Tuesday, 1 February 2011

अंक-४था, २७ जानेवारी २०११

अधोरेखीत *
माहिती अधिकाराला अधिका-यांचाच दट्ट्या
भारतीय घटनेला अभिप्रेत असलेला माहितीचा अधिकार कायदा हा १२ ऑक्टोबर २००५ पासून अस्तित्वात आला. धनदांडगे आणि बेजबाबदार सरकारी अधिका-यांची मनमानी, भ्रष्टाचार या माहिती अधिकाराच्या अस्त्राने उघडकीला येईल आणि ख-या अर्थाने प्रजासत्ताक राज्य होईल अशी सर्वांना आशा होती.
‘जनतेला प्राप्त झालेले अत्यंत प्रभावी अस्त्र‘ अशा शब्दात अण्णा हजारे यांनी या माहितीचा अधिकार कायद्याचा गौरव केला आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची चळवळ लोकव्यापी करण्यात आणि हा कायदा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचविण्यात आदरणीय अण्णांचा सिहाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याच्या प्रेरणेतून अनेक कार्यकर्ते गावोगावी तयार झाले. परंतू माहिती अधिकार कायद्याचा लोकहितासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी वापर करणे तितकेसे सोपे नाही. कारण, संबंधित खात्याचे माहिती देणारे अधिकारी, अपिलीय अधिकारी हे सरकारी व त्याच खात्यातील वरिष्ठ अधिकारी असतात. ते शक्यतो आपल्या खात्याच्या कर्मचारी, अधिका-यांचा बचाव करण्याचीच भूमिका घेत असतात. म्हणून ते कायद्यातील पळवाटा शोधून माहिती देण्यास विलंब लावणे, पुरेशी माहिती न देणे, असे प्रकार करुन कालहरण करीत असतात असे सर्रास अनुभवाला येते.
कोकणातील एक उदाहरण द्यायचे तर पोलीस खात्यातील भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करणारे एक कार्यकर्ते अरुण गणपत भोवर यांनाही भ्रष्ट अधिका-यांना पाठीशी घालणा-या वरिष्ठ सरकारी अधिका-यांचा अत्यंत वाईट अनुभव आला आहे.
२००७ साली अरुण भोवर यांनी माहितीच्या अधिकाराखाली सादर केलेल्या अर्जाचा प्रवास पुढीलप्रमाणे -
-- दि.२०/७/२००७ रोजी वेंगुर्ले पोलिस स्टेशनला अशोक बाबा परब यांच्या तक्रारीची प्रत व पोलीस ठाण्याने घेतलेला निर्णय माहितीच्या अधिकाराखाली मागितला. त्यावर ३० दिवसांच्या आत उत्तर आले नाही.
-- दि. १०/९/२००७ रोजी अर्जदार भोवर यांनी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी येथे अपिल केले.
त्यांना मिळालेल्या उत्तराचा सारांश असा - सदर मागणी केलेल्या अर्जाचा भा.दं.वि. कलम ४४७,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून पोलिस तपास सुरु आहे. आपण मागितल्याप्रमाणे माहिती पुरविल्यास पुढील तपास करण्यास अडचण येईल म्हणून कलम ८ (ज) प्रमाणे आपण मागितलेली माहिती नाकारण्यात येत आहे.
वास्तविक माहितीचा अधिकार कलम ८ (ज) हे कलम या केसला लागू होत नाही. कारण, अर्जदार भोवर यांनी अशोक बाबा परब यांच्या तक्रारीची प्रत आणि पोलीस ठाण्याने घेतलेला निर्णय याचीच माहिती मागितली होती. ती देण्याने पोलीसांना अपराध्याला अटक करण्यास अडचण होणार नव्हती.
ह्या माहिती अर्जाचा प्रवास इथेच संपत नाही. माहिती नाकारल्याने संबंधित अधिका-यावर कारवाई व्हावी म्हणून २७/११/२००७ला लोकायुक्त, कोकण भवन, नवी मुंबई येथे दुसरे अपिल केले. त्याचा निर्णय लागायला २८/१/२०१० म्हणजे तब्बल २ वर्षांपेक्षा जास्त काळ लागला.
दि. २८/१/२०१०ला तेव्हाचे माहिती आयुक्त यांनी अरुण भोवर यांना तुम्हाला माहिती मिळाली आहे असे सांगत अर्ज निकाली काढला. दरम्यानच्या कालावधीत कोर्ट केसेसचा निकाल अरुण भोवर आणि कुटुंबियांच्या बाजूने लागल्याच्या प्रती भोवर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या पण आयुक्तांनी तुम्ही खुशाल हायकोर्टात अपील करु शकता असे तोंडी सांगितले.
३० दिवस, ९० दिवस अशी अर्ज निकाली काढण्याची मुदत असतांना लोकायुक्तांना मात्र अपिलातील अर्ज निकाली काढण्यासाठी कोणतीच विहित मुदत नसल्याने हे अधिकारी कालहरण करीत असल्याचा आरोप भोवर यांनी केला आहे.
माहितीच्या अधिकाराचा वापर करुन सनदशीर मार्गाने लढणारे एकटे भोवरच नाहीत तर राज्यभरातला भ्रष्टाचार निपटण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांची अशीच कुचंबणा होत आहे.
सार्वभौम प्रजासत्ताक राज्यात केवळ कायद्यांची नाही तर त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या यंत्रणेची गरज आहे.
उच्चशिक्षित सरकारी अधिकारी (सन्माननीय अपवाद वगळता) कायद्यातील पळवाटा शोधत असतील तर लोकांनीच भरलेल्या करांमधून वेतन घेणा-या सरकारी अधिका-यांना त्यांची जागा आणि कर्तव्यपालनाची कठोर जाणीव करुन द्यायलाच हवी.
अरुण भोवर यांनी आता उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही दाखविली आहे पण या भ्रष्टाचारविरोधी राज्यव्यापी लढ्याला व्यापक लोकचळवळींची आणि तरुणांच्या सहभागाची गरज आहे.
अरुण भोवर यांच्या व्यापक भ्रष्टाचारविरोधी लढ्याला कोणत्याही प्रकारचा पाठिबा, सहभाग,

संपैंदकीय *
अणुवीज प्रकल्पाला विरोध विकासाच्या मुळावर
जैतापूर येथील अणुवीज प्रकल्प आता विकासाच्या मुद्यावरुन राजकीय हुद्यांवर आला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला कमी पडणारी वीज आवश्यकच आहे. त्यातील बराचसा वीज पुरवठा संकल्पित अणुवीज प्रकल्पातून होणार आहे. औष्णिक वीज प्रकल्प हे पर्यावरणाची मोठी हानी करणारे तसेच त्या त्या क्षेत्रातील जमिन धारकांच्या पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण करणारे आहेत म्हणून औष्णिक वीज प्रकल्पांना प्रखर विरोध झाला. त्याचे पडसाद काही प्रमाणावर मागाील लोकसभा, विधानसभा निवडणुकीमधेही पडल्याचे दिसून आले. शिवाय फलोद्यान आणि पर्यटन जिल्हे म्हणून जाहीर झालेल्या रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांना हे औष्णिक प्रकल्प हानीकारक असल्याचे तज्ज्ञांच्या समित्यांचे निष्कर्ष असल्यामुळे सरकारलाही स्थानिक जनतेच्या विरोधापुढे नमते घ्यावे लागलेले आहे. त्यामुळेच पूर्वी कोकण किनारपट्टी लगतच्या सर्वच प्रकल्पांचा जोरदार पुरस्कार करणा-या पालकमंत्री नारायण राणेंनीही या औष्णिक वीज प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे सोडून दिले आहे. पण त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या जैतापूर गावात होऊ घातलेल्या अणुवीज प्रकल्पाचा मात्र जोरदार पुरस्कार केला आहे.
अणुवीज प्रकल्प हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय. त्यामध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग नाही. या प्रकल्पासाठी जमिन संपादनाचे काम कागदोपत्री पूर्ण झालेले आहे. प्रत्यक्षात न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशनकडे त्या जमिनीचा ताबा मिळावयाचा आहे. अन्यत्रच्या वीज, खनिज प्रकल्पांप्रमाणे या प्रकल्पालाही स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. बाहेरुन आलेल्या विरोधकांनी स्थानिक जनतेचा विरोध संघटीत करुन या प्रकल्पातील संभाव्य धोके प्रसिद्धी माध्यमांद्वारे दाखवून दिले आहेत.
या प्रकल्पाची बाजू मांडणा-या समर्थकांनीही विरोधकांच्या दाव्यातील पोकळपणा आणि कल्पनाविलास दाखवून दिला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी लागणारी जैतापूर-माडबन परिसरातील बरीचशी जमिन ही नापीक आहे. प्रकल्पबाधित कुटुंबांची संख्या कमी आहे. या अणुबीज प्रकल्पामुळे पर्यावरण प्रदूषण होणारे नाही. समुद्रात सोडण्यात येणारे पाणी पुरेसे थंड करुनच सोडले जाणार आहे. त्याचा समुद्रातील माशांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. हे क्षेत्र भूकंप प्रवण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनधारकांना पुरेसा मोबदला देण्यात येत आहे. कुटुंबातील किमान एकाला नोकरीची हमी देण्यात आलेली आहे. परिसरात शाळा, हॉस्पिटल इ. सोयी उभारण्यात येणार आहेत. आता तर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथील जमिनधारकांना एकरी दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. ती कार्पोरेशनने तात्काळ मान्य केली. आहे. याखेरीज अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.
अशा सर्व आशादायक गोष्टींमुळे स्थानिक लोकांचा विरोध हळुहळू मावळेल आणि हा वीज प्रकल्प गती घेईल असे दिसून येऊ लागले आहे. केंद्र सरकारही या प्रकल्पाविषयी ठाम आहे. असे असतांना प्रथम शिवसेनेने आणि आता भाजपनेही या प्रकल्पाच्या विरोधी पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कोणताही तात्विक विरोध न राहता तो आता राजकीय विरोध बनलेला आहे.
एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण आता अधिकच गढूळ, कोत्या मनोवृत्तीचे बनलेले आहे. यातून निष्पन्न काय होणार? संपूर्ण महाराष्ट्राला वीज भारनियमनाला तोंड द्यावे लागणार. त्यामुळे वीज पुरवठ्यावर आधारीत उद्योग बंद तरी पडतील किवा आजारी पडतील. त्यामुळे बरोजगारी वाढेल, शेतीच्या पंपाना वीज पुरवठा बंद राहिल्याने शेतीचेही मोठे नुकसान होईल. विकासाच्या या दोन मुख्य धमन्या (रक्त वाहिन्या) कमजोर झाल्यावर महाराष्ट्राची स्थिती पक्षाघात झाल्यासारखी होईल.
तात्पर्य, अणूवीज प्रकल्पाला चाललेला हा विरोध राज्याच्या विकासाच्या मुळावरच घाव घालणारा ठरणार आहे.
मेधा पाटकर आदी समाजवादी परिवारातील मंडळी प्रथमपासूनच याच नव्हे तर सर्वच प्रकल्पांच्या विरोधात आहेत. मात्र त्यांनी वीज निर्मितीला पर्याय दिलेला नाही. सौर उर्जा, पवन उर्जा, समुद्री लाटांपासून वीज निर्मिती या प्रकारांना खुपच मर्यादा आहेत. त्यातून कोकणाची सुद्धा कमी असलेली वीजेची गरज भागणारी नाही. जलविद्युत प्रकल्पांच्याही अनेक मर्यादा आहेत.

नेचर क्युअर
वर्षातून एकदा शरीरशुद्धी हवीच- नाट्य अभिनेते प्रशांत दामले

रोजचं काम आणि मानसिक तणावांमुळे मन आणि शरीर थकून जातं. आजाराची लक्षणं जाणवू लागल्याशिवाय किवा आजारी पडल्याशिवाय आपल्याला शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शरीर आणि मनाला सव्र्हसिगची गरज आहे. हे मनोमन पटूनही आपण केवळ कंटाळा किवा दुर्लक्ष करीत असतो. या पार्श्वभूमीवर वर्षातून एकदा शरीरशुद्धीचा पर्याय अवलंबायला हवा.
आजच्या वेगवान जीवनशैलीत वाहनांना महत्व प्राप्त झालं आहे. बाईक असो की कार, दैनंदिन जीवनात त्यांचा वापर अटळ बनत चालला आहे. वाहन घेतलं म्हणजे त्याची निगा राखणं आलं. वेळच्या वेळी सव्र्हसिग, इंजिन ऑईल, टायरमधील हवा आणि इतर अनेक गोष्टी नियमितपणे तपासून घ्याव्या लागतात. गाडी जेवढी महाग, तेवढा तिचा निगा राखण्याचा (मेन्टेनन्स) खर्च आवर्जून करत असतो.
आपलं शरीर हे एक यंत्रच आहे. त्यालाही सव्र्हसिगची गरज असते हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो. आपल्याला शरीर फुकट मिळालेलं असल्याने आपल्याला त्याची किमत कळत नाही. रोजचं काम मानसिक तणाव आणि घरातले प्रश्न सोडविताना मन आणि शरीर थकून जातं, तरी ते आपण तसंच रेटत असतो. आजाराची लक्षणं जाणवू लागल्याशिवाय किवा आजारी पडल्याशिवाय आपल्याला शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शरीर आणि मनाला सव्र्हसिगची गरज आहे, हे मनोमन पटूनही आपण केवळ कंटाळा किवा तो खर्च टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करत असतो.
आयुर्वेदात जीवनशैलीबद्दल बरीत माहिती मिळते. काय खावं, काय खाऊ नये, याबरोबरच दिनक्रम कसा असावा, कोणत्या ऋतुत शरीराची कायम मागणी असते आणि वात, कफ, पित्त प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीचं आचरण कसं असावं याबद्दलही आयुर्वेदात मार्गदर्शन केलेलं आढळतं. त्यानुसार आचरण केलं,तर औषधाची गरज ‘औषधा‘लाही भासणार नाही. मात्र आपण तसं वागत नसल्यामुळे शरीराचं ठराविक कालावधीनंतर ‘सव्र्हसिग‘ करुन घेणं आवश्यक आहे. आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला बरंच महत्व आहे. यातील काही काही चिकित्सा तज्ज्ञ वैद्यांकडून करुन घेतल्यास शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होऊन आपण पुन्हा जोमाने कामाला लागू शकतो आणि हे उपचार निसर्गाच्या सान्निध्यात उपलब्ध झाल्यास सोने पे सुहागा!
निसर्ग आणि मानव यांचं नातं अतूट आहे. आकाशाला भिडू पहाणारे डोंगर, खोल द-या, डेरेदार वृक्ष , काठावरचा परिसर समृद्ध करत संथ वाहणा-या नद्या, वा-यावर डोलणारी शेतं या निसर्गाच्या अद्भुत संपदेचं किती आणि कसं वर्णन करावं ते कळत नाही. अलीकडच्या काळात सिमेंटची जंगलं वाढवत निसर्ग विद्रूप करण्याचं काम जोमाने केलं जातं. आज महानगरांचा विस्तार वेगाने होत असताना त्या गदारोळात मोकळा श्वास घेणंही अवघड झालं आहे. त्यामुळेच वर्षातन किमान काही दिवस या कोलाहलापासून दूर, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची ओढ वाढत आहे.
अलीकडच्या काळात अशी निवांत, निसर्गरम्य ठिकाणं कमीच राहिली आहेत. त्यामुळे त्यांचं संवर्धन व्हायला हवं. साता-या जवळ यवतेश्वर येथे असणारं प्रकृती हेल्थ रिसॉर्ट हे असंच एक निवांत आणि तन-मन प्रसन्न करणारं ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण होते. येथील वैद्य सुयोग दांडेकर यांनी बॉडी सव्र्हसिगचं एक खास पॅकेजच तयार केलं असून तीन दिवस निसर्गरम्य वातावरणात राहन शरीरशुद्धी करुन घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. यासाठी त्यांनी तीन दिवसाचं वेळापत्रक तयार केलं असून, शरीरशुद्धी करु इच्छिणा-यांना त्याचं पालन करावं लागतं. तिथे शरीरशुद्धीसाठी खास स्वतः बनवलेल्या आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर केला जातो. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी शरीरशुद्धी करुन घेणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांना परवडणा-या दरात हे शक्य असल्याने सर्वांनीच याचा लाभ घ्यायला हवा. या विशेष सुविधेमुळे माझ्या भटकंतीमध्ये आता ‘प्रकृती‘चं नाव कायमचं नोंदवलं गेलं आहे. प्रकृतीची आणखी दोन महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आयुर्वेदात नाडीपरीक्षेला विशेष महत्व आहे. तसेच नादपरीक्षेतूनही अचूक रोगनिदान करता येते. ही परीक्षा पंचमहाभूतसिद्धांतांवर आधारित असून त्यात पोटावर नादपरीक्षा केली जाते. याशिवाय जन्मतारखेवरुन प्रकृती ओळखून त्यानुसार औषधांची निवड यात डॉ. दांडेकरांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
नाटकाच्या निमित्ताने मी ठिकठिकाणी दौरे करत असतो. या दौ-यांच्या निमित्ताने गेल्या वर्षभरामध्ये मी दर महिन्याला सरासरी १५ हजार किमी तरी प्रवास करतो. अर्थातच याचा परिणाम तब्येतीवर होतो. त्यामुळे मोकळा वेळ मिळताच किवा खास वेळ काढून शरीरशुद्धीसाठी प्रकृतीचा रस्ता धरण्याचा शिरस्ताच पडला आहे.
माझे एक नातेवाईक मणक्याच्या विकाराने त्रस्त होते. त्यांना मुंबईहून साता-याला अॅम्बुलन्सने न्यावं लागलं होतं. पण ‘प्रकृती‘मध्ये राहिल्यानंतर ते स्वतःच्या पायाने चालू लागले. त्यांच्याकडून प्रकृतीविषयी माहिती मिळाली. पुढे माझ्या ‘ओळख ना पाळख‘ या नाटकाच्या प्रयोगाप्रसंगी वैद्य सुयोग दांडेकर मला भेटले. आयुर्वेदशास्त्रावरील त्यांची नितांत श्रद्धा, गाढा अभ्यास, स्वच्छ विचार मला आवडले. म्हणून मी त्यांच्या ‘प्रकृती हेल्थ रिसॉर्ट‘मध्ये जायचं ठरवलं. सुमद्रसपाटीपासन तीन हजार फूट उंचीवर पाच एकर जागेत पसरलेल्या या हेल्थ रिसॉर्टमध्ये पाऊल टाकल्यापासून स्वतःमध्ये खूप छान बदल जाणवले. नाही तरी ट्रिप म्हणजे तरी आपल्याला काय असतं? या निमित्ताने रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला बदल हवा असतो. मग आपण कधी बोटिगला जातो. कधी हॉर्स रायडिग करतो. आपण वर्षातले १५-२० दिवस फिरायला जात असू तर त्यातील किमान तीन दिवस तरी शरीरशुद्धीसाठी द्यायला हवेत. यामुळे शरीर आणि मनाला ओळखणं सहजसाध्य होतं. इथ शरीराशी एक वेगळं नातं जोडलं जातं. मला तर इथे आल्यानंतर शरीराचं ऋण फेडल्यासारखं वाटतं.
वैद्य दांडेकरांशी बोलताना असं जाणवलं की, आरोग्याच्या दृष्टीने वयाच्या चाळीशीपर्यंत दरवर्षी तीन दिवस पुरेसे आहेत. पण चाळीशीनंतर मात्र दरवर्षी किमान सात दिवस आपण शरीराकडे लक्ष द्यायला हवं. ‘प्रकृती‘मध्ये आलेल्या अनेकांशी बोलताना जाणवलं की, सांधेदुखी, मणक्याचे आजार, कंबरदुखी, स्पाँडिलायटिस, अर्धांगवायू यासारख्या आजारांना कंटाळल्यानंतर विश्वासाचा किरण म्हणन लोक इथं येत आहेत आणि छान बरं वाटतंय अशी त्यांची भावना आहे. हवापालट, जीवनशैलीतील बदल, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, शरीरशुद्धी यासाठी लोक इथं येत आहेत. ज्यांच्या आई-वडिलांना डायबेटिस सारखे आजार आहेत असे लोकही आपण लवकर आजारी पडू नये यासाठी शरीरशुद्धी करुन घ्यायला येत
आहेत.
एखाद्या दिवशी आपलं डोकं दुखत असेल आणि तरीही लगेच कामावर जायचं असेल तर अॅलोपथीची औषध घ्यायलाच हवीत. पण, आजारी पडूच नये यासाठी आणि जुनाट विकारांवर मुळापासून उपचार घेण्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही. मी स्वतः दर वर्षी तीन दिवस ‘प्रकृती‘ला जायचं ठरवलं आहे.
शुद्ध शाकाहारी, रुचकर तरीही पथ्यकर असं मराठमोळं जेवण या ठिकाणी मिळतं. इथल्या दिनचर्येमध्ये सर्व शरीरशुद्धी, पंचकर्म, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम, जप, मेडिटेशन, प्रवचन, आरती, शतपावली हे सगळं असतं. निवासी डॉक्टरांची व्यवस्था आहे. लोकल स्टाफ असल्यामुळे अतिशय प्रेमाने, अगत्यपूर्वक वागणूक मिळते. या ठिकाणचं घरगुती वातावरण पुन्हा पुन्हा इथे येण्याचं निमंत्रण देतं. तुम्हीही एकदा मन आणि शरीर निवांत करणा-या या विलोभनीय ठिकाणी अवश्य जाऊन या. मोबाईल रोजच्या रोज चार्ज करताय ना? मग स्वतःलाही वर्षातून एकदा चार्ज करुन घ्यायला हवं.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९८५०८४८४८२/९९३०१६७७१५ क्रमांकावर संफ साधता येईल.

विशेष *
धडपडीची अखेर ः प्रा. शिवाजी साटम
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षक एस. डी. साटम सर यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिव दुःख झाले. सुमारे वीस वर्षापूर्वी आम्ही कॉलेजमध्ये विद्यार्थी असतांना काही लेक्चर्सना ते मुद्दाम शिक्षकांसाठी येत असत. विद्यार्थ्यांबद्दल कमालीची आस्था, कळकळ, निरपेक्ष वृत्ती व निष्कलंक चारित्र्य यामुळे त्यांचा सर्वांना आदर होता. विद्यार्थ्यांनी नाविन्याची कास धरावी, सतत शिकावे, नवनिर्मिती करावी, लोककल्याणासाठी कार्यक्रम करावेत, प्रबोधनपर मार्गदर्शन व्हावे यासाठी दिनक्रमात प्राधान्य होते. त्यांच्या भारदास्त आवाजातही एक आर्जव होते.
वैयक्तिक पातळीवर त्यांनी वेंगुर्ल्याशी फार प्रेमाचे नाते जोडले होते. अनेकांशी स्नेह होता, त्यामुळे भेटीगाठी, विचार विनिमय, चर्चा व कधीतरी गंमती आम्ही अनुभवल्या. त्यांचे मनमोकळे, दिलखुलास हसणे आता कायमचे संपले आहे. २००२ मध्ये लॉ कॉलेजमध्ये अर्धावेळ व्याख्याता म्हणून काम करतांना साटम सरांच्या सोबत माझा काही काळ गेला. त्यावेळी त्यांचे प्लिहाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर काही वर्षे त्यांची प्रकृती स्थिरावली, पण पुढे प्रकृतीने साथ दिली नाही. हे विद्यार्थी वर्ग व पर्यायाने वेंगुर्ल्याचे दुर्देव.
कै. साळगांवकर सरांचे त्यांच्यावर विशेष प्रेम व मार्गदर्शन लाभले होते. त्यामुळे वेंगुर्ल्यातील सुमारे दोन दशकांच्या सामाजिक जडणघडणीचा इतिहास लिहितांना भावी काळात साटम सरांचे नाव खास घेतले जाईल. नोकरीतील त्रास व बंधने असूनही वैचारीक बांधिलकी मानणारा व कृतीशील शिक्षक साटम सरांसारखा विरळाच. त्यांच्या पवित्र स्मृतीस आमचे प्रमाण. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रा. अभिजित पं. महाले, वेंगुर्ले

वाचक लिहितात *
‘किरात वेंगुर्ल्याचा मानबिदू‘
‘इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याच वेलू गेला गगनावरी‘ या संतांच्या उक्तीची प्रचिती आमच्या ‘‘वेंगुर्ल्याचा मानबिदू‘‘ असलेल्या ‘किरात‘च्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेता दिसून येते.
वेंगुर्ल्यासारख्या एका लहान शहरामध्ये ८८ वर्षापूर्वी एक वार्तापत्र चालू करण्याचे धाडस ‘किरात‘ संस्थापक कै.अनंत वासुदेव मराठे यांनी केले. मराठे परिवाराची चार पिढ्यांची जिद्द आणि मेहनत यामागे आहे. त्याला दाद द्यावीच लागेल.
दुस-या पिढीतील कै. केशव अनंत उर्फ बाबा मराठे या नावाने परिचित असलेले. त्यांनी अनेक समस्यांशी जिद्दीने टक्कर देत या वेलीचे ख-या अर्थाने संवर्धन केले. बाबांचा मित्रपरिवार मोठा होता. तरीसुद्धा स्पष्ट वक्तेपणामुळे आपले विचार ते निर्भिडपणे ‘किरात‘ मधून मांडत.
‘किरात‘ने जानेवारी महिन्यात आपला वर्धापनदिन साजरा करतांना एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती विशेषांक आणि नामवंत व्यक्तीचे व्याख्यान असा उपक्रम अलिकडे सुरु केला आहे. यावर्षी १४ जानेवारीचा वर्धापनदिन समारंभही पुस्तक प्रकाशन आणि संगीत कार्यक्रम यामुळे दिमाखदार स्वरुपात साजरा झाला.
आमच्या शालेय जीवनाच्या काळामध्ये आमची हस्तलिखित मासिकांची स्पर्धा असायची. आमचे मित्र कै. दिगंबर परुळेकर, दाजी वेंगुर्लेकर, बाबा बोवलेकर, आपा मोर्ये, पेडणेकर ही मंडळी त्यामध्ये विशेष रस घेत असत. ‘कैवल्य‘, ‘सुभाष‘, ‘फुलबाग‘ इ. माझ्या स्मरणातील काही मासिकांची नांवे आहेत. त्याच दरम्याने ‘किरात‘मध्ये ‘बालजगत‘ या नावाने एक विभाग सुरु झाला होता. सय्यन हसन हे वाङमयप्रेमी त्यांचे संपादन करीत. त्यामध्ये मुलांच्या कविता, गोष्टींना प्रामुख्याने स्थान असे. ‘किरात‘ मध्ये नांव छापून आले याचे बाल उदयोन्मुख लेखकांना मोठे अप्रुप व भूषण वाटे.
मालवणचे प्रसिद्ध ‘बालसन्मित्र‘ पाक्षिकाचे संपादक पां.ना. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले येथे तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हस्तलिखित मासिकांचे प्रदर्शन व स्पर्धा झाली होती. त्यामध्ये बाबा मराठे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे अनेक तरुणांनी लेखनाची प्रेरणा घेतली.
आमच्या घरी आमच्या लहानपणापासून नेहमीच ‘किरात‘चा अंक येत असे. माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला अनेक वर्षे ‘किरात‘चे नांव ‘किरात टणत्कार‘ असे होते व मुखपृष्ठावर त्या नावाशेजारी एक धर्नुधारीचे सुंदर चित्र असायचे. कालांतराने ‘किरात‘चे स्वरुप बदलत गेले तसे नांवातही फरक झाल्याचे जाणवते.
आता संपादनाची जबाबदारी स्विकारलेले श्रीधर मराठे यांनी तर ‘किरात‘च्या स्वरुपात आमुलाग्र सुधारणा केली आहे. ‘किरात‘चे समाज प्रलोभनाचे कार्य विकासात्मक लेखाद्वारे होत असते. नवनविन सदरे, किरातचा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून प्रसिद्ध होणा-या दिवाळी अंकाशी स्पर्धा करणारा दरवर्षी उत्तरोत्तर बहरुन येणारा नामवंत तसेच उगवत्या लेखकांनाही लेखनास प्रोत्साहित करणा-या कथा, कविता, मालवणीका, चारोळ्या इ. विविध विषय तसेच नाविन्यपूर्ण मुखपृष्ठावरील चित्राने नटलेला असा दिवाळी अंक वाचकांच्या हाती पडतो तेव्हा निश्चितच त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत होत असतो.
‘किरात‘च्या समकालीन मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून नवयुग, मौज, धर्नुधारी, चित्रमय जगत, स्वराज्य यासारखी दर्जेदार साप्ताहिके प्रसिद्ध होत होती. ती कालौघामध्ये पुढे तग धरु शकली नाही. पण ‘किरात‘ने अनेक समस्यांना सामोरे जात आज आपला ८८ वा वर्धापनदिन दिमाखाने साजरा केला. त्याचे श्रेय श्रीधर मराठे व त्यांचे बंधू सुनिल तसेच चौथ्या पिढीचे तरुण अभ्यासूवृत्तीचे अॅड. शशांक मराठे यांना द्यावे लागेल.
यंदाच्या दिवाळी अंकातील ‘‘कोकणातील रस्त्याच्या समस्या व उपाययोजना‘‘ तसेच ‘‘रस्त्यांचा वळणदार प्रवास‘‘ हे माहितीपूर्ण लेख आणि ‘‘प्रातःकाले विशेषतः‘‘ हा आपलं दैनंदिन जीवन आरोग्यदायी व सुखमय होण्यासाठी आपला जीवनक्रम कसा असावा याचे सुंदर मार्गदर्शन तरुणांना तसेच ज्येष्ठांनाही वाचनीय आहे. या अंकाचे मुखपृष्ठ नाविन्यपूर्ण आणि वेंगुर्ल्याची उदयोन्मुख चित्रकर्ती चेतना दिपनाईकने काढले आहे. यंदाच्या अंकास मुंबईतील दिवाळी अंक प्रदर्शन व स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल मराठे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ‘किरात‘चा उत्तरोत्तर असाच उत्कर्ष होवो ही शुभेच्छा कोकण विकासाच्या विविध पैलूंवर किरातने आजवर सातत्याने इतके विपूल लेखन प्रसिद्ध करुन लोकप्रबोधन केले आहे. एवढे अन्य कोणत्याही छोट्या वृत्तपत्राने केलेले नसेल. किरातमधील अनेक महत्त्वपूर्ण लेख मोठ्या दैनिक वृत्तपत्रांतून पूनर्रमुद्रित होत.
- वसंत डुबळे, वेंगुर्ले

No comments:

Post a Comment