Saturday 18 June, 2011

अंक २२वा, २६ जून २०११

विशेष संपादकीय

पंत!
तसे ते आमच्याहून सुमारे चाळीस वर्षांनी मोठे. ‘किरात‘ मुद्रणालयाशेजारीच त्यांचे घर. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांना पहात आलोय. सावळा वर्ण, स्वच्छ धोतर, सदरा आणि गांधी टोपी असा वेश. तरतरीत चाल, स्थूल नसले तरी एकूणच भारदस्त व्यक्तिमत्व.
आठवीपासून अकरावीपर्यंत भटवाडीच्या आमच्या घरापासून पाटकर हायस्कूलमध्ये आम्ही चालतच जायचो. साहजीकच इतक्या लांबवरच्या जाता-येतानाच्या चालीत कधीमधी मित्रांसोबत वागण्या बोलण्यात वाह्यातपणा असायचा. पण, मारुतीच्या देवळापाशी आल्यावर तो आपोआपच थांबायचा. एकतर प्रेसमध्ये वडील बहुतेकदा असायचे पण पंतही अनेकदा तिथे असायचे किवा त्यांच्या घरापासून मार्केटपर्यंत कुठेतरी वाटेत दिसायचेच. त्यांचे आडनावच तेवढे माहित होते. ते करतात काय? गावात त्यांचे स्थान काय हे कळायचे तेव्हा वयच नव्हते. पण त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा वाटायचा.
हायस्कूल संपले, कॉलेज जीवन सुरु झाले आणि मग गावातल्या कुठल्या कुठल्या सभा, संमेलनात जात असू तेव्हा गावातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसायचा. तेव्हा ते वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाह होते. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘किरात‘ प्रेसच्या छपाई कामांच्या संदर्भात अनेकदा त्यांच्यासमोर जावे लागायचे. वाचनालयात पुस्तके घेण्यासाठीही जायचो. कथा-कादंब-यांचा भर ओसरुन वैचारिक साहित्याची आवड निर्माण झाली होती. एकदा त्यांनी कसली पुस्तके वाचतोस म्हणून विचारले तेव्हा इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर, आचार्य अत्रे अशी काही नावे सांगीतली. त्यावर त्यांना खूपच समाधान झाल्याचे जाणवले. म्हणाले, अशीच चांगल्या मोठ्या लेखकांची चांगली चांगली पुस्तके वाचीत जा. तुला वर्तमानपत्र चालवायचे असेल तर भरपूर वाचन हवे. त्यांचा हा सल्लावजा उपदेश आम्हाला खूपच उपयोगी पडला.
पत्रकारितेत आम्ही उमेदवारी करीत असतांनाच अल्प आजाराने वडिलांचे निधन झाले. प्रेस आणि ‘किरात‘ची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर आली. तेव्हा ते जाता येतांना हाक मारुन विचारपूस करीत. धीर देत. काही लागलं सवरलं तर सांग म्हणत. कधी वेळ असला तर बसून जुन्या आठवणी सांगत. ‘किरात‘शी आणि आमच्या वडिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कधीकधी दोघांचे शाब्दीक भांडणही व्हायचे. पण ते व्यक्तिगत कधीच नसायचे. गावातील कुठल्यातरी घटनेवरुन झालेला तो वाद-विवाद असायचा. थोड्याच वेळात ते सगळे विसरुनही जायचे.
त्यांनी मध्यंतरीच्या काळात ‘किरात‘ची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. ‘किरात‘चे संस्थापक आमचे आजोबा मुंबईतल्या प्रसिद्ध ढवळे प्रकाशनाकडे पुस्तके लिहिण्यानिमित्ताने बराच काळ मुंबईत असायचे. तेव्हा आमच्या वडिलांना प्रेस,‘किरात‘ आणि कौटुंबिक जबाबदारी त्यात ‘किरात‘वरील दाव्यांमुळे कोर्ट कचे-या हे सर्व जड जात असे. पण ‘किरात‘चे प्रकाशन नियमित रहावे यासाठी त्यांची धडपड असायची आणि तेव्हा अनेक महत्त्वाच्या कामी ते आमच्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संपादनाची आणि विविध विषयांवरील लेखनाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. ‘किरात‘च्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत त्यांचाही मोलाचा सहभाग होता.
त्याकाळी ते अनेक कामांत खूपच व्यस्त असायचे. स्वातंत्र्य लढ्याचा तो काळ ते स्वतः काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पाईक, त्यातच अनेक सामाजिक संस्थांची कामे. घरी सदैव लोकांचा राबता. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग हे सगळे आम्ही प्रत्यक्ष पाहिले नसले तरी त्यांच्या समकालीन लोकांकडून नंतर ऐकलेले. साहजिकच त्यांच्या विषयीचा आदरभाव दुणावलेला.
गावातल्या कोणा महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या घरी त्यांची उपस्थिती असायची. त्या दुःखद शोकाकुल वातावरणात त्या व्यक्तीच्या आठवणी, मोठेपण, याविषयी ते सांगायचे. त्याबरोबरच स्मशानयात्रेतील किवा स्मशानातील काही घडलेल्या गंमती सांगून वातावरणातील शोकाकूल ताण कमी करायचे.
त्यांचा असा गप्पिष्ट स्वभाव फारसा कोणाला माहिती नसावा. पण त्यांच्या समकालीन स्नेह्यांना आणि विविध कारणपरत्वे त्यांच्या सहवासात आलेल्यांना त्यांच्याशी होणा-या गप्पांमधून खूप नवनवीन माहिती समजायची आणि तेव्हा हे करारी, बाह्यतः तामसी दिसणारे व्यक्तिमत्व श्रद्धा, प्रेम आणि करुणा यांनी किती ओतप्रोत भरलेले आहे हे जाणवायचे.
असे हे आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या सार्वजनिक कार्यामुळे आपले नाव मागे ठेवून गेले. वेंगुर्ल्याच्या इतिहासात त्यांचे नाव ठळकपणे नोंदले जावे असेच त्यांचे कार्य होते. त्यांची जन्मशताब्दी लोकांना आठवण रहावी या पद्धतीने त्यांच्या कुटुंबियांकडून साजरी होत आहे.
वेंगुर्ल्याचे एकेकाळी भूषण असलेले परंतू अलिकडच्या काळात संपूर्ण रया गेलेले सेंट लुक्स हॉस्पीटल नवीन व्यवस्थापनाखाली पुन्हा एकदा उभारी घेत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुठेही नाही अशा प्रकारचे आय.सी.यू. युनिट (अतिदक्षता विभाग) त्यांच्या मुलामुलींनी हॉस्पीटलला, पर्यायाने वेंगुर्ल्याला उपलब्ध करुन दिले आहे. त्याला पंतांचेच नाव दिले आहे आणि हॉस्पीटलच्या प्रसुतीगृहाचे संपूर्ण नूतनीकरण करुन त्या विभागाला आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करणा-या आईचे कै. सौ. लक्ष्मी यांचे नाव दिले आहे. या दोन्ही विभागांचा नामकरण सोहळा पंतांच्या शताब्दी दिवशीच होत आहे. हे दान रुग्णसेवेसाठी आहे. देणा-यांनी निरपेक्ष भावनेने ते दिले आहे. पंतांच्या समाजकार्याची स्मृती जपणा-या या देणगीचा लोकांना अव्याहत उपयोग व्हावा याची जबाबदारी आता हॉस्पीटल व्यवस्थापनाची आहे. तेच पंतांना खरे अभिवादन ठरेल!
श्रीधर मराठे


विशेष लेख -
बाबा तुमच्यासाठी
प्रिय बाबा,
स. न. वि. वि.
आज खूप वर्षांनी पत्र लिहितेय तुम्हाला. खूप नियमित पत्र लिहायची मी तुम्हाला. पण, ती चौकशी करण्यासाठी आणि आम्हा सगळ्यांची खुशाली कळवण्यासाठीच असायची. माझ्या मनातले विचार सांगण्यासाठी किवा कधी तुमचा सल्ला ऐकण्यासाठी असा संवाद फारसा झालाच नाही. आज तुमच्या शंभराव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी ते सांगायचा प्रयत्न करतेय, त्यासाठी हा पत्राचा घाट.
आमचा लहानपणाचा काळ हा अगदी वेगळा होता. आजच्यासारखं वडील-मुलांच्या प्रेमाचे उक्तीने वा कृतीने प्रदर्शन करण्याची तेव्हा फारशी पद्धत नव्हती आणि तशी गरजही नसायची. आपल्याकडे तर ती अजिबातच नव्हती. त्यामुळेच अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी आमचा आपल्याशी संवाद असायचा तो आईच्या माध्यमातून, त्यामुळे आम्ही तुमच्यापासून दूरच राहिलो. नंतरच्या आयुष्यात तेव्हा थोडी संवाद साधण्याची मानसिकता तयार झाली तोवर आम्ही तुम्हा दोघांपासून खूपच दूर निघून गेलो आणि बोलायचं सगळं राहूनच गेलं! आता थोडं बोलायचा हा प्रयत्न.
‘बालपणीचा काळ सुखाचा‘ असं म्हटलं जातं. पण आमच्यासाठी ते तितकं सुखाचं कधी नव्हतंच. असंख्य अडचणींच्या आगारात आमचं बालपण, शिक्षण, संगोपन, संस्कार या सगळ्याच गोष्टी तशा अवघडच होत्या. खरं म्हणजे आमच्या पिढीत ब-याच लोकांना अशा या ना त्या प्रकारच्या अडचणी सोसाव्याच लागल्या. त्यामुळे तेही तसं विशेष नव्हतं. मात्र तुम्ही व आई दोघांनीही ज्या प्रकारे परिस्थितीला तोंड दिलंत त्यामुळे आम्ही तेव्हाही खरंच खूप चांगलं आयुष्य जगलो असंच आजही वाटतंय. तुम्हा दोघांच्या परस्पर सहकार्यामुळे आणि समजुतदारपणामुळे अवघड गोष्टीही खूपच सोप्या झाल्या.
तुमची शिस्तबद्ध दिनचर्या, नेमस्त जेवण्या-खाण्याच्या सवयी आणि आहे त्या परिस्थितीत स्वाभिमानाने, खंबीरपणाने, आत्मविश्वासाने वागण्याची रीत या सगळ्याच गोष्टी न बोलताही खूप काही शिकवून गेल्या. खरं म्हणजे त्या न कळत्या वयात आजूबाजूला दिसणारं वैभव डोळे दिपवणारं असायचं! खूप कुतूहलाच्या, नवलाईच्या आणि आकर्षित करु शकणा-या गोष्टींची रेलचेल बघत होतो. त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणं अगदी सहज शक्य होतं. मात्र त्याचा मोह कधीच झाला नाही. उलट त्याविषयी एक अलिप्त भावच कायम मनात असायचा, जो आजही तसाच असतो. आता कळतय तुम्ही किती सहजपणाने आम्हाला खूप मौलिक धडा घालून दिलात. या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपण काही कमी आहोत, आपल्याला काही अप्राप्य आहे असा कोणताही न्यूनगंड मनात निर्माण झाला नाही, तसेच कुठल्याही गोष्टीबद्दलची असोशीही निर्माण झाली नाही.
खरं सांगू बाबा,खूप चिडके होतात तुम्ही! तुमच्या रागाच्या भीतीने तुमच्यापासून आणखी चार पावलं दूर गेलो. पण तुमचं रागावणं का होतं हे आम्हालाही हळूहळू समजत गेलं आणि त्यामुळे त्याची भीती जरी वाटायची तरी ते चीड निर्माण करणारं ठरलं नाही. संतापी वडिलांच्या अनेक कथा ऐकत होतो. बघतही होतो. मात्र तुमच्या संतापी स्वभावाने बिथरुन जाऊन कोणताही टोकाचा किवा अविचारी निर्णय घेण्याचा विचारही कधी मनात आला नाही.
मला माहीत आहे बाबा, त्या काळात तशी पद्धत नव्हती आणि तुम्ही ज्या पद्धतीने वाढलात त्यात ते अपेक्षितही नव्हतं, त्यामुळेच तुमच्या व्यक्त प्रेमाचा अनुभव आम्हाला घेता नाही आला, पण तरीही तुमची आमच्याबद्दलची काळजी, हळवा भाव तुमच्या छोट्या छोट्या कृतीतून आमच्यापर्यंत पोहोचत होता. अर्थात तो पोहोचण्याच्या बाबतीत आईची भूमिका खूपच महत्वाची होती आणि ते तुम्हालाही माहीत होतं आणि आम्हालाही.
आमच्या समजुतीच्या काळात मोठे भाऊ बाहेर त्यांच्या शिक्षणात वगैरे व्यस्त होते. आम्ही चौघंही लहान व शिकणारी भावंडे. खूप अडचणीतून जात होता तेव्हा तुम्ही. तुमचा तेव्हा किती कोंडमारा होत असेल हे आता कळतं. तेव्हा ते वयही नव्हतं आणि परिपक्वताही नव्हती. मात्र तुम्हा दोघांची साथ आहे या एकाच आधारावर आम्ही सर्व अडचणी पचवत होतो. मात्र आजही आठवतं तेव्हा आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की, त्या सगळ्या परिस्थितीत आई इतकी सोशीक व शांत कशी राहू शकली? ती तुमच्याशी कडाडून भांडतांना किवा तुमच्या मागेही तुमच्याविषयी आम्हाला काही ऐकवताना कधीच आढळली नाही. सगळं समजून उमजून सोसत होती आणि आम्हालाही तसंच वागायचा संदेश आपल्या कृतीतून देत होती. आईच्या वागण्या वावरण्याने खूप प्रश्न सोपे झाले होते निश्चितच. पण बाबा तुम्हाला माहित होतं किवा नाही, मला माहित नाही, मात्र आम्हाला हे माहीत होतं की, या सगळ्याचं श्रेय आई तुम्हालाच देत होती. ती म्हणायची, ‘‘संकटाच्या काळात घरचा कर्ता पुरुष जेव्हा कुटुंबासोबत राहून संकटं धैर्याने झेलतो तेव्हाच कुटुंब त्यातून यशस्वीपणाने तरुन जातं.‘‘ किती खरं होतं तिचं म्हणणं, हे खूप उशिरा कळलं. आज मात्र ठायी ठायी या म्हणण्याचा प्रत्यय येतो. तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला जगण्याची दिशा आणि बळ तर मिळालंच, पण संकटकाळातही कुठेही न भरकटता शांतपणाने व धैर्याने कसं पार पडता येतं याचा एक मौलिक धडाच आम्हा भावंडांना दिला. आज सभोवतालच्या समाजाचं भरकटलेलं स्वरुप, दिशाहीनता, संयमाचा आणि विवेकाचा अभाव हे सगळं बघताना लक्षात येतं की तुम्ही दोघांनी आम्हाला खरंच किती मोठी शिदोरी दिली होती. याचमुळे पुढच्या आयुष्यात अनेक संकटांना, अडचणींना न डगमगता तोंड देणं आम्हाला शक्य झालं.
कोणत्याही मनाला पटलेल्या गोष्टीत स्वतःला झोकून देणं हे तुमचं आणखी एक वैशिष्ट्य! आमच्या लहानपणीची तुमची काँग्रेसनिष्ठा व त्यापायी करीत असलेली धावपळ आम्ही बघत होतोच, पण सोसतही होतो. मात्र जीव तोडून केलेल्या या राजकारणाच्या सेवेत तुम्ही स्वतःसाठी निदान एका मुलासाठी तरी काही मिळवायला हवं होतं असं मला तेव्हा खूप वाटत असे. तुम्ही मात्र तसा कधी विचारही केला नाहीत. उलट त्यासाठी घरातल्या आमच्या घासातला अर्धा घास प्रसंगी पुढे केलात. खूप राग यायचा तेव्हा, अर्थातच मनातल्या मनात. आम्ही बहिणींनी तर तेव्हाच निश्चय केला होता की, या असल्या पदरमोडीच्या आणि मनस्तापाच्या फंदात कधी पडायचं नाही. मी तुम्हाला असं कितीही म्हणले तरी, ‘अच्छा है कुछ ले जानेसे देकरही कुछ जाना‘ ही तुमची वृत्ती नकळत मनात रुजलीच.
खरं म्हणजे बाबा! आमचा जितका राग तुमच्या राजकारणावर होता तितकाच तो तुमच्या समाजसेवेवरही होता. कोणालाही कोणतीही अडचण आली की, अगदी हक्काचं घर म्हणजे तुमचं घर! कोणाला कशाची माहिती दे, कोणाचे अर्ज लिहून दे, कोणाला हक्काची मदत मिळवून दे, हे तुमचं आपलं चाललेलंच असायचं. मग काय तुमचं मोफत सहाय्य केंद्र अगदी गजबजलेलं असायचं. तुमचा स्वभाव तुमच्यापेक्षा बाकी लोकांनाच अधिक समजला होता व त्याचा फायदाच नाही तर गैरफायदाही लोकांनी पुरेपूर घेतला. आपल्या पायलीभरातलं पसाभर देणं हे अगदी योग्यच आहे पण तुम्ही संत वाङमयाचे गाढे व्यासंगी, तुमचं आपलं ‘आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको‘ ही अनंत फंदींची शिकवण अनुसरणं चालू असायचं आणि मग कधीकधी घरात आमची जी अवस्था व्हायची त्याला तोड नाही.
बघा बोलायला घेतलं आणि अगदी भरकटतच गेले की, खूप लांब झालं पत्र. आता आवरतं घेते, मात्र जाता जाता एक गोष्ट सांगायलाच हवी, तुम्हा दोघांचा वाचनाचा छंद हा आम्हाला तुम्ही दिलेला सगळ्यात मोठा धनाचा साठा. मोकळा वेळ चांगल्या वाचनात घालवण्याचा तुमचा छंद आमच्याही अंगवळणी इतका पडला की तो अगदी जिवाभावाचा सखाच झाला आहे. कितीही दमायला, कंटाळायला अगदी चिडायला झालं तरी छान काही वाचण्यासाठी असेल तर सगळं जगच विसरायला होतं. अगदी टी.व्ही.च्या भुक्कड मालिकासुद्धा.
शेवटी इतकंच सांगेन, आज आम्ही जिथे, जसे आहेत तिथे अगदी समाधानात आणि आनंदात आहोत. मात्र आठवण सदैव येतच असते आणि विशेषतः जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा तर खूपच आठवण होते. कारण आम्ही आजवर जे काही यश, मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळवली त्याच्यामागे तुम्हा दोघांच्या पुण्याईचा, सच्चेपणाचा आणि निर्व्याज समाजसेवेचा जितका प्रभाव होता तितकाच तुमच्या आमच्यासाठी असलेल्या आशीर्वादाचाही होता. तुमचे आशीर्वाद आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला असू द्या इतकेच मागणे.
तुमची,
उषा.

तेथे कर माझे जुळती!
श्री. विष्णु गणेश तथा विष्णूपंत नाईक यांचा १७ जून १९११ रोजी वेंगुर्ले येथे सुखवस्तू कुटुंबात जन्म झाला. बालपण तसं लाडाकोडातच गेलं. वेंगुर्ले हे मुळातच गजबजलेले व्यापारी शहर आणि त्या काळातही शिक्षण, सांस्कृतिक जीवन, धार्मिक समारंभ या सर्वच बाबतीत सुधारलेले या गटात मोडत असल्यामुळे बालवयात या गोष्टींचा त्यांना फारच फायदा झाला.
वेंगुर्ल्यात त्या काळातही मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणाची सोय असल्यामुळे शिक्षण यथावकाश, व्यवस्थित सुरु झाले. मात्र हा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ असल्यामुळे व सर्व देशभर सुरु असलेल्या स्वातंत्र्य चळवळीत हे पुढारलेले गाव मागे राहणे शक्यच नसल्यामुळे शिक्षणाच्या मधल्या टप्प्यात इंग्रजांच्या शाळांवर बहिष्काराची जी चळवळ सुरु झाली. त्या दरम्यान विष्णुपंतांनी वेंगुर्ल्यात दे.भ. आबा वालावलकरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या शाळेतच कै. नारायण सिताराम आरोसकर हे गुरु म्हणून लाभले. त्यांनी त्या काळात दिलेले संस्कृतचे धडे व तसेच शिस्तीचे धडे हे पुढे जन्मभराची शिदोरी ठरली. (कै.नारायण आरोसकरांची मुलगी सुधा माझी पत्नी झाली व माझी बहिण सुधा त्यांची सून झाली.) या संस्कृतच्या शिक्षणाच्या पक्क्या पायाच्या आधारावरच नंतर आयुष्यभरात अनेक संस्कृत ग्रंथांचा केलेला अभ्यास अगदी पदव्युत्तर स्तरावरच्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकणारा होता.
त्या काळात मॅट्रिकची परीक्षा मुंबईत जाऊन द्यावी लागत असे. त्यांच्या प्रकृतीला या परिक्षेसाठीचा प्रवास व दगदग फारशी मानवली नाही व आजारपणाला तोंड देणे भाग पडले. परिणामी, शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवण्याच्या बाबतीत नाराज असलेल्या त्यांच्या वडिलांनी पुढचे शिक्षण घेऊन किमान पदवीधर होण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली नाही व म्हणून क्षमता असून, प्रबळ इच्छा असूनही त्यांनी आपली ही इच्छा सोडून दिली व वडिलांच्या इच्छेप्रमाणे घराची जबाबदारी स्विकारली. शिक्षणाची अपुरी राहिलेली आपली इच्छा त्यांनी बंधू कै. महादेव गणेश नाईक यांना एल.एल.बी. व नंतर त्यांच्या इच्छेनुसार बी.टी.पर्यंत शिक्षण देऊन पूर्ण केली. स्वतःच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा, परिस्थिती प्रतिकूल असूनही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास शक्य ते प्रोत्साहन दिले.
शिक्षण जरी जास्त घेता आले नाही. तरीही अंगीकृत बुद्धिमत्ता व ग्रहणक्षमता, मराठी, संस्कृत व इंग्रजी या तिन्ही भाषांवरील प्रभुत्व यामुळे वाचनाची आवड फार मोठी होती व त्यामुळे व्यासंगही गाढा होता. संत वाङमय, ज्ञानेश्वरी यांचा अभ्यासाच्या बाबतीत त्या काळात तरी त्यांची बरोबरी करणारी व्यक्ती गावात नव्हती असेच म्हणावे लागेल. एम.ए.चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी शिकविण्याचे काम त्यांनी त्या काळात केले होते.
वाचनामुळे वक्तृत्व व लेखन गुणही त्यांच्याकडे होते. प्रसंगानुरुप वक्तृत्व व प्रसंगानुसार काव्य वा गद्य लेखन हा त्यांचा हातखंडा होता. इ.स.१९२२ पासून वेंगुर्ल्यातून प्रसिद्ध होणा-या ‘किरात‘ साप्ताहिकामध्ये अनेक वर्षे संपादकीय मजकूर लेखनाचे काम विष्णुपंतांनी केले होतेच व तेव्हाचे संपादक कै.के.अ.मराठे यांच्याबरोबरीने या साप्ताहिकासाठी अन्य कामही केले होते. याखेरीज काव्य, लेख, कथा, नाटके या प्रकारचे लिखाणही त्यांनी केले होते. मात्र ते साहित्य अप्रकाशित व दुर्लक्षितच राहिले व काळाच्या ओघात नष्टही झाले.
आवाजाची देणगी त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली होती. आवाजातला नैसर्गिक गोडवा, उत्तम उच्चार, असंख्य अभंग, भजनांचे पाठांतर यामुळे अनेक धार्मिक समारंभात व पालखीच्यावेळी भजनांसाठी त्यांची उपस्थिती अपरिहार्य अशीच असे. त्यांचे आवडते दैवत म्हणजे ‘विठ्ठल रखुमाई‘ या मंदिरात वर्षातून दोनवेळा होणारी काकड आरती न चुकविण्याचा त्यांचा कटाक्ष असे. शिवाय दर महिन्यात एकादशीच्या दिवशी प्रवचन करण्याचा रिवाज त्यांनी अनेक वर्षे पाळला होता. ते उत्तम किर्तनकार होते. अनेक वर्षे मारुती मंदिरात हनुमान जन्माच्यावेळचे किर्तन तेच करीत असत.
सामाजिक कार्य हा जणू त्यांचा छंदच असावा इतके ते त्यात समरसून जात. अतिवृष्टी, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत किवा अशाच अन्य आपत्तीत शक्य ती मदत अगदी सहजभावनेने देऊ करीत, त्यामुळेच अशा प्रसंगी किवा अन्य प्रसंगी गरजूंना सरकारी मदत मिळवून देण्याचं मोफत मदत केंद्र आमच्या घरात सदैव चालूच असे व अशा अनेक प्रसंगी कित्येकांना चहा-जेवणही देतांना त्यांचा हात मागे नसे. अर्थात त्याचे चटके घरातल्या व्यक्तींना किती सोसावे लागले याबाबत न बोलणेच बरे!
ऐन तारुण्याचा काळ हा स्वातंत्र्यपूर्ण काळ. त्यामुळे त्याकाळात चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात न पडणे हे त्या काळच्या सुजाण तरुणाला शक्यच नव्हते. हेही त्याला अपवाद नव्हते. मात्र, त्याच वेळी आजारी वडिलांची जोखीम व संपूर्ण कुटुंबाची एकट्याच्या शिरावर असलेली जबाबदारी याचं भान बाळगणं भाग होतं. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणे बेजबाबदारपणाचे ठरले असते, म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यात त्यांना छुपेपणाने सहभागी व्हावे लागले व त्यासाठी भूमिगत होणेही भाग पडले.
स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्या काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने गावाचा शक्य तितका विकास साधावा या हेतूने अनेक वर्षे काँग्रेसचे काम अगदी तळमळीने व कार्यक्षमतेने केले. मात्र नंतरच्या काळातली त्या पक्षाची तत्वे मानवणारी नाहीत हे लक्षात आल्यावर त्याच निग्रहाने काँग्रेसचा त्याग केला.
गावाला अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने जे जे काही करणे आवश्यक वाटले अशा सर्व गोष्टींचा विष्णूपंतांनी सतत पाठपुरावा केला व त्यामुळेच त्या काळात गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक गरजा भागविणा-या पाटकर हायस्कूल, कन्याशाळा, मंगेश विद्यालय या माध्यमिक शिक्षण देणा-या नावाजलेल्या संस्थांना सतत मदत, मार्गदर्शन केलेच व त्या शाळांच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. गावातील १०० वर्षांपेक्षा जुन्या अशा प्राथमिक शाळांनाही योग्य ती मदत मार्गदर्शन करीत राहिले.
गावात महाविद्यालय असणे ही त्यांची अगदी अनेक वर्षांची तीव्र इच्छा होती व जेव्हा बॅ.बाळासाहेब खर्डेकर, प्राचार्य एम.आर.देसाई हे कोकणात महाविद्यालय स्थापन करता येईल का याची पाहाणी करण्यासाठी सावंतवाडी येथे येणार असल्याचे कळले तेव्हा स्वतः सावंतवाडी येथे जाऊन वेंगुर्ला हे त्यासाठी किती योग्य ठिकाण आहे हे त्यांना अशाप्रकारे पटवून दिले की, दक्षिण कोकणातलं पहिलं महाविद्यालय वेंगुर्ल्यात सुरु झालं. आजवर या महाविद्यालयातून हजारो तरुण पदवीधर होऊन निरनिराळ्या व्यवसायात, उद्योग, नोकरीत स्थीर झाले आहेत.
गावातले वाचनालय हे गावाच्या सुसंस्कृतपणाचा व विचार समृद्धतेचा आरसा असतो. आमच्या गावात त्या काळात असे १०० वर्षे जुने वाचनालय होते ही गावाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. या वाचनालयाच्या जीर्णावस्थेच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यात त्यांनी अनेक वर्षे काम केले व विशेषतः १९६६ ते १९८१ या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी कार्यवाह पदावर काम करतांना संस्थेला जी शिस्त लावली व एक नेमस्तपणा व आकार दिला तो अगदी कौतुकास्पद असाच होता. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत वर्णन करण्याच्या पलिकडची होती. या काळात संस्थेच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी व विशेषतः आज ज्या नवीन इमारतीत नगर वाचनालयाचा कारभार चालतो त्या इमारतीसाठी विविध थरातील लहान-मोठ्या व्यक्तींकडून देणग्या व तत्सम मदत मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या सहकार्याने घेतलेली जिवापाड मेहनत याचे आम्ही सर्वच कुटुंबीय साक्षीदार आहोत.
गावातील विविध सामाजिक कार्यक्रम आयोजनात त्यांचा सहभाग मोलाचा असे. गावाच्या विकासासाठी होणा-या कोणत्याही कार्यक्रमात किवा बैठकीत त्यांची हजेरी ही अगदी अपरिहार्यच होती. वानगीदाखल सांगायचे तर १९६० सालात वेंगुर्ले येथे झालेले कोकण विकास परिषदेचे आयोजन. या परिषदेच्या प्रारंभापासून ते यशस्वीपणे पार पडेपर्यंत विष्णुपंतांचे प्रत्येक गोष्टीतले नियोजन अगदी वाखाणण्याजोगे होते. इतकेच नाही तर या कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतः रचलेली ‘ईशस्तवन‘ व ‘स्वागतगीत‘ या दोन्ही रचना आजही वाचतांना गहिवरायला लावतात. याच परिषदेदरम्यान कोकण वासियांच्या रेल्वेच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नालाही वेग देण्याचा प्रयत्न झाला होता व त्यावेळच्या समविचारी राजकारण्यांच्या मदतीने याबाबत खूपच वाटचालही केली गेली. कोकणच्या बहुसंख्य लोकांना शिक्षण, रोजगार या सर्वच गोष्टींसाठी मुंबईकडे धाव घेणे अपरिहार्य होते. मात्र डोंगरद-यांच्या या प्रदेशातील एस.टी.बसचा १४-१६ तासांचा खडतर प्रवास हा एक भयंकर अनुभव असे. साहजिकच आगगाडीचा सोपा प्रवास आपल्याला लाभावा ही प्रत्येक कोकणवासियांच्या अंतरीची आस होती. हे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी त्यावेळच्या राजकर्त्यांना सतत जागते ठेवण्यासाठी झटणा-यांमध्ये विष्णुपंत अग्रणी होते. आज या कोकण रेल्वेचा सुखकर प्रवास उपभोगायला ते नाहीत.
गावात त्या काळात कार्यरत असणा-या सर्वच संस्थांशी विष्णुपंतांचे सहकार्याचे संबंध होते. त्या काळात गावाचे वैभव असणारे सेंट लुक्स हॉस्पिटल हेही त्याला अपवाद नव्हते. येथे कार्यरत असणारे डॉ.सव्र्हड व डॉ.सिटन हे तसेच त्या काळात या रुग्णालयात निष्णात शल्यविशारद म्हणून कार्यरत असलेले डॉ.सत्राळकर हे त्यांचे अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे मित्र होते.
सर्वात शेवटी उल्लेख करावयाची महत्त्वाची बाब म्हणजे गावातील कुठल्याही गरजू माणसाने कोणत्याही वेळी, अगदी मध्यरात्रीसुद्धा मदत मागितली तर यांचा हात नेहमी पुढेच राहिला. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आणि त्याला निरोप देण्यासाठी स्मशानापर्यंत जाणे गरजेचे असेल तर त्यांनी कधीही कोणत्याही क्षणी ते नाकारले नाही. अगदी स्वतःला व घरातल्या माणसांना त्रास झाला तरीही. अखेर गावाच्या या अनावर ओढीमुळेच त्यांनी अखेरचे दिवस अगदी जिद्दीने तिकडेच घालवले व गावातच अखेरचा श्वास घेतला. यापेक्षा वेगळी मातृभूमीची ओढ वेगळी काय असू शकेल!- स. वि. नाईक

मानवाच्या कल्याणासाठी
सर्वसाधारण संसारात असलेल्या मनुष्यांना प्रामुख्याने ऐहिक सुखलालसेचीच इच्छा असते व अशी इच्छा असणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. भगवान गोपालकृष्णांनीही अर्जुनाला निमित्त करुन सर्व विश्वाच्या कल्याणाकरिता, जी प्रत्यक्ष रणांगणावर, त्याची कर्तव्यपराङ्मुखता घालवून त्याला कर्तव्योन्मुख करण्यासाठी निवेदन केली, त्या श्रीमद्धगवद्धीतेच्या अठराव्या अध्यायातही, भगवंतांनी सर्वसाधारण संसारी जीवासाठी हा बुद्धियोग म्हणजे कर्मयोगच सांगितला आहे.
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धि यथा विन्दति तच्छृणु ।।
(श्रीमद्धगवद्धीता १८ः४५)
या श्लोकाचा अर्थ फार मनन करण्यासारखा आणि विचार करण्यासारखा आहे. आपापल्या कर्माच्या ठिकाणी जो मनुष्य रत होतो, त्याला वैराग्यप्राप्ती होते आणि तो स्वकर्मरत मनुष्य मोक्षमार्गाचा अधिकारी होतो. (क्रमाक्रमाने मोक्ष पावतो.) या श्लोकावर विवरण करतांना श्रीज्ञानेश्वर महाराज लिहितात.
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।
आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९०६)
अगा जयासि जें विहित । तें ईश्वराचे मनोगत ।
म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९११)
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धि विन्दति मानवः ।।
(श्रीमद्धगवद्धिता १८ः४६ वा)
यातही श्री ज्ञानेश्वर म्हणतात,
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९१७)
या सर्व उपदेशाचा विचार करता सर्वसाधारण संसारी माणसाला कर्मयोग हाच प्रामुख्याने शिकविणे व आचरण करुन दाखविणे जरुर आहे असे वाटते. परंतू हा कर्मयोग सकाम वा निष्काम रीतीने आचरण करण्याला तो मनुष्य, प्रथमतः व्यावहारिकदृष्ट्या थोडास तरी सुखी असलाच पाहिजे. तरच त्याचे चित्त वा लक्ष शांत राहील व नंतर तो कर्मयोगाचार करण्यास अगर अध्यात्मज्ञानाचा अधिकारी होण्यास योग्य व लायक होईल.
यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध सात्त्विक ज्ञान, शुद्ध उच्चार हे सर्व शिकविणे व सत्कर्मप्रवृत्त करणे जरुरीचे आहे, कारण समाज हा एक एक व्यक्ती मिळून शत, सहस्त्र, लक्ष, कोटी अशा श्रेणीने बनलेला आहे. परंतू प्रथमतः त्यांत व्यक्तीलाच प्राधान्य देणे जरुरीचे आहे. प्रत्येक व्यक्ती आचार-विचार-उच्चार-संपन्न, नीतीसंपन्न, न्यायसंपन्न, सत्कर्मसंपन्न, सत्शास्त्रसंपन्न अशी बनली म्हणजे आपोआपच, समाज हा आचार-विचार-उच्चार-संपन्न बनतो.
परंतू हे सर्व समाजाला शिकविण्यासाठी धर्मनिरपेक्ष व निःस्वार्थी अशा संस्था, आणि त्या संस्थांतून स्वार्थत्यागी, निष्काम कर्मयोगी, सेवाधर्मपारायण अशी माणसे तयार व्हावीत म्हणूनच ‘‘श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट‘‘ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. मानवसेवाधर्म आणि निष्काम कर्मयोागाचा आचार हेच या संस्थेचे ध्येय आहे.
आजचा भारतातील मानवी समाज हा अत्यंत गांगरुन गेलेला, लाचार बनलेला आणि ध्येयशून्य असा झाला आहे. या समाजाला धड खायला अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, राहायला घर नाही, नेसायला वस्त्र नाही, रोग निवारणाकरिता वैद्यकिय मदत नाही, उत्तम शिक्षण नाही, पोट भरण्याकरिता कामधंदा नाही, स्वधर्माचे ज्ञान नाही, स्वकर्माचे ज्ञान नाही अशा हतबल, निरुत्साही आणि उत्सन्न बनलेल्या या आपल्या स्वदेश व स्वधर्मबांधवांना, जर आम्ही वरील गोष्टी प्राप्त करवून देण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर या भारतातील हा मानव समाज अवनतीला जाईल व शेवटी नामशेष होईल की काय, अशी भिती निर्माण झाली आहे.
भगवान व्यासमहर्षींनी हा युगधर्माचा मार्ग पूर्वीच दाखवून दिलेला आहे. धर्माची सुरुवात आणि धर्ममंदिराची स्थापना, प्रथमतः मानवाच्या हृदयात होत असते आणि त्या मंदिराचा पाया पोटात असतो. आज आपण भगवान व्यासमहर्षींनी सांगितलेला, ख-या सेवाधर्माचा आचार-विचार विसरुन गेलो आहोत आणि त्याच ख-या धर्माचा थोडास तरी आचार करण्याचे या विश्वस्त निधीने घोषित करुन थोडे तरी कार्यान्वित केले आहे. (त्या ख-या धर्माचे प्रात्यक्षिक श्रीसद्गुरु दिगंबरदास महारजांनी डेरवण येथील कार्यातून जगला दर्शविले आहे.)
म्हणून भगवान व्यासमहर्षी म्हणतात,
अशनं वसंन वासः येषांचैवा व्यवस्थितम् ।
मगधेन समा काशी गंगाप्यङ्गारवाहिनी ।।
म्हणजे ज्या समाजातील व्यक्तींचे खाणे, पिणे, कपडालत्ता, राहण्यासाठी घर हे व्यवस्थित नाही, त्यांना पवित्र काशी किवा मगध देश दोन्ही सारखेच. तसेच त्यांना शीतल गंगाजळ हे इंगळाच्या नदीप्रमाणे तापदायक ठरणार. तात्पर्य हीनदीन स्थितीमध्ये जगणारा मनुष्य उच्च तत्त्वज्ञान पेलण्यास असमर्थ असतो. भौतिक, धार्मिक वा अध्यात्मिक गोष्टींचा हा पायाच आहे आणि पायाचा एकतरी दगड निदान बसवावा असे सेवाधर्माचे व्रत ‘श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट‘ या संस्थेने अंगिकारले आहे हे महत्त्वाचे आहे.
- श्रीसद्गुरुचरणरज
श्री. विठ्ठल गणेश जोशी

आदरणीय व्यक्तिमत्व - कै. वि. ग. नाईक
वेंगुर्ले शहरातील जुन्या पिढीतील ज्या व्यक्तींनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत भरीव कार्य केले त्यामध्ये कै. श्री. विष्णु गणेश नाईक यांचे नांव आवर्जून घ्यावे लागेल. खादीचा पांढरा स्वच्छ सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी या वेषात भरभर पावले टाकीत जाणारे श्री. नाईक आजही आठवतात. शहरात आणि परिसरात ‘पंत‘ या नांवाने ते परिचित होते.
१७ जून १९११ या दिवशी त्यांचा जन्म झाला. वडिलांचा व्यापार होता. श्री. विष्णुपंत लहानपणापासूनच शिक्षणात हुषार होते. तेव्हाची अकरावी म्हणजे मॅट्रीकची परीक्षा होती. त्या परीक्षेत उत्तम यश मिळविले. परंतू पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेंगुर्ल्याबाहेर जाण्यास परवानगी मिळू शकली नाही. त्यांचे मराठी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. संस्कृतमधील अनेक वचने त्यांना मुखोद्गत होती. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, मोरोपंतांच्या आर्या, तुकारामांचे अभंग, अर्वाचीन कवींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या सर्वांचा वापर ते आपल्या वक्तृत्वातून करीत असत. अनेक विषयांवरील पुस्तकांचे त्यांचे वाचन अव्याहत चालू असे. जणू काही वाचन आणि पुस्तके ही त्यांची जीवनशैलीच बनून गेली होती. चातुर्मासात ते पांडव प्रताप, भक्तिविजय इ. ग्रंथांचे वाचन करीत. शहरातील विठ्ठल मंदिरात तर कित्येक वर्षे ते पहाटे काकड आरतीसाठी नित्य नियमाने जात असत. पूर्वी या विठ्ठल मंदिरात कै. आजगांवकर वकील, प्रा. डॉ. चि. त्र्यं. केंघे (खर्डेकर महाविद्यालयातील तत्कालीन संस्कृत व तत्वज्ञानाचे प्राध्यापक) हे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत असत. हे वेंगुर्ल्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातले एक वैशिष्ट्य होते. श्री. नाईक यांचा संत साहित्याचा व्यासंग असल्यामुळे त्यांनीही ज्ञानेश्वरीवर निरुपणे केलेली आहेत व ती अजूनही अनेकांच्या स्मरणात असावीत. वेंगुर्ल्यातील सार्वजनिक उत्सव, देवस्थानचे उत्सव इ. मध्ये त्यांचा सहभाग ठरलेला असायचा. तसेच गोवा मुक्तीनंतर अडवलपाल (गोवा) येथील श्री देवी शर्वाणी वेताळ महारुद्र देवस्थानच्या सर्व उत्सवात ते अत्यंत उत्साहाने सहभागी होत असत.
स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी त्यांनी स्विकारली होती. ते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता होते. त्यांच्या घरी असलेली पं. नेहरु, राजेंद्र प्रसाद, राजाजी, सरदार पटेल यांची भव्य चित्रे त्याची साक्ष आजही देतात. परंतू काँग्रेस दुभंगल्यानंतर त्यांनी संघटना काँग्रेस मध्येच राहणे पसंत केले. नंतर संघटना काँग्रेस जनता पक्षात विलीन झाल्यामुळे १९७७ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी जनता पक्षाचे उमेदवार प्रा. मधु दंडवते यांच्या प्रचारात भाग घेऊन अनेक सभांतून भाषणेही केली होती.
लोकांचे वाचनच कमी झाले. त्यामुळे वाचन संस्कृती संपणार, दूरचित्रवाणीमुळे पेपरही वाचला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी नेहमी ऐकू येतात. अशा परिस्थितीत वाचनाबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी, लोकांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आस्वाद घेता यावा या एकमेव उद्देशाने श्री. नाईक यांनी वेंगुर्ले शहराचा मानबिदू असलेल्या वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाहपद स्विकारुन वाचनालयामध्ये उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करुन दिली व त्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी वाचनालयाचा दर्जा व गुणवत्ताही सुधारली. कथा-कादंब-यांच्या चौकटीत अडकून न पडता त्या पलिकडे जाऊन ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान-आरोग्य - शेती-व्यापार इत्यादी विषयांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध करणारी अनेक पुस्तके वाचनालयात उपलब्ध करुन देण्याचे कार्यही त्यांनी कळकळीने केले व त्याचबरोबर व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. या कामात त्यांना त्यावेळच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची तसेच श्री. वल्लभ धोंड, राय, गोळम या कर्मचा-यांची साथ लाभली.
विष्णुपंतांना लेखनाची आवड होती. घराच्या बाहेरील ओटीवर टेबलावरती विजेचा दिवा लावून रात्री खूप उशिरापर्यंत त्यांचे लिखाण चालू असायचे. सा. ‘किरात‘, सा.व्याध, सा. नवकोंकण इ. त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलेले आहे.तसेच वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध सा. ‘किरात‘चे संपादकत्वही त्यांनी काही काळ भूषविले होते.
संगीत ऐकणे हाही त्यांचा छंद होता. त्यांना गायनाचीही आवड होती. लहान-थोरांशी सारख्याच आत्मीयतेने ते बोलत आणि चौकशी करीत. वेंगुर्ल्यातील शिक्षण क्षेत्रातही त्यांचा वावर असायचा. शहरातील नावाजलेल्या वेंगुर्ले एज्युकेशन सोसायटीचे ते अनेक वर्षे कार्यकारी मंडळ सदस्य होते. तसेच काही काळ चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जे जे नवीन, सुंदर आहे ते अगदी सहज स्विकारण्यासाठी ते नेहमीच तयार असत.
त्यांच्या जीवनात त्यांना कै.सौ.माई (लक्ष्मीबाई वि. नाईक) यांनी मोलाची साथ दिली म्हणूनच ते सामाजिक कार्य करु शकले. कै. विष्णुपंत व कै.सौ.माई यांनी आपल्या सर्व मुलांना सुसंस्काराची जन्मभर पुरणारी शिदोरी दिली. मुला-मुलींनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांची वाटचाल पाहतांना त्यांन मनस्वी आनंद होत असे व तो आनंद योग्यवेळी व्यक्तही करीत असत. त्यांची मुले उच्च विद्याविभूषित असून आपापल्या क्षेत्रात मोठ्या दर्जाचा पदावर कार्य करुन निवृत्त झाली आहेत. आता त्यांची तिसरी पिढीही उच्च विद्याविभूषित असून देशात आणि परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.
सामाजिक बांधीलकी मानून कार्य करणा-या कै. वि. ग.नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या विषयीचे मला ज्ञात असलेले विचार व्यक्त करतांना त्यांच्या आदरणीय स्मृतीस विनम्र अभिवादन.
- बाळ खानोलकर
गोरेगांव, मुंबई मोबा. ९८६९८४८४१६

एक कुशल व्यवस्थापक
वेंगुर्ले नगर वाचनालयाचे सन्मान्य आजीव सभासद, माजी कार्यवाह कै. श्री. विष्णुपंत गणेश नाईक यांची अद्यापही उणिव भासत आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख करतांना त्यांनी नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेला जी उर्जितावस्था आणली. संस्था भरभराटीस येण्यास जे परिश्रम केले ते सांगावे तेवढे थोडेच आहे.
या आधी ते काँग्रेस सभासद, वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन, एक प्रगल्भ वक्ते, किर्तनकार, सामाजिक कार्यात सहभाग असणारे म्हणून ओळखले जात. स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वालावलकर यांनी ज्या ज्या व्यक्तींना मार्गदर्शनल केले त्या व्यक्तितील एक शिष्य म्हणजे पंत.
वेंगुर्ल्यातील पडवळ कुटुंबिय वेंगुर्ले वाचनालयातून निवृत्त झाल्यावर ग्रंथालय संस्थेचा सर्व आर्थिक कारभार नेटाने चालविणारे, कागदपत्रे, हिशेब, दप्तर व्यवस्थित ठेवणारे, वाचनालयाच्या संबंधी सरकारी कागदपत्रांना उत्तरे देण्यात तरबेज असणारे पंत संस्थेचे खंबीर आधारस्तंभ होते. व्यापारी वर्गाच्या विठ्ठल मंदिरातील काकड आरती सातत्याने नियमितपणे सुमारे ३० वर्षे त्यांनी व त्यांच्या सौ. लक्ष्मीबाई यांनी व्यवस्थित चालविली होती.
वाचनालयात वासंतिक व्याख्यानमाला भरविणे, हितचितक सभेमार्फत व संस्थेच्या शतकमहोत्सवा वेळी मोलाचे कार्य करणे, सर्व पदाधिका-यांना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणे, हा त्यांचा स्थायी भाव होता. सुमारे २५ वर्षे संस्थेचा आर्थिक कारभार सुरळीत चालविला.
पंत १९३७ सालापासून १९३९ पर्यंत प्रथम वाचनालयाचे कार्यवाह झाले. दुस-या टप्प्यात १९६२ पासून मे १९८३ पर्यंत सलग २१ वर्षे त्यांनी आपल्या सबलतेने नगरवाचनालयाचे कार्यवाहपद सांभाळले. पंत दररोज वाचनालयात येत. त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष असे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीपासून ते संचनालयाच्या पत्रांना उत्तने देण्याचेही काम त्यांनी तत्परतेने पार पाडले.
त्यांच्याच कार्यवाह पदाच्या काळात संस्थेचा शतक महोत्सव पार पडला. यावेळी प्रसिद्ध लेखक अनंत काणेकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी कादंबरीकार रणजित देसाई आले होते.
नगरवाचनालयाची दैनंदिन कामाची काहीशी विस्कळीत झालेली घडी बसविण्याचे महत्त्वाचे कार्य विष्णुपंतांनी केले. सध्या दुमजली दिसणारी संस्थेची इमारत उभारण्याच्या कामी विष्णुपंतांनी मोलाचे योगदान दिले होते.
मराठी प्रमाणेच इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात त्यावेळी दक्षिण रत्नागिरीतील चालू घडामोडी संबंधी माहिती ते देत असत. या एकाच उदाहरणावरुन त्यांच्या कड्यार् इंग्रजीची जाणीव सर्वांना निश्चित होईल.
एत्रादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर ते पंतांना सहन होत नसे. त्यांचा निर्णय ब-याचवेळा अचूक असायचा. सदर निर्णय योग्य आहे हे पटवून देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेण्यात ते तरबेज होते. खादीचे नेहरु शर्ट, स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर, कडक इस्त्रीची गांधी टोपी हा त्यांचा पेहराव सर्व परिचित होता. विशेष प्रसंगी ते जाकीटही परिधान करीत. कडक शिस्तीचे म्हणून ते व्यवस्थापनात प्रसिद्ध होते.
नाईक कुटुंबियच उच्चशिक्षित होते. तोच वारसा त्यांच्या मुलामुलींनी चालविला आहे. त्यांचे या संस्थेस लाभलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!
- अनिल श्रीकृष्ण सौदागर,
कार्याध्यक्ष,
नगर वाचनालय वेंगुर्ले

स्व. विष्णुपंत नाईक ः एक संयमी व्यक्तिमत्व
वेंगुर्ल्यामध्ये जुन्या पिढीतील सर्वांना ज्ञात आहे की, विष्णु गणेश तथा विष्णुपंत नाईक या नावाचे एक समाजसेवी व्यक्तिमत्व या शहरात होऊन गेले. यावर्षी जून २०११ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. ते वेंगुर्ले नगरवाचनालयाचे कार्यवाह असतानाच्या काळात मी या वाचनालयात ग्रंथपाल होतो. त्यातून जाणवलेले त्यांचे व्यक्तिमत्व सांगण्याचा हा प्रयत्न.
पांढरे शुभ्र धोतर, शुभ्र सदरा, त्यावर खादीचे जॅकेट व पांढरी टोपी, वर्ण सावळा व जलद चाल. समोरुन येत असतांना कुणीही ओळखावे हे विष्णुपंत आहेत. त्यांच्या सान्निध्यात सुमारे १५-१६ वर्षे रहाण्याचा योग मला आला तो नगरवाचनालयाचा ग्रंथपाल म्हणून काम करतांना. कारण ते या संस्थेचे मानद कार्यवाह म्हणून काम करीत होते. त्यांचा जन्म वेंगुर्ल्यातच झाला. त्यांच्या पत्नी सर्वांच्या ‘माई‘ म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना तीन कन्या व चार मुलगे असे कुटुंब. त्यांचा व्यवसाय खादी भांडार चालवायचा. धड नोकरी नाही. किरकोळ जमिनी होत्या त्या कुळांकडे होत्या. उत्पन्न जेमतेम. स्वस्ताई होती पण पैसा दिसत नसे. मदत कुणाची नाही व मुले मुळातच हुशार असल्याने शिकणारी. प्रपंच चालविणे कठीण होते. पण न डगमगता अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना तोंड देत त्यांनी मुलांना शिक्षण दिले. पुढे मुले मोठी झाली. त्यांचे दोन मुलगे स्टेट बँकेत गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या हुद्द्यावर पोचले. मोठा मुलगा एक्साईज अँड कस्टममध्ये कलेक्टर झाला. आता त्यांना पैशांची कमी नव्हती आणि सर्व मुले त्यांना फार मान देत. त्यांचा स्वभाव थोडा तापट होता. काही चूक झाली की क्षणात ते चिडायचे. मग पत्नी असो, मुलगी असो अगर मोठ्या पदावर असलेला मुलगा असो. पण त्यांना प्रतिउत्तर करण्याचे धाडस कुणी करीत नसे. पण काही क्षणातच ते शांत होऊन सारे विसरुन जायचे. त्यांच्या तीनही कन्या नम्र व सुशील होत्या. मुलगेही तसेच होते. एक दोन वेळा राज्य ग्रंथालय संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्या मुंबई निवासी मुलांच्या घरी राहण्याचा मला योग आला. पण माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला आपल्यातीलच समजून पती-पत्नीने जी वागणूक दिली त्याने मला त्यांचा अभिमान वाटला.
तर अशा चांगल्या परिस्थितीत त्यांनी नगर वाचनालयाचे कार्यवाहपद स्विकारले. त्यांचेसोबत संस्थंच्या कार्यकारी मंडळ, त्यांचे इतरही सहकारी होते. त्यावेळी संस्थेची अवस्था मात्र हलाखीची होती. पण विष्णुपंतांची शिस्त, हुषारी आणि टापटीपपणा यामुळे त्यांना संस्थेत मान होता. प्रयत्न आणि चिकाटी यावर संस्था सुधारण्यासाठी त्यांनी श्रम केले. राज्य ग्रंथालय संमेलनात व्यासपीठावर आवाज उठवून अनुदान वाढवण्यास शासनास जाग आणली. हळू हळू अनुदान वाढत गेले. याच मुदतीत नगर वाचनालयास १०० वर्षे झाली. मोठी जबाबदारी समोर आली. योगायोगाने संस्थेस मुंबई हायकोर्ट वकिल, वेंगुर्ल्याचे सुपूत्र अॅड.गो.रा.उर्फ अरुण रेगे अध्यक्ष म्हणून लाभले आणि सर्व सहका-यांच्या मदतीने संस्थेसाठी नवीन इमारत बांधून शतकमहोत्सव करण्याचे ठरले व तो विष्णुपंतांच्या कारकिर्दीतच झाला. आज ही संस्था प्रगतीपथावर असून आर्थिक संपन्नता प्राप्त आहे, त्याचे श्रेय विष्णुपंताना आहे.
याच संस्थेत त्यांनी त्यावेळी ‘हितचितक सभा‘ नावाची छोटी संस्था काढून काही पारंपारिक धार्मिक कार्यक्रम ते करीत, नारळी पौर्णिमा, विजयादशमी, शमीपूजन आदी कार्यक्रम व समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्यांना भजन-कीर्तनाचीही खूप आवड होती. रामेश्वर सप्ताहात ते आरंभापासून दिडीपर्यंत सहभागी व्हायचे.
स्व. विष्णूपंतांनी जसे सामाजिक कार्य केले तसेच देशासाठीही केले होते. १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेऊन लाठीमार खाल्ला. ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगवासात टाकले. तिथे जेलमध्येही त्यांनी हालअपेष्टा सोसल्या. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र व मानधन त्यांना मिळाले, पण त्यांनी ते नाकारले. पण बरोबरच्या इतर सहका-यांना पेन्शन मिळवून देण्याच्या कामी बहुमोल सहकार्य केले. इतकेच नव्हे तर देशप्रेमाने भाराऊन १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ते आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून सलामी देत असत. त्यांनी कधीही जातीभेद मानला नाही. त्यांनी केवळ सामाजिक कार्यासाठी स्वतःला बांधूनच घेतले होते. सर्वांसाठी झिजत असतांना अकस्मात त्यांच्या पत्नी, सर्वांच्या माई त्यांना सोडून या जगातून निघून गेल्या. आयुष्याची सोबतच गेल्याने विष्णूपंत खंगत गेले. मुलांनी खूप प्रयत्न केले. पण कुणाचेही न ऐकता आपल्या घरातच राहण्याचा त्यांनी आग्रह धरला. आपल्या घरातच अकस्मातपणे त्यांनी देह ठेवला.
असा हा सर्वांचा आधारस्तंभ आज आपल्यात नाही याची खंत वाटते. पण स्मृति मात्र ताज्या वाटतात. अशा या थोर माणसाच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या विषयीच्या स्मृति जागृत करुन त्यांना मी आदरांली अर्पण करतो.
- वल्लभ कृष्णाजी धोंड, वेंगुर्ले

ज्ञानोपासक प्रा. मोहन पवार
विद्यार्थी दशते असतांना आपल्या जीवनात अनेक शिक्षक - प्राध्यापक येतात. आपल्यावर ज्ञान संस्कार करतात. जीवनाला आकार देतात आणि या दुनियेत समर्थपणे उभे राहण्याकरिता व आव्हानांना सामोरे जाण्याकरिता लागणारे बौद्धिक बळ देतात. असे असले तरी सर्वच शिक्षक आणि त्यांची नावे स्मरणात राहतात असे नाही. प्रा. मोहन पवार हे असे प्राध्यापक होते की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा कोरलेली होती. कारण त्यांची अध्यापनाची शैली आणि त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व हे होय. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे विवेचन करतांना आम्हां मुलांना ते प्रति ज्ञानेश्वर वाटायचे तर बखरीतील उतारे शिकविताना बखरकार वाटायचे. मराठी भाषेचे उत्तम ज्ञान, उदाहरणे, दाखले देतांना मधाळ रसाळ वाणी त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या अध्यापनाशी तद्रुप होत असत.
त्यांच्या निधनाची बातमी खूप उशिरा वाचनात आली आणि जवळ रहात असून देखील त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही याची चुटपुट मनाला लागली. त्यांच्या निधन समयी मी गोव्या बाहेर असल्याने असे घडले होते. त्यांचे निधनाचे वर्तमान वाचले आणि माझे मन तब्बल ४७ वर्षे मागे गेले. मार्च १९६४ मध्ये मी रा. कृ. पाटकर हायस्कूलमधून शालांत परीक्षा पास झालो आणि जून ६४ मध्ये बॅ.खर्डेकर महाविद्यालयात पदवीपूर्व वर्गात दाखल झालो. परिसर परिचित असला तरी कुठच्याच प्राध्यापकांशी ओळख नव्हती.
नवीन वर्ग सुरु झाले. प्राचार्य पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्ग खचाखच भरलेला होता. काही थोराड विद्यार्थी बिनधास्तपणे बसले होते. तर आमच्या सारखी नवखी मिसरुडही न फुटलेली मंडळी भित्र्या सशाच्या काळजाने भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणातील एकही शब्द कळला नव्हता कारण त्यांनी स्वागत केले होते ते अस्खलीत इंग्रजीमध्ये! शालांत परीक्षेत तृतीय भाषा म्हणून पास होण्यापुरता आमचा इंग्रजीचा अभ्यास! आजूबाजूचे वातावरण मालवणी किवा मराठी भाषेतील! त्यामुळे इंग्रजी भाषेचे सतत दडपण! प्राचार्यांच्यानंतर क्रमाक्रमाने वेगवेगळ्या विषयांचे प्राध्यापक येत गेले. प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होत गेली आणि कॉलेजमधील वातावरण अंगवळणी पडलं. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकविणारे प्रा. आजगांवकर, हिदी विषयाचे प्रा. कुलकर्णी, मानसशास्त्राचे प्रा. शिरगुप्पीकर इंग्रजीच्या प्रा. पिटकर मॅडम तर इतिहासाच्या प्रा. संगम मॅडम आणि भूगोल विषयाचे हिरो सदृश्य श्री. कुन्हेकर सर. या सर्वांशी पुढे परिचय वाढत गेला. पण या सर्वांपेक्षा सर्वांना जवळचे व आपले वाटायचे ते प्रा. मोहन पवार. कारण त्यांच्या अध्यापनाचा विषय होता मराठी. जो आम्हा सर्वांना सहज सुलभ वाटत होता. शिवाय त्यांचे अध्यापन कौशल्य इतरांपेक्षा वेगळे होते. एखाद्या शब्दाला समानार्थी अनेक शब्द आणि त्यांच्या विरुद्धार्थी अर्थाचे शब्द सहजपणे ते जाता जाता सांगून जायचे. गद्यपाठ किवा पद्यपाठ शिकविण्यापूर्वी लेखक/कविची साग्रसंगीत माहिती ते देत असत आणि विषय विवेचन एवढ्या ओघवत्या भाषेत करायचे की, ऐकतच रहावे. त्यांची शब्दकळा अवर्णनीय होती. खूप साहित्य वाचन, मनन, चितन आणि अभ्यासूवृत्ती असणा-या ज्ञानोपासकाची ती लक्षणे होती. शब्दालंकार, अर्थालंकारांची खरी ओळख त्यांनीच आम्हाला करुन दिली. विविध संदर्भ पुस्तकांच्या वाचनाची आवड त्यांच्यामुळे जडली. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास त्यांचेच प्रोत्साहन असायचे. त्यांच्या या सुसंस्कारीत मार्गदर्शनाचा उपयोग आम्हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसीत होण्यासाठी निश्चितपणे झाला.
प्रा. पवार यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला. विविध साहित्य संमेलनाचे चित्रप्रदर्शनांचे, प्रसिद्ध साहित्यिकांचे फोटो त्या साहित्यिकाची स्वाक्षरी यांसह त्यांच्या संग्रही होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी निमित्त मी गोव्यात आलो आणि जन्मगाव परका झाला. त्यामुळे त्यावेळचे आप्तमित्र, सगेसोयरे आणि शिक्षक हे दूरातले दिवे झाले. पण जन्म गावच्या आठवणी चिरंतन मनात राहिल्या. त्यात प्रा. मोहन पवार हे नाव ठळक होते.
१९९९ साली अशाच एका संगीत समारोहात खांद्याला कॅमेरा लटकाऊन छायाचित्रणासाठी योग्य क्षेत्र व जागा शोधणारे पवार सर दिसले. पुढे होऊन वाकून त्यांचे चरण स्पर्श केले. ते चांगलेच गोंधळले. ‘सर, मी तुमचा विद्यार्थी.‘ मग ओळख पटली. आपल्या निवृत्तीनंतर ते आपल्या धाकटे बंधू प्रकाश यांच्यासह पणजीला राहत होते हे समजले. त्यानंतर गोवा कला अकादमीत होणा-या संगीत, नाटक, परिसंवाद, चित्र प्रदर्शने यांच्या निमित्ताने त्यांची भेट व्हायची.
६ फेब्रुवारी २००० साली गं.त्र्य.तथा भाऊसाहेब माडखोलकर यांची जन्म शताब्दी त्यांच्या मूळ गावी म्हणजे आंबोली जवळच्या माडखोल इथे झाली. या समारंभाला भाऊसाहेबांचे नातू अॅड. प्रियदर्शन माडखोलकर खास नागपूरहून आले होते. किती तरी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि राजकीय व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. पवार सर मला या समारंभाला आग्रहाने घेऊन गेले. त्यामुळेच मी तो दिव्य सोहळा अनुभवू शकलो आणि स्थानिक वर्तमानपत्रासाठी शब्दबद्ध करु शकलो. पण त्यानंतर बराचकाळ त्यांच्याशी गाठ पडली नाही. २००४ साली मी सेवा निवृत्त झालो. निवृत्तीनंतर माझ्या जन्म गावासाठी काही करावे म्हणून माझ्यावर प्रभाव पाडलेल्या गुरुवर्यांच्या नावाने वार्षिक शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. त्याची बातमी सा. ‘किरात‘ मधून प्रसिद्ध झाली होती. ती वाचताच त्यांनी माझा फोन नंबर मिळवला आणि मला आपला नवीन पत्ता दिला व भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी त्यांच्या कांपाल पणजी येथील निवासस्थानापाशी पोहोचलो. बेल वाजवताच त्यांनी स्वतःच दरवाजा उघडला. खोलीत सामान अस्ताव्यस्त पडले होते. पुस्तके, लिखाणाचे साहित्य, संगणक, कपडे यांचा पसाराच पडला होता. एकेकाळी टापटीपीने राहणारे सर ते हेच का असा भाव कदाचित माझ्या डोळ्यात त्यांना दिसला असावा. तेव्हा तेच म्हणाले, ‘एवढे दिवस मी आपला धाकटा भाऊ प्रकाश सोबत राहत होतो. पण अचानक त्यालाच अर्धांगाचा झटका आला. आता त्याची प्रकृती ठीक आहे. पण त्याच्या अशा अवस्थेत माझा भार त्याच्यावर नको म्हणून हल्लीच मी ही स्वतंत्र जागा घेतली. पण त्याच्या निवासस्थानापासून जवळच.‘ त्यानंतर खूप गप्पा झाल्या. वेंगुर्ल्याच्या त्या दिवसांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. पण त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचे धाडस मला झाले नाही.
एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गराड्यात वावरणारे माझे सर एकाकी जीवन जगत होते. सोबतीला होते ते ग्रंथ आणि नव्या पुस्तकांच्या संकल्पना! त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी मी अनभिज्ञ होतो. त्यांची ओळख होती ती फक्त मराठी भाषेचा प्रगाढ प्राध्यापक एवढीच.
त्यांना माझ्या निवासस्थानी आणण्याची, माझ्या सौ.च्या हातचे सुग्रास भोजन देण्याची, तत्कालीन विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या वेंगुर्ले येथे त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणायची सुप्त इच्छा त्यांच्या निधनाने अपूर्णच राहिली. आता एकच गोष्ट हातात उरलीय ती म्हणजे त्यांच्या स्मृतीसाठी बॅ. खर्डेकर विद्यालयातून पदवी परीक्षेत मराठी विषयात सर्वोच्च गुण प्राप्त विद्यार्थ्याला पारितोषिक देण्याची. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न असेल. असे गुरुवर्य जन्मोजन्मी मिळोत हिच त्या ईश्वरचरणी प्रार्थना!
- ज. अ. उर्फ शरद रेडकर, सांताक्रुज - गोवा, मोबा. ९४२३३१०५४१

No comments:

Post a Comment