Thursday, 24 February 2011

अंक ८वा, २४ फेब्रुवारी २०११

संपादकीय *
डच वखारीच्या जीर्णोद्धाराला विरोध का?
वेंगुर्ल्यातील डच वखारीचा जीर्णोद्धार हॉलंड सरकारच्या मदतीने होणार असल्याची बातमी प्रसिद्ध होताच सावंतवाडीचे माजी आमदार जयानंद मठकर यांनी ‘गुलामीच्या प्रतिकांचा उद्धार कशासाठी?‘ या शीर्षकाचे पत्र वृत्तपत्रांतून छापून आणले. (याच अंकात ते आम्ही प्रसिद्ध केले आहे.) देश स्वतंत्र झाल्यानंतर गुलामीची प्रतिके असलेल्या वास्तूंचे जतन करण्याचे काही कारण असे त्यांचे म्हणणे आहे.
जयानंद मठकर हे जिल्ह्यातील समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते, पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकही आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदरच आहे. वयाच्या ८० वर्षे ओलांडल्यावरही भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला आहे. परंतू त्यांनी डच लोकांनी चारशे वर्षापूर्वी व्यापारी उपयोगासाठी बांधलेल्या वखारीचा जीर्णोद्धार करुन तेथे पर्यटनदृष्ट्या काही योजना आणण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याचे काही कारण नव्हते. या विरोधामागच्या त्यांच्या ‘स्वाभिमानी‘हेतूविषयी शंका नसली तरी त्यामागे वेंगुर्ल्याविषयीचा सावंतवाडीकरांचा पुरातन आकस मात्र जरुर दिसून येतो.
त्यांच्या म्हणण्यानुसार परकीय आक्रमकांनी भारतात निर्माण केलेल्या वास्तू नष्ट करावयाचे ठरले तर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर, व्हिक्टोरिया टर्मिनस, मुंबई विद्यापीठाची इमारत, क्रॉफर्ड मार्केट (ज्याची छोटी प्रतिकृती वेंगुर्ल्यातही आहे.) अशा वास्तू नामशेष होऊ दिल्या पाहिजेत. यामध्ये अर्थातच गावांची, शहरांची नावेही येतात. जसे क्रूरकर्मा औरंगजेबाचे नाव असलेले औरंगाबाद, अहमदनगर, हैद्राबाद इत्यादी. परंतू शिवाजी महाराजांचे उठता बसता नाव घेणारे ढोंगी निधर्मीवादी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याला विरोध करतांना दिसतात.- इथेही राज्यकर्त्यांच्या विशेषतः शरद पवारांचा बेधडक दुटप्पीपणा पहायला मिळतो. - दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचा निर्णय काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेने घेतला. त्यावेळी बहुमताच्या निर्णयाचा आदर करायला हवा असे म्हणणारे शरद पवार औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या औरंगाबाद महापालिकेच्या निर्णयाविरोधात दंड थोपटून उभे रहातात. कारण ही महापालिका सेना-भाजप युतीकडे आहे. - एकीकडे गोव्यातील आणि अन्य शहरांतील परकीय नावांच्या खुणा स्वतंत्र भारतात पुसल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा आणि महाराष्ट्रातील स्वदेशी मराठेशाही बुडवायला आलेल्या मुस्लीम आक्रमकांची नावे बदलण्याला निधर्मीपणाच्या नावाखाली विरोध करायचा, बाबरी मशीद पाडल्याबद्दल अजूनही शोक करीत बसायचे. असल्या ढोंगी, धर्मनिरपेक्षतावाल्यांना काय म्हणायचे? असो. हे काहीसे विषयांतर झाले. पण तेही मुद्याला धरुन झाले.
वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असलेल्या परंतू वापरात नसल्याने आता सरकारच्या पुरातत्व विभागाने दुर्लक्षित करुन त्याची पडझड होऊ दिलेल्या परकीय आक्रमकांनी आणि भारतीयांनी उभारलेल्या कितीतरी वास्तू आज देशभर आहेत. त्यातीलच ही एक डच वखार. डच लोकांनी त्याकाळी भारताच्या कुठल्याच प्रदेशावर कधी राज्य केलेले नाही. त्यांचा उद्देश व्यापाराचा होता. त्यांनी आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या देशात बांधलेल्या वास्तू डच (आत्ताचे हॉलंड) सरकारने लक्ष घालून त्यांचे पुनरुज्जीवन केले. तर कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्यास समर्थ असलेल्या आपल्या भारत देशाच्या सार्वभौमोत्वावर ते काही आक्रमण ठरणारे नाही.
सुमारे वीस वर्षापूर्वी अॅड. (कै.) राम आजगांवकर यांनी हॉलंड सरकारशी पत्रव्यवहार करुन भारत सरकारचे लक्ष वेधून पुरातत्व खात्याला त्या जागेची साफसफाई करावयास लावली होती. तिथे वॉचमन नेमला. पण पुढे याबाबत योग्य तो पाठपुरावा न झाल्याने या वास्तूची पडझड होत गेली. ते सर्व लेख, बातम्या किरातमध्ये त्यावेळी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यानंतर दहा वर्षापूर्वी पहिला सिधुदुर्ग पर्यटन महोत्सव झाला. त्यावेळी विद्यमान नगराध्यक्ष संदेश निकम यांनी आपल्या वार्डातील या डच वखारीच्या आवारातच वेंगुर्ल्यातला पर्यटन महोत्सव भरवून या पुरातन वास्तूकडे लक्ष वेधले होते. आता हॉलंड सरकारच्या प्रतिनिधीनीच या वास्तूला नुकतीच भेट देऊन तिची पुर्नउभारणी करण्याचे योजिले आहे. तसे झाले तर पुरातन वस्तूंचे संग्रहालय येथे करता येईल. पर्यटन प्रवण सिधुदुर्ग जिह्यात हे एक देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरेल. मात्र याचा सरकारी पातळीवर पाठपुरावा होणे आवश्यक आहे.
आपल्या पूर्वजांनी विविध देशात बांधलेल्या परंतू तेथील सरकारांच्या अनास्थेमुळे पडझड झालेल्या वास्तू जशाच्या तशा पुन्हा उभारणे हा डच लोकांना त्यांच्या देशाचा अभिमानाचा विषय वाटतो. या उलट आपल्याकडच्या इतिहासाविषयी आत्यंतिक उदासीन असणा-या लोकांनी आणि स्वाभाविकपणे सरकारनेही वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे असलेल्या परकीयांच्या अनेक वास्तूंकडे दुर्लक्ष केलेच पण आपल्याच देशबांधवांनी निर्माण केलेल्या वास्तूंच्या दुर्दशेकडेही कधी लक्ष दिले नाही. शिवशाहीतील पराक्रमाची आठवण करुन देणारे गड-किल्ले आज भग्नावस्थेत गेले आहेत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची पुरातन मंदिरे मोडकळीस आली आहेत. अनेक मंदिरांवर, मशिदी आणि चर्च उभी राहिली आहेत. त्या बाबतीत तर यांचा तथाकथित स्वाभिमान पळूनच जातो!
क्रिकेट आणि राष्ट्रकुल स्पर्धा हे गुलामगिरीचे ठळक प्रतीक असणारे खेळ आपण ‘स्वाभिमानाने‘ खेळतो. मग मठकर साहेब कोणकोणत्या गुलामगिरीच्या खुणांचे निर्दालन करणार आहेत?
शिरोड्यातील मीठाच्या सत्याग्रहाचे स्मारक करण्यात स्वातंत्र्यातही नोकरशाही आणि नियमावलीच आड येते आहे. त्याबाबत मठकर साहेब सल्लागार असलेली समिती काय करते आहे? तेव्हा स्वाभिमानच दाखवायचा असेल तर अनेक मार्गांनी भारतावर होणा-या परकीय संस्कृतीच्या आक्रमणांना विरोध करुन दाखवावा.

अधोरेखीत *
जैतापूर प्रकल्पाचा आर्थिक पैलू
इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १९९२ साली महाराष्ट्रात काँग्रेस शासनाने अत्यंत महाग, आतबट्ट्याचा, पर्यावरणाचा व निसर्गाचा नाश करणारा असा द्रवीभूत गॅस आधारित वीजनिर्मिती प्रकल्प अमेरिकेत काळ्या यादीत असलेल्या एन्रॉन कंपनीपुढे पायघड्या घालून निमंत्रित केला. प्रारंभापासूनच एन्रॉन प्रकल्पाची घातकता व धोके उर्जा तज्ञ, अर्थ तज्ञ, यांनी स्पष्ट केले होते व स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला कसून विरोध होता. एन्रॉन विरोधी लाटेवर स्वार होऊन भाजप-शिवसेना युतीने १९९४ च्या निवडणूक काळात एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याचे वचन दिले. जनतेने विश्वासाने युती शासनाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली. युती शासनाने मात्र प्रकल्प हटवण्याचे नाटक करुन मूळ प्रकल्पापेक्षाही अधिक घातक अटींवर एन्रॉनची धोंड महाराष्ट्राच्या गळ्यात बांधली. हे का व कसे घडले ते सर्वज्ञात आहे. मे १९९९ मध्ये वीजनिर्मिती सुरु झाली. विजेचा आश्वासित दर होता २ रुपये युनिट, पण जुलै २००० मध्ये एन्रॉनची वीज ७.८० रु. युनिट एवढी महाग पडली व ती मागणीनुसार वेळेवरही मिळेना म्हणून राज्य वीज मंडळाने २३ मे २००१ रोजी वीज खरेदी करार रद्द केला. डिसेंबर २००१ मध्ये उचापती एन्रॉन कंपनी दिवाळखोर निघाली. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाने जरुर ती पावले टाकून एन्रॉन कंपनी ताब्यात घेणे आवश्यक होते व शक्यही होते. एन्रॉनचा दाभोळ कंपनीतील वाटा केवळ १०० कोटी रुपयात मिळवणे शक्य होते. पण अमेरिकेच्या दडपणाखाली शासनाने कुचराई केली. परिणामी भारताचे किमान ३५००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण?
अमेरिकेच्या दावणीला भारताची स्वायत्तता बांधून अणुऊर्जेच्या स्वागताला पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, नोकरशाही, शासकीय अणुशास्त्रज्ञ आणि प्रसारमाध्यमे सज्ज आहेत.
आपण भारतीय नागरिकांनी एन्रॉनचा अर्थ प्रारंभीपासूनच लक्षात घेऊन त्याला सर्वतोपरी विरोध केला होता. जैतापूर अणुउर्जाप्रकल्प एन्रॉन प्रकल्पाहूनही महाघातक आहे. एन्रॉन प्रकल्प फसल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले तरी अखेर रत्नागिरी गॅस पॉवर इंडस्ट्री लि.ने तो प्रकल्प ताब्यात घेतला. आता रडतखडत का होईना पण थोडी वीजनिर्मिती होते आहे. परंतु अब्जावधीची गुंतवणूक करुन आयात अणुइंधन आधारे जर अणुवीज प्रकल्प उभारले आणि अमेरिकेबरोबर केलेल्या अणु सहकार्य करारासंबंधातील एखादी अट मोडली असे जर अमेरिकेला वाटले तर इंधनाची आयातच बंद होऊन अणुवीज प्रकल्प ठप्प होतील. एवढेच नव्हे तर बंद केलेल्या किरणोत्सारबाधित अणुभट्ट्या सुरक्षित राखण्याचा प्रचंड खर्च व धोका भारतीय जनतेच्या माथी कायम मारला जाईल.
अणुभट्ट्या पुरवणा-या अमेरिकी खाजगी कंपन्यांना भारताकडून कायदा करुन हवा आहे की त्यांना पुरवलेली यंत्रसामग्री, इंधन याबाबतची कोणतीही जोखीम त्यांच्यावर असता कामा नये. त्यानुसार अमेरिकी शासनाच्या हुकमाचे बंदी मनमोहन सिग सरकारने त्याबरहुकुम २०१० साली संसदेमध्ये आण्विक नुकसान भरपाई विधेयक संमत करुन घेतले. त्यानुसार अणुभट्टीत अपघात झाला तर नुकसान भरपाईची कमाल मर्यादा फक्त २१४३ कोटी रुपये असेल. अणुभट्टी चालवणा-या कंपनीवर फक्त १५०० कोटी रुपयांची जोखीम असेल. वास्तविक पाहता अपघात झालाच तर दहा हजार कोटी किवा त्याहूनही अधिक मोठे नुकसान होण्याचा धोका असतो.
एन्रॉनच्या दाभोळ वीज प्रकल्पाप्रमाणे निविदा न मागवता, भांडवली खर्चाचे आकडे अति अवास्तव असल्यामुळे वीजदर न परवडण्याजोगा होईल, या कशाचाही विचार न करता पंतप्रधानांनी अमेरिकेबरोबर अणु सहकार्य करार करुन घेण्यासाठी अमेरिकन सरकारच्या दडपणाखाली १०००० मे.वॅ. क्षमतेच्या अणुभट्ट्या अमेरिकी कंपन्यांकडून घेण्याचे कबूल केले.
अणुभट्ट्यांची खर्चिकता ः भारतातील कोळसा-गॅस इंधनाधारित वीजकेंद्रांच्या भांडवली खर्चाशी तुलना करता अमेरिकन अणुभट्ट्या ३ ते ४ पट खर्चिक आहेत. जैतापूर येथील प्रस्तावित ३३०० मे.वॅ. क्षमतेच्या अरेवा कंपनीच्या दोन अणुभट्ट्यांचा अपेक्षित भांडवली खर्च ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी‘ यातील आकडेवारीनुसार ६०००० कोटी रु. म्हणजे रु. १८ कोटी प्रति मे.वॅ. एवढा जादा खर्च येतो. म्हणजे वीजनिर्मिती दर पडेल रु. ९ प्रति युनिट! चालू वीजनिर्मिती खर्च २ ते २.५ रु. आहे असे असूनही अणुऊर्जा निगमचा दावा आहे की जैतापूर प्रकल्पाची वीज महाग पडणार नाही. हा दावा कशाच्या आधारे केला जात आहे? तर परकीय कंपन्यांचा भांडवली खर्च कितीही असला व त्यानुसार वीज दर अतिमहाग असला तरी अणुविजेचा पांढरा हत्ती प्रचंड अनुदान (सबसिडी) देऊन पोसण्याचे शासनाने ठरवले आहे. तेव्हा हा बोजा ग्राहकांवर महाग वीजदराद्वारा न टाकता, अणुवीज महाग नाही, असा बहाणा करुन अणुऊर्जेवर अनुदान देऊन त्याचा भार मागील दाराने करदात्यांवर टाकण्यात येणार आहे. याचा अर्थ भारतीय करदाते अरेवा, वेस्टिग हाऊस, जी.ई. अशा महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांना घसघशीत अनुदान देणार! हा प्रचंड खर्च विजेची मोठी तूट भरण्यासाठी करीत असल्याचा शासनाचा दावा आहे. पण अणुभट्टी उभारणीबाबत भारत व परदेशांचा अनुभव तपासला तर पुढील दहा वर्षात आण्विक वीज उपलब्ध होणार नसल्याने नजिकच्या काळात या प्रकल्पांचा काहीच उपयोग नाही.

विशेष *
सिधुदुर्गातील महाशिवरात्र
महाशिवरात्र हा भगवान शंकराचा उत्सव. या दिवशी शंकराची बेलाची पाने वाहून पूजा केली असता इच्छित मनोकामना पूर्ण होतात. पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. शंकराची अनेक आकार प्रकाराची रुपे आहेत. अनेक ठिकाणी जमिनीमध्ये खोलगट शाळुंखेचा आकार असतो, तर अनेक ठिकाणी शाळुंखेवर पिडी असे स्वरुप असते. अनेक ठिकाणी या पिडीवरच धातूचा मुखवटा बसविलेला, कुठे तो चांदीचा तर कुठे सोन्याचा असतो. प्रत्येक गावात एक तरी शंकराचे मंदिर असते. अनेक गावात तर त्यास ग्रामदेवतेचा मान असतो.
भगवान शंकराची पवित्र स्थाने अखंड भारतभर पसरलेली आहेत. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून आसामपर्यंत असलेली शंकराची विविध स्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तेथील पूजेच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी भगवान शंकराचे मूर्त किवा अमूर्त स्वरुप वेद-पुराणांमध्ये वर्णिले आहे तसेच आहे. असंख्य लोक देशभरातील फक्त भगवान शंकराच्या पवित्र स्थानाला भेट देऊन शंकराचे दर्शन करण्याकरिता परिक्रमा करीत असतात. अमरनाथ यात्री ही अत्यंत खडतर असते. वर्षातील काही ठराविक दिवसात एका गुहेमध्ये बर्फापासून बनणारी पिडी हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. या पिडीचे दर्शन घेणे हे अति पुण्यप्रद मानले जाते. अतिशय खडतर अशी ही अमरनाथ यात्रा करुन बर्फलिगाचे दर्शन घेणे यालाच जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे मानणारे कोट्यावधी भाविक आहेत.
प्राचीन काळापासून अनेक तीर्थस्थानांच्या यात्रा पायी चालत करण्याची प्रथा आहे. अलिकडच्या काळात रस्त्यांची आणि वाहनांची सोय झाल्यामुळे जलदगतीने देशाच्या सर्व भागात असलेल्या तीर्थस्नानांच्या यात्रा करणे सहजसुलभ झाले असले तरी अजूनही पूर्वापारच्या प्रथेनुसार पायी यात्रा करणारे बरेच श्रद्धावान भाविक आहेत.
विदेशी लोकही भारतातील या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या तीर्थयात्रा करण्यासाठी भारतात येतात. समुहाने यात्रा करण्यामुळे यात्रेकरुंच्यात एकोपा होतो. उच्च-नीच भेदभाव विसरले जातात आणि विविध ठिकाणच्या समाजजीवनाचा परिचय होतो. विचारांची, संस्कृतीची देवाण घेवाण होते.
महाशिवरात्रीच्या उत्सवात गावोगावच्या शंकराच्या देवस्थानात दर्शनासाठी सारा गाव लोटतोच पण आजूबाजूच्या गावातील आणि गावातील दूरच्या ठिकाणी असलेले बरेच लोक आपापल्या गावी केवळ या उत्सवासाठी एकत्र येतात.
सिधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावात शंकराचे मंदिर आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हे स्थळ मोठ्या यात्रेमुळे विशेष प्रसिद्ध आहे. सागराची पार्श्वभूमी असलेल्या या निसर्गरम्य देवस्थानातील शिवरात्र उत्सव तीन दिवस चालतो. लाखो भाविक या यात्रेत येतात. तेथून जवळच वाडा या गावातील विमलेश्वर हेही पुरातन आणि प्रेक्षणिय शिवस्थान आहे.
ब-याच शंकराच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीत भगवान शंकराची उत्सवमूर्ती रथामध्ये ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली जाते. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावचा रथोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. परंतु येथे भगवान शंकराच्या ऐवजी ग्रामदैवत रवळनाथाची उत्सवमूर्ती रथारुढ केली जाते. हे येथले वैशिष्ट्य. भगवान शंकराच्या (सिद्धेश्वर) मंदिरात सर्व धार्मिक विधी होतातच आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दीही असते.
मोचेमाड येथील श्रीदेव गिरोबाचीही रथयात्रा काढली जाते. तशीच प्रथा आकेरी (रामेश्वर) गावातही आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील कलेश्वर हेही एक प्रमुख देवस्थान. तेथेही रथोत्सव होतो.
मठ येथील स्वयंभू मंदिराच्या शिवरात्र उत्सवास ५० वर्षे झाली. दरवर्षी कीर्तन, भजने, दीपोत्सव, पालखी प्रदक्षिणा व उत्सव सांगतेच्या दिवशी महाप्रसाद अशा स्वरुपाचा येथील उत्सव असतो.
वेंगुर्ले येथील श्रीदेव रामेश्वराचा रथोत्सवही विशेष प्रसिद्ध आहे. दिवसभर धार्मिक विधी आणि रात्री तरंगदेवतांसह रथप्रदक्षिणा होते.
महाशिवरात्र उत्सव हा हिदू वर्षपरंपरेप्रमाणे देवस्थानांच्या ठिकाणी होणारा वर्षभरातला शेवटचा सार्वजनिक उत्सव. प्रवासाच्या सुविधा वाढल्यामुळे लाखो लोक या उत्सवात भाग घेण्यासाठी गावोगावी येतात. यातून सामाजिक एकोपा तर वाढतोच पण या निमित्ताने गावाच्या विकासावरही विचार विनिमय होतो. मंदिरांचा जीर्णोद्धार होतो. गावच्या शाळागृहांची दुरुस्ती होते. अन्य सोयी सुविधांसाठी सरकारी दरबारी पाठपुरावा होतो. पर्यटन प्रवण सिधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर संस्कृती हा एक पर्यटनाचा मोठा आणि महत्वाचा घटक उपलब्ध आहे. त्याचे नीट नियोजन झाले तर पर्यटन वृद्धीसाठी या मंदिरांचाही उपयोग होईल.

महाराष्ट्रातील वीजपुरवठ्याचा प्रश्न
शासकीय आकडेवारीनुसार २००९ साली महाराष्ट्रामध्ये एकूण १८७५० मे.वॅ. वीजनिर्मिती क्षमता असून उपलब्धता १४२०० मे.वॅ. होती. त्यामुळे कमाल मागणीच्या वेळी ५००० मे.वॅ. पर्यंत तुटवडा पडतो. वीज परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा खाजगी प्रकल्प निमंत्रित करण्याची गरज आहे हा युक्तिवाद पटतो. त्याबाबतची वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे.
खरे तर आजचे वीज टंचाईचे संकट केवळ खाजगी वीज प्रकल्पांमुळेच गुदरले आहे. १९९१ साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ फायद्यात चालत होते. वीज पुरवठा पुरेसा होता. वीज मंडळाचे अनेक प्रकल्प मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे खोळंबलेले होते. परंतु त्यांना मंजुरी मिळण्याऐवजी ते बासनात गुंडाळून शरद पवार शासनाने एन्रॉनला निमंत्रित केले. २००१ साली एन्रॉन कंपनीचे दिवाळे वाजले. एन्रॉनपायी वीज मंडळाला कोट्यावधीचा फटका बसून ते तोट्यात लोटले गेले आणि एन्रॉनमुळे नवे प्रकल्पही बारगळले. खाजगी वीज प्रकल्पांचा महाराष्ट्राचा अनुभव असा विदारक आहे. आजही रत्नागिरी गॅस पॉवर प्रॉजेक्ट लि.ने. ताब्यात घेतलेल्या एन्रॉन वीजकेंद्रात सतत बिघाड होत आहेत व केंद्र वारंवार बंद पडत आहे. कारण जनरल इलेक्ट्रिकने पुरवलेली सदोष वायूचक्की. पण त्याबाबतची जबाबदारी घेण्यास जी.इ. तयार नाही. तरी पुन्हा खाजगी प्रकल्पांचा अट्टाहास महाराष्ट्र शासन व केंद्र शासन धरत असून कोकण किनारपट्टीवर २०००० मे.वॅ. क्षमतेचे कोळसा आधारीत खाजगी औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्राला खाजगी प्रकल्पांची काही गरज नाही हे सार्वजनिक क्षेत्रातील नियोजित प्रकल्प लक्षात घेतल्यास स्पष्ट होईल.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प ः महानिर्मितीने वीज पुरवठ्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने परळी (२५०), पारस (२५०), खापरखेडा (५००), भुसावळ (१०००), चंद्रपूर (८००) आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय प्रकल्पांमधून १०१२ पर्यंत २९०० मे.वॅ. उपलब्ध होईल. याशिवाय वीजगळतीचे प्रमाण ३९ टक्के वरुन १५ टक्के पर्यंत कमी करण्याची महापारेषणची योजना आहे. याबरोबरच कपॅसिटर बसवून व विजेचे दिवे, उपकरणे, मोटारी, पाणी उपसण्याचे पंप यांची कार्यक्षमता वाढवून नव्या वीजनिर्मितीसाठी जो भांडवली खर्च लागतो त्याच्या २०-२५ टक्के खर्चात विजेची उपलब्धता बचतीच्या मार्गाने वाढवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. यामार्गे सुमारे ५५०० मे.वॅ. क्षमता उपलब्ध होईल. मेडाच्या योजनेप्रमाणे वायु, लघुजलविद्युत, साखर कारखाने सहनिर्मिती, जैवमाल आदी शाश्वत स्त्रौतांमार्फत २०१२ सालापर्यंत १३४० मे.वॅ. क्षमतेची भर घालणे शक्य आहे. वरील शासकीय योजना कार्यान्वीत होत जातील तसा विजेचा तुटवडा दूर होईल. त्याबरोबर सध्या चालू असलेली विजेची प्रचंड उधळपट्टी कमी करण्याच्या दृष्टीने जास्त वीज वापरणा-या ग्राकांचे वीजदर चालू दराच्या २/३ पट करणे आणि मॉल्स, मल्टिप्लेक्स आदींसाठी या वाढीव वीजदरावर खास आकार लावणे गरजेचे आहे. यामधून वीजबचतीला उत्तेजन मिळेल व वीज उपलब्धता वाढेल.
तेव्हा कोकण किनारपट्टीवरील वीज प्रकल्पांचे समर्थन विजेची गरज या सबबीखाली करता येत नाही. तरीही खाजगी कंपन्यांच्या नफेखोरीसाठी त्यांच्याशी संगनमतात असलेल्या राज्यकर्त्यांना ते प्रकल्प लादायचे आहेत. तेव्हा टंचाईच्या फसव्या दाव्याच्या मागील हितसंबंध लक्षात घेऊन कोकणमधील विनाशकारी वीज प्रकल्पांविरोधात ठामपणे उभे राहाण्याची गरज आहे.

गुलामीच्या प्रतिकांचा उद्धार कशासाठी?
वेंगुर्ले येथील भग्नावस्थेत असलेल्या डच वखारीचा नजीकच्या काळात उद्धार केला जाणार असल्याचे वृत्त वाचून आश्चर्य वाटले आणि एक भारतीय नागरिक म्हणून मनाला वेदनाही झाल्या. वेंगुर्ल्याची ही डच इमारत तसेच बेचाळीसच्या स्वातंत्र्य संग्रामात सैनिकांनी जाळून टाकलेली मालवणची डच वखार ही आमच्या संस्कृतीची आणि स्वाभिमानाची प्रतिके असती तर त्या वस्तुंचा उद्धार करणे समर्थनीय ठरले असते. पण या वखारीचा इतिहास पाहता ही ख-या अर्थाने आपल्या पारतंत्र्याची म्हणजे गुलामीची प्रतिके आहेत.
साडेचारशे वर्षापूर्वी पोर्तुगीज आणि डच यांच्या व्यापारी स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वैरी विजापूरच्या आदिलशहाच्या मर्जीने डचांनी १६४६ साली ही वखार उभारली होती. त्यानंतर १६८२ साली मालवण येथे दुसरी वखार उभारली. कालांतराने या दोन्ही वखारींचा ताबा इंग्रजांना मिळाला. इंग्रजांनी या दोन्ही इमारतीत महालकरी कार्यालये आणि न्यायालये सुरु केली होती.
वेंगुर्ले येथील डच वखारीचा इतिहासही वेदना देणारा आहे. औरंगजेब बादशहाचा एक मुलगा अकबर वेंगुर्ल्याच्या या वखारीत डचांच्या आश्रयाला आला होता. त्यावेळी औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहाआलम याने वेंगुर्ले पेटवून दिले होते. स्वातंत्र्यपूर्ण काळात या वास्तुमध्ये स्वातंत्र्यासाठी, लढणा-या कोकणचे गांधी प.पू.आपासाहेब पटवर्धनांपासून महाराष्ट्रातील आणि या जिल्ह्यातील असंख्य देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांना कारागृहवासाच्या अगर फटक्यांच्या सजा सुनावल्या गेल्या होत्या. मालवणची वखार १९४२च्या ‘छोडो भारत‘ आंदोलनात स्वातंत्र्यसैनिकांनी जाळून टाकली होती. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० साली वेंगुर्ल्याच्या डच वखारीतील कार्यालये कॅम्पमधील नवीन शासकीय वास्तूमध्ये हलविली गेली. १९७४ पासून ही वखार पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. गुलामीचे प्रतीक असलेल्या या वास्तूचे स्वतंत्र्य भारतात जतन करण्याचे काहीच कारण नव्हते.
स्वतंत्र भारतात गुलामीची प्रतिके असलेल्या वास्तूंची नावेही आपण बदलली. मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (बोरीबंदर) नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले. तर ‘किग्ज सर्कल‘ गार्डनचे नाव ‘महेश्वरी उद्यान‘ करण्यात आले. ‘किग्ज जॉर्ज हायस्कूल‘चे नाव ‘राजा शिवाजी विद्यालय‘ असे करण्यात आले. पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पर्दापण केले त्याला पाचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोव्यात एक समारंभ घडवून आणण्याचे घाटत होते. पण गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी तो डाव उधळून लावला.
१९३०च्या मिठाच्या सत्यग्रहापासून १९४२च्या ‘भारत छोडो‘ आंदोलनापर्यंत तसेच गोवा मुक्ती आंदोलनात वेंगुर्लेवासीयांचे योगदान मोठे आहे. साम्राज्यशाहीच्या विरोधात वेंगुर्ल्याचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी आत्मबलिदान केले आहे. स्वातंत्र्य संग्रामात अशी पार्श्वभूमी असलेल्या वेंगुर्लेवासीयांनी गुलामीचे प्रतिक असलेल्या डच वसाहतीच्या उद्धाराच्या उपक्रमात सहभागी होऊ नये, असे माझे समस्त वेंगुर्लेवासीयांना आवाहन आहे. त्याऐवजी वेंगुर्ले येथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक आणि शिरोडा येथे मिठाच्या सत्याग्रहाचे स्मारक उभारण्याच्या उपक्रमात वेंगुर्लेवासीयांनी सहभागी व्हावे. तसेच ही दोन्ही स्मारके लोकोपयोगी आणि पर्यटकांची आकर्षणे व्हावीत, अशा स्वरुपात उभारण्यासाठी सहकार्य करावे, असे वेंगुर्लेवासीयांना माझे विनम्र आवाहन आहे.
- जयानंद मठकर, माजी आमदार-सावंतवाडी, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार

विशेष बातम्या *
मुंबईत - वांद्रे येथे ग्लोबल कोकण महोत्सव
जगाला कोकणचा परिचय व्हावा व कोकण जागतिक दर्जाचे व्हावे, कोकण सुंदर व आर्थिक संपन्न करावे, यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईत बांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सारस्वत बँकेचे अध्यक्ष व महोत्सवाचे स्वागताध्यक्ष एकनाथ ठाकूर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष द.म.सुकथनकर यांनी केले आहे.
२४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होत आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. कोकणातील सर्व मंत्री व आमदार या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. आपला देश आर्थिक महासत्ता होण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पण कोकणचा विकास म्हणावा तसा झाला नाही. कोकणला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असतांना शासनाने मरीन विद्यापीठ नागपूरमध्ये केले. ते कोकणात का होऊ शकले नाही? विदर्भ व मराठवाड्याला वैधानिक विकास महामंडळ दिले. परंतू कोकणला पश्चिम महाराष्ट्र वैधानिक महामंडळाला जोडले.
सिधुदुर्ग ही निसर्गभूमी, रत्नागिरी, रत्नभूमी, रायगड वेदभूमी व ठाणे जिल्हा उद्योगभूमी आहे. या चार जिल्ह्यातील ४६ तालुक्यांपैकी ३० तालुके पर्यटनदृष्ट्या विकसित होणारे आहेत. या तालुक्यांचा अभ्यास करुन विकासाला वेग देण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात येणार आहेत. महोत्सवात कोकणातील उपक्रम, उद्योग, कला व खाद्य संस्कृतीची मांडणी होणार आहे. या महोत्सवातून कोकणने राज्य, देश व जगाला काय दिले हे दाखवून देण्यात येईल. विविध दालनात ही मांडणी केली जाईल. येथील उद्योजक कोकण घडविण्यासाठी काय करतात, त्याचीही ओळख करुन दिली जाईल.
कोकणात प्रदूषणकारी कारखाने यावेत, असा सरकारचा अट्टहास का? प्रदूषणकारी नसलेले तसेच कमी प्रदूषणकारी असलेले व लगतच्या गोवा राज्यात असलेले फार्मास्युटिकल उद्योग, फळप्रक्रिया उद्यग आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी का प्रयत्न केले नाहीत? सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे. मात्र, पक्षीय पादत्राणे बाहेर ठेवून कोकणच्या विकासासाठी एकत्र यावे. असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले. या महोत्सवानंतर कृती आराखडा तयार करुन तो राबविण्याच्यादृष्टीने सर्वंकष विचार करणार असल्याचे ते म्हणाले.
विकासाचे नियोजन शासन करील. पैसा देईल. ही संकल्पना संपुष्टात आली आहे. हे लक्षात घेऊन कोकण विकासाचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने पुढाकार घेतल्याचे श्री. सुकथनकर यांनी सांगितले. कोकणच्या विकासाला ठोस दिशा देण्याची हीच वेळ आहे. विकासासाठी पूर्वी शासनावरच अवलंबून रहावे लागत होते. आता ती परिस्थिती नाही. प्रदूषण न होणारे पर्यायी उद्योग आणले, तर रोजगाराचा मुद्दा मागे पडेल. कोकणच्या निसर्गाचा समतोल राखून विकास करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सुकथनकर यांनी सांगितले.

सिधुदुर्गात १२० मुले हृदयविकारग्रस्त
सिधुदुर्ग जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील एक ते पाच या वयोगटातील ३० बालकांसह दारिद्रयरेषेखालील पंधरा वर्षे वयोगटाच्या आतील १२० गरीब मुले हृदयविकाराने ग्रस्त आहेत. यातील अनेकांवर तातडीने उपचार झाले पाहिजेत. चाकरमान्यांनी मदतीची तयारी दाखविल्यास जिल्हा प्रशासनाच्या माध्यतमातून या गरीब मुलांवर तातडीने उपचार करुन त्यांना जीवनदान देणारी यंत्रणा जिल्ह्यात उभी करण्याचा मानस सिधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरच्यावतीने डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.आर.एस.कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पुढाकारातून आरोग्य यंत्रणेने शालेय आरोग्य तपासणीअंतर्गत नुकताच एक सर्व्हे केला होता. कुडाळ येथील सिधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरने आंतरराष्ट्रीय किर्तीचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. भरत दळवी यांच्या माध्यमातून संशयित बालरुग्णांसाठी मोफत कॅम्प नुकताच आयोजित केला होता. या कॅम्पसाठी जिल्ह्यातील १५ ही बालरोगतज्ज्ञांनी पाठविलेल्या बालरुग्णांची तपासणी केली होती.

पंडित पॅक्स अॅण्ड प्रिटसचे यश
महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे ५५वे अधिवेशन १३ फेब्रुवारी रोजी पुण्यात संपन्न झाले. या निमित्ताने राज्य पातळीवर आयोजित केलेल्या मुद्रण स्पर्धेत दैनंदिनी आणि पुस्तके या विभागातून कणकवलीच्या मे. पंडित पॅक्स अॅण्ड प्रिटसला राज्य पातळीवरील दुसरा क्रमांक मिळाला. मे.पंडित पॅक्स् आणि प्रिटस् यांनी सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०११साठी छपाई केलेल्या दैनंदिनीसाठी हा पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्रण सौंदर्य तज्ज्ञ किरण प्रयागी या स्पर्धेच्या परिक्षक समितीचे प्रमुख होते.
स्पर्धेचे बक्षिस वितरण हेडलबर्ग इंडिया प्रा. लि. च्या प्रिट मिडीया अॅकॅडमीचे प्रमुख डॉ.राजेंद्रकुमार अनायथ यांच्या हस्ते आणि ‘अॅडॉबे‘ या जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मिडिया कंपनीचे प्रतिनिधी श्री.सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष विलास सांगुर्डेकर, माजी अध्यक्ष मुकुंद इनामदार, मुद्रण तंत्र प्रकल्पाचे अध्यक्ष आनंद लिमये, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील असंख्य मुद्रक उपस्थित होते.
मे. पंडित पॅक्स अॅण्ड प्रिटस्, कणकवली यांना यापूर्वी सन २००५ मध्ये वार्षिक अहवाल छपाई विभागात तर सन २००८ मध्ये कॅटलॉग फोल्डर विभागात राज्य पातळीवर महाराष्ट्र मुद्रण परिषदेची बक्षिसे मिळालेली आहेत.

स्थानिक वर्तमान -
- थंडीचे प्रमाण अनियमित आहे. मध्यरात्रीनंतर थंडीचे प्रमाण वाढलेले असते. तरीही २२ फेब्रुवारीच्या रात्री काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.
- आंबा, काजू झाडांवर मोहोर भरपूर आला तरी त्या प्रमाणात फळधारणा झालेली नाही. त्यातच तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला असून मोहोर काळा पडल्याने यंदा भरपूर पीक मिळण्याच्या आशेवर असलेल्या बागायतदारांचे चेहरेही काळवंडले आहेत.
- काजूचे पीक मात्र यंदा भरपूर आहे. पण त्यावरही रोगकीडीचा प्रादुर्भाव आहे. बाजारात काजू बीचा दर किलोला ८० ते ९० रु. आहे. नवीन काजूगाराचा दरही किलोला दर्जानुसार ४०० ते ४५० रु.आहे.बाजारात ओले काजूगर येऊ लागले आहेत.
- शहरातील बरेच रस्ते खड्डेमय झाले आहेत. भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते बुजविल्यानंतर गल्लीबोळातील रस्तेही खराब झाले आहेत. शहरातील दोन मुख्य रस्त्यांवर ब-याच ठिकाणी खड्डे पडल्याने आणि ते वेळीच भरुन न काढण्याचे बांधकाम खात्याचे धोरण असल्याने खड्डयांची व्याप्ती वाढत चालली आहे.
- आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या मतदार संघातील दोडामार्ग-सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यात काथ्या प्रक्रिया उद्योग केंद्रे सुरु करण्याचा सपाटाच लावला आहे. नुकतेच भटवाडी येथे एक केंद्र सुरु झाले.
- महिला औद्योगिक सहकारी काथ्या कारख्याचे अध्वर्यु सौ. प्रज्ञा परब आणि एम.के.गावडे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेल्यामुळे वेंगुर्ल्यातील काथ्या कारखानाही काँग्रेसमध्ये गेला त्यामुळे काथ्या उद्योगात राष्ट्रवादी टिकविण्यासाठी गावोगावी राष्ट्रवादी प्रणित काथ्या केंद्रे सुरु केली जात आहेत.
- चैतन्य सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ खानोलीतर्फे रवळनाथ मंदिरात महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी जि.प.च्या महिला बालकल्याण समिती सभापती सौ.मनिषा ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हळदीकुंकू समारंभही करण्यात आला. सौ.मोहिनी पंडित, सौ.ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

Thursday, 17 February 2011

अंक ७वा, १७ फेब्रुवारी २०११

प्ासंगीक *
डॉक्टर आणि इंजिनिअरच कशाला?
आपल्या पाल्याला डॉक्टर/इंजिनिअरच करायचाय आणि तो तसा व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याने घसघशीत मार्क मिळविलेच पाहिजेत या मनोकामना पूर्तीसाठी पालकांचा आटापिटा चालू असतो. हा प्रयत्न दीर्घकाळ, पाल्य माध्यमिक शाळेत गेल्यापासून ४-५ वर्षे फूल स्पीड चालू असतो. एवढा की, त्यापुढे संसारातले सर्व प्रश्न गौण मानले जातात.
या विषयात जरा आंत डोकावलं तर लक्षात येईल की, जवळ-जवळ वेडाचे रुप घेतलेला हा रोग प्रामुख्याने नोकरपेशा मध्यम वर्गात एवढा रुजलाय की, अनेक घरात त्याचे क्रॉनिक झाले आहे. यामुळे पाल्य व पालक हे ताणाच्या रोगाचे बळी झाले आहेत. त्या त्या कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य पार हरपले आहे.
पाल्याने खच्चून मार्क मिळविले पाहिजेतच व मेडिकल/इंजिनिअरिगला प्रवेश मिळवायलाच हवा ही अंधश्रद्धेएवढी भीषण भावना झाली आहे. गेल्या काही वर्षात तिला (मध्यमवर्गात) एका उच्चभ्रू वेडाचारी परंपरेचे रुप आलेले आहे. साईड इफेक्ट म्हणून अन्य समाजात त्यामुळे उगीचच न्यूनगंड निर्माण झाला आहे. एक तर या अन्य समाजाला गुणात्मक विद्या अंगिकारण्याची पूर्वपरंपरा नाही. भरपूर मार्क मिळविण्याचं टेक्निक त्यांना अवगत नाही. तेही माहित असेल तर त्यांची आर्थिक कुवत नाही. हळूहळू या अन्यांमध्ये हे वातावरण पसरण्याची प्रोसेस चालू आहे. त्याला अन्य कारणांबरोबर शिक्षकवर्गही जबाबदार आहे. म्हणून तर उच्चवर्गीयांबरोबर किवा त्याहून अधिक गुणात्मक चमक इतर समाजातल्या कुणी विद्यार्थ्याने दाखविली तर त्याचे माध्यमांतून विशेष कौतुक प्रसिद्ध होते.
कार्यकारण मिमांसा न करता ज्या अर्थशून्य गोष्टी परंपरा म्हणून केल्या जातात त्यांना अंधश्रद्धा म्हणतात. त्या अगदीच अर्थहीन नसल्या तरी त्यांना पर्याय असतात. जगातल्या उलाढाली बहुविध आहेत हे जाणून चितन मनन केलं जातं. याला मध्यम व उच्च वर्ग, धनाढ्य व उच्चविद्याविभूषितही अपवाद नाहीत. डॉक्टर/इंजिनिअर होण्याचं शिक्षण पाल्याला घेण्याची संधी साधायला हवी यासाठी कुटुंबात ४-५ वर्षे निकराची लढाई मांडणा-या पालकांनी जगात पाल्याला उभं करायलाच काय, चमकवायलासुद्धा अन्य शेकडो पर्याय आहेत हे आता लक्षात घ्यायला हवे.
म्हणजे मेडिकल/इंजिनिअरींगच्या लाईनचा हा तिटकारा नव्हे. जमल तर उत्तम पण, न जमलं तर खट्टू होण्याचं, पाल्याला दोष देण्याचं कारण नाही. त्याचा कल कशाकडे आहे, त्याच्यात इतर सामर्थ्य काय आहे हे पहायला हवं. तर त्याला योग्य ती पर्यायी लाईन देता येईल.
आता जरा पर्यायी लाईनबद्दल चर्चा करु. जे या मार्क उकळण्याच्या वातावरणापासून दूर आहेत त्यांचं जेमतेमच शाळाशिक्षण असूनही त्यांच्यापैकी हजारोजण चांगल्या समाजमान्य मार्गाने डॉक्टर/ इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमवित असतात व दहा-पंधरा वर्षात चांगली प्रॉपर्टीही जमवितात. यात पानपट्टीवाल्यापासून, प्लंबर, वीजयंत्री, टीव्ही दुरुस्तकार, दुकानदार, ठेकेदारांपर्यंत अनेक प्रकारचे लोक आहेत. एक जाहीर आकडेवारीच अशी आहे की, महिना ५० हजार ते एक लक्ष रु. कमविणा-यांपेकी ५० टक्के लोक कॉलेजची पायरी चढलेले नाहीत किवा तेथून एक-दोन वर्षात पायउतार झाले आहे. भले यातील काही टक्के अप्रिय-अमान्य धंदा व्यवसायात असतील. तर मग डॉक्टर/इंजिनिअरसुद्धा वाईट धंदे, व्यवसायात असतात हे वृत्तपत्रांतून जाहीर होत असते, त्याचे काय?
आणखी एक मुद्दा असा की, डॉक्टर, इंजिनिअर व तत्सम लाईनसाठी भरमसाठ मार्क मिळविणे यासाठी आकलनशक्तीपेक्षा पाठांतर व सुस्मृती महत्वाची भूमिका बजावते. मूलभूत विषय समजलेलाच असतो असं ठामपणे म्हणता येत नाही. (निदान भारताची शिक्षण पद्धती अशीच आहे.) तरीही अशा विद्यार्थ्यांचं कौतुक जरुर आहे. पण विषयच मर्यादित आहेत तर अन्य शेकडो विषयांपैकी कशात हुषारी आहे ते मोजायला मार्ग काय? सचीन, लता, कामराज नाडर, वसंतदादा पाटील यांना गुण दाखवायला कुठल्या परीक्षांची, मार्क दाखविण्याची संधी होती आणि त्यापेक्षा काय जरुरी होती?
तेव्हा मेडिकल, इंजिनिअरिगपेक्षाही अधिक प्राप्ती व अधिकार देणा-या नोक-या, उद्योग व्यवसाय आहेत याचे भान शिक्षित पालकांनाही ठेवायला हवे. तसे प्रयत्न आतापासूनच करायला हवेत. तिथेसुद्धा स्पर्धा आहेच. हे वेळीच न केले तर पालक व पाल्य यांच्यामध्ये वैफल्याची भावना येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- किशोर बुटाला, महाड
मोबा. ९४२२२९४०५३

अधोरेखीत *
अणुउर्जा कशी हो बनते?

अणुउर्जेमध्ये धूर निर्माण होत नाही. तेव्ही ती ‘स्वच्छ‘ उर्जा आहे आणि आपली जी काही उर्जेची गरज आहे त्यासाठी अणुउर्जा हा झकास उपाय आहे असे मत शिक्षित वर्गात आहे. अशिक्षित वर्गाला आधी उर्जा आणि अणुभट्टी ही काय भानगड आहे तेच माहित नसतं. पण म्हणजे सुशिक्षितांना, जैतापूरच्या बातम्या देणा-या बातमीदारांना, त्यावर लिहिणा-या पेपरवाल्यांना, मतं ठासून मांडणा-या, तावातावाने चर्चा करणा-या कट्ट्यावरच्यांना आणि प्रकल्प पुढे दामटू पाहणा-या नेत्यांना, त्यांच्या अनुयायांना माहित असते असं नाही. तुम्हाला माहित आहे का?
अणुभट्टी साधारण कशी चालते? त्यातून वीज कशी बनते? आम्हालाही आधी माहित नव्हतं. अणुवीज प्रकल्प आमच्या अंगणात आला. त्याची धग आम्हाला जाणवू लागली. तेव्हा आम्ही अभ्यास करुन ते जाणून घेतलं. जितकं सोप्प करता येईल तितकं करुन सांगायचा प्रयत्न करतो.
लोखंड, तांबे, सोनं या आपल्याला माहित असलेल्या धातूंप्रमाणेच युरेनियम हा एक खूप जड धातू असतो. आमच्या घरात पणज्याच्या काळापासून चालत आलेला न्हाणीचा तांब्याचा हंडा आहे. तो आमच्या पणतूला सुद्धा वापरता येईल. पण तुम्ही जर घरात युरेनियमचा हंडा आणलात तर तुमच्या घरातल्यांसकट आसपासचा सारा शेजार ४-५ वर्षातच या जगातून नाहीसा होईल. ह्या धातूतून सतत आपोआपच नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या प्रकारची, डोळ्यांना न दिसणारी किरणे आणि कण बाहेर पडत असतात. ती माणसांना आणि सजीव सृष्टीला घातक असतात. जिथे कुठे या धातूच्या खाणी असतील तो भाग वावरायला चांगलाच धोकादायक असणार आणि असतोही. भारतात जादूगोडा परिसरात युरेनियमच्या खाणी आहेत. तितले संथाळ आदिवासी आता आता जागृत झालेत. आंदोलनं, विरोध करु लागलेत, दुष्परिणाम दिसायला लागल्यावर. सरकार बेदरकार आहे.
दुपारचे बाराचे कडकडीत उन कसं अंग भाजते! त्यात जर तासभर तसेच उभे राहिलात तर भाजून जाल. सनस्ट्रोक म्हणतात ना तो होईल. नंतर सूर्य कलतो. उन उतरतं. पण समजा ते भाजकं कडक ऊन तसंच तासन तास अंगावर ठेवले तर काय होईल? प्रत्येकाची सहनशक्तीची मर्यादा असते, पण सतत अंगातली गर्मी वाढत जाऊन, नेमके सांगता येणार नाही पण काही ना काही तासांनी माणूस मरणार. सूर्याची किरणे छत्रीने, छप्पराने, भितींनी अडतात पण, युरेनियमची किरणे त्या सर्वांच्या आरपार जात असतात आणि आपल्यावर प्रभाव टाकतात. हाच तो किरणोत्सार. त्याने भाजत नाही. तो गुदमरवून टाकत नाही. त्याच्यामुळे डोळे चुरचुरत नाहीत, त्वचा खाजत नाही, त्याची बाधा होताना कळतही नाही. त्याचा प्रत्यक्ष परिणाम एका मर्यादेपर्यंत लगोलग होत नाही. पण हळूहळू त्याच्या तुम्हाला मिळणा-या डोसाची बेरीज होत जाते. कडक उन्हाच्या डोसाप्रमाणेच, आणि मग त्याचे कोणताही इलाज उपलब्ध नसलेले घातक परिणाम दिसायला लागतात. आपल्या सगळ्या सजिवांची शरीरे ज्या पेशींनी बनली आहेत आणि त्या ज्या डीएनएमुळे नियंत्रित होतात, ते डीएनएचे किरणोत्सर्ग उध्वस्त करतो. पेशी अनियंत्रित होतात. अचानक वाढतात वा खूप कमी होतात, म्हणजेच कॅन्सर. बेताल वागतात आणि सगळी शरीर यंत्रणा ढासळून पडते. म्हणजे समजा हृदयाच्या पेशी यकृतासारख्या वागू लागल्या, मेंदूच्या पेशी आपलं कामच विसरल्या तर काय होईल?
किरणोत्सार धोकादायक का आणि कसा ते आता तुम्हाला साधारण कळले असेल. किरणोत्साराची किती मात्रा माणसाला हानीकारक आहे याचे जे प्रमाण, जे शास्त्रज्ञ आणि नेते सांगतात, त्यांना तितका डोस देवून खात्री करुन द्यायला त्यांची हरकत नसावी. त्याचा छोटासा संफही तुम्हाला जीवनातून उठवू शकतो. तुमची होणारी मुले विकृत, व्यंग असलेली जन्माला आणतो. बाधा तुम्हाला झाली तरी तुमच्या पुढच्या ७ पिढ्यांत ती व्यंगे चालू राहतात. माणसाला किरणोत्साराची माहिती झाल्यापासून आतापर्यंत सातच पिढ्या झाल्यात. पुढच्या जन्माला येतील तेव्हा त्यांचे कळेल. जणू घराण्याला लागलेला काळसर्पांचा शाप! पण माणूस फार खोडसाळ प्राणी आहे. तो नाहक धोक्याशी झटापटी घेत खेळत राहतो.
हा युरेनियम किरणांच्या रुपात उर्जा व उष्णता बाहेर टाकून कणाकणाने फुटतो. त्याचे दोन नवे वेगळे धातूचे कण बनतात. तेही असाच किरणोत्सार बाहेर टाकत फुटतात. त्यांचे परत काही वेगळेच पदार्थ बनतात. अशी साखळी चालू राहते. ही क्रिया फार वेळखाऊ कितीतरी हजारो, लाखो वर्षे निरंतर चालू राहते. अणुभट्टीत त्याचा वेग एकदम वाढवला जातो. सेकंदाच्या छोट्याशा भागाइतका. युरेनियमचा छोटा कण म्हणजे अणू कृत्रिमरित्या फोडून त्यामुळे खूप उर्जा आणि उष्णता एकदम मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. तिच्यामुळे बाकी युरेनियमच्या कणांची पण फाटाफूट होत जाऊन सगळाच एकदम फुटला, तर त्याला आपण अणुबॉम्ब म्हणतो. पण अणुभट्टीत फाटाफुटीचा वेगही नियंत्रित केला जातो. निर्माण होणारी बरीचशी उर्जा व उष्णता जड पाणी युरेनियमच्या आसपास खेळवून त्यात शोषली जाते. ते गरमागरम जड पाणी मग साध्या पाण्याने थंड केले जाते. जड पाणी परत भट्टीत जाते. गरम झालेले साधे पाणी बाहेर सोडले जाते. थोडे साधे पाणी वाफ बनण्याएवढे गरम होऊ दिले जाते. ती वाफ फिरत्या चाकांच्या पात्यांवर फेकून ती चाके गरगर फिरवली जातात. त्यामुळे वीजेचे जनरेटर जे एरव्ही आपण घरीदारी डिझेल इंजिनने गरगर फिरवतो ते फिरतात. वीज निर्माण होते. तारांनी हवी तिथे पाठवली जाते.
अणुभट्टीत विजेसाठी प्रत्यक्ष गरजेच्या मानाने कितीतरी पट जास्त उष्णता निर्माण होत असते. ती बव्हंशी पाण्यात शोषली जाते. ती उष्णता काही ताबडतोब आकाशात चंद्रावर उडून जात नाही. परिसरातच मिसळते. सतत मिसळत वाढत राहते. गरम वाफेच्या रुपात हवेतही मिसळते. बागेत साधा पाला-पाचोळा गोळा करुन आग घातली तरी १०-२० पावलांवर काय धग लागते, धुराच्या झळीत येणा-या डहाळ्या, फांद्या, झाडे होरपळतात, जळून मरतात हे आपण बघतो. तर, या परिसरातल्या प्रचंड उष्णतेचे काय? तरी सरकार म्हणते उष्णतेचा काहीच त्रास होणार नाही.
तुमच्या लक्षात आलंच असेल, अणुभट्टी म्हणजे एक मिनी मिनी अणुबॉम्ब असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणा-या सा-या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. जड पाणी आणि युरेनियमच्या मधल्या भितींना अतिसूक्ष्म छिद्रे पडून किरणोत्सार जड पाण्यात मिसळतो. जड पाणी आणि साध्या पाण्याच्या मधल्या भितीमधून साध्या पाण्यातही मिसळतो. किरणोत्साराची ही गळती नगण्य असते असे सरकार म्हणते. प्रत्यक्षात गोपनियतेच्या आवरणात तिच्या वाढत जाणा-या प्रमाणावर कायमच आडपडदा टाकलेला असतो. सतत झीजेमुळे पूर्वी अशी अणुभट्टी फारतर १५ वर्षे वापरता यायची. सुधारुन सुधारुन ३० वर्षांपर्यंत वापरता येऊ लागलीय. सरकार म्हणतेय ६० वर्षे चालणार. या झिजलेल्या अणुभट्टीचा, यंत्रणेचा वापर मर्यादेपलिकडे चालू ठेवायचा म्हणजे प्रत्यक्ष अणुस्फोटाशी गाठ आहे. दरवर्षी किरणोत्सार गळतीचे प्रमाण वाढत जाते ते अलाहिदा. ३० वर्षांनंतर तुम्हाला अणुउर्जा पाहिजे तर एक नवीन अणुभट्टी बनवायला हवी. ती बनवू हो! पण या जुन्या अणुभट्टीचे काय? स्टीलचा कारखाना व भट्टी दुरुस्तीपलिकडे गेली की मोडीत काढता येतात. सरळ भंगारवाल्याला विकून टाकता येतात. तसं याचं करता येत नाही.
आधी आपण बघितलं की, युरेनियम फुटून त्याचे २ नवीन पदार्थ बनतात. त्यांचे पुन्हा आणखी नवे, आणखी नवे. ती जी साखळी आहे त्यातले बहुतेक सारे युरेनियमसारखेच घातकी. किरणोत्सारी. वाईट माणसांच्या पोटी वाईटच पोरे जन्माला यावीत तसे. त्यांचे किरणोत्सार फेकत राहायचा कालावधी काही वर्षे ते हजारो वर्षे असा कमी जास्त आहे. तरी त्रासदायकच. तर या पदार्थांचे छोटे कण, अणुभट्टीच्या त्या यंत्रणेत आरपार घुसून बसलेले असतात. ती घातकी झालेली असते. अणुभट्टी म्हणजे तो जो मोठा सिमेंट काँक्रीटचा घुमट आम्ही बघतो थडग्यासारखा, ते खरोखरच एक थडगे असते. त्याचे काही करता येत नाही. या जागेत कोणी फिरकू नका म्हणून पाटी लावून सोडून द्यावा लागतो.
बरे, आपण नेहमी बघतो की, इंधन जाळलं की राख ही उरतेच. धूर आहे तिथे आग असते, तसं आग असते तिथे राखही असतेच. तर या अणुभट्टीतली राख म्हणजे युरेनियमचं इंधन जळून गेल्यावर उरलेले त्याच्या पुढच्या साखळीतले पदार्थ, जे किरणोत्सारी असतात, त्यांचं काय करायचं? हा प्रश्न फार बिकट असतो. सध्या असं करतात की, अणुभट्टीपाशीच एक दुसरं मजबूत थडगं बांधून त्यात ही ‘राख‘ ठेवून देतात. पण ती नुस्ती ठेवून चालत नाही. नेहमीच्या राखेसारखी काही ती विझलेली, मेलेली, थंड नसते. ती राख आग व किरणोत्सर्ग ओकतच असते. तिच्याभोवतीचे कवच काही काळानंतर वितळून टाकते. ते नेहमी नवे बदलत राहावे लागते. ते पिढ्यान पिढ्या सांभाळत बसायची जबाबदारी व हजारो वर्षांचे ओझे पुढच्या सा-या पिढ्यांवर लादून हे बुढ्ढाचार्य जणू तरुण पिढी त्यांच्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाचा सूडच उगवतायत. ती राख जमिनीखाली खोलवर पुरायचे प्रयत्न करुन झाले. भूकंपाने असा काही दट्ट्या दिला की तो मार्ग कायमचा सोडून द्यावा लागला. कोकण बरोबर तीव्र भूकंपाच्या फॉल्ट रेषेवर वसलेले आहे. त्यातूनच बनलेले आहे. आजपर्यंत ज्ञात इतिहासात तसा तीव्र धक्का बसलेला नाही, हा एक सृष्टीचमत्कार मानावा लागेल. वाडवडिलांची पुण्याई, जी लवकरच संपणार आहे! सरकारने या गोष्टीकडे पूर्णपणे काणाडोळा केलाय. त्यांना काय वाटतं? कोकणात अणुबॉम्ब फुटला तर दिल्लीचं तख्त हादरणार नाही? जर भूगर्भात पुरलेला तो राखेचा ज्वालासूर भूकंपाने अचानक वर आला किवा आतल्या भेगांतून भूजलात मिसळत वर आला तर सारं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. सारा भूप्रदेश दूषित होईल, वा-याबरोबर वाफा आणि त्यांचे ढग दूरदूर त्याचा फैलाव थेट दिल्लीपर्यंत नेतील. कसलीही पूर्वसूचना न देता हाहाकार उडेल.
बापरे! जेव्हा आम्हाला हे सर्व आकळलं, तेव्हा अशी शिसारी आली या स्वार्थांध माणसांची. जेमतेम एक पिढी उपभोगू शकेल अशा थोड्याश्या विजेसाठी ही माणसे, ही पिढी, पुढच्या सगळ्या पिढ्यांचा बळी घ्यायला निघलीय.

विशेष *
अणुउर्जा प्रकल्पातील अपघातांची यादी
जागतिक अपघातः
१) १९५७ च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडमधील विडस्केल अणुवीज केंद्रात अपघात होऊन अणुभट्टीच्या धुराड्यातून किरणोत्सारी पदार्थ बाहेर फेकले गेले. वा-याबरोबर ११०० चौरस किलोमीटर क्षेत्रात दूरवर पसरले. या केंद्रातून कमी किरणोत्सर्गवाले पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडल्यामुळे आयर्लंडचा समुद्र जगातला सर्वात किरणोत्सर्गी बनला. या केंद्राचे सुमारे ३०० अपघात गोपनीय कागदपत्रे कालांतराने उघड झाल्यावर समजले.
२) १९६१ मध्ये अमेरिकेतील इडाहो येथील अपघातात तीन शास्त्रज्ञ मरण पावले. त्यांची शरीरे एवढी किरणोत्सारी बनली की त्यांचे दफन कसे करावे हा मोठा प्रश्न झाला. २० दिवसानंतर जाड शिशाच्या पेटीत ती प्रेते ठेवून कडक बंदोबस्तात पुरण्यात आली.
३) जगातील पहिला मोठा अपघात २८ मार्च १९७९ रोजी अमेरिकेत थ्री माईल आयर्लंड अणुभट्टीत झाला. त्या काळात किरणोत्साराच्या घातकतेबाबत जनसामान्यांना कल्पना नव्हती. अणुभट्ट्या उभारणा-या कंपन्या आणि शासकीय नियमन-नियंत्रण यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने अणुप्रकल्पाची भलावण चाले. त्यातले धोके व अपघाताबाबत पुरेपूर गुप्तता राखली जाई. १०० टन इंधन गाड्या म्हणजे युरेनियम अतितप्त झाले आणि किरणोत्सारी वायू हवेत निसटले. किरणोत्साराने बाधित पाणी नदीत सोडले गेले. अणुभट्टीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅरीसबर्गमध्ये त्याचा घातक परिणाम जाणवला. ७-८ किलोमीटर परिसरातील दीड लाख नागरिकांना कायमचे स्थलांतर करावे लागले. किरणोत्साराची बाधा झाल्याने नागरिकांना विविध व्याधींनी ग्रासले व प्रश्न चिघळू लागल्यावर ४० लाख डॉलर १९८५ साली वाटून अपघातावर पडदा टाकला गेला.
४) अमेरिकेमध्ये अन्यत्रही किरणोत्साराचे घातक परिणाम झाले. न्यूयॉर्कजवळ फिटझपॅट्रीक पॉवर प्लॅन्ट (१९७२) व माईन माईल पॉईंट-१ (१९६९), अरकानसस न्युक्लिअर-१ (१९७४), बीव्हर व्हॅली (१९७६), व्हरनॉन व्हरमाँयाकी (१९७२) आदी. याशिवाय इतर अनेक देशांत अपघात घडले, घडतच आहेत.
५) रशियात चेर्नोबिलमध्ये सर्वात मोठा अपघात २६ एप्रिल १९८६ रोजी झाला. अणुभट्टीवरचे नियंत्रण हाताबाहेर जावून मोठा स्फोट झाला. छप्पर उखडले गेले आणि प्रचंड किरणोत्साराचे लोट वातावरणात सोडले गेले. वा-याच्या दिशेप्रमाणे बेलारुस, युक्रेन, रशिया, पश्चिम युरोपमध्ये किरणोत्साराचा गंभीर उपसर्ग पोचला. सुमारे १,५०,००० चौरस किलोमीटर पर्यंतचा प्रदेश प्रदुषित झाल्याने कायमचा सोडून द्यावा लागला. (जवळजवळ ओदीसा राज्याएवढे क्षेत्रफळ) ही तर केवळ १००० मेगावॅटची अणुभट्टी होती. जैतापूरची त्याच्या १० पट ताकदीची आहे. त्यासाठी युरोपियन अरेवा कंपनी जी अणुभट्टी पुरवणार आहे, तशा तंत्राची एकही अणुभट्टी अजून जगात उभारली गेलेली नाही. अमेरिकेतील आण्विक नियामक आयोगाने या नमुन्याच्या अणुभट्टीस अजून मान्यता व परवानगी दिलेली नाही. फिनलंडमध्ये अरेवा उभारत असलेल्या अणुभट्टीमध्ये आराखडा आणि बांधकामात अनेक उणिवा तिथल्या सुरक्षा प्राधिकरणाला आढळून आल्या. ते काम रेंगाळलेले आहे. तेव्हा जैतापूर व कोकणाचा प्रयोगाची जनावरे म्हणून उपयोग केला जात आहे म्हणायला हरकत नाही.
भारतातील अपघात-
१) हैद्राबाद आण्विक इंधन निर्मिती केंद्रात युरेनियमच्या इंधन कांड्या बनवल्या जातात. नव्वदीच्या दशकात इथे अधिकृतपणे चार लहान अपघात नोंदले आहेत. प्रक्रिया केंद्रातून रोज ५०००० टन दूषित पाणी बाहेर पडते.
२) डिसेंबर १९९१ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्रात सायरस संकुलातील दूषित पाण्याची नलिका गळू लागली. गळतीच्या दुरुस्तीसाठी बाहेरुन मजूर आणले. त्यांना झालेल्या मोठ्या बाधेची कुठेच दखल घेतलेली नाही.
३) तारापूर येथे १३ मे १९९२ रोजी नलिकेतील गळतीमुळे किरणोत्सर्ग आसमंतात पसरला.
४) कल्पक्कम इथे ६ मार्च १९९९ रोजी जड पाण्याची गळती झाली. अशा ३ घटना इथे, नरोराला २, काक्रापार इथे १ सरकारने मान्य केलेल्या आहेत. कल्पक्कमच्या समुद्रावर मेलेले मासे मोठ्या प्रमाणात येऊन पडतात. ते स्थानिक खात नाहीत. खारवून दूर मद्रासला विकतात.
अणुउर्जा प्रकल्पामध्ये लहान मोठे अपघात, तांत्रिक बिघाड व किरणोत्साराची बाधा, गळती या समस्या सतत उद्भवत असतात. परंतु शासन किरणोत्साराचे दुष्परिणाम मान्य करत नाही. कारण त्यामुळे आण्विक कार्यक्रमच अडचणीत येईल.
गारुड्याने विषारी सर्प चावणार नाही याची कितीही खात्री दिली तरी सापाला तुम्ही घरात ठेवून घेणार नाही. सापाला विष आहे म्हणजे तो कायम धोकादायक हे तुम्हाला कळते. अणुभट्टी हा असाच किरणोत्साराचे जालिम विष घेतलेला साप आहे. त्याला तुम्ही तुमच्या गावात घेणार का? अणुउर्जा प्रकल्पाला इतर कोणत्याही कारणापेक्षा किरणोत्साराच्या धोक्याचे कारण हेच विरोधाचे सर्वात महत्वाचे कारण आहे. जनतेला जर प्रश्नाची नेटकी माहिती मिळाली तर ही शास्त्रीय माहिती हेच जनतेचे अस्त्र बनते. ते अस्त्र हाती घेऊन जनतेने निग्रही संघटन बांधून चिकाटीने लढत दिली तर सरकारला नमावेच लागते.
संदर्भ- अणुउर्जा- भ्रम, वास्तव आणि पर्याय
- सुलभा ब्रम्हे

बालकांच्या आरोग्यासाठी
सुवर्णप्राशन - विधी
सर्व सजीवांना सध्या विविध प्रदूषणांना सामोरे जावे लागत आहे. हवा, पाणी, अन्न यांद्वारे विविध विषारी रसायने शरिरांत प्रवेश करीत असतात. त्यांतच ध्वनी-प्रदूषणाचा (वाहनांची वाढती संख्या, त्यांचे कर्णकर्कश हॉर्न इ. मुळे) मुकाबलाही सतत करावा लागतो. त्याशिवाय सध्या पर्यावरणांतही चित्रविचित्र बदल सतत आढळून येत आहेत. ‘तपमान-वृद्धी‘ (ग्लोबल वॉर्मिग) हा त्यातलाच एक. या सर्वांचा एकत्रित परिणाम सर्व मानवजातीला विशेषतः लहान बालकांना भोगावा लागत आहे.
सर्व प्रकारच्या प्रदूषणांशी यशस्वी टक्कर देण्यासाठी मानवाची प्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. ‘सुवर्ण - प्राशन विधी‘ हा उपक्रम विशेषतः बालकांची प्रतीकारशक्ती वाढविण्यास मदत करुन वरील हेतू साध्य करण्यास हातभार लावतो.
‘आयुर्वेद‘ या जगातील प्राचीनतम वैद्यकशास्त्रामध्ये, व्याधीची उत्पत्ती झाल्यावर त्याचा प्रतिकार करीत बसण्याऐवजी व्याधी होऊ न देण्यासाठी काय काळजी घ्यावी यावर अधिक भर दिला आहे.
स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. याचा पाया बालवयातच घालणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ‘स्वस्थवृत्त‘ विभागात आयुर्वेदाने अनेक उपाय वर्णन केले आहेत. त्यापैकी बालकांच्या स्वास्थ्यवर्धनासाठीच्या अनेक उपयांपैकी एक म्हणजे ‘सुवर्ण - प्राशन विधी.‘
सुवर्ण म्हणजे सोने. पर्यावरणातील बदलांचा परिणाम सोन्यावर पटकन होत नाही. अग्नीमध्ये देखील ते स्वतःचा वर्ण (रंग) बदलत नाही (म्हणूनच त्याला ‘सु‘वर्ण म्हणतात.) असे अनेक उपयुक्त गुणधर्म असल्याने सोन्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये मानाचे स्थान आहे. मनुष्य देहाला ते कांतिवान,सुदृढ आणि प्रतिकारक्षम बनवते.
सुवर्णप्राशनासाठी जे औषध बनवले जाते त्यात सुवर्णभस्मा - सोबत वचा (वेखंड) हे एक प्रमुख औषध आहे. लहान मुलांमध्ये वेखंड हे मेध्य कार्य करते. त्यामुळे बालकांची धी (बुद्धी) आणि स्मृती (स्मरणशक्ती) वाढते. अभ्यासात मागे पडणा-या विद्यार्थ्यांसाठी याचा छान उपयोग होतो. तसेच वेखंडामुळे वाणी सुधारते (शब्दोच्चारणातील दोष नाहीसे होतात.) सुवर्ण आणि वेखंड यांच्या योगे वर्ण (त्वचेचा रंग) सुधारतो, बुद्धीची चांगली वाढ होते. या औषधामध्ये तूप आणि मध मिसळलेले असतात. प्रत्येक महिन्याच्या ‘पुष्य‘ नक्षत्रावर बालकाला (पोलिओ डोसप्रमाणे) पाजले जाते.
सध्याच्या मर्यादित अपत्यांच्या काळात प्रत्येक सुजाण पालक आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांची बुद्धी कुशाग्र होण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत सजग आणि प्रयत्नशील असतात. ‘सुवर्ण-प्राशन विधी‘ ही संधी त्यांना सोन्यासारखी ठरु शकते.
कर्नाटक राज्यातील हासन येथे श्री धर्मस्थल मंजुनाथेश्वर (एस.डी.एम.) आयुर्वेदिक कॉलेजमध्ये, आयुर्वेद निदेशक यांचेतर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘सुवर्ण-प्राशन शिबिरा‘साठी निमंत्रण मिळाल्यामुळे सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मला जाण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या संस्थेतर्फे दर महिन्याला कॉलेजच्या आवारांत तसेच अन्य चार केंद्रांच्या ठिकाणी सुवर्ण-प्राशन कॅम्प आयोजित करण्यांत येतो आणि दर महिन्याला सर्व केंद्रांत मिळून सुमारे दहा हजार बालके त्याचा लाभ घेतात. एकट्या कॉलेजच्या आवारांत सुमारे पाच हजार मुले त्यासाठी दर महिन्यांत नियमाने एकत्र येतात. त्या शिबिराचा एक दिवस पुष्य नक्षत्रादिवशी येईल अशी आखणी करण्यांत आली होती. त्यामुळे बालकांचा तो प्रचंड जमाव एकत्रित झालेला मला स्वतःला अनुभवता आला. बालके (व सोबत पालक) हजारो असली तरी नियोजन सुव्यवस्थित असल्याने कोठेही गडबड गोंधळ नव्हता. शेजारच्या गोवा राज्यांतही सुवर्ण-प्राशन शिबिरे दर महिन्यांत आयोजित करण्यांत येतात.
‘अखिल मानव कल्याण न्यास‘ या सेवाभावी संस्थेने जामसंडे (देवगड) येथे सुवर्ण प्राशन विधीची सुविधा सर्व प्रथम उपलब्ध करुन दिली. तेथील उत्तम प्रतिसादामुळे आता कणकवली आणि सावंतवाडी येथेही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
- प्रा. वैद्य मुरलीधर पु. प्रभुदेसाई
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय,
सावंतवाडी, जि. सिधुदुर्ग ४१६५१०
संफ * ९४२२४३५३२३

मध्वानुभव
टी.व्ही.चा शोध लावणा-या संशोधकाला, या शोधामुळे समाज कसा घडत किवा बिघडत चालला आहे हे पहायला मिळाले तर त्याला ‘प्रायश्चित‘ घ्यावेसे वाटेल. मला ‘प्रायश्चित‘ दे, अशी ऑफर त्याने मला दिली, तर गेली ३ - ४ वर्षापेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या ‘सिरिअल्स पहाण्याचे प्रायश्चित‘ मी त्याला देईन. (तो डोक्याचे केस (स्वतःच्या) उपटत, हातात येईल त्या वस्तूने टी.व्ही. फोडेल असे रम्य कल्पनाचित्र माझ्या डोळ्यासमोर साकार होत आहे.)
टी.व्ही.काय किवा अन्य कोणतेही शोध काय, ‘ते वरदान की शाप‘ हे ठरवणं कठीण आहे. एखादं ‘शस्त्र‘ हे कुणाच्या हाती आहे त्यावरुन ते विधायक की विघातक होईल हे ठरतं. सुरी ‘सर्जन‘च्या हातात ‘जीवनदायीनी‘ ठरते. तर गुंडांच्या हातात......!
मध्यंतरी कुणीतरी टी.व्ही.मुळे मुले बिघडतात असे म्हणतांना ऐकलं. मुलं किवा पुढची पिढी टी.व्ही.मुळे बिघडत आहेत हे मला स्वतःला फारसं पटलं नाही. टी.व्ही., सिनेमे इत्यादींच्या ‘बेलगाम‘ वापरामुळे मुलं-मुली लवकर वयात येत आहेत असे वाचनात आले आणि एक अनुभव आठवला.
म्हणजे त्याचं काय झालं, शनिवार / रविवारी दुपारी टी.व्ही.वर डिस्कव्हरी चॅनल पहात होतो. आमच्या शेजा-यांचा ६-७ वर्षांचा मुलगाही समवेत होता. ‘आजोबा, मराठी सिनेमा लावा ना‘ असा हट्ट त्याने धरला. कॉन्हेंटमध्ये शिकणा-या या बालकाने मराठी सिनेमा पहाण्याची इच्छा व्यक्त केल्याने मी धन्य झालो. मी मराठी सिनेमा ‘सर्फिग‘ करुन लावला. सिनेमाचे नाव, अन्य तपशील आता आठवत नाही. परंतू नायक - नायिकेचे मराठी बजेटला साजेशा बागेत हुंदडणे, पळापळी, धावाधावी इ. सुरु होते. (वाचकहो, धावतांना ताला-सुरात ज्याला गाणं म्हणणं जमत असेल त्याचा खास सत्कार करावा असं मी संपादकाना सुचवितो!)
तर त्या दोघांचं दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे, यथेच्छ बागकाम झाल्यावर पुढे फारशी विघ्ने न येता लग्न झाल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर साहजिकच हनिमुनला जाणे ओघानेच आलं. आमच्या शेजा-यांचा ‘कुमार‘ हे सर्व मन लावून पहात होता. सिनेमाचे कथानक पुढे सरकत होते. त्यानंतर तो लग्नानंतरचा रोमांचकारी सीन व क्षणही आला. नायिका फुलांच्या माळांनी शृंगारलेल्या पलंगावर अधोमुख होऊन सलज्जपणे बसली होती. नायक हॉटेलच्या रुमचा दरवाजा उघडून आत आला. दोघांची वेशभूषा प्रसंगाला साजेशी होती. दिग्दर्शकाच्या सुचनेनुसार नायक नायिकेजवळ पलंगावर बसला. नायिकेच्या हनुवटीला स्पर्श करीत त्याने तिचे अधोमुख किचित वर उचलले. नायिका नखशिखांत रोमांचित झाल्याचे ‘पार्श्वसंगीत‘ सुचवत होते.
एवढ्यात माझ्या शेजारी बसलेला कुमार उस्फूर्तपणे म्हणाला, ‘आजोबा, त्या हिरोने दाराची कडी लावली नाही!!!‘
सहा - सात वर्ष वयाच्या कुमाराचं हे ‘निरिक्षण‘ पाहून मी धन्य झालो. हा ‘कुमार‘ भविष्यात सिनेमा नायक, दिग्दर्शक झालेला दिसला तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. टी.व्ही. सिनेमे यामुळे ‘पिढी‘ लवकर वयात येत आहे हे निरिक्षण ज्या कोणाचं असेल त्याला माझा पूर्ण पाठिबा आहे.

‘गेलेले हे ते नव्हेतच.‘
तेरा जानेवारी दोन हजार अकराला रात्री नऊ पासून सर्ववृत्तवाहिन्यांनी ‘पंत‘ नटवर्य गेल्याचे वृत्त प्रसारीत करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक नाटकप्रेमी व्यक्तीला आपले पंत गेले ही भावना काजाळवून गेली.
पंत म्हणजेच नटवर्य प्रभाकर पणशीकर. ते आपल्यातून गेलेले नाहीतच. ते जाणारच नाहीत. ते तेथेच आपल्यात ठामपणे उभे आहेत, धृवाच्या ता-यासारखे. त्यांनी त्यांच्या पणशीकर किवा पंत नावाच्या भूमिकेची रंगभूषा आणि वेशभूषा उतरवून ठेवली आहे एवढेच काय ते.
एकोणीसशे पंचावन सालापासून आपले पंत रोजच्यारोज प्रभाकर पणशीकर नामक भूमिकेची वेश-रंगभूषा उतरवून ठेवत आणि नवनव्या भूमिकांच्या वेशरंगभूषा चढवून वेगवेगळ्या देहबोली आणि नवनव्या संवाद पद्धतीसह उजळलेल्या रंगमंचावर आपल्यासमोर वावरत होते. रंगमंचावर अंकाचा पडदा पडला की त्या दिवशीचा पंतांचा तो नाट्यप्रयोग पाहाणा-या प्रत्येकाच्या मनात पंतानी सादर केलेली ती भूमिका जिवंत होवून वावरत असायची असे सतत पन्नास वर्षे सुरू होते.
कॅप्टन अशोक परांजपेची ती फ्रेंचकट दाढी, नेव्हीचा गणवेश संरक्षणदलातील अधिका-याप्रमाणेच्या हालचालीतील तत्पर चटपटीतपणा कोणी विसरू शकत नाही. विद्यानंदांच्या ‘खरे काय आणि खोटे‘ काय या स्वगतातील मानसिक आक्रोश पंतांनी अनेकांच्या हृदयात कायमचा कोरुन ठेवलाय. न्यायमूर्ती देवकीनंदन मधील न्यायाधीशाचा काटेकोर करारीपणा आणि कुटुंब प्रमुखाचा सहृदयपणा हा मला काही सांगायचयचा आधार होता. तो कुणाला विसरता येणारच नाही. फॉरेनरिटर्न्ड दिवाकर दातार आणि कर्मठपणाचा अर्क असलेल्या प्रवचनकर्त्या दाजीशास्त्री दातारांच्या व्यक्तिमत्वातील फरकांवर एखादे पुस्तक लिहिता येईल. कोण म्हणतो, आपले पंत गेले? छे! छे!! ते आपल्या सर्वांच्या मनात ठामपणे वेगवेगळ्या रंगरुपात वेगवेगळे संवाद म्हणत उभेच आहेत!
ओशाळलेल्या मृत्यूतला शहेनशहा औरंगजेब गाजत असताना, बंद पाकिटावर फक्त, शहेनशहा पणशीकर एवढे दोनच शब्द कोठल्याही पत्त्याशिवाय लिहिलेले, बाहेरगावच्या पोष्टात टाकलेले पत्र पंतांच्या दादरच्या घरी पोहचते झाले होते. त्या पोस्ट कर्मचा-याच्या मनातही तो शहेनशहा औरंग्या पणशीकर वावरत असणार! कोर्टात दिसणारा लखोबा म्हणजेच राघेश्याम महाराज किवा दिवाकर दातार किवा दाजी शास्त्री असतो यावर अनेक सुशिक्षितांचा विश्वास बसायचा नाही. लखोबा लोखंडेला उद्देशून सरकारी वकील एके ठिकाणी म्हणतात, --- या आरोपीचे अभिनय कौशल्य पाहून सरकारने याला अभिनयासाठीचा पद्मपुरस्कार दिला पाहिजे. --- या वाक्याला प्रेक्षक कडाडून टाळ्या वाजवायचे, कारण प्रेक्षकांना ---- ते वाक्य लखोबासाठी नसून प्रभाकर पणशीकरांसाठी आहे हे मनोमन पटलेले असायचे.
खरोखरच कोण होते ते ? शहेनशहा औरंगजेब की लखोबा? अल्लाउद्दिन खिलजी की प्रि. विद्यानंद? न्यायमूर्ती देवकीनंदन की, मि. ग्लाड. की, दाजी शास्त्री दातार? कोण? कोण होते ते? ते हे सर्वकाही असलेले ‘आपले पंत‘ होते.
- कॅप्टन डॉ. आनंद जयराम बोडस

विशेष बातम्या *
डच वखारीचा जीर्णोद्धार!
व्यापार-उदिमासाठी डचांनी सन १६७८ मध्ये बांधलेल्या वेंगुर्ले, सूरत, कोचीन येथील पुरातन इमारतींच्या जागी त्याच दिमाखात नूतन वास्तू बांधून पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या हॉलंडमधील आर्किटेक्ट सुझान्न,राजकीय नेते अॅरी फोम यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष संदेश निकम यांची भेट घेतली. यावेळी निकम यांनी याप्रश्नी जिल्हाधिका-यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
हॉलंड-नेदरलँडमध्ये आजही डचांनी भारतात सोळाव्या शतकात बांधलेल्या वस्तूंचे नकाशे आहेत. त्यात इमारतींची पूर्ण माहिती आहे. भारतातील जीर्ण झालेल्या या इमारतींचा विकास करण्यासाठी हॉलंडकडून निधी आणून येथील इमारतींचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारत सरकारचे सहकार्य लागणार आहे. पुढील काळात हॉलंडमधील पर्यटक येथील वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी भारतात येतील, असे अॅरी फोम यांनी स्पष्ट केले.

पत्रकार केसरकरांना वालावलकर पुरस्कार प्रदान
कुडाळ तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा भैय्यासाहेब वालावलकर स्मृति पुरस्कार वेंगुर्ले येथील ज्येष्ठ पत्रकार शशिकांत केसरकर यांना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तालुकास्तरीय शहरी पुरस्कार हरिश्चंद्र पालव, ग्रामीण गटातून मधुकर कुडाळकर यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद ठाकूर, व्याधच्या संपादक सौ.संजीवनी देसाई, श्री. रणजीत देसाई आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट प्राचार्य डॉ. के. जी. केळकर
वेंगुर्ले येथील अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर यांना ‘बेस्ट प्रिन्सिपॉल अवार्ड‘ ने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शिक्षण व व्यवस्थापन दिल्ली या संस्थेकडून विविध विभागांच्या प्राचार्यांमधून शिक्षण व होमिओपॅथिक वैद्यक शास्त्रातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल देशभरातून आलेल्या प्रस्तावातून वैयक्तीक कामगिरी व बौद्धिक विकास या निकषावर ही निवड करण्यात आली.
डॉ.के.जी.केळकर गेली २२ वर्षे होमिओपॅथीक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९९८ पासून प्राचार्य पदावर काम करीत आहेत. तसेच होमिओपॅथीक वैद्यक क्षेत्रात होमिओपॅथीच्या प्रसाराकरिता शिक्षण, आरोग्य मेळावे, आरोग्य शिबिरे, प्रशिक्षणे इ. माध्यमातून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या पोस्ट ग्रॅज्युएट विभागात तसेच मुंबई विद्यापीठात होमिओपॅथीक विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) म्हणून तसेच अभ्यास मंडळे यावर काम केले आहे.

मिराताई जाधव यांचा ८४व्या वाढदिवस साजरा
वेंगुर्ले-कोचरे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सावंतवाडी येथील सा. सत्यप्रकाशच्या माजी संपादक मिराताई जाधव यांचा ८४व्या वाढदिवस नुकताच त्यांच्या निवासस्थानी साजरा केला. सिधुदुर्ग काँग्रेस सरचिटणीस एम.के.गावडे यांच्या हस्ते श्रीमती जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रज्ञा परब, सौ. दिपा जाधव, लावण्यलक्ष्मी जाधव, हेतल जाधव आदी उपस्थित होते.
आज पत्रकारीता ही काळानुरुप बदल असून पत्रकाराने लेखणीचा वापर विकासासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी करावा असे विचार श्रीमती मिराताई जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देतांना त्या म्हणाल्या, आपण सावंतवाडीत केवळ १९ रुपयात निवडणूक लढविली होती. परंतू आज निवडणूक साम, दाम, दंड यावर आधारीत आहे. नितिमूल्य घसरत आहेत याची खंत वाटते. यामध्ये बदल हा केवळ युवक करु शकतो. परंतू त्याचबरोबर समाज बदलण्याची ताकद ही पत्रकारीतेत आहे. तिची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. पत्रकाराला मिळणारे मानधन व पत्रकाराच्या कामाचे स्वरुप यामध्ये तफावत आहे. याकडेही शासनाचे लक्ष त्यांनी वेधले आहे. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

एम.के.स्वयंरोजगार सहकारी संस्था स्थापन
एम. के. गावडे यांच्या नावानेच एम.के.स्वयंरोजगार सहकारी संस्थेची स्थापना झाली असून या संस्थेची पहिली सभा एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये सौ. प्रज्ञा परब - वेंगुर्ले (चेअरमन), सखाराम ठाकूर - मठ (व्हा.चेअरमन), सदस्य - एम.के.गावडे-वेतोरे, शुभांगी गडेकर-आडेली, सुनिल नाईक-वेतोरे, श्वेता नाईक - पालकरवाडी, अंबाजी धर्णे - आडेली, श्वेता सच्चिदानंद जाधव - कोचरे, बाबाजी येरम -वेतोरे (सचिव)
संस्थेने ४ कोटीचा विकास आराखडा तयार केला असून ८ लाखाचे ५०० टन क्षमतेचे गोडावून व ३० लाखाचे पॅकिग, ग्रेडिग युनिट बांधण्यात येणार आहेत. १२० शेतकरी व महिलांचे कर्ज प्रस्ताव केले असून केले असून त्यांना उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संस्थेमार्फत मार्केटमध्ये खरेदी - विक्री व्यवहारही केली जातील. असे संस्थापक एम.के.गावडे यांनी सांगितले.

Friday, 11 February 2011

अंक-६वा, १० फेबुवारी २०११

अंक-६वा, १० फेबुवारी २०११
संपादकीय *
पुनर्वसनाच्या दिरंगाईमुळे विकास प्रकल्पांना विरोध

जैतापूरच्या अणुउर्जा प्रकल्पास स्थानिक लोकांचा संघटीत वाढता विरोध होत असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यावरील वीज टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अणुउर्जा प्रकल्प झालाच पाहिजे यावर भर दिला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी सोपविली आहे पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाची हानी करणा-या कोळसा व गॅसवर आधारीत उर्जा प्रकल्पांना स्थानिक लोकांचा व पर्यावरणवादयांचा तीव्र विरोध असल्याने पर्यटन विकासाशी विसंगत असे हे प्रकल्प उभारण्याबाबत सरकारने फेरविचार करण्याची तयारी दर्शविल्याने सध्यातरी या औष्णीक उर्जा प्रकल्पांचे काम थंडावले आहे. पण जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत भारत सरकार आणि फ्रान्समध्ये करार झाल्यावर कसेही करून हा प्रकल्प उभारायचाच असा निश्चय सरकारने केला आहे. त्यासाठी आता नारायण राणे यांनी अणुउर्जा महामंडळाकडे सादर केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या. त्यानुसार येथील जमीनदारांना एकरी दहा लाख रुपये मोबदला, विस्थापितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन, प्रकल्पबाधित कुटुंबातील किमान एकाला नोकरी, तसेच रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांवर भारमान लादले जाणार नाही या मागण्या मान्य झाल्या आहेत.
एवढे सगळे जाहीर होऊनही जैतापूर प्रकल्पामधील गावांतील लोकांचा विरोध कायमच आहे. वृत्तपत्रांतून या प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ उलट सुलट लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे संभ्रमावस्था वाढलेली आहे. या स्थानिक लोकांवर साम-दामाचे प्रयोग यशस्वी न झाल्याने आता दंडनीती सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. या परिसरात पोलीस छावण्या अुभारण्यात आल्या आहेत. जरूर तर निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात येईल. तथापी स्थानिक, विशेषतः मच्छिमारांनी या प्रकल्पाच्या विरोधात ठाम राहून हा प्रश्न आपल्या जीवन मरणाचा बनविला आहे. या परिसरातील बहुसंख्य लोक हे काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत पण त्यांनीही सत्तेवर असलेल्या आपल्याच पक्षाच्या सरकारविरूद्ध संघटीतपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार केलेला आहे.
जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात आणि बाजूने वृत्तपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्या जे काही दाखवितात ते सगळे सत्य नव्हे, आमची बाजूच कोणी नीटपणे मांडत नाही असे सिधुदुर्गातून गेलेल्या पत्रकारांच्या टीमला तेथील नेत्यांनी व स्थानिकांनी सांगीतले. या टीमने हा परिसर पाहून आणि लोकभावना जाणून स्थानिकांची बाजू मांडायचे ठरविले. त्यानुसार ‘किरात‘ ने या अणुउर्जा प्रकल्पाबाबत फेब्रुवारी महिन्याच्या सर्व अंकांतून ‘जैतापूरची युद्धभूमी‘ ही खास लेखमाला सुरू केली. या अंकात लेखमालेचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे.
या अणुउर्जा प्रकल्पाबाबत यापूर्वी संपादकीय लेखामध्ये आम्ही समर्थनच केलेले आहे.राज्याच्या विकसासाठी वीज हवी तर मोठा वीज प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक जमीन संपादन करावी लागणार, लोकवस्तीचे पुनर्वसन करावे लागणार, त्यांना आवश्यक तो मोबदला द्यावा लागणार हे ओघानेच आले.
असे प्रकल्प उभारण्यास पाठिंबा देणारे हे संभाव्य अडचणी व धोके याबाबत अज्ञानी आहेत किवा ते अविचाराने असे प्रकल्प उभारीत आहेत असे मानण्याचे काही कारण नाही. संपूर्ण परिसराचा, संभाव्य पर्यावरण हानीचा, विस्थापितांच्या पुनवर्सनाचा, त्यांच्या रोजीरोटीचा सर्वंकष विचार करूनच असे अवाढव्य प्रकल्प उभारले जात असतात. असे प्रकल्प कोण्या एका गावाचे, राज्याचे नसतात संपूर्ण देशाचा तो प्रकल्प असतो. अणुऊर्जा या महामंडळाने देशात अनेक ठिकाणी अणुउर्जा प्रकल्प उभारलेले आहेत. तेव्हाही असाच विरोध झालेला होता. जलविद्युत, पवन उर्जा, सौरऊर्जा वगैरे उर्जा निर्मिती योजनांना खूपच मर्यादा आहेत. हेही या मोठ्या प्रकल्पा संबंधी विचारमंथन होताना दिसून आलेले आहे. म्हणूनच अणुऊर्जा खात्याने कमितकमी पर्यावरण हानी होईल, जास्तीत जास्त नापिक जमीन प्रकल्पाखाली येईल, समुद्रमार्गे वाहतुक सुलभ होईल आणि विस्थापितांची संख्याही कमित कमी राहील असा विचार करूनच जैतापूर क्षेत्राची निवड केलेली असणार. पिढ्यान पिढ्या तेथे राहणा-या लोकांचा विरोध हा होणारच पण त्यांचे चांगले पुनर्वसन केले तर तीही समस्या सुटू शकते. परंतू आपली नोकरशाही आणि राज्यकर्ते सुद्धा कोणत्याही प्रकल्पबाधीत विस्थापित लोकांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी आग्रही नसतात असाच आतापर्यंतचा अनुभव असल्याने प्रकल्पाच्या विरोधाला हे एक महत्वाचे कारण आहे.
जे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यांच्याही पुनर्वसनाचे प्रश्न अजून प्रलंबीत आहेत मग राज्याचे महसूल आणि पुनर्वसन खाते काय करीत असते? हाही एक संशोधनाचा विषय आहे. त्यातूनही अनेक घोटाळे बाहेर येतील! विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काम, प्राधान्याने आणि कोणताही भ्रष्टाचार न होता झाले असते तर असे संघर्षाचे प्रसंग आले नसते. सर्वच राज्यकर्त्यांनी आणि नोकरशाहीने म्हणजे सरकारी यंत्रणेने हे लक्षात घ्यायला हवे. पण तशी कार्यतत्परता दाखवील तर ती सरकारी यंत्रणा कसली!

अधोरेखीत *
अणूउर्जेला पर्याय
जैतापूर उणुउर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध झाल्यावर राज्याची आणि देशाची वीजेची गरज लक्षात घेऊन अणुउर्जेला पर्याय द्या अशी आवई उठविण्यात आली. प्रत्यक्षातून रत्नागिरी-सिधुदुर्ग विभागातून वीजेच्या मागणीच्या कित्येकपट अधिक वीज निर्मिती सध्या सुरु आहे. (तरीही भारनियमन आहेच.) पर्यायी उर्जा स्रोताचा अभ्यास करण्यासाठी शासनाने स्वतंत्र अपारंपारिक उर्जा मंत्रालय कार्यान्वित केले आहे. किबहुना अपारंपारिक उर्जा मंत्रालयासाठी स्वतंत्र कॅबीनेट दर्जाचे मंत्री देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असावे. अपारंपारिक खात्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असतांना लोकांकडेच पर्याय मागणारा उफराटा प्रश्न उपस्थित केला जातो. यावरुनच शासनाची मानसिकता स्पष्ट होते.
पेट्रोल, कोळसा, नैसर्गिक वायू असे पारंपारिक उर्जा स्रोत येत्या ३० ते ४० वर्षात जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपारंपारिक उर्जा स्रोतांशिवाय भविष्यात पर्याय नाही. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा अभ्यास करुन जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या अभ्यासगटाने दिलेला अहवाल मार्गदर्शक आहे. छोटे जलविद्युत प्रकल्प राबवून या दोन जिल्ह्यातून ८,५०० मेगावॅट वीज निर्मिती शक्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. यासंदर्भातील परिपूर्ण अहवाल तयार झाला. परंतु तो विधानसभेत आजवर सादर झालाच नाही आणि त्यांच्या शिफारशींनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असा आक्षेप आहे.
पर्यायी उर्जा निर्मितीच करायची झाली तर सौर उर्जा, पवनउर्जा, जैविक उर्जा, जलविद्युत, घनकच-यापासून उर्जा असे कित्येक पर्याय आहेत. नेहमी जनतेला मानसिकता बदला असे उपदेशाचे डोस पाजणा-या राजकीय नेत्यांनीच या विषयावर मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
समुद्राच्या तापमानाचा वापर करुन ओटेक (ओशियन इनर्जी कन्व्हर्जेन) सारखे प्रयोग कमी खर्चात युरोपीय देशांनी यशस्वी केले आहेत. प्रत्येक बाबतीत युरोपीयन देशांचा दाखला देणा-यांनी या उर्जा स्त्रोतांचा अभ्यासपूर्ण आढावा घेऊन असे प्रकल्प आपल्या देशात किवा राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न केल्याचे ऐकिवात किवा वाचनात नाही. कमी खर्चाचे प्रकल्प म्हणून ते बाजूला ठेवण्यात आले की काय अशी शंका यावी इतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.
युरोपियन देशांच्या तुलनेत भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत अधिक समृद्ध आहे. राजस्थानमधील थरच्या वाळवंटाचा सौरउर्जा प्रकल्पासाठी वापर केल्यास कमीत-कमी १ लाख ८० हजार मेगावॅट एवढी उर्जा निर्मिती शक्य असल्याचा काही तज्ञांचा दावा आहे. (संदर्भ- प्रयास ऑर्गनायझेशन, पुणे) इटलीमध्ये सौरउर्जेचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. डेन्मार्कसारख्या देशाने पवनचक्कीसारखा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. भारतामध्ये एवढे प्रचंड नैसर्गिक स्रोत असतांना परकियांवर आधारीत अणुउर्जेसारखे अधिक खर्चिक व पर्यावरणावर परिणाम करणारे प्रकल्प हवेतच कशाला? याचा जाब एक ना एक दिवस ही जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही काही काळ काही माणसांची दिशाभूल करु शकता, परंतु तुम्ही सर्व काळ सर्व माणसांची दिशाभूल करु शकत नाही. हे वाक्य संबंधित राजकीय नेत्यांनी जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे समर्थन करतांना लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यामुळेच आता सिधुदुर्ग, रत्नागिरीतील येऊ घातलेल्या उर्जा प्रकल्पांना पर्यायी उर्जा निती सुचविण्यात आली आहे. अंकुर ट्रस्टने यासंदर्भातील मागणी शासनाकडे केली आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीच्या ३० जूनला येणा-या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी विकास नितीची मागणी आता जोर धरत आहे. कोकणातील रत्नागिरी व सिधुदुर्ग या दोन जिल्ह्यात तब्बल ५६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामध्ये तब्बल बारा औष्णिक प्रकल्प आहेत. पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी केंद्राने नेमलेल्या डॉ. माधव गाडगीळ समितीचा अंतिम अहवाल ३० जूनच्या दरम्यान येणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिधुदुर्गच्या १७० किलोमीटरच्या चिचोळ्या समुद्रकिनारी भागात उर्जा प्रकल्प राबविण्यापूर्वी शासनाने पर्यायी विकास नीतीचा आराखडा करावा, अशी मागणी कोकणातील पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिग, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून केंद्रस्तरावर पत्रव्यवहार सुरु झाला आहे.
सिधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांची विजेची मागणी १८० मेगावॅट आहे. प्रत्यक्षात रत्नागिरी व सिधुदुर्ग या विभागातून सध्या ५ हजार ४४४ मेगावॅट विजेचे उत्पादन सुरु आहे. पोफळी (ता. चिपळूण) येथील जलविद्युत प्रकल्पातून २ हजार मेगावॅट, दाभोळ वीज प्रकल्पातून २ हजार २०० मेगावॅट, जयगड येथील औष्णिक उर्जा प्रकल्पातून १ हजार २०० मेगावॅट व पावस-रनपार येथील प्रकल्पातून ४३ मेगावॅट अशी एकूण ५ हजार ४४३ मेगावॅट वीजनिर्मिती सध्या रत्नागिरी-सिधुदुर्ग विभागातून होत आहे. राज्याची १४ हजार मेगावॅट विजेची गरज गृहीत धरल्यास या एकूण मागणीच्या एक तृतीयांश वीजनिर्मिती रत्नागिरी-सिधुदुर्ग विभागातून होत आहे. असे असतांना या दोन्ही जिल्ह्यात आणखी किती आणि कशा पद्धतीचे उर्जा प्रकल्प आणायचे हा महत्वाचा प्रश्न असल्याने पर्यायी उर्जा साधनांचा विचार व्हावा.
सध्या सिधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बारा औष्णिक उर्जा प्रकल्प व जैतापूरचा अणुउर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून ५६ हजार मेगावॅट उर्जा निर्मितीचे प्रकल्प होऊ घातले आहेत. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पर्यावरण संवेदनशील रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यात आणखी किती प्रकल्प कार्यान्वित करायचे याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. कोयना अवजलाचा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी शासनाने कोयना अवजल अभ्यास गटाची नियुक्ती केली . तज्ञ श्री. कद्रेकर व श्री. पेंडसे यांच्या समितीने यासंदर्भात दिलेला अहवाल दिशादर्शी आहे.
कोकणात दरवर्षी पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती असते. चिपळूणच्या वसिष्ठी नदीसह राजापूरचा भाग पाण्याखाली असतो. तरीही उन्हाळ्यात नद्यांच्या आसपासच्या भागात पाणीटंचाईचे चटके जाणवतात. ही परिस्थिती बदलायला हवी. जिह्य्ात छोट्या जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून ८ हजार ५०० मेगावॅट उर्जा निर्मिती शक्य आहे. यासंदर्भात फिजीबिलीटी स्टडी (व्यवहार्यता तपासणी अभ्यास) होणे आवश्यक आहे.
अणुउर्जा निर्मितीवर प्रचंड खर्च होतो, त्या मानाने वीज निर्मिती नगण्य असल्याची आकडेवारी आहे. सौर उर्जा, पवन उर्जा, जैवीक उर्जा, लघु जल विद्युत प्रकल्प, कनकच-यापासून उर्जा निर्मितीचे प्रकल्प राबविणे शक्य आहे. या पर्यायी उर्जा नितीचा अभ्यास करुन त्याचा अवलंब व्हायला हवा.
यासंबंधी रत्नागिरी जिल्हा जागृकता मंचचे म्हणणे आहे, शेती, मत्स्योत्पादन, फलोत्पादन, पर्यटन विकास ही रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्याची विकासाची धोरणे शासनाने ठरवली होती. सिधुदुर्गला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला, असे असतांना अचानक विकासाचे फंडे अचानक बदलतात कसे. कद्रेकर-पेंडसे समितीचा अहवाल पर्यायी उर्जा नितीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कोकणचा विकासच करायचा असेल तर १७० किलोमिटरच्या चिचोळ्या भागात उर्जा प्रकल्प राबविण्यापेक्षा आय.टी. पार्कसारखे प्रकल्प उभे करावेत. राज्यात एकूण ३८० आ.टी. पार्क प्रस्तावित आहेत. त्यापैकी पाच टक्के कोकणच्या वाट्याला येणे आवश्यक आहे. कोकणची पर्यायी समग्र विकास निती तयार व्हायला हवी.
जिओथर्मल एनर्जीचा प्रस्ताव
कोकणात राजापूरसारख्या काही ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे येतात. त्याठिकाणी जिओथर्मल एनर्जीचा प्रस्ताव आहे. भुगर्भातील उष्णतेचा वापर करुन उर्जा निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान कोकणात वापरण्याचे विचाराधीन आहे. औष्णिक व अणुउर्जेपेक्षा कमीत-कमी प्रदूषण होणारा हा प्रकल्प असल्याचा संबंधीत कंपन्यांचा दावा आहे. त्यामुळे आता जिओथर्मल एनर्जीचीही चर्चा सुरु झाली आहे.
ओंकार तुळसुलकर, सावंतवाडी

विशेष *

प्रश्न देशाचा आहे
जैतापुरात आकांत आहे. पण राजापुरात आनंद आहे. जैतापूरपासून राजापूर ३४ कि.मी. अंतरावर आहे. राजापुरात आनंद याचा आहे की प्रकल्पाच्या बांधकामासाठी आता भरपूर रहदारीची वर्दळ वाढणार. पुढच्या वर्षी सुरु होऊन २०१६ साली प्रकल्प पुरा होणार आहे. सरकारी कामाचा रागरंग पाहता अजून काही वर्षे पुढे वाढणारच. या काळात या रहदारीत येणा-या तमाम ड्रायव्हर क्लिनरांपासून वरच्या मेन सायबापर्यंत सर्वांच्या सर्व प्रकारच्या सरबराईचा मौका राजापुरवाल्यांना मिळणार. वडेपाव, चायपासून रम, रमी, रमणी पर्यंत सर्व गोष्टींचा धंदा भरपूर वाढणार. पैसा भरपूर बनणार. राजापूरवाल्यांचा जैतापूरवाल्यांवर प्रकल्पाला विरोध करतात म्हणून राग राग आहे. तसे तर आम्ही आजपर्यंत त्यांना खूप धंदा दिला आहे. आमच्यासाठी तीच सर्वात जवळची बाजारपेठ आहे. आमच्या पैशांवर आमच्यापेक्षा मोठे इमले त्यांनी बांधलेत. आता त्यांना त्यापेक्षा मोठ्या इमल्यांची स्वप्ने पडत आहेत.
आम्हा जैतापूरवाल्यांचाही त्यांच्यावर उलटा राग आहे. शेजारगावातले सर्व लोक मरणार म्हणून त्यांच्या मयताचा, कफनाचा आणि चितेच्या लाकडाचा धंदा मिळणार म्हणून खुशी बाळगणा-यांचा आम्हाला तिरस्कार वाटणे साहजिक आहे. तुम्हालाही तो तसा वाटतो का? मग तुमच्यात आणि राजापूरवाल्यांत काय फरक आहे?
स्थानिक माणसांवर अन्याय होतो आहे हे कबुल आहे. पण देशाला वीज पायजेल, असे पोलीस छावणीतले पोलिस आम्हाला सांगतात. तुम्हाला त्यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही. होय ना? अनेक कोटी लोकांची वीजेची सोय करण्यासाठी काही हजार लोकांचा बळी द्यायला काय हरकत आहे? पोलिस म्हणतात, आमचा बंदोबस्त करणे हा वरुन आलेला आदेश आहे. त्याला ते बांधील आहेत. हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. असो बापडे. एरव्ही आमची त्यांची खाजगी दुश्मनी थोडीच आहे? सरकारातल्या लोकांची आणि आमची कुठे आहे? आमची तुमची तरी तशी कुठे आहे? पण देशासाठी विजेचा प्रश्न त्याच्यापेक्षा मोठा, खूप मोठा आहे.
असा स्थानिक लोकांनी विरोध केला तर कुठलेच प्रकल्प होणार नाहीत. धरणे नाहीत, मोठे पूल नाहीत, रुंद रस्ते नाहीत, मोठे कारखाने, वीज प्रकल्प, खाणी काहीच नाही. बाकी विस्थापितांचे पुर्वानुभव पाहून लोक आता फार शहाणे झालेत. कुठेही कसला प्रकल्प केला तर स्थानिकांचा विरोध ठरलेलाच. जोपर्यंत स्वतः प्रकल्पग्रस्त होत नाहीत तोपर्यंत हेच लोक बाकी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करुन उपलब्ध झालेल्या सोयी, वीज, नळाचे पाणी, जलद वाहतूक, कारखान्यांत बनलेल्या वस्तू सारे उपभोगत असतात. स्वतःवर वेळ आली की मग गळा काढतात. अशा उफराट्या, दुतोंडी लोकांना कशाला दाखवायची सहानुभूती? प्रश्न देशाचा आहे!
बरोबर आहे तुमचे. आम्ही तसेच होतो. आज आमच्यावर वेळ आल्यावर आम्हाला उपरती झाली आहे. आम्ही म्हणू लागलोय आम्हाला तुमची ती वीज, कारखाने नकोत. स्वप्ने दाखवणारा टीव्ही, मोबाईल, गाड्या, काचेची घरे नि झुळझुळत्या एसीचा गारवा नको-नकोसे झालेत. या सर्व विकास मानल्या जाणा-या गोष्टी निव्वळ चैनी आहेत, असा साक्षात्कार आता आम्हाला झालाय. रोजचे अन्न, प्यायचे पाणी, स्वच्छ हवा, निर्धोक परिसर जास्त महत्वाचे वाटू लागलेत. पण सरकार आणि तुम्ही आता उपरती झाली म्हणून आमची गय करणार नाही आहात. प्रश्न देशाचा आहे!
प्रकल्प होईल. दुःखात सुख एवढेच की राजापूरवाल्यांचा आनंद फार दिवस टिकणार नाही. शहरातले धंदेवाले पैसा करायची अशी संधी हातून घालवणार नाहीत. राजापूरवाल्यांना सुखासुखी पचू देणार नाहीत. त्यांची दुकाने, घरे, जागा त्यांना खूप वाटतील असे पैसे देवून, गरज पडल्यास जबरदस्तीने विकत घेतील. बाहेरुन खाली मान घालून निमूट काम करणारे नोकर आणतील. राजापूरवाले मिळालेले भरपूर पेसे घेऊन चैन करायला शहरात जातील. तिथले हुषार व्यापारी नाना मिषांनी, आमिषांनी लवकरच त्यांचे खिसे खाली करतील. मग ते त्याच व्यापा-यांकडे बाहेरुन आलेले मिधे नोकर म्हणून खाली मान घालून नोक-या करु लागतील. त्यांनी दिलेल्या तुटपुंज्या पगारात शहरातल्या झोपडपट्ट्यांतले गलिच्छ, त्रासाचे, अभावांचे जिणे जगतील. जिवंतपणी नरकवास भोगतील. पण राजापूरवाल्यांवर सूडाचा आनंद घेण्यासाठी आम्ही तेव्हा जिवंत नसू. शहरांच्या झोपडपट्ट्या दिवसेंदिवस का फुगत चालल्यात, त्याचे कारण आता तुम्हाला कळाले का? अहो देशभर प्रकल्पांची संख्या नाही का वाढत चाललीय? देशाचा विकास जो वाढतोय.
तुम्ही कुठे राहता, गावात? तर मग तुमच्यासाठी लवकरच एखादा प्रकल्प येणार आहे. तुमच्या नेत्यांना विकासक होण्यातला फायदा हवा होणार आहे. आम्ही इतरत्र प्रकल्प होताना डोळे झाकून बसलेलो. आमच्या वेळी तुम्ही बसलात तर मग तुमचीही पाळी येणार आहे. आम्ही जात्यात आहोत. तुम्ही सुपात आहात.
तुम्ही कुठे राहता, शहरात? झोपडपट्टीत? चाळीत? फ्लॅटमध्ये? की बंगल्यात? झोपडपट्टीत राहत असाल तर तुम्ही या देशाच्या उभारणीतले पायाचे दगड आहात. मोठ्या उभारणीखाली पाया म्हणून चिरडून टाकायला कोणीतरी लागतेच. प्रश्न देशाचा आहे! तुम्हाला काय वाटले, या प्रकल्पाची वीज तुम्हाला मिळणार आहे? त्याआधी दोन वेळचे अन्न कुणी घालते का पहा.
चाळीत राहत असाल तर कधी एकदा फ्लॅटमध्ये जातो असे तुम्हाला झालेले असणार. जेमतेम दोन ट्यूब, पंखे वापरता. तुम्हाला या प्रकल्पाच्या वीजेची गरज आहे कुठे? फ्लॅटवाल्यांनी आपल्या जास्तीच्या बेडरुममधील जास्तीच्या टीव्ही वा फ्रिजची वीज जरी तुमच्याकडे वळवू दिली तरी तुमचे भागेल.
फ्लॅटमध्ये राहत असाल तर सुदैवी आहात बुवा. हजाराच्या आकड्यात तुमचे वीजेचे बिल असते. देशातली जास्तीत जास्त वीज तुमच्या घरांसाठी आणि तुम्हाला ५-६ आकडी पगार घालणारे उद्योगधंदे, कारखाने चालवण्यासाठी वापरली जाते. तुम्हाला काय वाटते, तुमचे हे सुदैव किती काळ टिकू शकेल?
लोक झोपडपट्टीत राहतात ते तुमच्या स्पर्धेच्या जगात कमी अक्कलेचे, नालायक आहेत म्हणून नव्हे. तुमच्या विकासासाठी गावातल्या लोकांची जमीन, पूर्वापार स्वावलंबी धंदे उध्वस्त करता तेव्हा ते शहरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये तुमची स्वस्त मजुरांची सोय पुरी करायला येतात. इंग्रज जसे वागत होते तसे तुम्ही वागताय. पण ते दूर बेटावर सुरक्षित होते. तुम्ही गगनचुंबी इमारतींना सुरक्षित बेटे समजता का? त्यांच्या हलाखीला तुमची चैनबाजी कारण आहे हे जेव्हा त्यांना पुरेपूर कळेल तेव्हा झोपडपट्ट्यांतले लोक चवताळून तुमच्यावर हल्ला करतील. तुमच्या घरादारात घुसून जाळपोळ, लुटालूट, दंगेधोपे सुरु करतील. त्याआधी वेळेत चूक सुधारा. तुमची उधळपट्टी थांबवा. आहे ती वीज सहज पुरेल.
तुमच्या जास्तीच्या सुख चैनीसाठी जास्तीची वीज हवी म्हणून जर आमच्यावरचा अन्याय जाणला नाहीत, आमचे होणारे खून तटस्थपणे पाहत राहिलात. तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. त्याचा दंड तुम्हाला एक दिवस तो देणार, जसा राजापूरवाल्यांना देणार आहे. बंगल्यात राहणारी ती मूठभर माणसे गब्बर घराणी, नेतेमंडळी तुम्हाआम्हाला मन मानेल तसे वाकवतात. तुडवतात. तुम्ही जगावे की मरावे, खावे की उपाशी तडफडावे, कशाला हसावे, कधी रडावे आपले सारे निर्णय तेच घेतात. तुम्ही आम्ही लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य म्हणत ते त्यांच्या हाती सोपवलेय, पण त्यांना तुमची आमची चाड नाही. त्यांचे चाचा-भतीजा, मामा-भाचे म्हणजे त्यांच्यासाठी सारा देश आहे.
त्यांना नाही पण शहरी माणसांनो तुम्हाला तरी आमची चाड आहे की नाही? तुम्हीही आम्हाला देश मानत नसाल तर हा आक्रोश व्यर्थ आहे. सरकार म्हणते तुम्हाला वीज हवी म्हणून हा प्रकल्प आहे. सरकार तुम्हाला देश म्हणते. तुम्ही प्रकल्पाला नाही म्हणालात तर प्रकल्प थांबेल. तुम्ही आम्हालाही देश मानत असाल, तर आमच्यासाठी आवाज उठवा. लक्षात घ्या. आम्हीही तुमचा देश असू तर प्रश्न देशाचाच आहे.
सौ. सुलभा गवाणकर, दळे
शब्दांकन - समीर बागायतकर


फळांचा राजा आंबा
आंबा बागायतदार शेतकरी बंधूनो, जागे व्हा, संघटीत व्हा, येणारा भविष्यकाळ फार वाईट आहे, त्यामुळे कदाचित आपल्या जीवनाची दिशाच बदलू शकते, वेळीच जागे व्हा अन्यथा सावरणे कठीण होईल, चालू वर्षी कडाक्याची थंडी असल्याने सगळीकडे सरासरी ९० टक्याहून अधिक कलमांना मोहोर आला. प्रत्यक्षात या १० टक्के सुद्धा मोहोरामध्ये फळधारणा झालेली नाही. आजपर्यंत केलेल्या खर्चातील ९० टक्के खर्च वाया गेला. आंबा बागायतदार शेतकरी वर्ग म्हणजे मोठा आशावादी समुदाय. येणा-या आंबा हंगामात तरी आपणाला चांगले दिवस येतील म्हणून आशा बाळगली आणि अगदी जून पासून त्याचे नियोजन केले. वेळीच खते दिली. कल्टार, बोल्टार सारखी महागडी संजिवके वापरली. मात्र त्याचा कुठेही परिणाम झालेला दिसून येत नाही. याला कारण दीर्घकाळ उशिरापर्यंत पडणारा पाऊस, अतिवृष्टी होवून सुद्धा आंबा पिकाला त्यात समाविष्ट केले नाही किवा तसा कोणी प्रयत्नही केला नाही ही खेदाची गोष्ट आहे. एकंदरीत आंबा बागायतदार शेतकरी वर्गाला कोणी वाली नाही. घाट माथ्यावर द्राक्षे, संत्री, मोसंबी इत्यादी पिकांना अतिवृष्टीत नुकसानग्रस्त पिक म्हणून घोषीत करण्यात आले. मात्र कोकणातील शेतकरी वर्ग आज कर्जबाजारी झाला. त्याला सावरणार कोण? महिना दिडमहिना आंबा हंगाम चालू होणे शक्य नाही. त्यामुळे शेतक-याच्या पदरी निराशाच येत आहे.
आज संपूर्ण जिल्ह्यात आंबा कलमांना आलेला मोहर पाहून या उत्पादनाशी निगडीत पूरक धंदे तेजीत चालल्याचे दिसून येते. दरवर्षी ३० ते ४० रुपयांना मिळणारा खोका(लाकडी बॉक्स) यावर्षी रुपये ५० ते ६० किमतीच्या खाली देणे परवडत नाही म्हणून गिरणी मालक सांगू लागले आणि आगावू रक्कम मिळाल्याशिवाय खोक्याची जबाबदारी घेत नाहीत. तसेच दरवर्षी २० ते २५ रुपयांना मिळणारी करडाची भाळी ४० ते ५० रुपयाला जाईल. कामगारांनाही जेवण, चहापाणी खर्च करून दररोज २००/- रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत आंबा बागायतदाराने मिळते जुळते कोणा, कोणाबरोबर घ्यावे. कॅनिग उद्योगामुळे आंबा बागायतदार जगले म्हणतात प्रत्यक्षात बरेचजण कर्जबाजारी किवा देणेकरी आहेत. मुर्हूताच्या पेटीला ३ हजार दर देणारा दलाल त्याच बागायतदाराला पेटीमागे ३०० रु. एवढा दर आणून ठेवतो. माथाडी कामगार, वहातुकदारांचा संप, आवक वाढली ही कारणे दर खाली येण्यासाठी दिली जातात.
आज अगदी लोकल मार्केटला सुद्धा कुठल्याही प्रकारचे फळ १०/- रुपयाला मिळू शकत नाही. मग फळांचा राजा आंबा त्याची ही अवस्था का? आज येथून वाशी मार्केटला १ पेटी विक्रीस पाठवली म्हणजे आंबा काढून मार्केटला विक्री होईपर्यंत किमान २००/- रुपये खर्च अपेक्षीत आहे. मग आपल्या सहा डझनच्या पेटीला ९०० ते १००० रुपये हमीभाव मिळेल का आणि का मिळू नये? आज आपण सफरचंद ८० ते १०० रुपये किलो भावाने घेतो, १ किलोला ५ ते ६ फळे येतात म्हणजे प्रती फळाला किमान १५/- रुपये आपण मोजतो, मग आज २५० ग्रॅमच्या आंब्याला १०/- रुपये हमीभाव म्हणजेच ४०/- रुपये प्रती किलो का मिळू नये? हमीभावाने आंबा खरेदी केल्यास त्याचा दर्जा नक्कीच सुधारेल आणि शेतकरी वर्गाचे दरडोई उत्पन्न वाढेल. आंबा हंगाम वर्ष सन २०१० मध्ये २० एप्रिल ते २० मे अशा एक महिन्याच्या कालावधीत मी एका गोव्याच्या व्यापा-याबोरबर हमी भावाने सौदा करून गोवा माणकूर शेकडा दर १५००/- रुपये, हापूस आंबा शेकडा दर १०००/-रुपये, साधे माणकूर प्रती शेकडा दर ५००/-रुपये या भावाने व्यापार केला. मला पैसे मिळालेच शिवाय समोरच्या व्यापा-याला मालाचा दर्जा चांगला असल्यामुळे चांगला उतारा येवून चांगले पैसे मिळाले. मग हीच पद्धत सगळीकडे का रूजू होत नाही. कारण अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकरी घाई न करता तोड वेळीच करून चांगला आंबा विक्रीस पाठविल. आणि त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही सुखी होतील.
- ललितकुमार (उर्फ कुमा) बा. ठाकूर, मठ, ता. वेंगुर्ला, मोबा. ९४२३३०१२२३

विशेष बातम्या *

पुष्कराज कोलेंतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण
गुरुजनांचा मानसन्मान कायम ठेवा,गुरुंनी दिलेली दिक्षा (शिक्षण) प्रामाणिकपणे आत्मसात करा. कुडाळ येथील अभय पाटीलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपले नाव रोशन करावे, असे प्रतिपादन उद्योजक तथा जिदाल ग्रुप कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी पुष्कराज कोले यांनी वेंगुर्ल्यात केले.
शाळा नं.२ मधील सर्व विद्यार्थ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक पुष्कराज कोले यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक कैवल्य पवार, पत्रकार भरत सातोस्कर, मॅक्सी कार्डोज, पालक सदस्य अच्युत खानोलकर उपस्थित होते.

अखिल भारतीय भष्टाचार विरोधी मंच वेंगुर्ले शाखेचे उद्घाटन
संपूर्ण देशामधील प्रचंड भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्याना जीवन जगणे असह्य झाले आहे. भ्रष्टाचाराविषयी समाजातील काही व्यक्ती स्वतंत्रपणे लढा देत आहेत, परंतु त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरूद्धच्या जनआंदोलनात सर्वांनी विशेषतः महिलांनी व तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन अखील भारतीय भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या महाराष्ट्र राज्य सचिव सौ. रश्मीताई लुडबे यांनी मंचाच्या वेंगुर्ले शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन प्रभावीपणे उभारण्यासाठी केंद्रशासनाच्या मान्यतेने अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी मंचाची स्थापना झाली आहे. या मंचाच्या कोकणातील प्रत्येक तालुक्यात शाखा कोकण विभाग प्रमुख श्री. प्रकाश जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात येत आहेत. यापैकी वेंगुर्ला तालुक्यात जिल्हा उपाध्यक्ष अमीन हकीम यांच्या पुढाकाराने दाभोली नाका येथे मंचाची शाखा स्थापना करण्यात आली आहे. शाखेचे उद्घाटन सौ. रश्मीताई लुडबे यांचे हस्ते झाले. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारीचे शुभभाई, कुडाळ तालुका अध्यक्ष सदासेन सावंत, कुमार कामत, प्रकाश जैतापकर, अतुल हुले यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रताप गावस्कर, लाडू जाधव, एम. पी. मठकर, सौ. बेस्ता, सौ. पाटणकर सौ. व श्री. पाटील सर, आळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश तोडकर यांनी सूत्र संचालन केले व श्री. अमीन हकिम यांनी आभार मानले.
जिल्हा सल्लागारपदी अतुल हुले
भ्रष्टाचाराविरोधी प्रभावी पणे लढा देणार्‍यांची जिल्हा व तालुका कार्यकारणीत समावेश करण्यात येणार आहे. वेंगुर्ले येतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतुल हुले यांची जिल्हा कार्यकारीणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी सावंतवाडी येथील डॉ. विजय गणेश तोरसकर यांची निवड झाली आहे ते राष्ट्रीय मानव अधिकार मिशनचे सावंतवाडी तालुका समितीवर आहेत.

आडेलीत सिडिकेट बँक
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली या ग्रामीण भागात अण्णा अवसरे यांच्या नव्या इमारतीत सिडिकेट बँकेतर्फे नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. शाखेचे उद्घाटन वेंगुर्ले तहसीलदार नितीन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आडेलीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच भारत धर्णे, बँक उपप्रबंधक सविता कामत, सामाजिक कार्यकर्ते बबनराव शेणई, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन मांजरेकर, संतोष पेडणेकर, भाऊ गडेकर, अण्णा अवसरे, चंद्रकांत गडेकर,वेतोरे सरपंच विजय नाईक उपस्थित होते.

संदेश निकम मित्रमंडळाच्या नेत्रशिबिरात १०० जणांची तपासणी
नगराध्यक्ष संदेश निकम मित्रमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला मोफत नेत्रशिबिरात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील १३ रुग्णांना मिरज येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. असे उपक्रम मंडळाने ठिकठिकाणी घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती विजय परब यांनी उद्घाटन करतांना केले. यावेळी रुग्णांना मोफत गॉगल देण्यात आले. विवेकानंद नेत्रालय, कणकवली, लायन्स क्लब सेंटर मीरज हेल्पस इंडिया यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले होते. नगराध्यक्ष संदेश निकम, काँग्रेसचे जिल्हा सदस्य वसंत तांडेल, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर आंगचेकर, नगरसेविका सौ. सुमन निकम, सौ. गीता अंधारी आदी यावेळी उपस्थित होते.

सहवेदना *
कृष्णा कोठारी
मेनरोड भटवाडी येथील रहिवाशी रामकृष्ण (कृष्णा) लवू कोठारी (३५) या युवकाचे अल्प आजाराने ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्याचे पश्चात आई-वडील व भाऊ वगैरे परिवार आहे.


Saturday, 5 February 2011



वर पाहिजे
३१) वधु - भंडारी, मध्यम बांधा, उंची ५.२, १२वी कॉमर्स, आर्टीस्ट, भरतनाट्यम, नोकरी. मासिक प्राप्ती ५० हजार. वास्तव्य - मुंबई
अपेक्षा - स्वजातीय, नोकरी किवा आर्टिस्ट, ब्राह्मण, वैश्य, मराठा, मुंबई - पुणे येथील चालेल.

३२) वधु - कुडाळदेशकर, २६ पूर्ण, उंची ५.६, गोरी, सडपातळ, एम.बी.ए.मुंबई विद्यापीठ, आर्थिक स्थिती उत्तम. वेंगुर्ले
अपेक्षा - स्वजातीय किवा ब्राह्मण. उच्चपदस्थ नोकरी किवा बिझनेस.

Friday, 4 February 2011

अंक-५वा, ३ फेब्रुवारी २०११,

अंक-५वा, ३ फेब्रुवारी २०११,
संपैंदकीय *
सोनवणेंच्या हत्येमुळे ‘माफिया राज‘संपेल काय?
नाशिक जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची भर दिवसा रॉकेल ओतून जाळून हत्या करण्यात आली. इंथन तेलाची चोरी करणारे, भेसळ करणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना ‘तेल माफियांच्या‘ रोषाला बळी पडावे लागले. घडलेला प्रकार अत्यंत निर्घृण, संतापजनक आणि चिताजनकही आहे. राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि राज्यातील सर्व सरकारी कर्मचा-यांनी २७ जानेवारीला एकजुटीने एक दिवस काम बंद आंदोलन करुन आपला निषेध व्यक्त केला. या प्रकाराने वृत्तवाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना दोन-चार दिवसांचे ‘खाद्य‘ मिळाले. राजकारणा-यांना वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत बोलण्याचे काम मिळाले. सत्ताधा-यांना यापुढे कडक धोरण स्विकारल्याचे सांगायला वाव मिळाला. काही दिवसांनी पेटवले गेलेल्या सोनवणे यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट ओसरेल. त्यांना पेटविणा-यांनाच ‘अभय‘ देणारे सत्ताधारी राजकारणी आणि काही प्रसारमाध्यमे यात सोनवणेच कसे दोषी होते हे सांगत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु लागतील आणि राजकारण्यांशी लगेबंधे असणा-या अनेक प्रकारच्या माफियांच्या कारवाया पुढे सुरुच राहतील. कर्तव्य बजावतांना सोनवणे यांची अशी हत्या होणे निदनीय होय. परंतू या हत्येचा निषेध करण्यासाठी संप पुकारुन निदर्शन करणा-या सरकारी कर्मचा-यांपैकी कितीजण आपापल्या खात्यांमधील भ्रष्टाचाराबद्दल असे दंड थोपटून उभे राहतील!
सरकारी नोकरीमध्ये असतांना दीर्घकाळ ‘चिरी मिरी‘ घेतल्याशिवाय लोकांची अड(वि)लेली कामे न करणा-या कर्मचा-यांनाशी सेवा निवृत्तीनंतर आपल्या अडलेल्या सरकारी कामांसाठी लाच घ्यावी लागते तिथे सर्वसामान्यांची काय व्यथा?
सर्वच सरकारी - निमसरकारी खाती आज भ्रष्टाचाराने ग्रासलेली आहेत. या भ्रष्टाचाराची साखळी मंत्रालयापर्यंत आहे हे ही उघड आहे. पण सरकारला वाकविण्याची क्षमता असलेली सरकारी कर्मचा-यांची संघटना या विरुद्ध कधी आवाज उठवितांना दिसत नाही. सरकारी कर्मचा-यांनी केवळ आपल्या वेतनवाढीसाठी थकबाकी मिळण्यासाठी लढा करण्याऐवजी एकदातरी वाढती महागाई, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई या विरुद्ध संघटीत लढा उभारण्याचे धाडस दाखविले तर जनता त्यांच्या पाठीशी राहील. राज्यकर्त्यांना त्यांच्यापुढे नमावेच लागेल.
असे कधी घडेल तेव्हाच सोनवणे यांच्यासारख्या अधिका-यांचे बलिदान चर्चेपुरते मर्यादित राहणार नाही. महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसताहेत तसेच नोकरीतून निवृत्त झाल्यावर कर्मचा-यांनाही बसणार आहेत.
बेकायदेशीर धंदे करणा-यांचेही एक तत्व (!) असते. सर्वसामान्य लोकांना त्यांचा प्रत्यक्ष त्रास नसतो. त्यांचे धंदे कायदेशीर मार्गाने थांबवू शकणा-यांना ते रीतसर त्यांचा हप्ता पोचवीत असतात. तरीही त्यांच्याकडून अडवणुक झाली तर त्यांना ते ठोकून काढण्यास कमी करीत नाहीत. अनेक सरकारी किवा पोलीस खात्यातले कर्मचारी, अधिकारी यांच्यावर होणारे हल्ले हे त्याचेच द्योतक आहेत. अर्थात सोनवणे यांच्याबाबतीत तसेच घडले असेल असे नाही. कर्तव्यतत्परताही त्यांच्या जीवावर बेतलेली असेल.
तेल ही निर्जीव यंत्रासाठी वापरावयाची वस्तू. त्यातील भेसळीमुळे फारतर ते यंत्र बंद पडेल. पण अन्नपदार्थात दूध, खाद्यतेल व अन्य वस्तूंमध्ये भेसळ करुन लोकांच्या जीवावरच उठलेले भेसळ माफिया आणि त्यांना अभय देणारे संबंधीत सरकारी अधिकारी, राजकारणी, सत्ताधारी मंत्री यांना काय म्हणावे? शालेय मुलांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणा-या पदार्थात भेसळ, दुधात थेट रासायनिक भेसळ करुन आपल्या तुंबड्या भरणा-यांना तर देहांताचीच शिक्षा व्हायला हवी. इतके हे गुन्हे गंभीर आहेत. पण संवेदनाहीन बनलेल्या सरकारी यंत्रणेला आणि सत्ताधा-यांना त्याचे काही वाटते असे त्यांच्या कृतीमधून दिसत नाही.
कोणताही गुन्हा मोठ्या प्रमाणावर करणा-यांना ‘माफिया‘ हा शब्द प्रसारमाध्यमांनी रुढ करुन त्याला एक प्रकारची प्रतिष्ठा दिली आहे. माफिया हा शब्द इटलीहून आला. अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्यांची संस्थानिकांप्रमाणे असावीत तशी घराणीच इटली व अन्य युरोपीय देशांमध्ये निर्माण झाली होती. अजूनही असतील. भ्रष्ट नोकरशहा व पोलीसांना वश करुन त्यांचे काळे धंदे बिनबोभाट चालू असतात. त्या घटनांमधील संघर्षावर कादंब-या लिहिल्या गेल्या, चित्रपटही निघाले आणि प्रचंड गाजलेही. (उदा. गॉडफादर) त्यामुळे या गुन्हेगारांना तेथील प्रसारमाध्यमांनी माफिया संबोधून एक प्रकारे त्यांचे उदात्तीकरणच केले. येथे आपल्याकडची प्रसारमाध्येमेही तेच करीत आहेत. ‘दाऊदचा माणूस‘ या शब्दात पोलीस खात्यामध्ये आणि गुन्हेगारीशी संबंधीत राजकारण्यांमध्ये जे वजन(!) आहे तसे यापुढे विविध क्षेत्रातील मोठ्या गुन्हेगारांनाही ‘माफिया‘ शब्दामुळे वजन प्राप्त होणार आहे.
यशवंत सोनवणेंच्या हत्येमुळे जागृत झाल्यासारखी दाखविणारी सरकारी यंत्रणा आणि सत्ताधारी हे माफिया राज संपवितात की त्याला प्रतिष्ठा मिळवून देतात हे कालांतराने समजेलच.

अधोरेखीत *
उद्या मारणार ते आज मारा
बाहेरचे लोक आमच्यावर आरोप करतात, दर चढा मिळावा, बोली वाढावी म्हणून आम्ही सरकारला ब्लॅकमेलिग करण्यासाठी प्रकल्प विरोध करतो आहोत. एकूण ९६८ हेक्टर जमिन संपादित करायची आहे. त्यासाठी सुमारे २७०० जणांना भरपाईचे चेक वाटण्यात आले. त्यातले फक्त १०० चेक स्वीकारण्यात आले. हे १०० जण पुणे, मुंबई, औरंगाबाद व बाहेर स्थायिक झालेले दूरस्थ आहेत. त्यातले काही गडगंज श्रीमंत आहेत. आज्या, पणज्यांचे, सास-यांचे नाव सातबारावर होते, त्यांचे वारसदार म्हणून पैसे मिळाले. आज गावाशी कसलाही संबंध नसताना फुकट पैसा मिळतोय म्हणून त्यांनी उलटसुलट अटी घालत, सरकारशी करार करत ते घेतले. १ पैसा / १ चौ. फूट दराने प्रत्येकाला रु. २५०० वाटण्यात आले. आज सरकारने मोठे पॅकेज आणल्यावर ते हळहळतायत.
पण इथले स्थानिक, ज्यात बव्हंशी हातावर पोट घेवून जगणारे गरीब आहेत, ज्यांना पैशाची खरी गरज आहे, त्यातल्या एकाही माणसाने सरकारी पैसा, चेक स्वीकारलेला नाही. सध्या नव्याने देवू केलेला दर १० लाख रुपये एकरी हा एकूण प्रकल्प खर्चाच्या ०.०१२ टक्के आहे. एकूण प्रकल्प खर्च १,८०,००० कोटी रुपयांचा आहे. जगभरचे पुनर्वसनासाठी मिळणारे २० टक्केचे गणित धरले तर १५ कोटी रुपये एकरी द्यावे लागतील. सरकार एखाद्या मारवाडी व्यापा-याप्रमाणे दराची घासाघीस करते आहे. त्यावर विश्वास ठेवायचा कशाला आणि का? सरकारने कितीही मोठे पॅकेज आणले, पैसा दिला तरी आम्हाला तो नकोच आहे.
सरकारी पुनर्वसनावर कोणाचाही विश्वास नाही. तुमचे पुनर्वसन दुस-या एखाद्या यंत्रणेकडून खात्रीशीर करुन देवू म्हणणा-यांनी त्या खात्रीशीरपणे कोयना प्रकल्पापासून, पाटबंधारे व इतर तमाम प्रकल्पांतील विस्थापितांचे आधी पुनर्वसन करावे, मग आमच्याकडे यावे. इतर विस्थापितांना तसेच वा-यावर सोडून आम्हाला खास वागणूक द्या, आम्ही म्हणत नाही. आम्ही कोणाकडे कसलाच प्रकल्प मागितलेला नाही. ते सर्व तुम्ही आमच्यावर लादत आहात.
हे समोर पसरलेले माळ पाहा, आज त्यावरचे ९० टक्के शेतीचे क्षेत्र पडीक आहे. सरकार म्हणते तसे नापीक नव्हे. पूर्वी इथे पावसाळ्यात नाचणी, तीळ भरपूर होत असे. त्यावर आमची वर्षभराची अन्नाची गरज सहज भागे. आज शेती होत नाही, कारण शेतीपेक्षा आंबा, काजूच्या बागायती करुन त्यावर जास्त पैसा मिळतोय. गरजेचे अन्न या पैशातून सहज बाहेरुन विकत आणता येतेय. कमी मेहनतीत भागतेय, म्हणून तर शेतीची खटपट कोणी करत नाहीय. पण आपल्या जमिनीत तेवढीही मेहनत करायची तयारी जे दाखवत नाहीत ते गरीब आहेत. आमचे लोक २०० रु. मजुरी दर दिवशी देवूनही मजुरीला येत नाहीत. कर्नाटकातून मजूर आणावे लागतात.
थोडक्यात समाधान मानणा-या आमच्या लोकांना आळशी म्हणा, मिजासी म्हणा वा आध्यात्मिक योगी म्हणा, आम्ही आहोत तसे सुखी आहोत. आज स्वावलंबी आहोत. मालक आहोत. आमचा विकास केला नाही तरी चालेल. विकास आला तरी आम्हीच नाही राहिलो तर कोणासाठी?
या जमिनीने आमच्या तमाम मागच्या पिढ्या जगवल्यात. तमाम पुढच्या पिढ्या जगणार आहेत. त्या सर्वांच्या पालनपोषणाचे काय? याचे गणित सरकार वा कोणी बनवू शकेल? त्याची पैशात भरपाई करु शकेल? ज्यांची प्रकल्पाखाली जमिन जाईल ते तर देशोधडीला लागतीलच, पण इलाख्यातील इतर सर्वांची तीच गत होणार. या प्रकल्पाच्या प्रचंड उष्णतेने आमचे आजचे उपजिविकेचे साधन आंबा, काजू, नारळ बागायती नष्ट होतील. थोडेसे उत्पादन मिळू शकले तरी किरणोत्सर्गाच्या भीतीने बाहेरचे कोणी घेणार नाहीत. पिण्याचे पाणी दूषित होईल. उपासमारीने आणि कॅन्सरग्रस्त होऊन आम्ही कणाकणाने मरु. असे काही होत नाही म्हणणा-यांनी आण्विक क्षेत्रात कायम वास्तव्य करुन दाखवावे. मग बोलावे. जेमतेम ३०० तंत्रज्ञ इथे काम करतील. त्यांची वस्ती प्रकल्पापासून १० कि.मी. दूर राहील. ती का? आम्ही इथेच असणार, ते का?
आता अजून कसल्या चर्चा करता आणि सुनावण्या लावता? त्या नाटकांची काय गरज? जेवढ्या म्हणून समित्या आल्या, सरकारी म्हणा, शास्त्रज्ञांच्या म्हणा, राजकीय पक्षांच्या म्हणा त्या सर्वांनी आम्ही जे बोललो, सांगितले ते बाहेर मांडलेच नाही. आमचे सांगणे घुमवून फिरवून आपल्या सोयीने मांडले. प्रकल्प होणारच हे आधीच ठरवून ते येतात. खाजगीत आम्हाला सांगतात तुमचे पटतेय पण आमच्यावर वरुन दबाव आहे, आम्ही काही करु शकत नाही. कधी वाटते उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष्या सगळे पाळीपाळीने येऊन आमच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रू ढाळून जातील की, तुमचे आम्हाला पटते पण नाईलाज आहे. बाहेरचा दबाव आहे. अरे पण बाहेरचा दबाव कोणाचा आणि का तो सांगा ना? मग तुम्हा आम्हाला मिळून त्याचा सामना करता येईल.
सरकारचे साम आणि दाम उपाय चालले नाहीत. आम्ही सर्वजण ठाम एकी करुन आहोत. दुफळी, भेद माजवण्याचे प्रयत्न चालले नाहीत. मग आता दंडनीती वापरा ना? आम्ही शेतकरी - मच्छिमार माणसे तुमच्या पोलिसांच्या दंडुक्यांचा, बंदुकांचा कसला सामना करु शकणार आहोत? तुम्ही प्रकल्पाचे सामान, अवजड वाहने आणायला सुरुवात केलीत की आम्ही अडवणार आहोत. तुम्ही आमच्यावर ट्रक, बुलडोझर, रणगाडे घालणार आहात. आम्हाला चिरडून प्रकल्प उभारणारच आहात. प्रकल्प उभारल्यावर उद्या कणाकणाने मरणार ते आजच गोळ्या घालून मारा. आम्ही तयार आहोत या लोकांसाठी असलेल्या, लोकांनी बनवलेल्या, लोकांच्या लोकशाही सरकारकडून गोळ्या झेलायला.
-डॉ. मिलिद देसाई
शब्दांकन - समीर बागायतकर

आरोग्य आणि सण
माघ मास

वसंतपंचमी- नवीन अन्नाची पूजा करीत माघ महिन्याची सुरुवात होते. रति कामदेवाचे पूजन करुन गीतगायन, नृत्य, वादन करीत करमणुकीचे कार्यक्रम करीत सामुहिक आनंदोत्सव साजरा करतात.
कामदेवाचे पूजन म्हणजे काम या रिपुवर विजय मिळवण्यासाठी केलेली आळवणी आहे. आपण जन्म घेतला त्याचा काय उद्देश आहे हे आज तरुणांना माहित नाही. आयुर्वेद व अध्यात्मात याचे उत्तर सांगितले आहे. पुरुषार्थ प्राप्ती धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यात काम हा पुरुषार्थ म्हणून वर्णन केला आहे. काम म्हणजे सेक्स नव्हे, स्वैराचार नव्हे, काम म्हणजे वंशसातत्य टिकवण्यासाठी सुनियंत्रित पद्धतीने केलेले सुप्रजाजनन.
सूर्योपासना- याच महिन्यात रथसप्तमी येते. यावेळी अंगणातील तुळशीकडेएका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतु जाईपर्यंत शिजवतात.
रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्यं भास्करात् इच्छेत। असं वचन आहे. म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून असते. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावं म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले तर शरीरबळ व मनोबळ वाढते. जर हे समंत्र घातले गेले तर आत्मबळ सुद्धा वाढते. सूर्योदयापूर्वी दीड तास लवकर उठावे, शुचिर्भूत होऊन बरोबर सूर्योदयाच्या वेळी अर्ध्य देण्यास तयार असावे.
आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये पूजाविधीला स्थान दिले पाहिजे. सकाळी आंघोळ झाल्यावर किमान दहा मिनिटे देवपूजा करण्यासाठी राखीव ठेवलेली असतात. ही दहा मिनीटे पूर्ण दिवसाचा उत्साह वाढवितात असे लक्षात येते. आजमितीपर्यंत भारतात तरी ‘देवाचे केले नाही तर‘ पाप लागते हा संस्कार सर्व हिदुंच्या घरात केला जातोय. आणि ‘देवाचे केले‘ म्हणजे पुण्य मिळते हा समज आहे. पण दुर्दैवाने नेमके ‘देवाचे कसे करावे‘ म्हणजे देव लवकर प्रसन्न होईल हे नीटसे समजून घेतले जात नाही. जगाला अध्यात्माची देणगी देणा-या भारतात अध्यात्माबद्दल अशी उदासिनता का बरे आहे? कर्मकांड व अध्यात्म यातील फरक वेळीच नवीन पिढीला समजून आला पाहिजे.
महाशिवरात्र- याच माघ महिन्यात आणखी एक शिवाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे महाशिवरात्र, दिवसा नव्हे तर मध्यरात्री शिवाची पूजा सांगितली आहे. बेलपत्राची आरास, दुधाचा किवा उसाच्या रसाचा त्या शंकराला अभिषेक. किती प्रसन्न वाटते नाही का? नैवेद्याला कवठाची बर्फी, कवठ हे फळ पित्त विकारात वापरले जाते.
पूजेच्या प्रकारात पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, महापूजा इ. ‘कॅटेगरी‘ स्थळ काळ व उपलब्ध साधनसामुग्री यानुसार करण्यात येते. यात कुठेही भक्तीला उणेपणा येत नाही. उलट सर्व पूजा प्रकारामध्ये ‘मानसपूजा‘ हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. मानसपूजा जमली तर इतर सर्व पूजाविधी गौण मानले जातात. पण इथेच तर खरी गोम आहे. आमचे मनच जर जाग्यावर नसेल तर ईश्वराची स्थापना मनामध्ये करुन त्याची पूजा आम्ही कशी काय करणार? म्हणून साधनेचेही काही टप्पे केले आहेत. जसे आपल्याला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आधी सर्वात खालची पायरी चढावी लागते, तरच त्याच्यावरची पायरी चढता येते. तसे ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी प्रथम सगुण उपासना, प्रत्यक्ष पूजाविधी, कर्मकांड, किर्तन, प्रवचन, उपवास, तप इ. पाय-यांवरुन जावेच लागते. जर एकदम वरच्या पायरीवर पाय ठेवायचा प्रयत्न केला तर नाही चढता येणार आणि बळे बळे चढण्याचा प्रयत्न केलाच तर ख-या ईश्वराची भेट लवकर होईल असेही नाही, ज्या धर्मात मूर्तीपूजाच नाही अशा धर्मातील लोकांनाही ईश्वर भेटतो पण अशी माणसे अत्यंत कर्मठ बनतात. अन्य धर्मीय लोक त्यंना अतितुच्छ वाटतात, मूर्तीभंजक तयार होतात, काफीरांना ठार मारा सांगणारे हैवान घडतात. व्यवहारात साधे अंकगणित सोडवायचे झाल्यास उत्तर मिळेपर्यंत ‘क्ष‘ गृहीत धरावाच लागतो. तसे ईश्वराचे अस्तित्व समजेपर्यंत आपल्याला ईश्वर ‘क्ष‘ गृहीत धरावाच लागेल. आणि हिदू लोक हा ‘क्ष‘ गृहीत धरीत आले आहेत म्हणून हिदू धर्म सहिष्णु बनला आहे. आणि म्हणूनच शास्त्रोक्त पूजाविधी करणे सामान्य साधनेच्या माणसांना आवश्यक आहे. या ‘क्ष‘लाच काही बुद्धीवादी निसर्ग, काहीजण सुपर पॉवर, काहीजण अदृश्य शक्ती, काहीजण चैतन्याचा स्रोत वगैरे नावे देतात.

विशेष बैंतम्या
अक्षरगंधच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत किरात दिवाळी अंकाचा सन्मान
कल्याण येथील अक्षरगंध संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांच्या स्पर्धेत वेंगुर्ले येथील साप्ताहिक किरातच्या २०१० च्या अंकाची सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून आलेल्या ७२० अंकांपैकी १५ सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक यावर्षी निवडण्यात आले.
यंदाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रशैलीचा आविष्कार साकारणा-या नवोदित चित्रकर्ती चेतना दीपनाईक यांनी किरात परिवाराच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला.
कोकणातील नवोदित लेखक, कवींना व्यासपीठ मिळवून देणा-या आणि कोकण विकासाचे प्रश्न दिवाळी अंकातून मांडणा-या किरात दिवाळी अंकाचे यंदाचे ३१वे वर्ष आहे. यंदाच्या दिवाळी अंकात कथा, कविता, मुलाखतीबरोबरच, रस्ते विकासाचा महामार्ग या विषयावर परिसंवादात्मक लेखमालेचे आयोजन केले होते.


दै. सिधुदुर्ग समाचार आयोजित विविधरंगी साड्यांच्या वेशभूषा स्पर्धेचे बक्षिस वितरण
दै. सिधुदुर्ग समाचाराने नवरात्रौत्सवात नवदुर्गेची विविध नऊ रुपातील विविधरंगी साड्यांच्या वेशभूषा जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना वेंगुर्ले - कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील वाचकांच्या मेळाव्यात जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापक सौ. निलम राणे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या पुढीलप्रमाणे -
सौ. साक्षी स्वप्निल गडेकर (आडेली-वेंगुर्ले सावित्रीबाई स्वयंसहाय्यता बचत गट आडेली संचालिका), सौ. माधवी मधुसूदन गावडे (वेतोरे-वेंगुर्ले सुर्यकांता महिला फळप्रक्रिया औद्यो. संस्था चेअरमन), श्रद्धा रविद्र साळगांवकर (नमसवाडी-उभादांडा, कुडाळ महाविद्यालय), शिल्पा संजय पाटील (वेंगुर्ले सातेरी बचत गट), अर्चना महादेव जाधव (आनंदवाडी-वेंगुर्ले, द्वितीय वर्ष कला, खर्डेकर कॉलेज),दर्शना दिनानाथ गावडे (मालवण-चौके, रुचिरा बचत गट), सौ.रंजना रामचंद्र कदम (देवगड-इळये, आकारी ब्राह्मण बचत गट अध्यक्ष), सायली सतिश काळसेकर (परबवाडा-वेंगुर्ले, बॅ. खर्डेकर कॉलेज १२वी), छाया प्रभाकर भाईप (नेमळे-सावंतवाडी, महालक्ष्मी बचत गट अध्यक्ष).
यावेळी सौ.प्रज्ञा परब, एम.के.गावडे, सौ. अस्मिता बांदेकर, डॉ.सौ.पूजा कर्पे, दै.सिधुदुर्ग समाचार कुडाळ कार्यालय प्रमुख श्रीमती निशा रांगणेकर, वेंगुर्ले कार्यालय प्रमुख सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, माजी सभापती सौ. सारिका काळसेकर, सौ. वंदना किनळेकर, वजराट सरपंच सौ. विशाखा वेंगुर्लेकर, आडेली माजी सरपंच सौ.शुभांगी गडेकर, सौ.शुभांगी भोसले, अणसूर सरपंच सौ. देऊलकर, छाया परमेकर, संगीता माळकर आदी उपस्थित होते. सौ. सृष्टी कौलगेकर यांनी स्वागत तर प्रास्ताविक एम.के.गावडे यांनी केले.

ब्राह्मण मंडळाचे स्नेहसंमेलन दिमाखात संपन्न

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिधुदुर्गचे २२वे वार्षिक स्नेहसंमेलन ३० जानेवारीला गोगटे मंगल कार्यालय, वेतोरे येथील स्व. अण्णा गोगटे सभामंडपात मंडळाचे अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख वक्ते सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर खाडीलकर होते.
प्रारंभी सकाळी बटूंनी वेदपठण केले. सौ. अनघा गोगटे यांनी स्वागतगीत म्हटले. वेंगुर्ले तालुका अध्यक्ष प्रकाश नवाथे यांनी प्रास्ताविक केले. श्रीधर मराठे यांनी स्वागतपर भाषणांत संमेलनाची रुपरेषा सांगितली. यावेळी वेदमूर्ती राजाभाऊ फाटक-वेंगुर्ले, उद्यानपंडित संतोष गाडगीळ, शेतीनिष्ट पुरस्कार मिळालेले शिवराम गोगटे, एल.एल.एम उत्तीर्ण झालेले अॅड. श्रीकृष्ण ओगले, संमेलन संयोजक श्रीधर गोगटे, तसेच १०वी, १२वी, पदवी परीक्षेत ७० टक्के गुण मिळविणा-या वेंगुर्ले तालुक्यातील मुलांचा गौरव करण्यात आला.
या संमेलनात ‘ब्राह्मण मंडळाचा आणि ज्ञातीचा उत्कर्ष‘ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे संचालन दहिबाव-देवगडचे पु.ज.ओगले यांनी केले. यावेळी सभागृहातील अनेकांनी आपले विचार मांडले. दुसरे चर्चासत्र होते ज्ञातीतील ‘विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह होण्याबाबतचे‘ त्याचे संचालन सावंतवाडीच्या सौ. मृणालिनी कशाळीकर आणि कुडाळ ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी केले. या ज्वलंत विषयावर ब-याच पालकांनी आणि युवक - युवतींनीही आपली मते मांडली आणि मंडळाने खास वधु-वर मेळावे घेण्याची सूचना केली.
पंचद्रवीड पतसंस्थेविषयी संस्थेचे अध्यक्ष महेश्वर रायकर यांनी माहिती देतांना संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व राज्यात या पतसंस्थेचे काम शासनाचे सर्व निकष पूर्ण करणारे ठरले असल्याचे सांगितले. कुडाळ ब्राह्मण सभेच्या सातत्यपूर्ण कार्याची माहिती गुरुनाथ दामले यांनी दिली. शिरोडा (गोवा) येथील गोमंतक आयुर्वेद मेडिकल कॉलेजची माहिती तेथील संस्था पदाधिका-यांनी देऊन ब्राह्मण ज्ञातीतील मुलांनी आयुर्वेद शिकून व्यवसाय, परंपरा जपण्याचे आवाहन केले. पू. रामदेव बाबांच्या पतंजली योगविद्येचे प्रचारक डॉ.रसिका करंबळेकर व विद्याधर करंबळेकर यांनी योगविद्येबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते प्रभाकर खाडीलकर यांनी संमेलनातील चर्चासत्रांचा आढावा घेऊन अतिशय उद्बोधक विचार मांडले. अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांनी या संमेलनाच्या यशस्वीबद्दल संयोजकांचे अभिनंदन करुन आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशांक मराठे यांनी केले.
ब्राह्मण मंडळ सिधुदुर्गची, वार्षिक सर्वसाधारण सभा ३ वाजता होऊन सचिव सुभाष जोग यांनी सादर केलेला अहवाल, जमाखर्च मंजूर करण्यात आला. याच सभेत पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. संमेलनास जिल्हाभरातून सुमारे चारशेहून अधिक ब्राह्मण बंधु-भगिनींची उपस्थिती होती.
अलिकडेच दिवंगत झालेले विख्यात गायक भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम संमेलनानंतर शेखर पणशीकर, सौ.अनघा गोगटे यांनी सादर केला.

स्वरसम्राट पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली
वेंगुर्ले येथील कु. मायादत्त आंबर्डेकर यांच्या निवासस्थानी पं. भीमसेन जोशी यांच्या दुःखद निधनाबद्दल ‘स्वरसाधना‘ संस्थेतर्फे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमच्या पिढीने हे स्वर्गीय संगीत अनेक मैफीलीत अगदी मनसोक्तपणे ऐकले हा ईश्वरी प्रसादच म्हणावा लागले असे उद्गार गायक श्री. दिलीप दाभोलकर यांनी काढले. श्री. शेखर पणशीकर यांनी आपण ऐकलेल्या अनेक मैफीलीबद्दलचे आपले अनुभव कथन केले. कु. माया आंबर्डेकर यांनी आपले वडिल कै. भाऊसाहेब आंबर्डेकर यांच्या पंडितजी बरोबरच्या स्नेहसंबंधाची माहिती देऊन, बंधू बाळ आंबर्डेकर यांनी पंडितजीकडून घेतलेल्या संगीत साधनेची माहिती दिली. अतुल हुले यांनी पं. जोशी यांच्या वैयक्तिक मैत्रीचा उल्लेख करुन त्यांच्या मनमिळावू स्वभावाचे अनेक प्रसंग सांगितले. सौ. अनघा गोगटे यांनी त्यांच्या संगीतातील अनेक सौंदर्यस्थळांचे वर्णन करुन संगीत क्षेत्रातील त्यांचा मोठेपणा विशद करुन सांगितला. ‘स्वरसाधना‘चे अध्यक्ष शशिकांत कर्पे यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल माहिती देऊन त्यांनी संगीत रसिकांना व अभ्यासकांना फार मोठा मोलाचा ठेवा दिल्याचे सांगितले. पंडितजींचे अनेक भावमधुर अभंग ‘स्वरसाधाना‘च्या कलावंतांनी सादर केले. या कार्यक्रमाला अनेक संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.