Friday, 1 April, 2011

अंक १२ वा, ३१ मार्च २०११

संपादकीय
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र क्र. '१', सिंधुदुर्ग - '०'
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी दडपून सांगितले. अर्थात नोकरशाहीने तयार केलेल्या आकडेवारीनुसार ते खरेही असणार. कारण, विधिमंडळात सांगितलेले खोटे ठरले तर हक्कभंग होतो! उद्योगक्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांपुढे मुंबई - पुणे पट्टयासह राज्यातील काही मोठी शहरेच असावीत किवा मुंबईत मुख्य कार्यालये असलेले देशातील प्रमुख बडे उद्योग समुह असावेत. ग्रामीण भागात उद्योग व्यवसायांची कशी दयनीच अवस्था आहे हे त्यांनी पाहिले असते तर आपले राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे हे सांगताना त्यांनी दहावेळा विचार केला असता. राज्यात विकास योजनेची प्रत्यक्ष पूर्तता न करता केवळ आकडेवारीतच पूर्तता केल्याची बतावणी करणा-या सरकारी यंत्रणेच्या अहवालाबाहेर शंभरेक दिवसांपूर्वी दिल्लीहून महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री दुसरे काय सांगू शकणार होते? असो! मुख्यमंत्री राज्याच्या पहिल्या नंबरचे ढोल वाजवत असतांना आपल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगधंद्यांच्या बाबतीत साधी टिकही वाजत नाही त्याचे काय? हा विचार आता पृथ्वीराज यांच्या मंत्रीमंडळात राज्याचे उद्योगमंत्री असलेले नारायण राणे यांना करावा लागणार आहे. तसे ते जिल्ह्याच्या विकासाबाबत अगदी तळमळीने बोलत असतात. विकास योजनांसाठी मिळालेला निधी पूर्णतः खर्च न झाल्याबद्दल किवा कामचुकारपणाबद्दल सरकारी अधिका-यांना धारेवर धरीत असतात. आपल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत प्रशासकीय कार्यक्षमता न दाखविणा-या पदाधिका-यांनाही फैलावर घेत असतात. तसे ते सिधुदुर्ग जिल्ह्यातील बंद पडलेल्या किवा कसेबसे चालू असलेल्या छोट्या उद्योगधंद्यांना जी उतरती कळा लागलेली आहे. त्यास आपल्या कार्यपद्धतीने पुन्हा एकदा उभारी आणू शकतील, नव्हे जिल्हावासीयांची तीच अपेक्षा आहे. साधारण पंचवीस - तीस वर्षापूर्वी सिधुदुर्गात रेल्वे वाहतुक दृष्टिपथात नसतांना, रस्त्यांची दूरवस्था असतांना, टेलिफोन सेवा प्राथमिक अवस्थेत असतांना त्यावेळचे आमदार (कै.) एस.एस. देसाई यांच्या अथक परिश्रमाने कुडाळ येथे महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ आले. लहान - मोठे नवनवीन उद्योग सुरु झाले. वायमन गार्डनसारखा क्रँकशाफ्ट बनविणारा मोठा कारखाना सुरु झाला. या उद्योगांना पुरक असे अनेक व्यवसाय सुरु आहे. त्याबरोबरच अन्य काही तालुक्यांमध्ये उद्यमनगरी स्थापन झाल्या. तिथेही छोटे- मोठे उद्योग सुरु झाले. काही प्रमाणात फळप्रक्रिया उद्योग घरगुती स्वरुपात सुरु झाले. एकंदरीत जिल्ह्यात उद्योग विकासाचे वारे वाहू लागले होते. परंतू तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांना कार्यकाल पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागले, त्याबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले एस.एस.देसाई यांनाही मंत्रीपद गमवावे लागले आणि त्यानंतरच्या मंत्र्यांनी म्हणजे भाईसाहेब सावंत, बापूसाहेब प्रभुगांवकर यांनी एस.एस.यांच्याबाबतीतच नव्हे तर, जिल्ह्याच्या उद्योग विकासाच्या बाबतीतही दुजाभाव दाखविल्याने पुढे सिधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला उतरती कळा लागली, ही वस्तुस्थिती आहे. आता जिल्ह्यात रेल्वे वाहतुक सुरु झाली. अद्ययावत दूरसंचार सेवा आणि संगणक सेवा खेड्यापाड्यातही पोचली, वीज पुरवठ्याचा विस्तार झाला, नवीन रस्ते झाले, वाहनांची संख्या वाढली, निवासी हॉटेल्स, निवासी इमारतींची संख्या वाढली, इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रत्येक तालुक्यात झाल्या. तांत्रिक शिक्षण, सेवा व्यवसाय शिकविणारे अभ्यासक्रम सुरु झाले. इंजिनिअरिग कॉलेज झाले. अशा उद्योग - विकासाला अनुकूल आणि कामगारांना पूरक ठरणा-या सोयी झाल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत जिल्ह्याची औद्योगिक भरभराट अधिक लवकर होऊ शकेल. तशी ती झाली तरच जिल्ह्यात व्यापारी उलाढाल वाढेल. पर्यटन व्यवसाय वाढेल आणि त्यास पूरक असे अन्य व्यवसायही वाढतील. उद्योगमंत्री या नात्याने नारायण राणे यांनी निष्क्रीय ठरलेल्या जिल्हा उद्योग केंद्राला कामाला लावले, या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. तर त्यांनीच जिल्ह्याच्या विकासाचे जे स्वप्न रंगविले आहे ते साकार व्हायला वेळ लागणार नाही.
अधिकार शिकण्याचा
१९३० च्या आसपास मराठी प्राथमिक विभागाच्या पाठ्यपुस्तकामध्ये ‘अत्रे-घाटे‘ प्रकाशनाने क्रांतीकारक बदल घडवून आणले. रंजकता आणली, नाविन्य आणले. त्यात एक धडा होता. एका गावात एक सर्कस येते. बँडबाजा वाजवून त्याच्या जाहिराती गावात वाटल्या जातात. त्या मिळवण्यासाठी मुलांची एकच झुंबड लागते. चपळ-सशक्त मुले जाहिराती मिळवतात. पण एका मुलाला काहीच मिळत नाहीत तो केविलवाण्या स्वरात ओरडतो, ‘मला जाहिरात द्या. मला वाचता येतं. खरच मला वाचता येतं!‘ त्या शक्तीच्या खेळात इच्छा असूनही तो मुलगा अयशस्वी होतो. ज्ञानाचा सर्व अंगांनी मुक्तपणे स्फोट झालेला असताना शिकण्याच्या वयोगटातील कुणाला तरी शाळेत जाऊ नये असे वाटेल का? हीच तर आपल्या शिक्षणाची शोकांतिका आहे. दात आहेत तर चणे नाहीत. भारतीय संविधानाचे आश्वासक, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित, शोषित व उपेक्षित समाजामध्ये ते वाढले, पण ते किती थोर! आपणास मिळणा-या वागणुकीबद्दल ते कधीही अनुदार उद्गार कढीत नसत. त्यांनी तयार केलेल्या घटनेमध्ये सर्व समाजाचा सर्वांगिण विकास गृहीत आहे. कुणाविषयी आकस नाही. त्यामुळे घटनेमध्ये किमान ६अ ते १४अ हा वयोगट शिक्षणाच्या छायेखाली यावा असे त्यांनी आग्रहाने म्हटले आहे. परंतु सर्व नेत्यांची इच्छा असूनही अद्यापपर्यंत काहीही साध्य झाले नाही. पहिली पंचवार्षिक योजना १९५२ मध्ये कृतीमध्ये आली. ५ वर्षांनी निरनिराळ्या ठिकाणी, सर्व राज्यांमध्ये कार्यवाहीच्या फलिताचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुंबई, गुजरात व कर्नाटक मधील काही प्रदेशांसाठी समिती नेमण्यात आली. महाराष्ट्राच्या कामगिरीचा शोध घेण्यासाठी डॉ. जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेल्या क्ष्.क्ष्.क. कडे हे काम देण्यात आले. त्यावेळी जे. पी. नाईक, केंद्रामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख सल्लागार होते. महाराष्ट्राच्या समितीमध्ये रामभाऊ परुळेकर, व्ही. पी. खानोलकर आणि दोन संशोधन सहाय्यक होते. त्यामध्ये मी एक होतो. माझ्या गटाकडे रायगड, ठाणे, रत्नागिरी व सोलापूर हे जिल्हे होते. आम्ही या जिल्ह्यांतील शाळा पाहिल्या, गावक-यांच्या सभा घेतल्या आणि शिक्षकांशीही वार्तालाप झाले. या सर्व चर्चांमधून काढलेला निष्कर्ष म्हणजे शेती, घरकाम याकडे लक्ष दिल्याने अनुपस्थिती, अनुत्तीर्णता आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर क्द्धदृद्रदृद्वद्य. सातत्याने हे घडल्याने विद्यार्थी अक्षर ओळखही विसरायचे व पुन्हा निरक्षरतेमध्ये जाण्याची प्रक्रिया दिसायची. डोंगरी मुलूख व वनवासी भाग यामधून शाळेत येणा-या मुलांना प्रत्येक मुलामागे ४ ते रु. ८ असा ‘डोल‘ देण्यात येई. तो खर्चाला टाकल्याचे दिसे पण प्रत्यक्षात पालकांना ते सहाय्य मिळत नसे. शाळेच्या इमारती यथातथाच, स्वच्छतागृहे नाहीत, पाण्याची गैरसोय, वर्गात घोकंपट्टीवर भर, कुठेही आनंददायी वातावरण नाही. अशा स्थितीत कमिटीचे अहवाल हा एक ‘औपचारिक विधी‘ झाला तर नवल नाही.
आजची स्थिती- वरील घटनेला ५० वर्षे झाली आहेत. परिस्थितीमध्ये सत्कृतदर्शनी बदल झाला आहे. समाज शिक्षणाभिमुख झाला आहे. समाजास शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे पटलेले नाही असे नाही. परंतु कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड सारख्या प्रदेशांनी प्रगतीची आघाडी मारली आहे तशी महाराष्ट्राने नाही. डोंगरमाथ्यावरुन दुबार शाळेत येणे किती कष्टाचे आहे याचा अनुभव असणा-यांनाच कष्टाची कल्पना येईल. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथे साठे सरांनी पालक-ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारच्या वेळी मुलांना पेजेची व्यवस्था केली आणि आश्चर्य म्हणजे मुले आनंदली, उपस्थिती वाढली. शिक्षणाची प्रत सुधारली. या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली. ग्रामिण भागातील अनेक शाळांनी ही योजना स्विकारली. त्यास सारस्वत बँकेनेही चांगली मदत केली. शासनाने अंगणवाड्यांसाठी खिचडी, चिकी योजना लागू केली आहे आणि आता नगरपरिषदा, ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा यांनीही हा प्रयोग सुरु केला आहे. त्यामुळे आता वातावरणात आनंद, उत्साह आला आहे. मुलांना हुरुप आला आहे. ज्ञान आकलन करण्याची सुरेख पार्श्वभूमी तयार होत आहे.
एक आनंददायी घटना- मी प्रत्यक्ष अनुभवलेली अशी एक घटना. डॉ. के. ब. हेडगेवार प्रतिष्ठान तर्फे एका फिरत्या प्रयोगशाळेचा उपक्रम चालतो. एका तरुण शिक्षकास (विज्ञान पदवीधर) एक मोटरजीप, सहाय्यक, विज्ञान साहित्य, चार्ट-चित्रे व विज्ञानाच्या गमती जमतीची पुस्तके देण्यात आली. स्वतः शिक्षक जीप चालवितो व वनवासी क्षेत्रामध्ये प्राथमिक शाळांना अधिका-याची संमती घेऊन भेट देतो. त्याची गाडी दृष्टिपथात येताच विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह संचारतो. शिक्षक विज्ञानाच्या सुरस गोष्टी सांगतो, गाणी म्हणवून घेतो व शेवटी ‘बेडकाचे शरीर विच्छेदन‘ मुलांसमोर करतो. मुलांची ही तासिका क्षणाक्षणाला आनंद, उत्साह उत्कंठा शिगेला पोहोचवणारी. या क्षणी मुलांना तो शिक्षक देवासारखा वाटतो यात नवल नाही. ए.कड्ड, क्.कड्ड यशस्वी रीतीने पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्यापूर्वी अशा रितीचे कार्य करण्यास उद्युक्त करावे. सेवाभावी संस्थांना, शिक्षणप्रेमी तरुणांना आवाहन केले तर ही तरुणाई योग्य मार्गाला जाईल. देशाचा कायापालट होईल. माझ्या अनुभवाने मी हे सांगतो. क्तङक् चे शैक्षणिक अवलोकन- दि. २१ मार्चच्या च्र्.ग्र्.क्ष्. मध्ये अनेक प्रदेशांच्या ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांची हजेरी पटावरील २०१० ची नोंद मोठी विदारक आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्राथमिक शाळेतील हजेरीपट २६.५० लाखांनी खाली आला आहे. हे खेदजनक आहे. ही अधोगती परीक्षेतील अपयशामुळे, शिक्षणामध्ये स्वारस्य न वाटल्यामुळे की विद्यार्थ्यांना इतरत्र उपजीविकेच्या कामाला लावल्यामुळे आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.
शिकण्याचा अधिकार - म. गांधी ज्यांना आपले गुरु मानीत त्या स्व. गोपळ कृष्ण गोखले या भविष्यवेधी प्रागतिक नेत्याने ठीक शंभर वर्षांपूर्वी शिकण्याच्या हक्कासंबंधी पहिले प्रकट निवेदन केले. अण्णासाहेब हजारे यांच्या सारख्यांच्या प्रयत्नातून ‘माहितीचा अधिकार‘ दृष्टिपथात आला आणि आता ‘शिकण्याचा अधिकार‘ संविधानामध्ये नोंदविण्यात आला आहे हे सुचिन्ह आहे. हा अधिकार म्हणजे बहुवेधी शस्त्र आहे. शिकणे म्हणजे केवळ परीक्षा देणे नव्हे. विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींना तोंड देऊन त्याला आनंद देणारे अध्ययन लाभावे यासाठीच्या सर्व गोष्टींचे सहाय्य विद्यार्थ्यांना हवे आहे. तो उपाशी पोटी शाळेत जाता नये. शाळा दूर असली तर शाळेत जाई-येईपर्यंतच तो थकून जाईल. त्याच्यामध्ये उत्साह राहणार नाही. त्याचे आरोग्य चांगले रहायला हवे. त्याला किमान पोशाख मिळायला हवा. त्याचे खेळाचे वय जाणून त्याला ते साहित्य पुरवायला हवे. शिक्षणाच्या हक्कामध्ये या सर्व बाबी येतात. पंतप्रधानांनी घोषित केल्यानुसार सर्व शिक्षा अभियानाचा निधी आता ५० टक्के वरुन ६५ टक्के वर वाढविला आहे. हा वाढीव निधी जर प्राथमिक शिक्षणाच्या इमारती, मैदाने, स्वच्छतागृहे यांसाठी वापरला गेला तर खूप काही साध्य होईल आणि आज प्राथमिक शिक्षणाचे जे चित्र दिसते आहे त्यात चांगला बदल होईल. अशा त-हेच्या उपक्रमांमुळे ‘शिक्षण ही आनंददायी घटना‘ बनेल. समाज सेवकांनी हा विषय लावून धरला तर ‘शिकण्याचा अधिकार‘ हा ‘बहुमुखी‘ ठरेल. - श्रीराम द. मंत्री (०२२) २६७६२२४८ विशेष *

मुलांच्या प्रतिभेला फुलविणारं मुक्तांगण
बालवाडीतील मुलांचा गोंधळ, ठराविक प्रकारचे खेळ, ठरलेल्या वेळी इमारतीच्या बाहेर वाट बघणारे पालक हे शिशुवाटीकेचं नजरेसमोर येणारं सर्वसामान्य चित्र. पण यामध्ये बदल करत अडीच ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांसोबत सर्व उपक्रमात पालकांनाही सहभागी करुन घेणारं वेगळं प्रयोगशील शिक्षण बालवाडीतील मुलांसोबत कुडाळ इथं मुक्तांगणने दहा वर्षापूर्वी सुरु केलं. खरं तर १९९० पासून सौ. मंगल परुळेकर त्यांच्या घरी वेंगुर्ला इथं अनौपचारिक रित्या वेगवेगळे उपक्रम राबवित असत. १५ ऑगस्ट २००० पासून कुडाळमध्ये व्यापक प्रमाणात मुक्तांगणच्या प्रयोगशील शिक्षणाला सुरुवात झाली. आज दहा वर्षानंतर त्याची फळेही पालक आणि मुलांना अनुभवायला मिळत आहेत. मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर सांगतात की, आपल्याकडे शाळेत एकसारखे प्रश्न विचारणा-या विद्यार्थ्यांना सरळ सरळ गप्प बसवितात किवा ‘आगाऊ‘ असं लेबल लावलं जातं. मुक्तांगणमध्ये येणा-या प्रत्येक मुलाच्या कुतूहलाला संपूर्ण वाव दिला जातो. प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकविण्यावर भर असतो. उदा. कोंब येणा-या कोणकोणत्या वस्तू आहेत ते निरीक्षण करुन घेऊन या असं मटल्यावर मुलं मुगापासून ते नारळापर्यंत वस्तू मुक्तांगणमध्ये घेऊन येतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे निरीक्षण, संवाद-कौशल्य, अनुभवजन्य ज्ञान या गोष्टी विकसित व्हायला मदत होते. गणित, भूगोल शिकवतानासुद्धा अशा प्रकारचे प्रयोग केले जातात. याबरोबरच पहिलीच्या मुलांना शरीराच्या स्नायूंची ओळख, आपला जन्म कसा होतो या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगितल्या जातात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुक्तांगणच्या ८० टक्के उपक्रमांमध्ये मुलांच्या पालकांचा सक्रीय सहभाग असतो. प्रकल्प अहवाल लिहीणे, मासिक सभा आणि विविध उपक्रमांना हजेरी लावणे पालकांसाठी आवश्यक असते. त्यामुळेच पुढच्या शिक्षणात मुलाचा कल नेमका कुठे आहे हे समजून येते आणि मुलांवर आपल्या अपेक्षा लादण्याचे प्रमाण कमी होते असे मंगलताई सांगतात. वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये तर मुलं, पालक सर्वच सहभागी असतात. वर्षाच्या शेवटी मुलांचं मूल्यमापन हे त्यांच्या भावनांकावर होतं. मुलांना प्रगतीपुस्तके दिली जात नाहीत तर मुलांचा विकास आलेख म्हमजे कोणत्या क्षमता विकसित व्हायला हव्यात हे सांगितले जाते. मंगलताईंच्या मते बालवाडीपासून मुक्तांगणमध्ये देण्यात येणारं प्रयोगशील शिक्षण सार्वत्रिक व्हायला हवं आणि पुढच्या शिक्षणातही मुलांच्यात इर्षा वाढीला लावणारी गुणांमधली स्पर्धा बंद होऊन स्वतःची क्षमता ओळखणारी शिक्षणपद्धती विकसित व्हायला हवी. शब्दांकन- अॅड. शशांक मराठे

स्यमंतकची बिनभितीची शाळा -धामापूर - मालवण
सचिन आणि मिनल देसाई यांनी कोकणातल्या धामापूर सारख्या छोट्याशा खेडेगावात ‘बिनभितींची शाळा‘ हा उपक्रम यशस्वीरित्या चालवत आहेत. त्याचबरोबर इथल्या निवडक शाळांसोबत आय.बी.टी. हा उपक्रम स्यमंतक मार्फत राबविला जातो. सुरुवातीला आय.बी.टी. सिधदुर्गात राबविताना देसाईंना खूप कष्ट पडले. शाळा मुख्याध्यापकांचा नकारात्मक दृष्टिकोन, अतिचिकित्सक वृत्ती यामुळे त्रास जरी झाला तरी काम करण्याचं ध्येय आणि उत्साह असल्यामुळे त्रास जाणवला नाही. आता आश्चर्यकारक प्रतिसाद शाळांमधून मिळतो आहे. प्रत्यक्ष बिनभितीच्या शाळेत येऊन शिकण्यासाठी किमान पात्रता ८ वी पास आहे. एका वर्षी जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. यामध्ये जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवनशिक्षण दिले जाते. या निवासी अभ्यासक्रमाला नॅशनल ओपन स्कूल, नवी दिल्लीची मान्यता आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो. इंजिनिअरिग, ड्राॅईंग, कॉस्टींग, कॉम्प्युटर-इंटरनेट, टेक्नॉलॉजी हे सगळं प्रात्यक्षिकांवर आधारीत आहे. इथं कामाच्या आखणीपासून ते विक्रीपर्यंत सगळी कामे विद्यार्थीच करतात. अशा कामातून नफ्या-तोट्याचा थेट अनुभव मिळतो. या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासही घडत असतो. इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी नोंदणी पद्धत अवलंबली जाते. साधा चहा करायचा असेल तरीही साखर पावडर याचीही नोंद ठेवली जाते. बेल्डिग, सुतारकाम, शेती, प्लंबिग अशा कामांमुळे मुलांमधील बहुविध कौशल्य तर वाढतंच आणि वर्षभरात आपली आवड किवा आपला कल कुठे आहे हे सुद्धा समजून येतं. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षभर इथं इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहता येतं किवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. या शाळेत कुणी शिक्षक, निदेशक नसतात. हा निवासी अभ्यासक्रम असल्याने मुल स्वतः जेवण करुन जेवतात. प्रत्यक्ष व्यवसाय शिक्षण- या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन सध्या तीन मुले प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेत आहेत. सावंतवाडी-बेळगाव रस्त्याजवळ बुर्डी पुलाच्या जवळ प्रशांत भट यांच्या सुमारे तीन एकर जागेत संस्थेचा प्रकल्प चालू आहे. मुलांसाठी हा तर इंटर्नशीपसारखा अनुभव आहे. इथे मुले बांबूपासून दिव्यांची निर्मिती, गाईंचे शास्त्रीय पालन आणि असंख्य व्यावसायीक प्रयोग इथं होत असतात. त्यातून मुलांना आणि स्यमंतक संस्थेला विक्रीतील समान हिस्सा दिला जातो. हे संस्थेचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. बिनभितीच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी या प्रकारच्या शिक्षणाची आवड असणा-या मुलांच्या पालकांनी, संस्थांनी स्यमंतक संस्थेमध्ये फोन करावा. त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष येऊन मुलाची मुलाखत घेतील आणि योग्य वाटल्यास मुलाला शाळेत प्रवेश मिळू शकेल. संफ- सचिन देसाई/मिनल देसाई स्यमंतक संस्था- ०२३६५-२५५६२०, ९९२३९२०८६५ बातम्या *

बँक ऑफ इंडियाची एटीएम सेवा सुरु
वेंगुर्ले येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये एटीएम सेवेचा शुभारंभ बँकेचे विभागीय व्यवस्थापक व्ही. बी. वारंग यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष संदेश निकम, मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे, गटविकास अधिकारी अगर्ते, बँकेचे शाखाधिकारी व्ही. डी. केरकर, विभागीय कार्यालयाचे अमर मेहेंदे, अनेक ग्राहक उपस्थित होते. महेंदे व वारंग यांनी एटीएम सेवा आणि बँक ऑफ इंडियाच्या सेवांची माहिती दिली. नगराध्यक्ष निकम यांनी शुभेच्छा दिल्या. शाखाधिकारी केरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सतिश डुबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

सौ. शुभदा शेणई संचलित बालवाडीचे स्नेहसंमेलन
वेंगुर्ले येथील सौ. शुभदा अविनाश शेणई संचलित बालवाडीचा बक्षिस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व सौ. प्रज्ञा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ मार्च रोजी साई मंगल कार्यालय येथे साजरा झाला. याप्रसंगी लायनेस अध्यक्षा सौ.स्मिता डुबळे, अॅड.सौ.सुषमा खानोलकर, सौ. हेमा गावस्कर, सौ.सामंत उपस्थित होत्या. मुलांनी शारदा स्तवन व श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. छोट्या मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. मुलांच्या चित्रकलेचे प्रदर्शनही आयोजित केले होते. गेली २५ वर्षे बालवाडीतून मुलांवर उत्तम संस्कार करणा-या सौ. शेणई यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ.श्वेता हुले
वेंगुर्ल्यातील शिवसेना नगरसेविका श्वेता हुले यांची वेंगुर्ले तालुका शिवसेना महिला आघाडीप्रमुख म्हणून निवड झाली आहे. जिल्हाप्रमुख एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते त्यांचा तालुका शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला. वेंगुर्ले नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून पद भूषवितांना जनतेची विकासकामे करुन पदाचा सन्मान वाढविला. यावेळी तालुका सेनाप्रमुख अजित सावंत, उपजिल्हाप्रमुख अरुण सावंत, महेंद्र डिचोलकर, शहरप्रमुख अशोक वेंगुर्लेकर, आनंद वेंगुर्लेकर, विलास राऊळ, तुळशीदास खोबरेकर, बाळा दळवी, प्रकाश गावडे, पं.स.सदस्य लक्ष्मण कावळे, बाबी चिपकर, राजन वालावलकर, अभिनय मांजरेकर, रमेश नार्वेकर, शेखर कोयंडे, सुरेश वराडकर आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवा पॅसेंजर १ तास आधी
सावंतवाडी-दिवा पॅसेंजरची वेळ १ एप्रिलपासून बदलली आहे. ती मडगावहून ६.१५ ला सुटेल. सावंतवाडीहून ८-५५ ऐवजी ८ वा., कुडाळ येथून ८.२२ला, सिधुदुर्ग ८.३७, कणकवलीहून ९. ०१ वाजता रत्नागिरी ती ११.३० ला पोचेल. दिव्याला पूर्वीपेक्षा १ तास आधी पोचेल. दिवा येथूनही ती एका आधी सुटेल. उन्हाळी हंगामापर्यंत (१ एप्रिल ते ६ जून) जनशताब्दी दादर-सावंतवाडी आणि मंगलोर या एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे जोडले जाणार आहेत.

सावंतवाडीत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ
केंद्र सरकारचे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचालित दे.भ.शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे सुरु करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सांगितले. त्याची माहिती पुस्तिका एप्रिल ११ पासून कॉलेजमध्ये मिळू शकेल. यंदापासून बी.ए., बी.कॉम, पर्यटनाच्यादृष्टीने टुरिझम स्टडीज हे अभ्यासक्रम सुरु होतील. अधिक माहितीसाठी (०२३६३) २७१४२५

सहवेदना *
श्री. अण्णा आरोस्कर वेंगुर्ले येथील मूळचे रहिवाशी श्री. रमेश उर्फ अण्णा वसंत आरोस्कर (७०) यांचे २९ मार्च रोजी मुंबई - वर्सोवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते टाटा युनिसीस या नामांकित कंपनीचे पहिले भारतीय व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, दोन भाऊ, एक बहिण, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्री. नारायण केळजी वेंगुर्ले गाडीअड्डा येथील रहिवासी व वेंगुर्ले न्यायालयातील बेलिफ नारायण उर्फ अरुण दत्ताराम केळजी (५६) यांचे २९ मार्च रोजी सकाळी अस्थमाच्या अॅटॅकने निधन झाले. ते गाडीअड्डा मित्रमंडळाचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. जिल्हा न्यायालयातील सुप्रिटेंडेंट मोहनदास केळजी यांचे ते बंधू होत.
अनिता करंगुटकर उभादांडा - सुखटनवाडी येथील श्रीमती अनिता अंकुश करंगुटकर (७४) यांचे २२ मार्चला वृद्धापकालीन आजाराने निधन झाले. सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक रामचंद्र करंगुटकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment