Thursday 14 April, 2011

अंक १४ वा, १४ एप्रिल २०११

संपादकीय *

लोकपालामुळे सर्वव्यापी भ्रष्टाचार थांबेल काय?

अण्णा हजारे यांनी थेट दिल्लीवर स्वारी करुन गेली सुमारे साठ वर्षे प्रलंबीत राहिलेले लोकपाल विधेयक मांडण्यासाठी सत्ताधा-यांना ‘मजबूर‘ केले आणि चार दिवस चाललेले आपले आमरण उपोषण थांबविले. प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने एक ‘इव्हेंट‘ संपला! या उपोषणाचा आणि ‘सेलीब्रेटींनी‘ त्यांना दिलेल्या पाठिब्याचाही टी. व्ही. च्या वृत्तवाहिन्यांनी कसा ‘इव्हेंन्ट‘ केला हे तमाम भारतवासीयांनी पाहिले. आता या वृत्तवाहिन्या आणि सर्व क्रिकेटप्रेमी भारतीय विकल्या जाणा-या क्रिकेटपटूंच्या ‘आय.पी.एल‘ स्पर्धेमध्ये गुंग होऊन गेलेले आहेत. आता अण्णांच्या या उपोषणावर पत्रकार, विचारवंत, राजकारणी आणि ‘सेलीब्रेटी‘ वृत्तवाहिन्यांवर वांझोटी चर्चा करतांना दिसतील. अण्णांच्या या उपोषणावर, त्यामुळे घडणा-या किवा घडू शकणा-या घटनात्मक पेचप्रसंगावर लेख, वाचकांची पत्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होतील. या लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या अण्णांच्या नेतृत्वाखालील आंदोलनकर्त्यांच्या आणि सरकार पक्षाच्या समित्यांच्या बैठकांवर बैठका होत राहून प्रस्तावित लोकपाल विधेयक कदाचित विस्मृतीतही जाईल! एक गोष्ट मात्र सर्वमान्य आहे, ती म्हणजे अण्णांच्या प्रामाणिक हेतूंविषयी, त्यांच्या स्वच्छ चारित्र्याविषयी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असणा-यांची सुद्धा कोणतीच शंका नाही. म्हणूनच त्यांच्या उपोषण आंदोलनाला देशभरातील विविध क्षेत्रांतून जाहीर पाठिबा मिळाला. महाराष्ट्रात तर प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर अण्णांना पाठिब्यासाठी प्रशासकीय कार्यालयांसमोर शांततापूर्ण निदर्शने करुन सरकारला निवेदने सादर करण्यात आली. अनेक ठिकाणी मिवरणूकाही काढण्यात आल्या. प्रत्यक्ष दिल्लीत माजी पोलिस महासंचालक श्रीमती किरण बेदी, योग गुरु पू. रामदेव बाबा, स्वामी अग्नवेश अशा व्यक्तिच्या सक्रीय पाठिब्यामुळे अण्णांच्या या आंदोलनाला एक प्रकारचे तेजोबळ मिळाले. हे सर्व बरोबर असले तरी प्रस्तावित लोकपाल विधेयक मंजूर झाल्यावर देशात सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार थांबेल काय? भ्रष्टाचारी राज्यकर्ते आणि नोकरशाही सुधारेल काय? याचे उत्तर सध्या तरी नकारार्थीच येईल. भ्रष्टाचाराला लगाम घालता यावा यासाठी अण्णांच्याच दीर्घ प्रयत्नांमुळे सरकारने जनतेला माहितीचा अधिकार बहाल केला. त्यामुळे प्रशासन यंत्रणेला काही प्रमाणात जरब बसली. हजारो लोकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करुन जनजागृतीचे मोठेच काम केले. पण, जनमताचा दबाव सातत्याने राहू शकत नाही. त्यामुळे माहितीचा अधिकार कायद्याला धाब्यावर बसवून मनमानी करणारे अधिकारी निर्माण झाले. अगदी अलिकडे निलंबित झालेले राज्याचे माहिती आयुक्त तिवारी हेच भ्रष्ट निघाले! लोकांना तात्काळ ‘रिझल्ट‘ हवा असल्याने माहिती अधिकार कायद्याची विलंबीत कार्यपद्धती लोकांना त्रासदायक आणि प्रशासनाला फायद्याची ठरु लागली. त्यामुळे लोकही त्याबाबतीत उदासीन होऊ लागले. तरीही माहिती अधिकाराचा चिकाटीने पाठपुरावा करुन सरकारी यंत्रणेला सरळ आणता येते हे मात्र सिद्ध झाले आहे. या अधिकाराचा अनेकदा दुरुपयोगही होतो हे खरे असले तरी त्यावरही उपाययोजना करता येईल. प्रस्तावित लोकपाल विधेयक सत्ताधा-यांना प्रसंगी अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात आल्यामुळेच इतकी वर्षे ते प्रलंबीत राहिलेले आहे. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाला सर्व थरातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिबा मिळाला असला तरी कोणत्याही राजकीय पक्षाने किवा पक्ष नेत्याने जाहीर पाठिबा दिलेला नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे. पण मुळात या विधेयकाची गरज वाटली ती अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी नीट पारदर्शीपणे होत नाही त्यामुळे. साठ वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली आपल्या सार्वभौम प्रजासत्ताकाची घटना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीने सांगोपांग अभ्यास करुन, सर्व शक्यशक्यतांचा विचार करुन प्रदीर्घ चर्चा करुन तयार केलेली आहे. जगातील अनेक सार्वभौम देशांनी आपापल्या देशाची घटना तयार करतांना भारतीय राज्यघटनेचा आधार घेतलेला आहे. अशा या घटनेत सत्ताधा-यांनी आपल्या सोयीसाठी काही दुरुस्त्या, बदल बहुमताच्या जोरावर करुन घेतले असले तरी घटनेची मूळ चौकट कायम राहिलेली आहे. त्यामुळेच न्यायालये, प्रसारमाध्यमे बेगुमान सत्ताधा-यांना सरळ मार्गावर आणू शकतात. अण्णा हजारे यांच्या आत्ताच्या आंदोलनातून हेच दिसून आलेले आहे. अर्थात केंद्रातील विद्यमान सत्ताधा-यानी मान तुकविली ती काँग्रेस पक्षाच्या एकमेव श्रेष्ठी सोनिया गांधी यांच्या आदेशामुळे. घटनेनुसार सर्वसत्ताधीश असलेले पंतप्रधान आणि घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना कोणी विचारलेच नाही. किबहूना सोनियांच्या मतापुढे त्यांच्या मताला काही किमतच नव्हती. हेही या निमित्ताने प्रकर्षाने दिसून आले. म्हणूनच अण्णा हजारे यांनी आभार मानले ते सोनिया गांधी यांचे! आता लोकपाल विधेयकासंबंधी अण्णा हजारे यांचे आंदोलन यशस्वी झाल्याने त्यांनी आता शिक्षण, आरोग्य, निवडणुक नियमात सुधारणा अशा गोष्टींकडे लक्ष देण्याचे जाहीर केले आहे. त्याकरिता एकटे अण्णा हजारे पुरेसे पडणार नाहीत. खरोखरीच ज्यांना देशहिताची तळमळ आहे अशी कार्यकर्त्यांची नवीन फळी, त्यांना सहाय्य करण्यासाठी तरुणांची देशव्यापी संघटना उभी राहणे आवश्यक आहे. सर्वच गोष्टीत विविधता आणि विभिन्नता असलेल्या आपल्या खंडप्राय देशात हे काम तसे सोपे नाही. पण त्याची सुरुवात तरी झाली आहे. लोकपाल विधेयक मंजूर होऊन त्याची कार्यपद्धती अंमलात आली की, देशात सर्वव्यापी झालेला भ्रष्टाचार लागलीच थांबेल असे नाही. नुसते कायदे आहेत म्हणून गुन्हेगारी संपत नाही हे आपण नेहमीच अनुभवतो. कायद्याचे रक्षकच बिनदिक्कतपणे कायदे मोडतांना दिसतात. तसेच या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांबाबत होणार आहे. पण म्हणून असे कायदेच असू नयेत असे नव्हे. कायद्याचा आदर करणारी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणा जेव्हा येईल तेव्हा या कायद्याच्या आधारावरच त्यांना राज्य करणे सुलभ जाईल.


अधोरेखित *

आरोग्य पर्यटनातून आयुर्वेद विकास

सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन एक तप उलटून गेलं. पर्यटन आणि जिल्हा विकास असा जेव्हा विषय समोर येतो तेव्हा आयुर्वेद उपेक्षित ठेवून कसा चालेल? आणि शेजारच्या राज्याचा विकास जर आयुर्वेद या माध्यमातून होत असेल तर आमचा जिल्हा त्यात मागासलेला का ठेवावा? जसे केरळ राज्याचा सर्व विकास हा आयुर्वेद आधारावरच झाला आहे. केरळची वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा म्हणून केरळीय पंचकर्म हा प्रकार खूप प्रचलीत झाला आहे. खरं पाहायला गेलं तर आयुर्वेद शास्त्रानुसार केरळीय पंचकर्म हे आयुर्वेदातील फक्त पूर्वकर्म आहे. पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. या प्रत्येक कर्माच्या सरुवातीला स्नेहन स्वेदन केले जाते. म्हणजे तेल लावणे आणि शेक देणे. केरळच्या उपचारामध्ये केवळ तेल लावणे आणि शेक देण्याचेच अधिक प्रकार दिसतात. मग ते शिजवलेल्या तांदुळ उडीदाचे मिश्रण असेल किवा तेलाची आंघोळ असेल! आज केवळ ही पूर्वकर्म करुन जर केरळची अर्थनीती बदलत असेल तर महाराष्ट्रात सर्व पंचकर्मे शास्त्रोक्त आणि शासकीय स्तरावर केली गेली तर महाराष्ट्राची अर्थनीती संपूर्ण बदलून जाईल यात तीळमात्र शंका नाही. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. आरोग्यासाठी पर्यटक जिल्ह्यात आले पाहिजेत तर जिल्ह्यात काय पाहिजे? मूलभूत सुविधा, आयुर्वेद माहिती केंद्र, छान गावाबाहेर गर्दीपासून दूर असलेले उत्तम सेट अप असलेले अत्याधुनिक पंचकर्म उपचार केंद्र, बाहेरुन दिसायला झोपडी पण आतमध्ये शेणाने सारवलेली जमिन, पण विदेशी पर्यटकांच्या पायाला शेण लागू नये म्हणून पोफळीपासून बनवलेल्या सपाता, वर पंखाही पाहिजे, पण लाईटपेक्षा तुपाचा दिवादेखील पर्यटकांना वेगळा आनंद देऊन जाईल. आुर्वेदीय पद्धतीने बनवलेला आहार, भारतीय बैठकीवर समोर चौरंग आणि त्यावर केळीच्या पानावर वाढलेले अन्न, पानाभोवती सुंदर रांगोळी, त्यापुढे पेटलेला तेलाचा दिवा असा साज असेल तर पर्यटक का खूष होणार नाहीत आणि हे सर्व आपण आरोग्यासाठी देतोय, हे सर्व आयुर्वेदीयच आहे हे उत्तमरीत्या पटवून देणारा चकचकीत आयुर्वेदीय गाईड! एकदा हा सेट अप तयार झाला की पर्यटकांची पावले आपोआपच इकडे वळणार! जसे भुंग्याला फुलाचा वास दाखवावा लागत नाही. तो भुंगा फूल शोधत वासापर्यंत आकर्षित होतो. तसेच पर्यटकांना एकदा हा आयुर्वेदाचा सुगंध समजला तर पर्यटकांचा सिधुदुर्गातील ओघ थांबणार नाही. आज केरळमध्ये आरोग्याची पॅकेजीस दिली जात आहेत. एका आठवजड्याचे पॅकेज १५,००० रुपयांपासून ५०,००० रुपयांपर्यंत असते. सिधुदुर्गातील काही मुलांना तयार केले तर ही सुशिक्षित मुले आवश्यक असतील ती पंचकर्म, तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करु लागतात. एक गावच संपूर्णपणे आयुर्वेदीय पण शास्त्रोक्त पद्धतीने वसवायचे, उभारायचे! यालाच आयुर्वेद ग्राम असेही आपण म्हणू शकतो. जिथे संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने शेती केली जाईल. पालेभाज्या, कडधान्ये, तांदुळ, कुळीथ आदि कोकणी धान्यांचे उत्पादन तसेच अननस, केळी, कलींगड इ. फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाईल. आंतर पिकांमध्ये लवंग वेलची, कांदा, लसूण इ. पिके, गोपालनावर आधारीत ही शेती असेल. गोपालनापासूनच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, टाकावू गोमूत्र, गोमय इ. पासून खताची निर्मिती, हेच खत तयार होणा-या शेतीला वापरले जाईल. कुंपणावर बांबूची लागवड केली जाईल. रिकाम्या मळ्यांमध्ये, डोंगर उतारावर, जंगल भागात, आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली जाईल. यासाठी आयुर्वेद महाविद्यालये, कृषि महाविद्यालये, दापोली कृषी विद्यापीठ इ.चे सहाय्य घेता येईल. एका गावात या पर्यटनातून ४०० ते ५०० माणसांचे पोट सहज भरु शकेल. साध्या हलक्या काम करण्यापासून डॉक्टरपर्यंत सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. तयार झालेली दूध, तूप, श्रीखंड, जाम, सेंद्रीय खते, फळभाज्या पालेभाज्या इ. उत्पादने बाजारात विक्री करण्याचेही काम बेरोजगारांना मिळू शकते. बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करुन विकल्या जाऊ शकतात. कच्चा माल विकण्यापेक्षा तयार माल विक्रीवर जास्ती भर दिला तर भरपूर रोजगार निर्मिती होऊ शकते. आज आरोग्यासाठी पर्यटन हा नवीन फंडा रुढ होत चालला आहे. विदेशातून भारतात केवळ रोगमुक्तीसाठी, शस्त्रकर्म करवून घेण्यासाठी भारतात अनेक रुग्ण येत असतात. विशेषतः दातांच्या समस्येसाठी, हृदय रोगासाठी, त्वचा, केस प्रत्यारोपणासाठी जगभरातून लोक आज भारतात येतात. त्यांना रोग मुक्ती देण्यासाठी आयुर्वेदासारखा समर्थ पर्याय आपण देऊ शकतो. पण त्याला प्रबळ लोकशक्ती आणि राजकीय इच्छाशक्तीचेही बळ आवश्यक आहे.


विशेष -

एक पिकनीक आयुर्वेदीक ......

‘‘अहो, मी सहा दिवस नाही.‘‘ ‘‘म्हणजे कुठं शुटिगला निघालाय?‘‘ ‘‘नाही.‘‘ ‘‘नाटकाचे प्रयोग?‘‘ ‘‘नाही.‘‘ ‘‘मग काय घरी कुणाचं लग्न वगैरे?‘‘ समोरचा निर्माता मला एकामागोमाग एक प्रश्न विचारत होता. त्याला एक अॅड शूट करायची होती. ‘‘पण सहा दिवस तुम्ही जाऊन काय करणार? आजकाल नवरानवरी सुद्धा तीन पेक्षा जास्त दिवस रजा टाकत नाहीत. एन आर आय मुलं तर आठवड्याचीच रजा घेऊन येतात. मुली बघून ठरवून लग्नं करून निघूनही जातात.‘‘ ‘‘मला लग्नंही नाहीये करायचं.‘‘ ‘‘मग कशाला जाताय? कुठे जाताय?‘‘ ‘‘मी सव्र्हसिग करायला चाललोय. मझ्या बॉडीचं.‘‘ ‘‘काय?‘‘ निर्माता हादरलाच. पण तुम्ही नका हादरू. त्याचं काय की, आपल्याला वाटतं शरीर काम करून थकतं. मग त्याला रोज रात्री पुरेशी झोप दिली की संपलं. शरिराच्या स्वच्छतेसाठी नीट आंघोळ केली की झाली स्वच्छता. पण हे पुरेसं नाही. कारण आंघोळीनं होते ती बाहेरची स्वच्छता. आतल्या स्वच्छतेचं काय? आतली स्वच्छता म्हणजे शरीरशुद्धी. संपूर्ण शरीरशुद्धी. आयुर्वेद सांगतं वर्षातनं किमान दोनदा आपण शरिराच्या अंतर्भागाची स्वच्छता करायला हवीच. ज्यायोगे आंतड्यात, शरिराच्या आतल्या भागात लपून बसलेले अनारोग्यकारक घटक बाहेर टाकले जातात. आता तुम्ही म्हणाल अहो या कामाच्या धामधुमीत सहा दिवस काढायचे कसे? पण मला सांगा, जेव्हा आपल्याला कंपल्सरी आजारी पडावं लागतं तेव्हा घेतोच ना सक्तीची विश्रांती? म्हणूनच अशा विश्रांतीपासून सुटका मिळावी म्हणून निसर्गाच्या सानिध्यातली ही प्रकृती मधली आयुर्वेदिक सहल किवा पिकनीक अधिक मजेची आहे. ही आयुर्वेदिक सहल किवा पिकनीकच!!! इथे एकतर स्नेहन, स्वेदन... अशी पंचकर्म केली जातात. यात पोटाची म्हणजे दोन्ही आंतड्याचीं शुद्धता म्हणजे बस्थ दिली जाते. मसाज केला जातो. वाफ घेणे, वेगवेगले लेप लावणे अशा ट्रीटमेंटस् द्वारे शरिराची स्वच्छता होते. याची गरज भासते कारण आजकालची जीवनशैली. एक तर स्वच्छ मोकळी हवा ही मिळतच नाही. त्यातच ते प्रदुषण. धूळ, धूर, कचरा, अशुद्ध परिसर... याचा शरिरावर परिणाम होतो. त्यातच आहारात ठाण मांडून बसलेलं फास्टफूड, बेकरीचं खाणं, हॉटेलिंग आणि सकस, शुद्ध घरगुती चौरस आहाराचा अभाव. त्यामुळे पोटावर अन्याय होतो. मग त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे हे शरिर नामक यंत्र नादुरूस्त व्हायला लागतं. बरं त्याची कुरकुर सुरू झाली की आपण ते तात्पुरते अॅलोपॅथीचे उपाय करून त्याला तात्पुरती ट्रीटमेंट दिल्यासारखं करून गप्प बसवतो. पण मग हे विकार बळावतात आणि दीर्घ परिणाम करू लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे पाच सहा दिवस किवा अगदी तीन तरी दिवस राहून या सगळ्याची स्वच्छता करून मिळते. बरं शहरी जीवन म्हणजे धावपळ, टारगेटस्, मनाविरूद्ध काम किवा कामात स्वतःला बुडवून घेणं. यातून निर्माण होतात ताणतणाव. मानसिक आरोग्य बिघडतं. त्याचे परिणाम चिडचीड, परफॉर्मन्स खराब होणे या स्वरूपात होतात. त्या ताणामुळेही काही विकार उत्पन्न होतात. प्रकृतीतलं हे पंचकर्म मानसिक तणावांपासून मुक्ती देणारं आहे. कारण स्वच्छ व तंदुरूस्त शरिरातच ताकदवान मन वास करतं जे सारे ताण तणाव झेलू शकतं. म्हणून मी कामाचं असं नियोजन करतो की वर्षातून दोनदा इथे येता येईल. आणि इथे येण्यासाठी काही कामं सोडावी लागली तरी चालतं मला, कारण इथले सहा दिवस मला सहा महिन्यांचा तजेला देतात. म्हणून मी तुम्हाला सांगेन की पाच दिवसांच हे पंचकर्म सर्व कुकर्मावरचा उपाय आहे. हं हं..... कुकर्म म्हणजे हे अबर चबर खाणं, धावपळ व शरिराकडे दुर्लक्ष हो! फक्त पैशाचा विचार करणा-या त्या निर्मात्याला हा वेडेपणाच वाटला. पण आरोग्यम धनसंपदा हे सांगणा-या आयुर्वेदावर विश्वास ठेवणा-या तुम्हा आम्हाला हे पटायला हरकत नाही. कारण साधी बाईक असो, सायकल असो, वा कार.... मेकॅनिक ती खराब झाल्यावर पहिला प्रश्न विचारतो, या आधी सव्र्ंहसिग कुठं आणि केव्हा केलं होतं? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर? प्रकृतीतलं पंचकर्म. रामबाण उपाय आहे सव्र्ंहसिग वरचा. शरिराची शुद्धी म्हणजे मनाची शुद्धी. इथला आयुर्वेदीक आहार जीवनशैली आपल्याला अधिक तरूण ताजं तवानं आणि कार्यक्षम बनवते. म्हणूनच सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा. आणि चला आयुर्वेदिक पिकनीकला.... प्रकृतीमध्ये.... निसर्गाच्या कुशीत.

प्रकृती आयुर्वेदीक हेल्थ रिसॉर्ट मु. पो. यवतेश्वर, ता. जि. सातारा. मोबा. ९८५०९९४४७३. मुंबई संफ - नम्रता- ९९३०१६७७१


मूले कुठारः अर्थात मुळावर घाव

सुरुवातीला अगदी साधी वाटणारी लक्षणे दुर्लक्ष केले असता भीषण रुप धारण करतात. अशावेळी अगदी मूळ कारण शोधून चिकित्सा करावी लागते. लक्षणानुरुप चिकित्सा अशा वेळी विशेष उपयोगी ठरत नाही. यासाठी ‘मुले कुठारः‘ या न्यायाने व्याधीचे मूळ शोधून त्यावरच घाव घालावा लागतो. या प्रकारचा अनुभव व्यवसायात पुष्कळ वेळा येतो. एकदा एक तेरा वर्षाची मुलगी दवाखान्यात आई वडिलांबरोबर आली. कृश अंग, गोरी परंतु निस्तेज, संत्रस्त चेहरा व खूप घाबरलेली. जवळजवळ चार महिने तिला सतत सुका खोकला होता. भूक नव्हती, पाय वळत, पोट-या दुखत, अशक्तपणा ही सर्व लक्षणे होती. रात्री आडवी झाली की खोकला सुरु होत असे. सर्व प्रकारची औषधे व आवश्यक तपासण्या करुन झाल्या. परंतु काहीच गुण नव्हता. आता आयुर्वेदिक तरी करुन बघुया, या उद्देशाने ती आमच्याकडे आली. एका वर्षापूर्वी तिने नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी शिष्यवृत्तीची परीक्षा म्हणून क्लास व त्यामुळे सायकलींग, त्यातच कराटेचा सराव. या सर्व गडबडीत तिची रजः-प्रवृत्ती दोन महिन्यापूर्वीच सुरु झाली होती. पहिल्या दोन महिन्यात बरोबर महिन्याची पाळी आली व स्त्रावही व्यवस्थित होता. तिस-या महिन्यात स्त्राव सुरु असताना तिने डान्स व कराटेचा भरपूर सराव केला व पुढे दोन महिने असेच चालू राहिले. त्याच्या परिणामी स्त्रावाचा कालावधी दहा दिवस झाला. प्रमाणही भरपूर होते. ही तिची तक्रार तशीच होती. हळूहळू तिच्या स्वभावातील चिडचिड वाढली, अशक्तपणा जाणवू लागला, मळाच्या गाठी झाल्या व दोन दिवस आड मलप्रवृत्ती होऊ लागली, भूक कमी झाली, अभ्यासात मागे पडू लगाली, निस्तेज झाली व अखेरीस खोकला सुरु झाला. आयुर्वेदानुसार ही सर्व विकृती वाताची लक्षणे होती. बस्ती घेणे आवश्यक होते. खोकल्याने खूपच संत्रस्त झाल्याने ती बस्तीसाठी लगेचच तयार झाली. त्यामुळे चिकित्सा करणे सोपे झाले. (बस्ती ही वातदोषावरील श्रेष्ठ चिकित्सा आहे. परंतु ब-याच रुग्णांची बस्ती घेण्याची मानसिकता नसते. कारण बस्ती म्हणजे ‘एनिमा‘ अशी त्यांची ठाम समजूत असते.) तिला सिद्ध तेलाची मात्रा बस्ती दिली व दुस-या दिवशी पुन्हा बोलाविले. जवळजवळ चार महिने खोकल्याने अजिबात न झोपणारी त्या रात्री शांत झोपली. या चिकित्सा उपक्रमाने ती पूर्ण बरी झाली. पुढे शारिरीक क्षमता वाढण्यासाठीही तिने चिकित्सा घेतली. या सर्व गोष्टींमुळे मुळातच हुषार असलेली ती अधिक सक्षम झाली. ती मुलगी वेळेवर चिकित्सेसाठी आली व बरी झाली. परंतु हिच्यासारखी आणखी कितीतरी मुले मुली असतील की ती स्पर्धेच्या नादात आपले स्वास्थ्य गमवत असतील. सर्व गोष्टी साध्य करण्याची आपल्या पाल्याची शारिरीक क्षमता आहे की नाही याचे भान प्रत्येक पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलाला/मुलीला सर्वच गोष्टी यायला हव्यात हा पालकांचा अट्टाहास असतो. ब-याच वेळा मुलांना त्या विषयाची आवडही नसते. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही की मुलांनी किवा स्त्रियांनी या विशिष्ट अवस्थेत शारीरिक श्रमाचे कोणतेही काम करावयाचे नसते. या दिवसात मुळातच वातप्रकोप झालेला असतो. त्यामुळे वातप्रकोप गोष्टी (उड्या मारणे, नाचणे, सायकलींग करणे, शिलाई मशिनवर काम करणे, खणणए, ओझे उचलणे, दळणे, कांडणे, शारिरीक श्रमाची कामे/खेळ इ.) टाळणे आवश्यक आहे. सध्या दूरदर्शनवर विविध प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती असतात. ते वापरल्याने त्या जाहिरातीतील मुली या दिवसात अवघड वाटणा-या गोष्टी अगदी सहजपणे करतात, असे या जाहिरातींद्वारे वारंवार ठसविले जाते. हे बघितल्यावर ब-याच वेळा बघितलेल्या गोष्टीचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढते. त्रास होत असूनही अवघड वाटणा-या सर्व क्रिया आपणही या सर्व गोष्टी करु शकतो अशी समज करुन घेतली जाते व ज्यावेळी त्रास वाढतो आहे हे लक्षात येते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. मुलांच्या पालकांनी या गोष्टी समजावून सांगणे आवश्यक आहे. बारीकसारीक लक्षणेच पुढे अधिक भीषण होतात. ती तेवढीच म्हणजे त्या विशिष्ट भागापुरती मर्यादित राहिली तर त्यांची चिकित्सा करणे सोपे जाते. परंतु ब-याच वेळा पहिली लक्षणे तशीच असतात व शरीराच्या दुस-याच भागात अचानक तीव्र स्वरुपाची लक्षणे निर्माण होतात. वेळ निघून गेल्यानंतर आपण स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्यापेक्षा सुरुवातीच्या प्राथमिक लक्षणातच अचूक निदानाने योग्य औषध योजना झाली आणि त्याप्रमाणे रुग्णाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर पुढचे गंभीर आजार वेळीच टळू शकतात. अशा वेळी रुग्णाला पूर्णपणे विश्वासात घेऊन इतिहास जाणून घ्यावा लागतो. आजाराचे कारण लक्षात आल्यावर ‘मूले कुठारः।‘ या न्यायाने मूळावरच घाव घालणे सोपे जाते.

- वैद्य सौ. माधुरी मु. प्रभुदेसाई मोबा. ९४२३८८४३२१


विशेष बातम्या *

कोट्यावधींचे लोहखनिजातले सोने परदेशात

गोवा आणि सिधुदुर्गात उत्खनन करून परदेशी पाठविल्या जाणा-या लोहखनिजात टनामागे दोन ते पाच ग्रॅम सोन्याचा अंश असल्याचा अहवाल डंपर मधील लोहखनिज तपासणी करून आपण सरकारला दिला असल्याचे प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ एम. के. प्रभू यांनी सांगीतले आहे. परंतू सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हे सोने खनिजाबरोबर परदेशात जाते तेथे खनिज मातीमधील सोन्याचा अंश वेगळा करून संबंधीत कंपन्या मोठा नफा मिळवित असाव्यात असाही दावा प्रभू यांनी केला आहे. लोहखनिजातून कमी खर्चात सोने मिळविण्याचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया व कॅनडाने विकसीत केले असून ते तंत्रज्ञान वापरून आपल्या देशातही सोने वेगळे करता येईल. हे सरकारला कळविले असूनही याबाबतीत सरकारी उदासीनता संशयास्पद आहे.


एम. आय. डी. सी.च्या जमिनी परत करा ः शेतक-यांची मागणी

कुडाळ - पिगुळी व नेरुर गावातील २९२ शेतक-यांची सुमारे ६७० एकर जमीन १९७४ साली सरकारने औद्योगिक विकासासाठी संपादन केली. स्थानिकांना रोजगार, नोक-या मिळतील या आशेने प्रतिगुंठा ५० रु. इतक्या अल्प मोबदल्यात लोकांनी जमिनी दिल्या. त्यास ३५ वर्षे झाली. एम.आय.डी.सी.तील या भूखंडांपैकी जेमतेम १५ ते २० टक्के भूखंडावर काही औद्योगिक युनिटस् कशीबशी चालू आहेत. बाकीच्या भूखंडांपैकी अनेक भूखंडांवर एम.आय.डी.सी.च्या भ्रष्ट अधिका-यांशी संगनमत करुन काहींनी निवासी बंगले बांधले आहेत. म्हणजे एम.आय.डी.सी.स्थापन करण्याचा मूळ उद्देश बाजूलाच पडला. जिल्हा उद्योग केंद्रही या प्रकारात सामील आहे. संपादित जमिनीचा वापर होत नसल्याने संबंधीत शेतक-यांना या जमिनी परत मिळाव्यात यासाठी शेतक-यांनी संघटीतपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन निवेदन दिले आहे. जनता दलाचे प्रा. गोपाळ दुखंडे, कमलताई परुळेकर आदींसह शेतक-यांनी हे धरणे आंदोलन केले. त्यांना काँग्रेसचे नेते पुष्पसेन सावंत यांनीही पाठिबा दिला आहे.


स्वच्छता अभियानात कुशेवाडा ग्रा.पं.प्रथम, केळूस द्वितीय, परबवाडा तृतीय

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम, वेंगुर्ले तालुकास्तरीय स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायत प्रथम, केळूस ग्रामपंचायतीने द्वितीय, तर परबवाडा ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. या तीनही ग्रा. पं. ना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख, दोन लाख रुपये रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. कल्याण येथील मूल्यमापन समितीने प्रभागस्तरावर कुशेवाडा, केळूस, परबवाडा, वायंगणी, वेतोरे, पाल, पेंडूर, होडावडा, म्हापण, उभादांडा, आसोली, सागरतीर्थ, आरवली, शिरोडा या पंधरा ग्रामपंचायतींच्या कामांचे मूल्यमापन केले होते. त्यात ७४.४६ टक्के गुण मिळवून कुशेवाडा प्रथम, केळूस (७०.४० गुण) द्वितीय, परबवाडा (६९.३६) तृतीय क्रमांक. तसेच सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडीचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक कुशेवाडा अंगणवाडीला व सावित्रीबाई स्वच्छ शाळाचे ५० हजारचे बक्षिसही कुशेवाडा शाळेने पटकाविले आहे. शाहू-फुले-आंबेडकर दलिवस्ती विकास व सुधारणा बक्षिस परुळे ग्रामपंचायतीस मिळाले.


हरिहर आठलेकर, मोहन कुंभार यांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन

साकव प्रकाशन संस्थेच्यावतीने हरिहर आठलेकर यांच्या ‘वाळूतली पावलं‘ या कथासंग्रहाचे व मोहन कुंभार यांच्या ‘कोवळं आभाळ‘ या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन कणकवली येथील लेखक विद्याधर करंदीकर व डॉ. श्रीपाद कशाळीकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी या दोन्ही पुस्तकांच्या साहित्यिक मूल्यांबाबत विचार मांडले. यावेळी हरिहर आठलेकर यांनी सध्याच्या काळात मूल्य जपणे आवश्यक आहे. मूल्य जपण्याचे काम कोकणात होत आहे, असे स्पष्ट केले. तर मोहन कुंभार यांनी समाजातील आघाडी साहित्यातून मांडली पाहिजे. कोकणात अनेक प्रश्न आहेत. त्यांचे चित्रण लेखनातून होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. शरयू आसोलकर, डॉ. गोविद काजरेकर, प्रा. रविद्र सकपाळ यांनी पुस्तकाबाबत मत व्यक्त केले. प्रा. सुमेधा नाईक-धुरी, कल्पना बांदेकर यांनी ग्रंथातील निवडक भागाचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. काजरेकर यांनी केले. यावेळी साकव प्रकाशनाचे हरिहर वाटवे, व्यवस्थापिका नीला आपटे उपस्थित होत्या.


मुक्त विद्यापीठाचा गुणवत्ता पुरस्कार खर्डेकर कॉलेजला

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात १९९० मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र, तत्कालीन कुलगुरु डॉ. राम ताकवले यांनी या अभ्यासक्रमाचे खर्डेकर महाविद्यालयात येऊन उद्घाटन केले. त्यावेळी हे सिधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले अभ्यासकेंद्र होते. या केंद्रातून सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच शेजारच्या गोवा राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला त्यामुळे हे महाराष्ट्र - गोवा राज्यातील एकमेव केंद्र बनले होते. नंतर इतरत्र केंद्रे सुरु झाली. वेंगुर्ले केंद्रातून गेल्या २० वर्षात शेकडो व्यक्तींनी पदवी शिक्षण पूर्ण केले. सध्या या केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या ३००च्यावर असू बी.ए., बी.कॉम व पूर्वतयारी अभ्यासवर्ग चालू आहेत. खर्डेकर महाविद्यालय चालविणा-या कोल्हापूरच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे या केंद्राला बहुमोल सहकार्य लाभले. तज्ञ शिक्षकांनी चांगले अध्यापन केले. त्यामुळेच महाविद्यालयाला मुक्त विद्यापीठाचा ४० हजार रुपयांचा गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांनी अभ्यास केंद्राचे प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ फडतरे व केंद्रसंयोजक प्रा.एस.बी.चौगले तसेच केंद्र सहाय्यक प्रा.ए.के. बिराजदार यांचा संस्थेतर्फे जाहीर सत्कार केला.

1 comment: