Sunday, 12 June, 2011

अंक २१वा, ९ जून २०११

अधोरेखीत *
छोट्या जलविद्युत प्रकल्पांना चालना देण्याची गरज
एप्रिल-मे महिन्यातला असह्य उकाडा आणि त्यात विजेचे भारनियमन! यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि एकूणच त्रासलेली जनता हे गेली काही वर्षे असलेले राज्यातील चित्र, यावर्षी त्यात काही शहरी भागांमध्ये थोडीशी सुधारणा झाली असली तरीही संपूर्ण राज्याची या समस्येतून पुरती सुटका झालेली नाही. राज्य २०१२ पर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, भारनियमनमुक्त होईल, असे राज्यकर्ते सांगत होते. मात्र आता हे निर्धारित वेळेत शक्य होणारे नाही. राज्यातील जनतेची उर्जेची गरज ही वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि वाढत्या शहरीकरणाबरोबर तसेच औद्योगिकीकरणाबरोबरही वाढतच जाणार आहे. त्यामुळे विजेचा हा तुटवडा दूर करण्यासाठी जे विविध उपाय योजायचे आहेत, त्यातला लगेच अंमलात आणण्याजोगा उपाय म्हणजे लघू आणि लघुतम जलविद्युत प्रकल्प होय, असे मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यासाठीची प्रक्रिया शासकीय लालफितीच्या कारभारापासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाली, तरच हे प्रकल्प लवकरात लवकर अंमलात येऊन गावे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतील.
१०० किलोवॅटपर्यंत वीजनिर्मितीची क्षमता असणारे प्रकल्प हे लघुतम (मायक्रो) प्रकल्प, १०० ते २००० किलोवॅट (२ मेगावॅट) क्षमतेचे प्रकल्प हे अतिलघु (मिनी) प्रकल्प, तर २००० ते २५ हजार किलोवॅट म्हणजेच २५ मेगावॅट क्षमतेपर्यंतचे प्रकल्प हे लघू (स्मॉल) प्रकल्प म्हणून ओळखले जातात. त्यासाठी कोणतेच इंधन लागत नाही. फार मोठी जमिनही नको, आर्थिक गुंतवणुकही कमी लागते. (१ किलोवॅटकरिता ५० हजार रुपये)
अशा प्रकारचे लघु प्रकल्प राज्यात विविध भागांमध्ये जिथे जिथे वाहते पाणी आहे आणि सुमारे १० फूटांच्या उंचीवरुन ते पडत आहे, अशा ठिकाणी राबवता येतील. राज्यातल्या एकूण पाण्यापैकी ४० टक्के पाणी कोकणात आहे. ब-याच ठिकाणी झरे आहेत. त्यातले काही बारमाही आहेत. अशा ठिकाणी तसेच कालव्यांच्या प्रवाहावरही लघु प्रकल्प उभारता येतील. शासनाने लघू जलविद्युत प्रकल्पांद्वारे खाजगी तत्वावर वीजनिर्मिती सुरु करण्याचे धोरण अवलंबल्या नंतर आतापर्यंत सात प्रकल्प खाजगी तत्वावर कार्यान्वित झाले आहेत. याविषयीचा तपशील पुढे दिला आहे.
सिधुदुर्ग- सावंतवाडी जवळचा कोनाळ प्रकल्प - १० मेगावॅट, देवगडचा देवधर प्रकल्प - १.५ मेगावॅट, कोल्हापूर - राधानगरी- १० मे., पाटगाव- २ मे., चित्री - १.५ मे. सांगली - सोनावडे प्रकल्प - ४.४ मे., पुणे - नीरा देवधर प्रकल्प - ७.५ मे.
याव्यतिरिक्त अजून ७० प्रकल्पांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी सुमारे निम्मे प्रकल्प हे लालफितीत अडकून पडले आहेत. तर निम्म्ये प्रकल्प काही ना काही अडचणींमुळे रेंगाळत आहेत. तेव्हा हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजेत.
देवघर इथला गद्रे मरिन एक्सपोर्ट या प्रकल्पातून तयार होणारी वीज ४ रुपये २६ पैसे या दराने मिळते. कुठल्याही प्रकल्पातून तयार झालेली वीज ही तीन प्रकारे वापरता येते. १) ती वीज राज्य वीज मंडळाला विकायची. मंडळ त्यातून ६ टक्के प्रती युनिट इतकी रक्कम वजा घालून ती खरेदी करते. २) लघु प्रकल्पातून वीज तयार करणारी खाजगी कंपनी एखाद्या तिस-या कंपनीलासुद्धी ही वीज विकू शकते. मात्र, तशी ती विकताना वाहून नेण्यासाठी राज्य वीज मंडळाच्या तारांचा वापर होत असल्यामुळे मंडळाला या वापरापोटी प्रती युनिट (४ रु. १६ पैसे) १६ टक्के इतका दर महिन्याच्या बिलात द्यावा लागतो. ३) वीज निर्मिती कंपनी ही वीज स्वतःसाठी वापरु शकते. ज्याला कॅप्टिव्ह प्लांट म्हणतात. असे लघु प्रकल्प उभारताना सुरुवातीची गुंतवणुक थोडी जास्त (७ते ८ कोटी) आहे. मात्र प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, प्रकल्प देखभालीचा ८० पैसे ते एक रुपया प्रती युनिट इतका खर्च, प्रकल्पावर काम करत असलेल्या कामगारांचे पगार, असे सर्व खर्च वजा जाता ८ ते १० वर्षांच्या काळात प्रकल्प गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा मिळू शकतो.
१५ सप्टेंबर २००५ रोजी झालेल्या शासन निर्णय घ्ज्च्र्-१२०४/(१६०/२००४)/क्तघ् या आदेशाद्वारे शासनाने लघु जलविद्युत प्रकल्पांबाबतचे धोरण स्पष्ट केले असून हरित वीजनिर्मितीला चालना देणे, खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून केल्या जाणा-या गुंतवणुकीच्या आधारे असे प्रकल्प अंमलात आणण्यासाठी धोरण निश्चित करणे ही उद्दिष्टे शासनाने त्यात दिली आहेत. अशा प्रकारे खाजगी तत्वावर वीजनिर्मिती करता येतील अशी राज्यभरातील ठिकाणे शासनाने निश्चित केली असून त्याची यादी याविषयीच्या धोरणातच दिली आहे. ही यादी आणि यासंबंधीचे धोरण शासनाच्या जलसंपदा विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३१ मार्च २०११ या तारखेपर्यंत दिलेल्या यादीनुसार केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी असे प्रकल्प राबवता येतील असे शासनाने म्हटले आहे.
कार्यान्वित सात प्रकल्पां मधील देवगडचा देवघर प्रकल्प राबवत असलेल्या गद्रे मरिन एक्सपोर्ट कंपनीचे दीपक गद्रे यांनीही सांगितले की, अशा प्रकल्पांना अधिक गती मिळण्यासाठी शासनाकडून अधिक सहकार्याची गरज आहे. कार्यालयीन कामे वेगाने झाली पाहिजेत. यावर्षी त्यांनी ४७ लाख युनिटस् इतक्या वीजेची निर्मिती केली. ही क्षमता वर्षाला ६५ लाख युनिटस्पर्यंत नेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पण हे करत असताना त्यांनी एक प्रमुख अडचण सांगितली. सध्या त्यांना केवळ शेतीसाठी पाणी सोडले जाईल, तेव्हाच या प्रकल्पासाठी पाणी मिळणार आहे. मात्र पावसाळ्यात धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जाते ते पाणी या वीजनिर्मिती प्रकल्पांच्या यंत्रणेतून न्यायला सध्या परवानगी नाही. त्यासाठी आदेश मिळायची गरज शासनाच्या संबंधित विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी कुठल्याही वीज निर्मितीविना मोफत वाहून जात आहे. हे पाणी वापरायला परवानगी मिळाली तर वीज निर्मितीचे प्रमाण अजूनही वाढायला मदत मिळेल.
बॅ.अ.र.अंतुले हे मुख्यमंत्री असताना स्वामीनाथन समितीने १९८१ साली या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी राज्याच्या प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा प्रकल्प राबवायची सूचना केली होती. तसेच ग्कङक्ष् सारख्या संशोधन संस्थांच्या मदतीने अशा प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रणा देशांतर्गत कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेची कशी तयार करता येईल, याविषयी संशोधन होण्याची गरज आहे. अशा लघु जलविद्युत प्रकल्पांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या काही योजना आहेत. त्यांची योग्य प्रकारे प्रसिद्धी होऊन त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अशा लघुतम आणि लघू प्रकल्पांचा प्रसार झाला, तर अनेक गावे ऊर्जेच्या बाबतीत स्वतःची गरज भागवू शकतील, त्यामुळे आपण ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करु शकू.
या क्षेत्रातही चीनने पहिले पाऊल टाकले असून आज चीन त्याही बाबतीत आघाडीवर आहे. २००८ सालच्या एका जागतिक पाहणी अहवालानुसार चीन ६५ हजार मेगावॅट वीज लघू प्रकल्पांद्वारे तयार करत होता. आता त्यात आणखीही भर पडली असले. अशा प्रकल्पांद्वारे दहा हजार गावांचे विद्युतीकरण करायची योजनाही चीननं आखली आहे. आपल्या देशात हिमाचल प्रदेश याबाबतीत आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र राज्यातही अजून जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर खेडी वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली, तर राज्य वीज मंडळावरचा ताण कमी होईल. अशा प्रकल्पांमधून अनेकांना रोजगार मिळेल. गावागावात वीज पोहोचल्यामुळे संगणक शिक्षणाचा दर्जाही सुधारेल आणि ग्रामीण जनताही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल. मोठ्या प्रकल्पांवरचा ताण कमी झाला की त्यातून तयार होणारी वीज ही औद्योगिकीकरणासाठी वापरता येईल. त्यामुळे राज्याचा औद्योगिक विकास साधायला मदत होईल. त्यासाठी शासनाने या छोट्या प्रकल्पांबाबत अधिक जागरुकता दाखवायला हवी. प्रकल्प उभारणीत येणारे नोकरशाहीतले अडथळे आणि राज्य वीजमंडळाचा हस्तक्षेप कमी करुन या प्रकल्पांच्या उभारणीसाठी जी जी मदत आवश्यक असेल, ती लोकांना पुरवावी, म्हणजे भारनियमन मुक्तीबरोबरच ऊर्जा स्वयंपूर्ण-तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
(साप्ताहिक विवेकच्या सौजन्याने.)
- मनोज अणावकर, ९८६९१०७५७३

संपादकीय *
रामदेवबाबांचे आंदोलन
योग गुरु रामदेवबाबांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात दिल्लीत उभारलेले आंदोलन केंद्रातील लोकशाही सरकारने हुकूमशाही पद्धतीने चिरडले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. सत्ताधा-यांशी लागेबांधे असणा-या वृत्तपत्रांनी आणि दूरदर्शन वाहिन्यांनी या आंदोलनाची यथेच्छ कुचेष्ठा केली. तरी देशातील सर्वसामान्य जनतेचा पाठिबा मात्र या आंदोलनास असल्याचे दिसून आले.
रामदेवबाबांची कार्यपद्धती, विचार कोणाला मान्य असोत अगर नसोत, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कोणतेच मतभेद होणार नाहीत. राजकीय पक्ष आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनाही भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेधाचा सूर काढावाच लागत आहे. केंद्र सरकार किवा काँग्रेस पक्षाच्या विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी (त्यात भाजपसारखे हिदुत्ववादी आणि समाजवादी, साम्यवादी पक्षही आले) रामदेवबाबांच्या या आंदोलनाला पाठिबा दिला.
सत्ताधारी काँग्रेस पक्षाने हा विषय सबुरीने घेण्याचा त्यावर विचार विनिमय करण्याचा सल्ला दिला. पण रामदेवबाबांनी उपोषण आंदोलनाची तारीख व स्थळ जाहीर केल्याने त्यांना माघार देता येणे शक्य नव्हते आणि सरकारलाही त्यांचे म्हणणे विनाशर्त मान्य करुन शरणांगती पत्करणे परवडणारे नव्हते. काँग्रेसने स्वतःच सबुरीचे धोरण घेतले असते तर आंदोलन पोलीसी बळाने चिरडून हुकूमशाहीवृत्तीचे प्रदर्शन करावे लागले नसते आणि दिग्विजयसिगासारख्या वावदूक लोकांना रामदेवबाबांच्या विरोधात भुंकण्यासाठी सोडावे लागले नसते.
रामदेवबाबांचे हे दिल्लीतील आंदोलन आता त्यांच्या हरिद्वार येथील योगपीठातून सुरु झाले असले तरी देशभर तालुका, ग्रामपातळीवर पतंजली योगपिठाचे साधक आणि काँग्रेस विरोधक, भाजप, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते, हिदुत्ववादी संघटना यांनी हे आंदोलन दत्तक घेतले आहे. या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा स्पष्ट उद्देश असला तरी सर्वसामान्य लोकांचे तसे नाही पण ते या राजकीय रणधुमाळीत बाजूलाच पडण्याची शक्यता आहे.

बदल्या होणारच
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी जि.प.चे कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षक बदल्या शासनाच्या निर्देशानुसार करुन यामध्ये नेहमीच चालणा-या सौदेबाजीला वावच न ठेवल्याने सत्ताधारी काँग्रेस समर्थक आणि पदाधिका-यांची तसेच शिक्षक संघटना नेत्यांनी मोठीच पंचाईत झाली. योग्य जागी बदल्यांसाठी किवा बदलीच टाळण्यासाठी चालणारी लाखो रुपयांची सौदेबाजी थांबल्याने संबंधितांचे ‘उत्पन्न‘ बुडाले. राज्यात आणि जिल्हा परिषदेतही सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीपैकी सिधुदुर्गातील राष्ट्रवादी पक्षाने शिक्षक - कर्मचारी बदल्यांचे समर्थन केले आहे. गेली दहा वर्षे,सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा पातळीवरील नेते जि.प.कर्मचारी, शिक्षक बदली प्रकरणांमध्ये मोठीच सौदेबाजी करीत आहेत. त्यापूर्वी शिवसेनेत असतांना जि.प.च्या सत्तेत असलेले आजचे काँग्रेसमधील राणे समर्थक हेच करीत आले आहेत असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भिसे यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि शिक्षकांच्या संघटनांचे नेतेही प्रशासनाने केलेल्या या बदल्या अन्यायकारक असल्याची हाकाटी करीत आहेत.
सरकारी नोकरीमधील नियम व अटींनुसार तीन किवा अधिक वर्षे एकाच जागी नोकरी करणा-या कर्मचा-यांची बदली केली जाते. ती त्यांनी स्विकारलीच पाहिजे. तरीही कोणाची आत्यंतिक गैरसोय होत असेल तर त्याला पर्यायही ठेवलेला असतो. आताही कर्मचारी-शिक्षकांच्या बदल्यांमधून अशा काही अपवादात्मक प्रकरणी बदलीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन पर्याय काढला जाईल. पण इथे कोणालाच धीर नाही. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शिक्षण खात्यातील अधिका-यांचा बदली प्रकरणातील अहवाल घेऊन संगणकावरील नदीनुसार नियमा -प्रमाणे या बदल्या केलेल्या आहेत.
यात सोयी-गैरसोयीचा (अर्थात अपवादात्मक) विचार हा तालुका व जिल्हास्तरावरील संबंधीत अधिकारी वर्गाने करणे आवश्यक होते. पण तसे काहीही झालेले नसणार! कारण त्यांची मानसिकता सकारात्मक नाही. बदल्यांमुळे ‘अत्यंत त्रस्त‘ झालेल्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना त्यांना होता होईल तेवढा प्रशासकीय त्रास व बदनामीचे प्रयत्न करुन त्यांची तीन वर्षाच्या आतच बदली व्हावी असे प्रयत्न चालविलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण यानाच त्यांनी साकडे घातले. परंतू राणे यांनाही या सर्वांचे ‘गुण‘ माहिती असल्याने त्यांनी तोंडी आदेशवजा सूचना देऊन वेळ मारुन नेली असावी. आता यातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत.

विशेष *
भोजनाचा अतिरेक
अनुभवाने सिद्ध होणा-या गोष्टी नेहमी म्हणींच्या स्वरुपात प्रसिद्ध होतात. त्यामधील कमीत कमी शब्द महत्वाचा संदेश अतिशय प्रभावीपणे आपल्या पर्यंत पोहचवतात. ‘अति तेथे माती‘ ही एक अशीच अनुभव सिद्ध म्हण आपणा सर्वांना माहितच आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याची माती होते असा या म्हणीचा अर्थ आहे.
आपल्या आहार सेवनाच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. कारण, आहार सेवनाचा अतिरेक करुन आपण आपल्या आरोग्याची अक्षरशः माती करुन घेत असतो आणि त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. आपण आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेत आहोत हे कोणी मानायला तयार नसते किवा काही वेळा अज्ञानामुळे ते लक्षात येत नाही.
लहानपणापासूनच अति भोजनालाच आपण सर्वसाधारण आहार मानत असतो. ही अतिभोजनाची चुकीची सवय रोगांसहीत एका पिढीकडून पुढील पिढीकडे वाटचाल करीत राहते. अशाप्रकारे खाण्या -पिण्याच्या चुकीच्या सवयींचे संक्रमण होते जे अनेक रोगांचे कारण बनते. स्वादिष्ट भोजन हा आपल्या सर्वांचाच अत्यंत आवडीचा विषय आहे. सर्वसाधारपणे सण किवा एखादा विशेष प्रसंग साजरा करुन आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यात गुंततो तेव्हा, ‘‘काय मग, कसा काय होता मेजवानीचा बेत?‘‘ हाच एकमेकांना विचारलेला पहिला प्रश्न असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत भोजनावर सर्वांत जास्त लक्ष दिले जाते. वाढदिवस असो, सण असो अथवा लग्नसोहळा, अशा अनेक प्रसंगी मेजवानीचा बेत असणे ही समाजात प्रतिष्ठा मिळविण्या -साठीची मान्यता पावलेली गोष्ट आहे. एवढेच कशाला, माणसाच्या मृत्यूनंतरही श्राद्धाच्या स्वरुपाने आपण लोकांना एकप्रकारे मेजवानीच देत असतो. तात्पर्य काय, तर आनंद असो वा दुःख, अतिभोजनाच्या व्यतिरिक्त काही नाही.
अशाप्रकारे भोजनातिरेकाचे संस्कार आपल्या मनावर लहानपणापासूनच बिबविले जातात. ज्या वयात आयुष्य -भराच्या सवयी संस्कारानेच निर्माण होतात. लहान मूल जेव्हा अर्धीच पोळी खाते (जी त्याच्या वयासाठी योग्य आहे.) तेव्हा आई वेगवेगळी प्रलोभने देऊन त्याला पूर्ण पोळी खाण्यास प्रवृत्त करते.
अशाप्रसंगी सर्वसाधारपणे आई काळजीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि मुलाची भूक वाढविण्यासाठी औषधे देण्याची विनंती करते. एवढ्यावरच गप्प न बसता ती अनेक प्रकारचे स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनविते. अशाप्रकारे लहानपणापासूनच अतिभोजनाचा पहिला धडा त्या मुलाला मिळतो आणि मुलावर अतिभोजनाचा मारा चालू राहतो व त्यामुळे अस्वस्थता वाढून आजारपणात वाढ होते. अस्वस्थ असल्यावर प्राणीसुद्धा आपल्या नैसर्गिक उपजत बुद्धीने अन्नपाणी सोडून उपवास करतात. अशावेळी त्यांना त्यांच्या कितीही आवडीची वस्तू खाण्यास दिली, तरी ते त्या पदार्थाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परिणामी ते लवकर स्वस्थ होतात.
भोजनाच्या अतिरेकाचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो?
मानवी शरीर अनेक प्रकारच्या पेशींपासून बनलेले असते व त्या पेशींमध्ये पंचमहाभूतांच्या तत्वांचा नैसर्गिकपणे समतोलपणा राखला जात असतो. या पेशींचे मुख्यतः दोन प्रकारचे कार्य असते. प्रथम म्हणजे अन्नातून मिळणा-या पोषणमुल्यांपासून शरीराचे पोषण करणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया चालू असताना जे रासायनिक परिवर्तन होत असते. त्यातून निर्माण होणारे विषमय टाकावू पदार्थ शरीराबाहेर टाकणे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या पेशींच्या या कार्याचा संतुलनाच्या मर्यादा आणि क्षमता ठरलेल्या असतात. त्या मर्यादांचे व्यवस्थितरित्या पालन होऊन त्या दोन्ही क्रिया व्यवस्थित कार्यरत राहिल्या तरच स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहते. पेशींच्या या कार्यात अडथळा निर्माण होऊन कार्यांचे संतुलन बिघडले की व्यक्तीस अस्वास्थ्यास सामोरे जावे लागते.
-डॉ. पल्लवी रविद्र वाडेकर,
निसर्गोपचार केंद्र, यज्ञनगर,तळवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी,
फोन - (०२३५३) २२३४८६/५८६, मोबा. ९४२३ ८५५ ८१५/८३५

मध्वानुभव
मांजर हा प्राणी ‘वास्तुप्रिय‘ असतो. जुन्या घरातून चुलीच्या उबेला बसलेले मांजर किवा मांजरे हमखास दिसत असत. सरकारी निवासस्थानात, नोकरीच्या काळात असतांना मात्र मांजराच्या संदर्भात एक वेगळाचा अनुभव आला. आम्हाला बदलीच्या ठिकाणी शासकीय निवासस्थान असल्यामुळे तेथे आम्ही दाखल झालो. एके दिवशी माझ्या मुलाला दाराबाहेर मांजराच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने त्याला घरात आणले. छोटेसे, पांढ-या रंगाचे ते पिल्लू हळूहळू घरात रुळले. आमचे विशेषतः मुलांचे मित्र झाले. मुले अभ्यासाला बसली की, तेवढा सर्व वेळ ते मुलांसमोर बसून राही. मांजराच्या जातीला शोभतील असे खेळ चालू असत. मुलांबरोबर ‘लपालपी‘चा खेळ चाले, क्वचित प्रसंगी एखादे पाखरुं, सरडा याची शिकार करीत असे पण जास्त भर शाकाहारावर म्हणजे दूधावर! पण विशेष म्हणजे चोरटे नव्हते. या मार्जार पिलाचे नामकरण मुलांनी ‘नान्या‘ असे केले. सकाळी मुले रिक्षाने शाळेत निघाली की, नान्या ‘टाटा‘ करायला रिक्षापर्यंत जात असे. तसेच सायंकाळी मुले परतून येण्याच्या वेळीही स्वागताला हजर असे. नान्याला आमच्या मुलांचा व मुलांना नान्याचा लळाच लागला होता.
यथावकाश २/३ वर्षांनी आमची बदली झाली. टेम्पो वगैरे बघून घरसामान टेम्पोत भरले. टेम्पोत सामान भरताना मुलांच्या प्रत्येक फेरीबरोबर नान्याचीही ये-जा चालू होती. संपूर्ण घर रिकामे झाल्यावर मुलांसह आम्ही टेम्पोत बसलो आणि गंमत म्हणजे नान्याही टुणकण उडी मारुन केबीनमध्ये मुलांच्या मांडीवर बसला.
रात्री किचित उशीरा आम्ही सावंतवाडीला घरी दाखल झालो. मुले जवळ जवळ झोपेला आली होती. मुलांबरोबरच नान्याला घरात ठेवले. नव्या घरात नान्या रुळणार नाही अशी अटकळ होती. पण नान्याने हा अंदाज खोटा ठरवला. दुस-या दिवसापासून हक्काच्या घरात आल्यासारखा नान्याचा वावर सुरु झाला. पूर्वीच्या घरी (सरकारी-निवासस्थानात) ज्याप्रमाणे नान्या व मुले रहात होती त्याप्रमाणे त्यांचा जीवनक्रम सुरु झाला. यात किचित बदल म्हणजे आता नान्या ‘बाप्या‘ झाल्याने अधूनमधून एखाद दोन दिवस नाहीसा होत असे. दोन दिवसांनी परत येत असे. केव्हा-केव्हा ‘प्रेम युद्धातील‘ खुणा नान्याच्या अंगावर दिसत असत. तशी या एरियात नान्याची एंट्री नवीन असल्याने प्रस्थापितांना ते रुचत नसावे. एकदा मात्र नान्या ४ दिवस झाले तरी घरी परतलाच नाही. मुले विशेषतः मुलगा खूप अस्वस्थ झाला होता. दोन-चार दिवसापूर्वी रात्रौ मार्जार प्रेम-युद्धाचे आवाज मी ऐकले होते. परंतू त्यामध्ये नान्याचा सहभाग होता किवा नाही हे समजणे अवघड होते. सुट्टीच्या दिवशी मुलांची नान्या शोध मोहिम सुरु होती आणि नान्याचे कलेवर घरा मागच्या शेतात मुलांना दिसले. रडवेली मुले घरी आली. शेतात नान्याचा छिन्नविछिन्न देह पहावत नव्हता. मी जड अंतःकरणाने नान्याला मुठमाती दिली. घरी परतत असतांना ‘केवढे हे क्रौर्य‘ कवितेतले शेवटचे कडवे आठवले ‘मातीत ते पसरले....कले वरी उदर पांडूर निष्कलंक, चंचू तशी उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला...‘

विशेष बातम्या-
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीची सभा
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अॅड.गो.रा.रेगे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामिनी मंगल कार्यालय येथे पार पडली. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद कुळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले ते मंजूर करण्यात आले. संस्थेचे मेंबर सेक्रेटरी पां. अ. केसरकर यांनी आजारपणामुळे दिलेला राजीनामा मंजूर करुन डॉ. श्री. रावजी परब यांची मेंबर सेक्रेटरी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी संस्थेच्या एक हितचितक डॉ. उषा भिसे यांनी ५ लाख रुपये देणगी जाहीर केली आहे. या संगणक प्रशिक्षण वर्गासाठी तसेच संगणावकर आधारीत एक व्यवसायाभिमुख नवा अभ्यासक्रम या पाटकर हायस्कूलमध्ये सुरु करण्याबाबत एक प्रस्ताव आलेला आहे. त्याबाबत कार्यकारी मंडळाने आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करुन हा अभ्यासक्रम सुरु करावा असे अध्यक्षांनी सुचित केले. अनेक सदस्यांनी काही प्रश्न, शंका विचारले त्याबाबत कार्याध्यक्ष कुळकर व उपाध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी उत्तरे देऊन शंका समाधान केले.

पाऊस जोरदार
मोसमी पाऊस जूनच्या प्रारंभीच जोरदार सुरु होईल असा कुठलाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला नसतांना पावसाची जोरदार वृष्टी होऊन कोकणातील पाणी टंचाई संपुष्टात आली. नद्यानाले वाहू लागले. हा पाऊस आता राज्यात सर्वत्र पसरला असून कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार तसे घडतेच असा अनुभव नसल्याने लोक निर्धास्त आहेत. तरीही प्रशासनाला आपत्कालीन व्यवस्थेची तयारी ठेवावी लागते. तशी ती सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक खोळंबली तसेच काही ठिकाणी घरांची किरकोळ पडझडही झाली. आतापर्यंत सुमारे १५० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आंबा, काजू हंगाम यंदा पीक कमीच असल्याने मे अखेरीसच संपुष्टात आला. कोकमाचेही उत्पन्न लोक घेऊ शकले. फळधारणा कमी असली तरी आंबा काजू आणि कोकमाला चांगला दर मिळाला. कॅनिग आंब्याचा दर ३० रुपये किलो झाला होता. अखेरीस तो १५ रुपयांवर आला. काजू बी किलोला ९० रुपयेपर्यंत पोहोचला. तो सुमारे ७५ रुपयांवर आला आहे.
रासायनिक खते कीटकनाशके यांच्या जास्त वापरामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो. रोग कीडींचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढताच राहतो आणि पिकाचे नुकसान होते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने आता बरेचसे बागायतदार नैसर्गिक, वनस्पतीजन्य सेंद्रीय खते, कीटकनाशकांकडे वळू लागले आहेत.

वेंगुर्ले शाळा नं. २ च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन
वेंगुर्ले शहरातील शाळा नं. २ ही १८८८ साली उर्दु शाळा म्हणून सुरु झाली. कालांतराने परिवर्तन होत ही शाळा तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट पूर्ण प्राथमिक शाळा म्हणून नावारुपास आली. १ ते ७ वर्गाच्या या शाळेत ३५० ते ४०० पटसंख्या असायची. सध्या वार्धक्याने आजारी असलेले केळूस येथील राष्ट्रपती पदक विजेते आदर्श शिक्षक श्री.वि.रा.प्रभू यांच्या कारकिर्दीत ही शाळा यशोशिखरावर होती. या शाळेस त्यांनी ज्ञानमंदिराबरोबरच संस्कार मंदिराचे स्वरुप दिले. त्यांचे सहकारी शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त मेहनत घेत होते. या शाळेतून घडलेले विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात ठिकठिकाणी नेतृत्व करतांना दिसतात.
सुप्रसिद्ध माईनओनर व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गावडे, पुष्कराज कोले यांचे वडील रामकृष्ण कोले, जागतिक किर्तीचे रांगोळीकार गुणवंत मांजरेकर, डॉ.नंदन सामंत, डॉ.अमोल पावसकर, डॉ. संजय सामंत, नगराध्यक्ष संदेश निकम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव उल्हास मांजरेकर, गोव्याचे शिक्षणाधिकारी शरद रेडकर, उद्योगपती आनाजी भगत हे या शाळेचे विद्यार्थी. अशी किती नावे घ्यावी!
अलिकडेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत या शाळेस सुंदर दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. तसेच जुनी इमारत पाडून तेथे मुलांसाठी खेळाचे मैदान तयार केले आहे. शाळेस कंपाऊंड वॉल, अंतर्गत क्रीडा साहित्य, संगणक अशा भौतिक सुविधा प्राप्त केलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील विद्यार्थी या शाळेकडे आकृष्ट होत आहेत. पूर्वी या शाळेत नवाबाग, दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडी, गावडेवाडी, मधलीवाडी, भुजनाकवाडी येथील मुले शिक्षणासाठी येत होती. आता वाडी-वस्तीवर शाळा झाल्या. माध्यमिक शाळांना ५वी ते ७वी वर्ग जोडले तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या. यामुळे शाळेची पटसंख्या कमी झालेली असली तरी शैक्षणिक दर्जा उत्तम आहे.
अलिकडेच या शाळेच्या मुख्याध्यापकपदी या शाळेचेच माजी विद्यार्थी कैवल्य पवार हे रुजू झाले. आदर्श शिक्षक म्हणून ओळखल्या जाणा-या पवारगुरुजींनी शाळेस गतवैभव प्राप्त करुन देण्याचे ठरविले आहे. त्यांच्या मदतीला या शाळेचे माजी विद्यार्थी -पत्रकार शेखर सामंत, उद्योजक विलास गावडे, सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री व संजय तानावडे, नितीन नांदोस्कर, जॉन्सन फर्नांडीस, वैभव गावडे यासारखे माजी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. विलास गावडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेचे मैदानास सपाटीकरण व कार्यक्रमांसाठी कायमस्वरुपी हॉल (शेड) बांधून देण्याचा संकल्प केला आहे. पुष्कराज कोले यांनी भरघोस मदतीचे आश्वासन दिने आहे.
या शाळेसाठी अत्याधुनिक संगणक कक्ष, प्रयोगशाळा, सर्व विद्यार्थ्यांना डेस्क बेंच, शुद्ध पाण्याची व्यवस्था यांसारख्या गरजांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्याची व मदतीची गरज आहे. यासाठी या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा असे माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले आहे. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी सारस्वत बँक शाखा वेंगुर्ले येथील बचत खाते क्र. ०३९२००१०००१७४८४ या क्रमांकाच्या खात्यावर पैसे भरावेत. अधिक माहितीसाठी संफ -९४२२५९६३८९

No comments:

Post a Comment