Thursday 28 July, 2011

अंक २८वा, २८ जुलै २०११

अधोरेखित *
बाळशास्त्री आता तुम्हीच जन्म घ्यावा*
आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या नावाखाली जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाने आकड्यांचा खेळ केला आहे. बाळशास्त्रींच्या नावावर त्यांच्याच गावात (पोंभुर्ले, ता. देवगड) ५० लाख खर्ची पाडून ‘घेण्याचा‘ प्रशासनाचा घोटाळा माहिती अधिकार कायद्याने उघडकीला आणला. स्मारकासाठी राज्य मंत्रीमंडळाकडून मंजूर झालेला निधी वाटेल तसा खर्ची करुन सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक पैशाबाबत मनमानी करण्याच्या प्रवृत्तीविरोधात सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वास्तविक सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघानेच कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी पहिल्यापासून आग्रही भूमिका घेतली. बाळशास्त्रींच्या पोंभुर्ले या जन्मगावात जाण्यासाठी १९८७ पूर्वी धड रस्ताही नव्हता. सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्या नेतृत्वाखाली सतत तगादा लावून गावाला जोडणारा रस्ता करुन घेतला. सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष गजानन नाईक यांचा तो ऐन उमेदीचा काळ. त्यावेळी पहिल्यांदा ६ जानेवारी १९८७ चा पत्रकार दिन. दर्पणकारांच्या जन्मस्थळी साजरा झाला आणि पायाभूत विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या पोंभुर्लेला विकासाचा मार्ग मिळाला. आता बाळशास्त्रींच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून होऊ घातला आहे. बाळशास्त्रींच्या जन्मगावाचे आणि पर्यायाने बाळशास्त्रींचे स्मरण करण्याच्या आंतरीक प्रेरणेने सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने त्यावेळी विकासाची बीजे पेरली, हे विसरुन चालणार नाही.
त्यानंतर ओरोस जिल्हा मुख्यालयात कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे स्मारक (पत्रकार भवन) व्हावे म्हणून सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने दोन दशके सतत मागणी केली. त्याचा परिपाक म्हणून श्री. शशिकांत सावंत सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना ओरोस येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी ५० लाख जाहीर करण्यात आले. कोकण पॅकेजमधून जाहीर झालेल्या या निधीला तेव्हापासूनच पाय फुटले. जिल्हा मुख्यालयात मागणी असताना हा निधी पोंभुर्लेकडे वळता झाला तरीही जिल्ह्यातील पत्रकारांनी त्याला विरोध केला नाही. कारण जागेपेक्षाही बाळशास्त्रींचे यथोचित स्मारक होण्यालाच सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे प्राधान्य आहे. परंतु या स्मारकाच्या नावावर बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आकड्यांचेच खेळ चालविल्याची बाब चर्चेत आली आणि स्मारकाचा विषय प्रशासनाच्या अपारदर्शक भुकिकेमुळे वादग्रस्त बनला, मग तो स्थानिक पातळीवरचा असो की जिल्ह्यातील पत्रकारांना विश्वासात घेण्याच्या मुद्द्यावर असो, दोन्ही बाजूंनी वादाला तोंड फुटले, तेव्हा माहिती अधिकार कायद्याखाली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय झाला. निधीचे नियोजन करणा-या जिल्हा नियोजन कार्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज करण्यात आला. तो स्विकारण्या पासूनच टाळाटाळ सुरु झाली. चक्क शासकीय माहिती
अधिका-यानेच दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या सद्यस्थिती बाबतची माहिती देता येणार नाही असे कळवून शक्य तेवढी माहिती लपविण्याचाच प्रयत्न केला. मात्र आम्हा घरी ‘धन‘ शब्दाचीच रत्ने म्हणणा-या पत्रकारितेने जेव्हा ‘प्रहार‘ सुरु केले तेव्हा मात्र अधिका-यांचा नाईलाज झाला. शक्य ते सर्व प्रयत्न करुन माहिती दडविण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-या जिल्हा नियोजन कार्यालयाला सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या रेट्याने अपुरी का होईना, शक्य तेवढ्या विलंबाने स्मारका बाबतची माहिती उघड करावी लागली. तेव्हा समोर आलेले आकडे भंडावून सोडणारे होते.
पोंभुर्ले येथे कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धकृती पुतळा, त्यांच्या ‘दर्पण‘ वृत्तपत्राच्या नावाने सभागृह अगोदरच उभे राहिले आहे. बाळशास्त्रींचे वंशज असलेल्या जांभेकर कुटुंबाच्या खाजगी जागेत ही इमारत उभी असतांना त्याच इमारतीच्या पहिल्या माळ्यावर अतिथीगृहाचे बांधकाम करुन तब्बल १९ लाख ७७ हजार १८१ रुपये खर्ची घालून ‘घेण्याची‘ नामी शक्कल प्रशासनाने लढवली. यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याने दिलेल्या टिप्पणीत चक्क अधिका-यांनीच ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. खर्चाच्या विभागणीत ‘अस्तित्वातील इमारतीवरच अतिथी गृहाचे बांधकाम करणे‘ असा स्पष्ट उल्लेख करण्याचा ‘प्रामाणिकपणा‘ कुडाळ येथील सार्वजनिक बांधकामच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दाखवला आहे. जेमतेम सव्वा गुंठे जागेत अस्तित्वात असलेल्या इमारतीवरच खर्च करण्याची बादशाही (की नोकरशाही?) प्रवृत्ती चीनच्या जगप्रसिद्ध भितीशी स्पर्धा करणारी आहे. जेमतेम सव्वा गुंठे जागेत उभारण्यात
येणा-या संरक्षक भितीवर अंदाजपत्रकात तब्बल १४ लाख ११ हजार ३५२ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकामचे सगळे ‘आदर्श‘ नमुने वापरले तरी एवढी खर्चीक संरक्षक भित सिधुदुर्गशिवाय जगाच्या पाठीवर कदाचित कुठेही मिळणार नाही. त्यामुळे संरक्षक भितीवरील निधीच्या खर्चाच्या बाबतीत तरी चीनला मागे टाकल्याचे समाधान बांधकाम विभागातील अधिका-यांना मिळाले असेल. अधिका-यांच्या या विक्रमाची नोंद शासन घेईल तेव्हा घेईल, तूर्तास तरी माहिती अधिकार कायद्याने कागदावर याची नोंद घेतली आहे. त्यामुळे शासनाला विक्रम मान्य करण्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज लागू नये, एवढे चोख काम बांधकाममधील अधिका-यांनी बजावले आहे.
पाईप आणि मो-यांच्या बांधकामात तर सिधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा हात कोणीही धरु शकणार नाही. प्रस्ताविक स्मारकामध्येही मो-या आणि पाईपचे बांधकाम मोठ्या खुबीने करण्याचे बांधकाम विभागाने योजले आहे. त्यासाठी ९६ हजार ७९५ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. त्यामुळे अधिका-यांच्या या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
मुख्य रस्त्यापासून अस्तित्वात असलेल्या इमारतीपर्यंतचे अंतर जेमतेम ७५ ते १०० मीटर असेल. या इमारतीकडे जाणारा एकमेव रस्ता जांभेकर कुटुंबियांच्या जागेतून जातो. मात्र हा एकमेव रस्ता कदाचित पुरेसा ठरणारा नसेल. म्हणूनच अंतर्गत ‘रस्ते‘ काढण्यासाठी तब्बल ६ लाख १३ हजार ३६३ रुपयांची तरतूद अंदाजपत्रक अगोदरच अधिका-यांनी करुन ठेवली आहे. अन्यथा जेमतेम शंभर मीटरच्या रस्त्याचे ‘रस्ते‘ होऊन एवढा निधी खर्ची पडला नसता.
निधी खर्ची करण्याचे शंभरटक्के उद्दिष्ट गाठण्या साठी बांधकाम विभागाचे एवढे मोठे प्रताप बघून कोणाचेही डोळे दिपणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्युतीकरण, विहीर दुरुस्ती, मोटर पंप आणि इतर कामांसाठी तब्बल ८ लाख ७९ हजार ५२० रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद अधिका-यांनी करुन ठेवल्याने निधी खर्चाच्या बाबतीत ‘नियोजन‘ करुन विकास आणि शोध पत्रकारितेला अधिका-यांनी प्रचंड वाव दिल्याने ते देखील अधिका-यांचे योगदान मानून भविष्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘बांधकाम‘चे असे ‘आदर्श‘ उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको. परंतु पत्रकारितेतील आमचे दैवत म्हणून बाळशास्त्री आता आपणच जन्म घ्यावा; हे आमच्या सारख्या येरा गबाळ्याचे काम नव्हे.
ओंकार तुळसुलकर, सावंतवाडी * ९४२३३०१७६२


संपादकीय *
सारे काही विकासाच्या नावाने
सिधुदुर्ग जिल्ह्यात गेला पंधरवडाभर अतिवृष्टीमुळे हवामानात थंडावा असला तरी राजकीय वातावरण मात्र तापलेले होते. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांतच ही शाब्दीक लढाई जुंपली होती. तशी ती नेहमीच चालू असते. अर्थात हे वाद जिल्ह्याच्या विकासाकरिता नसून आपल्या किवा आपल्या पक्षाला श्रेय मिळावे यासाठी असतात. हे त्या संबंधीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत असतात त्यावरुन दिसून येते.
जिल्हा नियोजन विकास मंडळासाठी २०१०-११ या आर्थिक वर्षात आपण ९० कोटी रुपये आणले असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. त्या निधीतील ९९ टक्के रक्कम विविध विकास कामांवर खर्च पडल्याचे नियोजन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत सांगण्यात आले. याच सभेत त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत असे सांगून निकृष्ट काम करणा-यांवर कारवाई होईल असेही सांगितले. यावर्षीच नवीन तयार केलेल्या किवा दुरुस्त केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसामुळे कशी दुर्दशा झाली ते पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षच पाहिले असणार. दुर्गम ग्रामीण भागात ब-याच ठिकाणी ओढ्या, नाल्यांवर साकव नाहीत. शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारे तलाव, पाटबंधारे गाळमातीने भरले आहेत. त्यामुळे पाणी साठा कमी होऊन उन्हाळ्यात पाणी टंचाई होते. त्याबाबत कसलीही उपाययोजना झालेली नाही. जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजनांसाठी साहित्य खरेदी केली जाते. त्यामध्ये शालेय मुलींसाठी सायकली, महिलांसाठी शिलाई मशिन्स, गावात स्ट्रीट लाईट, ग्रामीण रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी, शेती, अवजारे, कीटकनाशके अशा अनेक साहित्यांच्या खरेदीत निकृष्ट दर्जाचे साहित्य घेऊन बाजारभावापेक्षा जास्त दराने पुरवठा ठेकेदारांना पैसे अदा केले जातात. ग्रामीण भागातील लोकांना ते साहित्य अल्प दराने दिले जाते. लवकरच ते भंगारात काढावे लागते इतके ते हलक्यादर्जाचे असते. पण इकडे या योजनांसाठी मंजूर झालेले पैसे मात्र शंभर टक्के खर्च झालेले असतात. अर्थात टेंडर प्रक्रिया करुन कागदोपत्री सर्व काही ‘नीट‘ असते. या योजनांमध्ये ‘लाभार्थींना‘ मिळणारी वस्तू ही पन्नास टक्केहून कमी दरात मिळते. त्यामुळे ते खूष असतात. तर या सर्व योजनांना मंजूरी देणा-यांना निम्मेहून अधिक टक्क्यांचा फायदा होत असतो. त्यामुळे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणा-या विरोधी पक्षाच्या लोकांच्या तक्रारी पलिकडे कोणाचीच कसली तक्रार नसते. आता बातमी हा काही पुरावा होऊ शकत नाही आणि विरोधकांकडे काही कागदोपत्री पुरावे नसतात.
असे सगळे या सिधुदुर्ग जिल्ह्यातच चाललेले आहे असे नाही, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. केवळ जिल्हा परिषदेतच हे घडते असे नव्हे. बहुतेक सर्व खात्यांमध्ये हे प्रकार वर्षानुवर्षे चाललेले आहेत.
पालकमंत्री नारायण राणे दीर्घकाळ मंत्री पदावर आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्हा विकासाच्या मुद्यावर प्रत्येक सभेत ते तळमळीने बोलतात. जिल्हा लहान असूनही आपण एवढा मोठा निधी मंजूर करुन आणला, पण अपेक्षित गतीने आणि अपेक्षित दर्जाने कामे होत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करीत असतात. त्याबद्दल ते संबंधीत सरकारी अधिका-यांना आणि आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनाही खडे बोल सुनावतात. पक्ष कार्यकर्ते व पदाधिका-यांनी त्यांनी या विकास कामांमध्ये लक्ष घालून कामे दर्जेदार होतील. याबाबतीत दक्ष असले पाहिजे. त्यांना मिळालेल्या सत्तेतील पदांचा उपयोग त्यांनी जनहितार्थ केला पाहिजे असे ते नेहमी सांगत असतात.
प्रत्यक्षात पालकमंत्री आपल्या मंत्रिपदाचा कारभार पाहण्यासाठी मुंबईला गेले की, इकडे सगळे सामसूम होते. राणे साहेब जिल्ह्यात असतांना त्यांच्या अवतीभोवती वावरणारे कार्यकर्ते, पदाधिकारी मागाहून निरनिराळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरुन श्रेयाच्या आणि विकासाच्या गोष्टी सांगायला मोकळे होतात.
जिल्हा परिषद राणे यांच्या वर्चस्वाखालील काँग्रेस पक्षाकडे आहे. जिल्ह्याचे तीन आमदार तीन तीन वेगवेगळ्या पक्षांचे त्यातील सत्ताधारी आघाडीतील. पण दोघांतही मतैक्य नाही. त्यामुळे विकासाच्या राजकारणापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणात सगळे मग्न आहेत. त्या संबंधीच्या वृत्तपत्रातील उलटसुलट रसभरीत बातम्या वाचून लोक आपले मनोरंजन करुन घेत आहेत. विकासाचे कोणाला काय पडले आहे?

विशेष *
मध्वानुभव
पशुसंवर्धन खात्यात (सरकारी) नोकरी करीत असतानाचे २-३ किस्से आजही आठवतात. ऑडिट, ऑडिटर, सरकारी पद्धतीने जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, औषधेसाठा वापर या नोंदी ठेवणे, सरकारी पत्रव्यवहार या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जात नसल्यामुळे सुरुवातीला खूप पंचाईत झाली होती. पण हळुहळू ‘जुने रेकॉर्ड‘ पाहुन पाहुन ‘मार्गस्थ‘ होणे जमू लागले. एकदा एका ‘ऑडिट पॉईंट‘ मध्ये पूर्वीच्या अधिका-याच्या नांवे रु. ११/- (अक्षरी रु. अकरा फक्त) ची रिकव्हरी दाखवली होती. सदर अधिका-याचे दुर्देवाने निधन झाले होते. त्यामुळे नियमानुसार त्याच्या वारसांकडूनही ‘अमाऊंट रिकव्हर‘ करावी लागेल असे मार्गदर्शन मला करण्यात आले. केवळ अकरा रुपयांसाठी वारस तपास वगैरे गोष्टी माझ्या आकलनाबाहेरच्या असल्यामुळे मी व माझे सहका-यांनी मिळून स्वतःच्या खिशातले पैसे जमा करुन विषय संपुष्टात आणला. (सदर रक्कम मिळविण्यासाठी ‘खोटी फिरती दाखवा‘ असा मौलिक व अनुभवी सल्लाही दिला गेला होता.)
एकदा एका योजनेमध्ये ‘शेतक-यांना नर-कोंबडे‘ वाटप केले गेले होते. सदर योजनेची ‘फाईल‘ घेऊन या असा ऑडिटरसाहेबांचा निरोप होता. मी (नवीन असल्याने) निरोप येताच फाईल घेऊन गेलो. कोंबडे वाटपाची फाईल (सकाळी) बघण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. ही फाईल संध्याकाळनंतर पहावी लागते असे सूचक - सांकेतिक भाषेत सांगण्यात आले. पण मी ‘नव-खा‘ असल्याने मला अर्थबोध की खाद्यबोध झाला नाही. शेवटी येथेही एक कार्यालयीन शिपाई (कृष्णा असे त्याचे नाव होते व तो ‘कार्यालयाचा पोटपूजा‘ हा विषय समर्थपणे संभाळत असे) मार्गदर्शक ठरला. तो उत्कृष्ट खानसामा होता. त्याने एकूणच ऑडीट पार्टी, वरिष्ठांच्या भेटीची व्यवस्था इ. बंदोबस्ताचे संदार्भात मला ‘सार्थ सज्ञानी‘ केले. काय करणार? ध्र्ण्ड्ढद न्र्दृद्व द्धदृथ्र्ड्ढ डड्ढ ण्ठ्ठध्ड्ढ ठ्ठद्म द्धड्ढठ्ठथ्र्त्ड्ढदड्डद्म किवा पाण्यात राहून माशांशी वैर धरु नये अशा काही ‘टीप्स‘ याच प्रकारचे महागुरुंकडून दिल्या गेल्यामुळे एकूणच नोकरीतील दिवस संस्मरणीय ठरले.
जवळ जवळ एक तप मी राजापूर तालुक्यात नोकरी केली. ४० वर्षापूर्वी अनेक ठिकाणी पायीच फिरती करावी लागे. माझ्या स्मरणाप्रमाणे मी सर्व (म्हणजे सुमारे १३५) गावी चालतच गेलो आहे. एकदा तर संपूर्ण दिवसात २० कि.मी.चाललो होतो. तो किस्सा खूप काही अनुभव देऊन गेला. एका गावी पूर्वसूचनेनुसार दुपारी गुरांना लस टोचणीसाठी जायचे होते. सकाळी ९ च्या दरम्यान एस.टी तून उतरलो. शिपाई आदल्या दिवशीच पोचल्याने मी एकटा होतो. या स्टॉप पासून ५-६ कि.मी. (सुमारे २ तास) वर नियोजित गाव होते. स्टॉपपाशीच एक ओळखीचे घर होते. त्यांनी मला पाहताच ‘कपभर दूध घेऊन जा‘ असा आग्रह केला. तो दिवस श्रावण सोमवार होता. मी नॉर्मली उपास वगैरे करत नाही. पण त्या दिवशी ‘श्रावण सोमवार‘ करावा असे वाटले. मी दूध आवडत नसल्याने दुधाला नकार दिला. घरातील एक वृद्ध बाई ‘अहो, दूधाला नाही म्हणू नये‘ असेही म्हणाल्या. पण मी न ऐकताच मार्गस्थ झालो. गावात पोचून गुरं टोचून होईपर्यंत देान वाजून गेले. एकदा बीन दुधाचा चहा घेतला. उपास सोडण्याच्या हेतूने तासभर चालत चालत एका ‘बांधवाच्या‘ घरी गेलो. पहातो तर त्यांच्या घराला कुलूप!!! कोकणातील खेडेगावातील एकांडे घर. जवळपास माणसांच्या ‘पायरव‘ नाही. तेथून फक्त अर्धा तास चालल्यावर दुस-या परिचिताचे घर होते. त्यांच्याकडे पोचलो. सुदैवाने ‘ते‘ होते. गंमत म्हणजे त्यांच्या घरी नुकतीच गाय व्यायली होती. त्यामुळे ‘ग्लासभर दूध‘ घेऊन ‘पाहुणचार‘ केला. मी सकाळचा दूधाचा नकार, श्रावण - सोमवारचा उपास ही सर्व कथा सांगून सकाळपासून बिनदूधाचा एक कप चहा, व आत्ताचे दूध एवढ्यावरच असल्याचे सांगितले. माझ्या तोंडून उपास हा शब्द ऐकून त्यांनी ‘त्यांच्या‘ घरी ‘उपास‘ सोडण्याबाबतची ‘अडचण‘ सांगितली. मी भूकेने कासाविस झालो होतो. तेथून त्या गावच्या सीमेवर सुमारे तासभर चालत त्यांनी मला माझ्या एका ‘बांधवाकडे‘ पोच केले. सूर्यास्ताच्या दरम्यान स्नानादिकृत्ये आटपून मी श्रावण सोमवारचा उपास सोडला. विशेष म्हणजे यममानांनी ‘भोजनदक्षिणाही‘ दिली. रात्रौ दिवसभरच्या पायपिटीमुळे झोप कधी लागली ते कळलचं नाही. सकाळी उठल्यावर समोर (चहा ऐवजी) कपभर दूध आले. मी कालचा सर्व प्रसंग आठवून मुकाटपणे दूध पिऊन वडिलधा-या यजमानांना नमस्कार करुन त्यांचा निरोप घेतला. या प्रसंगानंतर आजपर्यंत मी केव्हाही दूध घेणार का? या प्रश्नाला ‘होकरच‘ देतो.
मधुकर घारपूरे, सावंतवाडी

आकेरीतील दगडांचे गूढ*
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा
असे कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या कवीतेत म्हटले आहे. आकेरी व झाराप परिसरात याचा प्रत्यय येतो. विविध आकाराचे शेकडो दगड येथे पहावयास मिळतात. हजारो वर्षे झाली तरी जागच्या जागी घट्ट पकडून हे दगड उभे आहेत. झारापचा चेंडुगुंडा, माणगावचा सुळा गुंडा, तर साळगावचा हत्तीगुंडा असे नामकरण करण्यात आले आहे. वर्षानुवर्ष याच नावाने ते गुंडे म्हणजे दगड ओळखले जातात.
झारापचा ‘चेंडुगुंडा‘ याबाबत असे सांगितले जाते की पांडवांनी गोफणीतून पक्षांना हाकलण्यासाठी दगड टाकला व तो येथील उंच असणा-या उभा दगडावर येऊन पडला. तर पांडव चेंडूफळी खेळत असताना त्यांच्यापैकी भीमाचा चेंडू येथे येऊन थांबला म्हणून त्याचे नाव ‘चेंडुगुंडा‘ असे देण्यात आले अशीही कथा आहे. काही ग्रामस्थ याला भिमाचा चेंडू असे संबोधतात. येथे १५ फूटापेक्षाही उंच असा एक दगड आहे व त्यावर दहा मीटरपेक्षा अधिक व्यास असणारा दुसरा गोल दगड आहे. वर्षानुवर्षे उन्ह, पाऊस झेलत हे दगड उभे आहेत.
साळगाव येथे माऊली मंदिराच्या परिसरात ‘हत्तीगुंडा‘ आहे. हत्तीच्या आकाराचा भला मोठा दगड येथे कसा आला याचे गुढ अद्याप उलगडलेले नाही. या दगडाला निसर्गतःच हत्तीचा आकार आहे. रानटी हत्तीची प्रचंड दहशत माणगाव खो-यात असताना साळगावातील या हत्तीगुंड्याला पाहन रात्रीच्या वेळी एखादा घाबरला तर नवल वाटायला नको.
आकेरी येथील रामेश्वर मंदिराच्या समोर पूर्वेच्या बाजूला दोन काळे दगड दिसतात. हे दोन उंच दगड असून त्यापैकी एक थोडेसे कलंडलेले दिसते. या दगडांनाच ‘सवत पाथर‘ असे म्हटले जाते.
याबाबत ग्रामस्थ एक कथा सांगतात. संपूर्ण गावाचा मानकरी असणा-या आकेरी गावाचा प्रमुख याच्या दोन सवती होत्या. एक आवडती व दुसरी नावडती. दोन्ही सवती एक दिवस कपडे धुण्यासाठी येथील ओहोळावर गेल्या. त्यावेळी राग आल्याने एकीने दुसरीला ढकलले. की त्यामुळे दुसरा दगड थोडासा कलंडलेला दिसतो.
हे स्थळ गावाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. या परिसरातील मंडळी ओटी व काजळ कुंकू असा मान अमावस्या-पौर्णिमेस या स्थळासाठी देतात.
या परिसरामध्ये गुहा असून त्यामध्ये ब-याच वेळा वाघाची वस्ती असल्याचे दिसून येते. या स्थळाकडे जाण्यासाठी आकेरी इथल्या रामेश्वर मंदिराकडून अगर कोळसुंदा या ठिकाणातून डोंगर चढून वर जाता येते.
- वैशाली खानोलकर, झाराप * ९४२११८७७९५

विशेष बातम्या *
गणेशमूर्ती महागल्या!
गणपतीची माती आणि रंगाच्या किमतीमध्ये यंदा ४० ते ४५ टक्के वाढ झाली आहे. १८० रुपयांना मिळणारे शाडू मातीचे पोते २६० रुपयांपर्यंत गेले आहे. दुसरीकडे रंगांच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने मूर्तींचे दरही वाढवावे लागले आहेत. साधारण एक फुटाची गणेश मूर्ती ५०० रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बाप्पांनाही महागाईच्या झळा बसणार आहेत.

रिक्षाभाडे वाढ - सहा कि. मी. ला १५ रु.
सिधुदुर्ग जिल्ह्यात रिक्षा व्यवसाय गणपती व मे महिना अशा हंगामामध्ये चालतो. बाकीच्या हंगामात रिक्षा व्यवसायात मंदीच असते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शहरांचा विस्तार लहान असल्यामुळे तेवढ्यापुरताच रिक्षा व्यवसाय मर्यादित असतो. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी भाडे केल्यास परतीच्या प्रवासात परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडत नाही. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, दर महिन्याला वाढणारे पेट्रोलचे दर, स्पेअरपार्टचे दर, परिवहन कार्यालयातील वाढलेले शुल्क, अन्य कर तसेच विमा कंपन्यांचे वाढलेले शुल्क यामुळे जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेकडून वेळवेळी रिक्षा भाडे दरवाढीबाबत मागणी करण्यात येत होती. याबाबत जिल्हाधिका-यांसह झालेल्या बैठकीत चर्चा होऊन प्रवासी ऑटो रिक्षाची सुधारित भाडे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरवाढीत पहिल्या १ ते ६ किलोमीटरला १५ रु. पुढील प्रत्येक किलोमीटरला ९ रु. असा दर ठरला आहे. ही सुधारीत दरवाढ २३ जुलैपासून अंमलात आली आहे. पालिका हद्दीबाहेर प्रवासाच्या झालेल्या भाड्याच्या ५० टक्के अधिक द्यावे. लगेज दर ६० सेमी ते ४० सेंटिमीटर मापापेक्षा लहान ब्रिफकेस, हँडबॅग आणि सुटकेसशिवाय असणा-या प्रत्येक नगास २ रुपये आकार घ्यावा. जास्त भाडे घेणे, भाडे नाकारणे याबाबत प्रवाशांची तक्रार असल्यास त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाशी संफ साधावा असे परिवहन अधिकारी अभिजित हावरे यांनी सांगितले.

बी.कॉम.पदवी परीक्षा निकालः खर्डेकर महाविद्यालय ८४ टक्के
मुंबई विद्यापीठाचया बी. कॉम. पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून खर्डेकर महाविद्यालयातून १२१ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे -
रुपाली राजन वेंगुर्लेकर, २) निखिता संतोष वारंग, ३) वंदना उत्तम साळगांवकर. उत्तीर्ण १०१ पैकी ३२ प्रथम श्रेणीत तर ५२ द्वितीय श्रेणीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाइ्र, प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नांवे पुढीलप्रमाणे *
केळूसकर अजिक्य रा.- ३१५, मठकर उमेश अनिल- ३८२, बागायतकर काशिनाथ चं.- ३९३
घाडी जतीन अनंत- ३१८, होडावडेकर प्रथमेश रा.- ३२४, म्हापणकर समीर श.- ३२८
दळवी कुंदा विलास- ४४४, दळवी सुप्रिया चंद्रकांत- ४७५, घोगळे दयानंद दशरथ- ४१९
कांबळी ज्योत्स्ना रो.- ५०१, कोरगावकर स्वर्णिमा स.- ४६६, नाईक दिपाली महादेव- ४८२
नरसुले जान्हवी सुशील- ५४५, नरसुले कोमल किशोर- ५०९, पंडित कमल विनायक - ३७१
परब गिरिश विठ्ठल- ४०४, राळकर शिवराम स.- ४३५, राऊळ वैशाली सुहास- ४६४
साळगावकर रुपाली शं.- ५२३, साळगावकर वंदना उत्तम- ५५३, वळंजु योगिता रामदास- ४३५
बागकर जया सदानंद- ३०३, बागकर सुगंधा अर्जुन- ३६५, चेंदवणकर स्वप्निल स.- ३५५
दुतोंडकर समाधान चं.- ३६५, फर्नांडीस बोरीस पेद्रू * ३३२, गवंडे अक्षया अशोक- ४७४
गावडे कृष्णा आत्माराम- ४४८, गावडे क्षितिज विलास- ४२०, गावडे रामचंद्र हरिश्चंद्र- ३२५
कामत श्वेता लक्ष्मण- ३४९, खवणेकर पांडुरंग पुं.- ३८७, किनळेकर वैशाली स.- ३८६
कुबल राजेश हरिश्चंद्र- ३७६, मातोंडकर भावेश रविद्र- ३४६, म्हारव पुष्पलता भास्कर- ३६७
मुंडये गोविद बाळकृष्ण- ३४६, नाईक सुविधा अच्युत- ३९९, नार्वेकर राजेश गणपत- ४७१
पांढरे निकिता रमेश- ३४८, परब दिपिका आत्माराम- ३७५, परब कुलदीप बाळकृष्ण- ४१०
परब महेश एकनाथ- ३४९, परब मयुरी अशोक * ४२१, परब प्रविण एकनाथ- २७६
पेडणेकर वाटू रमेश- ४२३, फटजी चित्रा देविदास- ३४०, राणे दक्षता दशरथ- ३८१
राऊळ सुधाकर सुहास- ३४४, राऊळ सुषमा सुदर्शन- ४०५, रेडकर प्रियांका महादेव- ४०५
सागवेकर प्रशांत प्रदिप- ३७५, साळगावकर कमल स.- ३२५, सावंत अंकिता शामसुंदर- ३१०
शिरगावकर तृप्ती वि.- २८२, सुर्याजी सोनाली दशरथ- ३८३, तांडेल नविता भिवा- ४५०
टेमकर दिनेश सुरेश- ३०३, तेंडुलकर शिल्पा भगिरथ- ३४७, तोरसकर स्नेहांकिता ह.- ३७३
तुळसकर शंकर नामदेव- ४१६, वेळकर नितिन बाबुराव- ४७०, वेंगुर्लेकर रुपाली राजन- ५७३
वारंगे निकिता संतोष- ५४६, चिपकर अनादी यदुनाथ-३१६, शेगडे तुकाराम मोहन- ३८८
गावडे प्रियांका राजेंद्र- ५२८, कांबळी श्रद्धा प्रकाश- ५१५, मातोंडकर पल्लवी मोहन- ४७६
धुरी गणेश महादेव- २९१, फर्नांडीस लविना व्हि.- ४५५, गावडे दिप्ती दिलीप- ३८३
केरकर गजानन सद्गुरु- ३८७, लोणे रुपाली बाळकृष्ण- ४०४, मसुरकर ज्योती कृष्णा- ३४३
परब महेंद्र बाबाजी- २७८, राऊत कविता पुंडलिक- ४१९, सावंत बापू दाजी- ३५३
सावंत चित्रकला दाजी- ३७३, शेटये मयुरी मदन- ४२६, तोरसकर पूनम नरहरी- ४१२
भोने दिप्ती वसंत- ३२४, डिचोलकर प्रणिता उत्तम- ३९१, गवंडी प्राजक्ता शंकर- ३३६
कवठणकर श्रीकृष्ण ग.-३११, पालकर निखिल श्रीधर- ३४२, पाटील पराग प्रकाश- ३५३
पेडणेकर दमयंती वि.-३९८, रेवणकर नेत्रांजली श्री.- ३६३, तेंडोलकर हरिश्चंद्र पुं.-३५२
तेंडोलकर प्रणव मंगेश- ३७६, वायंगणकर महेश मारुती- ३३८, गावडे नारायण अरविद- ३१७
ठाकूर वैभव अच्युत- ३०६, नवार जयेश गंगाराम- ३२९, गिरकर ऋग्वेद विठोबा- ४३१
पंडित मिलिद पुरुषोत्तम- ४४३, तांडेल महादेव नागेश- २९९, पंडित श्रीधर दीपक- २९२
रेडकर अपर्णा अशोक- ३१२, साळगावकर पूनम ना.- २९६

No comments:

Post a Comment