Friday, 1 July, 2011

अंक २४वा, ३० जून २०११

अधोरेखीत *
वर्षा पर्यटनाचा बहर
उन्हाळी सुट्टीतील पर्यटनाचा हंगाम संपला की, अलिकडच्या काळात बहरलेल्या ‘वर्षा पर्यटनाचा‘ हंगाम सुरु होतो. डोंगर-माथ्यावरुन कडेकपारीतून पडणारे पाणी कुठे मोठ्या धबधब्याच्या स्वरुपात तर कुठे कड्यावरुन खाली दगडधोंड्यातून उड्या मारत अवखळत येत असते. अगदी अरसिक माणसालाही हे दृष्य भुरळ घालते. मग निव्वळ निसर्गाचा आनंद लुटायला गेलेल्या हौशी मंडळींची काय कथा? हे लोक मग त्या कोसळणा-या धबधब्यातच शिरतात.
कोकणात विशेष करुन सिधुदुर्ग-रत्नागिरीत अशी पावसाळी वर्षा पर्यटनाची सहल काढण्यासारखी अनेक ठिकाणे निसर्गानेच निर्माण केली आहेत. वेंगुर्ले - बेळगांव रस्त्यावरचे आंबोली हे हिलस्टेशन गेल्या १०-१५ वर्षात पावसाळ्यात गजबजलेले असते.
गेल्या २ वर्षात घाट कोसळण्याच्या घटनांमुळे इथल्या पर्यटनाला घरघर लागलीय. यंदाही मागील वर्षाच्या ठिकाणी पुन्हा दरड कोसळल्याने घाट आठ दिवस बंद होता. या घाटाला केसरी - फणसवडेचा पर्यायी मार्ग झाल्यास अवजड वाहतूक त्यामार्गे वळवल्यास आंबोली घाटाचा ताण कमी होईल. अजून पर्यायी मार्ग अस्तित्वात येण्याअगोदरच मार्गाचा प्रस्ताव सर्वप्रथम कोणी ठेवला? यावर आमदार दीपक केसरकर आणि विधानपरिषद आमदार राजन तेली यांच्यात श्रेयवाद सुरु आहे. राजकीय वादांमध्ये रस्ता तिथेच अडकू नये अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
आंबोलीतील या धबधब्यांप्रमाणे चौकुळ गावानजिक कुंभवडे, दोडामार्ग तालुक्यात असनिये, मांगेली, देवरुखजवळ मार्लेश्वर, कणकवलीजवळ सावडाव, नापणे धबधबेही पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहेत.
मार्लेश्वर हे धार्मिक स्थळ असल्याने तसेच आंबोली, सावडाव धबधबे वगळता इतर ठिकाणी पर्यटकांची गर्दी नसते. त्यामुळे ही ठिकाणे काहीशी दुर्लक्षितच होती. यंदाही आंबोली घाटात कोसळणा-या दरडींमुळे दोडामार्गजवळील मांगेली, असनिये, तळवणे, देवगड-शिरगांव येथील सैतवडे अशा धबधबे असलेल्या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. एक दोन दिवसांच्या कौटुंबिक सहलींसाठीही अशी ठिकाणी आकर्षण ठरत आहेत.
वर्षा पर्यटन बहरण्यासाठी या सुविधांची गरज
पर्यटन स्थळांकडे कसे जायचे याची माहिती मार्गदर्शक फलक आणि होर्डिगच्या माध्यमातून व्हायला हवी. शुभेच्छांचे बॅनर्स लावणा-या राजकीय नेत्यांनी आपल्या नेतेमंडळींच्या सौजन्याने ही माहिती दिल्यास पर्यटन व्यवसायाला हातभार लागेल.
जवळपास राहण्या-जेवण्याची किफायतशीर व्यवस्था हवी.
पर्यटन स्थळे जोडणारे चांगले रस्ते, लाईट्स अशा पायाभूत सुविधा असतील तर या हंगामी स्वरुपाच्या वर्षा पर्यटनाला बहर यायला नक्कीच मदत होईल.


संपादकीय *
आव्हानांना तोंड देण्यास सज्ज व्हा!
इंग्रजांच्या राजवटीत लॉर्ड मेकॉले या इंग्रज गृहस्थानी भारतात जी शिक्षण पद्धती रुजविली तिचाच अवलंब आपण आजही करीत आहोत. तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांना खंडप्राय भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी स्थानिक प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा शिकलेली नोकरशाही हवीच होती. त्यानुसार शिक्षण पद्धती तयार करण्यात आली. त्यामागे इंग्रजांचा हेतू कोणताही असो पण, इंग्रजी व प्रादेशिक भाषांमुळे भारतात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले. त्यांनी आखून दिलेल्या शिक्षण पद्धतीला आज आपण कितीही नावे ठेवत असलो तरी ते शिक्षण घेऊनच भारतीयांनी देश विदेशांत विविध क्षेत्रांमध्ये आपले प्राविण्य सिद्ध केले आहे, हे नजरेआड करुन चालणारे नाही.
या शिक्षण पद्धतीला आपण भारतीय वळण देण्याचा प्रयत्न केला. कालानुरुप बदल केले. व्यवसायाभिमुख नवे अभ्यासक्रम आणले. आता नवे तंत्रज्ञान, संगणकयुग हे सारे आले. त्यांचाच अवलंब करुन देशभरातील कोट्यावधी लोकांनी नोकरी, धंदा-सेवा व्यवसाय मिळविले आणि स्वतःच्या तसेच देशाच्या संपत्तीतही भर घातली. यामुळे इंग्रजांनी दिलेली शिक्षण पद्धती पूर्णतः चुकीची होती, भारतीय समाजमनाला ती पचणारी नव्हती असे म्हणता येणार नाही. आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत जे दोष निर्माण झाले आहेत ते आपले आपणच निर्माण करुन ठेवलेले आहेत.
एक तर शिक्षणावर सरकार सर्वात कमी - खर्च करते. शिक्षण पद्धतीमधील बदलांबाबत नेहमीच धरसोड केली जात असते. शिक्षणासाठी होणा-या सरकारी खर्चाचा वाटा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. पोचला तरी कागदोपत्री नोंद होण्यापुरता. ब-याचशा सरकारी शाळांमधील शिक्षक आणि एकूणच शिक्षणाच्या दर्जाविषयी बोलण्याचीच सोय नाही. त्यामुळे सरकारच्याच प्रोत्साहनाने खाजगी शिक्षण संस्था सुरु झाल्या. तिथे कोणतीही मोफत सुविधा नसते. उलट भरमसाठ फी मात्र वसुल केली जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि व्यावसायीक शिक्षण देणारी महाविद्यालये यांवर खाजगी शिक्षण संस्थांचाच कब्जा आहे. काही नामांकित आणि प्रामाणिक संस्था सोडल्या तर तेथील शिक्षणाचा दर्जाही सुमारच असतो. यामध्ये बहुतेक संस्था या राजकीय किवा सत्ताधारी नेत्यांच्या खाजगी मालमत्तेसारख्या असतात.
अशा सगळ्या शैक्षणिक घोळांमधून शिक्षणातले १०वी, १२वीचे टप्पे पार पडत असतात. सरकारी पाहणी नुसार पहिल्या इयत्तेपासून शिक्षणाची सुरुवात करणा-या मुलांपैकी जेमतेम २० ते २५ टक्के मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतात. मधली गळती होते कशी? सरकारी शाळांत शिक्षकांचे वेतन, शाळा इमारती इतर अनुषंगीक खर्च आणि शिक्षण खात्याची यंत्रणा सरकारच पोसत असते. शिवाय शाळेत मुले यावीत आणि ती टिकावीत म्हणून त्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, पोषण आहार, मोफत दिला जातो. मुलींना सायकली आणि शैक्षणिक फी माफी सर्वांनाच. असे असूनही सरकारी शाळांतील गळती चालूच असते.
सरकारी शिक्षणाची ही त-हा तर दुसरीकडे मोठ्याच नव्हे तर, लहान शहरांतूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना विद्यार्थी संख्या इतकी वाढते की त्यांना प्रवेश बंद करावा लागतो. असे का? याची उत्तरे शिक्षणखात्याच्या भ्रष्टाचारामध्ये आणि शिक्षणखात्यातील एकूण अनागोंदीमध्ये सापडतील. सरकारचे शिक्षण खाते शिक्षण संस्थांना मदत किवा मार्गदर्शन करण्याऐवजी अडचणीत आणून भ्रष्टाचार करण्यातच मग्न असते. अशी अनेक उदाहरणे आहेत.
शिक्षणाचे नियोजन आणि निश्चित धोरण नसल्यामुळेच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते आहे. नुसत्या पुस्तकी शिक्षणामुळे श्रमाची कामे कोणी करु पहात नाही. जीवनाचा प्राधान्य क्रम पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असा होता. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा नेमका उलटा झालेला आहे. हे होण्यास कारणही शैक्षणिक धोरणच आहे.
आज अनेक प्रकारची प्रलोभने मुलांसमोर आहेत. विविध ज्ञानशाखांचे शेकडो अभ्यासक्रम देणा-या हजारो शिक्षण संस्था आहेत. त्याशिवाय पालक प्रशिक्षित असतील तर मुलांना संगणकाच्या आधारे आपले शिक्षण घरबसल्या घेता येईल अशी सोय नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे शिक्षणातील तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी संस्कार आणि व्यवहारी जगाची ओळख ही ज्याची त्यानेच करुन घ्यायची असते.
यावर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण झालेली मुले पुढील पारंपारीक किवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यासाठी वरच्या वर्गात प्रवेश घेतील. त्यांचे अभिनंदन करतांना यापुढील काळातील सर्वच आव्हानांना ती तोंड देण्यास समर्थ व्हावीत यासाठी त्यांना शुभेच्छाही आपण देऊया.

विशेष *
कॅलिफोर्नियाचे स्वप्न अधुरेच!
अलीकडेच कोकणच्या भौगोलिक परिस्थितीशी साम्य असणारे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य पाहण्याची संधी मिळाली. पर्यटन, फळप्रक्रिया उद्योग, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॅलिफोर्नियाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. या प्रगतीमागे शेतक-यांची मेहनत, कष्ट, राज्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन याही गोष्टी आहेत. कॅलिफोर्नियाप्रमाणेच भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या कोकणचा कायापालट घडविणे आपल्याच हातात आहे. तेथील चांगल्या गोष्टी उपलब्धतेनुसार आपल्याकडे अंमलात आणाव्यात यासाठीच हा लेखनप्रपंच.....
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतगायत कोकणचा कॅलिफोर्निया होणार! असे स्वप्न माझ्यासहीत कोकणी माणसांनी पाहिले आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून बरेच प्रयत्न झाले आहेत आणि आजही कोकणचे नेते, उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना यामध्ये यश येईल व यावे. योगायोगाने माझी मुलगी सुयश्री हिला वचन दिल्याप्रमाणे बायो मेडिकल इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरींग पदवी प्रदान कार्यक्रमाला अमेरिकेला येण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे मी आणि माझी पत्नी सौ.अनुराधा हिच्यासमवेत तेथे कार्यक्रमाला हजर राहिलो. या २५ दिवसांच्या काळात कॅलिफोर्निया राज्या-मधील काही महत्वाची ठिकाणे, युनिव्हर्सिटी पाहण्याची, तिथली संस्कृती, लोकजीवन जवळून अभ्यासण्याची संधी मी घेतली.
कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पन्नास राज्यातील आहेत तीन मोठया राज्यांपैकी एक. सॅक्रीमेंटो हे राजधानीचे शहर. या राज्यात ५३ जिल्हे आहेत. त्यापैकी २८ किनारपट्टीवर वसले आहेत. सुमारे १३५२ कि. मी. लांबीची किनारपट्टी या राज्याला लाभली आहे. इथले हवामान विषुववृत्तीय असून हिवाळयात थंडी व पाऊस असतो. उन्हाळयात वातावरणात दमटपणा असतो आणि पाऊस पडतो. भौगोलिक सारखेपणा असणारे कॅलिफोर्निया हे कोकणाप्रमाणे पर्यटन, मासेमारी आणि विविध प्रकारच्या फळांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या श्रीमंतीत कॅलिफोर्नियाचा मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
कॅलिफोर्नियाचे वेगळेपण- या राज्यातील नागरिक, राज्यकर्त्यांचे नियोजन, गतिमान प्रशासन यंत्रणा, उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर यामुळे राज्याने प्रगती साधली आहे. कॅलिफोर्नियाकडूनच अमेरिकेला सर्वात जास्त महसुल मिळतो. फलोत्पादन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केली जाणारी शेती हे इथले प्रमुख व्यवसाय आहेत. सॅन फ्रान्सिसको इथे सोन्याच्या खाणी आहेत. अमेरीकेत सर्वात जास्त फळे, फुले, भाजी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय याच प्रदेशात होतो. फळांवर प्रक्रिया करण्याचे आधुनिक पद्धतीचे उद्योगही इथे विकसित झाले आहेत.
शेतीमधील प्रगती-इथले शेतकरी सुशिक्षित, नवीन माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीत वापर करणारे आहेत. मी युनिव्हर्सिटी अॅाफ कॅलिफोर्निया,बर्कले येथे प्रो. लॅटियस कार्फ यांची भेट घेतली. इथल्या डिपार्टमेंटची पाहणी केली. ते या युनिव्हर्सिटीत कृषि व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तसेच इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटी अॅाफ केंब्रिजमध्ये गेस्ट लेक्चरर आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळाले आहेत. प्रो. कार्फ यांच्या मतानुसार चालू मार्केटच्या स्थितीनुसार शेतीपिके आणि फळांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. पिकांची निवड करताना अर्थशास्त्राचाही अभ्यास व्हायला हवा.
कॅलिफोर्नियातील सेंट्रल व्हॅली आणि नापा व्हॅली या भागात मोठया प्रमाणांवर फलोत्पादन होते. प्रामुख्याने द्राक्षे, अॅारिकोर्डस, बदाम, पेरु यांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षांपासून वाईन बनविली जाते. तसेच भाज्यांमध्ये गवार, वाटाणा, गाजर, फरसबी, भोपळा, कांदा, बटाटा ही पिके घेतली जातात. कॅलिफोर्नियामधून निर्यात होणार्‍-या शेतीमालाची आकडेवारी थक्क करणारी आहे. वेस्टर्न युनायटेड सेंटर अॅग्रीकल्चरर्स असोसिएशन व इंटरनेशनल ट्रेड डेव्हलपमेंट असोसिएशन मार्फत शेतकर्‍-यांचा माल निर्यात होतो.
एकटया कॅलिफोर्निया या राज्यातच देशातील ५० टक्के भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते (घेवडा वर्गीय भाजी, कांदा, गाजर, काकडी, डब्बू मिरची, टॅामेटो, अळंबी, लसूण फुलकोबी इ.) सेंद्रीय प्रकारच्या शेतीला प्राधान्य दिले जाते. सेंद्रीय खतांचा वापर करुन घेतलेली पिके अॅारगॅनिक या प्रकारात मोडतात. त्यांची किमत अमेरिकन बाजारात जास्त असते. शेतकर्‍-यांना जास्त फायदा मिळतो. रासायनिक खते वापरुन घेतलेल्या पिकांना इनअॅारगॅनिक म्हटले जाते आणि ती स्वस्त दरात विकली जातात. त्यामुळेच इथे अल्फोन्सो आंब्याऐवजी मेक्सिकन आंबा दिसतो. फुलशेतीतही कॅलिफोर्निया आघाडीवर आहे. जरबेरी,कार्नेशन्स,लिली, अॅारकिड, गुलाब यांचे उत्पादन घेतले जाते. एकूण अमेरिकेतील ७५ टक्के फुलांचे उत्पादन केलिफोर्नियात होते.
आपल्याकडे यातले काय होऊ शकते शेतीच्या बाबतीत भौगोलिक परिस्थिती जरी सारखी असली तरी आपण बर्‍-याच अंशी निसर्गावर अवलंबून आहोत. आंबा, काजू, नारळ, भात सारे काही निसर्गाच्या मेहरबानीवर अवलंबून आहे. फळ -पिकांसाठी मिळणार्‍-या अनुदानामुळे सिधुदुर्गात लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असली तरी पुरक योजनांच्या बाबतीत मात्र आपण खूपच मागे आहोत. एकूण ५, ४ हजार हे.पैकी ६५ हजार हे. क्षेत्र लागवडी खाली आहे. आजही २१ हजार हे.क्षेत्र पडीक आहे.
फळपिकांच्या बाबतीत १००टक्के अनुदान योजनेतून मोठया प्रमाणावर झालेली लागवड अलीकडच्या १०-१५ वर्षातील आहे. मात्र कृषी खात्याच्या इतर शेतीपूरक विस्तार योजना, आजही ७० टक्के लोकांपर्यत पोचल्या नाहीत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरांवर वाडी-वाडीमध्ये कृषी साहाय्यकां -मार्फत या योजना तळापर्यंत राबविल्या पाहिजेत. एकदम आधुनिक होऊनही आपल्याला चालणार नाही. मात्र संशोधन केंद्रांमध्ये होणार संशोधन, नवीन तंत्र क्षेत्र अगदी ग्रामीण शेतकर्‍-यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मोठया प्रमाणावर जाणीव जागृतीही झाली पाहिजे.
कॅलिफोर्नियातील पर्यटन - दरवर्षी साडे तीन कोटी लोक इथल्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. गोल्डन स्टेट ऑफ टुरीझम पॉवर असे कॅलिफोर्नियाला म्हटले जाते. ४,३५,००० कोटी एवढे उत्पन्न पर्यटकांकडून येते. नॅशनल पार्क,१० कि.मी. लांब गोल्डन गेट ब्रीज,डिस्नेलॅन्ड, नॉर्थ पार्क, सेंट फ्रान्सीस्को प्राणी संग्रहालय ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
प्रगत वाहतूक व्यवस्था - येथील रस्ते, सहा पदरी, आठ पदरी, ५० कि.मी.पर्यंत सलग, विनावळणाचे असे आहेत. कॅलिफोर्निया राज्यातच ५० विमानतळ असून २८ विमानतळ किनारपट्टी-लगतच्या जिल्हयात आहेत. २ इंटरनॅशनल विमानतळ आहेत. हवाई वाहतूक जास्त संख्येने उपलब्ध असल्याने विमान प्रवासही तुलनेने स्वस्त आहे. सामान्य पर्यटकही हा प्रवास करु शकतो. इथले सार्वजनिक रस्ते आणि रेल्वे वाहतुक ही उत्त्तम आहे. एड्ढूण वैमानिकांत ३० टक्के महिला वैमानिक आहेत.
अमेरिका श्रीमंत कशामुळे आहे ?
अमेरिका समृद्ध आहे, श्रीमंत आहे म्हणून हया सर्व चकाचक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसून निसर्गाने भरभरुन दिलेल्या साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करुन पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेऊन अमेरिकन सरकारने योग्य नियोजन करुन कॅलिफोर्नियाचा विकास साधला आहे. पर्यटन व्यवसाय बहरलेला असल्याने आदरातिथ्य इथल्या माणसांच्या रक्तातच भिनलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात घ्थ्ड्ढठ्ठद्मड्ढ ने होते. आणि शेवट च्र्ण्ठ्ठदत्त् न्र्दृद्व, ण्ठ्ठध्ड्ढ ठ्ठ दत्डड्ढ ड्डठ्ठन्र् ने होतो. एवढी यांच्या वागण्यात विनम्रता आहे. इथले पोलिसही नम्र आहेत. पण कोणतेही नियम मोडलात तर भागवा भागवी चालत नाही. कठोर दंडवसूली असल्याने असल्याने गाडी चालक आणि रस्त्याने चालणारे वाहतुकीचे नियम सहसा मोडत नाहीत. एकूणच या सर्व साधनसुविधांचा उपयोग करुन कॅलिफोर्निया हे एक प्रगत राज्य बनले आहे.
कोकणचा कॅलिफोर्निया होईल का ?
नैसर्गिक साधन सुविधांच्या बाबतीत कॅलिफोर्निया आणि कोकणच्या प्रदेशामध्ये निश्चितच साम्य आहे. कोकणला ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. कोणत्याही ऋतचा अतिरेक इथे होत नाही. परंतु पर्यटनदृष्टया प्रगत होण्यासाठी देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर सिधुदुर्ग जिह्यात तब्बल १४ वर्षानंतरही पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. एम.टी.डी. सी.सा.बां.विभागाच्या सहकार्याने पनवेल पासून गोव्यापर्यंत महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यत जाणारे दिशादर्शक फलक, पर्यटनस्थळे जोडणारे रस्ते, महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार आहे. पण या सर्व गोष्टी लालफितीत न अडकण्यासाठी सर्व खात्यांमध्ये समन्वय हवा आहे.
इथल्या तरुणांना आदरातिथ्यांचे प्रशिक्षण देणार्‍-या संस्था, सरकारी अधिकार्‍-यांची मानसिकता बदलण्याच्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे. प्रगती करीत असताना पर्यावरणाचे संतूलन राखणे हेही आवश्यक आहे. फळप्रक्रिया व कृषीसंबंधी शिक्षण, तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणापासून समावेश व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन केंद्रामधील तंत्रज्ञान शेतकर्‍-यांच्या बागेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे.
कॅलिफोर्नियाप्रमाणे सर्वच गोष्टी इथे अंमलात आणणे कठीण आहे. पण ज सर्वोत्तम आहे. ते स्विकारुन त्याची अंमलबजावणी केली तर सर्वानाच कोकणचा हेवा वाटेल. राज्यकर्ते, प्रशासनाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय, त्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणाची उपलब्धता या गोष्टी जबाबदारीने केल्या व लोकांनीही कष्ट करण्याची प्रवृत्ती, विनम्रता हे गुण घेतले तर कोकणचा व सिधुदुर्गचा कायापालट सहज शक्य आहे.
- प्रवीणभाई भोसले,
सावंतवाडी (माजी राज्यमंत्री)

सच्चा स्नेही
दि. १६ जून २०११ चा कै. विष्णुपंत नाईक जन्मशताब्दी विशेषांक सर्वांगसुंदर आहे. वाचतांना मन पन्नास वर्षे मागे धावले. आमचे वडील कै. ना. वि. सामंत (नाना) स्व. विष्णुपंतांचे समवयस्क. विष्णुपंतांचे पुष्कळ वेळा आमचे परुळे येथील घरी येणे जाणे असे. तसेच नानासुद्धा वैद्यक व्यवसायाबरोबरच परुळ्याच्या जडणघडणीत कार्यरत असल्याने ते वेंगुर्ले या तालुक्याचे गावी वरचेवर जात तेव्हा ते आवर्जून विष्णुपंतांच्या घरी जात. स्व. विष्णूपंत अनेकदा रात्रौ आमच्याकडे मुक्कामाला असायचे. रात्री उशीरापर्यंत त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा रंगत असत. मी आणि माझी बहीणही त्यांचे घरी जात असू. कै. सौ. माई आम्हाला अत्यंत आपुलकीने आणि अगत्यपूर्वक जेवायला ठेऊन घेत असत.
१९५७ मध्ये कै. स्व. अण्णासाहेब देसाई, डॉ. व्ही. बी. सामंत आणि त्यांचे अनेक सहकारी यांनी परुळे येथे ‘विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ‘ ही संस्था स्थापन करुन ‘विद्यामंदिर, परुळे‘ ही माध्यमिक शाळा सुरु केली. शाळा विनाअनुदान होती. देणग्या जमवून शिक्षकांचे पगार आणि इतर शैक्षणिक साहित्य यांचे खर्च भागविले जात होते. माझी पहिलीच तुकडी होती. शिक्षण खात्याच्या नियमांनुसार शिक्षकांचे पगार देणे परवडणारे नव्हते. ती. नानांनी विष्णुपंतांना आमचेकडे १०वीला मराठी शिकविण्याची विनंती केली. ती त्यांनी आनंदाने मान्य केली. १९६०-६१ मध्ये ते आम्हाला मराठी आणि संस्कृत शिकवीत. मानधन अल्पच होते. त्यांचा मुक्काम आमचे घरी असायचा. शनिवार, रविवारी वेंगुर्ल्याला जायचे. मराठीवर त्यांचे प्रभुत्व तर होतेच शिवाय संस्कृत, संतवाङमय, संगीत, देशभक्ती अशा विविध पैलूंचे दर्शन आम्हाला घडले. त्यांनी सुमारे आठ दिवस शिकविलेला ‘पतीत पावन नाव ऐकून आलो मी द्वारा। पतीत पावन न होसी म्हणुनी जातो माघारा‘ हा अभंग म्हणजे संत वाङमयाच्या अभ्यासाचा उत्कृष्ट नमुनाच होता. त्याच कालावधीत त्यांनी परुळे येथे प्रवचने, कीर्तनेही केली. ‘वंदे मातरम्‘च्या अनेक चाली ते उत्तम त-हेने म्हणत असत. परुळ्यांत कोणी महनीय व्यक्ती यायची असेल तर नाना त्यांना मुद्दाम बोलावून घेत. त्यांचे स्वागतगीत, मानपत्र वगैरे ते बसल्या बसल्या तयार करुन देत. तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंतांसाठी ‘स्वागत नरवीरा करुया‘ हे स्वागतगीत स्वतः लिहून मुलींकडून उत्तम बसवून घेतले होते.
स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत असूनही त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन नाकारले. राष्ट्रीय सणादिवशी ते मारुती मंदिराजवळील स्वतःच्या घरासमोर झेंडा वंदन करीत. प्रखर देशाभिमान आणि निस्वार्थी देशभक्तीचा तो जमाना होता. स्व. दे. भक्त आबासाहेब वालावलकर हे आमच्या नानांचेही गुरु होते. कदाचित त्यामुळेच कै. पंतांची आणि कै. नानांची मैत्री मनोमन जुळली असावी.
सेंट लुक्स हॉस्पीटलमध्ये कै. विष्णुपंतांची आठवड्यात अनेकवेळा फेरी होत असे. आमचे वडील तिथे विशेष उपचारांसाठी गरीब रुग्ण पाठवितांना विष्णुपंतांना पत्र देत असत आणि तेसुद्धा तत्परतेने सेंट लुक्समध्ये जाऊन डॉ. सीटन, डॉ. सर्विड वगैरेंकडून माफक खर्चात त्यांचेवर उपचार करुन घेत असत. डॉ. सीटन यांना ते मराठी शिकवत असत. डॉक्टर त्यांच्याकडे येणा-या ग्रामीण भागांतील रुग्णांचे मालवणी शब्द न समजल्याने इंग्लिशमध्ये लिहून ठेवत आणि पंतांना विचारुन अर्थ समजावून घेत असत.
१९७९ मध्ये माझे वडील आकस्मिक मेंदूतील रक्तस्रावाने आजारी झाले. उपचार चालू असतांच त्यांना बोलणे अशक्य होऊ लागले. तेव्हा मला जवळ बोलावून स्व. आबासाहेब वालावलकर आणि विष्णुपंतांना कळविण्यास सांगितले. मी तसे लगेच कळविले. विष्णुपंत आले पण तत्पूर्वी दहाच मिनिटं अगोदर आम्ही और्ध्वदेहिक आटोपून घरी आलो होतो. स्व. विष्णुपंतांना आपल्या स्नेह्याची अखेरची भेटही होऊन न शकल्याने अतीव दुःख झाले. ते आल्यापावली जड अंतःकरणाने मागे फिरले. स्मशानात जाऊन आपल्या प्रिय स्नेह्यास अखेरचा निरोप देऊन मार्गस्थ झाले.
कै. विष्णुपंतांच्या कुटुंबियांनी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटलला मोलाची आणि भरघोस देणगी देऊन त्यांची स्मृती अजरामर केली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपण सर्वांनीच त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत.
प्रिय स्व. विष्णुपंतांच्या स्मृतीस त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी सादर प्रणाम!
-डॉ. उमाकांत सामंत, परुळे, ९४२२४३६९३४.

विशेष बातम्या *
सेंट लुक्सच्या अतिदक्षता विभाग/सुतिकागृह/रुग्णवाहिकेचे उद्घाटन
वेंगुर्ले येथील जुन्या पीढीतील सामाजिक कार्यकर्ते, नगरवाचनालयाचे माजी कार्यवाह कै.विष्णुपंत नाईक यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पीटलला रुग्णसेवेसाठी नवीन आय. सी. यु. युनिट, सुतिकागृहाचे संपूर्ण नूतनीकरण आणि एक रुग्णवाहिका आपले आईवडील कै. विष्णुपंत आणि कै.सौ.लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे. त्यांचा नामफलक अनावरण समारंभ १७ जून २०११ रोजी विष्णुपंत नाईक यांचे सुपूत्र श्री.अनंत उर्फ काका आणि श्री.सगुण उर्फ आबा नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्पीटल ग्रुप मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन रेव्ह.बी.आर.तिवडे होते.
प्रारंभी हॉस्पीटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ.जे.एम.दास यांनी प्रास्ताविक व परिचय करुन दिला. अरुण मोरजकर यांनी स्वागत केले. नाईक कुटुंबियांच्यावतीने श्री. आबा नाईक यांनी कै. विष्णुपंतांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन हॉस्पीटलला दिलेल्या देणगीमागचा उद्देश स्पष्ट केला. या सेवेचा लाभ सर्व गोरगरीब रुग्णांना हॉस्पीटलने करुन द्यावा असे आवाहन केले. यावेळी ‘किरात‘ ने कै. विष्णुपंत नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विशेष अंकाचेही त्यांनी कौतुक केले. याच दिवशी आय.सी.यु.युनिटमध्ये हृदय रुग्णांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. डॉ.आरोसकर यांनी रुग्णतपासणी केली. सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक श्री.डी.के.तिवडे यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व नाईक कुटुंबीय, व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर, वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे, श्री.लालामामा सावंत, आनंदराव चिटणीस, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कर्पे, अरविद शिरोडकर, विलास दळवी, नाना परब, पत्रकार श्रीधर मराठे, गोहीन मेमोरीयल चर्चचे पास्टर रेव्ह.मकवान, सौ.दास, सेंट लुक्स स्टाफ, नर्सिग विद्यार्थिनी व नागरीक उपस्थित होते.

नगरपरिषदेची नवीन प्रभाग रचना
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकीत आता प्रत्येक वार्डासाठी नगरसेवक अशी निवडणुक होणार नाही तर तीन ते चार उमेदवारांचा एक वार्ड यानुसार १७ वॉर्डाचे ४ प्रभाग करण्यात आले आहेत.
प्रभाग १ मध्ये दाभोसवाडी, दोन्ही गावडेवाडी, गिरपवाडी ते गाडीअड्डा पश्चिमेकडील बाजू, गाडीअड्डा रस्त्याच्या पूर्व बाजूने कोकण किनारा हॉटेलच्या पुढे मांजरेकर कंपाऊंडपर्यंतचा भाग निश्चित केला आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये मेनरोड भटवाडी (वेशीपर्यत दोन्हीबाजूने) खांबडवाडी, कॅम्पचा काही भाग, वडखोल, खालचे किनळणे, म्हाडा, गवळीवाडा ते रामघाटरस्त्यापर्यंतचा भाग.
प्रभाग ३ मध्ये टी.डी.मयेकर ते भाळी मार्केट, रामेश्वर मंदिर ते पिराचा दर्ग्यापर्यंत वरची बाजू, कुबलवाडा, महाजनवाडी, वेंगुर्लेकरवाडी, साकववाडी, कासकर घरापासून लकी स्टोअर्स ते खारलड ऑफीसकडील व्हाळी ते साकवापर्यंत, सातेरी मंदिर देऊळवाडा, कॅम्प एम.एस.ई.बी ऑफिससमोरील भाग यांचा समावेश आहे.
प्रभाग ४ मध्ये बंदर लाईन, कलानगर, मांडवी, भुजनागवाडी, पिराचा दर्गा, पश्चिम भाग, सुंदर भाटले रस्त्याच्या पश्चिम बाजूने मानसीश्वरपूलापर्यंत, नवीन एसटी स्थानकापासून सुंदरभाटले बाहेरच्या रस्त्याने मशिदीपर्यंत तेथूनच रामेश्वर रस्त्याने कुंभवडे नगरवाचनालयापर्यंत, पाटीलवाडा, दक्षिण राऊळवाडा, आंबेखण ते भराडी मंदिर रस्त्याच्या बाजूने मांजरेकर घरापर्यंत, आनंदवाडी ते मराठे गिरण हद्दीपर्यंत एवढा भाग निश्चित केला आहे.
प्रभाग रचनेनुसार आता राजकीय गणितेही मांडली जात आहेत. पालिकेच्या नव्या रचनेतील प्रभाग १ मध्ये विद्यमान नगरसेवक मोहन गावडे, प्रसन्ना कुबल, नगरसेविका सौ. लक्ष्मी वेंगुर्लेकर, सौ. श्वेता हुले यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन सर्वसाधारण खुला, एक मागास प्रवर्ग महिला व एक सर्वसाधारण खुला महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये विद्यमान नगरसेवक विशाल सावळ, संजय तुळसकर, शैलेश गावडे, तुषार सापळे यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन महिला सर्वसाधारण खुला, एक नागरिकांचा मागासवर्ग, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.
प्रभाग ३ मध्ये विद्यमान नगरसेविका व माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, बाळू नार्वेकर, उमेश येरम, सौ. गीता अंधारी यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन महिला सर्वसाधारण खुला, एक नागरिकांचा मागासवर्ग, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.
प्रभाग ४ मध्ये विद्यमान नगराध्यक्ष संदेश निकम, सौ. सुमन निकम, उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, सौ.सुचिता कदम व सुहास गवंडळकर यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन नागरिकांचा मागास महिला, एक सर्वसाधारण खुला महिला, एक अनुसूचित जाती, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.

मुले नाहीत जिल्ह्यातील १७ शाळा बंद!
कुटुंब नियोजनाचे चांगले काम, त्यामुळे घटलेला जननदर, आणि काही प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा यामुळे सिधुदुर्ग जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळा यावर्षी बंद झाल्या आहेत. तर १७१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याने त्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तालुकानिहाय बंद शाळा व बंद होणा-या (कंसातील आकडा) शाळा पुढीलप्रमाणे -
सावंतवाडी - ३ (३७), दोडामार्ग ३ (६), वेंगुर्ले २ (९), कणकवली ६ (१८), देवगड ३ (२८), कुडाळ, मालवण, वैभववाडी, तालुक्यात शाळा बंद नाहीत. पण बंदच्या प्रतीक्षेत अनुक्रमे १८, २२ आणि २३ शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना शह देण्यासाठी पहिली पासून इंग्रजीचा प्रयोग सुरु आहे. त्यासाठी शिक्षकांचेही वर्ग झाले. पण दर्जाबाबत शिक्षक व खात्याचे अधिकारीच बेफिकीर राहिले. परिणामी पालकांनी मुले खाजगी शाळांत दाखल केली. त्या शाळांनी शिक्षणखात्याची मान्यताही मिळविलेली आहे.
शिक्षण खात्याचे अधिकारी शाळा, शिक्षक वरकमाईच्या मागे असतात. त्यामुळे खात्याच्या कामांकडे त्यांचे दुर्लक्षच असते. त्यामुळेच पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती पात्र मुलांना दोन वर्षात शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. तर मुलांना गणवेश द्यायचे ते शाळा सुरु होऊन महिना झाला तरी तयारच नाहीत. वह्या, पुस्तकांच्या पुरवठ्याबाबतही हीच त-हा आहे. दरम्याने शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांची विभागीय स्तरावर चौकशी झाल्यावर २२ शिक्षकांच्या फेरबदल्या झाल्या आहेत आणि जिल्हा परिषद प्रशासनाला शिस्त लावून बदल्यांप्रकरणी कणखर भुमिका घेणा-या जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी-पंडीत यांची वर्षभरातच बदली झाली आहे. त्यांच्या जागी अमित सैनी यांची तर जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांचीही दोन वर्षात बदली झाली असून त्यांच्या जागी विरद्र सिग यांची नियुक्ती झाली आहे.

No comments:

Post a Comment