Tuesday, 13 September, 2011

संपादकीय
हे गणाराया,
तुमच्या येण्याने आणि दीड ते दहा दिवसाच्या वास्तव्याने मिळणारा आनंद आम्ही वर्षभर पुरवून घेत असतो. या आनंदाला गालबोट लावण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरु असते. पण त्या सर्वांवर मात करुन तुमचे भक्तगण आपापल्या कुवतीनुसार तुमचे आगत-स्वागत करतात. यथासांग पूजा-अर्चा करतात. हे घरोघर चालते.
हे गणराया, तुमच्या उत्सवाला एक सार्वजनिक स्वरुपही असते आणि ते प्रतिवर्षी वाढतच चालले आहे. सर्वसामान्य लोकांना सध्याच्या वाढत्या महामागाईचे कितीही चटके बसोत, ते तुमच्या आदरातिथ्यात काही कमी पडू देत नाहीत. प्रसंगी उसनवारी करतील, कर्जही काढतील. सार्वजनिक उत्सवात मात्र पैशांची कधीच कमतरता पडत नाही. परिसरातील लोकांकडून जवळपास सक्तीची उत्सव वर्गणी आणि मोठमोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्वाच्या नावाखाली भरपूर देणग्या मिळविल्या जातात. यात आता राजकीय पक्षही मागे नाहीत. या सर्व प्रकारांतून भरपूर पैसे जमा करणे, त्यातले काही समाजहिताच्या कामांसाठी जुजबी खर्च करणे, उत्सवात अनावश्यक वारेमाप खर्च करणे या सर्व दिखावू कार्यक्रमात सर्वजण मग्न असतात.
हे गणाराया, हिदूंच्या बहुतेक सर्व सण-उत्सवात आजकाल हेच थोड्याफार फरकाने चालले आहे. नुकतीच गोकुळाष्टमी पार पडली. त्यात दहिहंडीला अतोनात महत्व आहे. उंच दहिहंडी बांधण्याची आणि मोठमोठी बक्षिसे लावण्याची स्पर्धा आली. त्यासाठी व्यावसायीक स्वरुपाची मंडळे स्थापन झाली. हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्या नावाने चालते. पण त्या श्रीकृष्णांची खरी शिकवण सर्वचजण विसरलेले आहेत. तसाच नवरात्र उत्सव हाही आता प्रचंड पैशांचा खेळ बनला आहे.
हे गणराया, आजच्या मार्केटिगच्या युगात सण - उत्सवांमध्ये नाविन्य येणे, पैशांची उधळपट्टी होणे हे आता अपरिहार्यच झाले आहे. त्याला आता पर्यटनाची जोड दिली जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरातून तुमचा उत्सव गणेशोत्सव न राहता गणेश ‘फेस्टिव्हल‘ झाला आहे.
हे गणराया, तुमचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांचा उद्देश त्याकाळी स्वातंत्र्य लढ्याकरिता जनमत जागृत करणे हा होता. त्यामधून लोकांच्या सामाजिक प्रबोधनाचेही उपक्रम होत. स्वातंत्र्यानंतरही अशा सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन करणा-या व्याख्यानमाला, उत्तमोत्तम संगीताचे, लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. या उत्सवांचे आयोजन करणारी तरुण मंडळी निरनिराळ्या सामाजिक संस्थांमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करु लागली. बरेचसे राजकीय नेते अशाच प्रकारे तयार झाले.
हे गणराया, आज त्यातले काय उरले आहे? आदर्श गणेशोत्सव कसा झाला पाहिजे, याविषयी आधी काही दिवस वृत्तपत्रांतून लेख, वाचकांची पत्रे प्रसिद्ध होतात. पण त्यातले विचार कोणीच आचरणात आणत नाहीत. श्रद्धेने किवा नवस फेडण्यासाठी भाविक भक्त देणग्या देतात. काही उत्स्फूर्त देणग्या देतात. त्याहीपेक्षा भ्रष्टाचारातून, खंडणीतून मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणावर या उत्सावांसाठी खर्च होत असतो. गैर मार्गाने मिळविलेल्या पैशातून देणगी देणारा आपले पाप क्षालन झाल्याचे समाधान मानून घेत असतो. यामुळेच आपल्याकडची काही देवस्थाने अतिश्रीमंत झाली आहेत. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातून हा सगळा भ्रष्टाचार कसा थांबणार आहे? असो. तो आजचा विषय नव्हे.
हे गणराया, तुम्ही सर्वसामान्यांचे दैवत. एखाद्या आदीवासी - कातकारी पाड्यावरील झोपडीत तुमची स्थापना होते तशीच एखाद्या बड्या श्रीमंतांच्या हवेलीतही होते. भक्तिभाव तोच. किबहूना गरीब, सामान्यजनांचा अधिकच मनापासूनचा असतो. तुमच्यापाशीही आप - परभाव नसतो. याचे प्रत्यंतर आम्ही सारे घरोघरच्या उत्स्फूर्त उत्साहपूर्ण गणेशोत्सवातून घेत असतो. विभक्त झाले तरी तुमच्या उत्सवाला मुख्य घरी एकत्र येऊन सर्वजण तो एकोप्याने साजरा करतात, मुंबईकर चारकमान्यांचे प्रवासाच्या हालअपेष्टा सोसूनही चार-दोन दिवसांसाठी घरी-गावी येणे होते. मग घरी मूर्ती आणण्यापासून ती पूजेची लगबग, मिष्टान्नाचे भोजन, आरत्या, बायकांच्या फुगड्या, रात्र रात्र चालणारी भजने, मूर्ती विसर्जनावेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या‘ म्हणून केलेली आर्जवे. हे सर्व घरच्या गणपती उत्सवात अनुभवायला मिळते. म्हणूनच ही परंपरा, हा उत्साह तुमच्या सणामुळे अव्याहत चालू रहावा हेच मागणे गणराया!

कोकणातील जागृत गणपती दर्शन
रेडीचा गणपती
शिरोड्यानजिक ‘रेडी‘ येथे गणपतीचे जागृत देवस्थान आहे. असंख्य भाविकांची वर्दळ तेथे सतत सुरु असते. रेडी येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभुज गणेशमूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृष्य दिसते. ज्या उंचवट्यावरुन हे दृष्य न्याहाळत आपण उभे असतो, तेथे खाली व बाजूस समुद्राचे व्यापक दर्शन घडते. सांजवेळेला दूरवर उभी असलेली प्रचंड देशी विदेशी जहाजे, मासेमारी करुन परतणारे लहानमोठे पडाव, अस्तास जाणार्‍या सूर्याची निळाई व मंदमंद होत जाणारी किरणे वातावरणातील कातरता व गहिरे रंग या सार्‍या अनुभवाच्या गोष्टी आहेत. द्विभूज गणेश अशी ख्याती पसरल्याने प्रत्येक संकष्टीला गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून असंख्य भक्तमंडळी येत असतात. भाविक आणि स्थानिक मंडळींच्या पुढाकाराने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. प्रवासमार्ग- वेंगुर्ले, सावंतवाडी येथून बसची सुविधा आहे. शेवटच्या थांब्यापासून १ कि.मी.वर मंदिर आहे. स्वतःचे वाहन असल्यास जवळपासची अन्य भव्य मंदिरेही बघता येतील. रेडी गाव गोवा हद्दीलगतच असल्याने विदेशी पर्यटकांचीही येथे वर्दळ असते.
आपट्यांचा गणपती
भटवाडी-आजगाव, ता. सावंतवाडी
गोपाळ गणेश आपटे यांना ही श्रीमूर्ती घरामागे खोदकाम करताना सापडली. १९८४-८५ ला मंदिराचा जीर्णोद्धार झाला. काळ्या पाषाणाच्या चतुर्भूज मूर्तीला तैलरंग चढविण्यात आला आहे. ही बालमूर्ती असावी असे वाटते. मंदिर कोकणातल्या पद्धतीप्रमाणे कौलारु आहे. १० न् १५ गर्भगृह असून मंदिराला सभामंडप आहे. मंदिरात गोकुळाष्टमी, दिवाळी सामुदायीकरित्या साजरी केली जाते. अंगारकी, भाद्रपद चतुर्थी या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येतात. गावात मोजकीच घरे आहेत. मंदिरावर लक्ष ठेवण्यासाठी आपटे गुरुजी श्रद्धेने झटतात. त्यामुळे स्थानावर स्वच्छता आहे. प्रवासमार्ग- आजगावच्या प्रसिद्ध वेतोबा देवस्थानानंतर धाकोरे गावच्या दिशेने ५ मिनीटे चालल्यावर डाव्याबाजूला आडारी-भटवाडीत शिरावे. या वाटेवरच हे मंदिर मिळते.
कांदेरकर मराठ्यांचा गणपती
धाकोरे-आजगाव, ता. सावंतवाडी
मंदिराबाबत शके १८४६, रक्ताक्षी नामसंवत्सरे वैशाख शु. १० रोजी हे देवालय तयार केले. ही नोंद गणेशमूर्तीबाबतचे प्राचिनत्व सिद्ध करते. मूर्तीभोवतालचे मंदिर टप्प्याटप्प्याने बनले असावे. अत्यंत घनदाट अशा वृक्षराजीत गजाननाची मूर्ती विराजमान झाली आहे. धुरकट रंगाच्या पाषाणातील मूर्तीचे स्वरुप केवळ अवर्णनियच. मंदिरालगतच बारमाही वाहाणारा झरा आहे.
प्रवासमार्ग- इथे येण्यासाठी आजगावहून धाकोरे येथे यावे लागते. इथल्या प्राथमिक शाळेकडून उजव्या हाताला पंडितांच्या जमिनीतून चौकशी करीत निघावे. तिथेच एक ओहोळ वाहातो. त्याच्यावर पोफळी टाकल्या आहेत. त्यावरुन कसरत करत पलिकडे जावे लागते. मराठे यांच्या बागेतच हे मंदिर आहे. वेंगुर्ले किवा सावंतवाडी येथून आजगावपर्यंत एस.टी. बसची सुविधा आहे. राहाण्या-जेवण्याची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणावरच अवलंबून रहावे लागते.
फाटकांचे श्रीगणेश मंदिर
कॅम्प-भटवाडी, वेंगुर्ले
या मंदिराच्या स्थापनेचा काळ १८७७ च्या सुमाराचा आहे. १९५६ मध्ये याची प्रतिष्ठार्चा झाली. पुन्हा १९९६ साली वास्तूकला शिल्पकार शरद पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर मंदिर बनविण्यात आले. श्रीमूर्ती अत्यंत जुनी, काळ्या पाषाणाची, चतुर्भूज असून डाव्या सोंडेची आहे. मंदिरासमोरुन थोड्या अंतरावर ओहोळ वाहातो. सभोवताली गर्द वनराई आहे. या परिसरात नानाविध पक्षी आहेत. हा अनुभव पावसाच्या दिवसात आनंददायी असता प्रवासमार्ग- वेंगुर्ले एस.टी.स्टँडपासून ४ कि.मी.वर भटवाडी येथे मंदिर आहे. रिक्षा किवा अन्य वाहने येथे जाण्यासाठी उपलब्ध असतात. भटवाडी स्टॉप येथे उतरल्यास तिथूनही पायी जाण्याच्या अंतरावर हे मंदिर आहे. श्री. चंद्रकांत उर्फ मोहन फाटक आणि कुटुंबिय या मंदिराचे व्यवस्थापन पहातात.

गणेशतडीचा गणपती
कोचरा, ता. वेंगुर्ले
गणेशतडीचा गणपती हा इथून ३०० मीटरवर नदीतल्या डोहात १०० वर्षांपूर्वी सापडला असे म्हटले जाते. कोचरेकरांना प्रश्न पडला की, आपण मच्छिमार असल्याने सतत माशांच्या संपर्कात असतो. शुचिर्भूतता काय? याचा गंध नाही, मग देवाचे नीट कसे होणार? असा विचार करुन त्यांनी ती मूर्ती राजघराण्याशी संबंधीत प्रभूदेसाईंकडे सुपूर्द केली. मंदिराच्या बांधणीवरुन याची प्राचिनता लक्षात येते. काळ्या खडकात कोरलेली सुखासनातील मूर्ती अत्यंत दुर्मिळ अशी दोन हातांची आहे. सिधुदुर्गात रेडी आणि कोचरे येथेच द्विभूज गणेश पहायला मिळतात. गर्भगृहात सर्वांना प्रवेश असून हा भाग ४५ फूटाचा आहे. अलिकडेच श्री. मनोहर शंकरराव कोचरेकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रवासमार्ग- अत्यंत नयनरम्य अशा वनराईत उभे असलेले हे मंदिर म्हापण गावापासून ५ कि.मी.वर आहे. कोचरे समुद्रकिना-याआधी दीड कि.मी.वर हे मंदिर आहे. रस्त्यापासून आत ३०० मीटर चालावे लागते.

श्रीसिद्धीबुद्धिविनायक
चिदरवाडी-भोगवे, ता. वेंगुर्ले
या मंदिरातील गणेश मूर्तीच्या समोरच्या बाजूस पाषाणावर माघ शु. चतुर्थी १८०७ असे कोरल्याचे दिसते. गर्भगृहात पाच फुटांच्या द्वारातून जावे लागते. ६ न् ६ फुटांचे गर्भगृह आहे. बाजूस सामंत-चिदरकर घराण्यातील एका योगी पुरुषाची संजीवन समाधी असून हे स्थान अत्यंत जागृत आहे. मूळ गणपती यांनीच स्थापन केला व समाधी घेतली. येथल्या पुजा-यांच्या स्वप्नात एकदा समाधी दिसली. त्यातून त्यांना दिव्य आवाज ऐकू येऊ लागला, ‘ही सर्व ठिकाणे माझीच आहेत.‘ श्रीगणपती मंदिराच्या गर्भगृहात पुजा-याव्यतिरीक्त कोणाला प्रवेश नाही. समाधीस्थळ जेमतेम ४ न् ४ फूटांचे आहे. घरवजा कौलारु मंदिर ३० फूट लांब तर ३५ फूट रुंद आहे. मंदिराबाहेर मोकळे अंगण आहे. माघी गणेश जयंतीला देवस्थानतर्फे मोठा उत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील गावांबरोबरच मुंबई, पुणे, बेळगाव आदी दूरवरील शहरांतून भाविक माघ चतुर्थीला उपस्थित राहतात. ७००-८०० भाविकांना महाप्रसाद दिला जातो. चिदर येथे स्थानावर सहज पोचणे कठीण आहे. मंदिराच्या बाजूला बारमाही वाहाणारा झरा आहे. मंदिरासमोर स्वयंपाकघर आहे पण ऐनवेळी येणा-या भक्तांच्या व्यवस्थेची शक्यता गृहीत धरु नये. प्रवासमार्ग- वेंगुर्लेपासून ३३ कि.मी.वर असलेले हे मंदिर कुडाळवरुन अधिक जवळ पडते. भोगव्याला जाणा-या बसने गणेशबावला स्टॉप येथे उतरावे. नेवाळी गावाच्या दिशेने १०० पावलांवर उतरंडीची खडबडीत पायवाट दिसते. पाचच मिनिटे चालल्यावर उजवीकडे एका बाजूला मोठ्या घराप्रमाणे हे मंदिर आहे. मालवण-देबवाग येथूनही होडीने देवबाग ते नेवाळी हा जलप्रवास अवर्णनीय आहे.
स्वयंभू श्रीसिद्धीविनायक संस्थान
देवाची डोंगरी - साळगाव, ता. कुडाळ
श्रीक्षेत्र माणगावच्या टेंबेस्वामींचा कृपाप्रसाद, टेंबेस्वामींचे अनुग्रहीत भक्तवत्सल श्री. काकामहाराज खानोलकर यांचा आशीर्वाद व गाणेश तत्वज्ञान पंडित गजानन महाराज पुंडशास्त्री यांनी गणेशभक्तांच्या पाठीशी उभी केलेली आध्यात्मिक ताकद यातून उभे राहिले हे स्वयंभू श्रीसिद्धिविनायक संस्थान. हे भगवान श्रीगणेशाचे स्वरुप मूषकवाहनारुढ व लांबलचक, उजव्या सोंडेचे आहे. मूर्ती स्वयंभू असून सहसा न आढळणा-या दगडापासून बनलेली आहे. साधारण दीड फूट उंचीची ही मूर्ती निसर्गसान्निध्यात प्रतिष्ठापीत झाली आहे. कुडाळ व सावंतवाडीच्या साधारण मध्यावर असलेल्या झाराप तिठ्यावरुन थोडी आडवळणाला ही साळगावची देवाची डोंगरी आहे. साळगावमधील विजय तानावडे, दिनेश साळगावकर, श्रीराम साळगावकर यांच्या आणि भक्तमंडळींच्या पुढाकाराने येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काही दिवसातच अनेक गणेशभक्त या स्थानावर नित्य दर्शनासाठी येऊ लागले आहेत. प्रवासमार्ग- सावंतवाडी - कुडाळ हायवेवर झाराप तिठ्यावरुन साळगावला जाताना थोड्या आडबाजूला देवाची डोंगरी दिसते. स्वतःचे वाहन असल्यास प्रवास सुखकर होतो.
श्री देव दैवज्ञ गणपती
उभाबाजार - सावंतवाडी
सावंतवाडीमधील हे अत्यंत महत्त्वाचे सिद्ध स्थान आहे. श्रीगणपतीचे प्रतिष्ठापक श्रीनारोबा स्वामी तथा नारायणस्वामी मसूरकर व त्यांच्या कारकीर्दीनंतर सावंतवाडीमध्ये अवतरलेले योगीपुरुष श्रीबालाजी स्वामी यांची समाधीस्थळे या मंदिरासमोरच असल्याने या परिसराला जागृततेची झळाळी प्राप्त झालेली आहे. श्रीदेव गणपतीची मुख्य मूर्ती इ. सन १७६५च्या श्रीगणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला श्रीनारायणस्वामींनी प्रतिष्ठापित केली. त्यानंतर दुस-याच दिवशी आधीच तयार करुन ठेवलेल्या समाधीघरात प्रवेश करुन समाधीस्थळ बंद करावयास लावले व संजीवन समाधीस्थ झाले. आज श्रीमंदिरात आपण दर्शन घेतो ती काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती अगदी अलिकडे कारवारहून आणून २९ जानेवारी १९९० रोजी प्रतिष्ठापित केलेली आहे. उच्चासनावर स्थापिलेली ही मूर्ती सिहासनाधिष्ठित अशी साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीसमोरच पुढे खालच्या आसनावर एक पंचधातूची एक फुटांची सुबक मूर्ती दृष्टीस पडते. हीच मुख्य मूर्ती असून ती स्वतः नारायणस्वामी महाराजांनी स्वहस्ते बनविलेली आहे. अशाप्रकारच्या या सिद्धस्थानाचा जिर्णोद्धार सन १९९० साली करण्यात आला. मंदिराचे स्वरुप प्रचंड वाढलेले असून मंदिराचा सभामंडप म्हणजे लग्नकार्यासाठी दिला जाणारा भलाथोराला (४० फुट बाय ६० फुट) हॉलच आहे. प्रवासमार्ग- सावंतवाडी एस.टी.स्टँडवरुन रिक्षाने उभा बाजारमध्ये यावे. तिथेच हे मंदिर आहे.
श्रीमोरयाचा धोंडा
छत्रपती शिवरायांची शिवलंका मालवणच्या बेटावर उभी राहिली. त्याआधी श्री गणेशपूजन झाले, ते समुद्रकिना-यावर, मालवणच्या सिधुदुर्गच्या निर्मितीआधीचे श्रीगणेश पूजन हे सागरी सत्तेवर अधिराज्य गाजविण्याआधीच पहिला श्रीगणेशा होता. चौ-याऐशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही! शुद्ध खडक! स्थल उत्तम!! इये बंदरी नूतन जंजिरा वसवावा! महाराजांचे प्रशस्तीपत्रक लाभले नि मुहूर्त करण्याचे निश्चित झाले. मालवणच्या समुद्रकिना-यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाइटचा बनलेला जांभळट रंगाचा हा खडक आहे. स्थानिक लोक जांभ्या दगडाचे चिरे ज्यापासून काढून घराच्या भितीस वा खांबास बसवतात, त्या प्रकारचा हा खडक, विघ्नहर्त्या गजाननाखेरीज चंद्र, सूर्य, शिवलिग, नंदी व पादुका त्यावर कोरल्या. त्याचे शास्त्रोक्त पूजन सुरु झाले. परशुरामाचा कोकण - अपरान्त प्रदेश - त्याचा एका नव्या मनूत प्रवेश जाहला. मार्गशीर्ष बहुल द्वितीया, शके १५८६, इ. स. २५ नोव्हेंबर १६६४. श्रीगणेश पूजनानंतर सागरपूजन झाले. सुवर्णाचे श्रीफळ समुद्रार्पण केले. नंतर होडीत बसून शिवराजे कुरटे बेटावर गेले. तिथे त्यांनी ‘सिधुदुर्ग‘च्या मुहूर्ताचा चिरा बसवला. सद्यस्थिती - या घटनेला आजमितीला ३३५ वर्षे उलटलीत. श्रीमोरयाचा धोंडा ऊनपावसाचा मारा झेलत तसाच निश्चल उभा आहे. स्थानिकांनी लावलेले एखाद दुसरे निशाण; तेवढीच एक अभिमानाची निशाणी. त्यावर छप्पर करायचे म्हटले तरी सागर किना-यावर बांधकाम करण्याविषयक लागू असलेले कायदे आड उभे आहेत. त्या मूर्तीची झीज होऊन त्या अस्पष्ट दिसत आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची जपणूक झाली पाहिजे. प्रवासमार्ग- मालवण किना-यावरुन साधारण पंधरा मिनिटे चालल्यास श्रीमोरयाचा धोंड्याकडे आपण पोचतो.

कोकणात निसर्गसान्निध्यात उभारलेली ‘द्वारका‘
तुम्हाला तुमची सकाळ पक्षांचा किलबिलाट, हिरव्यागार निसर्गसान्निध्यातला ‘मॉर्निग वॉक‘, गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ नाद, अशा वातावरणात सुरु करायची असेल आणि परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच तिथली संस्कृती, लोकजीवन, शेती या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर दिलीप आकलेकरांनी निर्माण केलेल्या ‘द्वारकेला‘ अवश्य भेट द्या. निसर्गाला कुठेही न बिघडवता, पर्यावरणाशी समतोल साधन दिलीप आकलेकर यांनी तळवडे इथे (सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन पासून १० मिनिटाच्या अंतरावर) एक अप्रतिम ‘होम स्टे‘ म्हणजेच पर्यटकांसाठी हक्काचे घर बनविले आहे. गारमेंट एक्सपोर्टचा व्यवसाय करत असताना आकलेकरांचा अनेक विदेश लोकांशी संफ यायचा. त्या सर्वांना गोवा फिरण्याची इच्छा असायची. त्यामुळे स्वतःच्या मनःशांतीसाठी उभारलेल्या ‘द्वारका‘ निवासस्थानामध्ये पर्यटकांच्या निवासाकरीता काही बदल करावे लागले. विदेशी पाहुण्यांनी आम्हाला गोव्यात राहायचे नाही. आम्ही ‘द्वारकेतच‘ राहूनच इतर ठिकाणी फिरु असे सांगितल्याने. पर्यटकांच्या मागणीप्रमाणे घरासारखं वातावरण देणारी निवास व्यवस्था आज उपलब्ध आहे.
पंधरा एकरच्या जागेमध्ये ‘द्वारका‘ विकसित करताना आकलेकरांनी ‘स्वयंपूर्ण‘ होण्यावर भर दिला. इथल्या जागेतच १० गाईंचा गोठा आहे. डेअरी फार्म आहे. भात शेतीबरोबरच, द्विदल धान्य कुळीथ, चवळी, भूईमूग, वाली, उडीद यांची शेती सेंद्रीय पद्धतीने केली जाते. आंबा, काजू, चिकू अशी फळझाडेही आहेत. मूळा, पालक, वाल भाजी अशा भाज्याही इथे पिकवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना इथे ‘रेडी टू कुक‘ पदार्थ खाल्याचा आनंद घेता येतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्सुनामी जरी आली किवा बाहेर भाज्या, फळे -धान्य यांचा तुटवडा भासला तरी ‘द्वारका‘ स्वयंपूर्ण असल्याने फारशी अडचण येणार नाही.
निसर्गातून उपलब्ध होणारे पदार्थ इथे बायोगॅसवर शिजवले जातात. गाई-गुरांच्या शेणाच्या उपलब्धतेमुळे हे शक्य झालं. नंतर या शेणाचा उपयोग जैविक खत म्हणून आम्ही झाडांसाठी करतो. निसर्गचक्र कुठेही न तोडता पुनर्वापर केल्यामुळे निसर्गाला परत काही दिल्याचं समाधानही मिळतं.
इथे राहायला येणा-या पर्यटकांनाही आम्ही ए. सी. न वापरता रहा, धुम्रपान टाळा असा आग्रह करतो. साईट सीन्समध्ये इथले स्वच्छ समुद्र किनारे, मंदिरे, आंबोलीच हिल स्टेशन दाखविण्याबरोबरच गावात निसर्गाने जपलेल्या स्थळांचा अनुभवही आम्ही त्यांना देतो. आमच्या शेतीमध्येच एवढी विविधता आहे की, पर्यटकांना आपला अर्धा दिवस राखून ठेवावा लागतो. याचा आनंद विदेश पर्यटक अधिक घेतात. ब्रिटन वरुन आलेल्या एका जोडप्याने भातशेती कापल्यानंतर ‘गवताचे भारे‘ शेतक-यांच्या घरापर्यंत वाहून न्यायला मदत केली आणि त्याचा मोबदला म्हणून कोकम सरबत मागून घेतले. घरात रहायला आल्यानंतर पर्यटकांनाही घरासारखं मोकळं वातावरण मिळालं पाहिजे. अर्थात त्यांचा खाजगीपणा जपून.
जेवणामध्ये जपली इथली खासीयत
आपल्याकडे येणा-या पाहुण्यांना आपल्याकडेच मिळणा-या शाकाहारी - मांसाहारी पदार्थांची ओळख आपण करुन द्यायला हवी. वडे - सागोती, कोळंबी, माशांचे प्रकार, शाकाहारी मध्ये घावणे, उसळ, शिरवाळे, उकडीचे मोदक, कांदा भजी असा कोकणातला अस्सल खाद्यपदार्थ दिल्यावर पर्यटक कशाला चायनिज आणि पंजाबी फुडची मागणी करतील?
इथे येणा-या पर्यटकांचा जर मोठा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी १ तासाचा लोकनृत्य कार्यक्रम जसं की, समईनृत्य, गोफनृत्य, कळसुत्री बाहुल्या इथले कलाप्रकार त्यांना आम्ही दाखवितो. असे मौज-मस्तीबरोबरच आपली संस्कृती जपणारं आणि सर्वांना सामावून घेणारं पर्यटन सगळ्यांना आवडत हा आमचा वर्षभरातला अनुभव आहे.
आतापर्यंत स्वीस, अमेरिका, यू.के. नेदरलेंड इथून तसेच दिल्ली, मुंबई, पुणे इथल्या पर्यटकांनीही इथे भेट दिली आहे आणि जवळपास सर्वांनीच आम्ही पुन्हा येऊ असं सांगितलं आहे. एवढ आदरातिथ्य आम्ही जपलं आहे.
सरकारवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा आपल्या भागाचा विकास आपण सर्व एकत्र येऊन करु शकतो.
पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आदरातिथ्य हवं.
जर आपल्याला निवास - न्याहारी सारख्या योजना राबवून सर्वांच्या पुढाकाराने सिधुदुर्गाचं पर्यटन वाढवायचं असेल तर प्रत्येकाला आदरातिथ्याचं कौशल्य अंगात मुरवावचं लागेल. गावामध्ये स्वतःची जागा असेल जवळ समुद्र नाही तर एखादी नदी, तलाव असेल तर तुम्हीही हा घरगुती व्यवसाय सुरु करु शकता. त्यासाठी दिलीप आकलेकर मार्गदर्शन करायला तयार आहेत. कारण एकत्र येऊन, एकमेकांच्या सहकार्यानेच आपण प्रगती करु शकतो. स्वतःची जागा असेल तर ३ ते ४ लाख गुंतवणूक करुन आपण चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था विकसित करु शकतो. हे सर्व करत असतांनाच स्वच्छता, निसर्गाचा समतोल राखणे आणि स्थानिक गोष्टींना प्राधान्य देणं हे आपल्याच हातात आहे. द्वारकामध्ये आम्ही हे सर्व सांभाळल म्हणूनच त्याचं वेगळेपण सर्वांना जाणवंत.
संफ - दिलीप आकलेकर, द्वारका रेसिडन्सी,
तळवडे - सावंतवाडी, मोबा. ९८६९४१०६२६, ९४०४९४४४३८९

सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा लोकांचा पुढाकार
‘गोवा बचाव चळवळ‘ ३ डिसेंबर २००६ मध्ये गोव्याच्या लोकांनी सुरु केले. अनिर्बंध पर्यटनाच्या बेबंद वाढीमुळे झालेले दुष्परिणाम ढळढळीत दिसून येऊ लागले तेव्हा आमच्यावर सिधुदुर्गात असे आंदोलन करायची वेळ केव्हा येईल? खरे तर आलेली आहे.
एका नव्या पर्वाची सुरुवात करायची ही सोनेरी संधी आपल्याला मिळालेली आहे. आतापर्यंत न पाहिले गेलेल्या व अप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांची जगभरल्या पर्यटकांची आवड पुरी करणारे एक नवे जागतिक पर्यटन केंद्र आपण आकाराला आणू शकतो. सिधुदुर्ग जिल्हा हे एक वेगळ्या खासियतेचे पर्यटन स्थळ बनविण्याची विचारपूर्वक प्रक्रिया आपण चालू करुया.
आपल्या समोर एड्ढ तर इतर पर्यटन स्थळांची
नक्कल करण्याचा आणि
त्यात असणा-या सा-या
वाईट गोष्टी व समस्या
गळ्यात पडून घेण्याचा रुढ
मार्ग आहे किवा आपला
आपण विचारपूर्वक पर्यटन
विकास व विचार राबवून,
संपूर्ण जगासमोर आपला आदर्श उभा करण्याचा चांगला पर्यायही मोकळा आहे. हे पर्यटन इथल्या लोकांना आपल्या संस्कृतीला, डोंगर, नद्या, झाडे, जंगले, पशुपक्षी या सर्वांचे अस्तित्व टिकवणारे, शाश्वतीची हमी देणारे असेल. जग याचे साक्षी बनेल आणि आपला कित्ता गिरवेल.
एत्राद्या परिसराची शाश्वती मिळवायची असेल तर सरकार आणि लोक या दोघांच्या सहभागाचे संतुलन साधावे लागते. त्यात लोकांचा सहभाग हाच जास्त महत्त्वाचा. कारण तेच तर त्या परिसरात जगत असतात आणि जगणारं असतात. सरकारे येतात आणि जातात. पण त्या परिसरातील लोकांना तिथेच रहायचे, भरभराटायचे आणि विकसीत होत जायचे असते. म्हणूनच सरकारने लादलेल्या योजनांकडून लोकांनी स्वतःच केलेल्या योजना आणि पुढाकार हाच खरा बदल घडवतो.
‘शाश्वतीचे पर्यटन‘ या कल्पनेत पशुपक्षी, झाडे, झुडपे आणि परिसराची या सगळ्यांचीच श्रीमंती या वाढत्या पर्यटनाबरोबर, पाहुण्यांबरोबर अजून वाढत जाते. ती तशी शाश्वत, कायम टिकवायची असेल तर समाजाच्या सगळ्या थरांमध्ये ती समानपणे विभागली गेली पाहिजे.
या आमच्या खास माहितीपत्राचा ‘शाश्वतीचे पर्यटन-लोकांच्या पुढाकाराने‘ ज्याला आम्ही गंमतीने ‘शा.प.लो.पु.‘ म्हणतो हाच उद्देश आहे. या अंकापासून पुढे दर महिन्याला आम्ही रुढ साच्यातील पर्यटनातील धोके, त्रास, समस्या आणि मर्यादा आपल्या समोर आणू. त्याचबरोबर त्याला असलेल्या जास्त चांगल्या पर्यायी गोष्टी व योजना सुद्धा सोप्या करुन मांडायचा प्रयत्न करु. हा एक शोध असेल आपल्याच झाकोळलेल्या, अप्रसिद्ध राहिलेल्या परंपरांचा, खाद्य - वस्तू - राहणी संस्कृतीचा, कलांचा आणि हस्तकलांचा, सुंदर स्थळांचा, कार्यक्रमांचा आणि अशा अनेक केवळ आपल्याच पाशी असलेल्या खासियतींचा.
सहसा सर्वच नवीन उदयास येणा-या पर्यटन स्थळांचा अशी स्थिती असते की, वाढणा-या पर्यटनातून झटपट पैसा कॅश करायची कुतरओढ आणि चढाओढ सर्वांमध्ये लागलेली असते. या खुळ लागलेल्या घाईघाईत काहीजण परक्या लोकांना आपल्या जमिनी मिळतील त्या चढ्या दराने विकायला लागतात, काही अतिउत्साही लोक एखादे अत्याधुनिक सुखसोयीयुक्त हॉटेल वा रिसॉर्ट बनवण्यामागे धावतात. लवकरच पर्यटकांच्या वाढीचा वेग वाढत शिखराला जातो. पंचतारांकित श्रेणीच्या पर्यटक निवासांपासून इतर सर्व श्रेणीपर्यंतची निवासे उभारली जातात. उद्देश एकच. नफा. शिखरानंतर उतार ठरलेलाच.
त्यातले बडे खिलाडी त्यांचे बंदिस्त किल्ले आणि त्यात स्वप्नसुंदर इमले महागड्या उंची सुखसोयीने सर्वसंपन्न असे बांधतात. अर्थातच त्यांच्या त्या स्वप्नातल्या कल्पनांना साकार रुप देताना झाडे पाडली जातात, तळी बुजवली जातात, नद्या अडवल्या जातात, प्रवाळांची बेटे चुरडली जातात आणि वस्त्याच्या वस्त्या नजरेच्या टप्प्यातून एका बाजूला हटवल्या, हलवल्या जातात आणि त्यांच्या त्या बंदिस्त, अप्राप्य स्वर्गांना नैसर्गिकतेचा आभास निर्माण करण्यासाठी हे सारे केले जाते हे विशेष!
पण यापेक्षाही वाईट भाग हा, लोकांच्या बदललेल्या मनोवृत्तीचा असतो. गाववाले त्यांचे स्वयंपूर्ण शेती, मच्छिमारी, कारागिरीचे पारंपारिक व्यवसाय सोडून देऊन या रिसॉर्टच्या ‘पैसा फेको, तमाशा देखो‘ अर्थ व्यवस्थेला सहज बळी पडतात. लवकरच गाववाल्यांची स्वतःची सारी कमाई धंद्याची साधने बुडतात. त्यांना नवीन शब्द, नवीन प्रकारची कामे, नवीन आज्ञावल्या शिकाव्या लागातात, मिळतील ती चतुर्थ श्रेणीची कामे, पर्यायाने बिगारी स्विकारावी लागते. या असल्या पर्यटन संस्कृतीचा परिणाम हा नेहमीच (नैसर्गिक व सांस्कृतिक) पर्यावरणाच्या प्रदूषणात दिसून येतो. त्यांचा -हास हा ठरलेलाच.
आपल्याला विचार आणि योजनापूर्वक (वेगवेगळ्या आवडी परवणा-या) पर्यटन स्थळांच्या मांदियाळीत आपली जागा ठरवावी आणि नक्की करावी लागेल. न पेक्षा ज्या नैसर्गिक सदरतेच्या जीवावर आपण पर्यटनातून येणा-या समृद्धीची सुखस्वप्ने पाहतोय, त्या नैसर्गिकतेचेच दिवाळे वाजलेले असेल. साहजिकच पर्यटनाचेही. त्यामागोमाग पर्यटन व्यवसाय वाढत जाताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारली जायचा हा धोका हर घडी, पावलाला आपल्या समोर येत असतो. म्हणूनच सतत सावध रहावे लागते.
याचे एक खास उदाहरण सांगतो - १९९८ साली स्पेनला ५ कोटी पर्यटक भेट देत होते आणि एकट्या पर्यटन व्यवसायाचा वाटा देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत १० टक्के होता. लवकरच पूर्वी निसर्गसुंदर असणारे समुद्रकिनारे गैरबांधणींच्या हॉटेलांनी आणि रिसॉर्टनी भरभरुन व्यापले. किना-यांची प्रचंड झीज होऊ लागली. पाणी पोहण्यासाठी अयोग्य, अतिशय दुषित झाले. एकेकाळची स्वप्नसुंदर निसर्ग स्थळे, बकाल शहरीकरण झालेली भयाण स्वप्ने बनली. अगदी काही वर्षापूर्वी जिथे पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे नाचत होते तिथे आता कोणी फिरकेनासे झाले. हल्ली काही वर्षे तिथली हॉटेले रिकामीच असतात. पैशाचा ओघ पुरता घटलाय. सुखचैनीचा स्वर्ग म्हणून मिरवणारी क्रॉन्क्रीटची बांधकामे आता केवळ ढिसाळ व्यवस्थापन आणि नियोजन शून्यतेची चिन्हे म्हणून शिल्लक राहिली आहेत. गोव्यातील कळंगुटचा प्रवास याच दिशेने चालू आहे.
स्पेनमधील पर्यटन व्यवसायातील ही अधोगती आपल्या समोर या अतिगर्दीतल्या पर्यटनाचे धोके सुस्पष्ट करते. हे ‘स्वर्गा‘ च्या शोधात फिरणारे पर्यटक आणि त्यांच्या चुकीच्या मागण्या पुरवण्यासाठी धावताना, निसर्ग संवर्धनाचे नियम न पाळण्याचा आततायीपणा सरते शेवटी कसा घातक ठरतो हे दिसून येते. पर्यावरण विनाश, प्राण्यांच्या-वनस्पतींच्या प्रजातींच्या वंशसंहाराची सध्याची समस्या ही या सर्वांच्या मुळाशी असलेल्या एका चुकीच्या मानवी धारणेतून उद्भवलेली आहे. ती म्हणजे आम्ही कितीही जंगले कापली तरी ती कधीच संपणार नाहीत. हवे तेवढे कायम पुरवित राहणार आहेत आणि आधुनिक सुखसोई इतर कशापेक्षाही जास्त मोठ्या गरजेच्या आहेत. त्यालाच आपण प्रगती म्हणतो, आपल्या देशात येणा-या आधीच्या पर्यटकांची हीच मनोवृत्ती होती. आजही ‘स्वर्गा‘ चा शोध घेत येणा-या बव्हंशी पर्यटकांच्या डोक्यात तिच असते आणि त्यांच्या मागण्या पुरवण्यात सोन्याच्या संधी पाहणा-या ब-याचशा स्थानिक गाववाल्यांच्या डोक्यातही.
तर ‘शाप लोपू‘ चा उद्देश हा आपल्या सिधुदुर्गातील नैसर्गिक व सांस्कृतिक श्रीमंतीवर प्रकाशझोत टाकण्याचा आहे. आपल्या लोकांची, वस्तूंची (सिधुदुर्ग ब्रँड) ची खास किमत जागा जगात निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे. जिच्या माध्यमातून आम्ही आमची आर्थिक श्रीमंतीही वाढवू शकू. न की नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींचे मायनिग करुन त्या बाहेर रित्या करुन. तसेच आम्ही पर्यटन व्यवसायातील आमच्या लोकांना त्यांच्या व्यवसायातील वेगवेगळे उपयुक्त व पर्यावरणाची शाश्वती देणारे पर्याय आणि बदलही सुचवू.
सिधुदुर्गातले पर्यटन म्हणजे केवळ आंबोलीचा धबधबा आणि मालवणचा किल्ला नव्हे. सिधुदुर्ग जिल्हा म्हणजे केवळ वाळूचे किनारे नव्हेत आणि मालवणी खाणंपिण्याची खासियत कोंबडी, वडे - सागोती यावर संपत नाही. चितारी कला आणि गंजिफा इतकीच कला इथे आहे असेही नव्हे. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांपेक्षाही इथल्या आठवणी, स्मृतिचिन्हे म्हणून नेण्यासारख्या इतर खूप खूप गोष्टी आहेत. ते माहित करुन घेऊया.
येत्या गणेश चतुर्थीचा शुभमुहुर्त साधत, आम्ही आमच्या मुख्यपृष्ठावर ‘कोईळ-मालवण‘ येथील अप्रसिद्ध परंतु विशेष असा गणेशोत्सव दाखवला आहे. हे सा-या गावाला समृद्ध करणारे, सर्व गाववाल्यांच्या सहभागाने साजरे होणारे खरोखर प्रेरणादायक उदाहरण आहे. ही कोईळ -वासियांची खास परंपरा सामाजिक बंधुभावाचे उत्तम प्रतिक आहे. आम्ही अभिमानाने सा-या जगाला हा आमचा सामाजिक जपलेला वारसा आणि सहजीवन दाखवू इच्छितो.
आमच्या ‘शा.प.लो.पु.‘ मधील लिखाण हे व्यावसायिक पत्रकारांकडून नव्हे तर साधारण आणि असाधारण अशा आमच्या सिधुदुर्गवासियांकडूनच लिहिलेले असेल. तसेच देशातील पर्यटन व्यावसायिकांकडूनही मुद्दामहून आमंत्रित केलेले लेख असतील.
आमचे काम आपल्या जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील जुन्या जाणत्यांना बोलते करायचे आहे. त्यांनी या नवीन आशावादी बदलांचे, आपल्या आसपास गावात असलेल्या पर्यटनासंबंधीत दडलेल्या शक्यतांचे सूतोवाच करावे. नवशिक्यांना मार्गदर्शन करावे. शाश्वतीची हमी देणा-या नव्या कल्पनांना, विचारांना आणि नवोदितांना उत्तेजन द्यावे.
आमचे हे नवशिके प्रयत्न जरुर आहेत. पण ते व्यावसायिकांच्या कुशलतेने आम्ही पार पाडू. याचसाठी सिधुदुर्गातील प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ‘साप्ताहिक किरात‘ च्या माध्यमातून दर महिन्याला आपण भेटणार आहोत.
आपणा सा-यांना आमच्या या ‘शाश्वत पर्यटनासाठी लोकांचा पुढाकार‘ या उपक्रमात सामील होण्याचे मनःपूर्वक हार्दिक आमंत्रण.
- जॉर्ज जोएले

No comments:

Post a Comment