Friday 1 July, 2011

अंक २५वा, ७ जुलै २०११

अधोरेखीत *
माहिती अधिकाराची लढाई सुरुच!
रोजगार हमीचा कायदा प्रथम महाराष्ट्रात झाला. २००५ साली केंद्र सरकारने त्याचे अनुकरण करत सर्व राज्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला. त्याचा फायदा आज अनेक राज्यात मजुरांना होत आहे. पण याच रोजगार हमीचे महाराष्ट्रात तीन-तेरा वाजले. हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या माहिती अधिकार कायद्याची झाली आहे.
अण्णा हजारेंच्या चळवळीचा परिणाम म्हणून २००२ मध्ये महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा झाला. या कायद्यामुळे सार्वजनिक कामासाठी मंजूर केलेली रक्कम त्याच कामासाठी योग्य पद्धतीने वापरली आहे का? झालेल्या कामाचा दर्जा प्रमाणित निकषांवर आहे का? अशा अनेक प्रश्नांची उकल या कायद्याने करता येते. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या कायद्याचा व्यापक परिणाम म्हणून यु.पी.ए. सरकारने २००५ मध्ये देशपातळीवर माहिती अधिकाराचा कायदा संसदेत मंजूर केला.
महाराष्ट्रातले प्रशासन एवढे हुशार आणि कार्यक्षम आहे की, एका हाताने दिलेला माहितीचा अधिकार दुस-या हाताने काढून घेण्याची किमया प्रशासनाने साधली आहे. त्याला सिधुदुर्ग तरी अपवाद कसा असेल.
कायद्या अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घालणा-या कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे जिल्हा मुख्यालयात सिधुदुर्गनगरी येथे उचित स्मारक व्हावे हे सिधुदुर्गातील पत्रकारांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न आहे. यासाठी सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने आवश्यक तो निधी उभा करुन जिल्हा प्रशासनाकडून स्मारकासाठीची जागा ताब्यात घेतली. महाराष्ट्र शासनाने या खर्चाचा काही भाग उचलावा यासाठी शासनाकडे सातत्याने मागणी करुन त्याचा पाठपुरावा केला. शेवटी २००९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या सिधुदुर्गनगरी येथे झालेल्या बैठकीत ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले. या पॅकेजमधील ५० लाख रुपयांची रक्कम जांभेकर स्मारकासाठी देण्याची घोषणाही झाली.
निवडणूका पार पडल्या. मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थित असलेले मंत्रीच पुन्हा सत्तेत आले. पण कोकण पॅकेजमधील बरीच रक्कम खर्ची पडलीच नाही. जांभेकर स्मारकासाठी मंजूर झालेल्या निधीची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करुन ३ जूनला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने एका पत्रकाराने जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयात अर्ज केला.
विचारलेल्या माहितीवर २१-६-२०११ ला शासकीय माहिती अधिकारी सोमण यांनी पोस्टाने उत्तर दिले. ‘‘माहितीपैकी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची पृष्ठ संख्या तेरा आहे. तरी प्रती पान २ रुपये प्रमाणे २६ रु. व रजिस्टर्ड पोस्टेज खर्च २५ रु. मिळून एकूण ५१ रु. रक्कम शासकीय कोषागारात चलनाद्वारे भरुन आपण भरलेल्या चलनांची छायांकित प्रत या कार्यालयाकडे पाठविण्यात यावी. तद्नंतर माहिती पाठविण्यात येईल.‘‘ असा उल्लेख आहे.
या पत्रानुसार संबंधित अर्जदार आरोसला गेला. तेथे जिल्हा नियोजन कार्यालयात शासकीय माहिती अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यामुळे अपिलीय अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी विजय अहिरे यांच्याशी संफ साधला. मात्र त्यांनी हात झटकले. कायद्यानुसार माहितीचे शुल्क भरून घेण्याची कार्यालयात व्यवस्थाच नाही असे बिनदिक्कतपणे सांगितले. अर्जदार सावंतवाडीला येऊन सावंतवाडीच्या कोषागारात गेला. तेथील अधिका-याने मात्र वरील पत्रानुसार चलन भरण्याची कायदेशीर तरतूदच नाही असे स्पष्ट करणारा शासन आदेश हातात ठेवला, त्यात तीनशे रुपयांपेक्षा कमी रक्कम त्याच कार्यालयात (जिल्हा) रोखीने स्विकारणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे.
एवढा सगळा त्रास झाल्यानंतर आणि अपिलीय अधिकारी अहिरे यांनी केलेली दिशाभूल लक्षात आल्यावर कोणीही माहिती मिळविण्याचा नाद तिथेच सोडून दिला असता. मात्र या अर्जदाराने आपली नैतिक जबाबदारी ओळखून माहितीच्या अधिकाराचे सर्व संबंधित कागदपत्र मिळविले आणि पुन्हा मुख्यालय गाठले.
शासकीय माहिती अधिकारी यांच्यासमोर संबंधित कागदपत्रे ठेवली आणि पैसे भरुन घेण्यास सांगितले. पण सोमण यांनी आपला हेका सोडला नाही. तिनशे रुपयांच्या खालची रक्कम संबंधित कार्यालयात रोखीने स्विकारली पाहिजे हे शासनाने स्पष्ट करुनही शासनाच्याच खजिन्यातून वेतन घेणारे सोमण पैसे भरुन घ्यायला तयार झाले नाहीत. तेवढ्यात तेथे अपिलीय अधिकारी विजय अहिरे आले. त्यांच्याही नजरेस कागदपत्रे आणली. पण अहिरे यांनी या सर्वावर कळसच केला. माहितीच्या अर्जाची गरज काय? मी तुला अर्जाशिवायही माहिती द्यायला तयार आहे अशी मखलाशी करुन रोखीने माहितीचे शुल्क घेण्यास टाळाटाळच केली. त्यांची ही कृती माहिती अधिकार कायदा आणि शासन आदेश यांचा भंग करणारी आहे हे अर्जदाराने निदर्शनाला आणून दिले. मात्र अहिरे यांनी तुम्ही काही वाटेल ते करा अशी भूमिका घेतली.
अपिलीय अधिकारी अहिरे यांचा पूर्वानुभव लक्षात घेता दिशाभूल होणार हे गृहीत धरुन अर्जदाराने माहितीच्या अधिकाराचा कायदेभंग माहिती अधिकारीच करीत आहेत, याची नोंद करणारा अर्ज देवून त्या अर्जावर पोच घेतली आणि जिल्हा कार्यालयात उपस्थित असलेल्या सहका-यांच्या नजरेस या सर्व गोष्टी आणल्या आणि त्यांच्यासह पुन्हा नियोजन अधिकारी अहिरे यांच्या कार्यालयात धडक दिली.
तेव्हा रोखपालाला केबीनमध्ये बोलवत अहिरे यांनी माहितीचे शुल्क स्विकारण्याची तरतूद कार्यालयात आहे का? असा उलटाच प्रश्न विचारला. रोखपालाने तशी व्यवस्था असल्याचे सांगितल्याने त्यांची वाचा बंद झाली. काल-परवापर्यंत अशी व्यवस्थाच नसल्याचे सागून बेकायदेशीर वर्तन करीत सर्वसामान्यांची छळवणूक करणा-या अहिरेंचे पितळ त्यांच्याच केबिनमध्ये उघडे पडले. रोखपालाने रितसर पैसे भरुन घेतले. पावती दिली. संबंधित पावती घेऊन तयार असलेल्या माहितीची सोमण यांच्याकडे मागणी केली. पण सोमण यांनी नेहमीचा शासकीय दिरंगाईचा सूर आळवत नकार घंटाच वाजवली. अपिलीय अधिकारी विजय अहिरे यांनी तीच री ओढली.
असा हा नन्नाचा पाढा माहिती देण्यासाठी नेमलेले अधिकारी मोठ्या खुबीने माहितीपासून अर्जदारांना वंचित ठेवतात. २१ जूनच्याच पत्रात सोमण यांनी दिलेली माहिती अशी, ‘मंत्रिमंडळाने दोन वर्षापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या कोकण पॅकेजपैकी कै. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारकासाठी शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे स्मारकाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती देता येत नाही.‘ त्यामुळे जनतेपुढे स्पष्ट झाले की, मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या रक्कमेपैकी एकही रुपया आलेला नाही.
एका छोट्याशा माहितीसाठी पत्रकाराला कोणत्या दिव्यातून जावे लागते, याचा अनुभव घेत असतांना सतत डोळ्यासमोर एखादा शेतकरी किवा कुठेतरी श्रम करणारा मजूर या माहितीच्या अधिकाराचा कधीतरी वापर करु शकतील काय? असा प्रश्न अर्जदाराच्या मनात येऊन गेला.
माहिती देणारे अधिकारीच माहिती देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असले तरी थोडे संयमाने आणि धीराने अर्जदाराने पाठपुरावा केल्यास अधिका-यांनाही आपण वठणीवर आणू शकतो हा विश्वास कायद्याने दिला आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याची ही लढाई सुरुच राहणार आहे!
ओंकार तुळसुलकर, सावंतवाडी
९४२३३०१७६२



संपादकिय *
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांचे इथे काम नाही!
प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या संदर्भात ‘कडक‘ धोरण स्विकारणा-या आणि प्रशासनाला शिस्त लावू पाहणा-या सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. अश्विनी जोशी यांची वर्षभरातच बदली करुन राज्य सरकारने जि.प.मध्ये मनमानी करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची पाठराखण केली आहे.
अर्थात भारतीय प्रशासन सेवेतून राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिका-यांना हा अनुभव नवा नाही. यापूर्वीही मंत्र्यांची, लोकप्रतिनिधींची नाराजी ओढवून घेतलेल्या अधिका-यांना तडकाफडकी बदल्यांना सामोरे जावे लागलेले आहे, परंतु सध्या देशभर भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण झालेले असतांना उच्चपदस्थ अधिका-यांच्या धोरणामुळे भ्रष्टाचार करता येत नाही किवा ते कठीण झाले असे वाटणारे लोक शिरजोर होतील अशीच राज्य सरकारची पावले पडत आहे.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जोशी यांची बदली मुंबई येथे झाली आहे. त्यामुळे त्यांची बदली सोयीची असल्याची त्यांची भावना असेल. परंतु जि.प.मधील थोडेफार कर्तव्यदक्ष व भ्रष्टाचारमुक्त असे अधिकारी, कर्मचारी असतील त्याना आणि जि.प.तील सार्वत्रिक भ्रष्टाचाराला वैतागलेल्या संबंधीत लोकांच्या दृष्टीने त्यांची तडकाफडकी झालेली बदली क्लेषदायक ठरु शकेल. कारण डॉ. जोशी यांनी प्रशासनातील बेशिस्तीला आळा घालण्याचे आणि प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न चालविले होते, अशी त्यांच्याबाबत चर्चा होती. त्या मूळच्या कोकणातील (चिपळूणच्या) असल्याने त्यांना कोकणी माणसाची मनोवृत्ती आणि इरसालपणा चांगलाच माहिती असावा. परंतु जिल्हा परिषदेतील बहुसंख्य अधिकारी हे घाटावरुन आलेले. प्रशासन व्यवस्थेत मुरलेले. त्यांनी संघटीतपणे इथल्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या काही मंडळींना हाताशी धरुन पद्धतशीरपणे डॉ. जोशी यांना वर्षभरातच दूर करण्यात यश मिळविले आहे. त्यात त्यांना शिक्षक बदल्यांचे प्रकरणही जोडीला मिळाले.
जि.प.च्या बदल्यांमध्ये, नेमणुकांमध्ये करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होते अशी चर्चा आहे. बहुतेक बदल्या या ग्रामसेवक, आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांच्या असतात. कारण जि.प. प्रशासनात त्यांची संख्या जास्त आहे. गावोगावी काम करणा-या या शिक्षक किवा अन्य कर्मचा-यांमध्ये त्यांना आपला मतदार आणि आपला प्रचारकही दिसत असतो. हेही एक कारण लोकप्रतिनिधींनी या बदल्यांमध्ये रस घेण्यामागे असावे. त्यापैकी पैसे देतील त्यांची बदली त्यांना सोयीस्कर ठिकाणी व जे देणार नाहीत किवा कमी देतील त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी अशी सरळ विभागणी असते. तरीही त्यात कमी सोयीची, कमी गैरसोयीची अशीही पोट विभागणी असते. हे असे सर्वच जिल्ह्यांमध्ये चाललेले असते.
गेली अनेक वर्षे वरीष्ठ अधिका-यांच्या संगनमताने चाललेला हा धंदा यावर्षी बंद पडल्याने क्रोधीत झालेल्या जि.प.सदस्य, पदाधिकारी व अधिकारी यांनी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे तक्रार केली. परंतु राणे यांनी यावर काहीच निर्णय दिला नाही. उलट या बदल्या योग्य असल्याचे सांगितले होते. परंतु नंतर कुठे कशी चक्रे फिरली कोणास ठावूक! डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाल्याची बातमी आली. त्यामुळे ‘बदलीग्रस्त‘ शिक्षक, कर्मचारी, जि.प. सदस्यांसह अनेकांना हर्षवायू झाला असेल. पण तो दर्शविणे सध्या गैरसोयीचे असल्याने त्यावर फारशी जाहीर प्रतिक्रिया उमटली नाही.
या बदलीमुळे डॉ. जोशी यांची सोय झाली असेल. परंतु कर्तव्यदक्ष अधिका-याला अशा अपमानास्पद प्रकारे जिल्ह्याचा निरोप घ्यावा लागला याचे वैषम्य बहुसंख्य लोकांना निश्चितच वाटले असणार. त्यामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांचे या जिल्ह्यात काहीएक चालणार नाही. एकतर त्यांनी प्रस्थापित भ्रष्ट प्रशासन यंत्रणेशी जुळवून घ्यावे, लोक प्रतिनिधींशी संगनमत करुन स्वतःसुद्धा जमेल तेवढा भ्रष्टाचार करावा आणि आपले आसन स्थीर ठेवावे!
डॉ. जोशी यांच्या बदलीनंतर या जिल्ह्यात आलेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी हे नक्षलवाद्यांनी घेरलेल्या गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी व मागास जिल्ह्यातून आले आहेत. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांना ‘शिक्षा‘ म्हणून ह्या जिल्ह्यात नेमणूक दिली जाते. तथा नवीन आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी तशा प्रकारचे असतील तर या जिल्ह्यातही ते डॉ. अश्विनी जोशी यांच्याप्रमाणेच प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न करतील-नव्हे जनतेची तशीच अपेक्षा आहे. मग पुन्हा त्यांच्याही बदलीसाठी सूत्रे हलू लागतील, ती केव्हा हे पहायचे.

विशेष *
प्राचीन खजिन्याची किल्ली
प्रसाद मासिकाच्या मे २०११ अंकात श्री. आशुतोष बापट यांनी कसाल नजिक हिवाळे येथे असलेल्या कातळावरील प्राचीन चित्रांची माहिती दिली आहे. याचप्रमाणे मालवण तालुक्यात बुधवळे इथे राजापूर तालुक्यात निवळी फाटा येथे व तारव्याचा सडा या ठिकाणीही अशा स्वरुपाची चित्रे अस्तित्वात असल्याची माहिती दिली आहे. आमच्या मोहिमेमध्ये सामील असलेले श्री. शिवप्रसाद देसाई यांनी दोडामार्ग तालुक्यात ‘आई‘ या गावीही अशी चित्रे पाहिल्याचे सांगितले. मुख्य रहदारीच्या मार्गापासून दूर, उघड्या मोकळ्या सड्यांवर अशाप्रकारे चित्र, खुणा रेखाटणारी संस्कृती वा समाज आजच्या ज्ञात इतिहासाला अज्ञात आहे. एवढेच नव्हे तर अशाप्रकारची फार मोठ्या आकारातील शे-दोनशे फूट लांबी रुंदीचा संलग्न पसारा असणारी रेखाचित्रे, भारतीय प्राचीन अवशेषांमध्ये देखील एकमेवाद्वितीय अशी आहेत. इतरत्र कुठेही आढळलेली नाहीत.
ज्या ठिकाणी पाण्याचा एखादा झरा, विहीर अशा प्रकारचा एकमेव स्त्रोत ज्या सा-या परिसरात उपलब्ध असेल, अशाच ठिकाणी ही चित्रे आढळून आलीत. असे साम्यस्थळ इथे जाणवले. या चित्रखुणा वर्षांनुवर्षे काळाच्या मा-यापुढे पावसा-वा-याने झिजल्या आहेत. गवताच्या बेलगाम वाढीने अस्पष्ट, दिसेनाशा झालेल्या आहेत. कोकणातल्या तमाम आबालवृद्धांना आमचे आवाहन आहे की, अशा प्रकारच्या खुणा, कोरलेले कातळ आपल्या आसपास, आपल्या माहितीत असतील, तर कृपया आम्हाला जरुर कळवावेत. आम्ही ही सारी माहिती योग्य त्या संशोधकांपर्यंत पुढे पोहचवायचा प्रयत्न करु.
मोबाईलवर फोटो काढणे सहज सोपे झाले आहेत. तसे आम्हाला ई-मेलवर पाठवावेत. चित्रे, रेखाटने, वा शिल्पे ज्या जशा स्थितीत असतील त्यांचे, हानी न पोहचवता, बदल न करता तपशील कळवा.
आपल्या जाणकार पूर्वजांनी फार चांगल्या रितीने असे अवशेष खुणा जपायची तजवीज करुन ठेवलेली आहे. हिवाळेतील सदर चित्रांची जागा हा देवराईचा भाग आहे. त्यामुळे स्थानिक धनगर व ग्रामस्थ तिथला एखादा छोटासा दगडही इकडचा तिकडे आपणहून हलवित नाहीत. ज्या खड्ड्यातून तिथले महापुरुषाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे काढले गेले तेथून ते मंदिरापर्यंत नेतांना वाटेत पडलेले, आज शेकडो (हजारो) वर्षे तसेच त्या काळाची, त्या घटनांची साक्ष द्यायला जशाचे तसे पडून आहेत.
हिवाळेच्या सड्यावर तीन गोष्टींचा आम्हाला एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे जाणवले. पहिली गोष्ट म्हणजे साधारण दहा फूट खोल असलेली व पाच फूट घेराची चि-यांनी बांधलेली प्राचीन विहिर. हा त्या सा-या सपाट उंच पठरावरील एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची चव गोड आहे. तिला ‘फराळाची भाब‘ म्हणतात. भाब या शब्दाचा अर्थ पाण्याचा खोलगट भाग असा होतो. ‘फराळाची‘ कारण वर्षातून एकदा स्थानिक लोकांचा इथे महाप्रसादाचा, जेवणाचा सामुदायीक कार्यक्रम होतो. विहिरीच्या चार हात दूर लागून एक चिरे रचून बांधलेली तळी आहे. उन्हाळ्यात तिच्यात सुकलेला चिखल उरला होता व तळाशी असलेली शंकराची छोटीशी पिड स्पष्ट दिसत होती. तळीच्या एका बाजूने घाटाप्रमाणे तळापर्यंत पोहोचणा-या पाय-या आहेत. संपूर्ण हिवाळे पंचक्रोशीत फक्त या तळीत कमळे आढळतात. अशी स्थानिकांनी माहिती दिली. उघडच आहे, कमळांची बीजे मुद्दाम आणून या तळीत रुजवलेली आहेत.
आदीमानवांच्या काळात पाण्याचे साठे दर्शविण्यासाठी त्या परिसरात मुद्दाम काही खाणाखुणा निर्माण केल्या जात. कातळांवर चित्रे काढली जात. त्या मानवनिर्मित खुणा पुढे येणा-या टोळीला मार्गदर्शन करत की, इथे जवळपास पाणी आहे. मात्र त्या जमिनीवर शे दिडशे फूट लांबी रुंदीत काढल्या जात नव्हत्या. याशिवाय आदीमानवांकडून चिरे खणून काढून, तासून, घडवून त्याची बांधकामे केली जात नव्हती.
हे अशाप्रकारचे बांधकाम विहीरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महापुरुषाच्या मंदिराचे आहे. त्यात चिरे साधण्यासाठी चुना वा इतर कोणताही पदार्थ वापरलेला नाही. हेमाडपंथी देवळांप्रमाणे एकात एक अचूक बसणारे दगडांचे आकारही नाहीत. तरीही कुशलतेने दगडांना आकार देऊन ते नुसते रचलेले आहेत. मूळ गुहेच्या तोंडावर ती बंदिस्त करण्यासाठी केले गेलेले बांधकाम आहे. दूरवरुन ती जागा लक्षात येण्यासाठी कळस बांधलेला जाणवतो. या दगडांवर कोणतेही कोरीव काम वा चित्रे नाहीत. घुमटामुळे असलेला प्रवेशद्वाराचा तोरणासारखा भाग आता गेल्या दहा-बारा वर्षात कोसळलेला आहे. जेमतेम एक माणूस वाकून रांगत जावू शकेल असे बिळासारखे दार आहे. त्यातून रांगत आत गेले की,बरीच मोठी गुहा आत आहे. पुरुषभर उंचीची व पंधरा-वीस फुट लांबी रुंदीची समोरच छोटेखानी फुटभर चौथ-यावर दगडी पादुका आहेत. त्यांची पूजा होते. एका कोप-यात छोटे दार असून ते अजून आत एका छोट्या गुहेत नेते. काळोखामुळे तिथे पुढे जाता आले नाही. दगडात घडविलेल्या गुहेत एका कोप-याची जमिन मातीची आहे. लहानग्यांकडून माहिती मिळाली की ते बुजलेले भुयार आहे.
या गुहामंदिरासमोर एक अरुंद घळ आहे. ज्यातून पावसाळ्यात पाणी वाहत जाते. त्यापलिकडे पठार आहे. ज्यावर उठाव चित्रे आहेत. जिथून बांधकामाला चिरे काढले तो खड्डा आहे. ही चित्रे साधारण ३ इंच जाडीच्या रेषांनी व ३ इंच खोलीचे खोदकाम करुन बनवलेली आहे. मात्र त्यात गवताची मुळे वर्षानुवर्षे घट्ट रुजल्याने ती झाकली गेली आहेत. ती सारी व्यवस्थित साफ करुन पुरातत्व शास्त्राच्या विहीत प्रक्रियांनुसार मोकळी केली गेली तर सुस्पष्ट होतील. अशा संशोधनासाठी खास प्रकारची प्रकाशयोजना वापरणारे कॅमेरे वापरले जातात. खुणा स्पष्ट झाल्या की त्यांचा अर्थ लावणे सोपे जाईल.
बेंगळूरमधील एका इतिहास शास्त्रकारांनी या चित्राविषयी एक प्रबंध इतिहास परिषदेत वाचलेला आहे. प्रत्यक्ष जागेला भेट न देता, केबिनमध्ये बसून संशोधन करणा-या अशा शास्त्रकारांबद्दल व त्यांच्या दिव्यचक्षूंबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे. आमच्या देशी शास्त्रज्ञांचा व सरकारी पुरातत्व खात्याचा हा नेहमीचा खाक्या आहे. देशी विद्यापीठांतील प्राध्यापक वर्गाने अध्यापनासोबत संशोधन करावे की नाही, ही त्यांच्या दृष्टीने वादग्रस्त बाब आहे. जर पैसे मिळणार तर आम्ही विचार करणार, अशी उत्तरे आमच्या लोकांकडून मिळाली. मात्र विदेशातील विद्यापीठांतील काही प्राध्यापकांनी ताबडतोब इ-मेलला उत्तरे पाठविली. कधी येऊ ते कळवा म्हणून उत्साह दाखवला. ते येतील. पदरखर्च करुन संशोधन करतील. काही नवीन सत्ये जगासमोर आणतील. मग आमची सरकारी खाती हलतील. आम्हाला न विचारता तुम्ही संशोधन केलेच कसे? म्हणून जाब विचारतील. ही जागा पुरातत्व खात्याने ताब्यात घेतली आहे म्हणून पाटी लावतील. त्यानंतर कोणालाही या जागी सरकारी माणसांचे हात ओले केल्याशिवाय फिरकायलाही मिळणार नाही. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन गडकोट आणि लेण्यांची ही अवस्था आहे. स्थानिक गावक-यांच्या, ‘चित्रे‘ बघायला पर्यटक येतील, त्यांच्या सरबराईच्या रुपात व्यवसाय - धंद्याच्या संधी निर्माण होतील या अपेक्षा हवेतच राहतील. असो.
या चित्रांच्या बाबतीत अर्थातच ती कोणी बनवली? केव्हा बनवली? आणि का बनवली? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधणे खरे आव्हान आहे. गावक-यांकडून मिळणारी माहिती व त्यांच्यातील समजूती यासाठी कोणतीही विशेष मदत करु शकत नाहीत. जसे सिधुदुर्गात इतरत्र कोठेही दगडी घडीव फार जुने बांधकाम असले की त्यावर ‘पांडवांनी एका रात्री बांधले‘ असा शिक्का मारला जातो. तसेच गावकरी या चित्रांबाबत सांगतात, पांडव एका रात्रीत खेळ खेळले ती ही चित्रे. महापुरुषाचे मंदिर म्हटले गेले तरी, दारावर बांधलेली पितळी घंटा व आतमध्ये असलेल्या पादुका (ज्या मुळ कोरीव दगडाचा भाग नाहीत. मागाहून ठेवलेल्या असू शकतात.) या दोनच खुणा मंदिरदर्शक आहेत. महापुरुषाचे मंदिर म्हणून हा सारा भाग वयात आलेल्या स्त्रियांना निषिद्ध आहे. पादुका सोडल्या तर इतर कोणत्या गोष्टीची पूजा होत नाही. गावक-यांच्या रुढी, विधींमध्ये सड्यावरील चित्रांना कोणतेही स्थान नाहीत. प्रत्येक जाणता माणूस आम्हाला चित्रे आहेत की ती लिपी आहे की अजून काही माहित नाही, असे सांगतो. मात्र छोट्या निरागस मुलांनी माहिती दिली की, मंदिरातील भुयारात शिरले की एक एक सात खोल्या आहेत. जो कोणी सड्यावरील चित्रात घातलेले कोडे सोडवणार त्यालाच त्या खोल्या सापडतील व त्यातील सिद्धींचा खजिना. पिढ्यान पिढ्या धनगरांनी जपलेले हे रहस्य (आजोबांनी) लहानग्याला सांगितले होते.
ही चित्रे म्हणजे एखादा नकाशा आहे का? आपल्या सिधुदुर्गात अशा गुप्त भुयारांसंबंधीत अनेक जुन्या आख्यायिका आहेत. वेंगुर्ल्यात डच वखार ते यशवंत गड असे भुयार असल्याची बोलवा आहे. तुळसमधील वाघेरीचा डोंगर व त्यावरील सिद्धपुरुषाची असलेली गुहा वेंगुर्ल्यातील मूठच्या टोकाकडे कड्याखाली समुद्रात उघडते. तिथेही स्त्रियांना मज्जाव आहे. जिल्हाभर विखुरलेली दूर दुर्गम सड्यांवरील ही भुयारे म्हणजे जुन्या काळातील विजनवासातील आश्रयस्थाने आहेत का? ही चित्रे या भुयारी जाळ्यांचे नकाशे व आराखडे आहेत का? त्या भुयारांतून प्राचीन संपत्ती व खजिने दडवलेले आहेत का?
बोलता बोलता जुन्या जाणत्या भाऊ फौजदारांनी सांगितले की, पूर्वी एक कुत्रा महापुरुषाच्या मंदिरातील भुयारात शिरला व देवगड तालुक्यातील श्रावण या गावी बाहेर पडला, अशी बोलवा आहे.
महापुरुष, सिद्धपुरुष अशा नावांनी ही स्थाने नाथपंथियांशी संबंधीत आहेत. ह्या चित्रखुणा म्हणजे अजून उलगडा न होऊ शकलेली साबरी लिपी व त्यातील लेख आहेत का? त्यांच्या उपासनेची गुप्त स्थाने आहेत का? चि-यांचा रचीव बांधकामांचा काळ हा त्या काळाशी जुळतो. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शे-सव्वाशे वर्षे आधीच्या कालखंडाशी. हाच कालखंड विजयनगरच्या साम्राज्याशी जुळतो. कुडोपी-हिवाळे येथील दोन डोक्याच्या गरुडाचे चित्र हे याच साम्राज्याचे कुलचिन्ह आहे. हा गरुड गंडभेरुड म्हणून ओळखला जातो. सिधुदुर्गातील अनेक लाकडी कोरीव मंदिरशिल्पांमध्ये हे दोन डोक्याच्या गरुडाचे चिन्ह आळढते.
अशा प्रकारच्या उत्पत्तीही अनेक आहेत. सरकारी खाती किवा संशोधक गेली दहा वर्षे या चित्रांचे अस्तित्व शहरी समाजाला ज्ञात होऊनही थंड आहेत. पण खजिन्याची आणि साहसाची ओढ असेल तर या चित्रांचा मागोवा तुम्ही घेऊ शकता. चित्रांचे कोडे सर्वांना खुले आहे. पाहा तुम्हाला तरी उलगडते का? कुडाळपासून कणकवलीला जाणा-या हमरस्त्यावर कसाल सोडले की २ कि. मी. अंतरावर डावीकडे जाणारा एक फाटा आहे. तो राठिवडे, हिवाळेला जातो. ओवळीये गाव सोडले की, पुढे नऊ आंबुली म्हणून थांबा येतो. तिथून कच्चा रस्ता उजवीकडे आत डोंगरावर जातो. त्याच्या टोकाशी गाडी सोडून स्थानिक माहितगार मदतीला घेऊन डोंगर चढून वर जावे लागते. साधारण २५ मिनिटांचा चढाव आहे. वर खड्यावर धनगरांच्या १०-१२ उंब-यांच्या वाडीपर्यंत सुमारे २० मिनिटे चालावे लागते. मंदिर व चित्रे तिथून हाकेच्या अंतरावर आहेत. चित्रांचा उलगडा झाल्यास कळवायला विसरु नका! खजिना ठेवा तुम्हाला, ज्ञान द्या आम्हाला.
किशोर सावंत, दोडामार्ग



कृष्णलीला
हल्लीच सावंतवाडीत ‘संभवामी युगे युगे‘ या महानाट्याचा नेत्रदिपक आणि सर्वांर्थाने सुंदर असा प्रयोग पाहिला. या महानाट्यातील ‘कृष्ण-सुदामा भेटीचा‘ प्रसंग पाहून मला माझ्या प्राथमिक शालेय जीवनातला प्रसंग आठवला.
शाळेमध्ये ‘विविध करमणुकीचे कार्यक्रम‘ होणार होते. नाच, नकला, नाट्यप्रवेश असे ‘आयटेम‘ होते. मी बहुधा इयत्ता ३रीत असणार - उमर वय वर्षे ९ किवा १०! आमच्या गुरुजींनी शालेय पाठ्यपुस्तकातला ‘सुदाम्याचे पोहे‘ हा नाट्यप्रवेश सादर करण्याचे ठरवले. ‘स्क्रिप्ट‘ तयार होतेच. पात्रे दोनच! कृष्ण आणि सुदामा!!! कृष्णाच्या भुमिकेसाठी वर्गातल्या एका गोड चेह-याच्या गुटगुटीत धीट मुलाची निवड केली होती. कृष्णाच्या पाट्यार्साठी ‘मोरपीस‘ मिळविण्यात आले. सुदाम्यासाठी माझी अंगकाठी किवा शरीरयष्टी होतीच. (फाटक्या ठिगळ लावलेल्या) धोतरांची घरात कमतरता नव्हती. डोक्यावर कानटोपी सदृष्य ‘टोपी‘ दिली गेली. बरगडीन् बरगडी मोजून घ्यावी असे एकमेव पात्र वर्गामध्ये मीच असल्याने सुदाम्याच्या भुमिकेसाठी माझी निवड सार्थ ठरणार होती. याशिवाय आमच्या पाठांतरावर गुरुजींचा विश्वास होता. या सर्वांमुळे ‘सुदाम्याचे पोहे‘ सादर करण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी दोन आठवडे तालमी घेतल्या गेल्या. (या तालमीचे निमित्ताने अभ्यासाला ‘सुट्टी‘ मिळत असे हा मोठा प्लस पॉईंट होता!)
कार्यक्रमादिवशी आमचा ‘आयटेम‘ चौथा-पाचवा होता. कृष्ण खरंच दृष्ट लागण्यासारखा नटवला होता. सुदाम्याला कुणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच नव्हता. आमचे आई-वडील प्रेक्षकात हजर होते. (त्यावेळी आई-वडिलांचे ‘पालक‘ झाले नव्हते!) आई-वडील, वर्गमित्र, गुरुजी, बाई, कन्याशाळेतल्या मुली असा ‘प्रेक्षकवर्ग‘ होता. गावातील मान्यवरही होतेच. (ही मंडळी ‘आर्थिक भार‘ उचलत असत पण त्यांना ‘प्रायोजक‘ ही संज्ञा नव्हती.)
आमच्या नाट्यप्रवेशाची वेळ झाली. गुरुजींनी कृष्णाला स्टेजवर ‘धाडले‘. कृष्ण माझ्या एन्ट्रीची वाट पहात ‘महालात‘ येरझारा घालीत होता. विगेमधून ‘प्रेक्षक‘ पाहूनच माझे पाय लटपटू लागले. कपाळावर व शरीराच्या शक्य असेल त्या भागातून घाम येत होता. धोतर, कानटोपी, पडशी (त्यात खरंच पोहे होते) सांभाळत (गुरुजींनी ढकलल्यामुळे) सुदाम्याची एंट्री झाली. कृष्णाने मला पाहून त्याचा डॉयलॉग चोख म्हटला असावा. कृष्ण माझ्या ‘डॉयलॉगची‘ वाट पहात परत येरझारा घालत होता. गुरुजी आतून ‘प्रॉम्प्टींग‘ करत माझा संवाद (प्रेक्षकांना एकू जाईल एवढ्यानं) सांगत होते. पण माझा घसा कोरडा पडला होता. काहीच ऐकू येत नव्हते. शेवटी कृष्णच सुदाम्याच्या मदतीला धावून आला. सुदाम्याचे डॉयलॉग कृष्णाने प्रश्नार्थक रुपात विचारुन मला ‘चालना‘ देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष परमेश्वर हतबल झाला! प्रेक्षकांमधून टाळ्या, हशा, पडदा! पडदा!! असे आवाज ऐकू येऊ लागले. एवढ्यात मला कसे अन कां सुचले हे ‘श्रीकृष्णच‘ जाणे, मी मूळ स्क्रीप्टमध्ये नसलेला डॉयलॉग म्हणत कृष्णाला हात धरुन विगमध्ये जवळजवळ ओढत नेले. मला ऐनवेळी सुचलेला डॉयलॉग होता- ‘‘चल मित्रा, मी प्रवास करुन खूप दमलो आहे. तुझ्या महालात आत जाऊनच बोलूया!!!‘‘
सुदाम्याने कृष्णाला ओढत नेण्याचा प्रसंग या पृथ्वीतलावर प्रथम अन् शेवटचाच घडला असावा. सर्वात कहर म्हणजे या आमच्या नाट्यप्रवेशातील कृष्णाला पहिले बक्षिस तर मला ‘उत्तेजनार्थ‘ बक्षिस मिळाले. कृष्णलीला... नाहीतर दुसरे काय म्हणायचे?
डॉ. मधुकर घारपुरे, सावंतवाडी

विशेष बातम्या *
महामँगोचे होणार पुनरुज्जीवन ः ९ कोटींचा निधी
वेंगुर्ल्यात साकारणार फलोत्पादन महाविद्यालय
कुडाळ येथील महामँगो संस्थेची दीड कोटी थकीत रक्कम सिधुदुर्ग जिल्हा बँकेला देऊन पणन विभागामार्फत महामँगोच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी रुपये देण्यात येतील. सिधुदुर्गनगरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डच्या २५ एकर जागेसाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. तेथे कोल्ड स्टोरेज, अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. वेंगुर्ले येथील फलोत्पादन महाविद्यालयालाही मंजूरी देण्यात आली. आंब्यातील साका तपासणी केंद्र सुरु करायला अडीच कोटीचा खर्च आहे. सुरुवातीला वेंगुर्ले येथे केंद्र सुरु करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने मालवण, देवगड येथे साका तपासणी केंद्र सुरु करण्यात येईल. राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सिधुदुर्गनगरीमधील कृषी व पणन विभागाच्या खरीप आढावा बैठकीत जाहीर केले. यावेळी पणनमंत्री विखे पाटील यांनी सिधुदुर्गातील बागायतदारांचे प्रश्न जाणून घेतले. मिश्र खत पुरवठ्याच्या बाबतीतील समस्या लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे, जि.प.अध्यक्ष सुमेधा पाताडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीराव कुबल यांचा पाठपुरावा
वेंगुर्ले येथे कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र १९५० साली स्थापन करण्यात आले. या केंद्राशी संलग्न अशी चार उफद्रही स्थापन झाली. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये झालेल्या सातत्याने पाठपुरावा आणि फलोद्यान महाविद्यालयाची मागणी शिवाजीराव कुबल यांनी लावून धरली होती. हा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी समितीने मंजूर करुन अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याचाच परिपाक म्हणजे तातडीने वेंगुर्ले येथल्या फलोत्पादन महाविद्यालयाला तातडीने मंजूरी मिळाली आहे.

२३ जणांना कृषी पुरस्कार
महाराष्ट्र शासनाने वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रासह सिधुदुर्ग जिल्ह्यातील २३ शेतक-यांना विविध शेतीविषयक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ जुलै २०११ रोजी पुणे झाला.
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने शेतक-यांना हे पुरस्कार जाहीर केले होते. पुरस्कारप्राप्त शेतक-यांची नावे पुढीलप्रमाणे - वसंतराव नाईक-कृषीभुषण पुरस्कार-फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, शिवाजी रमाकांत कुबल-वेंगुर्ले, गोपुरी आश्रम- वागदे, हेगडेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, सौ. सुहासिनी उत्तम वैद्य-मातोंड, शेतिनिष्ठ पुरस्कार - रावजी बापू चव्हाण - वराड-मालवण, अरुण गजानन कांबळी-वायंगणी-मालवण, लक्ष्मण धोंडू नाईक-आसोली-वेंगुर्ले, प्रकाश सेनापती दळवी, होडावडे-वेंगुर्ले, शिवराम गोविद गोगटे - वेतोरे-वेंगुर्ले, मनोहर बाबू पेडणेकर-चिचवली-कणकवली, मधुकर सिताराम घोगळे-नेमळे-सावंतवाडी, श्रीपाद शंकर मांजरेकर-नाधवडे -वैभववाडी, रघुनाथ विठ्ठलराव नाईक-आरोस-सावंतवाडी, विजय वसंत प्रभू-काळसे-मालवण, लक्ष्मण राजाराम परब-कुणकेरी-सावंतवाडी, बाजीराव झेंडे-हिर्लोक-कुडाळ, शरद गणपत धुरी-झाराप-कुडाळ, उद्यान पंडित पुरस्कार - प्रसन्ना तुकाराम कुबल-वेंगुर्ले, बाळकृष्ण गणेश गाडगीळ-वेतोरे, विलास अनंतराव ठाकूर-मठ, सूर्यकांत महादेव देऊलकर - दोडामार्ग

पालकमंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ल्यात बुद्धिवंतांशी संवाद
समाज घडविणे ही बुद्धिजीवी लोकांचीही जबाबदारी आहे. अशा लोकांनी एकत्र येऊन आपल्या ज्ञानातून समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ३० जूनला शहरातील बुद्धिजीवी नागरिकांशी बोलतांना सांगितले. तालुका काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार डॉ.नीलेश राणे, आमदार राजन तेली, माजी आमदार शंकर कांबळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर, नगराध्यक्ष संदेश निकम, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय परब उपस्थित होते. तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी स्वागत केले.
उपस्थितांपैकी काही नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या मांडल्या. नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी शहरातील पाणीटंचाई व जिल्ह्यात पर्यटनाविषयी पायाभूत सुविधांचा अभाव हा प्रश्न मांडला. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शंकरराव पाटील यांनी शहरातील गटार योजनेसह अन्य मूलभूत सुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. लायनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता डुबळे यांनी येथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक व्हावे, खर्डेकर कॉलेजचे प्राध्यापक नरगच्चे यांनी महाविद्यालया -तील बारावीच्या प्रवेशप्रक्रियेतील मर्यादित क्षमता १०० वरुन १५० करावी. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील समस्या मांडल्या. आंबा बागायतदार भूषण नाबर यांनी आंबा फवारणीसाठी केरोसीनचा पुरवठा करावा. संजय पुनाळेकर यांनी शहरातील देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न सोडवावा. लायन्स अध्यक्ष नीला यरनाळकर यांनी पाणी टंचाईबाबत, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर व काजू कारखानदार दिलीप सामंत यांनी काजूवरील कर परतावा मिळावा, डॉ.प्रसाद साळगांवकर यांनी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे. कैवल्य पवार यांनी डोंगरी भागाचा, राजन गिरप यांनी जिल्ह्याचा पर्यटन नकाशा चुकीचा आहे. तो नव्याने व्हावा. एस.व्ही.कदम यांनी जिल्ह्यात सैनिक शिक्षण-प्रशिक्षण केंद्र व्हावे. एस.के.बिराजदार यांनी संशोधन केंद्रात फळ रोपवाटिका अभ्यासक्रम पुन्हा सुरु व्हावा अशा सुचना मांडल्या.
यावर पालकमंत्री श्री. राणे यांनी आढावा घेतांना सांगितले की, ‘वेंगुर्ले तालुक्याबाबत माझ्या मनात भावनिक स्थान आहे. ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेली ही पालिका अजूनही पाहिजे त्या प्रमाणात प्रगतीकडे गेली नाही. गेल्या पालिका निवडणुकीत पूर्ण सत्ता काँग्रेसकडे द्या. मग शहराचा विकास कसा होतो ते पहा, असे सांगितले होते, मात्र दुर्देवाने काँग्रेसला या निवडणुकीत मोठे यश आले नाही. वेंगुर्लेवासीयांनी मांडलेले प्रश्न व समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु.‘
नगरसेवक अॅड. शशांक मराठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शहरातील सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते.
भुयारी गटाराचे काम पूर्ण करावे
वेंगुर्ले शहरातील बहुचर्चित असलेल्या भुयारी गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आपण ठेकेदाराला दिले आहेत. यात काही अडचण आल्यास आपल्याशी संफ साधावा, असे आपण ठेकेदाराला सांगितल्याचे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

1 comment:

  1. माहितीचा अधिकार जरी मिळाला असला तरी त्याचा वापर करून माहिती मिळवण सर्वसामान्य लोकांसाठी फार कठीण आहे. त्याला कारण अधिकारी वर्गाची मनमानी आहे. माहिती मिळविण्यासाठी संघटीत प्रयत्न झाले पाहिजेत. माहिती अधिकाराचा उपयोग करून कितीतरी भ्रष्टाचार उघड करता येईल आणि नेमके हेच भ्रष्टाचारी लोकांना नको आहे. त्यामुळे कसा हा अधिकार दडपता येईल ह्याचा प्रयत्न ते करत असतात. अलीकडेच अनेक माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत ज्यात अनेकांचे जीवही गेले आहेत. गुजराथचे प्रकरण ताजे आहे. ओमकार तुळसुलकर यांना धन्यवाद आपण लिहिलेल्या लेखामुळे सत्य समोर आले आहे.
    धन्यवाद
    प्रो.वामन रा.परुळेकर

    ReplyDelete