Saturday, 12 March, 2011

अंक ९वा, १० मार्च २०११

संपादकीय *

स्त्रीची गरुडझेप हवी!

मै नारी हूँ। नही हारी हूँ। नही हारुँगी ।

असं खंबीरपणे म्हणणा-या स्त्रिया आज २१व्या शतकात कुठेच मागे नाहीत. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. क्रीडा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय व्यवसाय एक ना अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया आजही आपला ठसा उमटवत आहेत.

स्त्रियांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली आणि अजून प्रगतीची नवीन दालने तिच्यासाठी खुली होत आहेत. पूर्वीच्या काळी अनन्वित अत्याचार, अन्याय सोसणारी स्त्री, उंब-याच्या बाहेर न पडू पहाणारी स्त्री,सती प्रथा,केशवपन आणि त्याचवेळी होणारे अत्याचार, बालविवाह या सा-यांमधून अगदी शंभर टक्के म्हणता येणार नाही, परंतू ब-याच अंशी बाहेर पडली. सती प्रथा पूर्ण बंद झाली. सावित्रीबाई फुल्यांचा आदर्श असलेल्या स्त्रियांनी अफाट प्रगती केली. सारं जग आज याची साक्ष आहे.

परंतु स्त्री खरंच स्वतंत्र आहे का? स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय? अशा अनेक पैलूंवरती एक स्त्री म्हणून महिलादिनाच्या निमित्ताने मला माझे विचार आवर्जून मांडावेसे वाटतात.

स्त्री मुक्ती किवा स्त्री स्वातंत्र्य हा शब्द मला थोडा विचित्र वाटतो याचं कारण असं की, कुणीच कधीच स्वतंत्र नसतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही परस्परावलंबी आहे. आपापल्या नित्य जबाबदा-या या प्रत्येकालाच पार पाडाव्या लागतात. तसं केल नाही तर समाजव्यवस्था पार कोलमडून जाईल. मग स्वातंत्र्य, मुक्ती म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने समाजाचा, लोकांचा स्त्रीकडे पहाण्याच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. जबाबदा-यांची देवाण-घेवाण व्हायला हवी.याचं कारण असं, पुरुष आणि स्त्री ही सारखीच कमाई करीत असतील तरी पुरुषांच्या तुलनेत घर-दार, स्वयंपाक, येणं-जाणं, पाहुणे, सगळी नाती, उरलं-सुरलं पहाणं ही सारी कसरत स्त्रीलाच करावी लागते. म्हणूनच अनेक मोठ्या पदांवर असलेल्या महिला,शिकलेल्या महिला म्हणत असतात, ‘कितीही शिकलं ना तरी या कामांना पर्याय नाही हो!

याकरिता ख-या अर्थाने कामाचं शेअरिगव्हायला हवं. घरातल्या पुरुषानेही आपली पत्नी, आपली आई, बहीण जे कुणी असेल त्याला प्रामाणिकपणे मदत करणं, इतर काही जबाबदा-यांमध्ये हातभार लावणं हे जर केलं, थोडा दृष्टिकोन बदलला तर सगळच सुरळीत आणि सुसह्य होईल हे निश्चित!

आपण अनेकदा वाचतो की, ‘चूल आणि मूलयातून स्त्री बाहेर पडली. हे अगदी खरं आहे. परंतू तिच्या जबाबदा-या ती नाकारु शकत नाही. मुळातच केवळ चूल आणि मूलसंभाळणा-या स्त्रियाही कमी नाहीत. सगळ्यांकडे शिक्षण असेलच असं नाही. परंतु परमेश्वरानं कुणाला कला बहाल केलेली असते, कुणाला वक्तृत्व! कुणी पाककलेत प्रविण असतो. केवळ नोकरी केली म्हणून ती मोठी...... हा दृष्टिकोन बदलायला हवा. वीज मंडळाच्या कार्यालयात वीज वाचवा, वीज मिळवा.असं वाक्य वाचायला मिळतं. मग जी स्त्री घरच्या जबाबदा-या उत्तम प्रकारे सांभाळते. जसं असेल त्यात पैसे वाचवून घर चालवते त्या स्त्रीकडे पैसे वाचविणारी, पैसे मिळविणारीअसं का पाहिलं जात नाही? हे घडलं तरच स्त्री मनोमन,आनंदाने,समाधानाने आपलं जीवन ख-या अर्थी जगेल.

केवळ स्त्री मुक्तीचा डंका मिरवण्यापेक्षा खरंच नेमकी गरज कशाची? कोणाला काय समस्या आहेत? हे जाणून घेऊन त्यावर सशक्त उपाय, मदत केली गेली पाहिजे? अनेक वृत्तपत्रातून आपण वाचतो, चॅनल्सवर बघतो, बलात्कार, स्त्री शोषण यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. अशी शिक्षा हवी की पुन्हा कुणाचं तसं पाऊल उचलायचं धाडसच होणार नाही! समस्येतून बाहेर पडण्यासाठी ख-या अर्थी हात दिला पाहिजे. केवळ नारे देऊन काहीच होणार नाही.

तसंच स्त्रीमुक्ती, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुलींनी, स्त्रियांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. मॉडर्न जरुर असावं परंतु त्यातही अंगप्रदर्शनचा बीभत्सपणा नसावा. केवळ करिअरच्या नावाखाली मूल्यांची होणारी पायमल्ली थांबली पाहिजे. समाजामध्ये वावरतांना कसं वागावं? आपली वेशभूषा कशी असावी? आज शहरामध्ये केवळ जबाबदारी नको म्हणून मूल न होऊ देता एकत्र राहिलं जातं. मातृत्व असूनही केवळ फिगर जपण्यासाठी तर, कधी पाश्चात्यांच अंधानुकरण म्हणून सरोगेट मदरसारखे पर्याय जवळ केले जाताना दिसतात. विवाहबाह्य संबंध, बीभत्स अंग प्रदर्शन खरंच या गोष्टी योग्य आहेत का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. निसर्गाने आपल्या -कडे मातृत्व दिले आहे. एक पिढी घडवणं आपल्या हातात असतं. स्वतः केवळ स्वातंत्र्य या नावाखाली बोन्सायबनून रहाण्यापेक्षा विशाल वटवृक्ष होवून सगळ्यांची छाया बनावं! हाही विचार गरजेचाच आहे! तरच यशाच्या गगनभेदी आयुष्यात ख-या अर्थानं स्त्रीची गरुडझेपसार्थकी लागेल!

अतिथी संपादक

सौ. सुमेधा देसाई

अधोरेखित *

मला आईची आई बनायचंय!

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी

आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. ऽऽ आईऽऽ

खरोखरच आईहा शब्दच असा आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाचं विनाअट संगोपन करत असते. मातृत्वाचं वरदान लाभलेल्या स्त्रियांचा तो एक नैसर्गिक गुणच आहे. परंतु एकाच नाही तर हजारो मुलांची आई असलेल्या माई म्हणजेच सिधुताई आणि स्वतःच्या आईचा सहवास ख-या अर्थान न लभता सुद्धा त्याविषयी न कुरकुरणारी त्यांची कन्या ममता या मायलेकी आजच्या स्त्रियांसाठी आदर्शवतच म्हटल्या पाहिजेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने या माईच्या लेकीचा प्रवास तिच्या भावना, विचार उल्लेखनीय आहेत असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

मी सिधुताई सकपाळ बोलतेयया सिधुताईंचा जीवनपट उलगडून दाखविणा-या चित्रपटामुळे माईघराघरात जाऊन पोचल्या आहेत. हजारो मुलांची आई बनण्यासाठी त्यांना स्वतःचं मातृत्व बाजूला ठेवून, त्याग करुन जगावं लागलं. त्यांची मुलगी ममता प्रत्येक टप्प्यावर जसं जमेल तसं शिक्षण घेत दोन वर्ष या संस्थेत, दोन वर्ष त्या संस्थेत असं करत केवळ वर्षातून एखाद-दोन वेळा आई भेटावी अशा त-हेने तिचं बालपण गेलं. ६वी नंतर पुण्यात शिक्षणासाठी माईंनी तिला ठेवलं. १२ वर्ष होस्टेलला राहून मानसशास्त्रामध्ये बी.ए. व नंतर एम.एस.डब्ल्यू. ममताने पूर्ण केलं. आज ममता माईच्या म्हणजेच आईच्या वाटेवरुन चालत ११० मुले, अनेक वृद्ध माणसे, विधवा, घटस्फोटीत महिला, निराधार, निराश्रीत महिला अशा निराधारांची धुरा सन्मती बालनिकेतनया संस्थेच्या माध्यमातून सांभाळत आहे.

ममताशी दूरध्वनीद्वारेच संफ झाला. चर्चेच्या ओघात ती बोलत गेली. सामान्य मुलांसारखी आपली आई आपल्या वाट्याला आली नाही याचं कधी दुःख वा खंत वाटली नाही. कारण इतर मुलांजवळ आई जशी जवळ असते तशी माझ्याजवळ कधीच नव्हती, त्याखेरीज संस्थेमध्ये वाढणारी इतर मुलंही आईविनाच होती. त्यामुळे कुटुंब हे विश्वच माहित नव्हतं. जेवढी आई भेटायची तेच परमसुख वाटायचं. जे मिळालं त्याव्यतिरीक्त आई मुलीचं नातं काय असतं ते पाहिलंच नव्हतं.आईचा खूप अभिमान, कौतुक वाटत असल्याचं ती सांगते. आपल्या आईविषयी भारावून बोलतांना आईला म्हणजेच सिधुताईंना जेव्हा एवढ्या प्रकाशझोतात ती पहाते त्यावेळी आपण हिचा अंश आहोत यावर स्वतःचाच विश्वास बसत नाही. एवढी मोठी मातालाभणं हे मी परमभाग्य मानते. ज्यावेळी माई थकतात त्यावेळी मला त्या लेकरासारख्या वाटतात. माईंना आंजारावं, न्हाऊ माखू घालावं असं मनोमन वाटतं. आईसाठी काय करावसं वाटतं? असं विचारल्यावर ती पटकन उत्तरते, ‘मला आईची आई व्हायचंय!ममताची ही प्रगल्भता, विचारांची ही उंची तिच्याजवळ आली कशी हे तिलाही उमजत नाही. परंतु आई हेच विश्व, आईची वाटचाल, तिची निर्णयक्षमता, तिचे मनावर नकळत होणारे उत्तम संस्कार, आईच्या दूधातूनच ही प्रगल्भता आल्याचे ती सांगते.

समस्या प्रत्येकाला असतात. प्रत्येक स्त्रिच्या समस्या, तिला उपलब्ध असलेले पर्याय, परिस्थिती यातून मार्ग काढायला मदत केली तर तो खरा प्रयत्न म्हणता येईल. केवळ दिखाऊपणासाठी स्त्री मुक्तीचा पिटला जाणारा डंका, मोर्चे यातून काहीच साध्य होणार नाही. प्रत्यक्ष मदत अनिवार्य असल्याचं ती सांगते.

माई हजारो मुलांच्या आई बनल्या आहेत. आज तरुण पिढीची केवळ करियर या नावाखाली किवा स्त्रीमुक्ती या शब्दाचा विपर्यास करुन मातृत्वनाकारण्याची शहरातील वाढती मानसिकता किवा सरोगेट मदर यावर बोलताना ती सांगते की, आपण जे बघतो, एकतो त्याने माणसाचा दृष्टिकोन तयार होत असतो. आपण डोळे उघडे ठेवून चालले पाहिजे. आपण एखादं काम केले नाही तर तिथे दुसरं कुणीतरी हजर असतं. हा विचार डोक्यात ठेवून वागणं फार महत्वाचं. तरुण पिढीचा बदलता दृष्टिकोन, मुक्तीच्या नावाखाली होणारी मूल्यांची घसरण हे थांबविण्यासाठी निकोप दृष्टिकोन तयार होण्याची आवश्यकता आहे.

सिधुताईंचं परिस्थितीशी टक्कर देवून उभं रहाणं आणि हजारो मुलांची आई होणं हे अफाट आहे. त्यांच्यासारखी आई व्हायला खूप मोठ काळीज आणि त्यागी वृत्ती लागते. आईसारखी आई होणं झेपणारं नाही. परंतु सगळ्यांची माईमी नक्कीच आहे हे त्या आवर्जून सांगतात.

सिधुताईंच्या जीवनावर चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटावर बोलताना त्या म्हणतात की आई बरोबर मीच चिमुरडी, तान्ही होते हे मला माहित होतं पण तान्हीला घेवून वाटचाल करताना कसे प्रसंग घडले ते या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद महादेवन यांनी दाखविल्याचं ममता सांगते.

सिधुताई सकपाळांचं जीवन म्हणजे अक्षरशः धगधगते अग्निकुंडच! हजारो मुलांची आई असलेल्या सिधुताई आणि माझ्या वाट्याला आई आली नाही म्हणून अजिबत खंत न बाळगणारी, उलट मला आईची आई बनायचंय!असं म्हणणारी ममता या दोघी मायलेकींना हॅटस् ऑफ द् बोथ!म्हटल्यावाचून रहावत नाही.

-सौ. सुमेधा देसाई, तळेबाजार

महिला विशेष *

जिद्द *

मायादत्त आंबर्डेकर

अपंगत्वावर मात करीत ज्योतिषविद्या, संगीत कला याद्वारे सामाजिक कार्यातही आपला सहभाग देणा-या वेंगुर्ले येथील मायदत्त आंबर्डेकर यांनीही प्रचंड जिद्द, साईबाबांवरची निस्सीम श्रद्धा यांच्या जोरावर समाजात स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या अचूक भविष्यकथनाचा कित्येकांनी अनुभव घेतला आहे.

मायाताईंचे वडील कै. भाऊ आंबर्डेकर हे निस्सीम साईभक्त.तिच परंपरा मायाताई आणि त्यांचे सर्व कुटुंब भक्ती भावाने चालवित आहेत. आपल्या हातून होणार प्रत्येक काम हे साईबाबांच्या कृपेने होत असल्याचे त्या मानतात. स्वरसाधनाया संस्थेतर्फे दर बुधवारी मायाताईंच्या घरी संगीताची मैफल जमते.

भाऊंनी स्वतःरचलेल्या बंदिशी, रागांची माहिती,शास्त्रीय संगीताचा ओनामा ठरेल अशी माहिती भाऊंनी हस्तलिखीत स्वरुपात लिहून ठेवली होती. हा संगीताचा खजिना पुढील पिढीला पुस्तक रुपाने मिळावा ही भाऊंची इच्छा मायताईंच्या प्रेरणेनेच पूर्ण झाली.

किरातच्या ८८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून किरातप्रकाशनातर्फे भाऊंनी लिहिलेले स्वरमायाहे पुस्तक ख्यातनाम संगीतकार अशोक पत्कींच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले. तिथली संगीत मैफल, पाहुण्यांना आमंत्रण देणे ही सर्व जबाबदारी मायाताईंनी फोनवरुन हँडल केली. यांच्या कामात त्यांचे बंधू बाळ दोन बहिणी आणि आईचही मोलाचं सहकार्य असत. किरातसाठी मायाताईंनी सुरु केलेल्या रेशीमगाठीया सदरामुळे कित्येक लग्नगाठी जुळून आल्या आहेत.

आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करुन जीवन आनंदी ठेवण्याचा मायाताईंचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

सौ. प्रज्ञा परब

राजकारणात असूनही समाजकारण जपणारी माणसं विरळच असतात. सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा असलेल्या प्रज्ञा परब यांचा राजकारणा -पेक्षा समाजकारणावर जास्त भर असतो.

१९८८ पासून त्या सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. फळ प्रक्रिया, कृषीमाल प्रक्रिया आणि पर्यटन यांच्या माध्यमातून विकास साधायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकारी संस्थेच्या माध्यमातून कँम्प-वेंगुर्ला येथे सुरु असलेला काथ्या कारखाना हे रोजगार निर्मितीचे प्रत्यक्ष उदाहरण म्हटले पाहिजे. कोकणातील नारळाची सोडणे ह्या टाकाऊ वस्तूपासून हा काथ्या बनत असल्याने प्रत्यक्ष ४० आणि बचत गटाच्या माध्यमातून सुमारे २०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या प्रमाणात अर्थसहाय्य करता यावा याकरिता त्यांनी क्रांती ज्योत सावित्रीबाई फुलेंच्या नावाने महिला सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे. वेतोरे येथे सूर्यकांता फळ प्रक्रिया उद्योग सहकारी तत्त्वावर सुरु करुन त्या भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. अलिकडेच एम.के.सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली असून कोकणातील प्रमुख फळपीक काजूची युनिट स्थापन करुन सहकारामध्ये यशस्वी झेप घेतली आहे. संस्थेने ४ कोटीचा विकास आराखडा तयार केला असून ८ लाखाचे ५०० टन क्षमतेचे गोडावून, ३० लाखाचे पॅकींग व ग्रेडींग युनिट बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत १२० महिलांचे क र्ज प्रस्ताव केले असून त्यांना उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये पती प्रदिप आणि कुटुंबियांचा पाठिबा तसेच उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेस नेते एम.के.गावडे यांचे मार्गदर्शन असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. जिद्दीने प्रत्येक पाऊल पुढे टाकणा-या प्रज्ञाताईंच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

सौ. शुभदा शेणई

पूर्वाश्रमीच्या रजनी नारायण प्रभु शिरोडकर. लग्नानंतर सौ. शुभदा अविनाश शेणई. पहिल्यापासून समाजसेवेची आवड. पूर्वी वेंगुर्ल्यामध्ये पवार बाई संचलित बालवाडी होती. नंतर ती बंद पडल्याने १९८६ साली सौ. शेणई यांनी स्वतः बालवाडी सुरु केली. या बालवाडीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत कित्येक मुलांना त्यांनी अल्प मोबदल्यात शिकविले. या बालवाडीत शिकलेली मुलं आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर, उद्योग, राजकीय, शासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. बालवाडीत शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमाची आवड निर्माण केली जाते. वर्षातून एकदा स्नेहसंमेलन घेऊन बालवाडीतील प्रत्येक मुलाला त्यामध्ये सहभागी केले जाते. लहानपणापासून मुलांना स्टेज डेअरींगमिळावं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो.

संचालकांनी मुलांना खेळण्यासाठी लाकडी खेळणीही उपलब्ध करुन दिली आहेत. मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचे वाढदिवस तसेच रंगपंचमी, गोकुळाष्टमी असे सणही साजरे केले जातात. मुलांना उपयुक्त असे उपक्रम राबविले जातात. आता तर या बालवाडीमध्ये मराठी बरोबरच इंग्रजीचेही ज्ञान दिले जाते.

सौ. शेणई यांनी शिक्षण क्षेत्रा बरोबरच ११ वर्षे वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगरसेविका म्हणून काम केले आहे. सरकारचे कोणतेही अनुदान न घेता अल्प मोबदल्यात २५ वर्षे छोट्या मुलांना अविरत ज्ञान देण्याचे कार्य त्या करत आहेत. त्यांच्याकडून असेच चांगले कार्य घडो ही सदिच्छा!

शब्दांकन - अॅड. शशांक मराठे, प्रथमेश गुरव

सुंदरा मनामध्ये भरली!

सुंदरा मनामध्ये भरलीही शाहिर पठ्ठे बापूरावांची लावणी ऐकली की अभिजात भारतीय सौंदर्याच्या श्रेष्ठतेबद्दल खूणगाठ पटल्याशिवाय रहात नाही. अनादी काळापासून भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशातले अस्सल स्त्री सौंदर्य हे जगद्विख्यात आहे. आपल्या इतिहासातही आपल्याला स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांच्या आख्यायिका ऐकायला, वाचायला मिळतात. सीता, दौपदी, शकुंतला, देवयानी यांसारख्या रुपवान स्त्रियांमुळे रामायण, महाभारतासारखी खंडकाव्य रचली गेली आणि हाच इतिहास संस्कृती म्हणून आज आपण जगभरात अभिमानाने मिरवत आहोत. अशा रुपवान, बुद्धीवान आणि कर्तव्यपरायण स्त्रियांची परंपरा भारतात आजही जरासुद्धा खंडीत झालेली नाही. उलटपक्षी आज भारतीय स्त्रिया सौंदर्य, कला, उद्योग, क्रिडा अशा प्रत्येक आघाडीवर जगातील इतर देशांतल्या स्त्रियांपेक्षा कणभर सरसच ठरत आहेत याबद्दल आपण अभिमान बाळगायला हवा.

भारतात जेव्हा इंग्रजांची राजवट, आधुनिकता, सिव्हिलायझेशन अशा शब्दांशी कोणी परिचितही नव्हतं तेव्हा भारतीय सौंदर्याच्या व्याखेत केवळ शारिरीक आकर्षकपणा कुठेच बसत नव्हता. स्त्रिचं आरोग्य, तिचा खानदानीपणा, वर्तणूक, वाणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिची बुद्धी आणि लज्जा हे सौंदर्याचे प्रमुख निकष समजले जायचे. सलज्ज सात्विक स्त्री ही उत्तम सौंदर्यवती मानली जायची. समाजातल्या प्रतिष्ठीत, अब्रुदार वर्गाव्यतिरीक्त चारीत्र्य, शील या परिमाणात कमी समजल्या जाणा-या वर्गामध्ये सुद्धा हे अस्सल सौंदर्य त्यावेळी पहायला मिळे. मोठमोठ्या राजांच्या, जमिनदारांच्या नायकीणी, कोठ्यावरच्या नाचणारणी, कोकणातल्या देवाच्या भावीणी, तमाशातल्या कलावंतीणी, यलम्मा देवीच्या जोगतीणी अशा चारित्र्यहिन समजल्या जाणा-या स्त्रिया सुद्धा अशा सलज्ज अभिजात आणि पडदानशिन सौंदर्याच्या मालकीणी असत. त्यांच्याकडे साहित्य, प्रतिभा, कला आणि मधुरवाणीचा न संपणारा खजिना असे. त्यांच्या नृत्य, गायन, काव्य, संगीतवादन, अभिनय, निवेदन अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वांवर व दर्जेदार कलेवरच त्यावेळचे कला, बुद्धी आणि मनाच्या सौंदर्याचे उपासक असणारे राजेरजवाडे त्यांच्याकडे ओढले जात असत. महाराष्ट्रापुरते म्हणायचे झाले तर तमाशा किवा लावणी ही आपली जुनी लोककला. सौंदर्य, बुद्धी आणि कला यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आपली लावणी. त्यावेळच्या लावणी कलावंत या अतिशय प्रतिभावान असत. समाजासाठी तमाशा हा विरंगुळ्याचे साधन असला तरी जातीवंत लावणी कलावंतीणी कधीही कोणाला स्वतःशी शारीरीक सलगी करण्याची परवानगी देत नसत. शरीरविक्रय करुन पोट भरणे हा तमाशाचा हेतू कधीही नव्हता. केवळ अशा कलावंतीणींच्या नृत्य, गायन आणि अदा या प्रतिभेला आणि सौंदर्याला लोक भुलत असत. त्यासाठी तिला शरीराचा इंचभर भाग सुद्धा उघडा करुन दाखवण्याची वा शरीरविक्रयासारख्या निर्लज्ज प्रकाराची गरज पडली नाही.

आजच्या काळातले डान्सबार, सवंग अभिरुचीहिन नृत्ये, चित्रपटांतील घसरलेले चारित्र्याचे चित्रण, शरीर विक्रयाची उघडी निर्लज्ज दुकाने मात्र काही वेगळेच सांगत आहेत. अभिजात कलेचा लवलेशही नसलेले असंख्य प्रकार आज कलेच्या नावावर खपवले जातात. कलेचे पुनरुज्जीवन अशा गोंडस नावाखाली लावणीसारख्या प्रकारातला सवंगपणा वाढत चालला आहे. जातिवंत नायकीणींची जागा प्रतिभाहीन निर्लज्ज डान्सबार कलाकारांनी घेतली आहे. सौंदर्याचे उपासक स्त्रिच्या उघड्या शरीराचे प्रदर्शन मांडणा-या सौंदर्य स्पर्धा घेऊ लागले. स्त्री शरीर, तिची कमनियता, तिच्या त्वचेचा पोत, रंग, तिचे चालणे, बोलणे यावर तिचे सौंदर्य ठरवले जाऊ लागले. लज्जा संपली. अभिजातपणा लोप पावला. प्रतिभेला तिलांजली मिळाली. समाजाच्या सर्व थरांत दिसणारे भारतीय स्त्री सौंदर्य निराळ्याच अभिरुचीहिन स्वरुपात जगासमोर यायला लागले. जिथे तिथे स्त्रिचे उघडे शरीरहीच माध्यमांची प्रमुख मागणी ठरली. असे का घडले? अभिजात भारतीय कला आणि सौंदर्याचा एकमेवाद्वितीय संगम कुठे लोप पावला? भारतीय समाजाची दर्जेदार दृष्टी कशी अंध झाली? याचा गंभीरपणे विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकतेचे वारे वाहू लागले. त्याही आधी इंग्रजांच्या राजवटीत भारतीय समाजातील थोडेबहुत शिकलेले लोक, त्यांच्या दरबारी नोकरीला असलेला वर्ग हा आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा विसरुन पाश्चात्य देशांच्या राहणीमानाने, शिष्टाचाराने प्रभावित होऊ लागले. त्यांच्या सानिध्यात, वर्चस्वाखाली राहून त्यांच्या स्वतंत्र, स्वैर विचारांचे पुरस्कर्ते होऊ लागले आणि तिथेच आपल्या समाजाची परंपरागत चालत आलेली अभिरुची बदलली. इंग्रजांच्या आधीही आपल्याकडे शिक्षण होते. परंतु या शिक्षणाने कधीही आपल्याला स्वैर बनवले नव्हते. आता फरक तोच पडला. त्यांच्या आधुनिक विचारसरणीने प्रभावित होऊन आपल्या तरुण पिढीचा स्वैर स्वातंत्र्याकडे ओढा वाढला. आधुनिकतेमधल्या प्रगतीचा अंगिकार करण्यात गैर काहीच नाही. परंतु चांगलं असो वा वाईट असो केवळ आधुनिक म्हणून स्विकारणं आणि तेही स्वतःच्या दर्जेदार संस्कृतीला चूड लावून परकीयांचे अंधानुकरण करणं हे तर दरिद्रीपणाचे डोहाळे आहेत. नेमका हाच फरक समजण्याची कुवत वा तयारी आपल्या तरुण पिढीची नाहीशी झाली आणि आपण आपले स्वतःचे असे जातिवंत सौंदर्य गमावून बसलो. मूर्खपणाचा कळस म्हणजे आधुनिक म्हणवणा-या भारतीय स्त्रिया स्वतःच स्वतःच्या लज्जेची लक्तरं वेशीवर टांगू लागल्या. साडी किवा सलवारकमीज अशा पोशाखांऐवजी ज्यात अंगोपांग उठून दिसते असे स्लॅक्स, वनपीस, टॉप्स घालण्यात आपल्या मुली धन्यता मानू लागल्या. जेवढ्या मुली जास्त आधुनिक होत गेल्या तेवढे लैंगिक गुन्हे वाढू लागले. आपल्या मर्यादा विसरुन स्त्रिया पुरुषांशी बरोबरी करण्याच्या नादात मद्यपान, धुम्रपान, शारिरीक सलगी इ. गोष्टींची सुद्धा मानसिक तयारी दाखवू लागल्या. स्त्री आता अबला राहिली नाही यात काही वादच नाही आणि स्त्रिला कमी दर्जा देणा-या समाजाची दृष्टी बदलण्यातही आजची भारतीय स्त्री यशस्वी झालेली आहे हा आधुनिकतेचा एक चांगलाच भाग आहे. आजच्या स्त्रिला नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडावेच लागते. तिच्या स्वतःच्या आणि एकूणच स्त्रिच्या प्रगतीसाठी हे आवश्यक आहे हेही मान्य. परंतु केवळ स्त्री ही पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून देण्यासाठी वाईट घातक सवयी सुद्धा आत्मसात करणे म्हणजे मात्र प्रगतीचा विपर्यास आणि आधुनिकतेच्या हट्टापायी केलेला अविचार ठरतो असे मला वाटते. स्त्री आज जरी आधुनिक झालेली असली तरी तिचा शरीरधर्म बदललेला नाही. तसेच स्त्री सोबत सर्व समाजच आधुनिक होत चालल्याने स्त्रीकडे लैंगीक स्वैराचाराच्याच दृष्टीने पहाण्याची समाजाची सुद्धा मानसिकता वाढली. पाश्चात्य देशांमध्ये लैंगीक स्वैराचार खूप आधीपासूनच समाजमान्य आहे. केवळ याच कारणास्तव आज अनेक पाश्चात्य देशांतल्या तरुण पिढ्या सर्वनाशाच्या दरीत फेकल्या गेल्या आहेत आणि त्या देशांचे भवितव्य अक्षरशः संपुष्टात आलेले आहे. आपले तसे नाही. आपल्याला तारणारी आणि पुन्हा उभं करणारी आपली महान संस्कृती आहे. आज भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठपणाची ओळख अनेक परकीयांना पटून आपल्या संस्कृतीचे कित्येक पाश्चात्य लोक अनुकरण करत आहेत. भारतीय मनुष्याला प्रगतीच्या शिखरावर यथोचित बसवणारी ही आधुनिक प्रगती नाही तर भारतीय संस्कृतीच आहे हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. जितका आधुनिकतेमधल्या उत्तानपणाचा पुरस्कार आपण करु तितकी आपल्याकडे पहाण्याची समाजाची दृष्टी खालावत जाणार आणि त्याचा त्रास गुन्हे, शोषण या स्वरुपात स्त्रीलाच सर्वाधिक होणार आणि त्याची कडू फळेही स्त्रिलाच भोगायला लागणार हा निसर्गनियम आहे. अन्यायी वाटला तरी तो स्त्री शरीराचा नैसर्गिक धर्म आहे आणि कोणी कितीही आधुनिक झाले तरी हा धर्म बदलण्याची ताकद कोणामध्ये कधी निर्माण होणे शक्य नाही आणि हा निसर्गनियम बदलूही नये. कारण याच नियमाची भारतीय संस्कृती मुल्यातील सुवर्णसंधी म्हणजे स्त्रिला सौभाग्य आणि आदर बहाल करणारे विवाह बंधन व मातृत्व होय.

आधुनिकतेच्या पाश्चात्य उत्तानपणाला बळी पडलो नाही तरच आपण खरी भारतीय स्त्री ठरणार आहोत आणि निसर्गाने स्त्रिला बहाल केलेली सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजेच मातृत्वाचा आस्वाद आपण मुक्तपणे चाखू शकणार आहोत. लैंगिक स्वैराचार, विवाहबाह्य संबंध, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, कुमारी मातृत्व अशा लैंगिक संबंधांमध्ये हल्लीच्या तरुणींना काहीच गैर वाटत नाही. परंतु अशा मानसिकतेमध्येच विनाशाचे पहिले पाऊल पडलेले आहे हे या तरुणींनी लक्षात घ्यायला हवे. अशा प्रत्येक संबंधात शारिरीक आणि मानसिक ताप केवळ स्त्रिलाच भोगावा लागतो. स्त्री-पुरुष समानतेच्या आपण कितीही पुरस्कर्त्या असलो तरी निसर्गानेच जर स्त्री आणि पुरुषाच्या शरीर रचनेत काही फरक केलेला आहे, तर आपण तोही नाकारुन आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःच्याच पायावर दगड मारुन घेण्यात काय अर्थ आहे? आपल्या संस्कृतीने विवाह बंधनाच्या रुपात सहजीवनाचा, मातृत्वाचा आणि वृद्धापकाळातील एकटेपणावर रामबाण उपाय म्हणून एक अतिशय समंजस मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. आपल्यासाठी योग्य ठरणारा जोडीदार निवडणं हे कधीही आपल्या हातात असतं आणि ते कसब साधलं तर आयुष्य खरोखर नंदनवन होऊन जातं. हे कसब समजा साधलं नाही आणि जोडिदाराचा निर्णय चुकला तर आयुष्यभर फरफट होऊ नये म्हणून विवाह बंधनच निरुपयोगी ठरवणे हे मात्र आयुष्यभराच्या नैराश्याला, एकटेपणाला आणि मानसिक कुचंबणेला आमंत्रण देण्यासारखं आहे.

सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ स्त्रीच्या अंगप्रत्यांगाचे प्रदर्शन हा समज डोक्यातून काढून टाकून आपल्या संस्कृतीला अनुसरुन बुद्धी, आरोग्य, चारीत्र्य, व्यवहार कुशलता, कर्तव्य अशा निकषांवर जर भारतीय स्त्रीचे परीक्षण केले गेले तर पूर्णवस्त्रांकीत सलज्ज अभिजात सौंदर्य लाभलेली भारतीय स्त्री ही जगात सर्वोत्तम ठरेल यात शंका नाही आणि हे सौंदर्य चिरकाल टिकणारे आणि सदाबहार तेजस्वी सुद्धा असेल. असे न झाल्यास मात्र स्त्री सशक्तीकरणाच्या वल्गना केवळ वल्गनाच रहातील. प्रत्यक्षात मात्र स्त्रियांवरचे अत्याचार वाढतच जातील.

- डॉ.सौ. नम्रता रा. बोरकर

कोण आहे समाजाची नियंत्रक शक्ती?

मुलगी शिकली प्रगती झालीअसं वाक्य रिक्षाच्या मागे वाचलं व आपल्या भारतीयांच्या प्रगतीच्या संकल्पनेचा आवाका आला आणि मग खेडेगावातल्या रुग्णालयात काम करतांना जे प्रसंग अनुभवले ते सहज नजरेसमोर तरळले.

एक ३२ वर्षीय स्त्री गरोदरपणातील गुंतागुंतीमुळे दापोली म्हणजे आमच्या रुग्णालयापासून १०० कि. मी. दूर इथून अत्यवस्थ अवस्थेत रात्री ११ वाजता दाखल झाली. तिला सतत फिटस् येत होत्या. ती पूर्ण बेशुद्ध होती. आम्ही तिला त्वरित सिटी स्कॅन करुन उपचाराकरिता कृत्रिम श्वास चालू केला. अतिरक्तदाब वाढून तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.

तिला आणखी दोन लहान मुलं होती. तिची आई व ती लहान मुलं अतिदक्षता विभागाच्या बाहेर आपली आई बरी होईल, बाहेर येईल म्हणून आसं लाऊन बसली होती. नव्याने जन्मलेल्या बाळाला आम्ही अतिदक्षता विभागात घेऊन तिला बरं करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. तिचा नवरा गळ्यात जाड सोन्याची चेन, जाडजूड व्यक्तिमत्व असा अधून मधून तिची चौकशी करायला यायचा.

आमच्या प्रयत्नांना यश आलं. ती शुद्धीत आली. सर्वांना ओळखू लागली. फिजिओथेरपी सुरु झाली व घरी जाण्याची वेळ जवळ आली. तिच्या मुलांकडे पाहून रुग्णालयाने सर्व खर्च केला व डिसचार्ज देताना नव-याला बिलाचा आकडा सांगितला.

बिल बघितल्यावर नव-याने क्षणाचाही विलंब न करता उद्गार काढले की, ‘एवढे बिल भरण्यापेक्षा मी घरी जाऊन दुसरे लग्न करतो, तुम्ही तिला इथेच ठेवा.हे वाक्य ऐकल्यावर आम्ही अवाक झालो व आमच्याच अॅम्बुलन्सने तिला दापोलीला नव-याकडे सोडले. तिच्याकडे व मुलांकडे बघून तिचे सर्व बिल माफ केले. पण प्रश्न फक्त बिल माफ करण्याचा नव्हता तर आपल्या समाजात स्त्रीचे स्थान काय आहे? ह्याची जाणीव करुन देण्याचा होता!

एकदा अशीच २२ वर्षीय युवती रात्री तिच्या आईच्या छातीत दुखते म्हणून तिला रुग्णालयात घेऊन आली होती. आईला हार्ट अॅटॅक आहे व अॅडमिट करावे लागले असे सांगितले. आई तशी अॅडमिशनला नाखुषच होती. कारण, मुलीचे वडिल ६ महिन्यांपूवीच वारले होते. घरात २ भावंडे व घरचा सर्व भार या मुलीवर. ती एका बँकेत नुकतीच नोकरीला लागलेली होती व घर चालवत होती.

आईच्या डिसचार्जचा दिवस जवळ आला मी माझ्या केबीनमध्ये पेशंट तपासत होते. तेवढ्यात आमच्या नवजात अर्भक विभागात अॅडमिट असलेल्या तिळ्या मुलींचे वडील आत आले व ही मुलगीही बरोबर आली. या माणसाला आधीच्या ३ मुली होत्या व मुलगा हवा या हव्यासापोटी हा एक शेवटचा चान्स घेतला होता व ३ कमी वजनाच्या मुली देवाने पदरात टाकल्या तेव्हा आता हे बिल मी कसे भरु असे त्याचे म्हणणे होते! मी त्या मुलीला म्हटलं, ‘अगं, तू या माणसाबरोबर आत का आलीस?‘ तर ती म्हणाली की, हे माझे होणारे दीर आहेत व जेव्हा माझ्या आईला कळलं की, मी ज्या घरात लग्न होऊन जाणार तिथे तिळ्या मुली झाल्या तेव्हा तिला हार्ट अॅटॅक आला. दोन कुटुंबांची आगीतून उठून फुफाट्यात अशी परिस्थिती साधारणपणे उद्भवते याची जाणीव झाली.

सकाळी ११ वाजता पेशंट बरोबर पेशटंचे बिल तपासण्याचे काम चालू होते. काम खरं तर कंटाळवाणं, पण इतके सामाजिक प्रश्न ऐकण्याची व सोडविण्याची संधी मिळाली की, खरं तर डॉक्टर असण्याचं महत्त्व कळलं. नुसत्या शरिरावर उपचार न करता त्या रुग्णाच्या अख्या कुटुंबाला जाणून घेण्याची,त्यांच्या जीवनात डोकावून तिथल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव करुन घेण्याची जणू काही सवयच लागली आणि त्याचा फायदा असा झाला की,लोक जास्त जवळ आले. आपलेसे वाटू लागले व एक आपुलकीचं वेगळच नातं निर्माण झालं.

दुपारचे ११ वाजतच होते. इतक्यात एक ६० वर्षाची वृद्ध आजी केबीनमध्ये आली. चेह-यावर भिती, शरीर कंप पावत होते. मी विचारपूस सुरु केली. काय झालं? तशी आजी म्हणाली, माझे ४ पेशंट अॅडमिट आहेत. सर्वांच मिळून जे बिल झालं आहे ते मी भरु शकत नाही. मी रागातच सुरुवात केली. अहो, सर्व पेशंट फार गंभीर अवस्थेत होते. सर्वांची शस्त्रक्रिया करावी लागली. सर्वांना अतिदक्षता विभागात ठेऊन मोडलेली हाडं जोडावी लागली. आर्थिक प्रश्न बाजूला ठेऊन आम्ही त्यांना बरं केल आहे आणि आता तुम्हाला खर्चाचा अंदाज दिला आहे. असं कुठेच होत नाही.

ती स्त्री म्हणाली, त्याबद्दल मी रुग्णालयाची आभारी आहे. ही चार मुलं माझीच नातवंड आहेत. मी लातूरला रहाते. पण माझं माहेर कोकणात. सुट्टीसाठी मी त्यांना माझ्या माहेरी घेऊन आले पण माझच दुर्दैव. आमच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने त्यांचे इथे उपचार झाले. मी घाबरत घाबरतच लातूरला फोन केला. मुलं बरी आहेत. आम्हाला न्यायला या. तिकडून उत्तर आलं. तू तुझ्या माहेरी त्यांना नेलस तेव्हा त्यांना बरं करुन बिल भरण्याची जबाबदारी तुझीच आहे. आम्ही येऊ शकत नाही. मी माझ्या सासरी कधीच कोणालाही दुजाभाव केला नाही. सासरकडच्यांना आई, वडिल, भावा-बहिणींप्रमाणेच वागवले. पण हे उत्तर मिळाल्यावर पायाखालची वाळूच सरकली. अहो, ४० वर्षे संसार करुन नव-याच्या घरची होऊनही सासर माहेर एकरुप होऊ शकत नाही. एवढा परकेपणा स्वतःच्या घरात!

मला एकंदर परिस्थितीची कल्पना आली. त्या आजीला म्हटलं तुला जेवढे पैसे भरणे शक्य आहे तेवढे भर व मुलांना घरी घेऊन जा. विषय संपला. पण मुलगी सासरी गेली तरी शेवटपर्यंत परकीच ही बोचणी मनाला सतत लागूनच राहिली.

वालावलकर रुग्णालय स्त्रियांना समाजाचा केंद्रबिदू मानून त्यांच्याकरता अनेक कार्यक्रम राबविते. पण हे सामाजिक प्रश्न कसे सोडवायचे? एक डॉक्टर म्हणून शरीरावर फक्त उपचार करायचे पण मनाचं, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं काय? म्हणून किशोर वयात मुलींना पोषक आहार वाटप, गरोदर स्त्रियांना लाडू, औषधं वाटप करणे, त्यांचे डोहाळजेवण, मंगळागौरी करुन समाजात त्यांना असलेल्या महत्त्वपूर्ण स्थानाची जाणीव करुन देणे असे उपक्रम आम्ही सुरु केले.

तरीही म्हणतात ना, स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे. त्याप्रमाणे खेडेगांवातील गरोदर स्त्रीला चांगल्या सुविधांपासून वंचित ठेवणं हे काम स्त्रिया चांगलं करु शकतात. मुलगी झाली तर हिणवण या गोष्टी करायला इतर स्त्रिया विसरत नाहीत. सासू म्हणते, आमची दहा, दहा बाळंतपण घरी झाली हिलाच मोठ्या हॉस्पिटलचे डोहाळे लागले आहेत. औषधे घेऊन पिड पोसतात आणि मग ऑपरेशन लागेल असे सांगतात. आमच्यावेळी तसं नव्हतं. हीच सासू, जी आपल्या मुंबईला असणा-या मुलाशी भ्रमणध्वनीवरुन संफ ठेवते. गाऊन घालून आपल्या मुलीला शेतात काम करायची परवानगी देते पण बाळंतपण मात्र घरी. तेव्हा ते नविन तंत्रज्ञान वाईट, चुकीचे, मग जन्मलेल्या मुलाला काहीही त्रास झाला की, पोटावर डाग द्यायला मांत्रिकाकडे न्यायलासुद्धा मागे पुढे पहात नाहीत. म्हणूनच वालावलकर रुग्णालयाची टीमआजूबाजूच्या ६० आंगणवाड्यात जाऊन तेथे गरोदर स्त्रियांची नांव नोंदणी करते. त्यांची आठवड्याला तपासणी करुन योग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्याची व्यवस्था करते. पहिली प्रसुती मोफत व सिझेरियन अल्पदरांत अशी सुविधा देऊन प्रसुतीनंतर बाळंतविडा घेऊनच आई व बाळाची पाठवणी केली जाते. सासू, सुनांचे एकत्र मेळावे घेऊन रुग्णालयातील प्रसुतीचे महत्त्व पटवून दिले जाते.

लग्न ठरतांना १० माणसं एकत्र येतात, चर्चा होते, मुहूर्त ठरतो, खरेदीची दुकानेही ठरतात, बजेट ठरतं.. पण प्रसुती मात्र कोठेही. उंबरठ्यावर, रिक्षात, रस्त्यावर, अॅम्ब्युलन्समध्ये. असे का? बाळ जगात येणार तो पहिला श्वास असा कुठेही का म्हणून घेणार? म्हणून माहेरयोजनेंतर्गत रुग्णालयातच शेवटचा आठवडा येऊन रहा असे ह्या स्त्रियांना सांगितले जाते.

पण एवढे करुनही मुलगी झाली तर! भिती आहे. अहो या वेळी मुलगी झाली तर मला घरातच घेणार नाहीत. मला वाटलं. सुरेखा हे वाक्य गंमतीनेच म्हणते आहे. सुरेखाचे ९ महिने भरले होते. तिला आधीची ३ वर्षांची मुलगी होती आणि कळा सुरु झाल्या, प्रसूती विनासायास झाली. बाळ फार गोड होतं. वजनही उत्तम! पण मुलगी! ५ दिवस झाले तिच्या घरचे कोणीही फिरकले नव्हते. सुरेखाचा अंदाज खरा ठरला होता. माझ्या सासूबाईंना ४ मुलगे. त्यामुळे घरातून निघतानाच त्यांनी मला धमकी दिली होती. नवरा एका केमिकल कंपनीत नोकरीला. मग आम्हीच अॅम्ब्युलन्स केली व सुरेखाला व तिच्या मुलीला घरी नेऊन सोडले. त्यानंतर काय झाले कळले नाही.

एक दिवस अपघात विभागात एक ६ महिन्यांची मुलगी कॉटवरुन पडून मेंदूला मार लागल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आली होती. तिची आई फार घाबरलेल्या अवस्थेत होती. मुलीला ब्रेन हॅमरेज झाले होते. मी धावतच तिकडे गेले. आईचा चेहरा ओळखीचा वाटला. मी सुरेखा! तुम्ही मला अॅम्ब्युलन्स करुन घरी सोडलत. संपूर्ण केस माझ्या पूर्णपणे लक्षात आली. अगं पण तू मुलीकडे लक्ष दिलं नाहीस अशी कशी पडली ती? माझा प्रश्न ऐकताच ती रडायला लागली. अहो, घरची सगळी काम मीच करायची, मी करतेच, पण त्या वेळेत माझ्या मुलींना कोणीही सांभाळत नाहीत. तिच्या वडिलांनी तर तिच्याकडे जन्मल्यापासून ढुंकूनही पाहिलेले नाही. ते पेपर वाचत बाहेर बसले होते. मुलगी खेळतां खेळतां पडली. पण तरीही ह्या माणसाने साधे लक्षसुद्धा दिले नाही. तसाच पेपर वाचत राहिला. शेवटी मीच तिला ह्या अवस्थेत उचलून लगेच इकडे आणले.

मनात विचार आला राक्षस ह्याहून काही वेगळा असतो का? बी.एस.सी.होऊन केमिकल कंपनीत नोकरी करणारा हा बागुलबुवा माणूस, माणूस तरी म्हणायच्या लायकीचा आहे का? एवढ्या शिक्षणानंतर हे तरी नक्कीच कळलं असेल की, स्त्रियांमध्ये न्न् गुणसूत्र असते व पुरुषांमध्ये न्न्र् गुणसूत्र असतात. तेव्हा मुलगा होणं हे सर्वस्वी पुरुषांवरच अवलंबून आहे. आपण मर्सिडजचं कव्हर असलेल्या गाडीत बसल्याचा दिखावा करतो. पण प्रत्यक्षात अजूनही आपण बैलगाडीतच आहोत. घरोघरी अन्न, वस्त्र, निवारा, दूरदर्शन व भ्रमणध्वनी ह्या प्राथमिक गरजा भागविल्या गेल्या. जमेल तसं पुस्तकी शिक्षण मिळू लागलं. पण त्याचा जीवनात फायदा किती? शून्य.

दुपारची वेळ होती, पेशंटची गर्दी संपत आली होती आणि एक चाळीशीची बाई माझ्या कक्षात येऊन बसली. हातात ४-५ सोनचाफ्याची फुलं! मला ओळखलत? मी शुभांगी.

मी नेहमीप्रमाणे काय त्रास होत आहे? असे विचारले तेव्हा ती मला म्हणाली, अहो त्रास नाही. तुम्ही मला ओळखलं नाहीत. मी तुमच्याकडे बेशुद्धावस्थेत ६ महिन्यांपूर्वी अॅडमिट होते. श्वास पूर्ण थांबला होता. शुद्ध हरपली होती. जिवंत असण्याचे एकच लक्षण म्हणजे नाडीचे ठोके लागत होते. मला एकदम केस आठवली. आम्ही तिचे निदान सर्पदंश असे केले होते. तिला आठ दिवस कृत्रिमरित्या श्वास द्यावा लागला होता. शिवाय सर्पदंशमारक इंजेक्शन्स द्यावी लागली होती. पण ८ दिवसांनी ती पूर्णपणे शुद्धीत आली होती. आज ती तब्बल ६ महिन्यांनी मला भेटली. तिच्या डोळ्यात भाव दाटून आले होते. अहो, ह्या हॉस्पिटलमुळे माझ्या मुलांना आई मिळाली म्हणून आभार मानायला आले.

खरच! स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! जर ही स्त्री नसती तर ३ मुलं वा-यावरच आली असती. कदाचित नव-याने दुसरे लग्न केले असते. नव-याला बायको मिळाली असती. पण मुलांना आई नाही आणि म्हणूनच वाटतं समाज प्रगतीपथावर जायचा असेल, पुढची पिढी मनाने व शरिराने सक्षम व्हायची असेल तर प्रत्येक घरात एक आई ही हवीच! जिला सध्या गृहिणी (हाऊसवाईफ) अस म्हणतो. पुढच्या कित्येक पिढ्यांची दिशा तीच ठरवित असते.

ह्या अशा स्त्रियांना पुढे आणण्यासाठी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही सतत वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्यांना आपली संस्कृती कळावी यासाठी विशेष प्रयत्न असतात. पण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तो खेड्यांचा देश आहे. भारतातील ७० टक्के जनता ही खेडोपाडी रहाते असे आपण वाचतो. पण प्रत्यक्षात मिडियामध्ये दाखविलेल्या किवा चर्चा होणा-या गोष्टी ह्या शहरी झकपक आयुष्यातील असतात. खेड्यातील गरिबांपर्यंत हे काहीही पोचलेले नसते. आपण रॅम्पवरुन कॅटवॉक करणा-या स्त्रिया, खेळाडू स्त्रिया, सिनेमातील नट-नट्या यांची प्रगती पाहून स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख आखतो. शहरी स्त्रियांची परिस्थितीसुद्धा ह्याहून काही वेगळी नाही. जीन्स व टी शर्ट घातले,मेक अप केला म्हणून कांही विचारसरणी बदलत नाही.

आम्ही स्त्रियांचे सबलीकरण व्हावे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात म्हणून बचत गट तयार केले. त्यात शहरातील उच्चभ्रू स्त्रियाही पुढे आल्या. मला फार आनंद झाला. म्हटलं, एक दिवस ह्यांच्या बचत गटाला भेट द्यावी. गटातील सर्व स्त्रिया मोठमोठ्या बायका. गडगंज श्रीमंत. पण गरजेपुरतं शिक्षण घेतलेल्या व गृहिणी होत्या. प्रत्येकजण आपआपल्या परीने खाण्याचे पदार्थ, शोभेच्या वस्तू करुन विकत होत्या. मी म्हटलं, अगं तुम्हाला काय गरज आहे, असं करुन पैसे कमावण्याची. उत्तर ऐकून मी अवाक झाले. अहो, माझा मुलगा आता कॉलेजला जातो. पण माझं काही ऐकत नाही. तो फक्त पप्पांचचं ऐकतो. कारण, ते त्याला पॉकेट मनीदेतात. मी कांही कमवत नाही म्हणून मला तो विचारत नाही.

आता मी पण त्याला पॉकेट मनी देऊ शकते. त्यामुळे मलाही घरात थोडं वजन आलं आहे. म्हणजे सर्व कांही मनी ओरिएन्टेडच‘. अगदी नाती सुद्धा! आई म्हणजे जन्मदात्री, मुलांवर संस्कार करणारी, कुंभार मडकी घडवतो तशी मुलांना घडविणारी, गोष्टी सांगणारी, घरातील निर्णय ठामपणे घेणारी, घराची स्वामिनी, आईच्या आदेशाशिवाय घरची काडी सुद्धा इकडून तिकडे होणार नाही. पण ह्याच आयांना एका कार्यशाळेत आम्ही प्रश्न विचारला. अभिमन्यू कोण होता? तर एका मुस्लिम स्त्रीने उत्तर दिले. बाकी सर्व स्त्रिया चिडीचूप! पण अमिताभची सून कोण? तर ऐश्वर्या हे उत्तर क्षणाचाही विलंब न लावता मिळाले. मग हा महाराष्ट्र घडविणारी ती माता-पुत्राची जोडी, जिजाई-शिवराय हे आता केवळ इतिहासा पुरतेच उरले आहेत. आता अशी माता होणे नाही. तद्वतच असा पुत्रही होणे नाही असे वाटते. कारण,शहरी स्त्रियांचे प्रश्न जे आहेत ते अर्धवट ज्ञान, बदलती जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचे अन्धानुकरण यामुळे वेगळे आहेत व खेड्यातील स्त्री ही अजूनही धड आपली संस्कृती जोपासू शकत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण टाळूही शकत नाही आणि यामुळेच ही विषमतेची दरी वाढतेच आहे.

ह्या स्त्रियांना व ह्या समाजाला जो हिमनग पाण्याखाली आहे. त्याला हिमनगाच्या टोकावर असणा-यांनी वर काढायचे आहे. बाकी हिमनगाचा जो भाग टोकावर आहे अशांनी आपणच सगळ्यांच प्रतिनिधीत्व करतो आहोत असे दर्शवायचे आहे! पण म्हणून वस्तुस्थितीला झाकून आपण उगीचच मर्सिडीजमध्ये आहोत असा आव आणण्यापेक्षा आपण बैलगाडीत आहोत हे जाणून त्याचा टेम्पो कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

स्त्रीला समाजात मानाचे व आदराचे स्थान असावे, तिने स्वतःच्या घरात गृहसम्राज्ञी म्हणून नांदावे. ती समाजाची नियंत्रक शक्ती व्हावी, तिने मर्यादेने व शालीनतेने वागून सुपूत्र निर्माण करावेत व राष्ट्राला सुबुद्ध आणि जबाबदार नागरिक मिळवून द्यावेत आणि ह्या स्त्रियांनी जर मनावर घेतले तर पुन्हा हिदुस्थानला सुवर्ण युगाप्रत नेणारी शिवरायांसारखी नररत्ने त्या निश्चित निर्माण करतील ही देवाचीच इच्छा आपणा सर्वांच्या हातून पूर्ण होवो हीच प्रार्थना!!

- डॉ. सौ. सुवर्णा पाटील, वैद्यकीय संचालिका,

वालावलकर रुग्णालय, श्रीक्षेत्र डेरवण.

No comments:

Post a Comment