Thursday, 26 May, 2011

अंक १९वा, २६ मे २०११

अधोरेखित *
शब्द* जरा जपून!
शब्द हे दुधारी शस्त्र असल्यानं खूप जपून वापरावेत, शब्दांनी होणारी जखम कधी भरुन निघत नाही हे आपण नुसतंच ऐकतो. प्रत्यक्ष आचरणात कधीच आणत नाही. एका थपडेनं माणूस जितका दुखावला जाईल त्याच्या हजारपटींनी दुखावला जातो कटू शब्दांनी.
पती-पत्नीचं नातं सर्वात जवळच. या नात्याच्या आधारावरच घरातली इतर नाती अवलंबून असतात. पण होत काय की हे नातं नको इतकं ‘गृहीत‘ धरलं जातं. भांडणं क्षुल्लक कारणांनी सुरु होतात. ती पटकन मिटूही शकतात. पण तसं होत नाही.
पतीपत्नीचं नातं परस्पर विश्वासाचं असतं. लग्नाआधी वा नंतर या विश्वासापोटीच सगळ्या लहानमोठ्या गोष्टी, कच्चे दुवे एकमेकांजवळ बोलले जातात. एकमेकांची मर्मस्थानं माहीत झाल्यावर त्यांना जपण्याऐवजी संधी मिळताच त्यावर शब्दांचा शस्त्रासारखा वापर करुन घाव घालणं फारच वाईट. पती-पत्नी नात्यामधल्या विश्वासाचाच हा अवमान.
जेव्हा एखादी चूक घडते, आगळीक होते तेव्हा घरातली, जवळच्या नात्यातली माणसं सहजपणे एकमेकांजवळ कबुलीजबाब देऊन आधाराची अपेक्षा करतात. तेच नैसर्गिक असंत. पण मग अशा वेळी मूर्ख, बावळट, बेअक्कल या शब्दांचा वापर झाला तर हाही नात्यामधल्या जवळिकीचा अवमानच.
अगदी सभ्य, सुसंस्कृत घरांमध्येही अनेकदा अशा भावनिक थपडा परस्परांना मारल्या जात असतात. यालाच ‘शाब्दिक हिसाचार‘ म्हणतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते शाब्दिक हिसाचार, अवमानकारक बोलण्याची सवय अगदी लहान वयापासूनच असू शकते. कारण त्याचा उगम घरातून होतो आणि ही शिकवण आपल्या रोजच्या वागणुकीतून सकाळ-संध्याकाळ देणारे मुलांचे आई-वडीलच असतात. छोटे छोटे वाद, विपर्यास, भांडणामध्ये परस्परांविषयी जी अपमानास्पद भाषा, कधी शिव्या वापरल्या जातात तीच भाषा, वागणूक मुलं आत्मसात करतात. लहान मुलं शाळेत किवा इतरत्र एकमेकांसोबत खेळताना मग सहजपणे तशीच भाषा, वागणूक दाखवतात.
शाळांमध्ये समुपदेशक म्हणून काम करणारा एक समुपदेशक म्हणाला की, काही वेळा अगदी निष्पाप वाटणारी मुलं आपल्या वर्गातल्याच एखाद्या मुलाला वा मुलीला ज्या पद्धतीनं ‘लक्ष्य‘ करुन चिडवाचिडनी करतात, त्यासाठी जो शब्दांचा दुखावणारा वापर करतात, तो पाहिला की थक्क व्हायला होतं. शाळकरी वयात सवंगड्यांकडून मिळालेला असा शब्दांचा मार मुलं मोठेपणीही विसरु शकत नाहीत. शारिरीक व्यंग, स्वच्छतेच्या सवयी, डब्यामधला खाऊ, हुशारी, आईवडील, अगदी कुठल्याही बाबतीत मुलं एकमेकांचा अवमान करु शकतात. जसं ते घरी शिकले असतील अगदी तसंच!
हीच मुलं मोठी होतात. जबाबदार व्यक्ती बनतात. पती-पत्नी, भाऊ-बहीण, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी अशा विविध नात्यांनी परस्परांशी बद्ध होतात. पण त्यांच्या मनामधलं हे इतरांना शब्दांनी दुखावू शकणारं मूल मात्र वाढत नाही. त्याच वयाचं राहतं. शब्दांनी दुखावण्याच्या बाबतीतला शस्त्रांपेक्षा तीव्र ताकदीचा त्याचा अनुभव आणि ती ताकद इतरांवर अजमावून बघण्याचा त्याचा शौक मात्र वाढत गेलेला असतो.
पती-पत्नी नात्यात पत्नी बरेचदा खूप बोलणारी, तक्रारी करणारी, टोमणे मारणारी म्हणून ओळखली जाते. प्रसारमाध्यमातून तशीच प्रतिमाही सतत सामोरी येते. दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमध्ये तर एकमेकींचा, घरच्या इतरांचा सतत अवमान करणा-या सासवा, सूना, वहिनीसाहेब वगैरे दररोज भेटतच असतात. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते बोलून अवमान करण्याच्या बाबतीत पुरुष हा बाईला सहजपणे मागे टाकू शकतो. पत्नीच्या हजार शब्दांनीही पतीला फरक पडत नाही. पण पतीचा एखादा शब्द, उद्गार पत्नीला मर्मावर घाव घालणारा वाटू शकतो. नव्हे तो असतोही तसाच. विशेषतः जेव्हा तो पत्नीचे लग्नाआधीचे वा नंतरचे मित्र, माहेरचे लोक, जिवाभावाच्या मैत्रिणी यांना उद्देशून काढलेला असतो. पती हा पत्नीबद्दल शारिरीक-मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर मालकी हक्क मनात बाळगून असतो. अशा वेळी मग पत्नी ज्या गोष्टी-व्यक्तींबाबत तिच्या मनात जास्त आपुलकी, जिव्हाळा बाळगते त्यावर शाब्दिक हल्ला पतीकडून चढवला जातो तो मानसिक असुरक्षिततेपोटीच.
बोलणारा प्राणी ही माणसाची व्याख्या असेल तर फटकळपणे बोलणारा प्राणी ही मराठी माणसाची व्याख्या सहज बनू शकते. आम्ही फटकळ, स्पष्टवक्ते असं अभिमानानं (!) म्हणता म्हणता त्याच्या जीभेचं वळण अवमानकारक शब्दांकडे कधी झुकतं कळत नाही. दुकानदाराचं वय न बघता ‘ए, वो दिखाव‘ किवा नोकरांना ‘फुकट पगार द्यायचा का तुला?‘ वगैरे आपण अगदी सहज बोलतोच. परंतु ऑफिसात बॉसही ‘झोपा काढत काम करता का रे?‘ वगैरे बोलतो, तेव्हा ही अशी बोलणी दुस-याचा अवमान करणारी ठरु शकतात हे ध्यानातही येत नाही.
खूपदा असं दिसतं की लोक फणसासारखे किवा नारळासारखे वागतात. वरुन काटेरी, खडबडीत, कठीण परंतु आतून रसाळ, मधुर. अशा व्यक्तींना शब्दांचा गोड वापर जमतच नाही. ‘गोड बोलून मन जिकणं‘ वगैरे वाक्यांवर त्यांचा विश्वासच नसतो. प्रत्यक्ष कृतीद्वारे या व्यक्ती खूप जिव्हाळा, आपुलकी, सेवाभाव, प्रेमळपणा दाखवतात. पण तोंडच्या कडू, तुटक शब्दांनी, अवमानकारक स्वरांनी, वसवस ओरडण्यानं त्यांच्या सहृदय कृत्यांवर पाणी पडतं. या व्यक्ती आयुष्यात नाती जोडू वा टिकवू शकत नाहीत हेच खरं.
अवमानकारक बोलणं मग ते वैयक्तिक पातळीवर असो वा कौटुंबिक, सार्वजनिक असो वा आंतरराष्ट्रीय, कुठल्याही पातळीवर कायमच संबंध सुधारण्या पलीकडं बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतं.
दुस-याला नावं ठेवणं, कमी लेखणं किवा अगदी अनुल्लेखानं मारणं हेही एकप्रकारे अवमानकारक बोलणंच असतं.
दोन भिन्न मातांची माणसं एकत्र आली की मतभेद होणं अगदी नैसर्गिकच असतं. निरोगी नात्यामध्ये सर्व वाद, मतभेद, नात्याला कुठलीही हानी न पोचवता मिटतात. समुपदेशक तर म्हणतात की, वादाचा का होईना, पण नात्यात संवाद हवा. तरच ते नातं प्रवाही राहतं. नाहीतर त्याला साचलेपणा येतो. अर्थात यात परस्पर सन्मानाला कधीही ठेच पोचणार नाही, याचप्रकारे संवाद असावेत. तो नीट नसेल तर कटुता मनात साठत जाते आणि मग कधीतरी कोंडलेल्या वाफेसारखी बाहेर पडते. आपलेच कटू शब्द, आपलेच अवमानकारक शब्द आज ना उद्या कधी कधी तर दीर्घ कालावधीनंतरही बूमरँगसारखे आपल्यावरच उलटू शकतात याचं भान ते शब्दांचे बाण आपल्या भात्यातून बाहेर पडण्याआधीच मनाशी बाळगायला हवं.

संपादकीय *
वेळ आहे कुणाला?
सिधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून आपल्या मतदार संघातील विकास कामांकरिता पुरेसा निधी दिला जात नसल्याची तक्रार सावंतवाडी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि कणकवली मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काँग्रेस पक्षाचे कुडाळ मतदार संघाचे आमदार नारायण राणे यांच्याकडे आहे. ते सध्या राज्याचे उद्योग मंत्रीही आहेत. भाजपचे आमदार प्रमोद जठार हे विरोधी पक्षाचेच असल्याने त्यांच्या मतदार संघात पुरेसा विकास निधी दिला जात नाही, हे पक्षीय राजकारणात एकवेळ समजू शकते. पण आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही अशी तक्रार करावी लागणे हे जिल्हा नियोजन मंडळाला निश्चितच शोभादायक नाही. खरेतर सिधुदुर्गनगरीत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कोकणासाठी ५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाल्यानंतर कोकणातील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून पुरेसा विकास निधी न मिळण्याची तक्रार यावयास नको होती. पण कसे काय? त्या ५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा सर्वजण विसरुनच गेले असावेत! तीच गोष्ट जिल्हा नियोजन मंडळाला मिळणा-या विकास निधीची. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांच्या नियोजन मंडळाला दिल्या जाणा-या निधीमध्ये दुप्पटीने वाढ केली. त्यानुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील वार्षिक विकास कामांसाठी वीस ऐवजी चाळीस कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. त्यातही विशेष बाब म्हणून नारायण राणे यांच्या आग्रहाखातर आणखी वाढ करण्यात आल्याचे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले.
जिल्हा नियोजन मंडळाला राज्य सरकारकडून मिळणा-या या निधीचे वाटप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी सरकारी निकषांनुसार जिल्हा नियोजन अधिका-यांनी करावयाचे असते. त्याबाबत जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या सभेत मंडळाचे शासकीय, अशासकीय सदस्य प्रस्ताव देत असतात. त्यात डावे, उजवे ठरविण्याचे काम अर्थातच सत्ताधारी पक्षाकडे म्हणजेच पालकमंत्र्यांकडे असते. तसे करुनही कोणत्याच मतदार संघाच्या आमदारांकडून तक्रार येऊ नये. एवढा निधी जिल्ह्याला मिळालेला आहे. पण बराचसा निधी खर्च न होता. शासनाकडे परत जातो आहे. याला काय म्हणावे?
जिल्ह्यातील विकास कामे अपुरी असतांना किवा मंजूर कामे सुरुच झाली नसतांना निधी खर्च न होता परत जातो यामध्ये काय गोलमाल आहे. या विषयी याच संपादकीय सदरात पूर्वी आम्ही लिहिलेले आहे. या जिल्ह्यात काम करण्यासाठी नेमलेले पर जिल्ह्यातील सक्षम अधिकारी विकास कामे दप्तर दिरंगाईत रखडत ठेऊन निधी खर्चच करीत नाहीत. तो निधी ‘आपल्या‘ जिल्ह्यातील मंत्री, आमदारांकरवी आपल्या जिल्ह्याकडे वळविण्याचे काम मात्र इमाने - इतबारे करीत असतात. अर्थात याला काही कागदोपत्री पुरावे नसतात. सर्वजण पद्धतशीरपणे जिल्ह्याचा हा निधी वरीष्ठ स्तरावरुन पळवीत असतात हे सर्वांनाच माहिती आहे, मग आमचे लोकप्रतिनिधी किवा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य काय करीत असतात?
सर्व स्तरांवरचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या राजकीय उखाळ्या -पाखाळ्या वृत्तपत्रांतून जाहीरपणे काढण्यात मग्न असतात. सौंदर्यस्पर्धा, नाच गाण्यांचे कार्यक्रम, क्रिकेटच्या गावगन्ना स्पर्धा, स्थानिक पातळीवरच्या चिल्लर कामांची भूमीपूजने असल्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल असतात. त्यांना आपल्या जिल्ह्यात मिळणारा सरकारी विकास निधी खर्चच होत नाही याचे काहीच वाटत नाही किवा ते माहितीही नसते. अगदीच कोणी जाहीरपणे जाब विचारला तर ते संबंधीत सरकारी अधिका-यांनाच जबाबदार ठरवितात. असा हा सगळा जिल्हा नियोजनाचा घोळ वर्षानुवर्षे सुरुच आहे. म्हणूनच सरकारच्या चांगल्या योजना सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. पाणी टंचाई तीव्र होऊनही विहिरींची दुरुस्ती होत नाही. नळ योजना बंद पडतात. पावसाळा तोंडावर आला तरी जिल्ह्यात पावणे दोनशे साकव नादुरुस्त राहतात. रस्ते, इमारती दुरुस्तीची कामे सुरुच होत नाहीत. ही कामे वेळेवर पूर्ण व्हावीत यासाठीच जनतेने लोकप्रतिनिधी अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत निवडून दिलेले आहेत. त्यांनी फक्त आपापल्या गांवातील विकास कामांचा पाठपुरावा केला तरीही बरीच कामे मार्गी लागतील. पण तंटामुक्ती, निर्मलग्राम यासारख्या भंपक दिखावू कार्यक्रमापुढे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत बसण्यापलिकडे वेळ आहे कुणाला?

विशेष *
पुरस्कारालाच प्रतिष्ठा देणारे श्री. एकनाथ ठाकूर
सारस्वत बँकेचे अध्यक्ष व सिधुदुर्गाचे सुपुत्र श्री. एकनाथ केशव ठाकूर यांना बँक-विमा-अर्थशास्त्र-सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा व प्रतिष्ठेचा वा. ग. चिरमुले पुरस्कार दि.२५ मे रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आला. श्री.ठाकूर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांच्या सुहृदाने लिहिलेला हा लेख *
आजच्या घडीला देशात सर्वात मोठी व अव्वल दर्जाची सहकारी बँक म्हणून सारस्वत बँक ओळखली जाते. ९३ वर्षापूर्वी कोकणातील विशेषतः सिधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी स्थापन केलेल्या या बँकेने देशातील १७५० नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य स्थान मिळविले हे निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद सुद्धा. बँकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने सारस्वत बँकेला अखिल भारतीय बँकेचा दर्जा दिला त्यामुळे संपूर्ण देशात बँकेचा विस्तार होणार हे निश्चित. अशी ही सारस्वत बँक बलशाली होण्यासाठी बँकेचे अध्यक्ष एकनाथ केशव ठाकूर आणि त्यांचे सहकारी जी अपार मेहनत घेत आहेत ती आदर्शवत अशीच आहे.
श्री.ठाकूर यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जेव्हा सूत्रे हाती घेतली तेव्हा ३१ मार्च २०११ पर्यंत रु. २५ हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष निर्धारीत केले होते. परंतू बँकेने ते ऑक्टोबर २०१० मध्येच पूर्ण करुन मार्च २०११ पर्यंत बँकेचा व्यवसाय २७ हजार कोटींच्याही पुढे नेला.
एकनाथ ठाकूर यांचे जीवन चरित्रही प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. घरच्या गरिबीमुळे अनेक नोक-या करुन शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापिठातून उच्च श्रेणीत बी.अे.ची. पदवी मिळविली. इंग्रजी विषयांत विशेष प्राविण्य मिळविले. नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले. ठाकूर हे स्टेट बँक ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे पहिले अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रीयकरणानंतर देशातील सर्व बँक अधिका-यांचा जो महासंघ स्थापन झाला त्याचे ते संस्थापक - उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष होते. १९७७ साली युनो अंतर्गत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने पहिली जागतिक अधिकारी परिषद जिनेव्हा येथे घेतली. त्या परिषदेला भारतातील सुमारे २५ लाख अधिका-यांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यावेळच्या जनता पक्षाच्या सरकारने ठाकूर यांना पाठविले होते.
आणिबाणीच्या काळांत सर्व स्तरांवर होत असलेल्या अन्यायाने श्री. ठाकूर व्यथित झाले आणि स्टेट बँकेतील अधिकारी पदाचा राजीनामा दिला. परंतू नंतर २५ वर्षांनी त्यांची स्टेट बँकेचे केंद्रीय संचालक म्हणून केंद्र सरकारने निवड केली. ही नियतीचीच इच्छा!
स्टेट बँकेची नोकरी सोडल्यानंतर अनेक सन्मानाच्या नोक-यांच्या आलेल्या संधी नाकारुन त्यांनी आज संपूर्ण देशात विस्तार पावलेली आणि प्रसिद्ध असलेली ‘नॅशनल स्कूल ऑफ बँकींग‘ ही संस्था स्थापन करुन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची दारे उघडली व देशातील हजारो तरुण-तरुणींना बँका / विमा कंपन्या / केंद्र व राज्य सरकारी आस्थापना इ. मधून नोक-या मिळाल्या आहेत.
श्री. ठाकूर यांचे इंग्रजी, मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी भाषेतील विविध विषयावरील उत्तमोत्तम पुस्तके वाचून काढली आहेत व अजूनही त्यांचे वाचन चालूच असते. जेव्हा ते राज्य सभेत खासदार म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांचे कसदार वक्तृत्व ऐकण्यासाठी ज्येष्ठ मंत्री आणि खासदार आवर्जून उपस्थित राहत असत. त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नेमके शब्द आणि नेमकी वाक्यरचना योजून मौलिक विवेचन करणे, त्यांची स्मरणशक्ती हे त्यांना मिळालेले दैवी वरदानच होय.
श्री. ठाकूर यांचे कोकणच्या मातीशी घट्ट नातं आहे. या मातीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून आज कोकणातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. सिधुदुर्गातील अनेक शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात त्यांचे भरीव योगदान होते. आज श्री. एकनाथ केशव ठाकूर हे नांव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही सर्वदूर पसरले आहे. ते सारस्वत बँकेच्या माध्यमातून. बँकेने व्यवसायात जी गरुड भरारी घेतली आहे त्याचे सर्व श्रेय मात्र श्री. ठाकूर, बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी आणि ग्राहक यांना देतात आणि त्यामुळेच नकळत स्नेहबंध निर्माण करतात व ते जपण्याचा सदैच प्रयत्न करतात. सारस्वत बँकेचा विस्तार महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात करुन हा अश्वमेध असाच चालू रहावा यासाठी सर्व थरांतून सदिच्छा आणि सद्भावना श्री. ठाकूर व त्यांच्या सहका-यांबरोबर निश्चितच आहेत.
श्री. ठाकूर यांनी केवळ बँकेची आर्थिक बाजूच पाहिली नाही तर सामाजिक जबाबदारीचे एक नवं भान दिलं आहे. कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला केलेली मदत, ‘ताज‘वर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलेला मदतीचा हात, ग्रंथालयाच्या वाचन चळवळीला केलेले सहाय्य, आर्थिक दुर्बल घटकांना धंद्यासाठी केलेले कमी व्याजदराने केलेले अर्थसहाय्य, कै.अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना दिलेला आधार इ. अनेक बाबींमधून बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखीत करता येईल.
श्री. ठाकूर ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रांत ते यशस्वी झाले. कारण जे काही करायचे ते सर्वस्व झोकून, पूर्ण निष्ठेने व श्रद्धेने हे त्यांचे जीवन सूत्र असावे. म्हणूनच एक कुशल प्रशासक व अधिकारी, उत्तम वक्ता, यशस्वी संस्था चालक, उत्कृष्ट सामाजिक व राजकीय भान असलेला संघटक, दातृत्व जपणारा दाता, अर्थशास्त्र आणि बँकिग क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्व आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या श्री. ठाकूर यांना बँक - विमा - अर्थशास्त्र - उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा सन २०१० सालचा वा.ग.चिरमुले पुरस्कार देऊन २५ मे २०११ रोजी मुंबई येथे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गौरविले जाणार आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार पंतप्रधान मनमोहन सिग, न्या. वाय. व्ही. चंद्रचुड, दत्तोपंत ठेंगडी, विजय भटकर, रघुनाथ माशेलकर, पी. डब्ल्यू. रेगे आदी दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामध्ये आता एकनाथ ठाकूर यांचा समावेश होणे ही आम्हा कोकणवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. समस्त कोकणवासीयांच्या श्री. ठाकूर यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांना पुढील काळात मानाचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होवोत ही प्रार्थना.
- बाळ खानोलकर
निवृत्त स्टेट बँक अधिकारी, गोरेगांव (मुंबई)

मध्वानुभव *
आज ‘मध्वानुभव‘ लिहिण्यापूर्वी वाचनात आलेली एक गोष्ट प्रथम लिहिली पाहिजे. गोष्ट अशी - एक शेतकरी आपल्या मुलाला ‘शेती कॉलेजमध्ये‘ (पदवीसाठी) पाठवतो. शेतीमधील अद्ययावत ज्ञान त्याने मिळवावे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग घरच्या शेतीसाठी करावा असा हेतू असतो. चिरंजीव कॉलेजमध्ये जातात. कॉलेजकुमार म्हणून मजा करीत थोडाफार अभ्यास करीत तिस-या वर्षापर्यंत मजल मारतात. एकदा हे चिरंजीव सुटीमध्ये घराकडे येतात. बापाला खूप आनंद होतो. एके सायंकाळी बाप-लेक शेताच्या बांधावर उभे असतात. समोरच असलेल्या हिरव्यागार शेताकडे बघत ‘शेती शिक्षण‘ घेतलेला लेक बापाला म्हणतो, ‘अण्णा, तुम्ही आता जुन्या पद्धतीने शेती करायच सोडून द्या. नवीन बियाणे, भरपूर खतं, किटकनाशक वापरुन सध्यापेक्षा दुप्पटीन उत्पन्न काढू शकाल. आता हेच पहा ना समोर असलेल्या भूईमूगाच्या शेतीसाठी तुम्ही नवीन जातीचे संकरीत वाण वापरुन एन. पी. के. चा पुरेसा डोस दिला असता तर पिक तिपटीनं आलं असतं. तुम्ही किटकनाशकाचाही वापर केलेला दिसत नाही. मी भविष्यात जर शेतीसाठी गावाकडे आलोच तर ह्या ओल्ड सिस्टीमने शेती करणं मला नाही जमणार.‘
पोरगं शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या, मुंडासं घातलेल्या आपल्या बापाला ‘शेती शास्त्रातील क्रांतीकारी बदल‘ ऐकवत असतं. खेडूत बाप ‘मुकाटपणे‘ सर्व ऐकून घेतो आणि शेवटी म्हणतो, ‘पोरा, तू म्हणतोस ते सर्व खरं असेल, पण तुला एक सांगू का, तू मगापासून ज्याला भूईमुगाचं शेत म्हणतो आहेस, तो भूईमूग नसून वाटाणा आहे!!‘
सारांश, पुस्तकी शिक्षण हे जगाच्या बाजारात जगायला उपयोगी पडत नाही. जगाच्या बाजारात अनुभव खूप काही शिकवतो व हाच ‘महागुरु‘ जीवनाला ‘अर्थ‘ देतो. ही गोष्ट आज आठवण्याचं कारण म्हणजे, गेल्यावर्षी आमच्या एका स्नेह्याने शोभेचे वेल दिले. पोपटी रंगाची पाने, निळसर फुले असलेले हे वेल अंगणभर छान विस्तारले होते. एकदा एक-दोन ठिकाणचे वेल किचित सुकलेले दिसले. कुतूहुल म्हणून जवळ जाऊन पाहिले तर त्या वेलांच्या मुळ्यापासची जमीन किचित भेगाळली होती. रताळ्यासारखा दिसणारा कंद दिसला. उत्साहाने हे कंद बाहेर काढले. एकदम रताळ्यासारखेच दिसणारे हे कंद होते. पण आम्ही तर ‘शोभेचे वेल‘ लावले होते. मग त्याला रताळी कशी येतील? हा (पुस्तकी) प्रश्न सतावू लागला. बाजारात रताळी पाहिली होती, पण भूईतून नुकतीच आलेली रताळी आयुष्यात प्रथम पाहत होतो. रताळी घरात घेऊन आलो. कसले विषारी कंद असले तर काय घ्या? या विचाराने जाणकाराकडे चौकशी केली. त्यांनीही ‘रताळ्या‘बाबत अधिकृत मत प्रदर्शन केले नाही. शेवटी ४/८ दिवसांनी दारावर भाजी घेऊन येणा-या धनगरणीला समस्या सांगितली. तिने ही रताळीच असल्याचे ठामपणे सांगितले. (तिच्या डोळ्यात एवढे शिकलेले - डॉक्टर वगैरे-असून साधी रताळी ओळखता येत नाहीत हा भाव होता!) धनगरणीने ग्वाही दिल्यावर या रताळ्याचा ‘किस‘ करुन खाल्ला हे सांगणे नलगे!

हेडलीचा ‘हेडेक‘ रेगेंना!
शिकागो येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील सूत्रधार डेव्हीड हेडलीच्या कबुली जबाबामध्ये आपण मुंबई येथील राजाराम गोविद रेगे यांना भेटलो असल्याचे त्याने सांगितल्यामुळे सा-या मिडीयाच्या नजरा राजाराम रेगे यांचा शोध घेऊ लागल्या. सध्या राजाराम रेगे आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टीसाठी वेंगुर्ले इथल्या मूळ घरी आले असल्यामुळे चॅनलवाल्यांना त्यांना शोधायला आणि त्यांचा बाईट घ्यायला वेंगुर्ल्यात याव लागलं.
शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन या नावाने माहिम मुंबई येथे लॅन्ड डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीचा व्यवसाय करणा-या राजाराम रेगेंनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हीड हेडली आणि त्याचा जीम इन्स्ट्रक्टर विलास वरक याच्या सोबत शिवसेना भवनच्या बाहेर आपली भेट झाल्याचे मान्य केले. दोन वर्षापूर्वी हेडली आणि विलास वरक यांनी रेगेंना आपल्याला शिवसेना भवन आतून पहायचे आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायची आहे असे सांगितले. तेव्हा सेना भवन हे पर्यटन स्थळ नाही, त्यामुळे आतून बघता येणार नाही आणि सेनाप्रमुखांची भेट मिळणे मुश्कील असल्याचे रेगेंनी त्यांना सांगितले. त्यानंतर फोनवरुनही त्याचा संफ झाला. जवळीक वाढविण्यासाठी हेडलीने आपल्याला मुंबईत पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यासाठी रेगेंची मदत मागितली. रेगेंनी त्याला त्याच्या कंपनीची प्रोफाईल, त्याने अगोदर केलेले प्रोजेक्ट यांची माहिती कळवायला सांगितली. पण तसे प्रोजेक्टच हेडलीजवळ नसल्याने पुन्हा संफ झाला नाही. जेव्हा अमेरिकन पोलीसांनी हेडली या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला अटक केली तेव्हा आपल्याला भेटलेला माणूस हाच आहे हे कळल्यावर आपल्याला धक्काच बसल्याचे रेगेंनी सांगितले. दुस-याच दिवशी एन.आय.ए (नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजन्सी, नवी दिल्ली) या सर्वोच्च संस्थेने त्यांची चौकशी केली. त्यास रेगेंनी संपूर्ण सहकार्य केले होते.
सेनाभवनाच्या बाहेर हेडलीची भेट झाल्याचे रेगेंनी कबुल केले असले तरी आपण शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, आपल्याकडे कोणतेही पद नाही. आपण फक्त समाजसेवेसाठी शिवसेनाभवनमध्ये जात होतो असे सांगितले. या हेडलीच्या कबुली जबाबामुळे राजाराम रेगे एका दिवसात ‘मिडिया स्टार‘ झाले तरी त्यांची सुट्टी खराब झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

बातम्या *
एस. टी. ६३ वर्षांची झाली!
महाराष्ट्राची एस.टी. ३१ मे रोजी ६३ वर्षे पूर्ण करीत आहे. देशातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेले एस.टी.महामंडळ खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेमुळे आज चौथ्या क्रमांकावर गेले आहे. (कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर आहेत.) १ जून १९४८ रोजी निरनिराळ्या १५० मार्गावर एसटीची वाहतूक सुरु झाली आणि हळूहळू विस्तार होऊन १९७४-७५मध्ये राज्यात प्रवासी वाहतुकीचे संपूर्णपणे राष्ट्रीयीकरण झाले. प्रवासी सेवेची गुणवत्ता, रस्ता तेथे एसटी या उद्दिष्टपूर्तीसाठी सेवेचा विस्तार महामंडळाने केला.
१९८८च्या सुधारित मोटार वाहन अधिनियमानुसार पर्यटन बस परवाने मुक्तपणे देण्यात येऊ लागल्याने खासजी बसच्या संख्येत वाढ होत गेली. तसेच जीप, मॅटाडोर, सुमो, टेम्पो, ट्रॅक्स आणि मॅक्सीकॅब, तीन आसनी, सहा आसनी रिक्षा ही वाहतुकीची साधने छोट्या अंतरासाठी वापरली जातात. शिवाय स्वतःची दुचाकी वाहने असणा-यांची संख्याही प्रचंड वाढली. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. महामंडळ दररोज एक कोटी प्रवाशांची वाहतूक करु शकते. मात्र आज ५८ लाख प्रवासीच रोज एसटीचा लाभ घेत आहेत.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे बुडणारे उत्पन्न, डिझेल आणि अन्य सामानाच्या खरेदीमूल्यात होणारी वाढ, सामाजिक बांधिलकी -मुळे दुर्गम तसेच किफायतशीर नसलेल्या मार्गावर चालवाव्या लागणा-या बंधनकारक वाहतुकीमुळे होणारा तोटा, शहरी वाहतुकी -मुळे होणारा तोटा, अन्य राज्यांच्या तुलनेत प्रवासी कराचा अधिक दर या प्रमुख कारणांमुळे एसटीच्या तोट्यात वाढ होत गेली.
एस.टी. वार्षिक ६० कोटी रुपये टोल भरते. त्याचप्रमाणे शासनही एसटीच्या तिकिटातून प्रवाशांकडून १७.५० टक्के कर वसूल करते. विविध सवलतींचे १ हजार कोटी रुपये शासन एसटीला देणे आहे. ती मिळाल्यास एसटीची आर्थिक स्थिती सुधारेल,असे कामगार संघटनेचे मत आहे. सध्या कर्मचा-यांची सहनशीलता आणि प्रवाशांचे सौजन्य या भांडवलावरच एसटीचा कारभार सुरु आहे. राज्यात खासगी वाहतूकदारांकडे ९९ हजार बसेस आहेत. ४५ हजार जीप, ट्रॅक्सी दररोज प्रवाशांची वाहतूक करतात. याउलट एसटी महामंडळाकडे १६ हजार बसगाड्या वापरात आहेत.
एसटी महामंडळ १९८८ पर्यंत देशात आघाडीवर होते. राज्यांतर्गत एसटीने प्रवासाचे प्रमाण ८५ टक्के होते. तिकिट व्यवस्थेचे संगणकीकरण, नवीन आरामदायी गाड्यांचा वापर इत्यादी सुधारणा केल्या आहेत. पण खाजगी करणा-या वाटेने चाललेल्या एसटीला हे उपाय तारतील काय?

नगरपरिषद निवडणूक डिसेंबरमध्ये
नगरपरिषदांच्या पंचवार्षिक निवडणुका डिसेंबर २०११मध्ये होणार असून त्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांबरोबरच एप्रिल २०१२ पर्यंत मुदत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने बहुसंख्य पुरुष उमेदवारांचे निवडणुकीत उतरण्याचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.
आरक्षणाचाी सोडत येत्या जूनमध्ये काढण्यात येणार असून त्यानंतरच उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु होईल. सभागृहात लोकप्रतिनिधींच्या निम्मे संख्या महिलांची राहणार असल्याने सध्या महिला उमेदवारांचा शोध सुरु झाला आहे. बहुसंख्य राजकारणी आपली, पत्नी, भावजय, बहीण, मुलगी यांपैकी कोणाला तरी उमेदवारी मिळावी यासाठी व्युहरचना करु लागले आहेत.

निधन वृत्त *
डॉ.शामसुंदर परुळेकर
कुडाळ-उद्यमनगर येथील रहिवासी जुनेजाणते डॉ. शामसुंदर कृष्णाजी परुळेकर (७२) यांचे १८ मे रोजी अल्प आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
मूळ वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील रहिवासी असलेले डॉ. परुळेकर यांनी १९६५ मध्ये कुडाळ शहरात जुन्या बसस्थानकानजिक आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. गेली ४५ वर्षे त्यांनी रुग्णांची सेवा केली. ग्रामीण भागात रुग्णांच्या घरी जाऊनही ते सेवा द्यायचे. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सांस्कृतिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. आयुर्वेदिक अभ्यासक्रमा -नंतरच्या पदवीमध्ये त्यांना अॅवॉर्ड मिळाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आर्किटेक्ट मंदार परुळेकर व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मकरंद परुळेकर, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सुधा कुर्ले

वेंगुर्ले-माणिक चौक येथील सौ.सुधा वासुदेव कुर्ले (७१) यांचे १७ मे रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव कुर्ले यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment