Thursday 17 March, 2011

अंक १०वा, १७ मार्च २०११

संपादकीय *
ग्लोबल कोकण
सुमारे पंचवीस वर्षापूर्वी ‘कोकण विकास‘ या विषयावर पुणे येथे एक परिषद झाली होती. माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया या परिषदेचे प्रमुख आयोजक होते. या परिषदेत कोकण विकासावर सांगोपांग चर्चा झाली. रेडीतील खाण मालक व बेळगावचे उद्योजक रावसाहेब गोगटे यांनी कोकणाचे नंदनवन करण्याची कल्पना मांडली. इतरही अनेक राजकीय नेते मंडळींनी आपापल्या कल्पना मांडल्या होत्या. कोकणातील रस्ते, बंदरे, पर्यटन, फलोद्यान अशा अनेक विषयांवर चर्चा झाली होती आणि त्याच विषयांच्या अनुषंगाने आजही चर्चाच होते आहे. तशीच ती २४ ते २७ फेब्रुवारीला मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये झालेल्या कोकणभूमी प्रतिष्ठानच्या ग्लोबल कोकण महोत्सवातही झाली.
‘कोकण विकास आणि पुणे परिषद‘ या शीर्षकाखाली पंचवीस वर्षापूर्वी ‘किरात‘मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात पुणे येथील त्या परिषदेचा परामर्श घेताना कोकण विकासाकरिता नेमके काय केले पाहिजे त्याविषयीही लिहिले होते. परंतू तेव्हाही अस्तित्वात असलेला दोन राजकीय पक्षांमधला किवा एकाच पक्षातील दोन गटांमधला परस्पर संघर्ष आजही चालू राहिलेला आहे. त्यामुळे कोकण विकासाच्या सर्वच योजनांना खीळ पडत आहे. विकासाची म्हणून जी काही कामे होतात ती नियमित प्रशासकीय कामांचाच एक भाग म्हणून होत आहेत. भ्रष्ट कारभारामुळे ती कामे निकृष्ट होतात. पण त्यामध्येही श्रेय घेण्यावरुन राजकीय पक्ष किवा दोन गटात चढाओढ लागलेली दिसते. शिवाय अवाजवी राजकीय हस्तक्षेपामुळे कोकणाचे प्रश्न आहेत तिथेच राहिले आहेत.
केंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात विविध विकास योजनांवर खर्च होत असतो. तो अपुरा पडतो म्हणून सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दुप्पट केला. परंतू त्यापूर्वी मिळणारा निधीही कोकणातील जिल्ह्यात संपूर्ण खर्चच होत नाही असे दिसून आले. तिथे आता दुप्पट मिळालेला निधी पूर्णतः कसा खर्च पडणार? आत्ताच अनेक खात्यांमधला निधी खर्च न होता परत जाणार अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.
पालकमंत्री नियोजन विकास आराखड्याचा आढावा घेतात. प्रत्येक खात्याचा सर्वच्या सर्व निधी मार्च अखेरपूर्वी खर्ची पडलाच पाहिजे म्हणून अधिका-यांना तंबी देतात. प्रशासनही खात्यातील अपुरा कर्मचारी वर्ग, अधिका-यांची रिक्त पदे आणि निधी खर्ची घालण्याचे ज्या अधिका-यांना अधिकार आहेत त्यांचे आपल्या व अन्य जिल्ह्यांशी आणि तेथील मंत्र्यांशी असणारे हितसंबंध, कंत्राटातील टक्केवारीत लोकप्रतिनिधींचा वाढलेला हिस्सा अशा अनेक कारणांनी मंजूर असलेला निधी खर्चच होत नाही. यातील बहुतेक निधी हा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी असतो. कोकणखेरीज अन्य जिल्ह्यांना मिळालेला व कोकणातील जिल्ह्यांचा खर्ची न पडलेला निधी मिळून इतर अनेक जिल्ह्यात भरपूर निधी खर्च होत असतो. मंजूर निधीला कशा वाटा फुटतात हे संबंधितांना चांगलेच माहित असते. कोकणापुरते पहायचे झाले तर प्राप्त झालेल्या निधीला फुटलेल्या वाटा इथेही तशाच आहेत. खर्च झालेल्या निधीतून झालेली कामे काय दर्जाची आहेत. त्यातही किती जणांचे हितसंबंध आहेत हे तपासून पाहणे हा शोध पत्रकारितेसाठी उत्तम विषय होईल.
सरकारवर अवलंबून राहिल्यामुळे विकास योजनेचे कसे तीन तेरा वाजतात हा अनुभव असल्याने कोकणच्या पर्यटन विकासासाठी एक स्वयंसेवी संस्था निर्माण करण्याचे काही मंडळींनी ठरविले आणि त्यानुसार ग्लोबल कोकण संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे मुंबईत झालेल्या महोत्सवाला सारस्वत बँक, निर्माण ग्रुप यासारख्या संस्था व उद्योजकांचे प्रायोजकत्व लाभले होते. राज्याचे माजी मुख्य सचिव द.म.सुकथनकर हे या ग्लबल कोकण महोत्सवाचे अध्यक्ष आणि माजी खासदार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर हे आयोजन समितीचे चेअरमन होते. त्यांच्यामुळे या महोत्सवाला भारदस्तपणा आला होता. उद्घाटनाला मुख्यमंत्री, समारोपाला उपमुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्री, कोकणातील नारायण राणे व सुनिल तटकरे हे दोन मंत्री असा सत्ताधारी जामानिमाही या महोत्सवाला लाभला.
महोत्सवात कोकणातील लोककला, खाद्यपदार्थ, विविध उत्पादने, पर्यटन आदींचे सादरीकरण झाले. कृषीपर्यटन, फलोद्यान, पायाभूत सुविधांचा विकास, इ. विषयांवर परिसंवाद झाले. मुंबईतील कोकणी लोकांचाही सांस्कृतिक व खाद्य महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला.
यापूर्वी दामोदर हॉल व प्रांगणात मुंबईतल्या मालवणी बोलीभाषेच्या सिधुदुर्गवासीयांनी मालवणी जत्रौत्सव यशस्वी केले होते. ग्लोबल कोकण हे त्याचेच कोकणातील चार जिल्ह्यांचा समावेश असलेले मोठे रुप होते. पंचवीस वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या कोकण विकास परिषदेतलेच प्रश्न कमी जास्त प्रमाणात आजही आहेत. आता मुंबईतल्या या ग्लोबल कोकण महोत्सवातून फलनिष्पत्ती कोणती आणि कशी निर्माण होते हे पहावयाचे.

अधोरेखित *
महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलचा महाभ्रष्टाचार
फ्लोरेन्स नाइंटिगेल ही जगातील पहिली नर्स. आधुनिक नर्सिग म्हणजेच शुश्रुषेचा पाया त्यांनी घालून दिला. भारतामध्ये सर्वप्रथम १६६४ मध्ये मुंबईत मिलिटरी नर्सिग स्कूलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मिशन हॉस्पीटल अंतर्गत नर्सिग स्कूल्स स्थापन करण्यात आली.
वैद्यकीय व्यवसायात देशात परदेशात मिळणा-या नोकरीच्या असंख्य संधी असल्यामुळे नर्सिगचे शिक्षण घेणा-या मुलांचा ओढा वाढला. नर्सिगचे शिक्षण देणा-या संस्था गावोगाव उघडल्या. या सर्व शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे.
महाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलच्या अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन व अनेक तक्रारींवरुन महाराष्ट्र सरकारने नर्सिग कौन्सिल बरखास्तीचा निर्णय १८-१२-२०१० रोजी घेतला. सदर निर्णयानंतर कौन्सिलवर प्रशासक म्हणून डॉ. डी. एन. लांजेवार यांची नेमणूक करण्यात आली. या सर्व प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना रामलिग माळी यांनी कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही रामलिग माळी यांनी कौन्सिलचा पदभार दादागिरी व जबरदस्तीने स्विकारला असल्याचे आरोप आहेत.
नर्सिग कौन्सिलचे माजी अध्यक्ष रामलिग माळी यांनी कायदा धाब्यावर बसविला.
० कौन्सिलवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. डी. एन. लांजेवार यांच्याकडे पदभार न देता स्वतःच कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कारभार चालविणे.
० कोर्टाचे आदेश धुडकावून कौन्सिलचे धोरणात्मक निर्णय म्हणजे परिषदेची बैठक घेणे, नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी समित्या नेमणे, रजिस्ट्रार नेमणे इत्यादी निर्णय माळींनी घेतले.
० उच्च न्यायालयाच्या आदेशाचा धडधडीत अवमान होत असतानाही सरकारने आणि डॉ. विजयकुमार गावित मंत्री असलेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याने माळी यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
नवीन कॉलेजचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी मागितली जाते लाच-
जी.एन.एम. किवा ए.एन.एम. कॉलेजचा सेटअप तयार करुन जेव्हा एखादी संस्था कॉलेजच्या मान्यतेसाठी प्रस्ताव करुन पाठविते तेव्हा कोणतीही पाहणी न करता प्रस्ताव मान्य करण्यासाठी संस्था चालकांकडून लाखो रुपयांची मागणी केली जाते. अशा प्रकारची लाच देण्यास नकार देणार्‍या संस्थाचालकांच्या संस्थेची मान्यता कोणत्याही समितीच्या पहाणीशिवाय रद्द होते. यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर, पेण येथील संस्थांचे प्रस्ताव अशाच प्रकारे रद्द करण्यात आले आहेत. या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सध्या चालू आहे.
कुडाळ येथील बॅ. नाथ पै नर्सिग स्कूलचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी या कौन्सिलच्या महाभ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी वारंवार पत्राद्वारे, समक्ष भेटून पाठपुरावा चालू ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने विधानभवनाबाहेर उपोषणाचे हत्यार तूर्त थांबविले असेत तरी भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आपण पुढे चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘लाच देणे हा लाच घेण्याइतकात गंभीर गुन्हा आहे.‘ शिक्षणासारखे आणि त्याहूनही पवित्र अशा नर्सिग शिक्षणाला मान्यता देणा-या कौन्सिलमधील या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येतेय. सातत्याने उघडकीला येणा-या अशा प्रकारांमुळे एकूण शिक्षण व्यवस्थेचा आणि त्यामध्ये काम करणा-या सरकारी अधिका-यांविषयीचा जनमानसातील आदर मात्र झपाट्याने कमी होतोय.
शिक्षणातला हा महाभ्रष्टाचार केवळ नर्सिग कोर्स पुरताच मर्यादित नाही. शिक्षणाची सर्व अंगे या भ्रष्टाचार्यांनी व्यापलेली आहेत. त्याबाबत संबंधितांच्या सातत्याने तक्रारी आल्यावर वरीष्ठ अधिका-यांकडून चौकशीचे नाटकही पार पाडले जाते. पण कठोर कारवाई कोणावरच होत नाहीशिक्षण खात्याचे जिल्हा आणि विभागीय पातळीवरचे अधिकारी बिनदिक्कतपणे बेकायदेशीर निर्णय घेतात. शिक्षण संस्थाचालकांवर ते लादतात. सरकारी नियमांचीच पायमल्ली करतात आणि कायद्याचे, नियमांचे पालन करणा-यांची छळणूक करतात असे चित्र सर्वच जिल्ह्यांतून दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या वेतन (वाढ) आयोगाने भरघोस वेतन देऊन सुद्धा सरकारी पातळीवरचा हा भ्रष्ट उपचार थांबलेला नाही. उलट त्याच्या रकमेत वाढच झालेली आहे. हे कुठवर चालणार? आणि आपण चालवून घेणार?
- अॅड.शशांक मराठे, ९६८९९०३३७९

विशेष *

जि.प.च्या शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ
आजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होऊ लागली आहेत.
शिक्षण संस्थांमध्ये संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच सर्व स्तरांवर गुणात्मक वाढ करणे गरजेचे असून प्राचार्य व शिक्षकांनी शालेय शिक्षण आल्हाददायक तसेच तणावमुक्त करण्याची सूचना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी (२४ नोव्हेंबर) केली आहे. वरीष्ठ स्तरावरुन शिक्षणक्षेत्राविषयी असे विचार व्यक्त होत असतानाच जिल्हा परिषदेच्या पातळीवर शिक्षणव्यवस्थेचे कसे धिडवडे काढले जातात आणि जाणीवपूर्वक तणाव वाढविले जातात याचे सिधुदुर्ग जिल्हा हे एक मोठे उदाहरण आहे.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे. पालकमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या या जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी सदस्यच आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि विषय समित्यांच्या सभांमध्ये भ्रष्टाचारावर आसूढ ओढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आहेत, या विरोधकांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
एरवी विरोधी पक्षाचे सदस्य नेहमीच सभागृहात सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश पाडत होते. सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवित होते. त्यातूनच आतापर्यंत शिलाई मशीन्सची खरेदी, औषधे खरेदी, निकृष्ट प्रतीचा आणि किडी-अळ्या पडलेला शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियानांतर्गत केलेल्या अनेक प्रकारच्या खरेदीत आणि बांधकामात आर्थिक घोटाळा असल्याचे यापर्वीच स्पष्ट झाले आहे.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिका-यांनी मांडलेल्या उच्छादाचा लेखाजोखा आता माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कोकण विभागाचे कार्यवाह सुधाकर तावडे आणि दुर्गम अशा दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची छाननी करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. पाटील यांनी चौकशीअंती सादर केलेला अहवाल शिक्षण खात्यातील अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर प्रकाश पाडणारा आहे. या अहवालानुसार, शिक्षणाधिकारी या पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणा-या तत्कालीन दोन अधिका-यांनी एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवतील अशी कटकारस्थाने संस्था चालकांविरुद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारच्या नियमावलीनुसार प्रत्येक खाजगी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला दरवर्षी काही कागदपत्रे सादर करुन शिक्षणाधिका-यांची मंजूरी घ्यावी लागते. त्यात नव्या शिक्षकांच्या नेमणुका, सेवाज्येष्ठता, रजा, पगारवाढ, राखीव जागांची पूर्तता अशा विविध बाबींचा समावेश आहे. या मंजु-या घेतल्या नाहीत, तर संबंधित शिक्षण संस्थेविरुद्ध कारवाई होऊ शकते. आजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि काही शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होत आहेत.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिका-यांनी दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेला ‘गोत्या‘त आणण्यासाठी कशी चाल रचली हे पाटील यांच्या चौकशी अहवालात सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहे. दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शाळेव्यतिरिक्त देवगड, मालवण, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तालुक्यांतील खाजगी शिक्षण संस्थांवरही शिक्षणाधिका-यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी परस्परांच्या संगनमताने अन्याय केला असल्याचे पाटील यांनी अहवालात म्हटले आहे.
चौकशी अधिकारी पाटील यांनी आपल्या अहवालात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी राम नाईक तसेच बी. एम. किल्लेदार, अधीक्षक जी. आर. लिखारे, सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक एस. डी. डवरी, अधीक्षक गजानन खोचरे आदींनी त्यांच्या कर्तृत्वात कसूर केल्याचे निष्कर्ष काढले असून या सर्वांवर उचित कारवाई करण्याची शिफारस केली आहे. काही जणांवर फौजदारी करावाई केली जावी असेही पाटील यांनी सुचविले आहे.
भ्रष्टाचाराची लागण सिधुदुर्गातच नाही तर ती अन्यत्रही आहे. महिलांवर होणा-या अन्यायाविरोधात आजकाल बरेच लिहिले बोलले जाते. मात्र ग्रामीण भागातील निमशासकीय व खाजगी शाळांतील शिक्षकांना विशेषतः तरुण, विधवा, परित्यक्ता शिक्षिकांना, शिक्षण खात्यातील अधिका-यांच्या जाचांना सामोरे जावे लागते. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराची जी माहिती विविध मार्गाने आज उजेडात येते, ती हिमनगाचे टोक आहे. खोलवर जाऊन त्या भ्रष्टाचाराचा शोध घेणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
- कुमार कदम, पत्रकार-मुंबई

व्यक्तिविशेष - श्रीराम मंत्री
एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करुन जर एक विधायक नरजेचा माणूस आयुष्यभर निष्ठेने काम करत राहिला तर कुठल्या ताकदीचं काम करु शकतो याचा परिपाक म्हणजे श्री. श्रीराम मंत्री आणि गेली ५५ वर्षे कार्यरत असणारे उपनगर शिक्षण मंडळ. आज या मंडळाच्या १४ शैक्षणिक शाखा विद्यादानाचे काम करीत आहेत. मूल्यांचा ध्यास सामाजिक पुनरुत्थानाची आस, सचोटीचा व्यवहार आणि प्रचंड उर्जा एवढी पुंजी बरोबर घेऊन श्रीराम मंत्री त्यांच्या काही मोजक्या समविचारी मित्रांबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या विचाराने पुढे सरसावले.
‘वचितांचे शिक्षण‘ हे प्रमुख उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवून १८ नोव्हेंबर १९५६ रोजी उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना केली. अंधेरी येथे भाड्याने जागा घेऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा सुरु केली. पुढे सांताक्रूजला दुसरी रात्रशाळा सुरु केली. या शैक्षणिक उपक्रमाच्या रोपट्याचे आज विद्यानिधी संकुलासारख्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
विविध संस्था-जुहू विलेपार्ले पश्चिम येथील शांत रमणीय परिसरात आज विद्यानिधीची भव्य, सुंदर, सर्व शैक्षणिक सुविधांनी सज्ज अशी इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. येथे मराठी व इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंत वाणिज्य, विज्ञान यांची व्यवसाय केंद्री कनिष्ठ महाविद्यालये आहेत. याशिवाय विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी आणि कमला रहेजा विद्यानिधी वास्तुकला महाविद्यालयही आहे. श्रीराम मंत्री यांच्या आश्वासक आधारामुळे हे संकुल ‘गगन सदन तेजोमय‘ झाले आहे. तंत्रज्ञानाचे मुलभूत शिक्षण ही आधुनिक काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी दहावी उत्तीर्ण मुलांसाठी लघुव्यवसायाचे किमान कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम सुरु केले. या सर्व विधायक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गुणग्राहकतेच्या जोरांवर सर्व सहाका-यांना सहभागी करुन एक आदर्श निर्माण केला.
स्थानिय ते राष्ट्रीय संस्थांमध्ये सक्रिय सहभाग - केशवसृष्टी या उत्तन - भाईंदर जवळच्या निसर्गसुंदर ठिकाणी ‘रामरत्न विद्यामंदिर‘ ही इंग्रजी माध्यमाची मुलांची शाळा उभारण्यात श्रीराम मंत्री यांचा सिहाचा वाटा आहे. उत्तन विविधलक्षी शिक्षण संस्थेचे काही वर्षे ते अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व लाभलेल्या काही संस्था म्हणजे ‘‘भारतीय शिक्षण मंडळ‘‘, ‘‘विद्याप्रतिष्ठान महाराष्ट्र‘‘, ‘‘विद्याभारती‘‘ व ‘‘अमलविद्यावर्धिनी राजापूर‘‘.
पुढील उपक्रम - कै.डॉ.जे.पी.नाईक यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २००७ साली ‘‘अंतर्वेध‘‘ या नावाने ‘‘अनुसंधान आणि शैक्षणिक विकास‘‘ या विषयावर ते कार्यरत झाले आहेत.
साहित्यिक रुची - श्रीराम मंत्री यांच्या लोकसंग्रहामध्ये त्यांच्या सुंदर पत्रलेखनाचा महत्त्वाचा वाटा आहे. मोजक्या शब्दात आशयघन पत्र लिहिणं ही त्यांची खासियत. दुस-याच्या सुखदुःखात सामावून जाणारी, भावनेचा ओलावा जपणारी त्यांची पत्रे अनेकांनी जपून ठेवली आहेत. काव्यशास्त्रविनोदात विशेष रस असलेले श्री. श्रीराम मंत्री उत्स्र्फूत नर्म विनोदाने वातावरणात सहज प्रसन्नता आणतात.
जन्मगांव वेंगुर्ले - नैसर्गिक सौंदर्यांची मुक्त उधळण असलेले ‘वेंगुर्ले‘ हे श्रीराम मंत्री यांचे जन्मगाव. तरुण वयातच त्यांच्या मनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे संस्कार ठसले. आपण समाजाचं देणं लागतो ही भावना तेव्हापासून मनात रुजली. मंत्री यांच्या अफाट कार्यकर्तृत्वात त्यांच्या पत्नी रेखाताई यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. अविरत कष्ट सोसून त्या आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. दुर्देवाने डिसेंबर २००५ मध्ये त्यांचे निधन झाले.
उपगनर शिक्षण मंडळाच्या कामाचा व्याप सांभाळून मंत्री यांनी काही दर्जेदार पुस्तकांचं लेखनही केलं. शिक्षणक्षेत्राविषयी मौलिक विचार मांडणारं ‘वेध शिक्षणाचा‘ माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ‘आत्मविकासाकडून परम वैभवाकडे‘, ‘वेंगुर्ल्याचे लोकजीवन‘ तसेच पूर्वेतिहासाबरोबर शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उलाढालीचा आढावा घेणारे ‘फकाणा-गजाली वेंगुर्ल्याचे‘,‘आठवणीतील म्हणी आणि हुमाणी‘ ही सर्व पुस्तके मुद्दाम संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
शुभेच्छा - वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत कार्यरत असणारे श्रीराम मंत्री यांची अचाट स्मरणशक्ती, शांत सतेज मुद्रा, ओसंडून वाहणारा उत्साह आपल्याला स्तंभित करतो! आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या चेहे-यावर दिसणारी कृतार्थतेची भावना विलक्षण समाधान देऊन जाते. या ज्ञानऋषीने जोपासलेल्या, वाढविलेल्या अभिनव शैक्षणिक चळवळीला मनःपूर्वक शुभेच्छा!

बातम्या *
महिलांवर आर्थिक जबाबदारीचा बोजा नको -असुंता पारधे
महिलादिनी वेंगुर्लेत श्रमजीवी महिलांचा सत्कार

महिला आज सर्वच क्षेत्रात चमकू लागल्या आहेत. पण तरीही त्यांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत. अन्य संकटाबरोबर महिलांसमोर आता आर्थिक संकटही उभे आहे. आजही महिला खूप तणावाखाली आहे. संसाराच्या जबाबदारी बरोबरच महिलांकडून आता आर्थिक जबाबदारीची अपेक्षा केली जात आहे. महिला जर आर्थिक जबाबदारी स्विकारत असेल तर पुरुषाने घर संसारातील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे असे प्रतिपादन चेतना महिला विकास संस्थेच्या सचिव असुंता पारधे यांनी वेंगुर्ले येथे सा.किरात व नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्यावतीने, गणेश मित्रमंडळाच्या सहकार्याने महिला सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलतांना केले.
नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील प्रातिनिधीक १२ श्रमजीवी महिलांचा सत्कार करण्यात आला. घर संसारासाठी काबाड कष्ट करुन आपले संसार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तळागाळातील महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. नगराध्यक्ष संदेश निकम, महिला बालकल्याण सभापती सौ. लक्ष्मी वेंगुर्लेकर, गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय तानावडे, संस्थापक सुजय गांवकर, नगरसेविका सौ. श्वेता हुले, सौ.सुचिता कदम, ‘किरात‘ च्या अतिथी संपादक सौ. सुमेधा देसाई, ‘किरात‘चे श्रीधर मराठे आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मत्स्यविक्री करणा-या छाया खोबरेकर, बस कंडक्टर सुप्रिया बोवलेकर, महिला पोलिस संजाली पवार, मत्स्य विक्रेत्या फातिमा मेंडिस, मंगल कार्यालय चालक पल्लवी गावडे, डॉ. सौ. अश्विनी माईणकर, निवृत्त शिक्षिका सौ. जयश्री शिवलकर, सफाई कामगार अनिता जाधव, डॉ. सौ. अनुश्री गावस्कर, अॅड. सुषमा खानोलकर, निलम गावडे, डॉ. सौ. क्लेरा होडावडेकर व मायादत्त आंबर्डेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘किरात‘च्या महिला दिन विशेषकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अॅड. शशांक मराठे यांनी मानले.

काँग्रेसच्या फुगडी स्पर्धेत कुडाळचे दैवज्ञ मंडळ प्रथम
तालुका काँग्रेसतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित माजी आमदार शंकर कांबळी पुरस्कृत खुल्या महिला फुगडी स्पर्धेत कुडाळ येथील दैवज्ञ महिला मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.
साई दरबार हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत १९ महिला संघांनी भाग घेतला. फुगडीतील पारंपरिकतेचा बाज सांभाळत अनेक प्रकारांचे कौशल्यपूर्वक सादरीकरण केले. यावेळी जिजाऊ संस्थेच्या संस्थापक सौ. नीलम राणे यांनीही उपस्थिती दर्शविली. स्पर्धेत आजगांवचे रामेश्वर महिला मंडळ द्वितीय, सावंतवाडीचे दत्तप्रसाद महिला मंडळ तृतीय, मालवण येथील सिधूसखी, आरवलीतील सातेरी महिला समूहाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. बक्षिस वितरण शंकर कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे तालुका निरीक्षक बाळू कोळंबकर, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती विजय परब, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पूजा कर्पे, तालुकाध्यक्ष प्राजक्ता चिपकर, पं.स.सदस्य वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, नगरसेविका लक्ष्मी वेंगुर्लेकर, सुमन निकम, उभादांडा सरपंच सुकन्या नरसुले, परबवाडा सरपंच इनासीन फर्नांडीस, सूर्यकांता महिला संस्थेच्या प्रविणा खानोलकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळू देसाई, जि.प.सदस्य दादा कुबल, परीक्षक सौ. प्रविणा आपटे (सावंतवाडी), सौ.अनघा गोगटे (वेंगुर्ले) आदी उपस्थित होत्या. यावेळी प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या मोफत भाग्यवान प्रेक्षक योजनेचा ड्राॅ काढण्यात आला. सभागृहातील ५० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू व तीन सौभाग्यवतींना साड्या देण्यात आल्या. पॉप्युलर क्लॉथ सेंटरच्या वतीने पैठणी साडीचा ड्राॅ सौ. अंकिता चव्हाण यांनी जिकला.
नगराध्यक्ष संदेश निकम, उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार साळगांवकर, शहराध्यक्ष सचिन शेटये, ख.वि.संघाचे अध्यक्ष मनिष दळवी, दादा सोकटे, नगरसेवक सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, शेखर डिचोलकर, बिटू गावडे, विक्रम गावडे, राकेश खानोलकर, बाळू प्रभू आदी उपस्थित होते.


शिरोडा येथील भीषण आगीत ३० लाखाचे नुकसान
बाजारपेठ - शिरोडा येथे ११ मार्चच्या रात्री काही दुकानांना भीषण आग लागून सरकारी पंचनाम्यानुसार सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. रामचंद्र नायर यांच्या रेश्मा बेकरीचे १० लाख ३० हजार, वेंगुर्ले सभापती जगन्नाथ डोंगरे यांच्या जनता रेडिओ सव्र्हस या दुकानाचे ८ लाख ६५ हजार, शामसुंदर परब यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे ५ लाख १० हजार, गजानन वेंगुर्लेकर टेलर्स यांचे ८३ हजार ९५०, चंद्रकांत कुडतरकर यांचे ५० हजार ४००, संदीप राणे यांचे ५९ हजार २००, सुभाष नागवेकर यांच्या सुवर्णपेढीचे १८ हजार ४५० याप्रमाणे नुकसानीची नोंद तलाठी एस.एन.शिर्के, व्ही.टी.ठाकूर, तात्या हाडये, नीलेश परब, तानाजी सातोसकर यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार करण्यात आली आहे. रात्री आग लागल्याचे लक्षात येताच तेथील तरुणांनी व रहिवाशांनी धावाधाव करुन मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा केला. अनेकांच्या दुकानातील सामान बाहेर काढून वाचविले. वेंगुर्ले व सावंतवाडीहून बंब आल्यावर तासाभराने आग आटोक्यात आली. ही आग पूर्ववैमनस्यातून लावली गेल्याची तक्रार रामचंद्र नायर यांनी पोलीसात केली असून इतेश परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीबांधवांची कार्यकारिणी
गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुका उपसमितीच्या पुढील तीन वर्षासाठी नविन कार्यकारिणीची निवड नुकत्याच वेंगुर्ले येथे झालेल्या तालुका ज्ञातीबांधव स्नेहमेळाव्यात झाली. ६ मार्च रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले होते.
अध्यक्ष -डॉ. राजेंद्र श्रीकृष्ण गावस्कर, उपाध्यक्ष -दिगंबर आत्माराम नाईक, सौ. हेमा प्रताप गावस्कर, कार्याध्यक्ष-संजय विनायक पुनाळेकर, सचिव - अॅड. सौ.सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, सहसचिव - नंदकिशोर पुनाळेकर, खजिनदार - सौ. सुजाता अजित पडवळ, सहखजिनदार-सौ. मोहिलनी मोहन पंडीत, सदस्य - दिगंबर मंत्री, सदाशिव कीर, सचिन वालावलकर, सौ. विद्या प्रकाश रेगे, डॉ. प्रसाद प्रभुसाळगांवकर, आशिष पाडगांवकर, प्रसाद प्रभूझांटये, मानद सल्लागार - गुरुनाथ प्रभूझांटये, श्रीमती सुशिला प्रभूखानोलकर.
यावेळी मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन करुन नविन कार्यकारिणीच्या आगामी कार्याच्या नियोजनावर चर्चा झाली. वेंगुर्ला तालुक्यातील सर्व पोटभेदांसह ज्ञाती बांधवांचे सर्वांगिण सर्वेक्षण करुन शिक्षण, आरोग्य व संस्काराविषयक सुविधा पुरविण्याचे कार्यकारिणीने ठरविले आहे. यासंदर्भात तालुक्याशी संबंधीत ज्ञातीबांधवांनी उपयुक्त सूचना कराव्यात तसेच सहकार्य करावे असेही आवाहन नूतन कार्यकारिणीतर्फे सर्वांना करण्यात आले. कार्यकारिणीची पुढील बैठक रविवार दि. १० एप्रिल रोजी सायं. ४ वा. तुळस येथे मनोहर पडवळ यांच्या निवासस्थानी होणार आहे.

ऐश्वर्या दीनानाथ वेर्णेकर
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत राज्यात ४० हजार मुलांनी भाग घेतला त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी रौप्यपदके मिळविली. त्यापैकी एक बालवैज्ञानिक कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्यावी बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्यपदक पटकवायची ही दुसरी वेळ. इयत्ता सहावीमध्ये देखील राज्यस्तरावर तिने रौप्य पदक पटकावले होते.
वर्तमानपत्राच्या कागदापासून लगदा तयार करुन, घरगुती उपकरणाच्या सहाय्याने त्याच्या छोट्या विटा बनवायच्या व त्या पाण्यात भिजवून परसबागेतील झाडाच्या मुळावर ठेवल्या की कमीत कमी पाण्यात झाडे जगवता येतात. यात पाण्याची आणि वेळेचीही बचत होते. त्याचप्रमाणे टाकावू कागदाची विल्हेवाटही लावता येते. ऐश्वर्याच्या या प्रोजेक्टला रौप्यपदक मिळाले.
ऐश्वर्याला आय.ए.एस.करायचंय. यासाठी ती सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असते. तिला संगीत, नृत्याची देखील आवड आहे. या बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी तिला केणी मॅडम व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऐश्वर्या हिची आई कणकवलीच्या एस.एम. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षिका असल्याने कणकवलीला राहत असली तरी ती मूळची उभादांडा-वेंगुर्लेची सुकन्या आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दीनानाथ वेर्णेकर यांची ती कन्या होय.

No comments:

Post a Comment