Wednesday, 13 July, 2011

अंक २६वा, १४ जुलै २०११

अधोरेखित *
राजकारणाची बदलती शैली
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार सुमारे सात वर्षे एकमेकांना पाण्यात बघत चाललेले असतांना जिल्ह्या जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांचा सवता - सुभा उफाळून आला आहे. नजिकच्या काळात जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या असताना दोन्ही पक्षातले कार्यकर्ते अधिकच जोरदार आणि हिसक पातळीवर उतरु लागले आहेत. त्याचे एक प्रत्यंतर वेंगुर्ले आमसभेतही दिसून आले. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतर्फे सावंतवाडी मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार दीपकभाई केसरकर हे आता राणे समर्थक काँग्रेस पक्षाला खलनायक ठरले आहेत. तर राष्ट्रवादी पक्षही काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्र्यात उभा ठाकला आहे. दोन्ही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढविणार अशा घोषणा सुरु केल्या आहेत.
मंत्र्यांना आणण्याची शर्यत - या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये आणण्याची शर्यत गेल्या महिन्याभरात पहायला मिळाली. या मंत्र्यांनी भर पावसात विविध विकासकामांच्या आश्वासनांचाही पाऊसही पाडला.
सेनेला प्रेमाच्या विळखा - दुसरीकडे शिवसेना - भाजप युती रुसवेफुगवे करत का होईना अधिकाधिक घट्ट होऊ लागली आहे. त्यांना रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्षाचा प्रेमाचा विळखा पडला आहे. आगामी निवडणूक हे तिन्ही पक्ष महायुती करुन लढविणार आहेत.
मनसेची भूमिका - या युती आणि आघाडीच्या निवडणूक लढाईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका राहील किवा ते किती जागा जिकतील आणि युतीचे किती उमेदवार पाडतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
या सर्व निवडणुकपूर्व घडामोडींमध्ये राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊ लागले आहेत. याचे प्रत्यंतर त्या पक्षांच्या आपापसातील वादावादीमुळे दिसून येऊ लागले आहे. याची एक झलक वेंगुर्लेच्या आमसभेतही लोकांना पहायला मिळाली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलैला झालेल्या आमसभेत आमदारांच्या दिशेने चप्पल भिरकवण्यात आली. या प्रकरणी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष सचिन शेटये वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांनी आमदार केसरकर काँग्रेसलाच नाहक बदनाम करत आहेत. त्यांनी घटनेचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दिला आहे.
- राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिका-यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत लक्ष घालावे असे म्हटले आहे.
असे प्रकार वाढले तर जिल्ह्यात लोकशाही जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात यापूर्वी दोन राजकीय बळी गेले आहेत. काही जणांना बेपत्ता केले गेले आहेत. तिसरा बळी आपलाही जाऊ शकतो. यापूर्वी काँग्रेसच्या लोकांनी सावंतवाडीची आमसभा होऊच दिली नाही. यावरुन लोकांनी बोध घ्यावा अशा तीव्र शब्दात केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एकंदरीत जिल्ह्यातले बदलते राजकीय वातावरण पाहता सर्व सामान्य लोकांनाच यापुढे सक्रीय व्हावे लागेल. आपले मत कोणाला म्हणजे कोणत्या प्रवृत्तीला देतो? याचा विचार मतदारांना करावा लागणार आहे. लोकांच्या संवेदना खरोखरच तीव्र आहेत का? की त्या बोथट झाल्या आहेत याचे उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल.
- श्रीधर मराठे

संपादकीय *
शेवटी दैवावरच हवाला..!
गेल्या पंधरा-वीस दिवसात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्यातील अनेक मंत्र्यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावून आश्वासनांचा पाऊस पडला. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे हे महिन्यातून किमान दोनदा तरी जिल्ह्याचा दौरा करुन जातात. एकंदरीत भर पावसात यावेळी जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची रेलचेल होती. साहजिकच सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘मंत्रीग्रस्त‘ झाली होती. त्यात पुन्हा बदल्यांचे सत्र सुरु झालेले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विविध सरकारी कार्यालयात असणारी कामेही खोळंबली. शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना या मंत्र्यांच्या समवेत असणा-या गाड्यांच्या ताफ्यांकडे बघायलाही वेळ नव्हता. त्यामुळे मंत्र्यांना स्वतःच आपल्या खात्याशी संबंधीत ठिकाणांना भेटी देऊन बरोबरचे पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करुन दौरे सफल करावे लागले! विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या या दौ-यांवर टीका केलीच.
शरद पवार आंबोलीत आले ते उस संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी पण ते पुण्यातील ‘लवासा‘ सिटीप्रमाणे आंबोली परिसरातही ‘आंबोली सिटी‘ करण्याच्या हेतूने आले अशा बातम्या छापून आल्या. तर अनेक मंत्री हे केवळ पर्यटनासाठी या जिल्ह्यात येऊन गेल्याची टीका झाली. राष्ट्रवादीचा मंत्री आला की, एक- दोन दिवसात काँग्रेसचे मंत्री असा खेळ जवळपास दोन आठवडे चालला होता.
दरम्याने पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ल्यात बुद्धिवंतांचा मेळावा घेऊन येत्या निवडणुकीत नगरपालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती द्या. मग शहराचा आदर्श विकास कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ असे रोख ठोक आवाहन केले. यापूर्वीही सावंतवाडी आणि कणकवली येथे त्यांनी अशा बुद्धिवंतांच्या सभा घेऊन असेच आवाहन केले होते.
जिल्ह्यातील चार नगरपालिकांपैकी कणकवली आणि मालवण नगरपालिका या पूर्णतः काँग्रेस पक्षाच्याच बहुमताखाली आहेत. तर जिल्हा परिषदेवर गेली दहा वर्षे राणे समर्थकांचीच निर्विवाद सत्ता आहे. मग विकास खुंटला कुठे? विकास योजनांसाठी मंजूर असलेला निधी खर्च न होता परत का जातो? रस्त्यांची कामे होतात, निधी खर्च होतो तरीही रस्त्यांची दुर्दशा कां? सरकारी आरोग्य यंत्रणाच रुग्णाईत का? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. पण ते रोखठोक विचारु शकत नाहीत.
बारा महिने तेरा काळ राजकारणच करणा-यांना हे असले प्रश्न आपापल्या राजकीय पक्षाच्या सोयीनुसार पडत असतात. म्हणजे सध्याच्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीवर विरोधी पक्ष टीका करुन त्यांची उणी-दुणी काढणार तर सत्ताधारी त्यांना सत्तेच्या जोरावर दमबाजी करणार हे सगळे लोकांना वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असते. पण त्यामुळे विकास कामांचे गाडे काही हलत नाही.
मंत्र्यांच्या दौ-यामुळेही ते हलत नाही असाच आजवरचा अनुभव आहे. आपल्या वाडीत, गावात, रस्त्यांची, साकवांची, पाणी पुरवठ्याची, शाळेची, वीजेची कामे व्हावीत म्हणून संबंधीत लोक मोठ्या आशेने मंत्र्यांना निवेदने देत असतात. ती निवेदने मंत्रालयातील कच-याचा एक भाग होऊन जातात. सरकारी यंत्रणा समोर आलेली निवेदने, त्या सोबतची कागदपत्रे यांची दखलही घेत नाही. मग ती प्रकरणे न्यायालयात जातात. मग यांची पळापळ सुरु होते. हा सर्व खेळ कमी म्हणून की काय, राजकीय पक्षांमध्ये सध्या शिववडा, छत्रपती वडा आणि काँग्रेसचे कांदेपोहे असले बालीश खेळ सुरु झाले आहेत.
अण्णा हजारेंनी सातत्याने आंदोलने करुन माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना मिळवून दिला. पण त्यामुळे भ्रष्ट नोकरशाहांना चाप लागला का? अगदी ग्रामीण पातळीवरही भ्रष्ट आचार चालू आहे. गावोगावी असे अण्णा हजारे निर्माण झाल्याखेरीज असा चाप लागू शकणार नाही. सध्याच्या स्वार्थपारायण समाजजीवनात ते शक्य होईल काय? याकामी दुस-याने लढावे अशी अपेक्षा प्रत्येकजण करीत असतो.
अण्णा हजारेंचे जन लोकपाल आंदोलन झाले. केंद्र सरकारने गेल्या चाळीस वर्षापासून संसदेपुढे असलेला तो प्रस्ताव मान्य करुन सरकारी आणि अण्णा हजारे प्रणित गैर सरकारी समित्यांच्या चर्चांमध्ये सध्यातरी तो गुंडाळून टाकला आहे.
या सगळ्यामध्ये वाढत्या महागाईने ग्रासलेला, सरकारी नोकरांप्रमाणे निश्चित उत्पन्नाचे साधन नसलेला सर्वसामान्य असंघटीत माणूस काय करु शकणार आहे? याचे उत्तर कोणा बुद्धिवंतांपाशी नाही की, कोणा राजकारण्यांपाशीही नाही. त्यामुळे लोकही आता दैवावरच हवाला ठेवून राहणे पसंत करतील.

विशेष *
मधुमेहासाठी औषधीहीन चिकित्सा
मधुमेह या आजाराच्या नावात जरी गोडपणाचा उल्लेख असला तरी या विकारामुळे आजारी व्यक्तीला गोड पदार्थांकडे पाठ फिरवावी लागते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटल्यावर मन भितीने आणि शंकेने घाबरुन जाते. पूर्व सूचना न देता हा आजार होतो. कोणत्याही प्रकारची वेदना नाही, कुरुपता नाही, संसर्ग नाही, तरीसुद्धा हा आजार व्यक्तीला आजीवन त्रस्त करीत असतो. त्या व्यक्तीला जीवनभर आपल्या आहारावर अंकुश ठेवावा लागतो. त्याचा परिणाम पुढे अशाच प्रकारच्या जीर्ण आजाराच्या स्वरुपात सहन करीत जीवन जगावे लागते. सामाजिक समारंभ, मित्रमंडळींच्या बैठकी, इतर सहभोजनात सहकारी मित्रमंडळी ज्या भोजनाचा आस्वाद घेत असतात ते भोजन, मधुमेही व्यक्तींसाठी दुर्लभ होऊन जाते.
मधुमेह म्हणजे शरीराकडून शर्करा, स्टार्च, कार्बोहाइड्रेट सारख्या पदार्थांचे चयापचय योग्य प्रकारे न होणे. ‘इन्सुलीन‘ नावाच्या तत्वाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होते. ‘इन्सुलीन‘ एक प्रकारचे हार्मोन आहे. ज्याचे उत्पादन ‘पॅनक्रियाज्‘ नावाच्या ग्रंथीमध्ये होते. ही ग्रंथी पोटाच्या साधारण खाली आणि पाठीमागच्या बाजूला असते. नैसर्गिकरित्या पॅनक्रियाजद्वारे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होऊन आहाराच्या स्वरुपात घेतलेल्या स्टार्च आणि शर्करा यांचे नियमित स्वरुपात पचन होते. परंतु कुठेतरी गडबड होते आणि ‘पॅनक्रियाज्‘ च्या कार्यात अडथळा अथवा अनियमितता निर्माण होते. ‘पॅनक्रियाज्‘ या ग्रंथीने काम योग्य रितीने न केल्यामुळे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी रक्तामध्ये रक्तशर्करेचा अतिरिक्त संचय व्हायला लागतो. हे रक्त मुत्राशयामध्ये नियमित प्रक्रियेप्रमाणे विघटनासाठी (फिल्टरसाठी) गेले असता रक्तातील अतिरिक्त साखर विघटीत होते. रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्यासाठी शरीर ही साखर मुत्राशयावाटे लघवीद्वारे शरीराच्या बाहेर काढते. शरीर पोषणासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या साखरेचा अशाप्रकारे क्षय झाल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक कष्ट शरीरावर लक्षणांच्या रुपात दिसायला लागतात. असाधारण तहान लागणे, वारंवार लघवी होणे, योग्य प्रमाणात आहार घेतला तरी वजन कमी होणे, कधी कधी त्वचेवर खाज येणे आणि फोडांचा त्रास होणे वगैरे. रक्तशर्करेचे प्रमाण जास्त वाढल्यास ‘डायबेटिक कोमा‘ (मधुमेहजन्य बेशुद्धी) अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, मधुमेही व्यक्तीचे प्राण धोक्यात येऊ शकतात.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेषतः मध्यमवयीन, वजन जास्त असलेल्या महिला. आनुवंशिकतेने हा आजार होणा-या महिला ४० ते ४५ वयाच्या आसपास असतात. मधुमेह लहान वयातही होतो. पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे.
१९२१ साली डॉ.बेटींग आणि डॉ.बेस्टन यांनी ‘इन्सुलीनचा‘ शोध लावला आणि मधुमेही व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण डोकावला. इन्सुलीनचे इंजेक्शन घेऊन मधुमेह नियंत्रित केला जाऊ लागला. तरीही मधुमेह घालवून लावण्यासाठीचा हा उपचार नाही. मधुमेही ग्रस्त व्यक्तीला आजीवन इन्सुलीन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते.
अनेक चिकित्सेच्या शोधात आहारचिकित्सेचा अवलंब केला आहे. विद्वानांच्या मते सर्वसाधारण व्यक्तीच्या आहारामध्ये व्हिटॅमिन्सचा अभाव अधिक प्रमाणात असतोच. उदा. मशिनद्वारे दळलेले गव्हाचे पीठ अतिबारीक असते आणि या प्रक्रियेमध्ये शरीराला अत्यावश्यक असणा-या व्हिटॅमिन ‘बी‘ कॉम्प्लेक्सचा अभाव राहतो. म्हणून मधुमेही व्यक्तीने जाड कोंड्यासकट असलेले पीठ वापरले पाहिजे. आंबवलेल्या पिठामध्येही व्हिटॅमिन ‘बी‘ भरपूर प्रमाणात असते. हिरव्या ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये जीवनावश्यक खनिजे आणि क्षार जास्त प्रमाणात असतात. दैनंदिन खनिज क्षारांच्या पूर्ततेसाठी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खावयास हव्यात. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यामुळे पाचन संस्थेवर जास्त भार न पडता शरीराचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकते. मधुमेही व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा कमी उष्मांक असलेला पण खनिज क्षारांनी परिपूर्ण असलेला आहार घ्यावा लागतो. ताजी फळे, ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्या, कोशिबिर, कमी उष्मांक देतात आणि खनिज क्षारांची पूर्तता करतात. त्यासोबत तंतुमय पदार्थ मिळण्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
मधुमेही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग सहन करु शकत नाही. कुठे कापले किवा जखम झाली तर ती जखम लवकर बरी होत नाही. आपण अशी बरीच उदाहरणे पाहिली असतील की पायाला एखादी जखम झाली, बुरशीमुळे जंतूसंसर्ग झाला आणि परिणाम म्हणून पाय गमावण्याची वेळ आली. आपणांस जखमा वगैरे होतील या भीतीने मधुमेही व्यक्तीच्या कार्यात मर्यादा पडतात. त्यामुळे ते सक्रिय राहण्याचे टाळतात. अशी व्यक्ती बराचसा वेळ असाच बसून घालवते व त्यामुळे वजन वाढते व ही गोष्ट मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय घातक आहे.
व्यायामामुळे रक्तातील अतिरिक्त साखरेची पातळी कमी होते. मधुमेही व्यक्तींने नियमित व्यायाम करावा. त्यामुळे कार्बोहायड्रेट पदार्थांचे चयापचय चांगल्या रितीने होण्यास मदत होऊन व्यक्तीला लागणा-या इन्सुलीनची गरज कमी होऊ शकते. स्थूल असलेल्या मधुमेही व्यक्तीचे व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्या मधुमेही व्यक्ती निष्क्रिय राहतात त्यांच्या लघवीतही साखर आढळून येते. अशा व्यक्तींनी जर चालण्याचा व्यायाम नियमपूर्वक केल्यास लघवीतील सारखेचे प्रमाण आपोआप कमी होते. व्यायामामुळे पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलीनच्या उत्पादनासाठी मदत होते. श्वासाच्या व्यायामामुळे शरिराच्या कोट्यावधी पेशींची ऑक्सिजनची गरज पूर्ण होते. मोकळ्या आणि प्रदूषणमुक्त वातावरणात केलेल्या व्यायामामुळे मधुमेही व्यक्तीला नक्कीच स्वास्थ्य उंचावल्याचा अनुभव येईल.

सर्कारी नोकरी
सध्याच्या काळात शिक्षण असूनही ‘नोकरी‘ मिळविण्यासाठी जे काही ‘मार्ग‘ अनुसरावे लागतात ते ऐकता, सुमारे ४० वर्षापूर्वी आम्हाला विनासायास नोकरी मिळाली होती हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. एकतर आम्ही महाराष्ट्र सरकारचे ‘स्टायपेंडरी स्टूडंट‘ म्हणून पशुवैद्यकीय शिकत होतो त्यामुळे पदवीनंतर सरकारी नोकरीची शाश्वती होती. मुलाखत वगैरे सोपस्कार होत असत, पण ‘नेमणुकीचे आदेशपत्र‘ ब-याच वेळा मुलाखत संपताच हातात देत असत. कोकणात नोकरीसाठी बाहेरचे उमेदवार उत्सुक नसत आणि त्यामुळे रत्नागिरी (जुन्या) जिल्ह्यात नोकरी मिळण्यास अडचण नव्हती. मलाही मुलाखतीच्या वेळीच राजापूर या तालुक्याच्या गावी ‘पोस्टींग‘ देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने त्या आनंदात मी ‘स्वगृही‘ परतलो. नेमणुकीचे आदेशपत्र पोस्टाने येईल अशी वाट पहात होतो. मुलाखतीनंतर ८-१० दिवसांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दापोली तालुक्यात दौ-यावर आले होते. त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी माझ्या नेमणुकीबाबत चौकशी केली, त्यावेळी ‘अपॉईटमेंट लेटर‘ दौ-याचे ठिकाणीच मला ‘इश्यू‘ करण्यात आले व त्या आधारे मी नोकरीचे ठिकाणी रुजू झालो. नेमणूक आदेशपत्राची कार्यालयीन प्रत राजापूर येथे पोहोच झालेली होती. मुलाखतीच्या दिवशीच मला नेमणूक मिळाली असती. तथापि माझ्या अज्ञानामुळे मी ८ दिवस नोकरीवर उशिराने हजर झालो.
पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधारक झालो होतो तरीही ‘सर्कारी‘ कामकाजाची मला अजिबात माहिती नव्हती. हजर झाल्यावर जॉईनिग रिपोर्ट घ्यावयाचा असतो हे माहितच नव्हते! हा रिपोर्ट ‘मसुद्याबरहुकूम‘ दवाखान्याच्या असिस्टंटनी लिहून दिला कारण मी लिहिलेला ‘रिपोर्ट‘ फॉर्मेटमध्ये नव्हता. सारांश नोकरीच्या पहिले दिवशीच ‘सर्कारी काम विशिष्ट चाकोरीतूनच करायचे असते - करावे लागते‘. हा महत्त्वाचा धडा मिळाला.
पुढे यथावकाश सरकारी कामकाजाची पद्धत कळली पण समजली नाही. अंगळवणी तर शेवटपर्यंत पडली नाही. सुरुवातीला दवाखान्यात काम करतांना एक ‘अनुभव‘ नमूद केल्यावाचून रहावत नाही. गुरांना रोगप्रतिबंधक लसीकरणाचे काम करतांना एका गावी, पडवीतच (गुरांच्या शेजारी) एक म्हातारी झोपलेली आढळली. त्यांच्याकडील एका गायीवर मी पूर्वी उपचार केले होते. ही म्हातारी सांधेदुखीने बेजार त्रस्त झाली होती. म्हातारीने सांधेदुखीवर माझ्याकडे औषधाची मागणी केली. मी ‘गुरांचा डॉक्टर‘ असल्याने माणसावर उपचार करु शकत नाही असे सांगताच ती म्हणाली, ‘अरे बाबा, ती मोन जात, काहीबी बोलत नाही, सांगत नाही, तरी पण तूं परीक्षा करुन उपचार करतोस, माझे सांधे धरलेत, चालतांना दम लागतोय असे सांगूनही तुला माझ्या रोगाची परीक्षा कां होत नाही? मागं आमची गाय उठत नव्हती तेव्हा तूं ज्या दवा - गोळ्या दिल्या होत्यास त्याच मला दे. आमची गाय बरी झाली होती तशीच मी बी बरी होईन! देव तुझं भलं करो!‘
बहुतेक या म्हातारीच्या आशीवार्दानेच माझी सरकारी नोकरी सुरळीतपणे पार पडली. माझ्या पेशंटकडून मला कधीही त्रास झाला नाही. मात्र सरकारी कामकाजातील नियम, नोकरीतील वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांचेकडून खूपच अनपेक्षित अनुभव आले. काही गोड, काही कटू! काही अविस्मरणीय तर काही ‘दिसतं तसं नसतं‘ प्रत्यय देणारे!!!
-मधुकर घारपुरे

लोकपाल विधेयक
भ्रष्टाचार हा आपल्या देशाला कॅन्सरसारखा पोखरतो आहे. भारत हा आशियात भ्रष्टाचारी देशातून १६ व्या तर जगात ८७ नंबरवर आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून देशाच्या अर्थव्यवस्थेला काळ्या पैशाने मोठे संकट निर्माण केले आहे. ७० लाख कोटी रुपये परदेशी बँकांमध्ये काळ्या पैशाच्या स्वरुपात आहेत. हे देशाने घेतलेल्या परदेशी कर्जाच्या १३ पटीने आहे. हे पैसे भारतात परत आले तर देशातील ४५ कोटी गरीब लोकांना प्रत्येकी रु. १ लाख मिळू शकतात.
भ्रष्टाचार अनेक मार्गाने निर्माण होत आहे. सरकारी निविदा मंजूर करणे, बनावट औषधांची निर्मिती व विक्री, अनेक मार्गानी कर चुकविणे, सरकारी मालमत्तेचे/साधनांचे स्वतःच्या मर्जीने वाटप करणे, सरकारी कार्यालये, न्यायालये, पोलीस, लष्करी दले, प्रसारमाध्यमे यातील भ्रष्टाचार, सहकारी, धार्मिक संस्थांच्या पैशाचा अपहार अशा अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भ्रष्टाचारातील अलिकडील काही ठळक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. २क्र स्पेट्रममधील ए राजाचा रु.१,७६,००० कोटीचा घोटाळा, कॉमन वेल्थ गेममधील सुरेश कलमाडींचा रु.७०,००० कोटींचा घोटाळा, स्टॅम पेपरातील तेलगीचा रु. २०,००० कोटीचा घोटाळा, सत्यम कॉम्प्युटरचा रु. १४,००० कोटीचा घोटाळा, लालूप्रसाद यादवांचा रु. ९०० कोटींचा चारा घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका चालूच आहे. आणि हे घोटाळे रोखण्यासाठी व दोषींना कडक शासन करण्यासाठी देशातील प्रचलित कायदे आणि यंत्रणा सक्षम नाही. प्रभावी नाही हे वेळोवेळी उघड झालेले आहे. या सर्व यंत्रणा सरकारी अधिपत्याखाली असल्यामुळे निःपक्षपातीने आपले कर्तव्य पार पाडू शकत नाहीत.
सामान्य माणसाला आता जीवन जगणे मुश्किल झालेले आहे. हे आपण कुठवर सहन करायचं? गेली ४२ वर्षे लोकपाल विधेयक लोकसभेत सादर केल्याचे नाटक केले जाते व नंतर ते सभागृहातून नाकारले जाते. सरकार या विधेयकाबद्दल गांभिर्याने पाहत नाही. अशा वेळी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जनताच भ्रष्ट्राचाराच्या विरुद्ध उभी राहून लोकपाल कायदा करण्यासाठी सरकारशी संघर्ष करते आहे.
नागरी समितीला अपेक्षित असणारे जन लोकपाल बिलातील काही ठळक मुद्दे-
- जन लोकपाल यंत्रणेला केंद्रात लोकपाल तर राज्यपातळीवर लोकायुक्त म्हणून संबोधले जावे.
- सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयुक्त याप्रमाणे लोकपालांना स्वायत्तता मिळावी.
- भ्रष्टाचारी प्रकरणे १ वर्षाच्या आत निकालात काढावी.
- भ्रष्टाचारामुळे झालेल्या राष्ट्रीय नुकसानीची भरपाई त्या दोषी व्यक्तीकडून करावी व ती रक्कम देशाच्या महसूलात जमा करावी.
- लोकपाल दोषी अधिका-याला दंड देऊ शकतो व ती दंडाची रक्कम भरपाई म्हणून तक्रार कर्त्याला देऊ शकतो.
- कोणताही अधिकारी, न्यायाधीश, राजकारणी यांची चौकशी करुन त्यांना शिक्षा करण्याचे अधिकार लोकपालांना असावेत.
- भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणा-या कार्यकर्त्यांना लोकपालाकडून संरक्षण मिळावे.
आतापर्यंत सरकारच्या प्रतिनिधी व नगरी समितीच्या ७ सभा झाल्या. या सभांमध्ये सरकारकडून तसेच नागरी समितीकडून आपापले मसुदे सादर केले गेले. परंतु अजूनही काही मुद्यांवर एकमत झालेले नाही. सरकारने ८० ते ८५ टक्के तरतुदीवर एकमत असल्याचे जाहीर केलेले आहे. तर नागरी समितीने महत्वाच्या मुद्यावर मतभेद कायम असल्याचा दावा केला आहे. एकमत न होवू शकलेले काही मुद्दे-
सरकारने सुचित केलेले मुद्दे-
- लोकपाल हे स्वतः भ्रष्टाचारावर चौकशी करु शकत नाही.
- सर्वसामान्य नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवर लोकपाल कारवाई करु शकत नाहीत.
- थ्लोकसभेचे सभापती व राज्यसभेच्या अध्यक्षाकडून खासदारांवर आलेल्या तक्रारींवर लोकपाल कारवाई करील.
- लोकपाल हे एक सल्लागार मंडळ आहे. ते भ्रष्टाचाराच्या बाबींवर आपला अहवाल संबंधित खात्याला देईल.
- लोकपालांना पोलिसी अधिकार असू नयेत.
- सी.बी.आय.शी लोकपालाचा संबंध नसावा.
- दोषींना कमीत कमी ६ महिने तर जास्तीत जास्त ७ वर्षे शिक्षा असावी.
- लोकपाल हे सरकारी अधिकारी आणि नोकरशहा यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु शकत नाहीत.
- लोकपाल देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधातील प्रकरणाची चौकशी करु शकत नाही.
- थ्लोकपाल मंडळ हे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायमूर्तींचे असावे.
नागरी समितीची मुद्दे-
- लोकपानांना तो अधिकार असावा.
- लोकपालाना तसा अधिकार असावा.
- भारतीय नागरिकाकडून आलेल्या तक्रारींवर खासदाराची लोकपाल चौकशी करु शकतो.
- लोकपाल हे केवळ सल्लागार मंडळ नसून दोषी असलेल्यांना शिक्षा करण्याचे अधिकार त्यांना असावेत.
- पोलिसी अधिकार असावेत.
- सी.बी.आय.ची अँटी करप्शन विग लोकपालमध्ये विलीन करावी.
- दोषींना कमीत कमी ५ वर्षे तर जास्तीत जास्त आयुष्यभर कैद असावी.
- लोकपालाला सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची चौकशी करता यावी. त्यात राजकारणी, नोकरशहा तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाशिधाचीही.
- लोकपाल सदस्याची निवड सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, निस्पृह निवृत्त अधिकारी, स्वच्छ चारित्र्याचे राजकीय नेते यांतून व्हावी.
लोकपाल मंडळाला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जन लोकपाल विधेयक प्रभावी असावे. म्हणून आपण सर्वजण प्रथम लोकपाल विधेयक जाणून घेवू व त्याचा प्रसार करु. तसेच नागरी समितीच्या व मा. अण्णा हजारे यांच्या उपक्रमांना सक्रीय पाठिबा देवू या. देशाचे भवितव्य त्यांच्या हाताता आहे त्या तरुण पिढीला जागे करुया. आणि देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ या.
एस. एस. (बापू गिरप),
गोरेगाव, मुंबई , मो. ९९२०९५५१७५.

आकेरीत भरते भानसाची जत्रा
जत्रा हा शब्द जरी उच्चारला तरी लगेचच समोर दिसू लागतात ती खेळण्याची दुकाने, अगरबत्ती, केळी, नारळ, हार अन् त्यासोबत चणेफुटाणे, खडीसाखर, खाजा, चहा-भजीचे स्टॉल, याचबरोबर मध्यरात्री नमनास सुरुवात होऊन पाहाटे सूर्योदया अगोदर संपणारी दशावतार नाट्यमंडळांची पौराणिक, काल्पनिक नाटके चर्चेत असतात. मात्र, अशा जत्रेहून वेगळीच खास निसर्गाबरोबर संवाद साधणारी आकेरी येथील भावई देवी मंदिर परिसरात ऐन पावसाळ्यात भरणारी जत्रा वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवी. विशेष म्हणजे या जत्रेत हॉटेल्स, खेळण्याची दुकाने इतकेच काय देवपूजेच्या साहित्याची केळी-नारळाची दुकानेसुद्धा दिसणार नाहीत. ही जत्रा दिवसा ऐन दुपारच्या वेळेस पार पडते. आकेरी गावात या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साज-या होणा-या जत्रेस आकेरीवासीय करमळच्या खोल्याची (पानांची) जत्रा तथा भानसाची जत्रा म्हणून संबोधतात.
खडकाळ प्रदेशात १० ते १२ मी. उंचीपर्यंत वाढणारी करमळाची झाडे येथून फर्लागभर अंतरावर असलेल्या सिद्धमहापुरूष डोंगरीत मोठ्या प्रमाणात पूर्वी आढळायची. ही पाने साधारणतः २ फूट लांब व फूटभर रुंदीची असतात. पूर्वी घनदाट स्वरूपात आढणारी ही झाडे आता खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात. अवैध वृक्षतोडीमुळे त्याचं अस्तित्व जवळपास संपून गेलं आहे. ब-याच वर्षापूर्वी काहीजण केळीच्या पानाऐवजी करमळच्या झाडाची पाने ब्राह्मण भोजन, गणेशचतुर्थी,महालय श्राद्धसारख्या कार्याना बहुसंख्येने उपस्थित असणा-या आत्पस्वकीय नातेवाईकांना जेवणासाठी वापरली जायची. आता आधुनिक युगात बाजारात प्लास्टिक पत्रावळ अगदी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने रानावनात फिरून करमळाची पाने जमा करायचा जमाना जाऊन काळाच्या ओघात या पानांचा वापर मागे पडला. मात्र, आजही सिद्धाच्या डोंगरीच्या कुशीत वास्तव्यास असलेले लोक विशेषतः कशेलवाडीतील रहिवाशी शुभकार्यादिनी ही करमळाची पाने जेवणासाठी वापरतात.
करमळाच्या खोल्यांची (पानांची) जी भानसाची जत्रा म्हणूनही ओळखण्यात येते, ते पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्रात साज-या केल्या जाणा-या जत्रेसाठी आकेरी रामेश्वर पंचायतनातील श्री भावई देवीसाठी भातशेती जमिनीचे ठिकाण असून ते मंदिराचे पुजारी घाडी कसवून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून या जत्रेचा खर्च भागवला जातो. बारा-पाचाच्या देवस्कीत ३६० खेड्यांचे देवपण हा जो प्रकार आहे. त्यात ही जत्रा मोडते. रामेश्वर देवस्थान संबंधित जी गाव रचनेतील झाराप, आकेरी, नेमळे या तीन गाव मर्यादेतील १४ स्थळे येतात. त्यांचाही समावेश यात केला जातो.
जत्रेदिवशी न वापरलेल्या नव्या मातीच्या मोठ्या मडक्यात तांदूळ घालून त्याचे तोंड केळीचे पान बांधून बंद करून घाडीवाडीतील घाडी मानक-यांच्या कुळाच्या देवळाकडून घाडी समाजातील एखाद्याच्या डोकीवर देऊन वाजतगाजत बाराच्या पूर्वसाच्या मंदिरात आणून उतरले जाते. तेथून गा-हाणे करून तांदूळ व नारळाचा समावेश असलेले १२ शिधे मांडले जातात. यातील ६ शिधे २ शेर तांदूळ व नारळ तर उर्वरित १ शेर तांदूळ, नारळ अशा स्वरूपाचे असतात. संबंधितांकडून गा-हाणे करून प्रत्येक मानक-याच्या मानाप्रमाणे शिधे दिले जातात. या शिध्याची गुळ, खोबरे, दूध घालून खिर करून शिधा मिळालेल्या प्रत्येकाने आपापल्या देवतेस दुपारी नैवेद्य दाखवायचा असतो. मंदिरात तांब्याच्या पातेल्यात तांदूळ शिजवून भात तळवावर ठेवला जातो. तसेच पुन्हा भात शिजवून पातेले तसेच ठेवले जाते. मातीच्या मडक्यातही मडके भरून भात शिजवला जातो. हे ताजे मडके असल्याने त्यात तांदूळ शिजवणे जोखमीचे असते. ते फुटू नये यासाठी तांदूळ न धुता व आत तांदूळ शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी बाहेर न टाकता तो तसाच शिजवण्याची पूर्वापार पद्धत आहे. रितीरिवाजानुसार कुड्याच्या पानांवर परळ मांडले जातात. जत्रेसाठी लागणारे बांबूपासून तयार केलेले दादरे (फुलांच्या परडीच्या आकाराचे) त्यात करमळीची पाने घालून तळवावरचा भात भरून अवसारास हाक दिली जाते. अवसार हे दोन्ही दादरे हातात घेऊन पश्चिमेस असलेल्या विराच्या चाळ्याकडे नेऊन ठेवतो. तेथे १४ स्थळांचे १४ नारळ फोडले जातात. संबंधित मानकरी फोडलेल्या नारळाचे खोबरे व नैवेद्याचा भात घेतो. यानंतर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या छोट्या-मोठ्या दगडवजा पाषाणाकडे करमळाच्या खोल्यावर १४ वाड्या करून गा-हाणे करून तो प्रसाद स्थळाच्या मानक-यास दिला जातो. भाताने भरलेले मातीचे मडके वाजतगाजत बाराचा पूर्वस मंदिरात आणून त्यातील भात करमळाच्या खोल्यांवर (पानांवर) नैवेद्य स्वरूपात ठेवून गा-हाणे केले जाते. यावेळी भगत मानक-यास जेवणकर म्हणून गंधाक्षता (आकीत) लावल्या जातात. हा नैवेद्य परब मानकरी नेतात. उपस्थित सर्व मानक-यांस करमळाच्या पानावर भात व नारळाचे खोबरे (शिरवणी) प्रसाद वाटून हे मडके उर्वरित भातासह हरिजन बांधव घरी नेऊन प्रसाद म्हणून मडकीतला भात देतात. या दिवशी घाडी कुळातील सवत पाथर या देवतेसह नैवेद्य दाखवण्यात येतो.
भावई मंदिरातील तळवावरचा कोरडा भात प्रसाद म्हणून सर्वांना अर्पण करून तांब्याचे भात भरलेले मडके (भानास) घाडी मानकरी डोकीवरून जेथून या जत्रेची सुरुवात झाली त्या घाडीवाडीतील कुळाच्या देवळीकडे वाजत नेऊन तेथे घोगळे कुटुंबियापैकी एका व्यक्त्तीस जेवण वाढून गंधाक्षता लावून येथे जमलेल्या सर्वांना भात खोबरे वाटले जाते. मडक्यात शिजलेला हा भात व खोबरे खाण्यासाठी दरवर्षी बहुतेकजण येथे आवर्जुन उपस्थिती दर्शवितात. जोपर्यंत ही जत्रा होत नाही, तोपर्यंत करमळाच्या जत्रेअगोदर ही पाने वापरायची झाल्यास ती उलटी वापरायची असा प्रघात या गावात आहे.
मनोज परब, आकेरी

संस्कार
तीन-चार दिवस दुकान बंद असल्याने त्याची भेट झाली नाही. भेटला तेव्हा विचारलं, ‘‘का रे, दुकान बदं का? चार दिवस कुठे होतास?‘‘
‘‘सर, हे मे महिन्याचे दिवस. त्यातही हा शेवटचा आठवडा. बाबांनी हातात घेतलेलं विहीर खणायचं काम पाऊस सुरु होण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवं. त्यांची ओढाताण मी पाहिली आणि चार दिवस दुकान बंद ठेवून त्यांच्या मदतीला गेलो.‘‘ त्याचा चेहरा थकलेला जाणवत होता पण त्यामागे समाधानाचा अंश जाणवत होता, त्याचवेळी त्याच कौतुक करावं असं वाटलं. पण मला ते बर वाटल नाही. मी त्याच्या कौतुकाचा विचार मनातच ठेवला. मात्र त्याचा तो गुण मनात ठसला तो कायमचाच.
व्यवसायाने तो शिपी. टेलर. दुकान आमच्या शाळेच्या समोरच. छोटासा पत्र्याचा गाळा. तिथे सतत हिदी, मराठी गाणी लागलेली. लेडीज टेलर असल्यामुळे मुलींची वर्दळ फार. त्याचं व्यक्तिमत्वही शंभरजणात सहज उठून दिसणारं. हसतमुख. दुकानाच्या समोर साधारण फुटभर लांबीच्या चपला दिसल्या की ओळखावं तो दुकानात आहे. तो एक तर कामात असतो किवा मोबाईलवर बोलत असतो. मात्र दुकानासमोरुन कोणीही आलं वा गेलं की न चुकता त्याच्या चेह-यावर हसूच असणार. उंची आणि चेह-यावरील हास्य ही त्याची दोन वैशिष्ट्येच. घरात संगीताची जाण असणारं कुणी नाही. तरीही आमच्या युसुफला गाण्याची ओढ. त्यातही भक्तीगीतांकडे कल जास्तच. गावातील जिल्ह्यातील विविध संगीत स्पर्धा कार्यक्रमातून त्याने आपला ठसा उमटविला आहे. त्याला स्वरांची जाण आहे. आता तो विविध संगीतगुरुंकडे धडे घेतो आहे.
या सामान्य वाटणा-या माझ्या माजी विद्यार्थ्याची मी एवढी मोठी ओळख का करुन देत आहे असा काहीसा प्रश्न वाचकांस पडला असेल. मानवाकडून अपेक्षित असणा-या सद्गुणात प्रामाणिकपणाला बरेच वरचे स्थान आहे. याचाच प्रत्यय मला त्याच्याकडून आला. ती छोटीसी घटना त्याच्यावरील संस्काराचे दर्शन देऊन गेली.
मी एक रेडिमेड पँट खरेदी केली. त्या पँटची उंची कमी करण्यासाठी ती त्याच्याकडे सोपविली. सोबत माप घेण्यासाठी माझी एक जुनी पँटही दिली. लग्नसराई असल्याने त्याने माझे काम थोडेसे मागेच ठेवले. कपडे देऊन साधारण पंधरा-वीस दिवस झाले असतील. एकदा दुपारी तो अचानक माझ्या घरी आला. आला तो, इकडच्या - तिकडच्या गोष्टी झाल्या. अन् जायला निघाला तेव्हा म्हणाला, ‘‘सर, तुम्ही माझ्याकडे दोन पँटस् दिल्या होत्या. त्यातील जुन्या पँटच्या खिशात काही पैसे होते. दोन-तीन दिवस मी तुमची वाट पहात होतो पण तुम्ही बाहेरगावी गेल्याचे समजले. आज मी आरवलीला एका लग्नाला गेलो होतो. घरी परतताना म्हटलं तुम्ही आहात की नाही ते पहावं आणि तुमचे पैसे द्यावेत.‘‘
‘‘सर, मी ते पैसे मोजलेही नाहीत. तुमची किती रक्कम होती ती तुम्ही पाहून घ्या.‘‘ त्या आठ-दहा दिवसात मला एकोणीसशे रुपयांचा हिशोब लागत नव्हता. मी पैसे मोजले. ते बरोबर एकोणीसशे होते. रक्कम फार मोठीही नाही आणि म्हटलं तर तशी छोटीही नाही. पण तिचा मोह कोणालाही पडला असता आणि हा साधा, सरळ मनाचा युसुफ मला ते पैसे परत द्यायला आला होता. मी त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांना केलेल्या मदतीचे कौतुक केले. यावेळच्या प्रामाणिकपणाबद्दल फक्त पाठीवर हात ठेवला. तो भरुन पावला. मी शाबासकी दिली ती त्याला नाही तर त्याच्यावर झालेल्या संस्कारांना आणि मनोमन नतमस्तक झालो तो त्या संस्कार करणा-यांपुढे.
- प्रा. पी. एस. कौलापुरे, शिरोडा, ९७६७२९५८२९

विशेष बातम्या *
आमदार केसरकरांच्या दिशेने चप्पल फेक
वेंगुर्ले आमसभेतील घटना
वेंगुर्ले पंचायत समितीच्या आमसभेत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शेटये यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याने प्रचंड खळबळ उडाली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन शेटयेला अटक केली. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. सायंकाळी न्यायालयाने सचिन शेटये यांची जामिनावर मुक्तता केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला असून तहसिलदारांच्या समक्ष चप्पल फेकली जात असतांना पोलिस फिर्याद मागत असल्याबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना घडत राहिल्यास जिल्ह्याचा बिहार होईल. या राजकीय दहशतीबाबत आपण आपण शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने मात्र पोलिसांकडे तक्रार नसतांना नाहक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल पोलिसांनी निषेध व्यक्त केला

No comments:

Post a Comment