Thursday 19 May, 2011

अंक १८वा, १९ मे २०११

अधोरेखीत *

यशस्वी वैवाहिक जीवनाची सत्पपदी

लग्न म्हणजे काय? तर, ही एक समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरूष कायदेशीररीत्या धार्मिक विधीसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. ही झाली लग्नाची शब्दकोषातली व्याख्या, पण ख-या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे स्त्री आणि पुरूष या दोघांनी स्वसंमत्तीने प्रेम आणि सामंजस्याच्या आधारावर परस्परांच्या साथीने एकत्र राहण्याचा घेतलेला निर्णय. बरेचजण आपलं लग्न हे सर्वार्थाने यशस्वी करण्याच्या उद्देशाने या बंधनात प्रवेश करतात. पण ब-याच वेळा हा उद्देश सफल न झाल्याने अथवा जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असतात, असं का होतं?

आजच्या परिवर्तनशील युगात विवाह संस्थेला ब-याच समस्यांना सामोरे जावं लागतंय. याची कारणं अनेक असतील, पण सर्वात महत्वाचं किवा सगळ्यात अंतिम कारण म्हणजे जास्त अपेक्षा आणि कमी सामंजस्य. ढोबळ कारण, प्रथम वाद आणि नंतर घटस्फोटापर्यंत नेते. म्हणजे प्रत्येक वाद हा घटस्फोटापर्यंत जातोच ्असं नाही, पण फार कमी वाद हे सुसंवादापर्यंत जातात. ज्यामुळे विवाहाची गाठ ही अधिक पक्की होऊ शकते, म्हणजे सुसंवादाने ब-याच प्रश्नांवर उत्तरं मिळतात. पण हे सगळं अवलंबून आहे काही गोष्टींवर. त्या म्हणजे विवाहबंधनात प्रवेश करणारे दोघेही त्यांच्या विवाहाकडे कोणत्या दृष्टीने बघतात व त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना काय अपेक्षा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच लग्न टिकवण्याच्या दृष्टीने स्वतःकडून झटण्याची त्यांची तयारी आहे का?

लग्नाची पूर्वतयारी ही अतिशय महत्वाची आहे. यासाठी फक्त शारिरीकच नाही तर मानसिक तयारीही गरजेची आहे. लग्नापूर्वी दोघांचीही मनोवस्था लग्नासाठी पूरक आहे ना, नवीन नातेसंबंध, नवीन कोंदणात बसण्यासाठी आधार-विचारांची जी लवचिकता लागते त्याची तयारी आहे ना, या सर्व गोष्टींचा विचार हा सकारात्मक असेल, तरच आपण म्हणू शकतो की, लग्नासाठी दोघांचीही मानसिक तयारी झाली आहे. लग्नाचा विचार करताना मुलीने कुठला विचार करावा हे आपण प्रथम बघूया. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिचं घर, तिची माणसं मागे ठेवून येत असते. त्यामुळे तिने नवीन माणसं, नाती, जागा या सर्वांमध्ये स्वतःला सामावून घेण्यासाठी अथवा असे म्हणता येईल की, त्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. नोकरी करीत असताना जे पद तुम्हाला दिलं जातं ते सांभाळण्याचा तुम्ही प्रयत्न करताच ना. त्याचप्रमाणे लग्नानंतर मिळालेल्या पदाला जागण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलीने करायला हवा. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल ही अपेक्षा सोडून द्यायला हवी आणि हे लक्षात ठेवायला हवं की, आपलं तेच खरं असा आग्रह धरला तर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. आत्ताच्या काळात दोघांचाही लवचिक दृष्टिकोन ब-याच समस्या टाळू शकतो.

लग्नानंतर जसं मुलगा आपल्या आई-वडिलांचे अनुबंध तोडत नाही त्याचप्रमाणे मुलगीही तिच्या आई-वडिलांना विसरू शकत नाही. तिच्यासाठी लग्न म्हणजे फक्त तिची राहती जागा बदलण्यासारखं नाही तर, त्याहून खूप काही अधिक आहे. तिला पूर्वीच्या काही सवयी सोडून नवीन सवयी आत्मसात करायच्या आहेत. नवीन नियम नवीन अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे सर्व तिच्यासाठी तेव्हाच सुकर होतं जेव्हा तिच्या नव-याची सुयोग्य साथ तिला मिळते.

ज्याच्या वर आपलं प्रेम आहे अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या व्यक्तीला गुण-दोषांसह स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. ते दोघं एकमेकांना पूरक आहेत का किंवा भविष्यातील वैवाहिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने खरं तर विवाह समुपदेशकाला एकदा तरी भेट द्यावी. ज्यायोगे समुपदेशकाच्या काही ठराविक प्रश्नांवरून त्या दोघांनाही आपल्यातल्या गुणादोषांची नुसती जाणीवच होणार नाही तर, त्यांना स्वीकारण्यासाठी काय करावं लागेल याचंही मार्गदर्शन मिळेल.

लग्न म्हजे फक्त एकमेकांवर प्रेम करणा-या जिवांचं मीलन नाही तर ते दोन कुटुंबांना एकमेकांच्या जवळ आणतं, दोन्ही कुटुंबाच्या समस्या, आनंद, दुःख अशा ब-याच गोष्टी लग्नानंतर एक होतात. म्हणजे दोन्ही कुटुंबे भावनिकदृष्ट्या एकमेकांत गुंतत जातात आणि मग अशा वेळेस नवरा-बायकोत वाद झाले तर पालकांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे दोन्ही कुटुंबांकडून संबंध दुरावण्यापेक्षा ते जवळ आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, पालकांची योग्य भूमिका व मार्गदर्शन ब-याच वेळेला नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये सकारात्मक परिणाम करते याची दोन्ही पालकांनी जाणीव ठेवायला हवी. त्यामुळे मग पेल्यातली वादळं पेल्यातच शमतील आणि लग्नगाठ आणखी घट्ट होईल.

लग्नाचं दुसरं नाव म्हणजे सामंजस्य आणि लग्न चिरकाल टिकण्याकरिता प्रत्येकाने ते दाखवायला हवं. पुढच्या पिढीसाठी जर आदर्श निर्माण करायचा असेल तर या पिढीतील माणसांनी काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे, तडजोड आणि तीही दोघांनी स्वखुशीने केलेली असेल तर उत्तम.

आज आपण बघतो की

ब-याच घरांमध्ये नवरा आणि बायको दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. त्यामुळे दोघांची स्वतःची अशी ओळख समाजात असते. ती ओळख मिळवण्याकरिता बरेच प्रयत्न केलेले असतात. दोघांच्यात काही वाद झाला तर अनेकदा आर्थिक स्वतंत्रतेच्या बळावर दोघेही आपला अहंकार जपत वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण याच वादाकडे परस्परांच्या नजरेतून जर बघितलं तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकेल.

विवाहाची वाटचाल जर यशस्वी आणि सुकर करायची असेल तर लग्न करणा-या वा लग्न झालेल्या प्रत्येकाने खाली दिलेल्या विचारांच्या सप्तपदीचं पालन केलं पाहिजे.

१) पहिल पाऊल-एकमेकांच्या छोट्यातल्या छोट्या गुणांचं कौतुक असावं आणि दोष सांगताना दृष्टिकोन सकारात्मक असावा.

२) दुसर पाऊल - वैवाहिक जीवनात नकारात्मक विचारांचं प्रगटीकरण कमी असावं.

३) तिसरं पाऊल-लग्नानंतरही दोघांमध्ये मैत्रीचं नातं असावं.

४)चौथं पाऊल- एकमेकां बरोबरच्या अस्तित्वामुळे परस्परांच्या आयुष्याला अर्थ असण्याची जाण ही वागण्यातूनच दिसायला हवी.

५) पाचवं पाऊल-एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करुन परस्परांनी त्याकरता एकमेकाला सहकार्य केले पाहिजे.

६) सहावं पाऊल - कितीही मतभेद असले तरी दोघांमधील संवाद टळता कामा नयेत.

७) सातवं पाऊल- एकमेकांच्या भावनांचा आणि व्यक्तिमत्वाचा एकमेकांनी आदर केला पाहिजे.

मतभेद असताना जर ही सप्तपदी आठवली तर निश्चितच बरेच घटस्फोट टळून वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकेल.

संपादकीय *

केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या दौ-याचे फलित

केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसाच्या रत्नागिरी-सिधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौ-यावर आले आणि जाताजाता पालकमंत्री नारायण राणे प्रणित काँग्रेस पक्षाला एकप्रकारे शह देऊन गेले असेच त्यांच्या एकूण दौ-याच्या कार्यक्रमांमधील वक्तव्यांवरुन जाणवेल.

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आघाडीतील काँग्रेस पेक्षा अधिक आहे. तिथे सामना आहे तो शिवसेनेशी. त्यामुळे आगामी नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला तेथे काँग्रेस पक्षाशी आघाडी करावी लागेल. पण सिधुदुर्ग जिल्ह्यात एक हाती अंमल असणा-या नारायण राणे प्रणित काँग्रेस पक्षाशी पंगा घेऊन निवडणुका लढविणे राष्ट्रवादीला तसे सोपे जाणारे नाही. काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही शाखंनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा सुरु केली असली तरी तो आत्मघात ठरेल हे दोन्ही पक्षांच्या धूरीणांना माहित आहे, त्यामुळे स्वबळाचे हावभाव करीत राहून दोन्ही पक्ष ऐन निवडणुकीत आघाडी करतील यात शंका नाही.

या दृष्टीने शरद पवारांच्या सिधुदुर्ग जिल्ह्यातील दौ-याला विशेष महत्त्व होते. कृषिमंत्री या नात्याने त्यांनी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात शेतकरी, शास्त्रज्ञांच्या सभेस मार्गदर्शन केले. काही घोषणाही केल्या आणि कृषि पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तसेच वेंगुर्ले - नवाबाग येथे फिशरमन्स व्हिलेज वसविण्याच्या नियोजित जागेची पाहणी करुन जिल्ह्यात पर्यटन वृद्धिबाबत काय करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

देशातील शेतक-यांनी अन्नधान्याचे विक्रमी पीक घेतल्यामुळे सरकारने हमी भावाने खरेदी केलेले धान्य ठेवण्यास गोदामे पुरेशी पडत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान्याची नासाडी होते. या संदर्भातील याचिकेवर निर्णय देतांना धान्य वाया जाण्यापेक्षा ते गोरगरिबांना अत्यल्प किमतीत उपलब्ध करावे असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. हा संदर्भ देऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी देशाच्या ग्रामीण भागातील ७० टक्के जनतेला कुटुंबामागे ३५ किलो गहू आणि तांदूळ २ व ३ रु. किलो दराने देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे सांगितले. फलोत्पादनात भारताने जगात दुसरा क्रमांक मिळविला असल्याचे सांगतांनाच फळ बागायतीवर येणा-या रोग, कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी शास्त्रज्ञांनी आपले संशोधन तपासून घ्यावे असेही त्यांनी सुचित केले. मत्स्य उत्पादन, पर्यटन यावरही पवारांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली.

कोकणातील नैसर्गिक सृष्टिसौंदर्याची हानी होईल अशा प्रकारचे प्रकल्प येथे नकोत असे मत व्यक्त करतांना जैतापूर येथील अणुउर्जा प्रकल्पाचे मात्र समर्थन केले. प्रशासनाने आणि पक्ष कार्यकर्त्यांनीही या प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या मनातील शंका, गैरसमज दूर करावेत असे सांगत जैतापूर प्रश्नी मौन बाळगलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या - कार्यकर्त्यांनाही जबाबदारीची जाणिव पवारांनी करुन दिली आहे.

एकंदरीत चार वर्षानंतर होणारा शरद पवारांचा हा कोकण दौरा कार्यकर्त्यांना उत्साह देऊन गेला. याचवेळी सावंतवाडीत संभवामी युगे युगे या भव्य महानाट्याचा प्रयोग तब्बल अकरा दिवस चालू होता. श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर आधारीत या महानाट्याचे संयोजन आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. जिल्ह्यातील सुमारे दोन-चार लाख लोकांनी हे महानाट्य पाहिले आणि दीपक केसरकर यांच्या संयोजनाला दाद दिली. त्याचा संदर्भ पवारांच्या सावंतवाडी भेटीत आलाच! जिल्ह्यातील राजकीय दहशतवादाला हे एक उत्तर असल्याचे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. त्यावर राजकीय दहशतवादाला घाबरण्याचे कारण नाही हे संदेश पारकर यांनी कणकवलीत सिद्ध करुन दाखविले आहे. तशी धमक कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. मात्र पैसे टाकून मतदाराला लाचार न करता आपणाला ही निवडणुकांची लढाई जिकायची आहे असे पवारांनी सांगितले. हा एक प्रकारे नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना टोलाच होता. पवारांच्या या दौ-यात राज्यमंत्री भास्कर जाधव, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, अनिल तटकरे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार किरण पावसकर, शिवराम दळवी, पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्याबरोबरच राष्ट्रीय काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आवर्जुन सहभागी झाले होते.

पवारांनी जिल्हा व राज्यस्तरावरील प्रश्नांबाबत काही भाष्य केले नाही. पाणी टंचाई, बेरोजगारी, विकास निधी खर्च न होता परत जाणे इत्यादी प्रश्न त्यांनी पालकमंत्री आणि आपल्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडेच सोपविले असावेत. शेवटी ते शरद पवार आहेत. प्रसारमाध्यमे आणि राजकीय विश्लेषक त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचे निरनिराळे अर्थ लावून वृत्तपत्राद्वारे भाष्य करीत असतात. या कोकण दौ-यात पवारांनी निरनिराळ्या ठिकाणी जी काही वक्तव्ये केली त्याचेही वेगवेगळे अर्थ लावण्याचे काम राजकीय विश्लेषकांनी सुरु केले असणार. शरद पवारांनी कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, कोणाचा आठवणीने नामोल्लेख केला किवा कोणाला अनुल्लेखाने मारले याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु असणार.

शरद पवारांसारख्या चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या आणि केंद्र सरकारात संरक्षण, कृषी अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद सांभाळलेल्या जाणत्या नेत्याच्या दौ-यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मिळालेला उत्साह कितपत टिकतो आणि त्याचा राजकीय लाभ कितपत मिळतो हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून दिसून येईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांना आपल्या सर्वश्रेष्ठ नेत्याने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल. ते नीटपणे लोकाभिमुख झाले तर त्याचे फलित सत्तारुपाने राष्ट्रवादीला मिळेल.

विशेष *

नवाबाग - वेंगुर्ले येथे साकारणार फिशरमेन व्हिलेज * पर्यटनाला चालना

नवाबाग-वेंगुर्ले येथे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून फिशरमेन व्हिलेजहा आगळावेगळा पर्यटन प्रकल्प होऊ घातला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पातून मच्छीमारांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळणार आहे. मत्स्यदुष्काळाला दरवर्षी सामोरे जावे लागणा-या मच्छीमारांना या प्रकल्पातून पर्यायी उत्पन्नांचा मार्गही उपलब्ध होणार आहे. सध्या हा प्रकल्प पायलट प्रोजेक्टम्हणून उभारण्यात येणार असला तरी भविष्यात कोकणचा ७२० किलोमिटरच्या किनारपट्टीवर असे अनेक प्रकल्प उभे राहून मच्छीमारांच्या जीवनात अभूतपूर्व असा बदल होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन आमदार दीपक केसरकर यांनी हा प्रकल्प मंजूर करुन आणला आहे. या प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. युरोपमधील हॉलंड देशात हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. नवाबागामध्ये हा प्रकल्प होणार असल्याने गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांची पावले सिधुदुर्गात वळणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही गती मिळून लोकांची आर्थिक उन्नतीही होण्यास मदत मिळणार आहे.

नवाबाग या ठिकाणी ११० मच्छीमार कुटुंब राहतात. याठिकाणी शासनाची जागाही आहे. येथे पारंपारिक पद्धतीने मासे वाळविले जातात. या ठिकाणी मासळी बाजार होता. मात्र त्याची जागा वापरात नाही. वेंगुर्ले तालुक्यात पर्यटक येतात. मात्र ते वेंगुर्ले बंदरावर जाऊन पुन्हा माघारी परतात. नवाबाग येथे बीचअसूनह तेथे फारसे जात नाहीत. या ठिकाणी प्रकल्पासाठी निधी प्राप्त होऊ लागला आहे. मच्छीमारांना निवास व न्याहारी योजना राबविण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यास बँकाही तयार झाल्या आहेत. आतापर्यंत ५० मच्छिमार हा प्रकल्प राबविण्यासाठी तयार झाले आहेत. या ठिकाणी भविष्यात सोसायटीही उभारण्यात येईल. सोसायटीच्याच माध्यमातून हॉटेल उभे राहील. त्याचे उत्पन्न सभासदांमध्ये वितरीत करण्यात येईल. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दौ-यानंतर या प्रकल्पाला निश्चितच गती मिळेल.

जैतापूरची रणभूमीचे पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

सध्याच्या ज्वलंत अशा जैतापूरच्या प्रश्नाबाबत अभ्यासकांना तसेच सामान्यांना उपयुक्त अशी दोन्ही बाजू मांडणारी माहिती जैतापूरची रणभूमीया किरातट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

किरात ट्रस्टच्या जैतापूरची रणभूमी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार परशुराम उपरकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सचिव विजय केनवडेकर, मंदार केरकर, किशोर चिटणीस, हेमंत मराठे, अण्णा म्हापसेकर, ओंकार तुळसुलकर उपस्थित होते. या पुस्तकामध्ये जैतापूर माडबनमधील स्थानिकाची मते, भूगर्भशास्त्रज्ञ एम. के. प्रभू, अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा लेखणीतून सोप्या भाषेत जैतापूरचा प्रश्न शास्त्रीय बाजूने समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. किरणोत्सर्गाचे घातक परिणाम, कालचे आणि आजचे जैतापूर - माडबनचे स्वरूप अशा सचित्र मांडणीमुळे पुस्तक प्रभावी बनले आहे.

किरातच्या उद्योग भरारीचे प्रकाशन

सा.किरातच्या उद्योग भरारीविशेषांकाचे प्रकाशन मुंबईतील ज्येष्ठ उद्योजक दादासाहेब परुळकर यांच्या हस्ते वेंगुर्ले येथे झाले. अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद वेंगुर्ले शाखेचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर होते. याप्रसंगी संपादक श्रीधर मराठे यांनी प्रास्ताविक केले. सुनिल मराठे यांनी स्वागत केले. पंढरीनाथ महाले, शशिकांत कर्पे, वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे, वेतोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक, दादासाहेब परुळकर, देवदत्त परुळेकर आदींनी किरातच्या विशेषांकाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास बापूसाहेब दाभोलकर, शिवाजीराव कुबल, गजानन राजाध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर, प्रदीप सावंत, सुरेश कौलगेकर, भरत सातोस्कर, विनायक वारंग, सचिन वराडकर आदी उपस्थित होते.

सारस्वत बक नफा ७७ टक्क्यांनी वाढला - एकनाथ ठाकूर

सारस्वत बँकेला गेल्या आर्थिक वर्षात २१२.२७ कोटी रुपये नफा झाला असून बँकेचा हा उच्चांकी नफा आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकुर यांनी कुडाळ येथे दिली. नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७७ टक्क्यांनी वाढ झाली. कोकणात सहकार वाढत नाही, याला उत्तर सारस्वत बँक आहे, असे ते म्हणाले, गेल्या सात वर्षात बँकेने ४८०० कोटीवरून २७ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. थकित कर्ज शून्य टक्के आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ३५ नवीन शाखा उघडण्यात आल्या. ठेवीत १०.७५ टक्के वाढ केली, तर कर्ज व्यवसायात २४.४५ टक्के अशा लक्षणीय वृद्धी झाली. सातत्याने जाहीर केल्याने ३०८३.२२ कोटी ठेवी संकलन करणे शक्य झाले. स्वनिधी १२७०.३७ कोटीवरून १४७३.४९ कोटी झाला. बँकेने ९२ वर्षात एकूण व्यवसायाचा २५ हजार कोटीचा टप्पा गाठला. तेवढाच व्यवसाय येत्या पाच वर्षात करून एकूण व्यवसाय ५० हजार कोटी करायचा आहे. २०११ मध्ये व्यवसाय एक लाख कोटी करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मालकीची ही देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. कोकणात १५ शाखा सुरू केल्या असून. येत्या वर्षभरात १५ शाखा सुरू करण्यात येतील. ग्लोबल कोकणच्या उपक्रमाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन राज्याच्या अंदाजपत्रकात पाच कोटीची तरतूद केल्याचे श्री. ठाकुर यांनी सांगितले. यावेळी संचालक सुनील सौदागर, जनरल मॅनेजर एस. ए. प्रभू व कुडाळ शाखाधिकारी नीलिमा प्रभू आदी उपस्थित होते.

वेंगुर्ले बंदरावर पर्यटकांसाठी पेयजल सुविधा

वेंगुर्ले बंदरावर येणा-या पर्यटकाची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी संदेश निकम मित्रमंडळातर्फे पेयजल टाकी बांधण्यात येत असून त्यासाठी ७५ हजार रु. खर्च येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या हस्ते, वेंगुर्ल्याचे पक्ष निरीक्षक बाळू कोळंबकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष वसंत तांडेल, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तुषार साळगांवकर, नगरसेविका सुमन निकम, गीता अंधारी, राजेश परब, पेयजल योजनेच्या टाकीसाठी जमीन देणा-या अंजली मांजरेकर, सतीश हुले आदी उपस्थित होते. मंडळातर्फे वेंगुर्ले बंदराचे सुशोभिकरण करण्यात येईल. मच्छीमारांच्या मागणीनुसार खाडीतील गाळ काढण्याचेही काम लवकरच हाती घेण्यात येईल असे श्री. निकम यांनी सांगितले.

आयर्लंडच्या मंत्रिमंडळात मालवणी माणूस

मालवण तालुक्यातील वराड गावचे लिओ अशोक वराडकर हे आयर्लंड देशाच्या मंत्रिमंडळात दळणवळण, खेळ आणि पर्यटन मंत्री झाले आहेत. त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर हे वराड देऊळवाडीतील. त्यांचे शिक्षण गावीच आणि माध्यमिक शिक्षण मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेल्यावर त्यांना आयर्लंडला जाण्याची संधी मिळाली. डब्लीन शहरातच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तिथेच त्यांचा डॉ. मेरियन यांच्याशी विवाह झाला. त्यांना दोन मुली व एक मुलगा. तिघेही डॉक्टर आहेत. डॉ. लिओ युथ ऑफ पीपल्स पार्टी या पक्षातर्फे निवडणुकीत उतरले आणि जिकले. पहिल्या ५ वर्षात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कर्तृत्व दाखविले आणि दुस-यांदा निवडून आल्यावर त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. ३२ वर्षीय लिओ अविवाहित असून देशातील सर्वात तरूण मंत्री आहेत. ते आपल्या मूळ गावी अजून आले नसले तरी वडील दर दोन वर्षानी आपल्या गावी, घरी वराडला येत असतात.

मध्वानुभव *

सध्याची नवीन पिढी परदेशात असल्याने आजी-आजोबा, आई-बाबा यांना परदेश प्रवास योग असतोच. सून - मुलगी *आई होणार असेल तेव्हा तर (विशेषतः अमेरिकेत) हा योगअसतोच असतो; मात्र गंमत म्हणजे व्हिसा मिळण्यासाठी हे कारण सांगून चालत नाही. असो.

परदेशात गेल्यावर वेळ कसा घालवायचा ही एक समस्याच असते. रस्त्यावर फक्त मोटारीच फिरतात. माणसांनी फिरणे रिस्की असते. शेजार-पाजार हा कन्सेप्टच नाही. पूर्व परवानगी शिवाय कुणाकडेही जाणे हे शिष्ट संमत नसते. मुलाची भेट घेण्यासाठीसुद्धा आईला अपॉइटमेंटघ्यावी लागते असं म्हणतात. सारांश, आपली वसुधैव कुटुबकम्ही संस्कृती तिथे लागू नाही. सोमवार ते शुक्रवार मुलं नोकरीवर असतात आणि शनिवार-रविवार विकएण्ड टूर्स, मार्केटिग आणि काही सोशल फंक्शन्स! याशिवाय संवादासाठी भाषेचा प्रॉब्लेम असतोच. आपलं तर्खडकरी इंग्रजी तिथे निरुपयोगी.

आमच्या थायलंडच्या वारीमध्ये हा भाषेचा प्रश्न फारच जटील झाला होता; त्या देशात इंग्रजीचा वापर जवळ जवळ नसतोच. काही अपरिहार्य कारणास्तव इंग्रजी संवादाची वेळ आलीच तर त्यांचे थाईउच्चार अगम्य असतात. एका फोटो स्टुडिओ -मध्ये जुना रोल डेव्हलप करुन हवाय आणि नवा रोल कॅमे-यात घालून द्या हे समजावून सांगतांना तोंडाला अक्षरशः फेस आला. शेवटी हातवारे, देहबोलीच्या माध्यमातून हेतू साध्य झाला हा भाग वेगळा!

थायलँडमध्ये वेळ घालवणे ही समस्या भाषेच्या अडसरा -मुळे अधिक तीव्रतेने जाणवत असते. वेळ जाण्यासाठी सकाळ- संध्याकाळ एकदिशा मार्गधरुन दूर फिरायला जाणे, वाटेत बागेत बसणे हा उपाय मी सुरु केला होता. मॉर्निग, इव्हिनिग वॉकला खूप थाईमाणसं दिसत असत. इंडियन किवा आंग्ल भाषा जाणणारा माणूस माझ्या वास्तव्यात वाट्याला आला नाही. शेवटचा उपाय म्हणून इंग्रजी-थायी-शब्दकोषातून, गुड मॉर्निग, इव्हिनिग, आपले नांव काय? माझे नाव..., असे काही शब्द आणि वाक्ये लिहून घेतली आणि त्यांच्या आधारे संवाद साधायचाच असा निश्चय केला.

गेले कित्येक दिवस मी ज्या बागेत सकाळी जात असे तेथे एक थाई माणूस नित्यनियमाने येत असे. विशेष म्हणजे तो सायकलने ४/५ फे-या मारत असे. त्याच्या सायकलच्या कॅरिअरला १०/१२ पाण्याच्या बाटल्या असत आणि तो प्रत्येक राऊंडनंतर मी बसत असे त्याच्या आसपास उतरुन तेथे नव्याने लावलेल्या रोपांना, फुलझाडांना बाटल्यातील पाणी घालत असे. एके दिवशी मी थोडी धिटाई करुन त्याच्या कॅरिअरची पाण्याची बाटली काढून एका रोपाला पाणी घातले व तो जवळ आल्यानंतर त्याला गुड मॉर्निग‘ (थाई भाषेत अरुण सवादी‘) म्हटले. तो किचित हसला असावा असं गृहीत धरुन मी संवादसाधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. (त्याला मी पाण्याची बाटली चोरवाटलो नाही हे नशीब!)

दुस-या दिवशी आपण होऊन त्याने मला २ बाटल्या पाणी घालण्यास परवानगी दिली. मी माझ्या परीने संवादसाधण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. ३/४ दिवसानंतर त्याचे नाव छू-डेज आणि आडनाव जानसिरी असल्याचा मला शोध लागला. कारण, त्या दरम्यानं आम्ही दोघेही २/५ मिनिटे एका बाकावर बसण्याइतपत प्रगती केली होती. शिवाय मी माझ्याबरोबर शब्दकोषनेण्यास सुरुवात केली. डिक्शनरीतील नेमया शब्दावर बोट ठेवून माझ्े नाव सांगितले, त्याच्या नावासाठी प्रश्नार्थक मुद्रा केल्यावर त्याने नाव सांगितले ते १० वेळा ऐकल्यावर समजले. माझे घारपुरेहे नाव उच्चारणे त्याला अजिबात जमले नाही. मात्र मधुकरचा उच्चार त्याने मिसतार् मडूकरअसा केला व तो त्यानंतर मला माऽऽऽडूअसे म्हणत असे. अशाप्रकारे प्राथमिक ओळखीनंतर शब्दकोषाच्या माध्यमातूनआम्ही एकमेकांचे फुअनम्हणजे फ्रेंड झालो. मि. छू माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता व शेती खात्यातून निवृत्त होऊन सकाळच्या वेळेत सार्वजनिक बागेत फुलझाडे लावून त्याला रोज पाणी घालून जगवण्याचा निवृत्त्योत्तर छंद जोपासत होता. त्याच्या या छंदात त्याने मला सहभागी करुन घेतले. याबद्दल मी त्याचे आभार मानले. अर्थात शब्दकोषाच्या आधारे!!!

हळुहळू मी त्याच्याकडून थाई भाषेतील १ ते १० आकडे, काही नैमित्तिक संवाद समजून घेतले. शब्दकोषातून उच्चार कळत नसत आणि संवादासाठी उच्चार हेच महत्त्वाचे असल्याने छू कडून यासाठी उत्तम सहकार्य मिळाले. यासाठीची गुरुदक्षिणा म्हणून मी एकदा त्याला कॉफीसाठी घरीच बोलवायचे ठरवले. त्यासाठी परत डिक्शनरीचा आधार घेऊन त्याला आमंत्रण दिले. पण काय घोटाळा झाला न कळे! तो आमच्या घरी येण्याच्या ऐवजी मलाच त्याच्या घरी घेऊन गेला. जातांना मी माझे घर या दिशेला नाही वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही.

छू डेजचे घर साधारण उच्च मध्यमवर्गीयांसारखे होते. घरात त्याची आई, वय वर्षे ९०च्या आसपास होती. मी कमरेत वाकून २/३ वेळा तिला नमस्कार केला. छू ने थाई भाषेत आईला माझा परिचय करुन दिला. त्यानंतर आम्ही कॉफी प्यायलो. निघतांना मी त्याच्या आईला परत नमस्कार केला. तेव्हा त्या माऊलीने त्यांच्या बागेतील एक डाळींब मला दिले. छू ची आई दिसायला माझ्या आईसारखी मुळीच नव्हती पण कां कुणास ठाऊक तिचे माझे गतजन्मातले आई-मुलाचे नाते असावे असे मला राहून राहून वाटत होते. त्यांच्याकडे पायाला हात लावून नमस्कार करण्याची पद्धत आहे की, कसे हे मला माहित नव्हते आणि डिक्शनरीत असं काही लिहिलेलही नसल्यामुळे मोडक्या-तोडक्या इंग्रजी भाषेत तुमची आई माझ्या आईसारखीच आहेअसं छू ला सांगितलं आणि मनातल्या मनात छू च्या आईला साष्टांग दंडवत घातला आणि छू ला माझ्याकडे कॉफीसाठी निमंत्रण देऊन घरी परतलो.

No comments:

Post a Comment