतही शंभर टक्के राष्ट्रवादी असल्याने तेथील विषय समिती सभापतींची निवडणुक बिनविरोध झाली. विलास जाधव, राजू बेग, सुधन्वा आरेकर, अनारोजीन लोबो हे सभापती झाले.
मालवणात मात्र राणे समर्थक काँग्रेसने रडीचा डाव सुरुच ठेवला आहे. मालवण न.प.मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष अशी शहर विकास आघाडी स्थापन करुन या आघाडीचे गटनेते आपटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नितीन वाळके यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासह पालिकेतील तीन्ही सभापतीपदे आपल्याकडे राखून राष्ट्रवादीने काँग्रेसला शह दिला आहे. वाळकेंच्या स्विकृत सभासद अर्जावरही काँग्रेसने आक्षेप घेतला. पण तो फेटाळला गेला. आता शहर विकास आघाडी बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.आमदार वि. प. नेते विनोद तावडे यांच्या दौ-याने भाजप ‘चार्ज‘
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी सर्व तालुक्यांमध्ये भाजप - सेना युतीतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील वनजीवन, कुळकायदा, तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून ती पूर्ण करण्यास भाग पाडणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. सर्व तालुक्यांतून भारतीय जनता पक्षाची संफ केंद्रे सुरु करण्यात आली असून त्या मार्फत सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून गरजूंना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते करतील असे त्यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा पक्षाला फायदा झाल्याचे सांगून भाजपा विकास कामांना पाठिबा देतानाच प्रसंगी चुकीच्या गोष्टींना विरोध करुन सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी करण्याचे अधिकार भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांना असतील अशीही त्यांनी घोषणा केली.

खानोली सरपंचपदी महेश प्रभू खानोलकर
खानोली ग्रामपंचायतीचे सरपंचपद विद्याधर प्रभू आणि महेश राधाकृष्ण प्रभू खानोलकर यांनी अडीच अडीच वर्षे सांभाळावे असे ठरले असतांना प्रथम सरपंच झालेले काँग्रेसचे विद्याधर प्रभू यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा देण्याचे नाकारले. शेवटी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर ३१ डिसेंबरला महेश प्रभूखानोलकर यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सहकार्य मिळाल्याचे आभार व्यक्त करतांना सांगितले.

पार्सेकर मंडळाचे नवीन दशावतारी नाटक संत चोखामेळा
पारंपारीक दशावतारी नाटकाला अत्याधुनिकतेची जोड देत सात ट्रीकसीनच्या समावेशात खानोली - सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनाच्या ठिकाणी पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेल्या ‘संत चोखामेळा‘ दशावतारी नाटकातील ‘विराट स्वरुप देवदर्शन‘ बरोबर अन्य सहा ट्रीकसीनमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. या कलेची लोकप्रियता वाढविण्यासाठी या दशावतार मंडळाचे मालक प्रभाकर पार्सेकर यांनी आपल्या मंडळातील कलाकारांना दिलेल्या प्रोत्साहनातून राधाकृष्ण नाईक या कलाकाराने संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारीत घटनांचा आढावा घेत दशावतारी नाटक सादर केले.
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतनाचे मठाधिपती प. पू. दादा पंडित यांच्या हस्ते पार्सेकर दशावतारी मंडळाच्या नाटकाचा शुभारंभ झाला. ‘संत चोखामेळा‘ नाटकात प्रमुख भूमिका राधाकृष्ण नाईक, आनंद नार्वेकर, बाबा कामत, चारुदत्त तेंडोलकर, रामचंद्र रावले, रमेश करंगुटकर, पपू नांदोस्कर, राजू हरियाणा, बाळू कोचरेकर यांनी साकारल्या आहेत.

अभिनंदनीय *
डॉ. सुरेश बोवलेकर
मुंबई आणि बंगलोर येथे कार्यरत असलेल्या ‘फार्मानेट क्लिनिकल सव्र्हस प्रा. लि.‘ या अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ.सुरेश बोवलेकर यांची ‘सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट‘ (एस.सी.डी.एम) या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळावर २०१२ आणि २०१३ या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे. या नियामक मंडळावर नेमणूक झालेले डॉ. सुरेश बोवलेकर हे दुसरे भारतीय नागरीक आहेत. सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (एम.सी.डी.सी.) ही औषधांच्या चाचणी करतांना गोळा केलेल्या माहितीचा दर्जा उत्कृष्ट प्रकारचा असावा यासाठी झटणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था जगातील सुमारे ४० देशामध्ये कार्यरत असून या सर्व देशातील मिळून सुमारे २६०० सभासद आहेत. डॉ.बोवलेकर हे दाभोली - वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.डॉ. सतीश घाडी
‘प्रिव्हेंटीव्ह कॉर्डिऑलॉजी‘ या विषयावर ८ जानेवारीला अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मुंबईतून डॉ. सतीश घाडी यांची निवड झाली आहे. बायपास सर्जरी कशी टाळता येईल या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ. घाडी भाग घेणार आहेत. डॉ. सतीश घाडी हे वेंगुर्ल्याचे सुपूत्र असून ‘किरात‘चे आजीव सभासद आहेत.धार्मिक *
रामेश्वर मंदिरात माघी उत्सव
श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शु.१, मंगळवार दि. २४-१-२०१२ ते माघ शु. ६, रविवार दि. २९-१-२०१२ पर्यंत श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन दिन उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दि.२४-१-२०१२ रोजी उत्सवास प्रारंभ. श्री देवी सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे सवाद्य आगमन,श्रीदेव रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक. दि. २५-१-२०१२ रोजी श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव, सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा.
दि. २६-१-२०१२ रोजी श्रीदेव नागेश्वराचा वर्धापनदिन उत्सव, श्री नागेश्वरावर लघुरुद्र अभिषेक, श्री वरदशंकर व्रतपूजा. श्री नवचंडी देवता स्थापना, नवचंडी पाठवाचनास सुरुवात. श्री गणेश जयंती उत्सव, २१ पार्थीव गणपतींची स्थापना व त्यानंतर २१ गणेशयाग (हवन) पुर्णाहुतीसह.
दि.२७-१-२०१२ रोजी नवचंडी पाठवाचन. संध्याकाळी ४ वाजल्यापासून स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ.
दि. २८-१-२०१२ रोजी श्री देवी भगवती वर्धापनदिन उत्सव, श्री नवचंडी हवनयुक्त. सकाळी १० वाजल्यापासून कुंकूमार्चन. श्री नवचंडी हवनाची पुर्णाहूती.
दि.२९-१-२०१२ रोजी दुपारी १२ वा. श्री बारापाच देवतांस महानैवेद्य, त्यानंतर आरती, गार्‍हाणे व सर्व लोकांस महाप्रसाद देण्यात येईल.
भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा व ‘श्रीं‘ च्या दर्शनाचा तसेच उत्सव सांगतेच्या दिवशी ‘महाप्रसादाचा‘ अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत रोज रात्रौ ८ वा. श्री गणेश, श्री भगवती, श्री नागनाथ, श्री दत्त या देवतांची भजनासहीत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

No comments:

Post a Comment