Saturday, 21 May, 2011

१ मे २०११, उद्योग विशेष- भाग १

किरातचा हा उद्योग भरारी विशेष अंक. मूळचे कोकणातील असलेल्या अनेकांनी आपल्या गावापासून दूरच्या जिल्ह्यात, दूरच्या ठिकाणी जाऊन तिथे स्वकर्तृत्वाने छोटे-मोठे व्यवसाय करीत स्वतःचे उद्योग विश्व उभारले. तिथल्या लोकांना रोजगार दिला आणि आपल्या गावाकडील तरुणांनाही आपल्यासोबत नेऊन त्यांनाही चांगला रोजगार उपलब्ध करुन दिला. कोकणातील लोक आळशी. त्यांना परजिल्ह्यात, परप्रांतात नोकरी व्यवसायासाठी जायला नको असा एक आरोप कोकणातील लोकांवर नेहमीच केला जातो. काही प्रमाणात तो खराही आहे. पण कोकणी लोकांची मानसिकताही तशी का बनली याचा विचारच कोणी करीत नाही.

कोकणातील निसर्गरम्य हिरवाई, सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ, प्रदूषणमुक्त हवा. इतर जिल्ह्यांच्या, प्रांतांच्या तुलनेत नैसर्गिक संकटे फारशी नाहीत. ना तीव्र दुष्काळ, ना प्रलयंकारी महापूर, ना उष्म्याची लाट, ना हाडे गोठविणारी थंडी अशा प्रदेशात कायम वास्तव्य करावे, मिळेल त्यात समाधान मानून रहावे असे कोणाला वाटणार नाही? कोकणात कधी भूकबळी पडल्याचे ऐकिवात नाही. भातशेती तुटपुंजी असली तरी अशा शेतक-याला अन्य उत्पन्नाची साधने असतात. अगदीच काही नाही मिळाले तर माडावरील शहाळे तहान-भूक भागवू शकते. पण या सर्वांतून अर्थार्जन मात्र फारसे होत नाही. कुटुंबातील वारसदार सदस्यांची संख्या वाढली की मिळणा-या उत्पन्नातही वाटेकरी वाढतात. चार माणसांचे कुटुंबही उदरनिर्वाह करु शकत नाही. मग चांगले अर्थार्जन करण्यासाठी घर-गाव सोडावे लागते. कोकणातून अशी असंख्य माणसे आपले घरदार सोडून अन्य जिल्ह्यात, अन्य प्रांतात नशीब आजमाविण्यासाठी गेली. वाटेल ते कष्ट करायची तयारी, धाडस, जिद्द आणि चिकाटी, समजुतीने सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती या गुणसम्मुचयाने तेथे स्थायीक झाली, उद्योग-व्यवसायात यशस्वी झाली. इतरांना प्रेरणादायी ठरली. अशा काही निवडक व्यक्तींचा परिचय किरातच्या या उद्योग भरारी विशेषांकातून दिला आहे. अर्थात हे एवढ्यावरच थांबणारे नाही. यापुढेही हा उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत. ही केवळ सुरुवात आहे. कोकणातील मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यातील हे काही उद्योजक आहेत. मूळच्या कोकणातील उद्योजकां बरोबरच वेगळी वाट निवडणारे कमर्शिअल लॉयर नितीन पोतदार, गोवा येथील अॅनिमेशन स्कूलचे संस्थापक-संचालक ऋतुराज आरोलकर, तनुजा सावंत, अस्मिता दाभोलकर या नवउद्योजकांना, तरुणांना प्रेरणादायी ठरतील अशा व्यावसायिकांची ओळखही या अंकातून करुन दिली आहे.

तशी खुद्द कोकणातही रोजगाराची साधने कमी नाहीत. पण त्याकडे फारसे कधी लक्षच दिले गेलेले नाही. राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली. प्रत्यक्षात विविध विकासाच्या आणि उद्योग विकासाच्या योजना संबंधीत सरकारी खात्यांनी, अधिका-यांनीच हाताळल्या ते बहुतांशी कोकणा बाहेरील होते व आहेत. कोकणात उद्योग वाढीसाठी निर्माण झालेल्या सरकारी संस्था म्हणजे कोकण विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ (ग्.क्ष्.क्.क्.), लघुउद्योग विकास महामंडळ (ग्.च्.च्.क्ष्.क्.क्.), महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (ग्.च्.क.क्.), याबरोबरच राष्ट्रीयकृत बँका आणि या सर्वांचा समन्वय साधून उद्योगधंदे वाढावेत, रोजगार निर्माण व्हावा अशी ज्या जिल्हा उद्योग केंद्राकडून अपेक्षा होती त्या सर्वांनीच कोकणातील उद्योग विकासासाठी फारसे काही केलेले नाही. तशी त्यांची ड्युटीअसूनही! जे काही उद्योग व्यवसाय स्थीर झाले त्यामागे त्या त्या उद्योजकाचे व्यक्तिगत योगदानच मोठे आहे. वरील सरकारी खात्यांनी या सुरळीत चाललेल्या उद्योगांपुढे अडचणी मात्र तत्परतेने उभ्या केल्या हा अनुभव अनेक उद्योजकांना आलेला आहे.

कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगांना अन्नभेसळ प्रतिबंधक खात्याचे अधिकारी अक्षरशः नाडतात. त्यापैकी एक उदाहरण नोंद करण्यासारखे आहे.

स्थानिक उपलब्ध पाण्यावर चालणारा उद्योग असेल तर ते पाणी पिण्यास योग्य असल्याबद्दलचा दाखला सबंधीत सरकारी अधिका-यांकडून मिळवावा लागतो. एका नव उद्योजकाने त्यासाठी आपल्या विहिरीतील पाण्याचा नमुना सादर केला. पण त्याला कोणतेच उत्तर मिळाले नाही. आठ-दहा दिवसांनी चौकशीसाठी गेला तर पुन्हा दुसरा नमुना आणण्यासाठी फर्माविले गेले. तसे करुनही दाखला मिळण्याची चिन्हे दिसेनात. दुस-या दिवशी चौकशीला गेला तर पुन्हा ताजे पाणी घेऊन येण्यास फर्माविले गेले. पुन्हा गावी जावून पाणी आणणे शक्य नव्हते. आधीच्या नमुन्यांचे काय झाले तेही विचारण्याची सोय नव्हती. शेवटी तेथील शिपायाने तोडगा काढला. त्याने चक्क कार्यालया बाहेरील बाथरुमच्या नळाचे पाणी एका बाटलीत भरुन पाचशे रुपयांच्या नोटेसह तो पाण्याचा नमुना देण्याचा मौलिक सल्ला दिला. तसे केल्यावर केवळ तासाभरात पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला कोणतीही शास्त्रीय तपासणी न करताही मिळाला! असाच प्रकार वेगवेगळ्या खात्यांगणिक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे नवउद्योजकांना अनुभवायला मिळत असतो. यामुळेच अनेकांनी मोठ्या उमेदीने पाहिलेली आपल्या औद्योगिक व आर्थिक उत्कर्षाची स्वप्ने विरतांना पहावी लागलेली आहेत. अनेकांनी उद्योग विकासाचा नोद सोडून नोकरी पत्करली तर अनेकांनी आपल्या घरच्या किवा नवीन जमिनी घेऊन शेती-बागायतीत लक्ष घातले.

कोकणात औद्योगिक संस्कृती रुजण्यास ही संबंधीत सरकारी खाती, त्यांचे खाबू अधिकारी, कर्मचारी अडथळा ठरलेले आहेत. राजकीय नेतृत्व यामध्ये काहीही करु शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

आजकाल कोकणात पर्यटन विकासाचे वारे वाहत आहेत. पण तिथेही पर्यटन व्यावसायीकांना असेच अनुभव येत आहेत. अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीतही मुळात कष्टाळू आणि जिद्दी असलेला कोकणी माणूस मार्ग काढीत आहे. असेच यशस्वीपणे मार्ग काढीत आपल्या उद्योगाचा उत्कर्ष घडविणा-यांचा या अंकातून थोडक्यात दिलेला परिचय सर्व नवउद्योजकांनाही प्रेरणादायी ठरेल. बेरोजगारांना स्वतःचे उद्योग-व्यवसाय निर्माण करण्यास प्रवृत्त करील यासाठी किरातच्या या उद्योग भरारी विशेषांकाचे प्रयोजन आहे. यापुढेही अनेक उद्योजकांचा परियच द्यायचा आहे. त्यासाठी अन्य कोणी आपल्या माहितीतील उद्योजकांची माहिती पाठविली तर त्याचे स्वागतच होईल. मात्र त्यासाठी ठरविलेले निकष पूर्ण झालेले असावेत अशीही अपेक्षा आहे. त्यामध्ये उद्योजकाचा थोडासा पूर्वेतिहास, शिक्षण, रोजगार निर्मिती, उत्पादनाची गुणवत्ता, कर्जबाजारीपणा नसणे याबरोबरच सामाजिक कार्य अशा अनेक निकषात बसणारे व्यक्तिमत्व असावे.

किरातच्या या विशेषांकासाठी अनेकांनी लेखन सहकार्य केले. उद्योजकांच्या प्रत्यक्ष किवा दूरध्वनीवरुन मुलाखती घेतल्या. त्यामध्ये मुंबईच्या मनिषा सोमण, नम्रता, सीमा मराठे, समीर बागायतकर आदींचा उल्लेख करावा लागेल. या अंकासाठी अनेकांनी जाहिराती देऊन आर्थिक सहकार्य केले. या अंकावरील वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सूक आहोत.

भारतात वेगाने विस्तारणारा अॅनिमेशन उद्योग

अॅमिनेशन उद्योगाचा पसारा प्रचंड आहे आणि तरीही भारतातला त्याकडे बघायचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित का आहे ?

जर मी तुम्हाला कोणत्याही चांगल्या दोन चित्रपटांची नावे सांगा म्हटले, तर तुम्ही फार विचार न करता, चटकन ती सांगून टाकाल. मग ते विनोदी चित्रपट असतील वा कौटुंबिक वा मारधाडवाले वा अगदी जुने कृष्णधवलही असू शकतील. तुम्हाला ते त्यातल्या गाण्यांसाठी आवडत असतील वा त्यातल्या दमदार अभिनयामुळे वा त्या चित्रपटांच्या कथेच्या परिणामकारकतेमुळे असेल. आपल्यासाठी चित्रपट म्हणजे या सा-याच गोष्टींचा जमून आलेला मेळ असतो. पण मग एक अॅनिमेटेड चित्रपट म्हणताच ज्यात या सर्व गोष्टी असतात. आम्ही लगेच तो लहान मुलांचा चित्रपट ठरवून मोकळे का होतो आणि नगण्य का समजतो ?

एका कुशल शिल्पासाठी छिन्नी आणि हातोडा ह केवळ साधन असतात. कॉम्प्युटर अॅनिमेशन हे बस् असेच मात्र एक चित्रपट बनवायचे साधन आहे. एक कॉम्प्युटर स्वतःहून कोणताही चांगला चित्रपट बनवू शकत नाही. ही साधने वापरणारा माणूस आपल्या कलेच्या आणि तंत्राच्या कुवतीनुसार त्यातून काही बरे-वाईट घडवतो. कॉम्प्युटर अॅनिमेशनचा मुख्यतः उपयोग चित्रपटाच्या खर्चात बचत करण्यासाठी आणि जी दृश्ये एरवी चित्रणासाठी धोकादायक ठरु शकतील, अशी चित्रित करण्यासाठी होतो किवा काहीवेळा एरवी अशक्य असणा-या कल्पना चित्रणासाठी जसे की बोलणारे प्राणी, आज अस्तित्वात नसलेले डायनोसोर वगैरे वगैरे.

भारतात अॅनिमेशनची तेजी चालू आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी अॅनिमेशन बाजारातली विभागणी आपल्याला समजून घ्यावी लागेल.

पूर्ण लांबीचे चित्रपट (खास दृश्य परिणाम/अॅनिमेशन)

टी.व्ही. वरच्या मालिका

थेट डी.व्ही.डी. वर उपलब्ध केले जाणारे चित्रपट आणि मालिका.

गेमिग - सोनी प्लेस्टेशनसारख्या यंत्रावर वा मोबाईल फोन, इंटरनेट आदीवर खेळले जाणारे खेळ.

जाहिराती आणि म्युझिक अल्बमसाठी.

इतर क्षेत्रात जसे की वास्तू रचना, अंतर्गत सजावट आणि वैद्यकीय उपयोगासाठी

भारतीय चित्रपट क्षेत्रातील कामगिरी तितकीशी उल्लेखनीय नाही. सैफ अली, अक्षय कुमार, करिना कपूर, यश चोप्रा यांच्यासारखी बडी नावे जरी पात्रांच्या आवाजासाठी जोडीला वापरली गेली, तरी त्यातून चांगले चित्रपट साध्य झाले नाहीत, जर अॅनिमेशन चांगले असेल तरच ते विकेल. काही असेही चित्रपट आले, ज्यांनी थीएटर्समधून नसले, तरी टी.व्ही. प्रसारणाचे हक्क, सी.डी. व डि.व्ही.डींच्या हक्कातून तसेच टी-शर्ट, खेळणी आदी व्यापारी माध्यमातून चांगले पैसे कमवले.

अमेरिकेमधील अॅनिमेशन चित्रपट आमच्या कित्येक बॉलिवूड हिट चित्रपटांपेक्षा जास्त धंदा करतात. त्यातून साधली जाणारी रॉयल्टी पुढे येणारी कित्येक वर्षे पैसा मिळवून देत राहते. भारतात बनलेल्या टिकर बेल, अल्फा आणि ओमेगा अशा काही चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवले, पण ते सारे परदेशी बड्या स्टुडिओंचेच बनवून घेतलेले चित्रपट होते.

टी.व्ही. मालिकांच्या बाजारात कमावला जाणारा बहुतेक सारा पैसा हा जगातील सर्वात मोठ्या डिस्ने निकेलोडीओन यासारख्या स्टुडिओकडून मिळणा-या आऊटसोर्स कामांच्या अथक ओघातून मिळतोय. भारतीय पौराणिक मालिका आणि काही अपवादात्मक इतर प्रोजेक्ट हेच तेव्हढे भारतात निर्मिलेले स्वदेशी आहेत. छोटा भीम हे जरी मध्यम दर्जाचे अॅनिमशन होते, तरी त्याला चांगले यश मिळाले. व्यावसायिक दृष्टीने ही मोठी बौद्धीक संपदा आहे.

जाहिरात आणि म्युझिक अल्बमच्या क्षेत्रात बरेच काही केले गेलेय आणि त्यातले काही खरोखरच जागतिक दर्जाच्या बराबरीचे आहे.

व्यवसाय पुढील ४ वर्षात ३६ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. मात्र अजूनही अमेरिकन वा युरोपियन बाजारांच्या तुलनेत खपाचे आकडे खूप खालीच आहेत.भारतातील अॅनिमेशन उद्योगाचे बाळसे हे बाहेरच्या आऊटसोर्स कामांचा परिपाक आहे.

भारतात १०० कोटी रुपयांचा धंदा करणारा

अॅनिमेशन चित्रपट बनेल का ?

स्पष्ट सांगायचे तर आमची त्यासाठी अजून तयारी झालेली नाही. यासाठी ब-याच अंशी भारतातील कलाशिक्षणाची व्यवस्था कारणीभूत आहे. आम्ही अजूनही या क्षेत्राला करियरच्या मुख्य पर्यायात धरत नाही. केवळ साधारण बुद्धीच्या मुलांचा तो विषय समजतो. अॅनिमेशन म्हणजे मुख्य चाकोरीच्या क्षेत्राबाहेरचा सोपा पर्याय समजतो. वास्तविक या क्षेत्रातही इतर मुख्य क्षेत्रातुल्य बौद्धीक क्षमता हवी, खूप सारी मेहनत हवी व योग्य शिक्षण व्यवस्था हवी, तरच यश मिळते. या क्षेत्रातील पगार हे एम्.बी.ए. वा इंजिनिअरिगच्या पदवीधरांच्या तोडीस तोड आहेत. अगदी आय्.आय्.टी.चे विद्यार्थी देखील या क्षेत्रातील तांत्रिक व प्रोग्रामिगची बाजू बघताना दिसतात.

अॅनिमेशन म्हणजे केवळ कार्टुन नव्हे. प्रगत कॉम्प्युटर तंत्रातून विकसित झालेले हे कलाकारांसाठीचे एक साधन आहे. अॅनिमेशनचा संबंध कैकपटीने जास्त कलेशी आहे, सॉफ्टवेअरांशी नव्हे. सॉफ्टवेअर्स काळाबरोबर बदलत जातात. पण कलेचे मूलभूत नियम तेच राहतात. म्हणूनच कलेचा मजबूत पाया हा अॅनिमेशनसाठी जास्त गरजेचा आहे. ब-याच लोकांचा गैरसमज ही बिनगरजेची गोष्ट आहे, असा आहे आणि त्याचे दृश्यफळ म्हणून आम्ही अजून जागतिक दर्जाचे आणि भरपूर पैसे मिळवून देणारे चित्रपट बनवू शकलो नाही. जपानकडे पाहा त्यांची स्पर्धा थेट अमेरिकेन अॅनिमेशनबरोबर चालते आणि तरीही आपला खास सांस्कृतिक ठसा ते आपल्या अॅनिमेशनमध्ये जपतात. ऑस्कर मिळण्याएवढे दर्जेदार काम करतात.

कोणत्या प्रकारच्या नोक-या उपलब्ध होतात ?

या क्षेत्रातील नोक-यांचे तीन क्षेत्रात वर्गीकरण करता येईल. कला, तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षेत्रातील व्यवस्थापन.

कलाकार दोन प्रकारचे लागतात. एक पारंपारिक प्रकारचे चित्रकार वा शिल्पी आणि दुसरे तंत्रज्ञान संबंधित (प्रोग्रामिगमध्ये काम करणारे)

तंत्रज्ञानाचे दोन विभाग आहेत. पाईपलाईन आणि आय.टी. पाईपलाईन विभागातला प्रोग्रामर कामाचा ओघ सहज वाढावा म्हणून प्रोग्राम लिहितो. यात अॅनिमेशनचे सर्व विभाग येतात. त्यात निर्मिली गेलेली कोणतीही माहिती व काम (डाटा) हरवू नये, गमावले जावू नये, याची काळजी घेणे, कामाचा वेग वाढवण्यासाठी अनभिज्ञ कलाकारांना सहज सोपी पडतील, अशी तंत्र साधने विकसित करणे, असे काम असते. आय.टी. विभागाचे काम हे सारी माहिती व काम (डाटा) सुरक्षित ठेवणे, यंत्राची निगराणी व सुव्यवस्था आणि नवीन अपडेट करणे असते. निर्मिती व्यवस्थापन हा गट हा निर्मितीचे पूर्वनियोजन आणि त्याबरहुकूम काम करुन घेण्याची जबाबदारी सांभाळतो.

अॅनिमेशनवाले, इंजिनिअर, कलाकार वा एम्.बी.ए. वगैरे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना इथे वाव आहे. उदा. रिदम आणि ह्यू या कॅलिफोर्नियातील स्टुडिओने चक्क भतिकशास्त्रातील एक पी.एच्.डी. नेमला होता. त्याचे काम ही लाटा, आगीच्या ज्वाळांचे अगदी आभास निर्माण करणारे तंत्र विकसित करायचे होते. ज्यांचा भौतिक नियमांशी कलेपेक्षा जास्त जवळचा संबंध होता.

अॅकेडेमी अॅवार्ड ऑस्कर मध्ये देखील अॅनिमेशन चित्रपट आणि तंत्रज्ञान विकासासाठी अशी खास पारितोषिके असतात.

भारतातील सद्यस्थिती काय आहे ?

या भरपूर पैशांच्या क्षेत्रात भारताचा सहभाग वाढत आहे. कलेची पार्श्वभूमी असणा-या वा तंत्रज्ञान आणि कला दोन्हींची जाणकारी असणा-यांची इथे खरी गरज आहे. मग त्यांची शैक्षणिक पात्रता वा विषय काहीही असोत. ऑस्कर जिकणा-या ए ग्रेडच्या मोठ्या जागतिक स्टुडिओंच्या शाखा भारतात आहेत. जसे की ड्रिमवर्क, रिदम आणि ह्यू, सोनी इमेज हे अमेरिकेतील, टेक्नीकलर, मोविग पिक्चर कंपनी हे ब्रिटनमधील, फ्रान्समधील सुपिनफोकम या जागतिक कॉलेजची शाखा आहे. विद्यार्थ्यांना भारत सोडून बाहेर न जाताच जागतिक ओळख मिळविण्याची संधी आता उपलब्ध आहे. हीच योग्य वेळ आहे. या १००० कोटींपेक्षा जास्त वाढणा-या क्षेत्रात प्रवेश करण्याची. आपल्याकडे या क्षेत्रातील ज्ञान देणारी अॅनिमेशन आणि आर्ट स्कूल, गोवा ही संस्था जवळच परवरी गोवा येथे उपलब्ध आहे.

संफः

ऋतुराज आरोलकर

फाईन आर्ट पदवीधर, अकादमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटी,

सानफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका.

संचालक, ऍनिमेशन आणि आर्ट स्कूल, गोवा.

महिलांनी महिलांसाठी चालविलेला पहिला काजू कारखाना

महिलांनी महिलांसाठी यशस्वीपणे चालविलेला महाराष्ट्रातील एकमेव काजू कारखाना पहायचा असेल तर सिधुदुर्गातल्या वेंगुर्ल्याला भेट द्यावी लागेल. वेंगुर्ले येथील सौ. मंदाकिनी दिलीप सामंत गेली २९ वर्षे नर्मदा कॅश्यू इंडस्ट्रिज हा अद्ययावत काजू कारखाना यशस्वीपणे चालवित आहेत. दिवसाला फक्त ३ किलो उत्पादन अशी घरगुती स्वरुपाची सुरुवात करुन आज दिवसाला सुमारे ५०० किलो पेक्षा जास्त तयार काजूगराचे उत्पादन असा या कारखान्याच्या प्रगतीचा चढता आलेख आहे. त्यांच्या या कामात सासुबाई श्रीमती लिलाताई यांची खंबीर साथ मिळाली आहे. सासू-सुनेचे असे नाते अभावानेच पहायला मिळते. त्यांचे पती श्री. दिलीप सामंत यांचे मार्गदर्शनही त्यांना मिळत असते.

वेंगुर्ले तालुक्याला काजू कारखान्यांची परंपरा फार जुनी आहे. पण संपूर्णपणे महिलांनी व्यवस्थापन करुन चालविलेला हा राज्यातील पहिलाच कारखाना. आता वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी येथे काजूवाली सामंतअशी काजू विक्रीची शोरुम्स असल्याने कारखान्यातील काजू ग्राहकांना थेट मिळतो. खारे काजू, मसाला काजू, काजू लाडू अशी उत्पादनेही आता लोकप्रिय झाली आहेत. कारखान्यात काजूचे लाडू बनवून विक्री करणे हा एकेकाळी कोकणात चेष्टेचा विषय होता. पण आज लाखो रुपयांची काजू लाडूची विक्री होते. मुंबई, गोवा, कोल्हापूर बरोबरच खाजगीरित्या परदेशातही या लाडूंना मागणी आहे.

कारखान्यांच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे तर इथे १३५ महिला काम करतात. कामगारांची कमतरता भासत नाही कारण चांगली वागणूक, त्यांच्या प्रासंगिक अडचणी दूर करणे, आजारपण अथवा घरातील लग्नकार्य यासाठी मदत करुन स्वतः जातीने उपस्थित राहणे यावर आमचा कटाक्ष असतो.

सौ. सामंत यांचे माहेर कर्नाटक मधील कुमठा येथील. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे अनेक राज्यात रहावे लागले. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी, कानडी, तेलगू, कोकणी या भाषाही उत्तम बोलता येतात. इथे आल्यावर मराठी आणि मालवणीवर जम बसला आहे. त्यांच्या सासूबाई श्रीमती लिला सामंत याही कारखान्याच्या संचालिका आहेत. त्यांचे उत्तम सक्रीय सहकार्य त्यांना मिळते. त्यांना महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योजिका पुरस्कार तसेच वसई येथील वर्तक फाऊंडेशनचा महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

योजक नाना

कोकणी मेवाख-या अर्थाने म्हणता येईल अशी विविध खाद्य उत्पादने मुंबई - कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अन्य प्रमुख शहरांमध्येही लोकप्रिय करण्याची किमया करणारे कृष्णा परशुराम तथा नाना भिडे हे कोकणातील एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर गावात वेसुर्लेवाडीत १९३१ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आजोबांचे पुण्यात हॉटेल होते ते त्यांनी रत्नागिरीत आणले. नानांनी शिकून मोठं व्हावं. भिडे घराण्याचे नाव उज्वल करावं ही त्यांच्या आईची भागीरथीबाईंची इच्छा. लहान वय असतांनाच वडील निर्वतले. त्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्यावरच आली. ते सर्व सांभाळून नाना १९४९ साली मॅट्रीक झाले. पुढे कॉलेजला न जाता वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय त्यांनी पत्करला. त्याबरोबर आंबा विक्रीसाठी व्यवसाय सुरु केला. त्यातून चांगले पैसे मिळू लागले. आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि कष्ट करण्याची तयारी, तरुण वय कल्पकता या सगळ्या गुणांनी अनुभव संपन्न बनलेल्या नानांनी कोकणातील विविध फळांपासून सरबते आणि खाद्यपदार्थ बनविण्याचा उद्योग सुरु करण्याचे ठरविले.

पावसचे स्वरुपानंद हे नानांचे आध्यात्मिक गुरु. त्यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा. त्यांच्याच आशीर्वादाने आपण जीवनात यशस्वी झालो. ही विनम्र भावना त्यामुळे नानांनी ज्या व्यवसायाला हात घातला त्याचे सोने झाले.

त्यांनी काय काय केले नाही? कलम नर्सरी, शेंगदाण्यापासून तेल काढणे, लाकडाचा व्यापार, आनंद इलेक्ट्राॅनिक्स हा चोक्स् तयार करण्याचा उद्योग, ग्लास प्रॉडक्टस, शिवाय हॉटेल होतेच. यातून व्यापार-उद्योगातले विविध अनुभव मिळाले, माणसे अनुभवली, यातून त्यांनी साकारली फळप्रक्रिया उत्पादनांची संकल्पना.

कोकम सरबत हे योजकनावाने त्यांनी बाजारात आणले. उत्कृष्ट व दर्जेदार पेय म्हणून ते लोकप्रिय केले. योजकचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. योजक असोसिएटस् या ब्रँडने त्यांनी आवळा, कोकम, करवंद, आंबा, जांभूळ या फळांपासून अनेक उत्पादने सुरु केली. पुढे पावस रोडवर संजीवनी हेल्थ फूडहा कारखाना सुरु केला. या उत्पादनांमुळे विविध फळे पिकविणा-या गरीब शेतकरी बागायतदारांच्या फळांना निश्चितपण चांगला दर मिळू लागला. ही उत्पादने मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील अन्य प्रमुख शहरात योजक असोसिएटस्च्या बॅनरखाली विकली जाऊ लागली. या कोकणी उत्पादनास फळांची मूळची चव टिकून राहील याची काळजी त्यांनी घेतली. याबरोबरच भिडे सेवा नावाने व्यवसाय सुरु करुन लोकांना लग्न, मेळावे, अन्य समारंभासाठी लागणारे निवासासाठी साहित्य, ५ हजार लोकांना जेवण्या-खाण्यासाठी लागणारा भांड्यांचा संच, समारंभासाठी लागणा-या खुर्च्या, टेबले असे सर्व काही भिडे सेवाउपलब्ध करुन देते. काही हजारात वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन सुरु केलेला नानांचा व्यवसाय आज दरमहा लाखो रुपयांच्या उलाढालीवर पोहोचला आहे. तरीही नानांची राहणी साधी आहे. लोकसंफ मोठा आहे. उपयुक्त अशा सामाजिक कार्याला मदतीचा हात आहे आणि स्वामी स्वरुपानंदांवर तितकीच श्रद्धा आहे. आपल्या नवीन उत्पादनातील पहिला प्रकार ते स्वामींच्या तसबिरी समोर ठेऊन आशीर्वाद घेतात. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरसुद्धा नाना तरुणाच्या तडफेने सर्व कामे करीत असतात. या कामात त्यांच्या मातोश्री भागीरथीबाई आणि पत्नी सौ. वसुधाताई यांची समर्थ साथ दीर्घकाळ लाभली आहे. नानांचे तिन्ही मुलगे आनंद, श्रीकांत आणि किशोर हे योजकच्याच व्यवसायात आहेत. उत्पादन, मार्केटिग यामध्ये ते कार्यरत आहेत. तिन्ही सुनाही नाना आणि वसुधाताईंना आई-वडिलांप्रमाणेच मानतात. एकत्र कुटुंबपद्धतीचा एक आदर्शच नानांच्या घरी पहायला मिळतो.

मुळात कोणतेही फळ हे नाशिवंत. फारकाळ न टिकणारे. उत्पादन खूप झाले तर त्याचे करायचे काय ही सुधा समस्याच. पण त्याच फळांवर प्रक्रिया करुन त्यापासून टिकावू खाद्यपदार्थ बनविता येतात हे भारतीय परंपरेतले शास्त्र. त्याला थोडी नव्या तंत्राची जोड दिली तर तेच टिकावू पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनविता येतात आणि जिथे मूळचे फळ किवा त्यापासून बनविलेले पदार्थ मिळत नाहीत तेथे विकता येतात हे नानांनी कल्पकतेने हेरले आणि कोकम पासून सुरुवात करुन इतर अनेक फळांपासून सीरप, सरबते, जाम याबरोबरच नाचणी, कुळीथ व अन्य अनेक कडधान्यांपासून सत्व अशी इतरही उत्पादने सुरु करुन कोकणात काय करता येईल त्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचे अनुकरण करुन कोकणातील अनेक गावात, अनेक तरुणांनी फळप्रक्रिया उद्योग सुरु केले आहेत.

नाना नेहमी सर्वांना विशेषतः त्यांच्या मुलांना व तरुण पिढीला सांगतात की, जबाबदारीची जाणीव, चिकाटी, उपक्रमशीलता, धोरणी विचारसरणी, सचोटी, पुढाकार घेण्याची तयारी, स्वतंत्र विचार, देशाभिमान, धोका पत्करण्याचं धाडस, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी कुठल्याही शाळा कॉलेजातून शिकवल्या जात नाहीत. त्या प्रत्येकानं स्वकौशल्यानं शिकायच्या असतात व आपलं वेगळेपण सिद्ध करायचं असते. जिज्ञासा, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, विचारांची स्पष्टता, शोभादर्शकासारखी विचार प्रक्रिया आणि अस्सलपणा या सगळ्या गोष्टी परस्पर निगडीत असतात. आणि हे सगळे घटक प्रत्येकामध्ये कमी-अधिक प्रमाणात असतातच. फक्त त्याच्यावर कोळीष्टके साठत नाहीत ना ह्याकडं लक्ष हवं.

नाना स्वभावानं मृदू असले तरी व्यवहाराच्या बाबतीत पक्के शिस्तप्रिय आहेत. वस्तूंची उधळमाधळ करणं, फुकट घालवणं दिसलं की त्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही. ते स्वतः कधीही गल्ल्यावर मालकाच्या थाटात आजपर्यंत बसले नाहीत. रोजची रोकड किती जमा झाली एवढेच नानांना माहीत असते. घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी रोजचे कुठूनही मिळालेले पैसे, व्यवहारातील, कौटुंबिक भेटी-पाकीटे सर्व एकत्र राहिले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असतो.

पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यांना आकर्षण असते ते इथल्या निसर्ग रमणीयतेचे आणि इथल्या खाद्य संस्कृतीचे. त्यामुळे भविष्यात या फळप्रक्रिया उद्योगांना मोठा वाव आहे. आज विविध प्रकारची यंत्र सामुग्री व अन्य प्रक्रिया पद्धतीने हे काम काहीसे सोपे झाले आहे. पण जेव्हा मनुष्यबळाच्या जोरावर केवळ हातांनी ही कामे केली जात त्याची मुर्हूतमेढ कोकणात नाना भिडे यांनीच रोवली आहे हे सर्वजण मान्य करतील.

नव्या पिढीला नानांचा एक सल्ला तो म्हणजे, कोणतेही काम करण्याची तयारी, धाडशीपणा, मार्केटिगचे कौशल्य, कल्पकता आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवलीत तर आपण आपले घर आणि आपल्या उद्योगावर अवलंबून असणारी कुटुंबे स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाहीत. त्यांच्या जीवनकार्यापासून नव्या पिढीला हेच शिकता येईल.

संपर्कासाठी दूरध्वनी ः रत्नागिरी (०२३५२) २२२६२५

काजू उद्योगाचे भवितव्य

काजू प्रक्रिया उद्योग हा कोकणच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक आहे. लाखो लोकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग आता पारंपारिकतेकडून नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत होऊ लागला आहे. यामध्ये कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग टिकतील काय? सरकारी योजनेनुसार नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणा-या छोट्या काजू उद्योगांना संधी मिळेल का? याविषयीचा अभ्यासपूर्ण लेख महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर झांट्ये करीत आहेत.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगिण विकासासाठी संघटीत प्रयत्न होणे जरुरीचे आहे हे लक्षांत आल्यावर सिधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजक एकत्र येऊन त्यांनीही कोकण कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची स्थापना ११ डिसेंबर १९९० साली केली. त्यानंतर संघटनेमुळे काजू उत्पादक शेतकरी उद्योजक यांच्या अडचणी सोडविणे सहज शक्य होऊ लागले व संघटनेची वाढ होत गेली. या संघटनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्व उद्योजकांना व्हावा यादृष्टीने संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र करण्यात आले व २०/६/२००६ रोजी संघटनेचे नामकरण महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्सकरण्यात आले आज या संघटनेचे शंभरहून अधिक सभासद असून महाराष्ट्रात काजू उद्योगाच्या प्रगतीसाठी संघटना भरीव कार्य करीत आहे.

महाराष्ट्रात काजू गरावर साडेबारा टक्के वॅट टॅक्स होता. परंतू शासनाने सवलत देऊन तो दर ४ टक्के ठेवला होता. परंतू १/४/२०१० पासून ती सवलत रद्द केल्यामुळे पुन्हा काजूगरावर साडेबारा टक्के वॅट झाला. मोठ्या किमती मालावर मोठ्या दराने वॅट लावल्यास उद्योग अडचणीत येणार हे असोसिएशनने शासनाचे निदर्शनास आणून दिल्यावर भरलेला कर उद्योगात परत करण्याची सवलत महाराष्ट्रातील काजू प्रक्रिया उद्योगास आज देण्यात आली आहे.

प्रथमतः पारंपारिक स्वरुपाचा असलेला हा उद्योग आज कात टाकून मोठ्या औद्योगिक स्वरुपाचा होत आहे. जगात प्रथम भारतात (तोही प्रथमतः वेंगुर्ल्यात) सुरु झालेला हा काजू प्रक्रिया उद्योग आज व्हिएतनाम, टांझानिया, चायना, ब्राझिलसारख्या देशात मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. एकेकाळी जगात निर्यातीसाठी एक नंबरवर असलेल्या आपल्या देशाला व्हिएतनाम सारख्या देशाकडून फार मोठी स्पर्धा होत आहे. त्यामुळे एक नंबरचे स्थान टिकविणे हे आव्हान झाले आहे. प्रक्रियेमधील एका एका विभागाची मशिन्स जगात येत आहेत. काही देशांत तर फुल अॅटोमॅटिक प्लाँटसुरु झाले आहेत. तेथील काजू बीच्या कमी दरामुळे संशोधनातील खर्च किवा तुकडा होण्याचे जास्त प्रमाण हे त्यांना परवडत आहे. मात्र येणा-या ५ वर्षात त्यातील सर्व त्रुटी काढून अद्ययावत अशी मशिन्स फुल अॅटोमॅटीक प्लाँट आपल्या भारतातही सुरु होतील. अर्थात त्यामुळे रोजंगारीवर काही परिणाम होणार नाही. कारण, आपल्याकडे उत्पादन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने चालणारा हा उद्योग आहे. त्या रोजगारांकडून पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. मात्र मशिन्सच्या अवाढव्य किमती या चालू उद्योगांना खरेदी करणे परवडणार नाही व हा उद्योग मल्टीनॅशनल कंपनींच्या हाती जाऊन सध्याच्या उद्योजकांना त्यांचे शेअर्स घेऊन एकेकाळी आपलाही उद्योग होता या आठवणी राहणार आहेत.

या सर्व परिस्थितीत टिकून राहण्यासाठी उद्योजकांनी पूर्ण तयारीनिशी अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन उद्योगात व स्वतःत बदल करुन घेण्याची आवश्यकता आहे. प्रक्रियेच्या बाबतीत काजू बी उत्पादन घेणा-या शेतक-यांपासून सुरुवात करावी लागते. त्यांनी परिपक्व झालेलाच काजू काढावा यासाठी कार्यशाळा घेणे. गोव्याच्या धर्तीवर उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. खरेदी अंतर आणि प्रक्रिया, आवश्यक तेवढी प्रक्रियेकरिताची मशिनरी त्यांचे रिझल्ट पाहून खरेदी करावी. मोठ्या गुंतवणूकीसाठी सिधुदुर्ग कॅश्यू क्लस्टरसारखे क्लस्टर स्थापन करुन अत्याधुनिक मशिनरी घेऊन उद्योगाची प्रक्रिया क्षमता वाढविणे आवश्यक आहे. प्रक्रिया झाल्यावर आली बाजारेपठ. बाजारपेठेत नांव कमावण्या साठी व ते टिकविण्यासाठीची चतुःसुत्री नजरेसमोर ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक आहे. तयार मालाचा १) सर्वोत्तम दर्जा, २) योग्य किमत, ३) ग्राहकांचे समाधान, ४) नियमित व सातत्यपूर्ण पुरवठा एवढे राखल्यास स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवरील बाजारपेठ सहजपणे टिकवू शकता.

तर व्हिएतनाम, ब्राझील, केनिया, टांझानिया या देशात काजू प्रक्रिया उद्योगात अद्ययावत प्लाँट उभे राहिल्यामुळे तेथून निर्यात होणारी काजू बी भारतात फार मोठ्या दराने येत आहे. पुढे ती मिळणेसुद्धा अशक्य आहे. त्यामुळे काजू बीचे उत्पादन वाढीकडे खास लक्ष देणे जरुरीचे आहे.

देशातील एक नंबर काजू पिकविणारे केरळ राज्य हे अवेळी पाऊस, काजू वेचण्यासाठी लागणारी माणसे उपलब्ध नाहीत. वर्षातून एकदाच मिळणारा सिझन यामुळे कंटाळून शेतकरी काजू कलमांची कत्तल करीत आहेत. त्याचा परिणाम साहजिकच पिक कमी होण्यावर झाला आहे. तर वर्षभर मिळणारे उत्पन्न कमी मालात जास्त उत्पादन मिळत आलेल्या रबराच्या झाडांचे उत्पादन केरळात होत आहे.

दिवसेंदिवस बदलणारे हवामान बराच काळ टिकलेली थंडी, अवेळी पाऊस, अती उष्णता या सर्वांचा जागतिक काजू पिकावर अनिष्ट परिणाम होत आहे. मागील वर्षी काजू पिकणा-या सर्व देशातील काजूचे पीक धोक्यात आले. परिणामतः त्याचा परिणाम दरवाढ झाली. यंदाच्या हंगामाकरीता नॉर्मल स्थिती अपेक्षित होती. मोहोरही छान होता परंतू अवेळी पाऊस, बराचकाळ टिकलेली थंडी, त्यानंतर पडलेले धुके यामुळे देशातील महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र, अमेरिका, कर्नाटक येथील सर्वाधिक काजू पीक धोक्यात आले. केवळ ५० टक्के पीक हातात आले आहे. तर आयात होणा-या काजू बी पिकविण्याच्या देशातही पाऊस त्यामुळे तेथील पीकही खराब झाले आहे. आयव्हरी कोस्ट सारख्या देशातील अराजकता ५ लाख टन काजू बीची नासाडी करण्यास कारणीभूत ठरली आहे. एकंदरीत निसर्गाचा कोप या उद्योगास सहन करावा लागत आहे. काजूबीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे काजूबीचे वर वाढले. त्यामुळे काजूगर महागला त्याचे विक्रीवर परिणाम झाले. खप मंदावला आहे. यापुढेही निसर्गाच्या ह्या बदलांची फार मोठी किमत या उद्योगास सोसावी लागणार आहे.

उद्योगासमोर अडचणी या येणारच. अडचणी शिवाय उद्योग नाही. त्यामुळे अडचणींनी खचून न जाता त्यावर मार्ग काढण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. आज जगात जेथे जेथे काजू बी उत्पादन केले जाते. त्यावर प्रक्रिया केली जाते तेथे भेटी देऊन त्यांच्या उद्योगातील अद्ययावतपणा, त्यांची बलस्थाने ओळखून आपणही आपल्या देशातील उद्योगात त्यांचा वापर करता येणे कसे शक्य आहे हे ओळखल्यास व अवलंबल्यास यशाचे शिखर गाठू शकतो.

महाराष्ट्रातील काजू बीची प्रत संपूर्ण जगात अतिउत्तम अशी आहे. या काजूला स्वतःची अशी भौगोलिक ओळख आहे. काजू बीचे उत्पादनही विपुल आहे. तर मुंबई, पुणे, नागपूर या सारख्या मोठ्या बाजारपेठा हाताशी आहेत. या सर्वांचा (बलस्थानांचा) उपयोग करुन घेतल्यास मराठी उद्योजकांची पावले कायम पुढे पडतील यात शंका नाही.

या उद्योगातील प्रत्येकाने व्हिजन २०२०डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी १) ग्राहकांचे समाधानास प्राधान्य देऊन बाजारपेठ काबीज करावी. २) काजूगरापासून व्हॅल्यू अॅडीशनम्हणजे मूल्यवाढीसाठी खास लक्ष देऊन त्याच काजूगरापासून जास्त किमत कशी मिळेल याचाही विचार करावयास हवा. ३) काजूगर म्हटल्यानंतर कॉलेस्ट्राॅल ही चुकीची समजूत शास्त्रीय पुरावे देऊन झिरो कॉलेस्ट्राॅलकडे ग्राहकांचे लक्ष वेधले पाहिजे. काजूगर हे भूक वाढविणारे शक्तीदर्शक असे अन्न आहे. फॅट, प्रोटीन, कार्बोहाड्रेट मिनरल्स यांचे आदर्श मिश्रण आहे. आपल्या शरीर संस्थेत अत्यंत आवश्यक असलेली अॅमीनो आम्ले काजूगरांना भरपूर प्रमाणात आहेत हे ग्राहकांना पटवून देण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

शब्दांकन - सुधीर झांटये,

संचालक - झांटये कॅश्यू, पदाधिकारी - महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

सुविश्रृ स्पेशालिस्ट केमिकल्सचे डॉ. विनय पाटील

मूळचे वेंगुर्ले- सिधुदुर्ग इथल्या डॉ. विनय पाटील यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ल्यातच झाले. मुंबईला एम. एस. सी करून च्द्वद्धढठ्ठडद्यठ्ठदद्य(सरफॅक्टंट) या विषयात पी.एच.डी. मिळविली. सुरवातीपासूनच केमिकल फिल्ड हे करियरसाठी निवडल असल्याने निश्चित ध्येय समोर होतं. पहिली ८ वर्षे एस. एम. डायकेम या कंपनीत, नंतरची २ वर्षे सनशिल्ड केमिकल कंपनीत नोकरी केली. पण स्वतःचा व्यवसाय करायचा हे मनात असल्याने २०००साली सुविश्रु स्पेशालिटी केमिकल्स प्रा. लि. या नावाने टेक्स स्टाईल्स आणि पेपर केमिकलचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

आम्ही तयार कपड्यांसाठी लागणा-या प्रिट्रिटमेंट पासून ते फिनिशिगपर्यंतची सर्व केमिकल्स पुरवितो. तसेच रद्दी पेपर पासून पेपर रिसायकलींगसाठी लागणा-या केमिकल्सची निर्मिती करतो. सध्या सिलवासा आणि डोंबिवली ग्.क्ष्.क्.क्.इथे दोन कंपन्या चालू आहेत.

आमचे सन्माननीय ग्राहक दक्षिण भारतात कोईमतूर, तिरूपूर, सेलम, मुंबई, भिवंडी, सूरत, वापी इथे आहेत. तर परदेशातही बांग्लादेश, सेरिया, श्रीलंका इथे आमची उत्पादने निर्यात होतात. उत्पादनामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत कधीच कसूर न केल्यामुळे अकरा वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

डॉ. विनय पाटील यांचे बंधू शंकर पाटील हे ही त्यांच्या व्यवसायात मदत करतात. सध्या डोंबिवली इथे ४० तर सिलवासा इथे २५ कामगार काम करत आहेत

व्यवसायात जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते. तेव्हा डॉ. पाटील यांच्या मते आपण जो निर्णय घेऊ त्याच्या परिणामांची जबाबदारी आपल्या स्वतःचीच असते. स्वतः ते निर्णय घेताना व्यवहारीकतेपेक्षा भावनिकपणाला प्राधान्य देतात. स्वीकारलेला एखादा पर्याय यशस्वी ठरला तर पुढचे सर्व पर्याय यशस्वी ठरतीलच असे नाही. घेतलेल्या निर्णयाबाबत आपण संतुष्ट असू तरच आपण त्यावर सातत्याने कार्यवाही करू शकतो.

मराठी उद्योजकांना आर्थिक पाठबळाची नेहमीच कमतरता जाणवते. अमराठी उद्योजकामध्ये व्यावसायिकता ही त्यांच्यातच पसरलेली असल्याने आपल्या उद्योग ते सहज वाढवू शकतात आणि सर्वात महत्वाच म्हणजे रिस्क घ्यायची ज्याची मानसिकता असेल तोच उद्योगात उतरू शकतो.

उद्योगाबरोबरच मिळालेल्या नफ्याच्या १० टक्के रक्कम समाजकार्याकडे खर्च करण्याकडे डॉ. पाटील यांचा कल असतो. सामाजिक कार्याला मदत करताना दिलेली रक्कम योग्य रितीने खर्च होत आहे की नाही याची खात्री ते करतात. सावंतवाडी इथे स्वतःच्या जागेत रेल्वेस्टेशनच्या जवळ सर्व सुविधांनी युक्त असे हॉस्पीटल उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. येत्या २-३ वर्षात हा प्रकल्प उभा राहिला त्याच्या या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी डॉ. सुजाता पाटील या स्वतः जातीनीशी लक्ष घालतात त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

सिलिका - माईन्स मधला कोहिनूर

वडिलोपार्जित सिलिका उत्पादन व निर्यातीचा व्यवसाय सांभाळत सिधुदुर्गाबरोबरच कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगांव येथे सहा ठिकाणी वेगवेगळे उद्योग उभारुन अल्प काळातच विलास प्रभाकर गावडे यांनी यशस्वीतेचा ठसा उमटविला आहे.

वडिल प्रभाकर झीलाजी उर्फ पी.झेड.गावडे यांनी आपल्या सिलिका मायनिग व्यवसायातून उद्योग उभारायची मनिषा बाळगली होती. त्यानुसार त्यांनी कोल्हापूर येथे केमिकल रॉ मटेरीयल प्रक्रिया करणारा उद्योग कोहिनूर इंडस्ट्रीज या नावाने सुरु केला. अल्प काळातच त्यांची दोन युनिटस् त्यांनी उभी केली. तत्पूर्वी साई समर्थ रोडलाइन्स या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे जाळे सर्वदूर पसरले होते. प्रभाकररावांचे सुपूत्र विलास गावडे यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन वडिलांचा व्यवसाय अधिक व्यापक बनविण्याचे योजिले होते. त्यांच्या पाशी उद्योजकाला आवश्यक असणारे नेतृत्वगुण होतेच महाविद्यालयात ते जनरल सेक्रेटरी म्हणून निवडूनही आले होते, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले होते आणि वेंगुर्ल्याचे ते नगरसेवकही होते.

पण राजकारणापेक्षा समाजकारणातच त्यांचे मन अधिक रमायचे अनेक प्रकारच्या गरजूंना त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आहे आणि करीत आहेत. अनेक संस्थाही उभ्या केल्या आहेत.

शिक्षण पूर्ण करुन व्यवसायात पदार्पण केल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेतोरे येथे साई समर्थ स्टील इंडस्ट्रीज उभी केली. त्यानंतर २००९ मध्ये अथर्व सिमेंट कंपनी या सिमेंट उत्पादन करणा-या कंपनीच्या शुभारंभ केला. वाळू निर्यातीचा व्यवसाय उत्तम रितीने चालू आहे.

खनिज - वाळू उत्खननाच्या त्यांच्या स्वतःच्या माइन्सही आहेत. कोल्हापूर येथे बॉक्साइट माइन्स, बेळगावमध्ये लाइनस्टोन यामध्ये चांगल्या जम बसलेला आहे. त्यामुळे कित्येक स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

ते राजकारणात असले तरी सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. कोणत्याही चांगल्या कार्याला ते पक्षभेद मानत नाहीत. व्यावसायिक व्यापाबरोबरच त्यांनी पर्यटनाला चालना देणा-या जी.आय.टी.हॉटेल मॅनेजमेंट स्कूलची स्थापना आपल्या सहका-यांसोबत केली आहे. यामध्ये हाऊसकिपिग, फूड टेक्नॉलॉजी असे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकविले जातात. याखेरीज अनेक शिक्षणसंस्थांना, सांस्कृतिक, क्रीडा मंडळांना त्यांची मदत असते.

वडिलोपार्जित सिलिका-माइन्स उद्योगातला कोहिनूर हिराच ठरावा असे श्री. विलास गावडे यांचे कतृत्व आहे. याचे सगळे श्रेय ते आपल्या वडिलांना देतात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शांतीधाम स्मारक उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

सकस अन्नदाता शाळीग्राम खातू

कोणत्याही पदार्थात मसाला घातल्याशिवाय त्या पदार्थाच्या चवीला पूर्णत्व येत नाही. तसेच सगळ्या पदार्थात एकसारखा मसाला घालूनही चालत नाही. प्रत्येक पदार्थासाठी वेगळ्या चवीचा मसाला असतो. हे इतके मसाले घरी करण्याचं काम फारच जिकरीचं. त्याला पर्याय म्हणजे बाजारात मिळणारे तयार मसाले! आज बाजारात विविध प्रकारचे मसाले विकणा-या पाच-पन्नास तरी कंपन्या असतील. आपणही बाजारात जाऊन मसाला मागतो, तो कोणत्या कंपनीचा आहे याची फारशी चौकशी करत नाही. ही चौकशी करणे अतिशय गरजेचं आहे. असं खातू मसाल्याचे व्यापारी शाळीग्राम खातू म्हणतात. खातु मसाल्याला का प्राधान्य द्यावं ते तर्कशुद्धतेने पटवून देतात.

वडिलांनी सुरू केलेल्या मसाले दळून देण्याच्या गिरीणीपासून काम सुरू करून आज शाळीग्राम खातु यांनी खातु मसाल्याचा मोठा उद्योग उभारला आहे. मसाले उद्योगात उज्ज्वल भविष्य आहे याचा विचार त्यांनी जवळपास ३० वर्षापूर्वी कसा केला असेल? विचारता ते सांगतात.

वडिलांची मसाले दळून देण्याची गिरणी होती. ते काही दुकानांना वगैरे मसाले पुरवत नसत तर गिरणीवर येणा-यांना मसाले दळून देत असतं. त्यांच्या मसाल्यांना खूप मागणी होती. पण ते दुकानात मसाले न देता. जे कोणी गिरणीवर येत त्यांनाच फक्त ताजे मसाले दळून देत असत.

शाळीग्राम खातू यांची मात्र आपले मसाले मोठ्या प्रमाणावर बाजारात विकावेत अशी इच्छा होती. त्यांनी वडिलांकडे त्यासाठी परवानगी देखील मागितली.

पण त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. आमच्या इथे भैया दळवी म्हणून एक गृहस्थ होते त्यांनी मला पहिल्यांदा मसाले बाजारात घेऊन जाण्याची प्रेरणा दिली. पण वडिलांनी नकारघंटा वाजविल्यामुळे मला काहीच करता येईना. पण त्याचवेळी आमच्या मसाल्याची विक्रीसाठी मागणी करणारं दाभोळच्या एका व्यापा-याचं पत्र आलं. ते मी वडिलांना दाखविल्यावर त्यांनी परवानगी दिली.

१९७४ साली दापोली तालुक्यापासून त्यांनी मसाले विकायला सुरवात केली. सुरुवातीला कशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं सांगतांना ते म्हणतात.

यात महत्वपूर्ण अडचण होती ती पॅकिगची. मसाले तयार करण्याबाबतीत काहीच प्रश्न नव्हता, आमच्या मसाल्यांचा दर्जाही उत्तम होता. पण लेबल लावणं, पॅकिग करणं ही तत्रं आमच्यासाठी नवीन होती. अर्थात ही अडचण काही फार काळासाठी नव्हती. पुढचं पाऊल होतं ते मसाल्यातली विविधता वाढवणं.

सुरूवातीला त्यांच्याकडे संडे मसाला, हळद, तिखट आणि धणे पावडर इतकेच प्रकार होते. पुढे मटण मसाला, चिकन मसाला, सांबार मसाला, चकली मसाला, चिवडा मसाला, पावभाजी मसाला, लोणचे मसाला, व्हेज पुलाव मसाला, चहा मसाला, मालवणी मसाला आणि त्यांची स्पेशालीटी असणारा संडे मिक्स मसाला यासारखे विविध प्रकार बाजारात आणले. या मसाल्याच्या चवीसाठी त्यांनी कशा प्रकारचा अभ्यास केला सांगतांना ते म्हणतात.

मला स्वतःला चवीचं खायला आवडतं आणि चव कळतेदेखील. त्यानुसार बाजारात उपलब्ध असणा-या मसाल्यांची चव घेऊन किवा पदार्थांची चव बघून मी मसाले कसे असावे याचा अंदाज बांधला.

खातू मसाल्याचं वैशिष्ट्य काय? विचारता ते म्हणतात. उत्तम कच्चा माल आणि अतिशय स्वच्छता. घरातल्या स्वयंपाकघरात जशी स्वच्छता असते तशी आमच्या गिरणीत असते. आम्ही कच्चा मालही उत्तम दर्जाचा घेतो. बेडगी मिरचीसाठी आम्ही थेट कर्नाटकातल्या बेडगीला जातो. आमच्याकडे जी बडीशेप वापरली जाते ती उत्तम दर्जाची असतेच. तरी देखील आपण जसे तांदुळ निवडून घेतो तशी आम्ही बडीशेप निवडून घेतो. अशी खबरदारी प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाबाबतीत घेतली जाते. अगदी तमालपत्र देखील वापरण्याआधी निवडलं जातं. दर बघायचा नाही तर दर्जा आणि चव बघायची हे आमचं तत्व आहे. आपण पदार्थ खाण्यासाठी वापरणार तो दर्जेदार नको!

सर्वसाधारण ग्राहक बाजारातून हळद -तिखट विकत घेतांना काही गोष्टींचा अजिबात विचार करत नाही. सांगतांना ते म्हणतात, उदाहरण म्हणून विचार करायचा झाला तर समजा हळकुंड १० रु किलो असेल आणि तयार हळद ९ रु. किलो असेल तर आपण १रु. स्वस्त आहे म्हणून विकत घेतो, पण ही १रु. स्वस्त द्यायला त्या व्यापा-याला कसं परवडत याचा विचार करत नाही.

खातू म्हणतात त्याप्रमाणे मसाले किवा हळद-तिखट विकत घेताना शेकडा पाच टक्के लोकदेखील ब्रॅण्डचा, किमतीचा विचार करत नसतील जो करणं खरचं गरजेच आहे. आज मसाल्याच्या गिरणीत किती स्वच्छता बाळगली जाते हे ग्राहकांना समजणे शक्य नाही. पण निदान ब्रॅण्डचं नाव विश्वासार्ह आहे किवा नाही हे तरी नक्कीच बघता येईल.

आज रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, क-हाड, सातारा, कोल्हापूर, अलिबाग या ठिकाणी खातू मसाले पोहोचले आहेत. यापेक्षा जास्त बाजारपेठ मिळावी अशी त्यांची इच्छा नक्कीच आहे.

अगदी परदेशी देखील पोहोचण्याची इच्छा आहे. पण तितकी चांगली माणसं मिळाली पाहिजेत. परदेशात जर कोणी मसाले विकण्यासाठी ठेवण्याची इच्छा दर्शवली तर इथून पाठवायची आमची तयारी आहे, फक्त पॅकिग कसं असावं हे त्यांनी सांगावं. बाकी आमच्या मसाल्याची चव आणि दर्जा याबाबतीत तर काहीच शंका असण्याचं कारण नाही. आता त्यांची मंडळी व दोन मुलगे मसाले उद्योगात पूर्ण लक्ष देत आहेत.

संपर्क - मे. खातू मसाले उद्योग,

पाटपन्हाळे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

फोन - (०२३५९) २४०७८६, २४४३२९

No comments:

Post a Comment