Thursday, 22 December, 2011

अंक ४६वा, २२ डिसबर २०११

अधोरेखित *
निळ्या ज्योतिची क्रांती
कोकणातील गाव म्हटल्यावर मागे डोंगररांगा व माडांच्या गर्द छायेमध्ये कौलारु घरं व त्या घरांच्या छपरातून येणा-या धुरांच्या रांगा असं रमणीय चित्र सर्वांना दिसतं. ‘चुलीतील धूर‘ कौलांच्या फटीतून येतो तेव्हा घर सुद्धा विडीचा धूर बंद ओठातून सोडणा-या कोकणी माणसासारखं बेरकी दिसतं. पण जी महिला चुलीसमोर बसून जेवण करते तिच्यासाठी मात्र ती चूल सखी नसते. धुरामुळे तिचा जीव घुसमटतो, डोळे चुरचुरतात, खोकला येतो, भांडी काळी होतात. पावसाळ्यातील भिजलेली, दमट लाकडं पेटविताना जीव नकोसा होतो. बाहेरच्या पडवीत बसून ‘‘च्याय करुक इतको वेळ लागता?‘‘ म्हणणा-या नवरोबाला याची कितपत जाणीव असते? आम्ही धूरमुक्त गावाची स्वप्नं पाहिली. आज स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. बायोगॅसच्या ‘निळ्या ज्वाळा‘ ही क्रांती घरोघरी घडवत आहे.
पाच ते सहा माणसांच्या कुटुंबाला वर्षभरात ६ बैलगाड्या लाकूड इंधनासाठी लागतं. म्हणजे २५० घरांसाठी १५०० बैलगाड्या लाकूड वर्षासाठी लागते. चुलीची कार्यक्षमता ३५ टक्के असते. धुरामधील कार्बन मोनॉक्साइड वायू अधिक विषारी असतो. पांढ-या धुरामध्ये हा अधिक असतो. आम्ही गावांचे सर्व्हे केले. किती कुटुंबांकडे जनावरे आहेत? वृक्षतोड किती होते? बायोगॅस बांधणार का? असे मोजके पाच प्रश्न सर्व्हेमध्ये असतात. बंद पडलेले बायोगॅस सुरु करण्यात आले. नवीन पद्धतीचा फेरोसिमेंटचा ‘दिनबंधु बायोगॅस‘ बांधण्याचे प्रशिक्षण गवंड्यांना बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या सहकार्याने दिले. गावामध्ये गवंडी प्रशिक्षणं घेतली. माहितीचे फलक लावले. म्हणता म्हणता १२०० बायोगॅस पूर्ण झाले. २०२० पर्यंत २० हजार बायोगॅस बांधण्याचा संकल्प आहे.
बायोगॅस बांधण्यासाठी देवाचा कौल घेणारे ‘श्रद्धाळू‘ ही भेटले. गावातील घाडी, गुरव, भटजी हे खरं तर ‘ओप्पीनियन मेकर‘ असतात. त्यांचे बायोगॅस अग्रक्रमाने बांधले. आता अडचण येत नाही. गॅस बांधायचा तर १५ हजार रु.चा खर्च. एवढे पैसे कुठून आणणार? जिल्हा बँकेचे सतीश सावंत, अनिरुद्ध देसाई व नाबार्डचे चंद्रशेखर देसाई यांच्यामुळे गॅससाठी १२ हजार रु.चे कर्ज मिळणे सुलभ झाले. ३००० रु. शेतकरी उभे करतो. एकट्या होडावडे शाखेमध्ये १४० कर्जप्रकरणे झाली. म्हणजे १६ लाख ८० हजार रुपये. शाखाधिकारी श्री. कोचरेकर यांनी खूप मदत केली. गवंड्यांना गाडी घेण्यासाठी बँकेने कर्जे दिली. त्यामुळे लांब जाणे सोपे झाले. आज आपले गवंडी रत्नागिरी जिल्ह्यामध्येही काम करतात. ५० गवंड्यांची टीम आहे. वर्षाकाठी प्रत्येकजण ५० हजार रु.चे काम करतो. श्रमाला ज्ञान व तंत्राची जोड मिळाली. स्वप्नवत वाटणारे काम सत्यामध्ये उतरले. महिलेला जेवण करणे आनंददायी झाले. बायोगॅसच्या निळ्या ज्योतीची ‘सखी‘ तिला मिळाली. बचत गटाच्या बैठकांना ती हजर राहू लागली. घुसमटणा-या महिलांना ‘श्वास‘ घ्यायला उसंत मिळाली.
‘मिथेन‘ हा वायू कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होतो. बायोगॅसमधील या वायूमुळे जेवण होते, गॅस पेटतो. पण हा वायू वातावरणामध्ये गेल्यास पर्यावरणाचे तपमान वाढते. ग्लोबल वॉर्मिग होते. रोटरी क्लब, माहिम-मुंबई ३१४० या क्लबने धूरमुक्त गावासाठी मोठे आर्थिक सहकार्य केले. अवधूत ट्रस्ट, मुंबई, तपोवन संस्था या सर्वांच्या सहकार्यामुळे कामाची गती वाढली. बायोगॅसमुळे जंगलतोड वाचली. सेंद्रिय खत मिळाले. ‘बायोगॅस‘ हा कल्पवृक्ष ठरत आहे. गवंड्यांना यामधून ‘ग्रीन करीअर‘ मिळाले. कोकणी माणूस आळशी नाही. कोणी तरी ‘लढ‘ म्हणणारे लागतात. ‘पाठीचा कणा‘ ताठ असतोच. भगीरथ या सर्वांमध्ये आपलं होऊन राहिलं. यातून विकासाची प्रक्रिया सुरु झाली.
आज आपण ‘स्टील‘ ऐवजी कोकणातील माणगा (बांबू) वापरुन बायोगॅस बांधत आहोत. त्यामुळे २ हजार रुपये वाचतात. या प्रयोगासाठीही ‘नाबार्ड‘कडे प्रस्ताव पाठविला आहे. बाई म्हणजे ‘चूल आणि मूल‘ हे आता जुनं झालं. गॅसमुळे जेवण करायचा वाचलेला वेळ कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय यासाठी वापरला जात आहे. ‘सावित्रीच्या लेकी‘ मळलेल्या वाटांचे रुपांतर हमरस्त्यांमध्ये करीत आहेत. गॅस पेटल्यानंतर पाणावणारे डोळे खूप खूप समाधान देत आहेत. आपल्या गावामध्येही असं घडू दे ही ‘पाषाणाला‘ प्रार्थना!
-डॉ. प्रसाद देवधर, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप,ता. कुडाळ. ९४२२५९६५००.

संपादकीय *
निवडणुकीनंतर*.
नगरपरिषद निवडणुकांचा शिमगा संपला असला तरी कवित्व उरले आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांच्या ५१ जागांपैकी केवळ ९ जागाच मिळवू शकलेल्या नारायण राणे समर्थक काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी व त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चारुन काँग्रेसच सत्तेवर येईल अशी विधाने करणे सुरु केले आहे. वेंगुर्ल्यात राणे समर्थक सशस्त्र गुंडांनी ५ डिसेंबरच्या रात्री राडा केला. तरीही तो शिवसेना- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला असे राणेंसह सर्वजण जाहीरपणे रेटून खोटेच सांगत राहिले. अर्थात तीन्ही नगरपरिषदांमध्ये नागरिकांनी काही बोलता त्यांच्या विरोधात कौल देऊन खोट्या प्रचाराला मतदान यंत्रातूनच एक प्रकारे उत्तर दिले आहे.
या सर्वातून बोध घेऊन राणे समर्थक काँग्रेसने समजूतदारपणाने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या जिल्ह्यात राष्ट्रवादीशी आघाडी केली तर त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादीला झुकते माप देणे भाग पडेल. राष्ट्रवादी पक्ष त्याचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही.
राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आहे. आत्ताच्या अनेक नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीने निवडणुका लढवून यश प्राप्त केले. जिथे शक्य होते तिथे स्वबळावर यश मिळविले. आपल्या नजिकच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येही मध्यंतरी नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव असा दोन मंत्र्यांमध्ये कलगी तुरा रंगूनही त्या जिल्ह्यात आघाडी होऊ शकली. त्यामुळे माफक यश मिळाले. दोन्ही काँग्रेसने एक पाऊल मागे घेण्याचे ठरवून येती जिल्हा परिषद एकत्र येऊन लढविली तर त्यांचीच सत्ता येऊ शकते. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय या युतीला सत्तेपासून वंचित रहावे लागेल.
परंतू अन्य जिल्ह्यात काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षात तीव्र स्वरुपाचे मतभेद असूनही तेथे काही ठिकाणी दोन्ही पक्षांची आघाडी झाली तशी सिधुदुर्ग जिल्ह्यात होईल याची शक्यता कमीच आहे. निवडणुक प्रचारात आरोप-प्रत्यारोप अगदी खालच्या पातळीवर जाऊन झाले. वेंगुर्ल्यात नारायण राणेंच्या पुत्राला घेराव घातल्याने संतप्त झालेल्या पालकमंत्री राणेंनी स्वतः जातीनिशी येऊन सशस्त्र कार्यकर्त्यांकरवी जमावावर हल्ला चढविला. स्थानिक कार्यकर्त्यांना षंढ म्हणून त्यांचा ‘स्वाभिमान‘ डिवचला आणि त्यांनाही लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांची मोडतोड करण्यास उद्युक्त केले. हे सर्व शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी आणि ‘बंदोबस्ता‘साठी आलेल्या पोलिसांनीही प्रत्यक्ष पाहिले तरी हा हल्याचा कट शिवसेना, राष्ट्रवादीनेच घडवून आणला असे टी. व्ही. वाहिन्यांवरुन आणि प्रचारसभांतून खोटेच सांगितले. या खोटेपणाचीच चीड येऊन काँग्रेसचे म्हणून असलेले बरेच मतदान विरोधात गेले. आता वेंगुर्ले पोलिसांनी निवडणुका संपल्यावर आठवडाभराने त्यावेळी जमावातील असलेल्या काही तरुणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. असे करुन बाहेरुन आलेल्या लाठ्या, शिगा, तलवारींनी जमावावर हल्ला करुन वाहनांची मोडतोड करणा-यांवर काहीच कारवाई न करणारे पोलीस पक्षपात करीत आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखीच गढूळ बनले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊन काँग्रेस पक्षाला ती निवडणुकही जड जाईल. तसेच घडावे असे वेंगुर्ले पोलीसांचे धोरण नसेलच असे म्हणता येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे आबा पाटील यांच्याकडेच तर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृहखाते आहे!
या निवडणुकीत नारायण राणे व व राष्ट्रवादीचे आमदार केसरकर यांच्यात तशी दिलजमाई होणे सध्या तरी शक्य दिसत नाही. कारण दोन्ही पक्षांनी आत्ताची निवडणुक पक्षाबरोबरच वैय्यक्तिक प्रतिष्ठेची केली होती. वेंगुर्लेतील राडा प्रकरणामुळे जनमत काँग्रेसविरोधात गेल्यामुळे सत्तेसाठी काँग्रेसशी दिलजमाई करणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही मानवणारे नाही. न. प. निवडणुकीतील अपयशामुळे शिवसेनेने भाजपा - राष्ट्रवादी युतीमध्ये सामील होण्याचे ठरविले तर सिधुदुर्ग जिल्हा परिषदेवर या महायुतीला आपली सत्ता प्रस्थापित करता येईल.
हे सर्व पक्षशिस्तीत बसत नसले तरी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केंद्रात व राज्यात आघाडी, युती केलेली असली तरी स्थानिक पातळीवर पक्षाला फायदा होईल अशा प्रकारे आघाडी, युती करण्यास स्थानिक पक्ष नेतृत्वाला तोंडी संमत्ती दिलेली आहे. त्यामुळेच यावेळच्या न. प. निवडणुकांत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस-सेना-भाजप युती, राष्ट्रवादी-सेना-भाजप युती अशा अजब युत्या आणि आघाड्या मतदारांना पहावयास मिळाल्या त्यातून जनतेचे मनोरंजन झाले असले तरी फायदा मात्र कोणताच होणारा नाही. फायदा होईल तो निवडून आलेल्या उमेदवारांचा आणि राजकीय पक्षांचा.

विशेष *
जतन आणि संवर्धन मंदिराचे
सन २००८ पासून एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बांद्रा चे विद्यार्थी सिधुदुर्गातील प्राचीन मंदिरांच्या उभारणीचा, स्थापत्यशास्त्र, वास्तूवरील चित्रकला यांचा अभ्यास करण्यासाठी प्राचार्य ए. एम. खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी येत आहेत. यावर्षी वेंगुर्ले येथील रामेश्वर आणि सातेरी मंदिरांचा अभ्यास हे विद्यार्थी करीत आहेत.
आपल्याकडची जवळपास सर्वच मंदिरे ३०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी, कोकणी आणि पेशवाई वास्तुशैलीचा सुंदर मिलाफ दर्शविणारी आहेत. ‘किरात‘च्या २४ नोव्हेंबरच्या ‘शा.प.लो.पु.‘ पुरवणीत अशी प्राचीन मंदिरे झपाट्याने कमी होत असल्याची खंत मांडली होती आणि त्यावर उपाय योजनाही सुचविल्या होत्या. अशा प्रकारचे जतनीकरणाचे काम गिर्ये-विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिरात सुरु आहे. प्राचिन बांधकाम जतन करणे, नव्या स्वरुपात डागडुजी करणे या सर्वांना खर्च प्रचंड येतो. पण हे बांधकाम १०० वर्षांपेक्षा जास्त टिकावू असते. स्लॅबच्या बांधकामाची हमी १० वर्षांपेक्षा जास्त कोणताही स्थापत्यकार देऊ शकत नाही. हेच मत एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य अरविद खानोलकर यांनी मांडले आहे.
प्राचार्य खानोलकर गेली ४ वर्षे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इथल्या बांधकामाचा, कलेचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर अनुभव घेता यावा म्हणून सिधुदुर्गात असे अभ्यासदौरे आखत आहेत. त्यांचे मुख्य उद्देश शहरातील विद्यार्थ्यांना पुरातन स्थापत्य बांधणीचा प्रत्यक्ष अनुभव देणे आणि गावातील मंदिरे पाहायला बाहेरुन अभ्यासक येत आहेत हे पाहिल्यावर पर्यटन वाढीलाही हातभार लागेल. त्यानिमित्ताने मंदिरांची साफसफाई होते.
स्थापत्यशास्त्र हे जगभर समान आहे. फक्त फरक असतो तो वास्तूच्या बांधणीमध्ये आणि रचनेत. कोकणातल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे कौलारु, लाकडी खांबावर कोरीवकाम असणारी आणि गोव्याप्रमाणे भव्य.
अलिकडे जीर्णोद्धार करणे म्हणजे जुनी मंदिरे पाडून झटपट वर्षभरात उभी रहाणारी सिमेंट काँक्रीटची मंदिरे उभी करणे हा ट्रेंड रुजला आहे. खानोलकरांच्या मते वास्तवात विचार करता जुन्या पद्धतीची टिकावू लाकडे आज मिळणे अवघड आहे. त्यामुळे जिथे शक्य असेल ते जसेच्या तसे जतन करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि जिथे अजिबातच शक्य नाही त्या ठिकाणी वेगळा विचार करायला हवा. उदा. मंदिरांचे जीर्णोद्धार करताना पुरातनपण टिकवायचे असेल तर प्राधान्यक्रमाने कामे हाते घ्यावीत. म्हणजे खांब, तुळया, वाशे ही कामे एकहाती पूर्ण केली पाहिजेत. नंतरच्या टप्प्यात कोरीव काम, फरशा घालणे अशी कामे करावीत. म्हणजे आर्थिक नियोजनही करता येते. अशा जतन करण्याच्या कामांना खर्च जास्त येतो. पण आपली प्राचिन वारसा सांगणारी संस्कृती, स्थापत्यकला जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. नाहीतर पुढच्या काही वर्षात आर्किटेक्चरच्या नवीन मुलांना इथे काय दाखवायचे?
मंदिरांच्या जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कारागिरांचा विचारही व्हायला हवा. साधारणतः दीडशे ते दोनशे वर्षांनी मंदिरे दुरुस्तीला येतात. आपल्याकडे कारागिर मिळत नाहीत अशी ओरड असते. त्यामुळे स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देणे, त्यांची टीम बनविणे, सर्वांनी केलेल्या कामाच्या लिखित नोंदी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे कारागिर आयात करणे थांबेल आणि इथल्याच हातांना काम मिळेल.

विश्वविक्रमाचा ध्यास
मठ येथील प्रतिथयश शेतकरी भगवान उर्फ भाऊ बोवलेकर यांनी वांग्याच्या विक्रमी उंचीच्या झाडाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतल्यानंतर त्यानी आता मिरचीचे झाड १६.२ फूट उंच वाढवून आणखी एक विक्रम केला आहे.
पहिल्या वांग्याच्या प्रयोगात समाधान न मानता आपल्या संशोधनातून अनेक झाडांची उंची वाढविण्याचे त्यांनी ठरविले आणि काम सुरु केले आहे. आपल्या शेतात मिरचीचे उत्पादन घेताना केवळ मिरचीची लागवड शेती म्हणून न पाहता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिरचीच्या झाडाच्या उंचीची नोंद १६ फूट झालेली आहे. आपणही यापेक्षा उंच मिरचीचे झाड वाढवावे ही प्रेरणा त्यांनी घेतली आहे. आपल्या विशिष्ट प्रकारच्या सेंद्रीय खताच्या संशोधनातून त्यांनी मिरचीचे झाड तब्बल १६.२ फूट उंच वाढविण्यात यश मिळविले आहे. शिवाय आणखीन काही झाडे ८ फूटांपेक्षा उंच वाढलेली आहेत.
या मिरचीच्या झाडापासून दर महिन्याला साधारणतः एक ते दीड किलो मिरचीचे उत्पादन मिळते. सदरच्या मिरचीचे झाड हे लांब मिरचीचे आहे. हे मिरचीचे बियाणेसुद्धा बाजारातून मसाल्यासाठी आणलेल्या मिरचीच्या बिया वाफ्यावर रुजवून रोपे तयार केली व उंची वाढविण्यासाठी एका झाडावर प्रयोग केला. सदरच्या झाडाचे बियाणे ४ एप्रिल २०११ रोजी रुजवून त्यावर कोणत्याही प्रकारचे बाजारी खत अथवा कीटकनाशकांचा वापर केलेला नाही.
केवळ स्वतःच्या कल्पकतेने व तयार केलेल्या सेंद्रीय खताचा वापर करुन मिरचीचे झाड १६.२ फूट वाढविण्यात बोवलेकर यशस्वी झाले आहेत. हे उंच मिरचीचे झाड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यास सिद्ध झाले आहे. याबाबत अनेक मान्यवरांकडून भाऊ बोवलेकर यांचे कौतुक होत आहे. तसेच हे मिरचीचे झाड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
शेतीविषयक प्रयोगांच्या माहितीसाठी संफ- भाऊ बोवलेकर ः ९४२२२१६३६५.

कॉ. वैदेही पाटकर पुरस्कार वितरण
महिलांवरील अन्यायाच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणा-या आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास सहाय्य करणा-या चेतना महिला संस्था, पुणे च्या वेंगुर्ले केंद्रातील सुप्रिया नवार, सायली कोचरेकर, लुड्डीन फर्नांडीस, इजाबेल डिसोजा, अंकिता बांदेकर, अक्षता साळगावकर तसेच बांबोळी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अनिशा नाईक यांना यावर्षीचा पहिलाच काँम्रेड वैदेही पाटकर स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
कोलगाव येथील निरामय विकास केंद्राच्या सभागृहात ११ डिसेंबरला झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा येथील लेखिका नमन सावंत, प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध लेखिका व विचारवंत श्रीमती विद्या बाळ, खनिज प्रकल्पा विरोधात लढा देणा-या कळणे सरपंच सौ. संपदा देसाई या होत्या.
बांदा येथील लोकलढ्यात समर्थ नेतृत्व करणा-या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या वैदेही आनंद पाटकर यांच्या नावे हा पुरस्कार देणारे त्यांचे सुपूत्र डॉ. रुपेश पाटकर यांनी या पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. अॅड. शशांक मराठे यांनी पुरस्कार मिळालेल्या महिलांच्या कार्याचा परिचय करुन दिला. निरामय केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर, पुरस्कार विजेत्या महिला, प्रमुख पाहुण्या व अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद घाणेकर यांनी सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमास चेतना संस्थेच्या संचालिका अॅड. असुंता पारधे, लेखिका सौ. उषा परब, विनया बाड, आरती कार्लेकर आदी विविध क्षेत्रातील व संघटनांमधील कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष बातम्या *
वेंगुर्ले नगराध्यक्षपदी नम्रता कुबल तर उपनगराध्यक्षपदी रमण वायंगणकर
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी सौ. नम्रता नितीन कुबल यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यावर पहिल्या अडीच वर्षांकरिता त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे चारच उमेदवार निवडून आले होते. त्यांना शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन आणि एक अपक्ष उमेदवार गिरगोल फर्नांडीस यांचा पाठिबा मिळाला. त्यावेळी नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित होते. पुढील अडीच वर्षांकरिता त्याच अपक्षाच्या पाठिब्यावर संदेश निकम नगराध्यक्ष झाले होते.
यावेळीही नगराध्यक्षपद हे इतर मागास महिलांसाठी आरक्षित असल्याने आणि नवीन कौन्सीलमध्ये राष्ट्रवादीचेच बारा सदस्य निवडून आल्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या पाठिब्याची जरुरी नव्हती. शिवाय सौ. नम्रता कुबल या पूर्वाश्रमीच्या केळुसकर म्हणजे इतर मागास प्रवर्गात येणा-या भंडारी ज्ञातीमधील असल्याने त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अपेक्षित होतेच. इतर मागास प्रवर्गातील माजी नगराध्यक्षा सौ. सुलोचना तांडेल याही नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या. परंतु त्यांनी यापूर्वी पाच वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले होते. तसेच डॉ. सौ. पूजा कर्पे आणि सौ. अन्नपूर्णा नार्वेकर या राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीपर्यंत काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होत्या. तेथे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळविली आणि राणे समर्थक काँग्रेस विरोधी लाटेत त्या निवडूनही आल्या. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सौ. नम्रता कुबल यांचीच निवड करुन नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. अन्य कोणाचाही अर्ज नसल्याने सौ. नम्रता कुबल यांचे नगराध्यक्षपद निश्चित झाले.तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेले रमण वायंगणकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि ते राष्ट्रवादी पक्षाबरोबरच राहिल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सावंतवाडी नगरपरिषदेत प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर व उपनगराध्यक्षपदी राजन पोकळे यांची बिनविरोध निवड झाली. तर मालवण नगरपरिषदेत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश जावकर यांना राष्ट्रवादीच्या सहा आणि शिवसेनेच्या दोन नगर सेवकांचा पाठिबा मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण त्यात त्रुटी असल्याची हरकत काँग्रेसने घेतल्यामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात आली.

१० जणांची अनामत जप्त
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांपैकी १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रभाग एकमधून नागेश मोहन गावडे (काँग्रेस), सिप्रियान तमास फर्नांडीस (मनसे), उपनगराध्यक्ष गिरगोल संतांन फर्नांडीस (काँग्रेस), भूषण उर्फ समीर भगवान सारंग (अपक्ष). प्रभाग २ मधून राधा सह्याद्री सावंत (शिवसेना), निलेश मोहन परब (अपक्ष), अल्ताफ हमीद शेख (शिवसेना), प्रभाग तीनमधून मनीष वामन सातार्डेकर (मनसे), प्रभाग चारमधून अलिशा जाफर शेख (अपक्ष) अशा १० उमेदवारांची एकूण ९ हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली.

जागृती फेस्टीव्हल २४ व २५ रोजी
वेंगुर्ले येथील जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळाच्या २३व्या जागृती फेस्टीव्हल २०११ चे आयोजन सिद्धिविनायक मंगल कार्यालयात २४ व २५ डिसेंबर रोजी करण्यात आले असून या फेस्टीव्हलचे उद्घाटन २४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता वेंगुर्लेच्या नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांच्या हस्ते होणार आहे.
दि.२४ रोजी सायंकाळी जागृती गौरव पुरस्कार वितरण, ‘आई‘ या विषयावरील कविता लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण, ७ वा. वेशभूषा स्पर्धा, ८ वा. नृत्यस्पर्धा. दि. २५ रोजी सकाळी ८ वा. कॅम्प मैदानावर मॅरेथॉन स्पर्धा, १० वा. सिद्धिविनायक मंगल कार्यालयात बालकुमार चित्रकला स्पर्धा, सायं. ४ वा. महिलांसाठी बटाटीपासून गोडपदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा. सायं. ६ वा. आदर्श बालवाडी पुरस्काराचे वितरण. ७ वा. ग्रुपडान्स स्पर्धा, रात्रौ १० वा. फेस्टीव्हलचा समारोप. या फेस्टीव्हलला वेंगुर्लेवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर व सचिव अमोल सावंत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment