Thursday 15 March, 2012

अंक ९वा, १५ मार्च २०१२

अधोरेखित *
दुधाची मनिऑर्डर
वीस वर्षापूर्वी कोणी जर सांगितलं असतं, बाटलीबंद पाणी लोक १५ रुपयांनी विकत घेतील तर लोकांनी विश्वास ठेवला नसता. कोकणातील दूध व्यवसायाबद्दल सध्या अशीच चर्चा सुरु आहे. दूधाचं गणित जमणारं नाही, अनेक फसलेले प्रयोग सर्वजण आठवून सांगतील. शालिनी डेअरीचे दूध व सिधुभूमीचे कोकण दूध मार्केटमध्ये आले सुद्धा. लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत. दोन्ही डेअरींचे संकलन रोजचं १० हजार लिटरच्या जवळपास आहे. काही समस्याही असतील. पण त्याचे उत्तर आपणालाच शोधावे लागेल. शाश्वत विकासाचा हमरस्ता छोट्या छोट्या पायवाटेतूनच तयार होईल. कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यामध्ये उतरलं. एक दिवस याच रेल्वेने दूधाची पिशवी मुंबईला जाईल, याची खात्री आपण मनाशी बाळगूया.
२ गायी १६ टक्के दारिद्र्याचं निर्मूलन व २ म्हैशी २२ टक्के दारिद्र्याचं निर्मूलन करतात. धरणं, कालवे, चारा-पिके, शास्त्रोक्त व्यवसाय या सर्वांतून दूध फायद्यामध्ये येऊ शकतं. काही प्रयोगविरांनी हे केलं आहे. रांगणा-तुळसुली येथील सावंत शेतकरी व गावडे या तरुणांनी याचं अर्थकारण समजून घेतलं आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन क्षमता व उत्पादकता यातील तूट कमी होईल. दूधाचा उत्पादन खर्च लीटरला १८ रु. आहे. या सर्वाला गोबरगॅसची जोड द्यावी लागेल. खाद्याची प्रत सुधारली की गॅसही चांगले पेटेल. स्लरीचा उपयोग गांडूळखत, नाडेप खत, कंपोस्ट खतासाठी करता येईल. ‘भगिरथ‘ने यासाठी काही प्रयोग केले आहेत.
आमदार प्रमोद जठार यांनी ‘भगिरथ‘चं काम पाहिलं. दूधाचं त्यांनी स्वप्न पाहिलं. आज ४ कोटीचा, ५० हजार लीटर क्षमतेचा प्रकल्प नाधवडे तलावा बाजूला आहे. आपण येथे भेट द्यावी. या सर्व प्रक्रीयेमध्ये वैचारीक बीज पेरणीचं काम भगीरथला करता आलं. इच्छाशक्तीचे राजकारणी असतील तर हे घडू शकतं. आपण कल्पना करा, रोजचं १ लाख लिटर दूध जमा होईल तेव्हा काय सामाजिक-आर्थिक परिवर्तन होईल. आपण राजकीय परिवर्तनाची चर्चा-चर्वणं खूप करतो. सामाजिक, आर्थिक बदल हे सामान्य माणसाला अधिक सुखावतात. म्हैशीमागे दंडुका घेऊन फिरणारा ‘कोकणी युवक‘ आम्हाला अपेक्षित आहे. सर्व राजकीय धुरीणांनी याचा विचार करावा. पश्चिम महाराष्ट्राची शाश्वतता ही साखरेपेक्षा दुधावर आहे. आपण जागं होऊया. केरळची लोकं नाहीतर हे सर्व करतील. त्यांची चूक काय? मला वाटतं, आता झोपेचं सोंग खूप झाले. जागं होऊया.
माझं हे सांगणं कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल. पण मायनिगसाठी डोंगर विकण्याला पर्याय दूधाचा ठरु शकतो. गोकुळ, वारणा, चितळे यांचे रोजचे संकलन प्रत्येकी ५ लाख लीटर आहे. वारणानगरचे माझे मित्र सांगत होते, दस-याच्या श्रीखंडामध्ये आमच्या गावातील महिलांच्या कष्टाचा गोडवा असतो. कधी तरी असं कोकणी माणसांच्या तोंडून ऐकू येऊदे. गावागावांमध्ये डबलबारी, रोंबाट, क्रिकेट टुर्नामेंट यासाठी गर्दी करणा-या कोकणी तरुणांनी हे आव्हान स्विकारावे. कोकणाचे भले त्यामध्ये आहे. परशुरामाच्या भूमीचं हे सांगणं आहे. मायनिगच्या डंपरच्या ऐवजी दूधाचे टँकर जिल्ह्याबाहेर जाऊदे; यासाठीच हे सांगण, पाव देवा!
-डॉ. प्रसाद देवधर, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप,ता. कुडाळ. ९४२२५९६५००.

संपादकीय *
होळी उत्सवावर मर्यादा घाला
होळी पौर्णिमा नुकतीच झाली. काही गावांचा होळीपासून सुरु होणारा दोन ते पाच दिवसांचा शिमगोत्सवही संपला. परंतू काही गावातून तब्बल पंधरा दिवसांचा शिमगोत्सव चालतो. गुढीपाडव्या -पासून सुरु होणा-या नव्या वर्षाच्या आदल्या दिवशी पहाटेपर्यंत पंधरा दिवसांचा शिमगावाले लोक दारु पिऊन दंगामस्ती करीत रंगपंचमी साजरी करतात. पंधरा दिवसांच्या या शिमगोत्सवाची ही प्रथा आपल्या सिधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. पण ती सर्वत्र नाही. काही ठरावीक गावांतच आहे. ती प्रथेप्रमाणे चालत आलेली आहे. त्याला शास्त्राधार काहीही नाही.
खरे तर होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी खेळण्याची प्रथा बहुतेक राज्यांत प्रामुख्याने उत्तर भारतात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुट्टीही जाहीर केलेली असते. मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात दुस-या दिवशीच्या रंगपंचमीनंतर होलीकोत्सव संपतो. पण सिधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात हा शिमगोत्सव तीन ते पाच दिवसांनी आणि काही गावात पंधरा दिवसांनी संपतो. या दिवसात ‘शबय‘ (म्हणजे भीकच) मागण्यासाठी काही लोक निरनिराळी सोंगे काढून घरोघर फिरतात. मिळणा-या पैशांतून दारु आणि चैनबाजी करतात. पूर्वीच्या काळी लोकांचे घरोघर जाऊन मनोरंजन करणे एवढाच हेतू असायचा. आता हा प्रकार बंद होत चालला आहे. तरीही आपापल्या गावातला ३ ते ५ दिवसांचा शिमगा संपल्यावर पंधरा दिवसांचा शिमगा चालणा-या गावात ‘शबय‘ मागण्यासाठी काही लोक शेवटचे चार दिवस फिरत असतात. या गोष्टीचा खरेतर गावातील लोकांना त्रासच होत असतो. त्यासाठी पंधरा दिवसांच्या शिमग्याची प्रथा बंद करुन ती दोन दिवसांवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, जाणते, राजकारणी, धार्मिक संस्थांचे, देवस्थानांचे लोक यांनी एकत्र येऊन तसे ठरविले पाहिजे व त्याची अंमलबजावणी पुढील वर्षीपासूनच केली पाहिजे.
वेंगुर्ल्यातही हे होऊ शकेल. त्यासाठी देवस्थानाच्या मानक-यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी जवळपासच्या गावांतून व वेंगुर्ल्यातील अनेक वाड्यांतील जी मंडळे ‘रोंबाट‘ घेऊन येतात. त्यांनाही त्यासाठी बोलावले पाहिजे.
दुसरी एक प्रथा म्हणजे, होळीच्या दिवशी वृक्ष तोडून ते सर्वांनी हाताने खेळवत नेऊन देवस्थानच्या किवा अन्यत्र ठरलेल्या जागी पुरुन त्याचे पूजन करणे. या प्रकारात जिल्ह्यात शेकडो वृक्षांची तोड होते. त्यामध्ये प्रामुख्याने दरसाल किमान पाचशे रुपयांचे उत्पन्न देऊ शकणा-या पोफळीच्या (सुपारीचे झाड) झाडांचा समावेश असतो. हाताने दूरवर खेळवत नेतांना अपघात होतात. पोफळही मध्येच मोडते. मग जवळच्या कोणाच्याही बागेतील दुसरी पोफळ तोडून नेली जाते. होळी उभी करण्याच्या जागी गंभीर अपघातही होतात. यावर्षीच्या होळी उत्सवात होळी उभी करतांना वैभववाडीतील ऐनारी गावात एका साठ वर्षाच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तसेच सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावात एका २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. खरे तर मोठाले वृक्ष तोडून होळी साजरी करणे ही चुकीचीच प्रथा आहे. त्यालाही काही शास्त्राधार नाही. अगदीच प्रथा-परंपरेचे पालन करायचे तर झाडाची एखादी फांदी पुरुनही होळी साजरी करता येते. वृक्ष तोडण्याची ही प्रथा केवळ सिधुदुर्ग आणि गोव्यातच आहे. अन्यत्र टाकावू कचरा, लाकडे रचून त्याची पूजा करुन ती होळी पेटविली जाते. त्यात त्या त्या वाडीतील लोक नारळ टाकून नंतर ते भाजलेले खोबरे प्रसाद म्हणून खातात. यामुळे टाकावू कच-याचीही विल्हेवाट लागते आणि होळीचाही आनंद घेता येतो.
आणखी एक गैरप्रकार म्हणजे धुळवडीच्या दिवशी रस्त्याने जाणा-या येणा-या कोणाही वाटसरुंना आणि वाहनचालकांना अडवून पैसे मागीतले जातात व नाही दिले तर रंग मारण्याची धमकीही दिली जाते. लोक नाईलाजास्तव, भिडेस्तव किवा ओळखीमुळे पैसे देतात. पोलीस खात्याने पंधरा दिवसांचा मनाई आदेश जाहीर करुनही हे घडते. कित्येकदा पोलीसांसमक्ष घडते. पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. ही वाटमारी थांबविण्याचे काम त्या गावातील, वाडीतील लोकांचे आहे. पोलीसांचे तर आहेच आहे.
हिदू धर्मातील सणांचे आचरण कसे करावे याबद्दल सातत्याने चांगले प्रबोधन करणा-या सनातन संस्थेने आदर्श होळी कशी साजरी करावी याची प्रात्यक्षिके गावोगाव दाखविली. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गोव-या, छोटी लाकडे यांची छोटीशी होळी रचायची त्याची यथासांग पूजा करुन मग ती पेटवायची. या आदर्शवत प्रथेचे अनेक गावांतून आज अनुकरण केले जात आहे. पण हिदुत्ववाद्यांकडे तुच्छतेने पाहणा-या लोकांना या चांगल्या प्रथेमागचा कार्यकारण भाव समजत नाही किवा समजून घेतलाही जात नाही. पण समाजधुरीणांनी आणि प्रामुख्याने वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी अशा चांगल्या प्रथांना प्रसिद्धी देऊन त्याबाबत योग्य प्रबोधनही केले पाहिजे. या कामी शासनाचेही काही उत्तरदायित्व आहे. पण हे सर्व कोणी करायचे?

विशेष *
शास्त्रोक्त पद्धतीने केलेला दुध व्यवसाय देतो फायद्याची हमी
शिर्षकातील वाक्ये ही कुणा तज्ञांची नसून प्रत्यक्ष अनुभव घेणा-या, कष्ट करणा-या शेतक-यांची आहेत. कुडाळ तालुक्यातील रांगणा-तुळसुली गावातील प्रगतशील शेतकरी श्री. सुधाकर गणपत सावंत यांच्याकडे पूर्वीपासून म्हशी-गुरे होतीच. पण गेल्या वर्षभरात शास्त्रीय पद्धतीने दुध व्यवसायाकडे पाहिल्याने आणि अन्य कृषीपूरक उपक्रमांची जोड दिल्याने हा व्यवसाय फायद्याचा ठरु लागला आहे.
सुधाकर सावंतांनी हरियाणा येथील मोरा जातीच्या ६ म्हशी आपल्याकडे पाळल्या आहेत. एका म्हशीची किमत आहे ७२ हजार रु. अशी सुमारे ४ लाख ३२ हजाराची मुलभूत गुंतवणूक करुन धाडसाने त्यांनी हा निर्णय घेतला. या जातीच्या म्हशी दिवसाला १० ते १२ लिटर दूध देतात. त्याप्रमाणे त्यांच्या खाद्यांनाची तरतूद करावी लागते. दिवसाला ५ किलो सरकी पेंड, १ किलो तुरभुशी, १ किलो कडबाकुटी, आठवड्यातून दोनदा राईचे तेल आणि गुळ दिला पाहिजे. ह्या गुरांना मोकळं साडून चालत नाही. डेअरीचे संकलन असेल तर प्रवासाचा खर्च वाचून शेतक-याला नफा मिळतो. सावंत कुडाळच्या शालिनी डेअरीला दुध घालतात. अंदाज येण्यासाठी १ म्हशीवरील खर्च आणि अंदाजे होणारा फायदा पाहू-
महिन्याला येणारा अंदाजे खर्च - ६००० रु.
(दिवसाला अंदाजे २०० रु.)
३५ रु. लिटरला दर मिळाल्यास होणारा नफा ३००० रु.
वाहतूक खर्त वाढल्यास २००० रु.
चांगला दर मिळण्यासाठी दुधाला ६.४ एवढा फॅट लागतो. याला जोड म्हणून गोबरगॅस, त्यापासून मिळणारे खत, दुधाचे बाय प्रॉडक्टस् तूप, श्रीखंड, घरगुती स्तरावर विकल्यास मिळणारा फायदा बोनस असतो. अर्थात हे सर्व शक्य होण्यासाठी कुटुंबियांचा सक्रीय पाठींबा आवश्यक असतो.
व्यावसायिक स्वरुप दिल्यास शेतकरी स्वतः यात लक्ष घालतो. दररोज डायरीमध्ये हिशेब लिहून ठेवयाची सवय ठेवल्यास जमा-खर्चाचा अंदाज येतो.
या व्यवसायासंदर्भात अधिक माहितीसाठी संफ- सुधाकर सावंत, मोबा. ८२७५३६४३५४.

स.सु.लि. (सहज सुचलं लिहिलं)
आपणापुढे येत आहे ती ससुली म्हणजे गुदगुली आहे. गुदगल्यांनी आपण खुदुखुदू हसतो. वाटते जणू आपण दुस-या कुणाला तरी बघून हसतोय. पण खरं म्हणजे आपणच आपणाला हसत असतो. आपणाला हे जाणवून दिलं तरी आपण म्हणणार - ‘कुणीतरी मला हे सांगायलाच हवे होते की नाही!‘
‘मधू मधू हसत रहा तू खुदूखुदू। पानोपानी दे टपली। कोणलाही नच खुपली‘ मधुकर घारपुरे हे बाळशास्त्री जांभेकरांचे अक्षरवारस. जांभेकरांचा दर्पण मधुकरांनी आम्हा वाचकांपुढे धरलाय. दर्पण म्हणजे आरसा. आपणाला आपला चेहरा दाखवतो. दर्पही घालवतो बघा. एका चित्रप्रदर्शनात एक रंभा चित्रापुढे उभी राहून फिस्कारली ‘कसले घाणेरडे चित्र येथे ठेवलेत? घालवा, घालवा ते!‘ प्रदर्शन सेवक शांतपणे म्हणाला, ‘बाईसाहेब, हे चित्र नाही, हा आरसा आहे!‘
आपणालाच आपणाकडे बघून हसायला लावणारी ही ससुली खरे तर एक सुरसुरी आहे. समोर दिसतंय त्यातली दांभिकता जाणवते. विसंगती लक्षात येते. कुटुंबिनियोजन प्रचारकाच्या घरीच चौदावा ट्यांहा येऊ पाहत असतो. आपण हसे लोकाला - चिरुट आपल्या तोंडाला. अशा वेळी माणसांच्या मर्यादांबाबत कणव बाळगून त्या मर्यादांना टपली मारण्याचा विषय करायचा, टपलीही कुरकुरीत, रुचकर, चुरचुरीत बनवायची. आपली सर्जरी कधी झाली हे कळूही द्यायचे नाही, इतके कौशल्य पशुवैद्यकाने कमवावे, हे मराठी साहित्यातले एक अप्रूप आहे. हे काय? एक पानभरच लेख? एवढयाच ओळी? असं विचारण्याचा खुळेपणा वाचकाने करायचा नाही. जे आलय ते नवीन गारुड आहे हे ध्यानी घ्यायचं. ससुलिमध्ये खट्याळपणा तर आहेच आहे. पलंगाखाली लपलेल्या नवर्‍याला ‘भाईर या‘ म्हणते ती भार्या. स्मशानात ज्येष्ठ नागरिक संघाने आगामी आकर्षण म्हणून आपल्याच काही आगाऊ सदस्यांची नांवे लावलेली असतात. दारुड्या बोले तैसा चाले म्हणून त्याची वंदावी पाऊले, किस वरचे किस्से - असा भरभरुन निरोगी वाह्यातपणा पानोपानी येत राहतो. ऐश्वर्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात येऊन मूषकाच्या कानाला ओठ लावते. मागणे मागते. मग पुढील जन्मी स. दा. धडपडेंना आपण सिद्धिविनायकापुढे मूषक म्हणून जन्माला यावे. ऐश्वर्याचे ओठ आपल्या कानाला लावून धरावेत असे वाटते.
दीर्घकालीन सरकारी कर्तव्यनिपटारा, त्यानिमित्त ऊठबस, फिरत्या, वरिष्ठांची ग्लास दोस्ती, समाज सुधारणांचा गळेकाढूपणा, कमिशन हेच मिशन, सार्वजनिक सभा संमेलने बैठकी, वक्तशीरपणा, कट्टयावर बसून एकमेकांना बाजूच्या पाण्यात बघणं, भुमिकन्या भार्या आणि भुमिगत दादला यांचे किस्से, सपशेल लोटांगणे, व्यवसायनिमित्ते पशूजीवनाची निरीक्षणं आणि गेल्या जन्मी पोलीस इन्स्पेक्टर असणारा इमानी मोत्या कुत्रा, त्याची कर्तव्यनिष्ठा हे सारे महाभारत पानकुरमुरीमध्ये रंगत राहते. या वर्तुळाचा व्यास त्या मोठया व्यासांना तरी आवरला असता का?
मधुकर घारपुरे यांच्या ठिकाणी उदंड विनोदबुद्धी आहे. कोणत्याही दबावाखाली नसणा-या माणसालाच विनोद सुचतो. पण दुःख हेच विनोदाचे मूळ आहे, असे म्हणतात. हसणे आणि आसू गाळणे या भाषापूर्व अभिव्यक्ती आहेत. त्यामागे तणावमुक्तीही आहे. म्हणूनच विनोदासंगे काही अश्रू गाळणा-याही ससुल्या येतात. अशा ससुल्यांमध्ये दर्दभरी कहाण्या आहेत. घडलेल्या घटना आहेत. आपण फक्त गांडूळ आहोत असे लेखकाला वाटते. एकदा लेखकाच्या हातातला पेढा कावळ्याने झडप घालून नेला. लेखकाला तो कावळा देवकावळा वाटला. अस आसूही ससुल्यांमधून हसू सारखे येतात. हे आसू विनोदाला माणुसकीचे अस्तर पुरवतात. अत्यंत सुसंस्कृत मनाने केलेली टवाळी, अभंग रचनेची वाट धरु लागते. ‘ज्याला काय लिहावे यापेक्षा काय लिहू नये हे कळते तो खरा लेखक.‘ असं अनंत काणेकर बजावतात.
मधुकर घारपुरेंच्या लिखाणात आत्मप्रौढी चुकूनही डोकावत नाही. उलट सूतगुंड्या घालून वापरण्याची लहानपणची चड्डी आणि हे पोस्ट बंद कर असा एका मुलीने खेकसत दिलेला इशारा वगैरे प्रामाणिक आत्मकथन घारपुरेंनी टाळलेले नाही.
मला आपलं नेहमी वाटत राहतं की, मधुकर घारपुरे हे उत्कृष्ट पशुवैद्य आहेत. म्हणूनच त्यांना माणसे चांगली जोडता येतात. माणसे बघा कशी बिलंदर, चेहरे बदलू असतात ती! मग माझ्या ध्यानात येते की पंचतंत्र घ्या, इसापनीती घ्या, पौराणिक कथा घ्या. सा-यामधून माणूस प्राण्यांच्या गोष्टी लिहीत, सांगत आला. लोकसाहित्यात कितीतरी प्राणी कथा आहेत. मधुकर घारपुरे यांना प्राणी अभ्यासातून हे पंचतंत्र, इसाप कथा मिळत गेल्या असणार.
सरळ साध्या निरागस पेशंट प्राण्यांनी मधुकर घारपुरे या डॉक्टरांना निरागस, पण चाणाक्ष बनविले असणारच. मराठी साहित्यात डॉक्टर लेखकांचा तुटवडा नाही. पण पशुवैद्यक अभ्यासून मग मराठी कथा, कादंबरी लेखन होईल तर कपिला गाईच्या डोळ्यातील खोल शांत डोह मराठी साहित्यात उतरेल असे वाटते.
ससुलिमध्ये एक लेख शीर्षक घेऊन येतो ‘समोरच्यांच काही खरं नसतं.‘ तरुणापुढं बाईक आणि पेन्शनरांपुढे माईक आला की समोरच्यांचं काही खर नसतं. माझी ही प्रस्तावना वाचून घारपुरे नवीन ससुलि लिहिणार!
‘तरुणांपुढं धावणं आणि पेन्शनर लेखकांपुढं लिहिणं ठेवलं की कुणाचच काही खर नसतं.‘
लेखक- डॉ. मधुकर घारपुरे, ९४२२३८१७८०
प्रकाशक - किरात ट्रस्ट, वेंगुर्ले
वितरक- सिधुकिरण, सावंतवाडी, ९४२०६५६१४६
मूल्य - १२० रु.

विशेष बातम्या *

वेंगुर्ले पंचायत समितीवर राष्ट्रवादीची मोहर
सभापती- अभिषेक चमणकर, उपसभापती- सुनिल मोरजकर
वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी - काँग्रेस अशी लढत झाली. १४ मार्च रोजी दु. ३ पर्यंत कोणाही अर्ज मागे न घेतल्याने सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अभिषेक चमणकर विरुद्ध कांग्रेसच्या सौ. चित्रा कनयाळकर, उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे सुनिल मोरजकर विरुद्ध काँग्रेसचे पुरुषोत्तम परब अशा लढती झाल्या. हात वर करुन मतदान करायचे असल्याने ६ मते राष्ट्रवादीला तर तीन मते काँग्रेसला पडली. अपक्ष उमेदवार स्वप्नील चमणकर हे गैरहजर राहीले. निवडणुक अधिकारी म्हणून जे. डी. नांदगावकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, शहराध्यक्ष सचिन वालावलकर, माजी आमदार शंकर कांबळी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी अभिनंदन केले.

भगिरथ प्रतिष्ठानला आनंदमयी पुरस्कार

पुणे येथील मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे समाजसेवेसाठी देण्यात येणारा ‘आनंदमयी‘ पुरस्कार यावर्षी कुडाळ तालुक्यातील झाराप येथील भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. १ लाख, १ हजार रु. रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सायन - मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात २ एप्रिल रोजी सायंकाही ६ वा. होणा-या सोहळ्यात हा पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण विकास प्रक्रिया पुढे नेतांना सर्वसामान्य माणूस केंद्रभूत ठेऊन ‘भगिरथ‘ने काम करण्यास सुरुवात केली. सर्वसमावेशक विचारातून जी प्रक्रिया गतिमान होईल, तीच अधिक अर्थपूर्ण असेल, हा विचार घेऊन ग्रामीण भागातील विकासाचा कणा असलेल्या सर्वसामान्य माणसाला उभा करण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. यासाठी भगिरथचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी बायोगॅस, निर्धूर चूल, शोषखड्डे यासारख्या उपक्रमांना प्रथम प्राधान्य दिले. कुक्कुट व शेळी पालन यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणे, महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेऊन महिला सक्षमीकरणासाठी योगदान तसेच गरजूंना शैक्षणिक व सामाजिक मदत करणे, यात संस्थेचा नेहमीच पुढाकार असतो. बायोगॅससाठी संस्थेचा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी गवंडी प्रशिक्षण संस्थेने दिले आहे. झाराप येथील संस्थेच्या कार्यालयात इंटरनेट सुविधा सुरु करण्यात आली आहे. वाचनालयही सुरु आहे. सूर्यफूल, भाजीपाला, हळद लागवड यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करुन अर्थसाह्य करणे, यासारखे उपक्रम राबविले जातात. एका गावात तीन वर्षे काम करुन एक मार्गदर्शक संस्था म्हणून काम करणे, बेरोजगारांना तसेच महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने झाराप येथे स्वतःची इमारत बांधून तेथे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. बेरोजगारांना बँकांचे आर्थिक साह्य मिळवून देण्यासाठीही ही संस्था कार्यरत असते.

शिरोड्यातील मिठागरांचे भवितव्य धोक्यात
व्यवसायातील अनिश्चितता आणि घ्यावे लागणारे प्रचंड कष्ट यामुळे येथील मीठ व्यवसायात नवी पिढी येण्यास फारशी उत्सुक नाही. यामुळे शिरोडा येथील मिठागरांचे भवितव्य कठीण आहे. शिरोडा -रेडी मार्गावरील गांधीनगर भागातील मिठागारामध्ये मीठ तयार होण्यास प्रारंभ झाला. पण व्यवसाय जिकीरीचा आणि उन्हातान्हातील असल्याने तरुण पिढीला यात स्वारस्य दिसत नाही. समुद्राच्या खा-या पाण्यापासून मीठ तयार करण्याचा हा व्यवसाय स्वातंत्रपूर्व काळापासून शिरोड्यात चालू आहे. १९३० मध्ये देश पातळीवर मीठ सत्याग्रह शिरोड्याच्या भूमीत झाला होता. आता मात्र दिवसेंदिवस मीठ उत्पादन क्षेत्र घटत चालले आहे. जागतिक मीठ उत्पादनाचा विचार करता भारताचा चीन, अमेरिकेखालोखाल तिसरा क्रमांक लागतो. देशात गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा राज्यात समुद्राच्या पाण्यापासून मीठ पिकविले जाते. देशात दरवर्षी सुमारे १७ लाख ४७ हजार मेट्रिक टन मीठ तयार केले जाते. याचा देशात वापर होऊनही ८२ देशांत मीठ निर्यात केले जाते. खा-या पाण्यापासून मीठ पिकविण्याबरोबरच हिमाचल प्रदेशासह काही भागात रॉक सॉल्टचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन वर्षाकाठी सुमारे दोन हजार तीनशे टन एवढे आहे. रॉक सॉल्टची निर्यात केली जाते.
सिधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव आदी भागात उत्पादन व्हायचे. आज तेथील मिठागरे बंद पडली आहेत. शिरोडा या एकमेव गावात सध्या मीठ बनविले जाते. गांधीनगर भागातील सुमारे ८७ एकर क्षेत्रात मीठ तयार होते. या भागात देवी माऊली देवस्थान, गणेशप्रसाद, भास्कर, नारायण प्रसाद, मोरो भीमाजी, सकबा सबनीस अशी सहा खाजगी मिठागरे आहे. नवारदेसाई, दादासाहेब, जुनादेसाई, दुर्गाबाई, सातोराम, विठोजी रामाचा, वडाचा मिठागर (ज्या ठिकाणी १९३० मध्ये मीठ सत्याग्रह झाला होता.) असे पाच केंद्र सरकारच्या मालकीचे मिठागर मिळून एकूण अकरा मिठागरांमध्ये मीठ बनविले जाते. मीठ तयार होण्यास फेब्रुवारी मध्यापासून सुरुवात होते. या हंगामात मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी सुमारे अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. या मिठागरांमधून पांढरे व काळे मीठ असे दोन प्रकारचे मीठ तयार केले जाते. काळे मीठ हे प्रामुख्याने आंबा कलमे, नारळीच्या झाडांना खतासाठी वापरले जाते.
सध्या मिठागरातील कामगार हे जुन्या पिढीतील आहेत. नवीन पिढीतील युवकांना या उन्हातान्हात राबण्यात स्वारस्य नसल्याने या व्यवसायाच्या भवितव्याबद्दलची काळजी व्यक्त केले जात आहे.

परबवाडा शाळा नूतन इमारत उद्घाटन समारंभ
शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वेंगुर्ल्यातील परबवाडा शाळा नं. १ च्या नवीन बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन ११ मार्च रोजी वेंगुर्ला पं. स.सभापती जगन्नाथ डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी व्ही. एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी, शिक्षणविस्तार अधिकारी एस.जी.गोडे, केंद्रप्रमुख व्हि.एम.पेडणेकर, परबवाडा सरपंच सौ. इनासिन फर्नांडीस, सौ. सारिका काळसेकर आदी उपस्थित होते.
शाळेच्या नवीन विज्ञान कक्षाचे उद्घाटन जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती दादा कुबल, संगणक कक्षाचे उद्घाटन गोविद परब व लोकसहभागातून शाळेच्या इमारतीच्यावर बांधलेल्या नवीन सभागृहाचे उद्घाटन शाळेचे आधारस्तंभ लक्ष्मीकांत परब, यांच्या हस्ते झाले. तसेच शिक्षणोत्सव उद्घाटन उद्योगपती दादासाहेब परुळकर यांनी केले.
१९२२ साली स्थापन झालेल्या शाळेने गेल्या ९० वर्षात केलेली नेत्रदिपक प्रगतीचा आढावा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविद्र परब यांनी प्रास्ताविकात केले. शाळेच्या शिक्षण व क्रिडा क्षेत्रातील प्रगतीची माहिती शिक्षक संजय परब यांनी दिली. यापूर्वी शाळेतून निवृत्त झालेल्या व हयात असलेल्या सर्व माजी मुख्याध्यापकांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन तसेच २५ वर्षे परबवाड्यातील दोन पिढ्यांना विद्यादान करणा-या श्रीमती मंगला घनःश्याम खामकर बाईंचाही सत्कार, शाळेच्या भरभराटीच्या काळात विशेष योगदान देणारे सत्यवान पेडणेकर, झिलू घाडी, रेश्मा पिगुळकर व सहका-यांचा सत्कार, शाळेसाठी विना मोबदला जमिन देणारे सर्व जमिन मालकांचाही सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देऊन शिक्षक व ग्रामस्थ करीत असलेल्या आय.एस.ओ.मानांकनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नविन बांधण्यात आलेल्या सभागृहासाठी ३ लाख रु. खर्च झालेला असून २ लाख ५० हजार रुपयांची अपेक्षा आहे. त्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमानंतर एल.सी.डी. प्रोजेक्टवर रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. सामनाचे पत्रकार संजय परब यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी मानले.

वेंगुर्ल्यात रंगली ‘धमाल नात्याची-कमाल जोडीची‘
वेंगुर्ले न.प.च्या महिला बालकल्याण, स्वास्थ्य समिती सभापती डॉ. पूजा कर्पे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या सांस्कृतिक भवनात ‘धमाल नात्याची - कमाल जोडीची‘ ही आगळी - वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष नम्रता कुबल यांच्या हस्ते झाले. यावेळी वालावलकर बिझनेस सेंटरच्या सौ.समिक्षा वालावलकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - नणंद - भावजय - १) मोना नाईक व आलिशा शेख, २) शोभा कौलगेकर व दिना गावडे, ३) वनिता सातार्डेकर व मृणाली कौलगेकर, उत्ते. - रिया केरकर व रुचिरा तिरोडकर, जाऊ-जाऊ -लुसी डिसोजा व रुबीना डिसोजा. प्रथम तीन विजेत्यांना साड्या तर उत्तेजनार्थ क्रमांकाना गृहप्रयोगी वस्तू देण्यात आल्या. उपस्थित महिलांसाठी ठेवलेल्या लकी ड्राॅ योजनेत सुवर्णा नार्वेकर, सुनिता सावंत, स्वाती गावडे, नीला यरनाळकर, सुप्रिया विरनोडकर, अक्षता मयेकर, निशा केळजी, सुवर्णा शिरोडकर, गीता शिरसाठ, उज्ज्वला जाधव अशा दहा जणांची चिठ्ठयांद्वारे निवड करण्यात येऊन त्यांना सचिन वालावलकर पुरस्कृत साड्यांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे परिक्षण सुनिता सावंत व चित्रा खानोलकर यांनी केले. बक्षिस वितरण नगराध्यक्ष नम्रता कुबल, नगरसेविका अन्नपूर्णा नार्वेकर, फिलोमिना कार्डोज, सुलोचना तांडेल, पद्मिनी सावंत, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, जि.प.सदस्या सुकन्या नरसुले, लायनेसच्या नीला यरनाळकर, हेमा गावसकर यांच्या हस्ते झालो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पालिकेच्या लेखापाल संगीता कुबल, महिला बालकल्याण विभाग लिपिक निशा आळवे, मनोहर जाधव, गणपत जाधव व चतुर्थ श्रेणी महिला कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment