Saturday, 3 December 2011

अंक ४३वा, २४ नोव्हेबर २०११

अधोरेखित *

मंदीर संस्कृतीचं कोकण

माणूस का फिरतो?

पोटासाठी.आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चारितार्थासाठी तो स्तलांतरीतही होतो. एका ठिकाणी स्थिर झालेला माणूस नित्याच्या चाकोरीला कंटाळतो. आणि मग तीर्थयात्रा म्हणा अगर प्रदेशाची यात्रा करतो. मनुष्य समुहप्रिय प्राणी आहे. त्याला आपल्यासारखीच माणसं पहायची असतात. या भूतलावर विविध पर्यावरणं आहेत. त्या त्या पर्यावरणात माणूस कशाप्रकारे जुळवून घेतो हेही त्याला समजून घ्यावंसं वाटतं.

पूर्वीच्या काळी कशासाठीही असो, भ्रमण म्हणजे पदयात्राच असायच्या. हत्ती, घोडे, बैल, उंट कोणी विशेष लोक वापरीत. पण त्या जनावरांच्या अखेरी पदयात्राच ना! गेल्या दोन अडीचशे वर्षात माणसाचं जीवनमानच बदललं. वाहनांच्या सोयी, व्यापार, अन्न ग्रहणाच्या तर्‍हा आणि नित्याचे आचार सगळंच बदललं. शिक्षण, नोकर्‍या आणि नोकरदारांचं प्रमाण वाढलं. या भूतलावर जाणून घेणार्‍याला अज्ञात जग असं फारच थोडं राहिलं. भुगोलाची जाण आणि भ्रमणाचं भान आले. माणसं फिरु लागली. नवनवीन भ्रमण स्थळं शोधू लागली.

तसं पाहिलं तर भ्रमंत्याला आपला प्रदेश सोडून दुसरा कुठलाही प्रदेश नवीनच. तरी त्यात भूमीचं वेगवेगळं सौंदर्य आणि त्याची विविधता कळू लागली तशी पावलं तिकडे वळू लागली. काश्मीर, केरळ, कुलू-मनाली, काझीरंगा, वेरुळ-अजंठा अशी पर्यटन स्थळं नजरेत आली. त्यातच कोकणही आलंच. विशेष करुन दक्षिण कोकण, गोवा हा कोकणचाच भाग. तसाच.

पूर्वी काशी, रामेश्वर, द्वारका, पुरी, कुरुक्षेत्र, अमरनाथ, मानस-कैलास अशी क्षेत्र यात्रेसाठी निवडली जात. त्यांचं महत्व कमी झालं असं नाही. परंतु सर्वच पर्यटकांची ती धार्मिक ओढ राहिली नाही. काहींना विरंगुळा हवाच असतो आणि बरोबर जिज्ञासाही जागृत असते. तिथलं तिथलं पर्यावरण आणि त्याच्याशी जुळवून घेणारी तिथली माणसे पर्यटकाला समजून घ्यायची असतात. त्या दृष्टीनं आपल्याकडे निसर्गानं किती बाबी दिल्या आहेत.

एक म्हणजे खडकांनी, खाड्यांच्या मुखांनी आणि मऊसूद वेळागरांनी (बीच) समृद्ध असलेला सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. दुसरं सिधुदुर्ग, विजयदुर्ग, यशवंतगड, रामगड, रांगणा, मनोहर मनसंतोषगड यासारखी ऐतिहासिक स्थळं आहेत. पश्चिमेला समुद्र तर पूर्वेला आंबोली, चौकुळ, गगनबावड्यासारखी थंड हवेची ठिकाणं असलेला सह्याद्रीचा पहाड आहे. दशावतार, भोरीप (नामशेष झालेला कलाप्रकार), चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या सारख्या लोककलांचं माहेरघर तर रामगडातील दगडातून कोरलेली भांडी-दगड्या, पेले, आंबोळ्यांसाठी आणि हाप्यांसाठी उपयोगात येणारी भिडी साठ-सत्तर वर्षांपूर्वी इथून बाहेर जात. आकेरी गावचं सोनवडेकर घराणं दगडी मूर्तींसाठी प्रसिद्ध होतं. तुळस गावातील इरली आणि बोंडगीच्या पातीच्या सुबक छत्र्या, चिकण मातीची आकर्षक भांडी, माठ, तुळसी वृंदावने सावंतवाडीची पांगार्‍याच्या लाकडांची रंगीत खेळणी आणि विशिष्ट कार्डांवर तयार केलेल्या गंजिफा सोंगट्या आणि तांबुलपेट्या प्रसिद्ध आहेत.

अशा या लावण्यभूमीत लेखक कलावंत निर्माण झाले नाहीत तरच नवल. मामा वरेरकर, मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे वि.स.खांडेकर, चि.त्र्यं.खानोलकर, जयवंत दळवी, वि. दा. करंदीकर असे नामांकित लेखक, डॉ. रामकृष्ण गो. भांडारकर, वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर, वेदाचार्य फाटक गुरुजी सारखे महाविद्वान याच भूमीतले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, न.चि.केळकर इथलेच. विठ्ठल कृष्ण नेरुरकर, कॅप्टन मा. कृ. शिदे, शंकर पांडुरंग पंडित असे किती सांगावे! या लोकांची कर्मभूमी जरी बाहेर असली तरी स्मृतिस्थळं याच भूमीत.

आरवलीचा वेतोबा, रेडीची माऊली, चेंदवणच्या सड्यावरची माऊली, वालावलीचं नारायण मंदिर, कुणकेश्वर-आचर्‍याची शिवस्थानं असाही मोठा वारसा आहेच. या वारशाबरोबरच मला आठवतं ते या देशातल्या गणराज्याचं मूळ असलेली, इथली ग्रामदेवता प्रधान असलेली इथली गाव रहाटी. अजून ती ब-याच अंशी शाबूत आहे.

गावातलं मुख्य मंदिर हे शिवमंदिर असतं. जसं रामेश्वर, पाताळेश्वर, कलेश्वर इत्यादी. मग त्याला जोडून भावई, भूमका, रवळनाथ, वेतोबा, निरंकार, जैन, देवी (चामुंडा, लक्ष्मी-भवानी वगैरे). त्यानंतर गावातील गावकर्‍यांचे वंस (वंश) पाषाण. जसे परभूवंस, बिरामण, वेसकार, कुळकार, नितकार, घाडवस इ. इ. हा सर्व मंदिर परिसर साधारण गावाच्या मध्यवर्ती जागेत असतो. एखादं देऊळ गावाच्या सीमेलगतही असतं. सामान्यपणे ते जरीमरी, एकवीरा किवा माऊलीचं असतं. गावात एखादं तळं असतं आणि गाव रहाटीत त्या तळ्याला स्थान असतं. पाट, धामापूर, चेंदवण, वालावल, नेरुर हा तर तळ्यांचाच प्रदेश आहे. स्थलांतर करणारे पक्षी हंगामात या तळ्यांच्या आश्रयानं वस्तीला येतात. तसंच हंगामात या तळ्यांतून लाल-शुभ्र कमळांचीही चांगली वाढ झालेली दिसते.

दक्षिण कोकणातली ही गावरहाटी सुमारे गेल्या दीड हजार वर्षांची किवा त्या आधीच्या लगतच्या काळातील घडी बसलेली असावी. उदाहरण म्हणून एका गावाचा नमुना पाहू. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. गावोगावी थोडाफार रहाटीत फरक असेल. परंतु साचा तसाच असेल.

चेंदवण हा गाव अेका बाजूंनी तसा परिपूर्ण आहे. ग्रामदेवता मध्यवर्ती ठिकाणी आहेत. फक्त सीमेवर माऊलीचं देऊळ आहे. गावात तळं आहे. वर्षातून २/३ पिकं देणारा विस्तीर्ण मळा आहे. खाडीकाठ असल्यानं पुरांच्या मळकीवरच शेती होते. देवस्थान केंद्रीत गावरहाटी डोंगरमाथा, डोंगर उतार आणि मळ्यांतील शेतीवर आधारीत आहे. एकेकाळी या गावात बाहेरुन येणार्‍या गोष्टी फारच जुजबी होत्या. कापड-चोपड, कांबळी-इरली याच त्यातल्या प्रधान वस्तू. अन्नातही गूळ, कांदे अशा काही चीजा आणि औषधांसाठी लागणारा आणि मसाल्यांसाठी लागणारा माल हा अधिक. तो वस्तु विनिमयानंच होई. पैशाची गरज होतीच तरी त्यातूनच तो निर्माण होई. सोनं चांदी या आपत्काली उपयोगी याव्या म्हणून राखून ठेवायच्या वस्तू. सारांश शंभर वर्षांपूर्वी हा गाव बराचसा स्वावलंबी होता.

अवर्षण - अतिवृष्टीमुळं दुष्काळाचं संकट नव्हतं असं नाही. पण शेतकरी सावध असायचा. बियाण्याच्या नावानं जादा मुड्या बांधलेल्या असत. काटकसरीनं त्याच्यावर गुजारा केला जाई. भरीला आंबे-फणस, कंदमुळं आणि पालेभाज्या यांवर भर दिला जाई. परत बोलीवर देवाण घेवाणही होई. जिज्ञासू पर्यटकांना अशा प्रकारची गावरहाटी समजावणं, दाखवणं हाही एक हाही एक पर्यटन व्यवस्थेचा भाग होऊ शकतो.

खरीपाची पिकं घरात येतात आणि गावप्रमुख तळ्याच्या मुहूर्तासाठी गावातील मानकरी आणि वीर्तिकांना देवळात पाचारण करतो. एका वेळी तीन कामं व्हायची असतात. नव्या धान्याचं पूजन. दुसर्‍या पिकाची नांगरणी आणि तळ्याच्या बांधाचा मुहूर्त ही कामं दिवस ठरवून होतात. या ठरावासाठी आणि पुढे प्रत्यक्ष कामासाठीही मानकरी वृत्तिकारांपर्यंत प्रत्येकानं हजर रहायलाच हवं असा दंडक. निदान प्रतिनिधी म्हणून घरातलं नऊ दहा वर्षाचं मूलही चालतं. ब्राह्मणानं (भट) दिवस सांगितला की मग गावात ढोलानं दवंडी दिली जाई. त्या दिवशी गावातील शेतकरी मुहूर्ताच्या कुणग्यात आवर्जून येत.

खरीपाची मळा आणि वरकस पेरण्या संपल्या की बैलांच्या मानेवर जू ठेवायचं नाही हा दंडक कडकपणानं पाळला जातो. तीन साडेतीन महिने बैल चा-यावर असतात. हा मुहूर्त झाल्याशिवाय कोणी जोत बांधणार नाही. त्या दिवशी मुहूर्ताच्या कुणग्यात मानकरी-वृत्तिकार (वीर्तिक-बलुतेदार) जमले की प्रथम नव्या धान्याचं (भाताच्या ओंब्याचं) पूजन होतं. मग पुन्हा भूमीचं पूजन होऊन नांगर जोडला जातो. नांगराला बैल म्हणून घाडी आणि महारांच्या खांद्यावर जू ठेवलं जातं आणि रुमणीवर हात ठेवून गुरव नांगरतो. तेव्हाच तळ्याच्या बांधाला माती-कवळकाठी घातली जाते. मग पूजन झालेल्या ओंब्या गावाला वाटल्या जातात. त्या दिवशी घरोघरी नव्या तांदळाची खीर केली जाते.

वार्षिक जत्रा, देवकार्ये आणि समाराधना यांचे ठराव होत नाहीत. परंतु गोंधळ आणि भोरीप या दोन कार्यक्रमांसंबंधी ठराव होतात. गोंधळी आणि भोरपी यांच्या उपलब्धतेवर ते अवलंबून असतात.

गावात शेताला कीड पडणं, अवर्षण आणि अन्य रोगराई (विशेषतः गुरांची) अशा संकटाच्या वेळी सगळ्या गावाला दवंडी असे. घरटी एकतरी पुरुष तेव्हा हजर राही. कोणाचा न्याय निवाडा व्हायचा असला की गाव जमे. नितकार म्हणजे नीतीची देवता. न्याय करणारी. तिच्यासमोर दोन्ही पक्षांनी प्रमाण करावं लागे. सहसा खोटं बोलणं नसेच. पण त्यातूनही संशय आला तर पंच महादेवाच्या पिडीवरचं फूल उचलून शपथवार सांगायला सांगत. तसं धाडस कोणी करीत नसत.

भोरीप हा प्रकार आता होत नाही. कारण आता भोरपी कोणी राहिले नाहीत. तो नाट्यप्रकार म्हणजे प्राथमिक अवस्थेतील दशावतार असायचा. भोरपाचा ठराव झाला की गावातील स्त्री पुरुषांनी भोरीप झाल्याशिवाय गाव सोडून जायचं नाही असा दंडक पाळला जाई. त्या दिवशी सर्व गाव उपास करी. यात ब्राह्मण नसत. रात्री भोरीप उभं रहाण्यापूर्वी इंगळे न्हाणकरुन तो उपास सोडायचा असे.

इंगळे न्हाणम्हणजे अग्निस्नान म्हणू. गावच्या मानकरी महारानं कवळ काठी पेटवून धग करायचा. तिथं उपासकरी पै-पैसा, विडा, नारळ ठेवून गार्‍हाणं करीत. नंतर लांब काठीला सूप बांधून पेटत्या धगटीतील निखारे वर उधळून देई. उपासकरी ते निखारे अंगावर घेत. हे नहाण झालं की उपासाची सांगता आंबोळी आणि शेवग्याच्या पाल्याच्या भाजीनंच करायची असे. ती पारणा झाल्यावर भोरीप पहायला बसायचं.

हे भोरीप म्हणजे पुढं विकसित झालेल्या दशावताराचं प्राथमिक स्वरुप असावं. मी लहान नऊ-दहा वर्षांचा असताना ते दोनदा पाहिलंय. त्यात मासा, कासव, घोडा वगैरे चित्रांचा आकार घेऊन नाच असे. बरेचसे अश्लील ग्रामीण संवाद असत. लोक हसत. शेवटी वाघाचं सोंग येई आणि त्यानं कोणा कोणाला त्रास द्यायचा नाही हे सांगितलं जाई. ही भोरपं करणारी मंडळी पेंडूर गावात रहात. त्यांना गावातून दहा मण भाताचं वर्षासन असे. नंतर भोरपं करणारी मंडळी मुंबई-कराचीकडे जाऊन नोकरी धंदा करु लागली. भोरपंही बंद झाली.

एका परीनं शेताची नांगरणी, हे भोरीप, देसरुड, खोरणी भरण्याची क्रीया (गाव सीमेवर बळी देऊन मुंडकं पुरण्याचा प्रकार) या प्राचीन काळापासून चालत आलेल्या यातुक्रियांचे अवशेष आहेत. त्यांना गावरहाटीत स्थान दिलेलं असे. कोकणची वस्ती ही एकच नव्हे तर वेदपूर्व काळापासून मनुष्य समुहांच्या अनेकानेक टोळ्या येऊन या भूमीत स्थिर झाल्या आहेत. त्याचं एक कारण इथल्या हरीत सृष्टीत आहे. एक म्हणजे अन्नाचं वैपुल्य नसलं तरी दुर्भिक्षालाही इथं सामोरं जावं लागत नाही. ही हरित सृष्टी अन्नाचा पर्याय देते. झाड पाला, मुळं फळं असं काहीही.

मग अशा समुहांच्या भिन्न भिन्न चालीरीतींना सुखानं रहायचं तर सामावून घेणं आवश्यक ठरतं आणि ते स्वाभाविक जमूनही जातं. एकंदर देशात जातीप्रथा रुढ झाल्या. रोटी बेटी व्यवहार बंदिस्त झाले. ते सगळं इथंही घडलं. पण गाव रहाटीत जैनाला तसा महारालाही अधिकार राहिला. एवढंच काय तर देवाचा वाजंत्री म्हणून कुणा अलिशेखाला स्थान मिळालं. तर कोणा महंमद पटव्याला अनंताचा दोरा पोचवण्यात आनंद वाटू लागला. शिवमंदिराचा निर्माता म्हणून कोणा मुस्लिम मौलाचा दर्गा शिवमंदिरासमोर उभा राहिला आणि त्याच्या दर्शनानं शिवभक्त धन्य होऊ लागले. कोणी पावलू कोणा शंकराला एकादशनीचा नवस बोलू लागला तर कोणी फराशी गणपतीची आरती करु लागला. तर असाच कोणी बाबूभट माता मेरीला नवस बोलू लागला.

या देव देवस्कीचे प्रकार तरी किती? त्यातूनच हे देव थेट माणसाच्या कुडीवर आरुढ होऊन थेट माणसांशीच बोलू लागले एवढंच नव्हे तर तरंगाच्या आपल्या निशाण्या घेऊन अर्धोदय, महोदयासारख्या पर्वात वाजत गाजत समुद्र स्नानाला जाऊ लागले. ह्या देवांना शिकारीचीही सय येऊ लागली. मग पुन्हा देवांचे कौल घेऊन माणसांचे जथे रान धरु लागले. सावज पडलं की ते त्या देवांना मानवलं जाऊ लागलं. गावासाठी त्याचे वाटेही पडू लागले. मानाप्रमाणं. पण भटाच्या वाट्याचा वाटेकरी दांडेकर!

दक्षिण कोकणच्या भूमीची ही संस्कृती हेच तिचं वैशिष्ट्य. हे पंचतारांकित सुविधा शोधणार्‍या पर्यटकांना कदाचित जाणून घ्यावंसं वाटणार नाही. पण जिज्ञासू पर्यटकांना ती ओळख द्यायलाच हवी. का? तर आक्रमणं झाली, काळानुरुप परिवर्तनं झाली, पालट झाले तरी सगळ्या मुशींतून जाऊनही हा संस्कृतीचा, सहजीवनाचा आणि स्वावलंबनाचा गाभा तोच राहिला.

पण हे कसं साध्य करता येईल हा प्रश्न येतोच. गावाच्या मंदिरातून अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संक्षिप्त आणि सचित्र फलक ठेवता येतील. त्या त्या देवतांचं कार्य कोणतं हेही त्या देवमंदिरात ठळकपणानं नोंदता येईल. शिवाय काही गावांच्या कलाकुसरी तिथं मांडता येतील. उदाहरणार्थ तुळस गावात तयार होणार्‍या पातीच्या छत्र्या, तुळशी वृन्दावने चेंदवण गावात होणारे विशिष्ट बांधणी झाडू, दुडती ओवीची दावी, परुळ्याचे कारागीर उत्तम चाकू, रापे, सु-या तयार करतात. तर पोखरण कुंद्याच्या बाजूला चिव्यापासून सुबक डाळ्या, सुपं, रोवळ्या, परड्या आणि इरली बनवली जातात. अशा वस्तूंच्या प्रदर्शनाची केंद्र हवीत. सावंतवाडीच्या शिल्पग्रामच्या धर्तीवर मासेमारीच्या खुणी, आर्का, वेगवेगळी जाळी हेही प्रदर्शनाचे नग आहेत.

हे काम आणखी एका प्रकारानं सुलभ करता येईल. वेंगुर्ले म्हटलं की डचांच्या भुईकोट किल्ल्याखालचं होरलेलं बंदर, मिशन हॉस्पीटल, बेळगाव-वेंगुर्ल्याला जोडणारा मध्यकाळातील रस्ता असा बराच इतिहास उभा राहतो. मी एकदा एका पर्यटनातून झाशीला पोचलो होतो. त्या पर्यटन सेवेत झाशीचा किल्ला नव्हता. पण चार तास अवधी होता. आम्ही काही लोक किल्ला पाहून आलो. आम्हाला तिथल्या फलकांमुळं जराशी देखील गाईडची उणीव भासली नव्हती. जागोजागी इतिहास नोंदलेला होता. वेंगुर्ले, मालवण, आचरा, कोचरा, वालावल, शिरोडा, आरवली अशा अनेक ठिकाणी हे वापरले हे तर?

परंतु हे त्या गावांनी मनावर घ्यायला हवं. अलिकडेच वाचनात आलं की महाबळेश्वरच्या डझनभर स्थानिकांनी आपल्या घरात पर्यटकांची सोय करायचं ठरवलं आहे. पर्यटकांची सोय करायची म्हणजे काय? एक म्हणजे रात्री झोपायला स्वच्छ जागा. अंथरुण-पांघरुण, संडास, बाथरुम आणि आहाराची सोय. पर्यटक येणार म्हणजे एखादं चार माणसांचं एखाद वेळ सहा सात जणांच कुटुंब. त्यांना सामुदायिक फिरण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देणं. तसंच गरज पडल्यास वाटाड्या पुरवणं.

एक अनुभव थोडक्यात सांगतो. एकदा चार माणसं माझ्याकडे आली. त्यांना शिरोड्यातील भाऊ खांडेकर रहात असलेली ठिकाणं पहायची होती. त्यात एक त्यांची मुलगीच होती. तिनंच विचारलं, ‘ते घरं कुठसं आलं आणि कोण दाखवील?‘

बरोबर यायला हवं का?‘ मी विचारलं.

तू! मग काय हवं?‘ तिनं म्हटलं आणि मी बरोबर निघालो. माझ्याही आठवणी त्या स्थळाशी जुळलेल्या असल्यामुळं जवळ जवळ सोळा वर्षांचा इतिहास मी सांगू शकलो. त्यातच जयवंत दळवींचं घर, सुरुचं बन, मिठागर अशी बरीच ठिकाणं मी दाखवू शकलो. अशीच चि. त्र्यं. खानोलकर, मामा वरेरकर, प्रसिद्ध चित्रकार पी. ए. धोंड, श्रीपाद दामोदर सातवळेकर इत्यादिकांच्या पाऊलखुणा दाखविणारी स्थळं ही देखील यात्रा स्थळ आहेत. त्यांची माहिती होणं आणि ती देण्याची क्षमता पैदा करणं हाही एक उद्योग असू शकतो.

घरगुती रहाण्याच्या सोयी करणं हे स्थानिकांनीच मनावर घेण्यासारखं आहे. पर्यावरण या दृष्टीनं जिल्हा समजून घेणं हा तीन ते चार दिवसांचा आणि साताठ माणसांचा (एका सुमोचा) गट करुन माणशी हजार बाराशे रुपयांच्या आत बसवता येण्यासारखा कार्यक्रम होऊ शकतो.

-- हरिहर आठलेकर, भटवाडी- सावंतवाडी

(०२३६३) २७३५२८

संपादकीय *

कोणीही आले तरी समस्या कायमच

८ डिसेंबरला होणा-या नगरपरिषदांच्या निवडणुकीत किमान सिधुदुर्ग जिल्ह्यात तरी काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झालेली नाही. शिवसेना, भाजपा आणि आर.पी.आय युतीने एकत्रीतपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावरच या निवडणुकीत उतरायचे ठरविले आहे. मनसे वगळता सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी असल्याने आणि प्रभाग रचनेमुळे झालेल्या गुंतागुंतीमुळे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला डावलायचे हा पेच सर्वच पक्षांसमोर आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेले नाराज लोक दुस-या पक्षाचा घरोबा करु लागले आहेत. काहींनी तो केलाही आहे. तसेच याआधी अन्य पक्षातून आलेल्यांनाही नव्या पक्षात तिकिट मिळणे कठीण झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील तीन्ही नगरपालिकेचे प्रत्येकी १७ नगरसेवक पदांपैकी निम्माहून अधिक म्हणजे ९ जागा महिलांसाठी राखीव झाल्यामुळे अनेक सक्षम उमेदवारांचीही पंचाईत झाली आहे आणि नवीन प्रभाग रचनेमुळे मतदार संघ पूर्वीच्या वार्डाच्या चौपट मोठा झाल्यामुळे एवढ्या मतदारांशी संफ साधणे अवघड असल्याने काही उमेदवारांनी इच्छुकांच्या यादीतून, पूर्वीच माघार घेतली आहे. तरीही नगरसेवक पदामुळे मिळणारी प्रतिष्ठा त्याहून महत्वाचे म्हणजे आर्थिक लाभ या कारणांनी १७ जागांसाठी शेकडो उमेदवारांनी निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे.

पूर्वी एका वॉर्डसाठी १ जागा असल्याने पाच-सहाशे मतदारांशी प्रत्यक्ष संफ साधून निवडणूक प्रचार करणे तसे सोपे होते. आता निवडणुक चिन्ह मिळून प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ सातच दिवस मिळणार असल्याने चौपट वाढलेल्या मतदार संघातील सुमारे दोन -अडीच हजार मतदारांशी प्रत्यक्ष संफ साधणे अवघड बनले आहे. त्यातूनही पक्षाचे तिकिट निश्चित मिळणार याची खात्री असलेल्या उमेदवारांनी घरोघरी भेटीदेऊन आपले मत पक्के करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

आतापर्यंत ज्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून लोकांना ओळख दिली. पूर्वी नगरसेवकपदही मिळविले त्या पक्षाने उमेदवारी नाकारताच दुस-या पक्षात प्रवेश करण्याचे आणि त्यांना स्विकारण्याचे जाहीर समारंभ होऊ लागले आहेत. कोणी राष्ट्रवादीतून किवा शिवसेनेतून काँग्रेसकडे किवा कोणी राष्ट्रवादीकडे तर कोणी काँग्रेसमधून राष्ट्रवादी किवा सेना - भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत. काहींनी कोणत्याच पक्षात स्थान मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने अपक्षम्हणून उमेदवारी जाहीर केली आहे.

इतक्या मोठ्या संख्येने तरुण वर्ग आपल्या गावाचे भले करण्याचा हेतू सांगून निवडणुकीत उतरले असतांना शहराचा सर्वांगीण विकास होणे कोणीही अपेक्षित धरुन चालतो. पण निवडणुक संपल्यावर वेगळीच वस्तुस्थिती समोर येते. शहरात काही बहुमजली इमारती उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला असे नाही. सर्व लोकांना पुरेसा पिण्यालायक पाण्याचा पुरवठा, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी तत्पर उपाययोजना, सांडपाण्याची व्यवस्था, चांगले रस्ते अशा अनेक नागरी सुविधा नागरिकांना अपेक्षित असतात. त्यासाठीच त्यांच्याकडून घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादी कर घेतले जातात. सरकारही विविध विकास कामांसाठी अनुदान देत असते. परंतू त्या पैशांतून होते काय? हे कित्येक वर्षाच्या अनुभवांतून नागरीकांना चांगलेच माहित झालेले आहे. नगरसेवकांची आर्थिक स्थिती कशी सुधारली याचीही लोकांना माहिती असते.

शासनाच्या सर्वच स्तरावर भ्रष्टाचार माजलेला असल्याने छोट्या मोठ्या नगरपालिका आणि तेथे निवडून येणारे नगरसेवक (काही अपवाद वगळता) त्यापासून अलिप्त असतील असेही कोणीही आता मानत नाही. बहुसंख्य लोक आता मतदानही आपापल्या हितसंबंधातून, आर्थिक लाभातून करु लागले आहेत. त्यामुळे कोणत्याही नगरपालिकेवर जुने जाऊन नवे आले तरी काही फरक पडेल असे नाही. समस्या कायमच राहतील.

विशेष *

२०३५ सालाची कल्पना करा

रौले पेन्टोन (पूर्वाश्रमीचा राहूल पेंडूरकर, तोंडवली, मालवणचा) चिपीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतो आणि तिथून ८ लेनच्या प्रशस्त गुळगुळीत एक्सप्रेस हायवेवरुन टोल भरुन त्याच्या घराकडे निघतो. इंग्लडहून तब्बल १४ वर्षांनी तो परततोय. त्यातली ५ वर्षे उच्च शिक्षणात, ६ वर्षे बर्कले बँकेतल्या उमेदवारीत आणि ३ वर्षे स्टेटन आणि होवॉन्ग जागतिक अर्थ सल्लागार कंपनीत, जिच्या १५६ शाखा जगभर पसरलेल्या आहेत त्यात गेलीत.

‘‘आईच्या गावात, गाव कुट्टे हाये?‘‘ तो त्याच्या इंग्रजाळलेल्या आवाजात मालवणीतील उद्गार काढतो. हे त्याचे मालवणी त्याने एका जुन्या साप्ताहिकाचे सदस्यत्व आवडीने चालू ठेवले आहे म्हणून टिकलेय, त्याचे नाव किरात साप्ताहिक.

मालवणचा एस.टी.स्टँड आता शहराच्या सीमेबाहेर हलवलेला आहे. अधिकृत कारण त्यामुळे शहरात फार गर्दी होते हे असले, तरी आताशा त्याचा वापरच कोण करतोय? खरे कारण असे होते की, बसस्थानक एका मोक्याच्या भूखंडावर वसलेले होते, ज्याची किमत आता ३० लाख रु. / गुंठा झालेली होती. आता तिथे जगभरचे सर्वोत्तम महागडे ब्रँड मिळणारे चकाचक मॉल एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. त्यामुळे मालवणची पूर्वीची दाटीवाटीची बाजारपेठ गायब झालीय. तिची गरजच उरली नाहीय. आता इथे ताजे अन्न मिळत नाही. मिळते ते सारे बायो इंजिनिअरींगने तयार झालेले आणि थंडगार फ्रिजमध्ये साठवलेले. चहा आणि वडापाव टेट्रा पॅकमध्ये मिळतात. पॅकिग चकाचक हवे ना?

सागरी महामार्ग २०२२ मध्ये पुरा केला गेलाय आणि भारतातील सर्व प्रमुख महानगरांना जोडला गेलाय. किना-यावर पंचतारांकित हॉटेलांची भरमार आहे. इथले लोक आता तुम्हाला गुजराती, सिधी, मारवाडी, पंजाबी, जर्मन, डच, चिनी (चिन्यांनी गणपती मूर्तीकामाचा आणि इतर सर्व धार्मिक रितीरिवाजांना लागणा-या गोष्टींचा पुरवठा करणारा व्यवसाय कब्जा केलेला आहे) आणि अशाच इतर भाषा बोलताना ऐकू येतात. ते आता ६२ टक्के स्थानिक व्यवसाय चालवत आहेत. उरलेल्यातली २८ टक्के प्रॉपर्टी रशियन, श्रीलंकन आणि रुमानियनांच्या ताब्यात आहे. बाकी जे ९ टक्के उरलेत ते आफ्रिकन मिश्र वंशाचे आहेत. ज्यांचा कधी भारतीय वंशावळीशी संबंध होता, ज्यांना आता का कोणास ठाऊक कसाबम्हटले जातेय. कसाबांचा सर्व त-हेच्या तस्करींशी संबंध आहे आणि त्यांची माफिया गँग या लांबलचक किनारपट्टीचा त्यासाठी पुरेपूर फायदा उठवतेय. लक्झरी स्पीड बोटी २३० मजली उंच आलिशान सप्ततारांकित हॉटेलकडे जा-ये करत असतात, जे समुद्राच्या -मध्ये एका बेटावर उभे आहे. ज्यावर कधी काळी सिधुदुर्ग किल्ला होता. त्यांच्या स्वागत कक्षात त्यांनी त्या किल्ल्याची एक छोटेखानी प्रतिकृती जतन करुन ठेवलीय, जो कधी काळी अस्तित्वात असल्याची वंदता होती. अशाच प्रकारची अजून देखिल काही हॉटेल समुद्रात पाहता येतील.

एक ६ लेनचा हमरस्ता लोकांना मासेमारी संग्राहलया‘ -कडे घेऊन जातो. जिथे बहुतेक जगभरातून आलेले अभ्यासू विद्यार्थी कुतूहलाने जातात. तिथे अनेक वर्षापूर्वी राहत असलेल्या मच्छीमार कोळ्यांची माहिती मिळते. समुद्रातले मासे संपलेले आहेत. पर्यटकांना समुद्रातून फिरवून आणताना जे सागरी जीवन दाखवले जाते, ते खरे तर स्थानिक मत्स्यालय आणि संशोधन केंद्रातून, प्रयोग शाळांतून निर्माण केलेले मासे असतात.

एक ४ लेनचा चमचमणा-या दिव्यांनी सजवलेला रस्ता, कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या वसाहतींच्या कडेकोट दरवाजापर्यंत तुम्हाला नेतो. तिथे खास डिझायनर लॅन्डस्केपिग केलेले आहे, ज्यात आंब्याची २ झाडे आणि अगदी खरेखुरे नारळीचे झाड उभे आहे, जी अतिशय दुर्मिळ आहेत.

आणि हो ! शेवटच्या त्या १ टक्के लोकांबद्दल सांगायचे राहूनच गेले. ते इथले मूळ रहिवासी असल्याचा दावा करतात. ते जास्त करुन दरवान, गाडीचालक, माळी, घरगडी म्हणून नेमलेले असतात किवा मग छोटी छोटी दुकाने चालवतात. जिथे ते काही खाद्यपदार्थ विकतात. त्यात मिळणारे मुदाक (पूर्वीचे मोदक) आणि काझा (पूर्वीचे खाजा) हे व्हॅनिला आणि चॉकलेटच्या स्वादात असतात. ती दुकाने तुम्हाला श्रीलंका ते देवगड सुपर एक्सप्रेस हायवेच्या कडेने लागलेली दिसतील. (आता भारत आणि श्रीलंकेमध्ये समुद्राचे पाणी उरलेच कुठेय?) ‘‘काजू स्वादाचे खारे दाणे!‘‘ गंगी जी गंगावणे, जुन्या कारागिरांच्या कुटुंबातील एक आहे, जोरजोरात कर्कश्पणे ओरडतेय, ‘‘यस सर, टेस्टी टेस्टी, हैद्राबादी खारे दाणे, अस्सल काजू पावडरीत घोळलेले. सिधुदुर्गाची अस्सल चव चाखा साहेब.‘‘

कसं वाटलं? अंगावर काटा आला का? पण हे अशक्य नाहीय. गोव्यात त्याचे अधले-मधले टप्पे आम्ही पाहतोच आहोत.

शापलोपूविषयी आम्हाला अनेक प्रश्न विचारण्यात येतात. त्यातले ३ आहेत.

१ ः ‘‘ते इंग्रजीत का प्रसिद्ध होत नाही?‘‘ माझे मुंबईतील मित्र विचारतात. माझे उत्तर असते, ‘‘ते स्थानिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आहे.‘‘

२ ः ‘‘सरकारकडून काहीच केले जात नाही. त्याविषयी का लिहीत नाही? कोकणात खरे तर चांगले रस्ते आधी हवेत.‘‘ आमचे उत्तर असते, ‘‘रस्ते झाले, तरी पुढे काय? बोला.‘‘ जर स्थानिक नागरिकांमध्ये जिल्ह्यातील परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत आणि त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, ही जागृती आली, तर ते अनेकपदरी हायवे पंचतारांकित हॉटेलांना जाऊन पोहोचणार नाहीत, त्याऐवजी लोकांवर निर्णय लादणा-या अधिकारशाहीला प्रत्येक निर्णय लोकांना विचारुन घ्यावा लागेल.

३ ः ‘‘पर्यटनच का?‘‘ कारण पर्यटन व्यवसाय या जिल्ह्याला जागतिक परिमाण मिळवून देईल आणि ते जगाचे मार्केट स्वतःहून चालत आमच्यापर्यंत येईल. सध्याच्या व्यावसायिकांची ‘‘मार्केटिग नीट होत नाही‘‘ ही बोंब उफराटी पाडून.

आपल्या सा-या समस्येची मेख आमच्या चमूतल्या सदस्याने एका वाक्यात झकास मांडलीय. तो म्हणाला, ‘‘आमची मंदिरे आजकाल राजस्थानी वा मद्रासकडचीच जास्त वाटतात.‘‘ याचे कारण हे आहे की ती बांधणारे कारागिर आणि सामानसुमान हेच मुळी राजस्थानी वा मद्रासकडचे असते. त्याला मुळात हे निदर्शनास आणून द्यायचे होते की, सिधुदुर्गातील मंदिरे आपली कोकणी ओळख आणि वैशिष्ट्ये आता गमावत आहेत. कारण इथल्या लोकांनाच आपल्या वैशिष्ट्यांची व संस्कृतीची ओळख, जाण आणि चाड उरलेली नाही. ती करुन घ्यावी इतका विचार व धीरही उरलेला नाही. सर्वसाधारण -पणे गैरसमज असा पसरला आहे की, जुन्या देवळांप्रमाणे पुन्हा तशीच बांधणी करायला आता तसे सामान आणि कारागिर उरलेले नाहीत. मिळतच नाहीत. पण आजघडीलाच पुनः बांधले जात असलेले श्री रामेश्वराचे गिर्ये-विजयदूर्गातील मंदिर आणि ते बांधणा-या समितीने आम्हा सर्वांना खोटे पाडले आहे. खरेतर आमचा इच्छाशक्तीचा अभाव उघडा पाडला आहे. त्याला जिर्णोद्धारम्हणणे चुकीचे, निगरगट्ट होईल. हे खरेतर जतनआहे. आपल्या संस्कृतीचे, आपल्या स्वयंपूर्णतेचे, स्वयंसिद्धतेचे. कारण यासाठी वापरलेले सर्व सामान आणि कारागिर हे १०० टक्के स्थानिक आहेत.

लेखाच्या सुरुवातीला रंगवलेले भयचित्र जर खोटे पाडायचे असेल आणि होऊ घातलेले अनियंत्रित बदल रोखायचे असतील, तर ही रामेश्वर मंदिराची पुनर्बांधणी त्याविरुद्ध रोखठोक उत्तर आहे. हे जिते जागते उदाहरण आहे. दृढ इच्छाशक्तीचे, सांघिक बांधणीचे, शहाणपणाचे, आपल्या मूळ संस्कृतीप्रती असलेल्या आदराचे आणि धीराने घेऊन आपल्याकडे अजूनही कुशल कारागिरी होऊ शकते, आपले लोक ती करु शकतात या दुर्दम्य आत्मविश्वासाचे. त्यासाठीचे सामानही इथलेच जमवलेले आहे. जे एरव्ही दलाल लुटून बाहेर नेत होते. हे सार्थ उदाहरण आहे लोकांच्या स्व-पुढाकाराचे आणि होऊ घातलेले बदल स्वतःहून नियंत्रित करुन घडवून आणायच्या स्व-सामर्थ्याचे. तीन गोष्टींचा धडा यातून आम्हाला मिळाला.

१. जर आपण सिधुदुर्गवासी आपल्या लोकांच्या हुषारीवर व सक्षमतेवर विश्वास ठेवायला शिकलो तर आपल्या जिल्ह्यातील हुषारीला, प्रतिभेला व कल्पकतेला वाव मिळून हे वैभव आपल्याच जिल्ह्यात राहून फुलेल.

२. केवळ मंदिरेच नव्हे, याप्रमाणे इतरही अनेक चांगल्या गष्टी आपण पुन्हा पुनर्जिवित करुन, त्यांना त्यांचे गतवैभव प्राप्त करुन देऊ शकतो.

३) त्यातूनच आपल्याला पर्यटन व्यवसाय वाढवता येईल. आपल्याकडे ते पर्यटक धावत ओढीने येतील, ज्यांना आमच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीबद्दल आदर आणि जाण असेल. जी लोकांच्या पुढाकार व जागरुकते अभावी हळूहळू नाहीशी होत चालली आहे. उलट ती पुन्हा आपल्या मूळ समृद्ध वारश्याने उजळेल. हे येणारे पाहुणेच तिच्या संवर्धनासाठी आपल्याला पैसा घेऊन येतील.

तर गर्जा जयजयकार पुन्हा एकदा रामेश्वर गिर्ये मंदिर जिर्णोद्धार समितीच्या सर्व वाहून घेतलेल्या सदस्यांचा. त्यातल्या थोड्यांशी भेटण्याचे आणि बोलण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले. त्यांचा सविस्तर वृत्तांत वाचा आणि जरुर एकदा भेट देऊन या.

- जॉर्ज जोएल

पुनर्जिवीत पिगुळीची चित्रकथी कला

पिगुळी इथे गुढीपूर म्हणून कुडाळ-सावंतवाडी हायवेवर ठाकर समाजाची १०० ते १२५ घरे आहेत. जैत रे जैतमध्ये आपण ठाकर पाहिले होते. त्यांच्याप्रमाणेच पूर्वापार जंगलात राहणारे हे लोक होते. आता त्यांच्या सभोवतालचे हिरवे जंगल नाहिसे होऊन सिमेंटचे जंगल तयार झाले आहे.

या आदिवासींचं गाणं, बजावणं, चित्रकला पाहून शिवाजी राजे खूप प्रभावित झाले. जाणता राजा म्हणून शिवाजी राजांचा गुणगौरव होतो. तेव्हा राजांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातल्या अनेक पारंपारीक कलांना उत्तेजन दिले व राजाश्रय देऊन त्या जगविल्या, हा भाग फार कमी प्रकाशात येतो. मालवणचा किल्ला बांधताना शिकारीच्या निमित्ताने राजे इथे आले. त्यानी ठाकराना काही मंदिरे कला सादर करण्यासाठी आणि त्यानिमित्ताने वर्षासने, उत्पन्न मिळण्यासाठी बांधून दिली. अगदी आजही त्या देवळांतून जत्रांवेळी ठाकरांतर्फे चित्रकथी, छायाकृती व कळसूत्री बाहुल्यांची नाटके सादर होतात. हल्लीच साळगाव येथील वेताळ मंदिरात तसे कार्यक्रम सादर झाले. किबहुना चित्रकथीचे कथानक सादर करायचे तर ते देवाचे स्थान हवे अशी पूर्वअट असते. काळ बदलला. नाट्यगृहातून आता शो सादर करताना मग गणपतीचे पान व मानपूजा ठेवून ही अट भागवली जाते.

रायगडाच्या सत्तेचा अस्त झाल्यावर पुढे सावंतवाडीच्या खेम सावंत, बापूसाहेब महाराजांनी या कलेला उदार आश्रय दिला. १२ न् १८ इंचाचे हाताने बनणारे कागद पुरवले. त्यावर ब्रशने रंगकारीसाठी नैसर्गिक वनस्पतींपासून बनणारे रंग वापरले जात होते. लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा असे ठराविक रंगच त्यात दिसतात. आज ३००-४०० वर्षे उलटून गेल्यावरही ते रंग तसेच तजेलदार दिसतात. त्यावेळी ठाकर समाजात लिहिता वाचता येणारे कोणी नव्हते. आजही शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ते नैसर्गिक रंग कसे बनविले जात होते, ही माहिती कोणी नोंदवून ठेवलेली नव्हती. ती आता लुप्त झाली आहे.

पुढे राजाश्रय गेल्यावर पिगुळीची कलाही मध्ये अनेक वर्षे लुप्त झाली होती. फक्त देवळांशी परंपरेने बांधलेली असल्यामुळे मोजकीच ४-५ ठाकरांची घरे चित्रकथीच्या बाहुल्या, वाद्ये, चित्रे सांभाळत राहिली आणि वार्षिक नेमापुरती नाटके सादर होत राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात मग जेव्हा आपल्या समाजाला आत्मभान आले आणि आपल्या पारंपारिक कलांचा धांडोळा घेतला जावू लागला, तेव्हा काही अभ्यासकांनी चित्रकथीची नोंद व दखल घेतली. कल्चर आंगणया संस्थेच्या माध्यमातून मग पुन्हा एकदा चित्रकथी जगासमोर आणण्यात काही कलाप्रेमींनी पुढाकार घेतला. ठाकरांच्या घराघरांतून जुन्या चित्रांचा, बाहुल्यांचा, वाद्यांचा शोध घेतला गेला. त्यात श्री. परशुराम गंगावणे हे आपल्या जागेचा उपयोग करु देण्यास तयार झाले. तिथे एका गोठ्याचे मग कल्पकतेने चित्रकथीच्या संग्रहालयात, संस्थेच्या मदतीने रुपांतर करण्यात आले आहे. गेली काही वर्षे कल्चर आंगणसंस्थेमार्फत पर्यटकांच्या भेटी या संग्रहालयात आयोजित करण्यात येतात. आता हळूहळू वृत्तपत्रे, चॅनेल्स व वेबसाईटच्या माध्यमातून या संग्रहालयाची व चित्रकथीची नाटके सादर करणा-या चमूची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे. इतर पर्यटक व विदेशी पर्यटक स्वतः शोध घेत इथपर्यंत येऊ लागले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या ओघाबरोबर व्यस्तता वाढत चालल्यामुळे आता संग्रहालय पाहण्यासाठी देशी पर्यटकांना २० रुपये व विदेशींसाठी ५० रुपये तिकीट आकारणी श्री. गंगावणे करतात. स्वतः आत फिरुन सर्व वस्तूंची व पूर्व इतिहासाची चांगली माहिती देतात. अजून ३०० जुनी चित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. संग्रहालयाचा विस्तार करुन तिथे ती मांडायचा त्यांचा विचार आहे. त्यांच्या या संकल्पाला आमच्या शुभेच्छा!

चित्रकथी म्हणजे वेगवेगळ्या चित्रांच्या साह्याने कथा सांगणे. रामायण आणि महाभारतातील कथा व प्रसंग, म्हणजे नाटकांसाठी कथानकांचा न संपणारा अफाट खजिनाच आहे. पण ठाकर अगदी आजच्या काळातली एडस्, लेप्टोस्पायरोसीस, स्त्री भूण हत्येसंबंधी जागृतीची कथानके देखील याच बाहुल्यांच्या साह्याने सहज रंगवितात.

एका कापडी पडद्यावर चित्रवलेल्या क्रमवार चित्रांतून कधी कथानक उलगडते, तर कधी कळसूत्री बाहुल्यांच्या नाटकातून, तर कधी पांढ-या पडद्यावर दिसणा-या बाहुल्यांच्या रंगीत सावल्यांमधून, त्यांच्या भोकाभोकांच्या जाळीच्या सुंदर नक्षीमधून, सादरीकरण होताना आठ जणांचा चमू असतो. दोघेजण पडद्यामागे वा पेटा-यात, दोघेजण गाणारे - निवेदन करणारे, तर चारजण वाजवणारे.

चित्रकथी सादर करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात संगीताची व गाण्याची साथसंगत अत्यावश्यक असतेच, पण वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वापरायचा प्रघात आहे. कळसुत्री बाहुल्यांसाठी झांज, नाळ (पखवाज), तुणतुणे व हातपेटी (एका भात्याची, एका स्वराची) वापरतात. जायती (शॅडो पपेट) साठी झांज, ढोलकी व काश्याची थाळी भेंडीच्या लाकडाच्या काठीने वाजवली जाते. मात्र काठी थाळीवर आपटली जात नाही. तर मोहाच्या मेणाचा थर लावून त्यावर धरली जाते. भेंडीची काठी थाळीवर उभी धरुन त्यावरुन दोन्ही हाताच्या मुठी खाली सरकवत नेल्या जातात व आवाजाची आणि स्वरांची निर्मिती होते. काठीची थाळीवरील पोझिशन बदलून पेटीवर काळी ३ ते ७ पर्यंतचे स्वर काढता येतात. त्यावर ठाकर बायकांची किणकिणत्या आवाजातली गाणी कानाला छान गोड वाटतात. आहे ना मस्त शक्कल लढवलेली? ठाकरांच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंपासून त्यांनी अशी स्वस्त आणि मस्त वाद्ये शोधून काढलीत. असेच दुसरे एक वाद्य वापरले जाते ते म्हणजे दोणा. हे एक आयताकृती लाकडी भांडे असते, ज्यात पूर्वी भाताची पेज वगैरे वाढत. ती उपडी घालून त्यावर पेजेच्या करवंट्यांच्या डवल्यांची टोके घासली की असेच आवाज निघतात. त्यांची तानपु-यासारखी साथ गाण्याला मिळते. पडद्यावर रंगवलेले कथानक सांगताना तंबोरा, टाळ आणि हुडूक (डमरु) वापरले जातात. या डमरुचे चामडे हे बैलाच्या आतड्याच्या अस्तराचे असायचे. त्याचा आवाज सहज एक किलोमीटर लांब अंतरावर ऐकू येत असे. याच ठाकरांमधील मध्यरात्रीनंतर फिरणा-या पिगळ्यांचा (ज्यांच्यावरुन या गावाचे नाव पडले) त्यांचा डमरु मात्र वेगळ्या चामड्याचा असतो. ते त्यांचे गुपित आहे. देशावरल्या वासुदेवांप्रमाणे आपल्याकडे पिगळी आहेत. पण आताशा सरसकट वासुदेव आणि पिगळी दोघेही गावोगाव फिरताना दिसतात. दोघेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

बदलत्या काळानुसार आता ठाकरांनी आपल्या चित्रकथीची मांडणी बदलली आहे. आता एखादे कथानक मांडण्यासाठीची वेगवेगळी चित्रे ते वेगवेगळ्या कागदांवर मांडतात आणि त्या चित्रांचा सेट तुमच्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी विकतात.

जुन्या रंगांची माहिती नसली तरी ठाकर उपलब्ध जलरंगांनी, जुन्या शैलीनुसार चित्रे रंगवतात. आकारनुसार ३०० रुपये ते ८०० रु.त त्यांची संग्रहालयात विक्री होते. चामड्यावरील छायाकृतींच्या रंगीत चित्रांना साधारण १५०० ते २००० रु. आकारणी होते. बक-याच्या कातिव चामड्यावर ही चित्रे रंगवली जातात. हे चामडे पारदर्शक दिसते इतके पातळ असते. त्यामुळे चित्रकथीच्या पडद्यावर (ज्याला जायती म्हणतात.) पडणा-या छायाकृतींच्या सावल्या ह्या रंगीबेरंगी असतात. नुस्त्या काळ्या रंगाच्या नव्हेत. या सावल्या कशा पाडल्या जातात तिही वेगळी गंमत आहे. एक माणूस त्या पडदेवाल्या पेटा-याच्या आत बसतो. तिथे गोड्या तेलाचा दिवा लावलेला असतो. एका हाताने छायाकृती हलवतो तर दुस-या हाताने शंख वाजवत तो ती फुंकर दिव्यावर मारतो. त्याबरोबर प्रकाश समोर प्रोजेक्टर सारखा फाकतो आणि छायाकृतींची पडद्यावर सावली बनते.

पिगुळीच्या या चित्रकारीची शैली ही ओरीसा व आंध्रप्रदेशातील अशाच प्रकारे सादरीकरण होणा-या चित्रकथींशी आश्चर्य वाटावी इतकी मिळतीजुळती आहे. मात्र सावंतवाडीतील गंजिफा, पोपट जोडीचे पाट वा तरंगांच्या लाकडी खांबांवरील चित्रांपेक्षा वेगळी आहे. लहान मुलांनी काढावीत अशी चित्रकारीत सहजता आहे. आजच्या मुक्त शैलीशी जास्त जवळीक असणारी अशी ही आदीम समाजातून आलेली कला आहे. आपल्या जिल्ह्यात जर कुठे चित्रकथीचा कार्यक्रम करायचा असेल तर काही हजारांतसुद्धा ठाकरांचा संच त्यासाठी उपलब्ध आहे. रसिकांनी आवर्जून याची जाणीव ठेवावी व या रसभरीत कार्यक्रमाचा आनंद लुटावा.

श्री रामेश्वर मंदिराचे जतन आणि संवर्धन

गिर्ये-विजयदुर्ग येथील श्री देव रामेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून मूळ मंदिराची स्थापना इसवी सनाच्या १७ व्या शतकात किवा त्याही पूर्वी झाली असावी. परंतु, आज आढळणा-या मंदिराच्या वास्तुस्वरुपावरुन, या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा करण्यात आला असा अंदाज करता येतो.

प्रथमतः १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा बांधला असावा. इसवी सनाच्या १८व्या शतकाच्या मध्यकाळात सरदार संभाजी व सखोजी आंग्रे यांनी मूळ गाभा-यापुढे चार लाकडी खांबांचा कलाकुसरींनी मढलेला सुंदर मंडप उभारला व सभोवती प्रदक्षिणा मार्गही बांधून मंदिर बंदिस्त केले. तसेच मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करुन पश्चिम व दक्षिणेला प्रवेशद्वारेही बांधली.

मंदिराच्या भितींवर चित्तारलेली चित्रेही याच काळात खास कलाकार बोलावून काढून घेण्यात आली. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, जरी त्यात चितारलेले प्रसंग पौराणिक असले तरी त्यातील व्यक्तिरेखांचे पोषाख, अलंकार व अन्य साधने, हत्यारे वगैरे १८ व्या शतकात वापरात असलेल्या नमुन्यांप्रमाणे आढळतात. त्यामुळे या चित्रांना आगळेच ऐतिहासिक मोल प्राप्त झाले आहे.

इ. स. १७६३ साली श्रीमंत माधवराव पेशवे यांनी सरदार आनंदराव धुळप यांना आरमार सुभ्याचे प्रमुख नेमून विजयदुर्ग किल्ल्याची किल्लेदारीही दिली. तसेच इ.स. १७७५ साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी गंगाधरपंत भानू यांना विजयदुर्ग प्रांताचे मुलकी सुभेदार नेमले.

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, या उभयतांनी श्री रामेश्वर मंदिर परिसरात बरीच कामे केली. त्यापैकी सरदार आनंदराव धुळप यांनी प्रथम उत्तरेकडील प्रवेशद्वार बांधले व नंतरच्या कालावधीत पूर्वेकडील डोंगर फोडून उताराची घाटी तयार केली व मुख्य प्रवेशद्वारही बांधले. तसेच त्यांनी एक भव्य घंटाही देवाला अर्पण केली. ही घंटा फुटल्यामुळे त्यांच्या वंशजांनी इ.स. १८२७ साली सध्या याच प्रवेशद्वारात असलेली दीड मण वजनाची घंटा देवाला अर्पण केली.

सुभेदार गंगाधरपंत भानू यांनी इ.स. १७८० च्या सुमारास मंदिरासमोर अत्यंत देखणा, लाकडी सुरुदार खांब व महिरपी कमानींनी सजलेला भव्य सभामंडप उभारला.

असे हे ऐतिहासिक श्री देव रामेश्वर मंदिर, केवळ कोकणी व पेशवाई वास्तुशैलींचा मिलाफ दर्शविणारा देखणा वास्तुविष्कारच नव्हे तर एक अमूल्य ऐतिहासिक ठेवाही आहे.

जीर्णोद्धार संकल्पना

या योजनेअंतर्गत मंदिराची मूळ वास्तुशैली व वास्तूस्वरुप तसेच जपले जातील आणि आवश्यक तेथेच दुरुस्त्या व सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. मूळ वास्तू जास्त देखणी दिसावी याकरिता सौंदर्यवृद्धी करणारे काही बदलही करण्याची योजना आहे. अर्थात, पारंपारीक वास्तुशैली विचारात घेऊन त्यानुसारच हे वास्तुसंवर्धन करण्यात येईल.

मंदिराच्या भितींवर चितारलेली चित्रे हाही एक अमूल्य ऐतिहासिक ठेवा असून आजमितीस ती उन्हापावसाने खराब होत आहेत. त्यासाठी मंदिराभोवती पडवी बांधून त्यांचे योग्य प्रकारे जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही मंदिरात नसणारी व फक्त याच मंदिरात असणारी ऐतिहासिक चित्रकारीची कायमस्वरुपी आर्ट गॅलरी निर्माण होणार आहे.

मंदिराच्या आवारातील फरसबंदी, सभोवतीची तटबंदी व त्यातील चार प्रवेशद्वारे, यांचेही संवर्धन करण्यात येणार आहेच. तसेच, आवारात एक भव्य जलकुंड व कारंजेही उभारण्यात येणार आहे.

याशिवाय, सद्यपरिस्थितीस अनुरुप अशी काही नवीन बांधकामे, म्हणजेच, भक्त निवास, सार्वजनिक स्नानगृहे व स्वच्छतागृहे, देवस्थानासाठी कायमस्वरुपी कचेरी, वगैरेही याच पारंपारीक शैलीत भासतील अशाच पद्धतीने करण्याचा मानस आहे.

पुण्यातील तज्ञ वास्तुविशारद श्री. अविनाश सोवनी यांच्या मार्गदर्शनाखाली अंदाजे दीड कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून हे महत्वपूर्ण कार्य उदार भक्तजनांच्या सहकार्याने हाती घेतले आहे.

मंदिराच्या भितीवरील सेको पद्धतीची चित्रे हा एक दुर्मिळ, अमूल्य, ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचे योग्य जतन व संवर्धन करण्यात येणार असून भारत सरकार, सांस्कृतिक मंत्रालय यांचे रिजनल कंझरवेशन लॅबोरेटरी (ग़्ङख्र्क्) यांच्याशी संफ साधून प्रस्ताव तयार करण्यात येऊन, हे काम लवकरच सुरु होणार आहे.


मंदिरांचा जिर्णोद्धार आणि नुतनीकरण

सिमेंटचीच मंदिरे का?

मंदिर लाकडाचे असो वा सिमेंट काँक्रिटमधील, त्याला दरवर्षी डागडुजी व नियमित देखरेख आवश्यक असते. अनेक गावांतून मानकरी व गावकरांमधील आपाप-सातील हेव्यादाव्यांमुळे, मानापमानाच्या भांडणात मंदिर व देवाच्या कार्यक्रमांकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. कोकणात याच कारणामुळे ५० ते ६० वर्षे देखिल पूर्णपणे बंद असलेली पडीक मोठमोठ्ठी मंदिरे आहेत. मग काळ त्याचे काम करणारच. मंदिरांची गरज संपली समजून त्यांचा क्षय हा होणारच. काही काही ठिकाणी मात्र देवळाची परिस्थिती बिकट होत आली असेल, त्यावर एखादे झाड कोसळायला आले असेल तरी जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. जणू कट आखला जातो. कारण मंदिर पडले की, जीर्णोद्धाराच्या नावावर मग कमिट्या बनवून लोकांकडून सहज देणग्या उकळता येतात. कितीक गावात अश्या कमिट्या बुडाल्या आणि त्यात घातलेले पैसे बुडाले. त्यातले राजकारण आणि अर्थकारण हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. भाविकांच्या अशा फसवणुकीच्या जखमांवरल्या खपल्या न काढलेल्या बरं. दुःख आणि वेदना भळभळा वाहू लागतील.

आतापर्यंत जवळ जवळ २७ मंदिरांचे सिमेंटमध्ये बांधकाम करणारे श्री. शरद पुराणिक (वेंगुर्ले) यांनी काही खास मुद्दे मांडले. मंदिरे आहेत तशी जुनी ठेवावीत व तसाच त्यांचा जीर्णोद्धार केला जावा, हे म्हणणे ठीक असले तरी वास्तवात आज तसे बांधकाम करण्यासाठी तशी लाकडे मिळत नाहीत, ही फार महत्वाची समस्या आहे. आरवलीच्या वेतोबाची मूर्ती फणसाची होती. ती आता पंचधातूत करावी लागली. हे एक ढळढळीत उदाहरण आपल्यासमोर आहे. जुने शेकडो वर्षांचे सागवान कधीच नष्ट झालेत. आता सागात आतला गाभा म्हणजे केत तयार झाला की तो लगेच तोडायला घेतला जातो. पण तो केत सुद्धा अनेक वर्षे जावून जून झाला तरच वजन पेलायला समर्थ मजबूत बनतो. तर आता बाजारात सर्वत्र उपलब्ध सागवानी लाकूड हे असे कमकुवत असते. ते वाकते, पिचते. त्याला अगदी सहज बरड लागतो. बांधकामासाठी व कोरीव कामासाठी सागवानी लाकूडच लागते. जांभा वा शिसव ही झाडे बघायला सुद्धा मिळत नाहीत इतकी दुर्मिळ झालीत. फणस आणि शिवण पावसात फुगणारी लाकडे आहेत. भेंडी हा त्यातल्या त्यात सागाला पर्याय होईल. जर मंदिर मोडकळीस आले तर त्यातून जुनी लाकडे मोठ्या प्रमाणात परत कामी येऊ शकत असतील, तरच पुनश्चः लाकडी छप्पर ठोकणे परवडते. न पेक्षा आजच्या उपलब्ध लाकडांनी केलेले काम व डागडुजी १० ते १५ वर्षात पुन्हा कामाला येते.

आपल्याकडे अनेक गाभा-यांचे बांधकाम जुने दगडी असते. ज्याप्रमाणे काँक्रीट -मधील लोखंडी शिगा, हवेचे तापमान कमी जास्त झाले की आकुंचन, प्रसरण पावतात व त्यामुळे हळूहळू भेगा तयार होतात, त्याचप्रमाणे दगडांमध्येही तयार होतात. सिधुदुर्गातील सर्व जुन्या मंदिरांच्या गाभा-यात पाणी झिरपते, गळते. प्लास्टर करणे, सिमेंट भरणे हे सारे उपाय थकतात. अर्थात स्लॅब सुद्धा २०-२५ वर्षानंतर गळतेच. जुन्या काळातलेच बांधकाम परत करायचे तर ते मटेरियल आणि ते कारागिर मिळत नाहीत. मार्बल झक मारेल असा उत्कृष्ट ग्रॅनाईट माणगाव (कुडाळ) पट्ट्यात मिळतो. धुरकट राखाडी वा काळ्या रंगाच्या या स्थानिक दगडापासून उत्तम फरशी व मूर्ती बनवीत. आता ते दगडी काम करणारे पाथरवट नाहीत. लाकडी कोरीवकाम हवे असेल तर कुमठा-काणकोण येथे जावे लागते.

मंदिर हे आमच्या सामाजिक जीवनातील महत्वाचे अंग आहे. शहरात मंगल कार्यासाठी, सार्वजनिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध असतात. ती गरज गावांमधून मंदिरे अनायास पुरी करतात. गावकीच्या सभा, पंचायती इथेच भरत. अगदी आडबाजूच्या आतल्या गावातून एखादा वाटसरु, परका माणूस गेला तर त्याला रात्रीचा निवारा गावातल्या छोटेखानी एका खोलीच्या मंदिरात आजसुद्धा हमखास मिळतो. गावच्या देवापेक्षा उंच बांधकाम दुस-या कोणा कितीही श्रीमंत माणसाच्या घराचे असू नये, हा संकेत सामाजिक समतेचे भान राखणारा होता. गावापेक्षा कोणी मोठा असू नये ही दृष्टी देणारा होता. ते संकेत आम्ही अडगळीत टाकलेत. हे असे जुने पूर्वजांनी आखून दिलेले संकेत धुडकावताना आम्ही त्याच्यामागच्या सुप्त कार्यकारणभावाचा विचार करत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

कौलारुच मंदिरे का?

आपल्या पूर्वसूरींनी शेकडो वर्षापूर्वी आपल्या हवामानाचा, भौगोलिक परिस्थितीचा, उपलब्ध साधनसामुग्रीचा आणि वास्तुशास्त्राचा पूर्णपणे विचार करुन ही मंदिरे उभारली आहेत. त्यात जाणवणारी शांतता, गांभिर्य, थंडावा तुम्हाला नव्याने बांधलेल्या सिमेंट-काँक्रीट-मार्बलच्या देवळात जाणवतात का? गिर्ये येथील रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या श्री. केळकर यांचा हा प्रश्न सर्व अन्य मंदिर जीर्णोद्धार समितींच्या सदस्यांना अंतर्मुख करायला लावणारा आहे. हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग आहे असे समजा. पण मग असा एकतरी आर्किटेक्ट आणि बांधकाम कंत्राटदार दाखवा जो या स्लॅबच्या बांधकामाची ५० वर्षांपेक्षा जास्त छातीठोक हमी देवू शकेल. ती ५० वर्षे देखिल सतत खर्चिक डागडुजी, रंगरंगोटी व देखरेख ठेवली तरच निभावतील. अशी बांधली गेलेली सिमेंटची मंदिरे सुरुवातीचा उत्साह संपला की दुर्लक्षिली जाऊन अगदी कळाहीन झालेली दिसून येतात. कुठे टवके उडालेत, पोपडे पडलेत, आतल्या शिगा उघड्या पडून गंजू लागल्या आहेत. उदाहरणार्थ रेडीचे मंदिर पहा.

याउलट आपल्या पूर्वजांनी बांधलेली जुनी देवळे शेकडो वर्षे टिकून आज आपल्याला वारसा रुपात मिळालेली आहेत. आपल्याच अज्ञानाने व हेळसांडीने ती टेकीला येतात. रामेश्वर देवळात साधारण ३० वर्षांपूर्वी सारवणाच्या जमिनीऐवजी फरश्या बसवण्याचे काम करण्यात आले. पूर्वीची जमिन लाकडी खांबांपासून, त्यांच्या दगडी जोत्यांपासून विचारपूर्वक थोडी खाली राखली होती. नव्या फरशीकामात ती सरळ लाकडी खांबांच्या पायापर्यंत वर आली. वाळवीचे फावले. वाळवीला लाकडापर्यंत सहज प्रवेश मिळाला. त्यापुढे दुर्लक्षितपणा झाला आणि मंदिर कोसळायच्या स्थितीला पोहोचले. आता मात्र आम्ही विचारपूर्वक लाकडी खांबांचे जोते वर ठेवले आहेत.

आज आपल्याकडे सरसकट मार्बल आणि सिमेंटची कामे राजस्थानातून आणलेले कारागिर, राजस्थानातून आणलेल्या दगडांवर करताहेत. ही नवी मंदिरे कोकणातील आपली वाटतच नाहीत. राजस्थानी वाटतात. कुणकेश्वराचे देऊळ नव्या बांधकामाने सोयी निर्माण करायच्या नावावर असे व्यापले गेले आहे की ते आता आपले स्वयंभू वाटतच नाही. कोणा बिर्ला-अंबानीने फुकट बांधून दिलेल्यातले वाटते. आदीनारायण, परुळे येथल्या देवळाचा उल्लेख पूर्वी कायम पुण्या-मुंबईतल्या कला विद्यालयांत गौरवाने व्हायचा. अभ्यासदौरे आखले जायचे. इथले जुने लाकडी कोरीव कामाचे सुंदर खांब नूतनीकरणात काढून टाकण्यात आले. ते शैलीदार नमुने अडगळीत जावून पडले आणि कला रसिकांच्या नोंदवहीतून आदीनारायणाच्या देवळाचे नाव बाजूला पडले. आता ते अभ्यासक व पर्यटक आदीनारायणाला न जाता वालावलीच्या लक्ष्मीनारायणाला जातात. वालावलीचे मंदिर देवानेच नूतनीकरणाचा कौल सतत नाकारुन राखले आहे. नाविन्याच्या हौसेपोटी गौतमेश्वर, दाभोली हे मंदिर जुने कोरीव काम काढून त्याजागी शंकराच्या पिडीच्या आकारात उभारण्यात आले. मात्र ते बघायला कोणीही येत नाही. संपूर्ण मंदिर गळते. ही उदाहरणे प्रातिनिधीक म्हणून दिली आहेत. कोणावर मुद्दाम बोट रोखण्यासाठी किवा कोणाच्या भावना दुखावण्या -साठी नव्हेत.

स्लॅबचे मंदिर कधी ना कधी गळायला सुरुवात होते. त्याला पूर्ण मंदिर पाडून नवीन बांधणे हाच एक पर्याय उरतो. या उलट कौलारु छप्पर गळते तेव्हा तितक्यापुरती लाकडांची डागडुजी वा अदलाबदल केलेली पुरते. दीर्घकालीन वापरासाठी खर्चाच्या दृष्टीने कौलारु छप्पर बांधणे व देखभालया दृष्टीने स्लॅबपेक्षा सहज परवडते व आवाक्यातील राहते.

पण आज लोकांची मानसिकता अमेरिकी करणाच्या व त्यांच्या मापदंडानुसार सर्व काही मोजायच्या एव्हढी आहारी गेलेली आहे की, गिर्येत देखील लोकांचा स्लॅबचे बांधकाम हवे, त्यातच मोठेपणा आहे असा आग्रह होता. काही वर्षे त्यामुळे मंदिर नेमके कसे असावे या खलात गेली. त्यानंतर सुशिक्षित नव्या पिढीला अनेक दाखले देवून पटवून देण्यात यश आले की जुन्याचे जतन करुन ठेवले तर हा अनमोल असा एक ठेवा आहे.

स्लॅबची बांधकामे झटपट वर्षभरात उभी राहतात. पण ही लाकडी कलाकुसर वेळखाऊ व कारागिर उपलब्ध होण्या न होण्यावर असल्यामुळे काम रेंगाळत चालू आहे. लोकांना ही चालढकल वाटते. त्यामुळे भाविकांकडून येणारे पैसे थोडे थोडे येतात. जसे जसे पैसे येतात तसे तसे काम थोडे थोडे पुढे सरकते आहे. मात्र सागवानी लाकूड दुर्मिळ झाले आहे. त्याच्यासाठी काम अडून राहू नये याची दक्षता घेऊन पुरेसा साठा करुन ठेवण्यात आलेला आहे.

आशा आहे, आमच्या कोकणातील सर्व मंदिर समित्या यातून काही बोध घेतील. देव हेच आमचे आधार. तेच जर परक्या संस्कृतीच्या घरात राहू लागले तर आमचीही घरे आणि संस्कृती नष्ट होण्यास कितीसा काळ लागणार?

No comments:

Post a Comment