Saturday 3 December, 2011

अंक ४४वा, १ डिसबर २०११

अधोरेखीत *

सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती

येत्या नगरपालिका निवडणुकीत ५० टक्के महिलाच निवडून येणार असल्यामुळे नगरपालिकांच्या कारभारात काही सकारात्मक बदल घडेल का? याची चर्चा प्रसार माध्यमातून झालेलीच आहे. तसे यापूर्वी महिलांना मिळालेल्या ३३ टक्के आरक्षणानुसार छोट्या नगरपालिकांमध्ये ६ ते ७ महिला निवडून आल्या आहेत. आरक्षणामुळे त्यातील काहींना नगराध्यक्षपदही मिळाले. नंतरच्या निवडणुकीतही आरक्षणामुळे काही नगरपालिकांमध्ये संपूर्ण शहरातील मतदारांकडून बहुमताने महिला नगराध्यक्ष निवडल्या गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची संख्या वाढली तर कारभारात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात (काही सन्माननीय अपवाद वगळता) ब-याच ठिकाणी नगरसेविकांच्या पतिराजांचेच राज्य असल्याची स्थिती होती व आहे. महिलांच्या सभागृहातील संख्येमुळे सभागृहाच्या कारभारात शिस्त येईल अशी अपेक्षा होती. पण तीही फोल ठरली. काही ठिकाणी महिलाच तावातावाने एकमेकांशी भांडताहेत, झिज्या उपटताहेत असे दृष्य सभागृहाला पहावे लागले.

असे प्रकार घडण्याचे कारण.... सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना फक्त आरक्षणे वाढवून दिली. परंतु नगरसेवकांच्या पात्रतेचा कोणताही निकष लावलेला नाही.

आता तर महिला ५० टक्के संख्येने लोकप्रतिनिधी म्हणून दाखल होणार आहेत. त्यातल्या स्वयंप्रज्ञेने काम करणा-या महिलांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीही असेल-नसेल. त्यामुळे नगरपालिका तसेच पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सभागृहात महिलांची संख्या पुरुषांच्या तोडीस तोड असली तरी प्रत्यक्ष कारभार मात्र पुरुषी वर्चस्वाखाली राहण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्वयंप्रज्ञेने काम करणा-या महिलांना काम करणे अवघड होईल.

वर्षानुवर्षे घरातल्या निर्णयप्रक्रियेतही फारशा सहभागी न होणा-या महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आल्यावर कामकाजाचा अनुभव नसल्यामुळे सभागृहात बोलणे, प्रश्न विचारणे, ठराव मांडणे, मंजूर करणे, चर्चा करणे या सर्व गोष्टींबाबत अनभिज्ञ असतात. हे सर्व टाळण्यासाठी राज्य शासनातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक महिला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षणाला हजर राहून कामकाजातील बारकावे समजून घेता येतील.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचे, ज्ञानाचे दरवाजे खुले केले. एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते हा अनुभव सा-यांनी घेतला. आता आरक्षणाने का होईना सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती पडत आहेत. या चाव्यांचा वापर विधायक कामांसाठी अधिक सक्षमपणे आणि प्रभाविपणे महिला करु शकतील असा सा-यांना विश्वास आहे आणि तसा तो त्यांनी केला तर त्यांचे पतिराजही कारभारात हस्तक्षेप करणार नाहीत.

स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके आहेत असे मानले जाते. पुरुष कितीही कर्तबगार असला तरी त्याला पत्नीची समर्थ साथ नसेल तर त्याची एक बाजू लंगडीच पडते. मुला-बाळांचे संगोपन, घराची देखभाल या गोष्टी स्त्रियांइतक्या सहजतेने पुरुषाला शक्य होत नाहीत. त्यामुळे घर-संसार नेकीने सांभाळणा-या स्त्रिया या राजकारणात, समाज कारणातही आपली कर्तबगारी दाखवू शकतात हे अनेक उदाहरणांवरुन सिद्ध झालेले आहे. अशीच कर्तबगारी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन सिद्ध करता येईल अशी संधी मिळालेली आहे. सभागृहातील महिला प्रतिनिधी संघटीतपणे काम करु लागल्या तर निश्चितपणे आपापल्या भागात दर्जेदार आणि भ्रष्टाचारमुक्त विकासकामे करु शकतील. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यामागे हाच हेतू आहे.

महिलाच घडवतील इतिहास

कदाचित हे वर्णन प्रथम दर्शनी वाचणा-यांना स्वप्नवत वाटेल. महिला निवडून जरी आल्या तरी खरा कारभार त्यांचे पती म्हणजे पुरुषच सांभाळणार असा भक्कम समज समाजात वर्षानुवर्षे मनात घट्ट आहे. तो बदलणे केवळ महिलांनाच शक्य आहे. राज्यशासनातर्फे देण्यात येणा-या प्रशिक्षणाला केवळ सहीपुरती हजेरी न लावता शिकविण्यात येणारे धडे प्रत्यक्षात आचरणात आणण्याची वेळ केव्हाच येऊन ठेपली आहे. सुरुवातीला अगदी घरातूनही विरोध होईल. हे धरुनच चालले पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनाही लोकांच्या विरोधाचा, शेणाचा सामना करावा लागला होता. त्याचे दुःख न मानता त्यांनी कार्य तसेच पुढे चालू ठेवले आणि त्याची फळे आज मिळत आहेत.

महिला म्हणतील, हे लिहायला, भाषणात बोलायला खूप सोपे आहे. पण आता केवळ आरक्षण कागदावर न रहाता त्याचे खरे परिणाम दिसावेत ही सा-यांची अपेक्षा आहे.

अॅड. शशांक मराठे

संपादकीय *

वेंगुर्ल्याच्या तोंडाला पुन्हा पानेच..!

वेंगुर्ले येथे होणारे फलोद्यान महाविद्यालय आता पालकमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे नेले आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मे २०११ मध्ये झालेल्या विधीसभेमध्ये फलोद्यान महाविद्यालय वेंगुर्ले येथे, अन्न प्रक्रिया प्रशिक्षण महाविद्यालय मुळदे येथे व कृषी महाविद्यालय रोहे येथे सुरु करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने कार्यवाहीही सुरु केली होती. कोकण कृषी विद्यापीठाच्या विधी सभेचे सदस्य आमदार दीपक केसरकर यांनी हा ठराव मांडून मंजूर करुन घेतला होता. वेंगुर्ले येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार, माजी नगराध्यक्ष व विद्यापीठाच्या विधीसभेचे माजी सदस्य शिवाजीराव कुबल यांनी या विषयाचा पूर्वीपासूनच पाठपुरावा केला होता व त्यानुसार मंजूर झालेले फलोद्यान महाविद्यालय वेंगुर्ले येथे होणार या वृत्ताने वेंगुर्लेवासीयांना समाधान व्यक्त केले जात होते. वास्तविक पाहता पालकमंत्री नारायण राणे यांनी विद्यापीठ ठरावानुसार त्याची कार्यवाही लवकरात लवकर कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतू प्रत्यक्षात उलटेच घडले आहे.

ना. राणे यांनी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आपल्या मतदार संघातील कुडाळ तालुक्यातील मुळदे येथेच हे फलोद्यान महाविद्यालय आणि त्यासाठी लागणा-या कर्मचारी वर्गाची पदे मंजूर करुन घेतली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या बातमीत पुढील शैक्षणिक वर्षापासून मुळदे येथील हे फलोद्यान महाविद्यालय सुरु केले जाईल असे म्हटले आहे.

यापूर्वी विद्यापीठाचे कृषिविद्यालय (शेतीशाळा) वेंगुर्ले येथे व्हावी असा विधिसभेचा ठराव झाला होता. तेव्हा विधिसभेचे सदस्य असलेले शिवाजीराव कुबल यांनी तो ठराव मांडून पाठपुरावा केला होता. त्यावेळी विधानसभा मतदारसंघाचे कुडाळचे आमदार पुष्पसेन सावंत हेही कृषी विद्यापीठाच्या विधिसभेचे आमदार या नात्याने सदस्य होते. त्यांनी त्यावेळी नवीनच सुरु झालेल्या विद्यापीठाच्या मुळदे येथील केंद्राच्या ठिकाणी हे कृषी विद्यालय व्हावे असा आग्रह धरला होता. परंतू त्यामुळे तेव्हा कोणताच निर्णय झाला नव्हता.

दरम्याने राज्यसरकारच्या शिफारशीनुसार तत्कालीन राज्य -पालांनी (जे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात) निर्णय दिला की, यापुढे कृषि विद्यापीठ स्वतःची विद्यालये, महाविद्यालये सुरु करणार नाही तर ज्या खाजगी संस्थांना अशी विद्यालये, कृषी महाविद्यालये सुरु करावयाची असतील त्यांना (विद्यापीठाच्या नियमात व निकषात बसत असतील तरच) विद्यापीठ मान्यता देईल. त्यामुळे वेंगुर्ले येथे कोकण कृषि विद्यापीठाचे कृषी विद्यालय होण्याचे त्यावेळी बारगळले आणि कोकणात ब-याच खाजगी संस्थांनी विद्यालये सुरु केली. खुद्द पुष्पसेन यांनीही आपल्या गावात कृषीविद्यालय काढले. खाजगी संस्थांना विद्यालये सुरु करण्यास परवानगी देतांना विद्यापीठ स्तरावर आणि नंतर या विद्यालयांच्या कारभारातही बरेच गैरव्यवहार झाले. परिणामी बहुतेक विद्यालये बंद पडली. काही चांगल्या प्रामाणिक संस्थांची आणि राजकीय हिकमती लढविणा-यांची विद्यालये सध्या जेमतेम सुरु आहेत.

वेंगुर्ल्यावर यापूर्वीही असाच अन्याय झालेला आहे. एस.टी. महामंडळाच्या मूळ योजनेनुसार त्याकाळी बंदर तेथे एस.टी.डेपो असे धोरण होते. त्यानुसार कोकणातील बहुतेक बंदराच्या गावांमध्ये एस.टी.डेपो सुरु झाले. सिधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदूर्ग, देवगड, मालवण हे डेपो त्यावेळी त्याच धोरणानुसार झालेले आहेत. त्याप्रमाणे वेंगुर्ले येथेही डेपोस मंजूरी मिळालेली होती. परंतू त्यावेळी तत्कालीन वेंगुर्ल्याचे सावंतवाडीचे आमदार प्रतापराव भोसले (माजी मंत्री प्रवीण भोसले यांचे वडील) यांनी आपले राजकीय वजन वापरुन वेंगुर्ले येथे होणारा हा डेपो सावंतवाडीला नेला. त्यानंतर वेंगुर्लेवासीयांच्या सातत्याच्या मागणीनुसार व प्रसंगी संघर्षाचा पवित्रा घेतल्यावर ब-याच वर्षांनी वेंगुर्ल्यात एस.टी.डेपो झाला.

नेमका असाच प्रकार फलोद्यान महाविद्यालयाबाबतीत झाला आहे. आता वेंगुर्ले तालुका हा सावंतवाडी मतदार संघात येतो. तेथील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना आघाडीचा धर्म म्हणून आपणच निवडून आणले असे नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. परंतू नंतर कोकण रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडी रोड (मळगाव) की मडुरे असा नवाच वाद सुरु होऊन दोघांमध्ये चांगलेच वितुष्ट आले. त्याचाच राग मनात ठेवून राणे यांनी फलोद्यान महाविद्यालय आपल्या कुडाळ मतदार संघात नेले अशी भावना वेंगुर्लेवासीयांच्या मनात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ना.राणे अजूनही या निर्णयाचा फेरविचार करुन सर्व सोयींनी युक्त, प्रयोगशाळांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या वेंगुर्ले येथेच फलोद्यान महाविद्यालय आणल्यास वेंगुर्लेवासीय त्यांना धन्यवाद देतील.

विशेष *

थप्पड!

केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दिल्लीत एका संतप्त शीख तरुणाने मारलेली थप्पड त्रिखंडात गाजली. दूरदर्शनच्या शेकडो वाहिन्यांवरुन ती थप्पड दिवसभर वाजविण्यात आणि गाजविण्यात आली. त्यातून देशभर चर्चा आणि प्रतिक्रियांना उत आला. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि लोकसभेच्या अधिवेशनातही या प्रकाराचा एकमुखी निषेध करण्यात आला. पण राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत. महाराष्ट्रात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ते अडविले. वाहतुक बंद पाडली. वाहनांवर दगडफेक केली. कोणालाच माहित नसलेल्या त्या थप्पड मारणा-याचे पुतळे जाळले.

अशी इतरांना त्रास देणारी हिसक कृत्ये घाटावरील जिल्ह्याजिल्ह्यातून झाली. मात्र कोकणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इतरांना त्रास होईल असे काही न करता स्वतः भर उन्हात उभे राहून आत्मक्लेश करुन घेत आपला निषेध व्यक्त केला. तिकडे आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतक-यांनी, उस, कापूस, कांदा उत्पादक शेतक-यांनी कशी प्रतिक्रिया व्यक्त केली ते प्रसार माध्यमांतून समजू शकले नाही.

खुद्द शरद पवारांनी घडलेला हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. सुरक्षा व्यवस्थेलाही त्यांनी दोष दिला नाही आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे आवाहन केले. एक दोन दिवसातच प्रसारमाध्यमांतून हा विषय थांबला. तरीही वृत्तपत्रांमधून विविध प्रतिक्रिया उमटत राहिल्या. त्यातून अण्णा हजारे यांची थप्पड एकच का मारली?‘ ही प्रतिक्रिया बरीच गाजली. अण्णा हजारे कसलेले राजकारणी नसल्याने त्यांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली. परंतू पवारांवरील या हल्ल्याचा बाह्यतः तीव्र निषेध करणारे काँग्रेस, भाजप व पवारांचे अन्य हितशत्रू मात्र आतून सुखावले असणार यात शंका नाही!

वास्तविक पंतप्रधानपदावर ज्यांना रास्त हक्क सांगता येईल अशा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गोष्ट निदनीयच आहे. दिल्लीश्वरांनी म्हणजे सत्ताधारी काँग्रेस श्रेष्ठींनी पहिल्यापासूनच महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक दिली. तशीच महाराष्ट्रातून स्वकर्तृत्वाने संसदेत गेलेल्या आणि केंद्रीय मंत्रीमंडळात जबाबदारीची मंत्रीपदे सांभाळलेल्या मराठी नेत्यांच्या या बाबतीतही नेहमीच दुजाभाव दाखविला. दिल्लीश्वरांना शह देणारे शरद पवारच ठरले. परंतू दुर्देवाने महाराष्ट्रातील मराठी नेत्यांमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला पुरेसे संख्याबळ मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदापासून वंचित रहावे लागले. तरीही त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे काँग्रेस नेतृत्वाला आघाडी सरकारमध्ये महत्वाचे मंत्रीपद द्यावे लागलेले आहे. अर्थात पवारांवरील हा हल्ला केवळ व्यक्तिगत म्हणता येणार नाही. तो सर्वसामान्य जनतेप्रती अत्यंत असंवेदनशील बनलेल्या केंद्रीय नेतृत्वावरचा रोष प्रगट करण्याचा मार्ग होता. सुरक्षा दलाच्या गराड्यात न फिरणा-या शरद पवारांच्यामुळे त्या शीख तरुणाला ती संधी मिळाली एवढेच.

दूरदर्शन वाहिन्यांनी पवारांवरील या थप्पडेचे चित्रिकरण वारंवार दाखवितांना अन्य कोणाकोणा महनीय नेत्यांवर चप्पल, बूट फेकण्याचे प्रकार झाले तेही दाखविले. त्यापासून प्रेरणा घेऊन यापुढे बहुधा विविध पक्षांचे समारंभ किवा सभांमधून थप्पड, जोडे, बूट फेकण्याचे प्रकार प्रायोजित केले जाऊ लागतील. पवारांवर थप्पड मारणा-या त्या शीख तरुणाने भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी काँग्रेसी केंद्रीयमंत्री सुखराम यांच्यावरही असाच हल्ला केला होता. दूरदर्शवाहिन्यांवरील विकृत बातम्यांमुळेही लोकांना असे प्रकार करण्याचे एक प्रकारे उत्तेजनच मिळणार आहे.

आता या सर्वच प्रकरणावर लवकरात लवकर पडदा टाकला गेला आहे. कारण महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेसाठी आघाडी केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी या निवडणुकीमध्ये बहुतेक ठिकाणी शिवसेना - भाजप - भारिप या महायुती विरोधात आघाडी केली आहे. तरी काही ठिकाणी राष्ट्रवादीने महायुतीशी आघाडी करीत काँग्रेसला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीला आताच्या नगरपालिका व लगेचच होणा-या महानगरपालिका आणि जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जिकण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. त्यामुळे थप्पड प्रकरण राष्ट्रवादीलाही विसरावे लागणार आहे!

नगरपरिषद निवडणुक विशेष

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने चारही प्रभागातून १७ उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी - भाजपा - शिवसेना यांनी निवडणूकपूर्व आघाडी न करता एकमेकांना जागा सोडून १७ उमेदवार दिले आहेत. त्यातही राष्ट्रवादीतून काहींनी बंडखोरी केली आहे. तर काही शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच कालपर्यंत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार यादीत असलेल्या काहींनी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली आहे. तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत.

या निवडणुकीत वेंगुर्ल्यात भाजपने ३ जागी उमेदवार दिले आहेत तर शिवसेनेने १२ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीतून १४ उमेदवार आहेत. मनसेचे ६ तर अपक्ष ७ उमेदवार निवडणुक रिगणात आहेत.

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यावर बंडखोरी केलेल्या किवा असेच अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांवर त्यांनी अर्ज मागे घ्यावेत म्हणून दबाव आणणे, आमिषे दाखविणे, धमकावणे इत्यादी प्रकार सुरु झाले. प्रभाग ४ मधील अपक्ष उमेदवार अलिशा जाफर शेख यांचे पती जाफर याकुब शेख यांना कणकवलीतून २७ नोव्हेंबरला २३१४०६ क्रमांकावरुन पत्नीची उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्याची तक्रार त्यांनी मोबाईल रेकॉर्डसह वेंगुर्ले पोलिसांत नोंदविली आहे.

नारायण राणे यांचे द्वितीय पुत्र स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यासाठी वेंगुर्ल्यात खास उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार अरविद उर्फ शाम गावडे, निता कार्डोज, उर्मिला उमेश पेडणेकर, जॉयसी रॉजर फर्नांडीस, गणेश उर्फ सुशील परब, प्रकाश डिचोलकर आदींनी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेस प्रवेश केला.

प्रत्येक मतदाराला ४ मते असली तरी उमेदवार आपल्या पसंतीचा नसेल किवा पात्र वाटत नसेल तर मतदार मत न देता किवा एखादेच मत देऊ शकतो. प्रत्येकाने ४ किवा ५ मतेच दिली पाहिजेत असे काही बंधन नाही. यामुळे काही स-बल उमेदवार मतदारांना एकाद-दुसरेच मत द्या असे सांगू शकतील. प्रभाग रचनेमुळे उमेदवारांची राजकीयदृष्ट्या डोकेदुखी बरीच वाढलेली आहे. मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेण्याबरोबरच कोण कोणाबरोबर फिरतो आहे. यावरही लक्ष ठेवावे लागत आहे.

विशेष बातम्या *

वेंगुर्ले नगरपरिषदेत ४ प्रभागात ५९ उमेदवार

प्रभाग क्र. १ अ- सर्वसाधारण

१) कोयंडे चंद्रशेखर लक्ष्मण-शिवसेना

२) गावडे नागेश मोहन-रा. काँग्रेस

३) फर्नांडीस सिप्रीयान तमास-मनसे

४)वेंगुर्लेकर अवधुत शि.-राष्ट्रवादी

प्रभाग क्र. १ ब- सर्वसाधारण

१) कुबल प्रसन्न तुकाराम-राष्ट्रवादी

२)गावकर श्रीकृष्ण गं. - शिवसेना

३) तानावडे संजय महादेव -मनसे

४)फर्नांडीस गिरगोल सं.-रा.काँग्रेस

५) सारंग भुषण भगवान - अपक्ष

प्रभाग क्र. १ क-ना.मा.प्र.महिला

१) कर्पे पुजा राजन - राष्ट्रवादी

२) लोणे रोहीणी सदाशिव -रा. काँ.

३) हुले श्वेता सतिश - शिवसेना

प्रभाग क्र. १ ड- सर्वसाधारण महिला

१) आरोलकर मंजुषा महेंद्र-रा.काँग्रेस

२) केळुसकर चेतना विलास-राष्ट्रवादी

३) गिरप गुलाबी रविद्र - शिवसेना

प्रभाग क्र. २ अ- सर्वसाधारण महिला

१) आंगचेकर शितल ज्ञा.-रा. काँग्रेस

२) बाविसकर प्रतिभा प्रविण-शिवसेना

३) भागवत निला दिनकर - भाजपा

प्रभाग क्र. २ ब- सर्वसाधारण महिला

१) घोगळे रेश्मा रमेश - रा. काँग्रेस

२) चव्हाण सई सुरेंद्र - अपक्ष

३) सावंत पद्मिनी जगन्नाथ-राष्ट्रवादी

४) सावंत राधा सह्याद्री - शिवसेना

प्रभाग क्र.२क-ना. मागास प्रवर्ग

१) कौलगेकर शाम कृष्णा - मनसे

२) निकम संदेश प्रभाकर-रा.काँग्रेस

३) म्हापणकर चैतन्य अंकुश-भाजपा

४) वायंगणकर रमण शंकर-अपक्ष

प्रभाग क्र. २ ड- सर्वसाधारण

१) गावडे विक्रम विजय - रा. काँग्रेस

२) गावडे शैलेश गुंडू - राष्ट्रवादी

३) परब निलेश मोहन - अपक्ष

४) शेख अल्ताफ हमिद - शिवसेना

५) सापळे तुषार गजानन - अपक्ष

प्रभाग क्र. ३ अ- सर्वसाधारण महिला

१) कुबल नम्रता नितीन - राष्ट्रवादी

२) भोसले शितल सुरेश - शिवसेना

३) वेंगुर्लेकर लक्ष्मी बाबुराव - रा. काँग्रेस

प्रभाग क्र. ३ ब- सर्वसाधारण महिला

१) परब संचिता सुनिल - रा. काँग्रेस

२) परब सुस्मिता संजय - मनसे

३) प्रभूखानोलकर सुषमा सु. - भाजपा

४) मोर्डेकर वृंदा कमलाकांत - शिवसेना

प्रभाग क्र. ३ क- नागरिकांचा मागास प्रवर्ग

१)किनळेकर यशवंत प्रभाकर -रा. काँग्रेस

२)वेंगुर्लेकर अभिषेक राजीव - मनसे

३)साटेलकर सत्यवान विठ्ठल - राष्ट्रवादी

प्रभाग क्र. ३ ड- सर्वसाधारण

१) कुबल विवेक श्रीगुरुनाथ - शिवसेना

२) डुबळे सुनिल शशिकांत - रा. काँग्रेस

३) परब मनिष अनंत - राष्ट्रवादी

४) सातार्डेकर मनिष वामन - मनसे

प्रभाग क्र. ४ अ- अनुसूचित जाती

१) कांबळे वामन धोंडू - राष्ट्रवादी

२) जाधव रामचंद्र कृष्णा - रा. काँग्रेस

प्रभाग क्र. ४ ब-

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

१) नार्वेकर अन्नपूर्ण दत्ताराम - राष्ट्रवादी

२) रेडकर अनुसया मुकुंद - रा. काँग्रेस

प्रभाग क्र. ४ क-

नागरिकांचा मागास प्रवर्ग

१) तांडेल सुलोचना शशिकांत - राष्ट्रवादी

२) निकम सुमन संदेश - रा. काँग्रेस

प्रभाग क्र. ४ ड- सर्वसाधारण महिला

१)कार्डोज फिलोमीना मॅ.- राष्ट्रवादी

२)डिसोजा पेरपेतीन बावतीस -रा. काँग्रेस

३) नाईक निशा नरेंद्र - शिवसेना

४) शेख अलिशा जाफर - अपक्ष

प्रभाग क्र. ४ इ- सर्वसाधारण

१)आरोलकर विवेकानंद श. - शिवसेना

२) परब यशवंत लक्ष्मण - रा. काँग्रेस

३) येरम बुधाजी बाबुराव - राष्ट्रवादी

४) शेटये सचिन भगवान - अपक्ष

मतदान कसे करावे?

या निवडणुकीत प्रथमच प्रभाग निहाय वॉर्ड रचनेमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर १२ उमेदवारांसाठी १ मतदान यंत्र असेल. त्यापेक्षा उमेदवार जास्त असतील तर दुसरे मतदान यंत्र असेल.

एका मतदाराने ४ मते नोंदवायची असल्यामुळे त्यांचा संभ्रम होऊ नये म्हणून मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र नेऊन मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. हा कार्यक्रम निवडणुकीआधी काही दिवस प्रत्येक केंद्रासाठी ठराविक वेळ देऊन दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच्या तारखा मागाहून जाहीर होतील.

परबवाडा शाळेस लाखाची देणगी

परबवाडा येथील श्री.लक्ष्मीकांत परब यांचे जामात सुधीर रामचंद्र सावंत (सांगवे,कणकवली) यांच्या कुटुंबियांनी परबवाडा शाळा नं. १च्या हॉल बांधकामासाठी एक लाख रुपये देणगी दिली आहे. लोकवर्गणीतून हा हॉल बांधण्याचा पालक-ग्रामस्थांचा संकल्प असून श्री. लक्ष्मीकांत यांनीही यापूर्वी भरीव देणगी दिली आहे.

एम. पी. मेस्त्री यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

एत्राद्या पदाची किवा खुर्चीची किमत त्याठिकाणी असलेल्या व्यक्तीच्या कार्यावर ठरते. एम.पी.मेस्त्री यांनी सेवाभावी वृत्तीतून शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची शिक्षकांना व शिक्षण विभागाला नेहमीच आठवण राहील, असे मत प्राथ. जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.अटुगडे यांनी वेंगुर्ले पं.स.चे वरीष्ठ अधिकारी एम.पी.मेस्त्री यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभात बोलतांना केले. साई मंगल कार्यालयात २६ नोव्हेंबरला झालेल्या या सत्कार सोहळ्यात व्यासपिठावर गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना वळवी, अॅड. देवदत्त परुळेकर, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, शिक्षण विस्तार अधिकारी एस.जी. गोडे, एम. पी. मेस्त्री व सौ.मेस्त्री उपस्थित होत्या. वालावलकर यांनी प्रास्ताविक व कार्याची ओळख करुन दिली. अॅड. परुळेकर यांनी सांगितले की, मेस्त्री सर हे एक उत्तम विद्यार्थी आहेत. त्यामुळेच ते उत्तम शिक्षक व चांगले अधिकारी बनले. आपल्या कामात व कर्तव्यात त्यांनी समतोल राखला. गटशिक्षणाधिकारी सौ. वळवी यांनी सांगितले की, अचूक मार्गदर्शन हा मेस्त्री यांचा खास गुण असून त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याही फायदा झाला. यावेळी श्री. वायंगणकर, श्री. गोडे तसेच उपस्थित शिक्षकांपैकी अनेकांनी मेस्त्री यांच्या कामातील आठवणी सांगितल्या. सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करतांना मेस्त्री म्हणाले, हा सत्कार प्रत्येक शिक्षकाचा आहे. मी या क्षेत्रात ठरवून आलो. माझ्या यशात पत्नी व मुलांचाही वाटा आहे. सूत्रसंचालन राजू वजराटकर, भाऊ आजगांवकर यांनी केले. आभार दिलीप प्रभूखानोलकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment