Friday 4 February, 2011

अंक-५वा, ३ फेब्रुवारी २०११,

अंक-५वा, ३ फेब्रुवारी २०११,
संपैंदकीय *
सोनवणेंच्या हत्येमुळे ‘माफिया राज‘संपेल काय?
नाशिक जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची भर दिवसा रॉकेल ओतून जाळून हत्या करण्यात आली. इंथन तेलाची चोरी करणारे, भेसळ करणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना ‘तेल माफियांच्या‘ रोषाला बळी पडावे लागले. घडलेला प्रकार अत्यंत निर्घृण, संतापजनक आणि चिताजनकही आहे. राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि राज्यातील सर्व सरकारी कर्मचा-यांनी २७ जानेवारीला एकजुटीने एक दिवस काम बंद आंदोलन करुन आपला निषेध व्यक्त केला. या प्रकाराने वृत्तवाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना दोन-चार दिवसांचे ‘खाद्य‘ मिळाले. राजकारणा-यांना वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत बोलण्याचे काम मिळाले. सत्ताधा-यांना यापुढे कडक धोरण स्विकारल्याचे सांगायला वाव मिळाला. काही दिवसांनी पेटवले गेलेल्या सोनवणे यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट ओसरेल. त्यांना पेटविणा-यांनाच ‘अभय‘ देणारे सत्ताधारी राजकारणी आणि काही प्रसारमाध्यमे यात सोनवणेच कसे दोषी होते हे सांगत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु लागतील आणि राजकारण्यांशी लगेबंधे असणा-या अनेक प्रकारच्या माफियांच्या कारवाया पुढे सुरुच राहतील. कर्तव्य बजावतांना सोनवणे यांची अशी हत्या होणे निदनीय होय. परंतू या हत्येचा निषेध करण्यासाठी संप पुकारुन निदर्शन करणा-या सरकारी कर्मचा-यांपैकी कितीजण आपापल्या खात्यांमधील भ्रष्टाचाराबद्दल असे दंड थोपटून उभे राहतील!
सरकारी नोकरीमध्ये असतांना दीर्घकाळ ‘चिरी मिरी‘ घेतल्याशिवाय लोकांची अड(वि)लेली कामे न करणा-या कर्मचा-यांनाशी सेवा निवृत्तीनंतर आपल्या अडलेल्या सरकारी कामांसाठी लाच घ्यावी लागते तिथे सर्वसामान्यांची काय व्यथा?
सर्वच सरकारी - निमसरकारी खाती आज भ्रष्टाचाराने ग्रासलेली आहेत. या भ्रष्टाचाराची साखळी मंत्रालयापर्यंत आहे हे ही उघड आहे. पण सरकारला वाकविण्याची क्षमता असलेली सरकारी कर्मचा-यांची संघटना या विरुद्ध कधी आवाज उठवितांना दिसत नाही. सरकारी कर्मचा-यांनी केवळ आपल्या वेतनवाढीसाठी थकबाकी मिळण्यासाठी लढा करण्याऐवजी एकदातरी वाढती महागाई, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई या विरुद्ध संघटीत लढा उभारण्याचे धाडस दाखविले तर जनता त्यांच्या पाठीशी राहील. राज्यकर्त्यांना त्यांच्यापुढे नमावेच लागेल.
असे कधी घडेल तेव्हाच सोनवणे यांच्यासारख्या अधिका-यांचे बलिदान चर्चेपुरते मर्यादित राहणार नाही. महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसताहेत तसेच नोकरीतून निवृत्त झाल्यावर कर्मचा-यांनाही बसणार आहेत.
बेकायदेशीर धंदे करणा-यांचेही एक तत्व (!) असते. सर्वसामान्य लोकांना त्यांचा प्रत्यक्ष त्रास नसतो. त्यांचे धंदे कायदेशीर मार्गाने थांबवू शकणा-यांना ते रीतसर त्यांचा हप्ता पोचवीत असतात. तरीही त्यांच्याकडून अडवणुक झाली तर त्यांना ते ठोकून काढण्यास कमी करीत नाहीत. अनेक सरकारी किवा पोलीस खात्यातले कर्मचारी, अधिकारी यांच्यावर होणारे हल्ले हे त्याचेच द्योतक आहेत. अर्थात सोनवणे यांच्याबाबतीत तसेच घडले असेल असे नाही. कर्तव्यतत्परताही त्यांच्या जीवावर बेतलेली असेल.
तेल ही निर्जीव यंत्रासाठी वापरावयाची वस्तू. त्यातील भेसळीमुळे फारतर ते यंत्र बंद पडेल. पण अन्नपदार्थात दूध, खाद्यतेल व अन्य वस्तूंमध्ये भेसळ करुन लोकांच्या जीवावरच उठलेले भेसळ माफिया आणि त्यांना अभय देणारे संबंधीत सरकारी अधिकारी, राजकारणी, सत्ताधारी मंत्री यांना काय म्हणावे? शालेय मुलांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणा-या पदार्थात भेसळ, दुधात थेट रासायनिक भेसळ करुन आपल्या तुंबड्या भरणा-यांना तर देहांताचीच शिक्षा व्हायला हवी. इतके हे गुन्हे गंभीर आहेत. पण संवेदनाहीन बनलेल्या सरकारी यंत्रणेला आणि सत्ताधा-यांना त्याचे काही वाटते असे त्यांच्या कृतीमधून दिसत नाही.
कोणताही गुन्हा मोठ्या प्रमाणावर करणा-यांना ‘माफिया‘ हा शब्द प्रसारमाध्यमांनी रुढ करुन त्याला एक प्रकारची प्रतिष्ठा दिली आहे. माफिया हा शब्द इटलीहून आला. अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्यांची संस्थानिकांप्रमाणे असावीत तशी घराणीच इटली व अन्य युरोपीय देशांमध्ये निर्माण झाली होती. अजूनही असतील. भ्रष्ट नोकरशहा व पोलीसांना वश करुन त्यांचे काळे धंदे बिनबोभाट चालू असतात. त्या घटनांमधील संघर्षावर कादंब-या लिहिल्या गेल्या, चित्रपटही निघाले आणि प्रचंड गाजलेही. (उदा. गॉडफादर) त्यामुळे या गुन्हेगारांना तेथील प्रसारमाध्यमांनी माफिया संबोधून एक प्रकारे त्यांचे उदात्तीकरणच केले. येथे आपल्याकडची प्रसारमाध्येमेही तेच करीत आहेत. ‘दाऊदचा माणूस‘ या शब्दात पोलीस खात्यामध्ये आणि गुन्हेगारीशी संबंधीत राजकारण्यांमध्ये जे वजन(!) आहे तसे यापुढे विविध क्षेत्रातील मोठ्या गुन्हेगारांनाही ‘माफिया‘ शब्दामुळे वजन प्राप्त होणार आहे.
यशवंत सोनवणेंच्या हत्येमुळे जागृत झाल्यासारखी दाखविणारी सरकारी यंत्रणा आणि सत्ताधारी हे माफिया राज संपवितात की त्याला प्रतिष्ठा मिळवून देतात हे कालांतराने समजेलच.

अधोरेखीत *
उद्या मारणार ते आज मारा
बाहेरचे लोक आमच्यावर आरोप करतात, दर चढा मिळावा, बोली वाढावी म्हणून आम्ही सरकारला ब्लॅकमेलिग करण्यासाठी प्रकल्प विरोध करतो आहोत. एकूण ९६८ हेक्टर जमिन संपादित करायची आहे. त्यासाठी सुमारे २७०० जणांना भरपाईचे चेक वाटण्यात आले. त्यातले फक्त १०० चेक स्वीकारण्यात आले. हे १०० जण पुणे, मुंबई, औरंगाबाद व बाहेर स्थायिक झालेले दूरस्थ आहेत. त्यातले काही गडगंज श्रीमंत आहेत. आज्या, पणज्यांचे, सास-यांचे नाव सातबारावर होते, त्यांचे वारसदार म्हणून पैसे मिळाले. आज गावाशी कसलाही संबंध नसताना फुकट पैसा मिळतोय म्हणून त्यांनी उलटसुलट अटी घालत, सरकारशी करार करत ते घेतले. १ पैसा / १ चौ. फूट दराने प्रत्येकाला रु. २५०० वाटण्यात आले. आज सरकारने मोठे पॅकेज आणल्यावर ते हळहळतायत.
पण इथले स्थानिक, ज्यात बव्हंशी हातावर पोट घेवून जगणारे गरीब आहेत, ज्यांना पैशाची खरी गरज आहे, त्यातल्या एकाही माणसाने सरकारी पैसा, चेक स्वीकारलेला नाही. सध्या नव्याने देवू केलेला दर १० लाख रुपये एकरी हा एकूण प्रकल्प खर्चाच्या ०.०१२ टक्के आहे. एकूण प्रकल्प खर्च १,८०,००० कोटी रुपयांचा आहे. जगभरचे पुनर्वसनासाठी मिळणारे २० टक्केचे गणित धरले तर १५ कोटी रुपये एकरी द्यावे लागतील. सरकार एखाद्या मारवाडी व्यापा-याप्रमाणे दराची घासाघीस करते आहे. त्यावर विश्वास ठेवायचा कशाला आणि का? सरकारने कितीही मोठे पॅकेज आणले, पैसा दिला तरी आम्हाला तो नकोच आहे.
सरकारी पुनर्वसनावर कोणाचाही विश्वास नाही. तुमचे पुनर्वसन दुस-या एखाद्या यंत्रणेकडून खात्रीशीर करुन देवू म्हणणा-यांनी त्या खात्रीशीरपणे कोयना प्रकल्पापासून, पाटबंधारे व इतर तमाम प्रकल्पांतील विस्थापितांचे आधी पुनर्वसन करावे, मग आमच्याकडे यावे. इतर विस्थापितांना तसेच वा-यावर सोडून आम्हाला खास वागणूक द्या, आम्ही म्हणत नाही. आम्ही कोणाकडे कसलाच प्रकल्प मागितलेला नाही. ते सर्व तुम्ही आमच्यावर लादत आहात.
हे समोर पसरलेले माळ पाहा, आज त्यावरचे ९० टक्के शेतीचे क्षेत्र पडीक आहे. सरकार म्हणते तसे नापीक नव्हे. पूर्वी इथे पावसाळ्यात नाचणी, तीळ भरपूर होत असे. त्यावर आमची वर्षभराची अन्नाची गरज सहज भागे. आज शेती होत नाही, कारण शेतीपेक्षा आंबा, काजूच्या बागायती करुन त्यावर जास्त पैसा मिळतोय. गरजेचे अन्न या पैशातून सहज बाहेरुन विकत आणता येतेय. कमी मेहनतीत भागतेय, म्हणून तर शेतीची खटपट कोणी करत नाहीय. पण आपल्या जमिनीत तेवढीही मेहनत करायची तयारी जे दाखवत नाहीत ते गरीब आहेत. आमचे लोक २०० रु. मजुरी दर दिवशी देवूनही मजुरीला येत नाहीत. कर्नाटकातून मजूर आणावे लागतात.
थोडक्यात समाधान मानणा-या आमच्या लोकांना आळशी म्हणा, मिजासी म्हणा वा आध्यात्मिक योगी म्हणा, आम्ही आहोत तसे सुखी आहोत. आज स्वावलंबी आहोत. मालक आहोत. आमचा विकास केला नाही तरी चालेल. विकास आला तरी आम्हीच नाही राहिलो तर कोणासाठी?
या जमिनीने आमच्या तमाम मागच्या पिढ्या जगवल्यात. तमाम पुढच्या पिढ्या जगणार आहेत. त्या सर्वांच्या पालनपोषणाचे काय? याचे गणित सरकार वा कोणी बनवू शकेल? त्याची पैशात भरपाई करु शकेल? ज्यांची प्रकल्पाखाली जमिन जाईल ते तर देशोधडीला लागतीलच, पण इलाख्यातील इतर सर्वांची तीच गत होणार. या प्रकल्पाच्या प्रचंड उष्णतेने आमचे आजचे उपजिविकेचे साधन आंबा, काजू, नारळ बागायती नष्ट होतील. थोडेसे उत्पादन मिळू शकले तरी किरणोत्सर्गाच्या भीतीने बाहेरचे कोणी घेणार नाहीत. पिण्याचे पाणी दूषित होईल. उपासमारीने आणि कॅन्सरग्रस्त होऊन आम्ही कणाकणाने मरु. असे काही होत नाही म्हणणा-यांनी आण्विक क्षेत्रात कायम वास्तव्य करुन दाखवावे. मग बोलावे. जेमतेम ३०० तंत्रज्ञ इथे काम करतील. त्यांची वस्ती प्रकल्पापासून १० कि.मी. दूर राहील. ती का? आम्ही इथेच असणार, ते का?
आता अजून कसल्या चर्चा करता आणि सुनावण्या लावता? त्या नाटकांची काय गरज? जेवढ्या म्हणून समित्या आल्या, सरकारी म्हणा, शास्त्रज्ञांच्या म्हणा, राजकीय पक्षांच्या म्हणा त्या सर्वांनी आम्ही जे बोललो, सांगितले ते बाहेर मांडलेच नाही. आमचे सांगणे घुमवून फिरवून आपल्या सोयीने मांडले. प्रकल्प होणारच हे आधीच ठरवून ते येतात. खाजगीत आम्हाला सांगतात तुमचे पटतेय पण आमच्यावर वरुन दबाव आहे, आम्ही काही करु शकत नाही. कधी वाटते उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष्या सगळे पाळीपाळीने येऊन आमच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रू ढाळून जातील की, तुमचे आम्हाला पटते पण नाईलाज आहे. बाहेरचा दबाव आहे. अरे पण बाहेरचा दबाव कोणाचा आणि का तो सांगा ना? मग तुम्हा आम्हाला मिळून त्याचा सामना करता येईल.
सरकारचे साम आणि दाम उपाय चालले नाहीत. आम्ही सर्वजण ठाम एकी करुन आहोत. दुफळी, भेद माजवण्याचे प्रयत्न चालले नाहीत. मग आता दंडनीती वापरा ना? आम्ही शेतकरी - मच्छिमार माणसे तुमच्या पोलिसांच्या दंडुक्यांचा, बंदुकांचा कसला सामना करु शकणार आहोत? तुम्ही प्रकल्पाचे सामान, अवजड वाहने आणायला सुरुवात केलीत की आम्ही अडवणार आहोत. तुम्ही आमच्यावर ट्रक, बुलडोझर, रणगाडे घालणार आहात. आम्हाला चिरडून प्रकल्प उभारणारच आहात. प्रकल्प उभारल्यावर उद्या कणाकणाने मरणार ते आजच गोळ्या घालून मारा. आम्ही तयार आहोत या लोकांसाठी असलेल्या, लोकांनी बनवलेल्या, लोकांच्या लोकशाही सरकारकडून गोळ्या झेलायला.
-डॉ. मिलिद देसाई
शब्दांकन - समीर बागायतकर

आरोग्य आणि सण
माघ मास

वसंतपंचमी- नवीन अन्नाची पूजा करीत माघ महिन्याची सुरुवात होते. रति कामदेवाचे पूजन करुन गीतगायन, नृत्य, वादन करीत करमणुकीचे कार्यक्रम करीत सामुहिक आनंदोत्सव साजरा करतात.
कामदेवाचे पूजन म्हणजे काम या रिपुवर विजय मिळवण्यासाठी केलेली आळवणी आहे. आपण जन्म घेतला त्याचा काय उद्देश आहे हे आज तरुणांना माहित नाही. आयुर्वेद व अध्यात्मात याचे उत्तर सांगितले आहे. पुरुषार्थ प्राप्ती धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यात काम हा पुरुषार्थ म्हणून वर्णन केला आहे. काम म्हणजे सेक्स नव्हे, स्वैराचार नव्हे, काम म्हणजे वंशसातत्य टिकवण्यासाठी सुनियंत्रित पद्धतीने केलेले सुप्रजाजनन.
सूर्योपासना- याच महिन्यात रथसप्तमी येते. यावेळी अंगणातील तुळशीकडेएका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतु जाईपर्यंत शिजवतात.
रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्यं भास्करात् इच्छेत। असं वचन आहे. म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून असते. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावं म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले तर शरीरबळ व मनोबळ वाढते. जर हे समंत्र घातले गेले तर आत्मबळ सुद्धा वाढते. सूर्योदयापूर्वी दीड तास लवकर उठावे, शुचिर्भूत होऊन बरोबर सूर्योदयाच्या वेळी अर्ध्य देण्यास तयार असावे.
आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये पूजाविधीला स्थान दिले पाहिजे. सकाळी आंघोळ झाल्यावर किमान दहा मिनिटे देवपूजा करण्यासाठी राखीव ठेवलेली असतात. ही दहा मिनीटे पूर्ण दिवसाचा उत्साह वाढवितात असे लक्षात येते. आजमितीपर्यंत भारतात तरी ‘देवाचे केले नाही तर‘ पाप लागते हा संस्कार सर्व हिदुंच्या घरात केला जातोय. आणि ‘देवाचे केले‘ म्हणजे पुण्य मिळते हा समज आहे. पण दुर्दैवाने नेमके ‘देवाचे कसे करावे‘ म्हणजे देव लवकर प्रसन्न होईल हे नीटसे समजून घेतले जात नाही. जगाला अध्यात्माची देणगी देणा-या भारतात अध्यात्माबद्दल अशी उदासिनता का बरे आहे? कर्मकांड व अध्यात्म यातील फरक वेळीच नवीन पिढीला समजून आला पाहिजे.
महाशिवरात्र- याच माघ महिन्यात आणखी एक शिवाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे महाशिवरात्र, दिवसा नव्हे तर मध्यरात्री शिवाची पूजा सांगितली आहे. बेलपत्राची आरास, दुधाचा किवा उसाच्या रसाचा त्या शंकराला अभिषेक. किती प्रसन्न वाटते नाही का? नैवेद्याला कवठाची बर्फी, कवठ हे फळ पित्त विकारात वापरले जाते.
पूजेच्या प्रकारात पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, महापूजा इ. ‘कॅटेगरी‘ स्थळ काळ व उपलब्ध साधनसामुग्री यानुसार करण्यात येते. यात कुठेही भक्तीला उणेपणा येत नाही. उलट सर्व पूजा प्रकारामध्ये ‘मानसपूजा‘ हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. मानसपूजा जमली तर इतर सर्व पूजाविधी गौण मानले जातात. पण इथेच तर खरी गोम आहे. आमचे मनच जर जाग्यावर नसेल तर ईश्वराची स्थापना मनामध्ये करुन त्याची पूजा आम्ही कशी काय करणार? म्हणून साधनेचेही काही टप्पे केले आहेत. जसे आपल्याला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आधी सर्वात खालची पायरी चढावी लागते, तरच त्याच्यावरची पायरी चढता येते. तसे ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी प्रथम सगुण उपासना, प्रत्यक्ष पूजाविधी, कर्मकांड, किर्तन, प्रवचन, उपवास, तप इ. पाय-यांवरुन जावेच लागते. जर एकदम वरच्या पायरीवर पाय ठेवायचा प्रयत्न केला तर नाही चढता येणार आणि बळे बळे चढण्याचा प्रयत्न केलाच तर ख-या ईश्वराची भेट लवकर होईल असेही नाही, ज्या धर्मात मूर्तीपूजाच नाही अशा धर्मातील लोकांनाही ईश्वर भेटतो पण अशी माणसे अत्यंत कर्मठ बनतात. अन्य धर्मीय लोक त्यंना अतितुच्छ वाटतात, मूर्तीभंजक तयार होतात, काफीरांना ठार मारा सांगणारे हैवान घडतात. व्यवहारात साधे अंकगणित सोडवायचे झाल्यास उत्तर मिळेपर्यंत ‘क्ष‘ गृहीत धरावाच लागतो. तसे ईश्वराचे अस्तित्व समजेपर्यंत आपल्याला ईश्वर ‘क्ष‘ गृहीत धरावाच लागेल. आणि हिदू लोक हा ‘क्ष‘ गृहीत धरीत आले आहेत म्हणून हिदू धर्म सहिष्णु बनला आहे. आणि म्हणूनच शास्त्रोक्त पूजाविधी करणे सामान्य साधनेच्या माणसांना आवश्यक आहे. या ‘क्ष‘लाच काही बुद्धीवादी निसर्ग, काहीजण सुपर पॉवर, काहीजण अदृश्य शक्ती, काहीजण चैतन्याचा स्रोत वगैरे नावे देतात.

विशेष बैंतम्या
अक्षरगंधच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत किरात दिवाळी अंकाचा सन्मान
कल्याण येथील अक्षरगंध संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांच्या स्पर्धेत वेंगुर्ले येथील साप्ताहिक किरातच्या २०१० च्या अंकाची सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून आलेल्या ७२० अंकांपैकी १५ सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक यावर्षी निवडण्यात आले.
यंदाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रशैलीचा आविष्कार साकारणा-या नवोदित चित्रकर्ती चेतना दीपनाईक यांनी किरात परिवाराच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला.
कोकणातील नवोदित लेखक, कवींना व्यासपीठ मिळवून देणा-या आणि कोकण विकासाचे प्रश्न दिवाळी अंकातून मांडणा-या किरात दिवाळी अंकाचे यंदाचे ३१वे वर्ष आहे. यंदाच्या दिवाळी अंकात कथा, कविता, मुलाखतीबरोबरच, रस्ते विकासाचा महामार्ग या विषयावर परिसंवादात्मक लेखमालेचे आयोजन केले होते.


दै. सिधुदुर्ग समाचार आयोजित विविधरंगी साड्यांच्या वेशभूषा स्पर्धेचे बक्षिस वितरण
दै. सिधुदुर्ग समाचाराने नवरात्रौत्सवात नवदुर्गेची विविध नऊ रुपातील विविधरंगी साड्यांच्या वेशभूषा जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना वेंगुर्ले - कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील वाचकांच्या मेळाव्यात जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापक सौ. निलम राणे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या पुढीलप्रमाणे -
सौ. साक्षी स्वप्निल गडेकर (आडेली-वेंगुर्ले सावित्रीबाई स्वयंसहाय्यता बचत गट आडेली संचालिका), सौ. माधवी मधुसूदन गावडे (वेतोरे-वेंगुर्ले सुर्यकांता महिला फळप्रक्रिया औद्यो. संस्था चेअरमन), श्रद्धा रविद्र साळगांवकर (नमसवाडी-उभादांडा, कुडाळ महाविद्यालय), शिल्पा संजय पाटील (वेंगुर्ले सातेरी बचत गट), अर्चना महादेव जाधव (आनंदवाडी-वेंगुर्ले, द्वितीय वर्ष कला, खर्डेकर कॉलेज),दर्शना दिनानाथ गावडे (मालवण-चौके, रुचिरा बचत गट), सौ.रंजना रामचंद्र कदम (देवगड-इळये, आकारी ब्राह्मण बचत गट अध्यक्ष), सायली सतिश काळसेकर (परबवाडा-वेंगुर्ले, बॅ. खर्डेकर कॉलेज १२वी), छाया प्रभाकर भाईप (नेमळे-सावंतवाडी, महालक्ष्मी बचत गट अध्यक्ष).
यावेळी सौ.प्रज्ञा परब, एम.के.गावडे, सौ. अस्मिता बांदेकर, डॉ.सौ.पूजा कर्पे, दै.सिधुदुर्ग समाचार कुडाळ कार्यालय प्रमुख श्रीमती निशा रांगणेकर, वेंगुर्ले कार्यालय प्रमुख सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, माजी सभापती सौ. सारिका काळसेकर, सौ. वंदना किनळेकर, वजराट सरपंच सौ. विशाखा वेंगुर्लेकर, आडेली माजी सरपंच सौ.शुभांगी गडेकर, सौ.शुभांगी भोसले, अणसूर सरपंच सौ. देऊलकर, छाया परमेकर, संगीता माळकर आदी उपस्थित होते. सौ. सृष्टी कौलगेकर यांनी स्वागत तर प्रास्ताविक एम.के.गावडे यांनी केले.

ब्राह्मण मंडळाचे स्नेहसंमेलन दिमाखात संपन्न

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिधुदुर्गचे २२वे वार्षिक स्नेहसंमेलन ३० जानेवारीला गोगटे मंगल कार्यालय, वेतोरे येथील स्व. अण्णा गोगटे सभामंडपात मंडळाचे अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख वक्ते सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर खाडीलकर होते.
प्रारंभी सकाळी बटूंनी वेदपठण केले. सौ. अनघा गोगटे यांनी स्वागतगीत म्हटले. वेंगुर्ले तालुका अध्यक्ष प्रकाश नवाथे यांनी प्रास्ताविक केले. श्रीधर मराठे यांनी स्वागतपर भाषणांत संमेलनाची रुपरेषा सांगितली. यावेळी वेदमूर्ती राजाभाऊ फाटक-वेंगुर्ले, उद्यानपंडित संतोष गाडगीळ, शेतीनिष्ट पुरस्कार मिळालेले शिवराम गोगटे, एल.एल.एम उत्तीर्ण झालेले अॅड. श्रीकृष्ण ओगले, संमेलन संयोजक श्रीधर गोगटे, तसेच १०वी, १२वी, पदवी परीक्षेत ७० टक्के गुण मिळविणा-या वेंगुर्ले तालुक्यातील मुलांचा गौरव करण्यात आला.
या संमेलनात ‘ब्राह्मण मंडळाचा आणि ज्ञातीचा उत्कर्ष‘ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे संचालन दहिबाव-देवगडचे पु.ज.ओगले यांनी केले. यावेळी सभागृहातील अनेकांनी आपले विचार मांडले. दुसरे चर्चासत्र होते ज्ञातीतील ‘विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह होण्याबाबतचे‘ त्याचे संचालन सावंतवाडीच्या सौ. मृणालिनी कशाळीकर आणि कुडाळ ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी केले. या ज्वलंत विषयावर ब-याच पालकांनी आणि युवक - युवतींनीही आपली मते मांडली आणि मंडळाने खास वधु-वर मेळावे घेण्याची सूचना केली.
पंचद्रवीड पतसंस्थेविषयी संस्थेचे अध्यक्ष महेश्वर रायकर यांनी माहिती देतांना संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व राज्यात या पतसंस्थेचे काम शासनाचे सर्व निकष पूर्ण करणारे ठरले असल्याचे सांगितले. कुडाळ ब्राह्मण सभेच्या सातत्यपूर्ण कार्याची माहिती गुरुनाथ दामले यांनी दिली. शिरोडा (गोवा) येथील गोमंतक आयुर्वेद मेडिकल कॉलेजची माहिती तेथील संस्था पदाधिका-यांनी देऊन ब्राह्मण ज्ञातीतील मुलांनी आयुर्वेद शिकून व्यवसाय, परंपरा जपण्याचे आवाहन केले. पू. रामदेव बाबांच्या पतंजली योगविद्येचे प्रचारक डॉ.रसिका करंबळेकर व विद्याधर करंबळेकर यांनी योगविद्येबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते प्रभाकर खाडीलकर यांनी संमेलनातील चर्चासत्रांचा आढावा घेऊन अतिशय उद्बोधक विचार मांडले. अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांनी या संमेलनाच्या यशस्वीबद्दल संयोजकांचे अभिनंदन करुन आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशांक मराठे यांनी केले.
ब्राह्मण मंडळ सिधुदुर्गची, वार्षिक सर्वसाधारण सभा ३ वाजता होऊन सचिव सुभाष जोग यांनी सादर केलेला अहवाल, जमाखर्च मंजूर करण्यात आला. याच सभेत पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. संमेलनास जिल्हाभरातून सुमारे चारशेहून अधिक ब्राह्मण बंधु-भगिनींची उपस्थिती होती.
अलिकडेच दिवंगत झालेले विख्यात गायक भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम संमेलनानंतर शेखर पणशीकर, सौ.अनघा गोगटे यांनी सादर केला.

स्वरसम्राट पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली
वेंगुर्ले येथील कु. मायादत्त आंबर्डेकर यांच्या निवासस्थानी पं. भीमसेन जोशी यांच्या दुःखद निधनाबद्दल ‘स्वरसाधना‘ संस्थेतर्फे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमच्या पिढीने हे स्वर्गीय संगीत अनेक मैफीलीत अगदी मनसोक्तपणे ऐकले हा ईश्वरी प्रसादच म्हणावा लागले असे उद्गार गायक श्री. दिलीप दाभोलकर यांनी काढले. श्री. शेखर पणशीकर यांनी आपण ऐकलेल्या अनेक मैफीलीबद्दलचे आपले अनुभव कथन केले. कु. माया आंबर्डेकर यांनी आपले वडिल कै. भाऊसाहेब आंबर्डेकर यांच्या पंडितजी बरोबरच्या स्नेहसंबंधाची माहिती देऊन, बंधू बाळ आंबर्डेकर यांनी पंडितजीकडून घेतलेल्या संगीत साधनेची माहिती दिली. अतुल हुले यांनी पं. जोशी यांच्या वैयक्तिक मैत्रीचा उल्लेख करुन त्यांच्या मनमिळावू स्वभावाचे अनेक प्रसंग सांगितले. सौ. अनघा गोगटे यांनी त्यांच्या संगीतातील अनेक सौंदर्यस्थळांचे वर्णन करुन संगीत क्षेत्रातील त्यांचा मोठेपणा विशद करुन सांगितला. ‘स्वरसाधना‘चे अध्यक्ष शशिकांत कर्पे यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल माहिती देऊन त्यांनी संगीत रसिकांना व अभ्यासकांना फार मोठा मोलाचा ठेवा दिल्याचे सांगितले. पंडितजींचे अनेक भावमधुर अभंग ‘स्वरसाधाना‘च्या कलावंतांनी सादर केले. या कार्यक्रमाला अनेक संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment:

  1. कविता सागर (मराठी - हिंदी - इंग्रजी) Kavita Sagar (Marathi - Hindi - English) an International Journal of Poetry
    “कविता सागर” दिवाळी अंक २०१२ साठी साहित्य पाठवा

    नऊशे बावन वर्षापूर्वी तेराव्या शतकात मुकुंदराज महाराजांनी मराठीचा पहिला कविता ग्रंथ ‘विवेक सिंधु’ ची रचना केली. त्यानंतर मराठी भाषेत असंख्य कविता-ग्रंथ लिहिले गेले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची आणि नामदेवांची गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आदी मराठी संत कवितांची मोठी परंपरा आहे. एक कवी - एक कविता या धर्तीवर पाचशे कवीच्या पाचशे निवडक कवितांचा या अंकात समावेश असेल. महाराष्ट्रातील कवितांचा कविता सागर हा पहिला विश्वविक्रमी, जाहिरातीच्या अडथळया शिवाय निखळ वाचनाचा आनंद देणारा व संपूर्ण कविता विषयक दिवाळी अंक बनविण्याची योजना असल्याची माहिती या योजनेचे मुख्य प्रवर्तक व संपादक अनिल धुदाट (पाटील) यांनी दिली.

    कविताचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाचशे किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच दिवाळी अंकात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही.

    जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड तज्ञ व जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवश्यक आहे. हा अंक ना नफा ना तोटा या तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकत नाही हे नम्र पणे नमूद करत आहोत.

    शब्द प्रकाशन संस्थेने प्रकाशनासाठी न स्वीकारलेले साहित्य कोणत्याही परीस्थितीत कवीला परत पाठविले जात नाही. त्यामुळे कवींनी प्रकाशनाकडे पाठविलेल्या आपल्या साहित्याची एक प्रत स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार, कवितांचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता "कविता सागर" दिवाळी अंक २०१२ च्या मर्यादित प्रती प्रसिद्ध होणार असल्या मुळे कवींना मोफत अंक पाठवणे शक्य नाही, दिवाळी अंकाची प्रत ज्या कवींना हवी असेल त्यानी तशी आगावू नोदणी करून आपली निराशा टाळावी.


    कवींनी आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता, आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य प्रकार - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष (असल्यास), मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून कविता करता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावे. आपल्या कविता शब्द प्रकाशन संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल.

    आपण आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित कविता या पत्त्यावर पाठवाव्या: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक, "कविता सागर" दिवाळी अंक २०१२, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य किवा अधिक माहिती साठी खालील दूरध्वनी क्रमांक अथवा ई-मेल वर संपर्क साधू शकता: ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com

    ReplyDelete