Tuesday 13 September, 2011

अंक ३३वा, ८ सप्टेंबर २०११

अधोरेखीत *
कोकणात अॅडव्हेंचर टुरिझम
नॅशनल हायवे अथॉरिटी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांचे सार्वजनिक बांधकाम खाते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संयुक्त सहभागाने कोकणात ‘अॅडव्हेंचर व्हेईकल टुरिझम‘ ची सोय निर्माण झाली आहे.
आतापर्यंत अॅडव्हेंचर टुरिझम म्हणजेच साहसी पर्यटन. हे पर्यटकांना समुद्रातील स्पीड बोटीच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होत चित्तथरारक सैर करणे, उंच डोंगरद-यांतून पॅराग्लायडींग, दोन द-यांमधले व्हॅली क्रॉसिग,साहसी गिर्यारोहण इ. पर्यंतच मर्यादित होते. कोकणातील रस्त्यांवरचा प्रवास हे देखील एक साहसी पर्यटन ठरु शकते हे
आजपर्यंत कोणी लक्षातच घेतले नव्हते!
परंतु सरकारनेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता या साहसी पर्यटनाचा पर्याय पर्यटकच नव्हे तर तमाम कोकणवासियांना दिला आहे. थेट पनवेल ते गोवा हद्दीपर्यंत सुमारे ३५० कि.मी.चे हे व्यापक पर्यटन क्षेत्र समस्त प्रवास करणा-या लोकांना निःशुल्क खुले करुन दिले आहे.
सर्वसाधारण रस्ते हे वाहनांद्वारे वाहतुक सुखकर व्हावी यासाठी असतात. तसे कोकणातील रस्ते एकेकाळी होते सुद्धा.
नैसर्गिक वळणा-वळणांचे बारीक रस्ते, ज्याला सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१७ असे नाव दिले आहे. हा रस्ता सुद्धा प्रत्यक्षात वळणांचा, चढ-उतारांचा आणि राज्यमार्गाएवढाच रुंदीचा आहे. आता तर तो खड्डयांमुळे धोकादायक बनलेला आहे. अशा धोकादायक रस्त्याने वेगाने प्रवास करणे हेच ‘अॅडव्हेंचर टुरिझम‘!
विशेषतः प्रगत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये दुचाकी वाहनांनी डोंगर उतारावरुन, खड्डयांतून, पाण्यातून वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा असते. त्यासाठी मोठा खर्च करुन विशिष्ट पद्धतीच्या अडथळ्यांच्या ट्रॅकची रचना केली जाते. त्यावरुन वेगाने वाहन चालविणे हा एक चित्तथरारक खेळ असतो. त्यासाठी मोठमोठी बक्षिसेही असतात.
आपल्याकडे कोकणात मात्र सरकारला कोणताही खर्च करावा न लागता बनलेले महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्ते आपोआपच धोकादायक बनलेले आहेत. त्याचा लाभ साहसी पर्यटन करणा-यांनी तसेच विदेशातल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षिसे मिळवायची आहेत अशा ‘बाईकर्सना‘ घेता येईल. या रस्त्यांवरुन वेगाने प्रवास करु शकणारे निश्चितच विदेशात मोठमोठी बक्षिसे मिळवतील.
पुरस्कारासाठी चुरस
महामार्गाची निगा राखण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, सरकारी बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग या सरकारी यंत्रणा सज्ज असतात. संबंधित खात्यांचे मंत्री, निविदा काढणारे, मंजूर करणारे अधिकारी, पदाधिकारी हे या संस्थांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून असतात. सन २००६ नंतर या मार्गाच्या सुधारणेसाठी कोणताही निधी नसतांना देखील सर्व खात्यांनी समन्वय साधून साहसी पर्यटनाचा ठेवा कोकणवासीयांना दिल्याबद्दल सर्व स्तरातून संबंधीत मंत्री, खात्यांचे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध स्वयंसेवी संस्थांनी तीनही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला संबंधित खात्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
श्रीधर मराठे

संपादकीय *
प्रवाशांना खंडणी आणि प्रवाशांनाच धक्के
मुंबईसारख्या महानगरांमधून छोटे-मोठे व्यावसायीक, बिल्डर, व्यापारी यांच्याकडून गँगस्टार - दादा लोक त्या त्या व्यावसायीकाच्या मगदुराप्रमाणे खंडणी म्हणून (त्याला ‘सिक्युरिटी - मनी‘ म्हटले जाते) दर आठवड्याला किवा दर महिन्याला एक ठराविक रक्कम घेतात. त्या बदल्यात त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ‘संरक्षण‘ देतात. गँगस्टारच्या नेत्यांनी आपापसात ‘एरिया ठरवून घेतलेला असल्याने दुस-या टोळीचा कोणी त्या व्यावसायीकाकडून कधी पैसे घेत नाही किवा काही त्रासही देऊ शकत नाही. उद्योग, व्यवसाय, धंद्यांना खरेतर सरकारचे म्हणजे पोलिसांचे संरक्षण असते, असले पाहिजे. पण तरीही असे बेकायदेशीर खाजगी धंदे चालतात. लोकही त्यांना पैसे देतात. कित्येकदा आपापसातील भांडणतंटे मिटविण्यासाठी या गँगस्टारांचीच मदत घेतात. धंदा बेकायदेशीर असला तरी त्यात प्रामाणिकपणा असतो. पोलिसांपेक्षा या ‘दादा‘ लोकांचीच लोकांना दहशत असते आणि शिस्तही असते. त्यामुळे पोलिसही सर्वसामान्यांना संरक्षण देणे, त्यांचे भांडण-तंटे मिटविणे, गुन्हेगारांना पकडणे ही सरकारचा पगार घेऊन करावयाची नित्याची कामे फारशी करीत नाहीत. अशी पोलिस खात्याशी या ना त्या प्रकारे संबंध येणा-या लोकांची तक्रार असते. पण निदान खंडणी बहाद्दर आणि पोलिस पैसे घेऊन सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशी कामे तरी करीत नाहीत.
परंतु आपले बांधकाम खाते, त्यांनी नेमलेले कंत्राटदार हे बहुधा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधलेले असतात. हे प्रामुख्याने रस्त्यांची, सरकारी इमारतीची निर्मिती आणि देखभाल करतात. तेच या खात्याचे मुख्य काम असते. पण सध्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण रस्त्यांची झालेली व होत असलेली दुर्दशा पाहिली की हे खाते अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा.
बांधकाम खात्याने केलेल्या रस्त्यांबद्दल रोजच्या रोज वृत्तपत्रांतून रस्ते कसे खड्डेमय झाले आहेत ते दिसत असते. त्यावर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखी उपाय योजना केली जाते. पण काही महिन्यांतच रस्ते पुन्हा उखडतात. याच रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी, मंत्री प्रवास करीत असतात. पण कोणीच याकडे लक्ष देत नाहीत.
हा निगरगट्टपणा आला कोठून? कंत्राटदाराकडून मिळणा-या पैशातून, साहित्य खरेदीतून, एखाद्या कामाची निविदा प्रसिद्ध होते. अनेक कंत्राटदार ती भरतात. कोणाची कमी किवा कोणाची जास्त दराची असते. त्यांच्याशी व्यक्तिशः ‘डिलिग‘ होते. निविदा मंजूर करणे, ते काम पूर्ण झाल्यावर त्याचे पैसे कंत्राटदाराला देणे या सगळ्या टप्प्यावर संबंधीत अधिकारी पैसे घेत असतात. या टक्केवारीच्या वाट्यात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही कित्येकदा सामील असतात. त्यामुळे टक्केवारी ५०-५० ची आता ६०-४० वर पोचली आहे. (६० वाटण्यासाठी आणि ४० कंत्राटदारासाठी) यातून कंत्राटदार शंभर टक्के काम कसे पुरे करणार? मग त्याच्याकडून निकृष्ट साहित्य तेही कमी प्रमाणात वापरणे, रस्त्याच्या रुंदीकरणातला काही भाग न करणे या अशा अनेक मार्गांनी आपले होणारे नुकसान भरुन काढीत असतो.
आता कंत्राटदार हा अधिका-यांचे वरकमाईचे साधन असल्याने त्याला तर टिकवला पाहिजे म्हणून न केलेल्या कामाचीच वाढीव अंदाजपत्रके करणे, खरेदीच्या कामात गैरव्यवहार करणे, क्वालिटी कंट्रोलवाल्यांना भागविणे, कंत्राटदाराला टेंडरशिवाय केली जाणारी इतर छोटी कामे देणे. अशाप्रकारे त्याची नुकसान भरपाई करुन दिली जात असते.
विषय आला रस्त्यातील खड्यांवरुन.... लोक वाहनांतून प्रवास करीत असतात. त्याकरिता सरकारला रोड टॅक्स व अन्य कर भरीत असतात. आता तर चौपदरी, सहापदरी, मोठे सरळ आरामदायी प्रवास देणारे रस्ते निर्माण होऊ लागले आहेत. त्यांचा पैसा रस्ता बांधकाम करणा-या कंपनीला सरकार देत नाही तर त्या कंपनीने त्या रस्त्याने जाण्यायेण्यासाठी पथकर (टोल) आकारणी करुन प्रत्येक वाहनाकडून तो वसूल करायचा असतो. हेही सगळे मूळ अंदाजपत्रकात नमूद असते. या ‘टोल‘द्वारे आणि पुढील दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्ती करण्याएवढे पैसे जमा झाले तरीही टोल सुरुच असतो. या सर्वच रस्त्यांवर मोठा भ्रष्टाचार होत असतो. रस्त्याची देखभाल, दुरुस्तीही नीट होत नाही. त्यात काही वर्षातच खड्डे पडू लागतात. मग अपघात ठरलेले.
म्हणजे या द्रुतगती मार्गामुळे पूर्वीचा मोफत प्रवास करु देणारा रस्ता बंद, लोकांनी भरमसाठ टोल भरुन या नव्या मार्गानेच प्रवास करायचा. खड्डे पडले आणि त्यामुळे अपघात घडले तरी जबाबदारी प्रवाशांचीच. असा धक्कामय प्रवास लोकांच्या वाट्याला आला आहे. द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचेल हे धोरण होते. तेच मातीमोल झाले आहे. यासाठी सत्ताधा-यांनाच धक्का देणे आवश्यक आहे. पण एक पक्ष गेला तरी दुसरा पक्ष तेच करणार आहे. लोक मात्र धक्के खात राहणार आहेत.
सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी खड्डेमय रस्त्यांची दखल घेतली असल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन दिसते. त्यासाठी खड्डयात वृक्षारोपण, (पावसामुळे रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करता येत नाही ही सध्या अडचण) संबंधीत अधिका-यांना घेराव असे प्रकार सुरु आहेत. त्यावर खात्याकडून भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. ते अर्थातच वाया जाते. मग तेच काम पुन्हा केले जाते. या कामांसाठी निधीच नाही अशी खात्याची तक्रार असते. मग मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भरपूर निधी मिळतो. तोपर्यंत पाऊस संपतो. आता पावसानंतर लगेच निवडणुकांचा पाऊस सुरु होईल. त्यामुळे खड्डयांकडे पहायला कोणालाच वेळ नसणार. कंत्राटदार खड्डे बुजविण्याची कामे करीतच असणार. त्याकडेही कोणाचे लक्ष नसणार. मग पुढच्या पावसात खड्डयांमुळे ओरड करण्याचे काम कार्यकर्त्यांना आहेच.

विशेष *
गणेशोत्सवातून पर्यटन
गणेशोत्सव हा आपल्या कोकणातील लोकांसाठी सर्वात मोठा सण. लहानग्यांसाठी तर पर्वणीच. छोट्या मुलांच्या नजरेतून पहाल तर गणपती बाप्पा म्हणजे त्यांचा सर्वात आवडता. कारण या दिवसात शाळेला सुट्टी, खाण्यापिण्याची, खेळण्याची चंगळ, फटाके वाजविण्याचा आनंद. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला मर्यादाच नाहीत.
मोठ्या माणसांचं म्हणाल तर प्रत्येकाच्या तोंडी असंच ऐकायला येईल की, ‘‘आज-काल काही दम नाही ह्या उत्सवात. पण आमच्या लहानपणीचा गणेशोत्सव म्हणजे काही विचारुच नका.‘‘ असं कितीही ऐकावं तरी त्यांचा उत्साह हा तेवढाच दांडगा, कारण घरात गणपती येणार म्हणजे सर्व तयारीही त्यांनाच करावी लागणार ना!
हे सर्व झालं प्रत्येकाच्या घरातील गणेशोत्सवाबद्दल. पण त्याही पलिकडे ‘सार्वजनिक गणेशोत्सव‘ हा एक वेगळाच विषय आहे. वेगवेगळे देखावे-डेकोरेशन्स करण्यात त्यांना दिवस -रात्र पुरे पडत नाहीत. त्यांच्या उत्साहाची तुलना कशालाच नाही. लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्याचे जिवंत उदाहरण आपल्याला पाहता येते ते म्हणजे लोकसहभाग - लोकांना एकत्र आणणे, त्यातून प्रबोधन वगैरे - वगैरे.
पण, खरच आता गणेशोत्सवाचे ते रुप राहिलं आहे का? कारण आधीचा सार्वजनिक गणपती आता नाक्या-नाक्यावर, गल्ली-गल्लीत, पक्षा-पक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे होतं काय? की सामान्य माणसाची प्रत्येक गणपती मंडळाची वर्गणी देऊन-देऊन पुरती वाट लागते आणि त्यातून त्याचा परत घरातील गणपती आहेच. याचा अर्थ मी असं बिलकूल म्हणत नाही की अशी अनेक गणेशोत्सव मंडळे असू नयेत. पण जशा गल्ली-बोळात आणि वाडीवार क्रिकेट टिम तयार होतात तशी गणेश मंडळे असू नयेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा अर्थ सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करायचा असा जर असेल तर प्रत्येक नाक्यावर गणेशोत्सव करणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा वेगळा असा गणपती पुजणे असा होतो. मग त्याला सार्वजनिक गणेशोत्सव कसे म्हणता येईल?
बरं... आता तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडूनही (सार्वजनिक) गणेशोत्सव केला जातो आणि डेकोरेशनच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या पक्षाचे झेंडे, बॅनर लागतात. हे कितपत योग्य आहे? म्हणजे कमीत कमी देवाकडे तरी पक्ष, राजकारण आणू नये ही त्या सर्वांना विनंतीच करावी लागेल. कारण काय होतं, मंडळाच्या बाहेर पक्षाचे झेंडे/फलक दिसले की सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येतो की गणेशाच्या दर्शनाला जावे की नको, कारण मी इकडे जर गेलो तर दुसरे पक्षवाले आपल्यावर राग धरतील, म्हणजे गणपतीच्या दर्शनाला देखील खुल्या मनाने जाता येऊ नये, तर कसला उत्सव आणि कसले काय?
आपल्या कोकणवासीयांच्या सुदैवाने ही परिस्थिती आपल्या सिधुदुर्गात अजून आलेली नाही. मुंबई-पुणे-ठाणे इथपर्यंतच आहे. पण यासाठी आपणास खूष होऊन भागणार नाही. कारण ही परिस्थिती आपल्याकडे येण्यास फार काळ लागणार नाही. त्यासाठी आपण आतापासूनच सजग आणि जागृत होणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव हा आपला सर्वात मोठा उत्सव. याचा उपयोग आपण पर्यटन विकासासाठी करु शकतो, किवा यातून काही रोजगार निर्मिती होऊ शकते. पाश्चिमात्य देशात त्यांच्या उत्सवांचा पर्यटनासाठी उपयोग केला जातो. तसाच आपल्या गणेशोत्सवाचा वेगळ्या धाटणीने उपयोग करुन घेता येईल. कारण पर्यटन-पर्यटन म्हणजे नुसते समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळे दाखविणे, हॉटेल्स बांधून त्यांत पंजाबी आणि चायनिज पदार्थ ठेवणे हे नव्हे, तर अशा आपल्याकडील सणांचा पर्यटनासाठी उपयोग करुन त्यातून अर्थकारण वाढविणे हे आपण नक्कीच साध्य करु शकतो.
हे जरुर मान्य की, लगेचच अशा गोष्टी होणे शक्य नाही. पण आज जर आपण अशा गोष्टींची सुरुवात केली तर येत्या काही वर्षात आपण नक्कीच ही गोष्ट साध्य करु शकतो. पण त्यासाठी सुरुवात ही आजपासूनच झाली पाहिजे.
-जितेंद्र वजराटकर, ९८६००५२३८३

विशेष बातम्या *
वेंगुर्ले येथे गणेश मूर्तीमागील भित कोसळली
बॅ.खर्डेकर मार्गावरील एव्हरीमन बेकरीसमोर असलेल्या लीलाधर केनवडेकर बंधु-भगिनींच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरात लीलाधर, त्यांची पत्नी शामला, बहीण किरण चिपळूणकर व पुतणी सुनयना चिपळूकर हे राहतात. सतत पडणा-या पावसामुळे गणेश मूर्तीमागील भित पूर्णतः कोसळली. तलाठी मिनीन फर्नांडीस, बांधकाम निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.

ओहोळात वाहून गेल्याने कुडपकर भगिनींचा मृत्यू
गणपतीनिमित्त्त वाजविलेल्या फटाक्यांचा कचरा गोळा करुन तो घरालगतच्या ओहोळात टाकण्यासाठी गेलेल्या भटवाडी येथील वैदेही संतोष कुडपकर (वय ६) व चिन्मयी संतोष कुडपकर (वय ४) या सख्ख्या बहिणी ३ सप्टेंबर रोजी ओहोळात आलेल्या पुरात वाहून गेल्या. चिन्मयीचा मृतदेह घरापासून ३ कि.मी. अंतरावर तर वैदेहीचा ६ कि.मी. नवाबाग येथे सापडला.
वैदेही व चिन्मयीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे त्या दोघी व तिची आई, दोन वर्षाचा भाऊ आजोबांसमवेत वेंगुर्ले-भटवाडी येथे राहत होते. कुडपकर भगिनींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment