Thursday 2 June, 2011

अंक २०वा, २ जून २०११

अधोरेखीत

पर्यटनवृद्धीची आश्वासने प्रत्यक्षात येणार काय?

सिधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन तब्बल १४ वर्षे होत आली आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरसंस्कृती, अस्सल कोकणी जेवण, लोकसंस्कृती, एकाच जिल्ह्यात समुद्र किनारा आणि आंबोलीसारखे हिलस्टेशन सिधुदुर्गातच आढळते. पर्यटनासाठी अनुकूल अशा सर्व गोष्टी असूनही एक-दोन हंगामी अपवाद वगळता सिधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या मागेच राहिला आहे.

वेळागर, आरवली, वेंगुर्ले, निवती, परुळे-भोगवे, तारकर्ली, मालवण, देवगड येथे स्थानिकांच्या पुढाकाराने अलिकडच्या ५-६ वर्षात चांगल्या दर्जाच्या निवास न्याहारीच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने अशा सुविधा उपलब्ध करुन देणा-यांना काही प्रमाणात करांमध्ये सवलत देऊन निवास न्याहारीच्या योजनेत सामावून घेतले आहे. पण सिधुदुर्गसाठी कोणताही ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. पर्यटन महामंडळाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी घेण्यात येणा-या पर्यटन महोत्सवातून दोन वर्षापूर्वीच फतवा काढून महामंडळाने आपला सहभाग काढून घेतला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्याच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये शासनाच्या या महामंडळाने आपली उदासीनता दाखविली आहे. तुलनेने पर्यटनात कितीतरी पुढे असणा-या आपल्या शेजारच्या गोवा आणि केरळ राज्यात त्यांची पर्यटन महामंडळे देशभर जाहिरातीसाठी आणि निरनिराळ्या विषयाला वाहिलेले महोत्सव स्थानिकांच्या मदतीने आयोजित करीत असतात. त्या राज्यांमधल्या पर्यटन महामंडळांना संपूर्ण स्वायत्तता असून एम.टी.डी.सी.सारखा त्यांचा कारभार अजूनतरी सरकारीछापझालेला नाही.

अलिकडेच केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार, राज्याचे पर्यटन आणि बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सिधुदुर्ग दौरे झाले. या दौ-यांच्या निमित्ताने उखडलेल्या रस्त्यांना एक-दोन दिवसात झळाळी आली. समुद्रकिना-यालगतची विश्रामगृहे अंतर्बाह्य बदलली आणि येत्या काही वर्षात पर्यटनाने सिधुदुर्गचा चेहरा-मोहरा पालटणार अशी आश्वासने देण्यात आली. यामध्ये आंबा संशोधन केंद्रालगत कृषि पर्यटन केंद्र, वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन व्हिलेज, नवाबाग येथील धूपप्रतिबंधक बंधारा, मांडवी येथील झुलता पूल, आरवली, वेळागर येथील पंचतारांकित हॉटेल्सचे रखडलेले प्रकल्प, मालवण येथे स्नॉर्कलिग, नवीन स्कुबा डायव्हिग केंद्र, खाड्यांमध्ये हाऊसबोट असे प्रकल्प लवकरच साकारले जातील अशी ग्वाही मंत्रीमहोदयांनी दिली. या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकारी यंत्रणा जी मंत्र्यांच्या आदेशाबरहुकूम आणि प्रशासकीय नियम आणि धोरणांनी चालत असते, तिच्याकडून होणा-या अंमलबजावणीवरच अवलंबून आहे.

पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी तर पर्यटन विकासासाठी असलेले दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले कोकण पॅकेजमधील २२५ कोटी रुपये खर्चच झाले नसल्याचे मान्य केले. ते कोणामुळे अखर्चित राहिले हे सांगायला त्यांनी नकार दिला असला तरी भविष्यात सर्व खात्यांशी समन्वय साधून पर्यटन विकास साधला जाईल हे सांगायला ते विसरले नाहीत.

तब्बल १४ वर्षांनंतर पनवेल पासून ते गोव्यापर्यंत महामार्गालगत असणा-या पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्यांचे दिशादर्शक फलक, पर्यटनस्थळे जोडणारे चांगले रस्ते, महत्वाच्या पर्यटन स्थळांवर स्वच्छतागृहे आता एम.टी.डी.सी., सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने उभारणार असल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे मॅनेजिग डायरेक्टर किरण कुरुंदकर यांनी दिली.

या नुसत्या आश्वासनांची सवय आता कोकणवासियांना झाली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पर्यटनस्थळे आज सिधुदुर्गात विकसीत झाली आहेत. तीसुद्धा स्थानिकांच्या पुढाकाराने आणि ऐतिहासीक वारशांमुळे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून काही विशेष तरतुदी, पर्यटनामध्ये गुंतवणुक करणा-या स्थानिकांना काही वर्षांसाठी कर सवलत (जी गोवा राज्यामध्ये दिली जाते), २४ तास वीज, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि चांगले रस्ते या मुलभूत सुविधा तरी सरकारनेच द्याव्या लागतात. १४ वर्षांनंतरही पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. हॉटेल उद्योजकांसमोर सरकारी अधिकारी नियम आणि अडथळ्यांची शर्यतच लावून देतात. यामध्ये सुवर्णमध्य काढून काही मार्ग काढता येईल का अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरु लागले आहे.

कोकणातील लोक नेहमी नव्या उद्योगांना-प्रकल्पांना विरोध करतात असा समज पसरवला गेला आहे. पण आजपर्यंत एकाही सकारात्मक प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध केलेला नाही. कोकणरेल्वे, सिधुदुर्गचे विमानतळ यासाठी लोकांनी जमिनी दिल्या आहेत. विमानतळाच्या बाबतीत फक्त सातबा-यावरील पेन्सिल नोंदी आणि अतिरिक्त जमिन संपादनाला विरोध होत आहे.

पारदर्शकता असणा-या चांगल्या प्रदूषणविरहीत प्रकल्पांचे इथल्या लोकांनी स्वागतच केले आहे. सर्वात आधी गरज आहे ती सरकारी अधिकारी वर्गाची मानसिकता बदलण्याची. एम.टी.डी.सी.ची नावापुरती असणारी स्वायत्तता ख-या अर्थाने बहाल होण्याची. हे सर्व प्रत्यक्षात येण्यासाठी खंबीर नेतृत्व कोकणच्या मागे उभे राहिले पाहिजे. विधिमंडळात कोकणातील १७ आमदार प्रतिनिधीत्व करतात. आपापसातील हेवेदावे विसरुन ते कोकणच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजेत. तर आणि तरच कोकण आणि सिधुदुर्गच्या पर्यटन विकासाची हवेतली आश्वासने प्रत्यक्षात उतरतील.

अॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९


संपादकीय *

राष्ट्रवादीला पक्षवाढीचा ध्यास

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोकणातील सिधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेचा यंदाच्या पर्यटन हंगामात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी या जिल्ह्यात पायधूळ झाडली. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी तर मे महिन्यात दोन वेळा जिल्ह्याला भेट दिली आणि पक्ष कार्याबरोबरच शेती शास्त्रज्ञांची बैठक घेऊन आंबा पिकाच्या दरवर्षी होणा-या नुकसानीची दखल गांभीर्याने घेतली. शेती शास्त्रज्ञांना नवीन उपाययोजना शोधण्यास सांगितले. परवाच्या दौ-यात ना. शरद पवार यांनी आंबोली - नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या उसांवर संशोधन करणा-या संस्थेस भेट देऊन जलद वाढणा-या, अधिक साखर देणा-या, कोणत्याही हवामानात टिकणा-या उसाचे संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा म्हटल्यावर राष्ट्रवादीचे झाडून सारे पदाधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दौ-यात सहभागी होणार हे ओघाने आले. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पिकांच्या मशागतीबरोबरच राष्ट्रवादी पक्षाची वाढ होण्यासाठीही राजकीय मशागत केली असणार!

जिल्ह्यातील सावंतवाडी (दोडामार्ग-वेंगुर्लेसह) विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरच पक्षाध्यक्षांनी पक्षवाढीचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवराम दळवींनाच राष्ट्रवादीत दाखल करुन घेऊन धडाकेबाज सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार आणि अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या बातम्या पसरल्या आहेत.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या प्रकारे शेतीची आणि पक्षाची मशागत चालविलेली असली तरी त्यांनी कोकणातील रखडत पडलेल्या सिचनाच्या योजनांबाबत काही ठोस कार्यवाही जाहीर करणे अपेक्षित होते. कारण त्यांच्या कृषी खात्याचे कार्य तर पाण्यावरच अवलंबून असते. राज्याचे पाणीपुरवठा खातेही त्यांचेच पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. शेती-बागायती आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असलेल्या या खात्याची नावे जरी बदलली तरी त्यातील झारीतील शुक्राचार्याची भूमिका काही बदलली गेली नाही.

सिचन प्रकल्पांतून पाणीच न देणारा झारीतील शुक्राचार्य हा भ्रष्टाचारच आहे. पण झारीच्या नळीत काडी घालून त्या भ्रष्टाचाररुपी शुक्राचार्यांचा डोळा फोडून पाणी वाहते करण्याचे काम कोणीच करीत नाही. त्यामुळेच कोट्यावधी रुपये खर्च होऊनही ग्रामीण जनतेचे पाण्यासाठीचे हाल संपत नाहीत. शहरात तर पिण्याचे पाणी एक दोन दिवसाआड लोकांना मिळते. कारण, जलसंपदेचे नीट नियोजन नाही. लहान मोठ्या पाटबंधा-यांच्या योजना मंजूर होतात पण पाण्याचा थेंबही न अडविता बहुतांश निधी कर्मचा-यांचे पगार, त्यांच्यासाठी निवासस्थाने बांधणे, यंत्रसामुग्रीची खरेदी यातच संपून जातो. त्यातून ठेकेदार पुरवठादार आणि लोकप्रतिनिधी यांचे खिसे भरतात. असे सरकारी समितीचा अहवालच सांगतो. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी पाणी पुरवठ्याच्या समस्येवर भाष्य केले असते. संबंधीत सरकारी यंत्रणेला खडसावले असते. आपल्या पक्षाच्या नेत्या - कार्यकर्त्यांना या कामांच्या पूर्ततेची खबरदारी घेण्यास बजावले असते तर सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात लोकांना तेवढा तरी दिलासा मिळाला असता. पण यातले काही घडले नाही. मंत्र्यांच्या दौ-यात असलेल्या गाड्यांच्या ताफ्यांनी रस्त्यावरचा धुरळा तेवढा उडाला. यामुळे पक्ष कसा वाढणार याची चिता कोणालाच असल्याचे जाणवले नाही.

विशेष *

जैतीर उत्सव

वैशाख महिन्यात दर्श भावुका अमावास्येला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे जैतिर उत्सव होतो. यंदा १ जून पासून सुरु झाला आहे. भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाविषयी -

संस्थानकाळात पूर्वी तुळस गावात जैते परब नावाचे थोर लढवय्ये, परोपकारी, न्यायी पुरुष होऊन गेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रांगणागडावर त्यांची सुभेदार म्हणून नेमणूक झाली. एकदा कामावरुन परत येतांना वाटेत नारुर गावी मुलीच्या सासरी तिला आपल्यासोबत आणण्यासाठी गेले. सोबत कुळंबीण स्त्री असावी असे तिच्या सासरच्यांनी सांगितल्यावरुन ते तुळस गावी आले. परत सोबत कुळंबीण स्त्री, नागन महार अ तिघेजण नारुर गावी जात असतांना भिल्लांच्या एका टोळक्याने या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैतोबांनी अनेक भिल्लांना कंठस्नान घातले. घनघोर चकमक झाली. लपून मारलेला एक तीर जैतोबांना वर्मी लागला. त्यांचे पार्थिव नागन महाराने तुळस गावी आणले. विधीपूर्वक अंत्यसंस्कार झाले. त्या जागीच छोटेसे जैतिर मंदिर बांधण्यात आले. हा जैतोबा उर्फ जैतिर गावचा रक्षणकर्ता मानला जातो.

या मंदिरात प्रतिवर्षी दर्श भावुका अमावास्येला वैशाख महिन्यात जत्रा भरते. हा उत्सव जेवढा दिमाखदार तेवढाच अतक्र्य, गुढ परंपरांनी भरलेला, भक्तांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा ठरत आहे. आदल्या दिवशी जोगीनी, भोगीनी हे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या दिवसापासून अकराव्या दिवशी कवळास उत्सव होतो. पाचव्या दिवसापासून जैतिर मुखवटाधारी देवपुरुष गावात सवाद्य फिरुन घरोघरी दर्शन देतो. सोबत मानकरी, सेवकवर्ग असतो. रात्री देवालयासमोरील मांडावर भाविकांची गा-हाणी (पडस्थळे) घेतली जातात. त्यांना मार्ग सांगितला जातो. अडीअडचणीत जैतीर देवाला हाक दिल्यास कामे होतात. यश येते अशी श्रद्धा आहे. जैतिर देवस्थान भाविकांचे अढळ श्रद्धास्थान आहे.

यंदा १ जून पासून जैतिर उत्सव यात्रा तर १० जूनला कवळास उत्सावाने जैतिर उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवाला मोठी गदी असते. पावसाळ्यापूर्वी भरणा-या या उत्सवातील बाजारात शेती अवजारांची मोठी उलाढाल होते. गोवा, कोल्हापूर, मुंबईपासून महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात भाविकवर्ग पसरला आहे.

या उत्सवामधली लक्षवेधी अशी प्रथा असते ती कातरची. गावतील सुतार बांधव या प्रथेत चक्क तलवारीखाली मान ठेवतात. त्या व्यक्तीवर बारा हरिजन झोपतात. यानंतर गावात जैतिरच्या आयुधांच्या पेटा-याची पूजा करणारी राऊळ मंडळी पुढे येतात आणि ते खंजिर उगारतात. यावेळी जैतिराचे तरंग या मंडळींभोवती प्रदक्षिणा घालून या व्यक्तींना शापमुक्त करतात आणि कारत सुटते. सुतार बांधवांमध्येही या तलवारीखाली मान कोणी ठेवावी याचा मान ठरलेला असतो. प्रत्येक वर्षाची वर्सल ठरलेली असते.

जैतिर देवालय परिसरात अन्य मंदिर आहेत. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्याला लागूनच असलेला हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून जिल्हा पर्यटन आराखड्यात नमूद झालेला आहे. तुळस जैतिराश्रीत संस्था, मुंबई व स्थानिक समिती यांनी श्री देव जैतिराच्या आशीर्वादाने गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. जैतिर मंदिराचा व परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार या मंडळीने लोकांच्या सहकार्याने केला आहे.

निसर्गरम्य वेंगुर्ले शहरापासून ८ किलोमीटरवर वेंगुर्ले - सावंतवाडी रस्त्यावर तुळस गाव आहे.

विशेष *

मुंबई गोवा दीड वर्षात रुंद

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. झाराप ते पत्रादेवी या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पनवेल ते झाराप रस्त्याचे काम ४ टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असे पर्यटन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यात दिले. पर्यटनासाठी कोकण पॅकेजमधून २२५ कोटी रुपये मंजूर करुनही दोन वर्षात अपेक्षित कामे झाली नसल्याची कबुली देत मंजूर कामे वर्षभरात पूर्ण झालीच पाहिजेत असेही त्यांनी संबंधीत अधिका-यांना बजावले. भुजबळ यांनी आरोंदा, शिरोडा-वेळागर, आरवली, वेंगुर्ले, कुणकेश्वर येथील पर्यटन योजनांची पाहणी केली. त्यांचे समवेत आमदार दीपक केसरकर, खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी आणि पर्यटन, बांधकाम खात्यांचे अधिकारी होते.

सागरी महामार्गावरील आरोंदा-किरणपाणी पूल येत्या ऑगस्ट महिन्यात वाहतुकीस खुला होईल. पर्यटन विकासासाठी सिधुदुर्ग जिल्ह्याला ८३ कोटींचा निधी दिला जाईल. शिरोडा - वेळागरचा वादग्रस्त भाग वगळून तेथे ताज ग्रुपचा पंचतारांकित प्रकल्प होईल. वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन्स व्हिलेज, मिठबांव येथे २० कोटींचा तारकर्लीप्रमाणे रिसॉर्ट, सिधुदुर्ग आणि विजयदूर्ग किल्ल्यांसाठी ७ कोटी रुपये मंजूर अशी कोट्यावधी रुपयांची आश्वासने देऊन आणि योजना जाहीर करुन पर्यटन मंत्र्यांनी हा दोन दिवसांचा धावता पर्यटन दौरा आटोपता घेतला.

आजोळचे उद्घाटन

कुडाळ तालुक्यातील नेरुर गावात इंगेश हॉस्पीटलच्या परिसरात ज्येष्ठ नागरीकांचे आजोळ२९ मे पासून सुरु झाले. तेथे पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना कोणताही दुर्धर आजार होऊ नये यादृष्टीने सल्ला-मार्गदर्शन उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी कुडाळ येथील सिधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर, रेडी येथील कार्डिओलॉजी सेंटर,मालवण येथील रेडकर हॉस्पीटल यांच्या मदतीने नेरुर येथील या आजोळीरुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पर्यटन केंद्राप्रमाणे येथे निवासी सोयी असून जिल्ह्यातील अन्य तज्ञ डॉक्टारांचीही या आजोळला मदत मिळणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ.विवेक रेडकर यांनी दिली.

हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, मोतिबिदू, दंत उपचार, सांध्याचे विकार यावर अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग, निसर्गोपचार या उपचार पद्धतींचा मेळ घालून आजोळी येणा-या रुग्णांचे स्वास्थ्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व सुखसोयींसह १४ सदनिका असलेले हे एक वैद्यकीय पर्यटन केंद्रच असून त्यातून मिळणा-या उत्पनातून अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्पदरात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.

शेखर सामंत, स्वाती वालावलकर यांना श्रीकांत लाड पुरस्कार

मूळचे वेंगुर्ल्याचे मुंबईच्या कामगार चळवळीत एकेकाळी अग्रणी नेते असलेले कॉम्रेड श्रीकांत लाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कॉ. श्रीकांत लाड स्मृती समितीतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या दरवर्षी एका व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणारे वेंगुर्ल्याचे श्री. शेखर सामंत यांना २०१० सालचा तर राष्ट्रीय विज्ञान जत्रेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणा-या सौ. स्वाती वालावलकर यांना २०११ सालचा पुरस्कार नेरुर येथील आजोळप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात देण्यात आले.

शेखर सामंत हे दै. तरुण भारतचे जिल्हा प्रमुख असून त्यांनी आतापर्यंत विविध वार्तांकनाद्वारे क्रीडा, कला, सांस्कृतिक, नवीन संशोधन आणि गुन्हेगारी विषयक लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

सौ.स्वाती वालावलकर या वेतोरे येथील सातेरी हायस्कूलच्या गणित विषयाच्या अध्यापक असून त्यांनीही तालुका, जिल्हा-स्तरावर विज्ञान जत्रेत अनेकवेळा पुरस्कार मिळविलेले आहेत.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख एक हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून श्रीकांत लाड स्मृति समितीचे कार्याध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

रेडीत अद्ययावत वैद्यकीय सेवा केंद्र सुरु

रेडी येथे मालवणचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी रेडकर हॉस्पीटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या माध्यमातून तेथे २४ तास अतिदक्षता विभाग, अर्धांग व संधीवातावर उपचार, फिजिओथेरपी सेंटर, नेत्रविकार शस्त्रक्रिया, फुफ्फुसाचे आजार तपासणी यंत्रणा, सोनोग्राफी, इकोकॉर्डिओग्राफी, एक्सरे आदी उपचार केले जाणार आहेत. तेथेच २४ तास खुला राहणारा मेडिकल स्टोअर्सही आहे. या सेंटरच्या पहिल्या मजल्यावर आरवली-टांक येथील शेटये ट्रस्टने कॉन्फरन्स हॉल बांधून दिला असून त्यांचा वापर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. श्री.आबा शेटये यांच्या हस्ते ट्रस्टच्या या नवीन वास्तूचे उद्घाटन ३० मे रोजी झाले.

या ठिकाणी दारिद्रयरेषेखालील लोकांना स्मार्टकार्ड दिले जाणार असून त्यांना औषध योजना मोफत राहणार आहे अशी माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी दिली आहे.

सहवेदना *

प्रा. मोहन पवार

खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक मोहन पवार यांचे पणजी - गोवा येथे त्यांचे बंधू प्रकाश यांच्या घरी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. वेंगुर्ले येथे ते मराठी विषयाचे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. नोकरी सांभाळून त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला होता. त्याशिवाय वेंगुर्ल्यातील सर्व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असे. वेंगुर्ले येथून त्यांची बदली कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात झाली. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. संस्थेचे सचिव व संस्कृत पंडित प्राचार्य एम. आर.देसाई यांनी अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या महाभारतावरील व अन्य ग्रंथांचे मराठी अनुवाद प्रा. पवार यांनी केले आहेत.

किरातशी त्यांचे खूप जवळचे नाते होते. अनेक विषयांवर त्यांनी किरातमधून सातत्याने लेखन केले आहे. ‘किरातच्या हिरकमहोत्सवी (६०व्या) वर्षारंभ अंकात त्यांनी किरातचा पूर्व इतिहास आणि एकूण कोकणातील वृत्तपत्रसृष्टी विषयी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख आजही संदर्भासाठी वाचला जातो. किरातचे संवर्धक कै. बाबा मराठे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

अनेक दैनिक वृत्तपत्रात ते साहित्यिक, मासिके यांमधूनही विविध विषयांवर प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. फोटोग्राफीच्या छंदासाठी त्यांची कोकणची खूप भटकंती केली होती. एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता.

कोल्हापूर सोडल्यानंतर ते आपले धाकटे बंधू सी.ए. प्रकाश पवार यांच्याकडे पणजी-गोवा येथे वास्तव्यास होते. काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता पण, त्यातून ते सावरले होते व लेखनही करु लागले होते. त्यांच्या पत्नी व दोन मुलगे पुणे येथे स्थायीक आहेत. किरातपरिवाराचे एक सदस्य असलेले प्रा. मोहन पवार यांच्या निधनाने किरातपरिवाराला अतीव दुःख होत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

गोविद नांदोसकर

मुळचे भटवाडी येथील मीरा-रोड निवासी श्री. गोविद गणेश उर्फ आबा नांदोसकर (७०) यांचे १६ मे रोजी निवासस्थानी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अक्षता भोगटेची आत्महत्या

वेंगुर्ले- दाभोलीनाका येथील अक्षता दिगंबर भोगटे (१८) हिने बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने नैराश्येपोटी घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ती खर्डेकर महाविद्यालयात विज्ञान विभागत शिकत होती. तिचे मागे आई-वडील, दोन बहिणी आहेत.

No comments:

Post a Comment