Saturday, 11 February, 2012

अंक ६वा, ९ फेब्रुवारी २०१२

अधोरेखीत *
पौरोहित्य करणारा नकोच*.!

विवाह विषयक निर्माण होणारे विविध प्रश्न, उद्भवणा-या वेगवेगळ्या समस्या याचा अभ्यास करीत असतानाच अलिकडच्या काळात ब्राह्मण समाजामध्ये पौरोहित्य करणा-या वा भिक्षुकी करणा-या मुलांचे ‘विवाह न ठरणे‘ ही एक खरोखरच गंभीर समस्या बनली आहे. केवळ कोकणच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक वगैरे ठिकाणी कमी अधिक फरकाने हीच समस्या सर्वत्र जाणवते आहे.
वास्तविक पहाता भिक्षुकी हा व्यवसाय खरंतर बिन भांडवली व्यवसाय मानला जातो. बिनभांडवली याचा अर्थ यामध्ये स्वतःची अशी खूप काही आर्थिक गुंतवणूक निश्चितच नसते आणि उत्पन्नाची प्राप्तीही उत्तम असते. शिवाय मिळणारा शिधा, फळ-फळावळ हे वेगळेच! तसेच पौरोहित्य करणे हे वाटते तेवढे सोपेही नाही. आपण जशी पदवी घेतो तसेच वेदपाठशाळेत राहून अक्षरशः आठ-दहा वर्षे हे अध्ययन केले जाते. यामध्येही प्राविण्य मिळवले जाते. त्यामुळे हे शिक्षणही घेणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी निश्चितच नाही. संस्कृतमधील उच्चार, अर्थ, तासन तास मंत्रोच्चारण हे निश्चितच क्लिष्ट आहे. शिवाय पौरोहित्य करणारे लोक जिथे जातात तिचे त्यांच्या ज्ञानाला आदरपूर्वक वाकून नमस्कार केला जातो. नमस्कार करणारी व्यक्ती कलेक्टर आहे की मंत्री आहे हा तिथे विषयच नसतो. याचाच अर्थ पौरोहित्य करणा-यांना मान दिला जातो.
इतके असूनही ‘पौरोहित्य करणारा मुलगा नको!‘ असं म्हणण्याकडे मुलींचा वाढणारा कल पाहून अनेक मुलांजवळ आणि मुलींजवळही चर्चा केली.
पौरोहित्य करणारी नाशिक आणि नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्रातील मुले म्हणतात की लाखांच्या घरात आमचे महिन्याचे उत्पन्न आहे. दारात दिमतीला गाड्या उभ्या आहेत. परंतु ‘भटजी नको हो!‘ अलं बिनधास्तपणे मुली सांगतात. मग त्यावेळी त्या इतर आर्थिक स्थिती, संपन्नता, मुलाचे नीट वर्तन या कशाचाच विचार करीत नाहीत. पुणे-मुंबई येथील पौरोहित्य करणारी मुलेही हाच अनुभव सांगतात. अनेकांची तर पस्तिशी-चाळीशी उलटून चालली आहे. संपन्नता आहे. परंतु केवळ पौरोहित्य करणारा म्हणून तो मुलगा नको ही मुलींची तसेच पालकांची मानसिकता सर्वत्र आढळते आहे.
तर कोकणात रहाणारा सागर यावर आपलं परखडं मत मांडतो. तो म्हणतो मी अनेक ठिकाणी फिरलो. एका ब्राह्मण मुलीच्या घरी तर घरात चहात घालायला दूध नाही, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण एकदम कमी अशी स्थिती होती. त्यांच्या घरी उत्तम कमाई असलेल्या सागरने स्वतःसाठी जेव्हा लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा केवळ तो भिक्षुकी करणारा म्हणून मुलीने नकार दिला. ही अतिशयोक्ती नाही, वास्तव आहे. सागर परखडपणे म्हणतो की, या मुलींना भिक्षुकी करणारा मुलगा नको असतो. पण ज्यावेळी याच मुली आंतरजातीय विवाह करतात त्यावेळी मग तो अगदी दरिद्री असला तरी खुशीने त्याच्याबरोबर जातात हे चित्र पाहून अत्यंत वाईट वाटल्याचे तो सांगतो.
अनेक मुलींजवळ याविषयी चर्चा केली असता पौरोहित्य करणा-यांकडे सोवळे-ओवळे पाळले जाते, मासिक अडचण पाळणे जाचक असल्याचे सांगतात, तर काहीजणी ‘भटजी नवरा आहे हे सांगायला कसंतरीच वाटतं‘, असेही म्हणतात. शिवाय अनेक ठिकाणी परंपरागत उत्तम प्रकारे पौरोहित्य करणारे पणजोबा, आजोबा, वडील अशी परंपरा असताना वडीलांना चालेल परंतु मुलीला पौरोहित्य करणारा मुलगा नको म्हणून स्थळे नाकारली जातात. उच्चशिक्षित मुलींचं सोडाचं परंतु शिक्षण कमी असलेल्या मुलीही महिना लाखाचे उत्पन्न मिळवणारा मुलगा केवळ पौरोहित्य करतो म्हणून नको म्हणतात.
सोवळे-ओवळे यावर बोलताना सागर म्हणतो की, आम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार असतो. मग अशावेळी घरात मासिक अडचण न पाळणे योग्य वाटत नाही. शिवाय याच मुली जर असे विचार मांडतात पण मासिक अडचणीच्या वेळी थेट देवाला जावून हात लावणे यांना तरी शक्य होईल का? ही गोष्ट जरी नैसर्गिक असली तरी आजही कुणी देवाजवळ अशावेळी जात नाही.
सारी मतमतांतर ऐकेली की अवाक व्हायला होतं. सागर म्हणतो तेही पटतं. परंतु या समस्येवर नेमका मार्ग काय आणि कसा हे स्पष्ट होत नाही. परंतु मुलींची ही अचाट मत ऐकल्यावर मुला-मुलींच्या
सा-यांच्याच पालकांना हे सांगावस वाटतं की, आपल्या मुलांजवळ मित्रत्वाचं नातं जरुर असू द्या. पण त्याचबरोबर शंभर टक्के स्वातंत्र्य देवू नका. थोडा धाक, आदरयुक्त भिती गरजेची आहेच. त्यांच्यावर कोणताही निर्णय घेण्याची सक्ती करावी असं मी बिल्कुल म्हणत नाही. परंतु मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विवाहेच्छुक वधू-वराने आपापले च्ज़्ग्र्च्र् ठ्ठदठ्ठथ्न्र्द्मत्द्म म्हणजेच च्द्यद्धड्ढदढद्यण् (क्षमता), ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्म (कमतरता), दृद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म (संधी), द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म (संभाव्य धोके) या सा-यांचा विचार करायला हवा. आत्मपरीक्षण व्हायला हवं. पालकांनी वास्तवाची जाणीव करुन द्यायला हवी.
केवळ चार तास नेसलेल्या धोतरामुळे कोणाला कमी लेखण्याची जरुरी नाही. व्यक्ती किती ज्ञानसंपन्न आहे हे पहायला हवं. त्याचबरोबर आपण किती शिकलो आहोत, खरोखरच जीवनामध्ये त्या शिक्षणाचा ख-या अर्थाने उपयोग करणार आहोत का? याचाही विचार व्हायला हवा. स्वप्न आणि वास्तव हे उमजायला हवं. केवळ शिकलो म्हणजे क्रांती केली हा अनेकांच्या बोलण्यामधून जाणवलेला ‘अहंम्‘ बाजूला ठेवून दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे. तरच यातून काही मार्ग निघेल अशी आशा करुया.
-सौ. सुमेधा देसाई, - ९७६५८४७२९७.


संपादकीय *
दृष्टिक्षेपात जिल्हा परिषद निवडणुक

या वेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्षातली शारिरीक नसली तरी शाब्दिक राडेबाजी पहावयास मिळाली. राज्य पातळीवरील नेते,मंत्रीगण या स्थानिक निवडणुक प्रचारामध्ये हिरिरीने उतरले. दोन महिन्यांपूर्वीच नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यात जसा काँग्रेसचा दारुण पराभव झाला तसे काही होऊ नये म्हणून पालकमंत्री नारायण राणे आपल्या दोन्ही पुत्रांसह जिल्ह्यातच तळ देऊन बसले होते. लोकमत बिथरु नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी संयमाने प्रचार करावयास सांगितले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करताच राणेंचाही तोल सुटला आणि त्यांनी ‘एकेकाला बघून घेईन, सोडणार नाही‘ वगरे भाषा वापरली. मग काय, त्यांचे जवळचे कार्यकर्तेही ताळतंत्र सोडून बोलू लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर्.आर्.पाटील, नगरविकास मंत्री भास्कर जाधव असे राष्ट्रवादीचे मंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आमदार विनोद तावडे हेही प्रचारात उतरले. एकंदरीत राज्य सरकारमध्ये एकत्रित सत्ता आघाडी करुन राहिलेले राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात तरी एकमेकांच्या उरावर बसलेले लोकांना पहायला मिळाले.
एकंदरीत प्रचार वैयक्तिक पातळीवर उतरला, एकमेकांची उणीदुणी काढतानाच घराणेशाहीचा उध्दार झाला. नेत्यांच्या डागाळलेल्या कारकिर्दीचाही पंचनामा झाला. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव झाल्याने कित्येकांची राजकीय कारकीर्द कोळपून गेली. आता आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पुरुष कार्यकर्त्यांना पक्षामध्ये पदे मिळविण्यासाठी किवा ते नाही मिळाले तरी किमान कार्यकर्ता म्हणून तरी वावरण्याची पाळी किमान पाच वर्षे तरी आली आहे. त्यातूनही काहीजण ग्रामपंचायत स्तरावर उतरतील. पण तिथेही महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आणि प्रस्थापित असलेल्या कार्यकर्त्यांशी स्पर्धा असणारच.
काँग्रेसच्या म्हणजेच नारायण राणेंच्या पाडावासाठी राष्ट्रवादी-सेना-भाजप-आरपीआय अशी महायुती प्रत्यक्षात झाली नाही तरी बर्‍याच जागांवर समझोता करुन किवा मैत्रीपूर्ण (?) लढती करुन ही निवडणूक लढविली गेली. त्याचा कितपत फायदा या अजब युतीला होतो, ते निवडणूक निकालानंतर समजेल. काँग्रेसने मात्र कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवून आणि बंडखोरी केलेल्यांना पक्षातून निलंबित करुन आपण एक जबाबदार राष्ट्रीय पक्ष आहोत हे दाखवून देण्याची संधी साधली.
निवडणूक आयोगाचा धरसोडपणा
जिल्हा परिषद निकालाबाबत निवडणुक आयोगाचा धरसोडपणा याही वेळी दिसून आला. नगरपालिका निवडणुकांच्या तारखा तर दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका झाल्याने जि. प. निवडणूक निकालांचा महापालिका निवडणुकांच्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जि.प.निवडणुकांचे निकाल महानगरपालिकांच्या बरोबरच जाहीर करावेत अशी निवडणुक आयोगाकडे मागणी केली होती. काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाने तशी मागणी केली नाही. निवडणूक आयुक्तानी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध होणार नाहीत म्हणून राज ठाकरे यांची मागणी फेटाळली होती. मग आता एकाएकी मतदान यंत्रांची उपलब्धता कशी काय झाली? यातून निवडणूक आयोगाचा धरसोडपणाच दिसून आला.
टी. एन. शेषन देशाचे निवडणुक आयुक्त झाले त्यावेळी त्यांनी आधीपासूनच अस्तित्वात असलेली निवडणूक नियमावली कठोरपणे अंमलात आणली. त्याचा धसका नोकरशाही आणि लोकप्रतिनीधींनीही घेतला होता आणि याच नियमावलीचा आधार घेत तालुका आणि जिल्हा पातळीवरील ‘शेषन‘ ही मनमानी करु लागले. राजकीय पक्षांनीही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परिणामी उमेदवारी अर्ज भरणे, फेटाळणे, निवडीलाच हरकत घेणे इत्यादी प्रकरणे न्यायालयात जाऊ लागली. कायद्याच्या राज्यात नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अपेक्षित असले तरी त्याबाबत तारतम्य न ठेवल्याने लोकांसाठी कायदे असण्यापेक्षा कायद्यांसाठी लोक आहेत. असे चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे निवडणूक आचार संहिता ही आधीच कामे न करणार्‍या अथवा टाळणार्‍या नोकरशाहीला वरदान आणि जनतेला त्रासदायक ठरलेली आहे. त्यात निवडणूक आयोग धरसोडपणामुळे आणखी भर घालीत आहे.


विशेष *
एकनाथ ठाकूर ः एक बहुआयामी व्यक्तिमत्व
देशातील सर्वांत मोठी व अव्वल दर्जाची सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेचे अध्यक्ष या नात्याने बँकेच्या वृध्दीसाठी अथक कार्य करीत असलेले श्री. एकनाथ केशव ठाकूर हे नाव आज महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. त्यांचा जन्म सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ह्या नितांत सुंदर गावात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हिरावलेले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे भावंडांना जास्त शिक्षण घेता आले नाही व त्यांना उपजिवीकेची व्यवस्था करावी लागली. सर्व भावंडात लहान असलेले एकनाथ जन्मतःच हुशार असल्याने त्यांनी पुढे शिकावे अशी सर्व भावंडांची इच्छा होती. त्याप्रमाणे कुडाळ शहरात राहणा-या आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी शिक्षणासाठी येऊन कुडाळ हायस्कूल मधून एकनाथ एस्.एस्.सी. परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. कुडाळ हायस्कूलमधील इंग्रजीचे अध्यापक आंगचेकर सर ह्यांच्या अध्यापनाने इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली व इंग्रजी विषयात त्यांनी एस.एस.सी.परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले. पुढे पुण्याच्या स.प.महाविद्यालयातून बी.ए.पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे शहरात सरकारी खात्यात नोक-या करुन व शिष्यवृत्यांद्वारे मिळविले. केवळ कारकुनी करावयाची नाही हे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. त्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून बँकेत १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले. अगदी जन्मापासून ते ही मानाची नोकरी मिळेपर्यंतचा कालखंड त्यांच्या जीवनातील संघर्षमय काळ होता. ह्या काळात त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आले असतील परंतु, त्यांच्या बोलण्यातून कधी कुणाबद्दल कसलीही तक्रार नसते. उलट आपल्याला ह्या काळात सर्वांकडून भरपूर प्रेम मिळाले असे ते आवर्जून सांगतात.
स्टेट बँकेत नोकरी करताना त्यांनी अनेक वेळा आपले बुध्दिचातुर्य व प्रशासकीय कौशल्य प्रत्ययास आणून दिले. स्टेट बँकेत कार्यरत असताना स्टेट बँक व तिच्या संलग्न बँकांच्या सुमारे ७०,०००/- अधिका-यच्या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषविले. सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिका-यांच्या महासंघाचे अध्यक्ष तसेच बँकांव्यतिरिक्त देशातील सर्व उद्योग धंद्यातील अधिका-यांच्या समन्वय समितीचे सेक्रेटरी जनरल ही पदेही त्यांनी भूषविली. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन १९७७ साली युनो अंतर्गत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जिनिव्हा येथे संपन्न झालेल्या जागतिक अधिकारी परिषदेला सुमारे २५ लाख भारतीय अधिका-यांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून जनता पक्षाच्या सरकारने त्यावेळी त्यांची नियुक्ती केली. त्या परिषदेत १२७ देशांच्या अधिकारी प्रतिनिधीनी ठाकूर ह्यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करुन त्यांच्या प्रतिनिधीत्वाचा सन्मान केला.
कार्यकर्ते जोडणे, जपणे, प्रथम संस्था, नंतर कर्मचारी ही विचारधारा मनापासून जोपासणे, संस्थेचा कसलाही तोटा न करता संस्थेच्या प्रत्येक कर्मचा-याला त्याच्या हक्काचा न्याय्य वाटा मिळवून देण्याची मनोधारणा असल्यामुळे त्यांना संस्थाचालक आणि कर्मचारी ह्या दोन्ही बाजूंकडून भरपूर सहकार्य आणि मान सन्मान मिळाला आणि म्हणूनच ते एक यशस्वी संघटना नेता होवू शकले. स्टेट बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी ह्यांचे ठाकूरसाहेब हे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व. स्टेट बँकेचे त्यावेळचे चेअरमन आर.के.तलवार ह्यांच्या बरोबर त्यांचे जसे सौहार्दपूर्ण संबंध असत तसेच ते बँकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्याबरोबरही असत. मतभेद व्यक्त करतानाही त्यांची सुसंस्कृतता कधीही सुटत नाही. त्यांच्या मनाची कवाडे सदैव उघडी असतात आणि त्यामुळेच त्यांना सगळीच माणसे आपली भावंडे वाटत असतात.
राष्ट्रीय आणिबाणीच्या काळीत सर्व स्तरांवर होत असलेल्या अन्यायांनी ते व्यथित झाले आणि त्यांनी स्टेट बँकेतील प्रतिष्ठेच्या अधिकारीपदाचा राजीनामा दिला. परंतू, नियतीला त्यांचे स्टेट बँकेतून बाहेर जाणे मान्य नव्हते, त्यामुळेच की काय राजीनाम्यानंतर पंचवीस वर्षांनी त्याच बँकेचे केंद्रीय संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नेमणूक केली. ही बँकिग विश्वातील अद्वितीय घटना होय. संचालक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी कर्मचा-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिले. ते जरी स्टेट बँकेतून बाहेर पडले तरी त्यांनी स्टेट बँक अधिका-यांची जी संघटना नावारुपाला आणली त्या संघटनेविषयी त्यांना आजही आस्था आणि जिव्हाळा वाटतो.
श्री. ठाकूर साहेबांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती व त्यातूनच विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणे हा त्यांचा सहजधर्म झाला. जे ज्ञान त्यांनी प्राप्त केले त्याचा उपयोग समाजातील असंख्य तरुण तरुणींना व्हावा ह्या विचाराने प्रेरीत होऊन स्टेट बँकेची नोकरी सोडल्यानंतर सन्मानाच्या व चांगल्या वेतनाच्या नोक-यांच्या आलेल्या संधी नाकारुन आज संपूर्ण देशात विस्तार पावलेली व प्रसिध्द असलेली नॅशनल स्कूल ऑफ बँकींग ही संस्था स्थापन केली. ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व इतर भागातील लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठीची दारे उघडली व त्याचा दृश्य परिणाम म्हणजे देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, केंद्र व राज्य सरकारी आस्थापना इत्यादी मधून हजारो तरुण तरुणींना नोक-या मिळाल्या. स्टेट बँकेत असतानाही स्थानीय लोकाधिकार समिती, मराठी मंडळ ह्यांच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी महनीय कार्य केले.
प्रसिध्द संसदपटू व वक्ते कै.बॅ.नाथ पै हे राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी श्री.ठाकूर कुडाळ येथे माध्यमिक शिक्षण घेत होते. बॅ.नाथ पैंची भाषणे ऐकून प्रभावित झालेल्या श्री. ठाकूर ह्यांनी इंग्रजी आणि मराठी वाङ्मयातील विविध विषयावरील उत्तमोत्तम पुस्तके वाचून काढली व पुढे पुणे येथे शिकत असताना महाविद्यालयीन व अन्य वक्तृत्व स्पर्धामधून भाग घेत त्यांनी अनेक पारितोषिके मिळविली. त्यांचे आचार्य अत्रे, ना.सि.फडके, पु.ल.देशपांडे इ.मान्यवरांकडून चांगल्या वक्तृत्वाबद्दल कौतुकही झाले. पुढे शिवसेनेने त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या सांसदिय काळामध्ये राज्यसभेत अनेक विषयांवर त्यांनी केलेली भाषणे ही आदर्श विचारांचा आणि सुंदर वक्तृत्वाचा नमुना आहे. स्टेट बँकेचे केंद्रीय संचालक झाल्यानंतर कुडाळ शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला झालेल्या प्रचंड गर्दीने लोकांच्या प्रेमाचे एक आगळेच दर्शन घडले.
सत्काराला उत्तर देताना केलेल्या अविस्मरणीय भाषणाच्या वेळी श्री.ठाकूर यांनी आपली बहिण श्रीमती माळगांवकर आणि शाळेत शिकत असताना ज्यांच्या दुकानात त्यांनी काम केले त्या श्री.तेली ह्यांचा आपल्या जीवनातील जडणघडणीत मोठा वाटा असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन त्यांच्या समोर ते जेव्हा नतमस्तक झाले तेव्हा सभेला उपस्थित असलेल्या सर्वांची मने हेलावली. इंग्रजी आणि मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व थक्क करणरे आहे. त्यांची स्मरणशक्ती हे त्यांना मिळालेले दैवी वरदानच ठरावे. काही वर्षांपूर्वी ते एका जाहीर सभेत *घोडा* या मराठी शब्दाला इंग्रजीतील अठरा समानार्थी शब्द स्पेलिगसह सांगताना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात श्रोत्यांकडून त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाला दिलेला पसंतीचा तो प्रसंग मला आजही स्पष्टपणे आठवतो. त्यांचे भाषण म्हणजे एक बौध्दिक मेजवानीच होय.
ठाकूर साहेबांचे अंतरंग निर्मळ आहे. त्यामुळेच त्यांचे इथल्या मातीशी घट्ट नात आहे. ह्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी त्यांनी सहजपणे पत्करली. आज कोकणातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. ग्रंथालीच्या ज्ञानयज्ञाचे अध्यक्ष, कोकण भूमी प्रतिष्ठान, भारत जोडो यात्रा, कोकण मराठी साहित्य परिषद, चि.त्र्यं.खानोलकर स्मारक समिती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज इ.विविध संस्थांतून ते कार्यरत आहेत. अनेक नामांकित साहित्यिक, समाजसेवक, राजकारणी, उद्योगपती, अर्थशास्त्रज्ञ इत्यादींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. प्रज्ञावंत, गुणवंत, कलावंत व्यक्तीबद्दल त्यांना अतीव आदर वाटतो. सिधुदुर्गातील अनेक शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आपण जे काही मिळविले त्यातील काही हिस्सा समाजासाठी द्यावा या उदात्त हेतूने अनेक संस्थांना देणग्या देवून कसलाही गाजावाजा न करता समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करतात.
आज श्री. ठाकूर साहेबांचे नांव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्व दूर पसरले ते सारस्वत बँकेच्या माध्यमातून. स्वतःच्या प्रकृतीस्वास्थाला दुय्यम स्थान देऊन सजगतेने बँकेच्या प्रगतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. भारतातील सर्वांत मोठी सहकारी बँक ही बिरुदावली सार्थ ठरविणा-या सारस्वत बँकेची चौफेर प्रगती झाली ती श्री. ठाकूरांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली. ठाकूर साहेब आणि बँकेचे सर्व संचालक ह्यांच्या योगदानातून आणि सहयोगातून आज सारस्वत बँकेचे नांव घरोघर पोहोचलेले आहे. बँकेच्या प्रगतीचा हा उंचावणारा आलेख बँकेच्या असंख्य सभासदांना भावला व त्यामुळेच सारस्वत बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या वर्षीची संचालक मंडळाची निवड बिनविरोध होऊ शकली. श्री. ठाकूर व त्यांच्या टीमवर सभासदांचा दृढ विश्वास असल्याचे हे द्योतक आहे. बँकेने नुकताच ३०००० कोटींचा पल्ला गाठला ह्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष ह्या नात्याने श्री. ठाकूर, बँकेचे कर्मचारी व ग्राहक यांना देतात आणि नकळतच स्नेहबंध निर्माण करतात आणि ते जपण्याचा सदैव प्रयत्न करतानाही दिसतात. सारस्वत बँकेचा विस्तार महाराष्ट्राव्यतिरीक्त कर्नाटक, दिल्ली, गुजरात, म.प्रदेश आदी राज्यांत करुन हा अश्वमेध असाच चालू रहावा ह्यासाठी सर्व थरातील लोकांच्या सदिच्छा आणि सद्भावना श्री. ठाकूर साहेब व त्यांच्या सहका-यांबरोबर निश्चित आहेत. सारस्वत बँकेचे क्षेत्र विस्तारतांना त्यांनी फक्त बँकेची आर्थिक बाजूच पाहिली नाही तर सामाजिक जबाबदारीचे एक नवं भान दिलं हे निश्चितपणे नमूद करावेसे वाटते. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात संपूर्ण जीवन व्यतीत करणा-या कै.बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन प्रकल्पाला केलेली मदत, *ताज* वर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलेला मदतीचा हात, अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कुटुंबियांना दिलेला आधार, ग्रंथालीच्या वाचन चळवळीला आर्थिक सहाय्य इ.अनेक घटनामधून बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करता येते.
गेली अनेक वर्षे कॅन्सर सारख्या व्याधीला जबरदस्त इच्छाशक्तीने आणि धिरोदात्तपणे ते तोंड देत आहेत. स्वतःला नवनवीन कार्यात गुंतवून घेत आहेत आणि यशाची शिखरे गाठत आहेत. ज्या क्षेत्रात गेले तिथे ते यशस्वी झाले. कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलेला असावा. जे काही करायचे ते सर्वस्व झोकून, पूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने हे त्यांचे जीवनसूत्र आहे. म्हणूनच एक कुशल प्रशासक व अधिकारी, उत्तम वक्ता, यशस्वी संस्था चालक, उत्कृष्ट सामाजिक आणि राजकीय भान असलेला संघटक, कसलीही अपेक्षा न बाळगता दातृत्व जपणारा दाता, अर्थशास्त्र आणि बँकींग क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्व असे अनेक कंगोरे असलेले त्यांचे जीवन बहुआयामी बनलेले आहे. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव, कै.बाबा आमटे आणि माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या श्रध्देयांचा लाभलेला सहवास, पत्करलेल्या कार्यासाठी केलेला त्याग, निश्चित ध्येयपूर्ती वंचिता बद्दल कळकळ ह्या सर्व गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. त्यांची श्रवणक्षमता उच्च दर्जाची आहे. त्यांना दररोज अनेक माणसे भेटायला येतात त्या प्रत्येकाचे म्हणणे प्रथम ते शांतपणे ऐकून घेतात व मगच स्वतः बोलतात. रोजच्या कामाच्या व्यापात त्यांना हे कसे जमते हे एक कोडे आहे. त्यांच्या विचारांतून व्यक्त होणारा समजसपणा, विचारांची परिपक्वता, सखोलता आणि सुसंस्कारीत वृत्ती यांचा ठसा त्यांच्या सहवासात येणा-या प्रत्येकाच्या मनावर उमटतो आणि हेच त्यांच्या नेतृत्वाचे आणि लोकप्रियतेचे कारण आहे.
मोठा मित्र परिवार असणारे, स्नेहबंध निर्माण करुन जपणारे, पूर्व सुरींची स्मृती जागवणारे, पूर्वसरी विषयी आदर राखणारे, कृतज्ञतेची जाणीव कायम ठेवणारे, अनेक संस्थांचे आधारस्तंभ असलेले, तृप्त संसारिक जीवन लाभलेले, मातीची वीण घट्ट ठेवणारे, सन्मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले, साहित्य, संस्कृती यांची जाण असणारे प्रसन्न व्यक्तिमत्वाचे कोकणचे लाडके एकनाथ ठाकूर १५ फेब्रुवारीला एकाहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. परमेश्वराने त्यांना निरामय दीर्घायुष्य द्यावे आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व सर्वतोपरी बहरावे हीच वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना.
- ग. रा. तथा बाळ खानोलकर - (निवृत्त स्टेट बँक अधिकारी


स्त्री-पुरुष समानता
आतापर्यंत आपण स्वतःची ओळख करुन घेतली, पैशांविषयीची विचारसरणी, मासिक प्राप्ती याविषयी विचार केला. वैयक्तिक जीवनातील प्रत्येक महत्त्वाची गोष्ट सहजीवनातही तितकीच महत्त्वाची असते. स्त्री-पुरुष यांचे आचार-विचार कसे असावेत? माणूस म्हणून दोघांनीही समानतेने वागावं आणि एकमेकांना समानतेने वागवावं. तत्वतः सुध्दा काही वेळा हा विचार व्यक्तींना पटत नाही. शेवटी काय? बायका त्या बायका किवा पुरुष ते पुरुष, असा नाईलाजी सूर सर्वत्र ऐकू येतो. परंतू, जननेंद्रियातील फरक वगळता स्त्री आणि पुरुषाच्या शरीररचनेमध्ये कोणताही फरक निसर्गाने केलेला नाही. कोणत्याही माणसाला त्याच्या जगण्यासाठी आवश्यक किवा आवड म्हणून ज्या प्रकारचं काम करण्याची इच्छा असते त्या प्रकारचं काम त्याला करता येते. म्हणूनच पुरुष उत्तमप्रकारे स्वादिष्ट चवीचा स्वयंपाक करु शकतात आणि स्त्रिया विमान चालवू शकतात. निसर्गाचा हा समान न्याय, वेगळ्या वाटा शोधण्याची हिमत बाळगणा-या अनेक स्त्री-पुरुषांनी समाजासमोर आणला आहे. तरीही......
अजूनही अनेक घरांमध्ये शक्य असूनही काही ठराविक कामं बायकांनीच करायची असा गैरसमज आढळतो. या विचारसरणीचा वैवाहिक जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. ही विभागणी जितकी लवचिक राहील. तितके विवाहातील स्त्री-पुरुष संबंध दृढ होतील.
पुरुषांनी घरात स्वयंपाक केला किवा स्त्रियांनी स्वयंचलित वाहने वापरली म्हणजे स्त्री-पुरुष समानता नव्हे. ही समानतेची एक पायरी आहे. यातही अपरिहार्यता किती? आणि सहजता किती? हा भाग पुन्हा खूप महत्त्वाचा. कारण त्याला सोय किवा तडजोड हे ही कारण असू शकतं.
समानता म्हणजे दोघांनीही जबाबदारीने वागणं, एकमेकांना सन्मानाने वागवणं. स्त्री म्हणून किवा पुरुष म्हणून कुठचेही खास फायदे न मागणे. यामध्ये थोडेथोडे बदल होतायत हेही खरं आहे. पण ते फार सावकाश होत आहेत.
काही पुरुषांना स्त्री-पुरुष समानतेची कल्पना म्हणजे स्त्रीची स्वैराचाराची इच्छा एवढंच समजतं, किवा स्त्रिया पुरुषांसारखं वागणार असं वाटतं आणि हे वारं आपल्या घरात नको असं ते म्हणत रहातात. घरकाम करणार्‍या पुरुषांच प्रमाण कमी आणि लहान बाळांना सांभाळणे तर त्याहून कमी.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विवाहानंतर आपल्या जोडीदाराची याबाबतची विचार करण्याची आणि वागण्याची पध्दत खूप प्रभाव टाकते.
आमच्या परिचयातला एक मित्र स्वतः निमसरकारी कार्यालयात अधिकारी आहे आणि त्याची बायको स्त्री-रोग तज्ञ आहे. अर्थात दोघांच्या कामाच्या वेळा आणि जबाबदारीत फरक आहे. तिला वेळी, अवेळी बाळंतपणाच्या रुग्णासाठी हातातलं काम बाजूला ठेवून जावं लागतं. अशावेळी आमचा मित्र घरातील केर काढणे, लादी पुसणे ही काम तर करतच असे पण ज्यावेळी त्यांची मुलं लहान होती. तेव्हा त्यांची शी-शू आणि आंघोळ अशी सुध्दा कामं अतिशय आनंदाने करताना आम्ही स्वतः पाहिलं आहे. पण अशी माणसं अपवादानेच आढळतात. आता या घरातील मुलांनी स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्ष अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही आपल्या जोडीदाराशी ते अशा पध्दतीने वागण्याची शक्यता वाढते.
एकूणच स्त्री-पुरुष समानतेचा विचार यशस्वी सहजीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. एवढं मात्र नक्की.
वंदना करंबेळकर * ९८५०४७३०१२


विशेष बातम्या *
वेंगुर्ले-सागरेश्वर समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची अंडी सापडली
८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले-सागरेश्वर येथील मंदिराच्या मागे समुद्रकिना-यावर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या समुद्री कासवाने अंडी घातली. समुद्री कासव अंडी घातल्यानंतर लगेचच समुद्रात निघून जाते. कासवांच्या पावलांच्या ठशांवरुन स्थानिक मच्छिमारांना येथे कासवांनी अंडी घातली असल्याचे लक्षात आले. काही जागरुक ग्रामस्थांनी वायंगणी येथे कासव संवर्धनाचे काम करणा-या सुहास तोरसकर यांना फोन करुन सांगितले. तातडीने सुहास तोरसकर व त्यांचे सहकारी प्रसाद पेडणेकर घटनास्थळी हजर झाले. पण ते पोहोचेपर्यंत सुमारे ६० ते ७० अंडी क्षणिक मोहापायी काही लालची ग्रामस्थांनी पळवली होती. वाळूमध्ये शोधाशोध करुन केवळ चार अंडी वाचविण्यात तोरसकरांना यश आले. आता चार अंड्यांची काळजी सुमारे ५२ दिवस घेतल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतील.
दुर्मिळ प्रजातीचे रक्षण आवश्यक- ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवांची दुर्मिळ प्रजात म्हणून जाहीर झाली आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याचे काम ही कासवे करतात. कासवांची ही प्रजात झपाट्याने कमी होत आहे. भारतात फक्त ओरिसा, गोवा, वायंगणी, वेळास या किना-यांवर ही कासवे प्रजननासाठी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत येतात. अलिकडच्या काळात देवगड, देवबाग, वेळागर, वेंगुर्ला इथल्या किना-यावर देखील कासवे येत आहेत. केवळ क्षणिक मोहापायी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अंडी पळविणे हा कायदेशीर अजामिनपात्र गुन्हाही आहे. सिधुदुर्गात वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी वनविभागाच्या सहकार्याने गेली चार-पाच वर्षे कासव संवर्धनाची मोहीम स्वतः नुकसान सोसून राबवित आहेत. कासव संवर्धन पर्यटनात वाढही करु शकते. स्थानिकांना रोजगार आणि पैसे उपलब्ध करुन देवू शकते याचा अनुभव वायंगणी वासीयांनी कासव जत्रेच्या निमित्ताने घेतला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जर कोणाला कासवाची अंडी आहेत अशी माहिती मिळाल्यास सुहास तोरसकर (९४०३०७२९९१) यांना संफ करावा. योग्य बक्षिस दिले जाईल.
कासवांची अंडी चोरणे/कासवांना मारणे याला कायद्याने जबर शिक्षा- कासवाची अंडी पळविल्यास अगर कासवांना मारुन त्यांचे मांस खाणे, कवचाची तस्करी करणे हे सर्व अजामीनपात्र गुन्हे असून आरोपीला पाच वर्षे कारावास व २५ हजार रु. दंड अशी शिक्षा होऊ शकते. पोलिस आणि वनविभागाला संयुक्तपणे कारवाईचे अधिकार आहेत. समुद्री कासवे प्रजननाच्या हंगामात संभाव्य किना-यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी कासवप्रेमींकडून होत आहे.
जिल्हा व्यापारी एकता मेळावा संपन्न
ग्राहकांना काय हवं, काय नको याचा विचार करायचा नाही. ग्राहकाला बोलवायचं नाही, ग्राहक आला तर ‘पुड्या बांधायच्या‘ असा व्यापार चालणार नाही. ‘चिल्लर नको, नोटा मोजा‘, अशा पध्दतीने व्यापार करा. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कर भरणारे व्यापारी निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात व्यक्त केली. कुडाळ तालुक्याच्यावतीने कुडाळ हायस्कूलच्या रंगभवन हॉलमध्ये सारस्वत बँक नगरीत सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या आयोजित २४ व्या व्यापारी एकता मेळाव्यात ते बोलत होते सुट्या पैशाच्या टंचाईचा मुद्दा धरुन ते म्हणाले जिल्हा अजूनही सुटे पैसेच मोजतो आहे. मात्र, अन्य जिल्ह्यातील व्यापारी नोटा मोजताहेत. ते नियोजनबध्द व्यापार करीत आहेत.


पर्यटन अन् प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष द्या!
जिल्हा निसर्गरम्य आहे. दोन बंदरे, विमानतळ, चार वर्षांत चौपदरी रेल्वेची डबल लाईन अशी कामे लवकरच पूर्ण होतील. याचा फायदा व्यापा-यांनी घेतला पाहिजे. हा फायदा घेताना विचारसुध्दा मोठे पाहिजेत. चिल्लरसारखे ते नसावेत. असे विचार त्यांनी मांडले. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. महासंघाचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, मैत्रेय ग्रुपच्या वर्षा सत्पाळकर आदींची भाषणे झाली. व्यापारी महासंघांच्या मार्फत व्यापा-यांच्या मुलांसाठी लॅपटॉप देण्यात येतील अशी माहिती अनिल सौदागर यांनी दिली.
मान्यवरांचा गुणगौरव- व्यापारातील भीष्माचार्य भाऊ धडाम यांना व्यापार गौरव, महिला उद्योजक प्रमिला मुंडले यांना माई ओरोसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला व्यावसायिक पुरस्कार लक्ष्मी शिदे यांना गीता घुर्ये यांच्या हस्ते देण्यात आला. पुढील वर्षाचा रौप्य महोत्सवी व्यापारी एकता मेळावा सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन शर्यतीत श्री. भाऊसाहेब परब यांचा ९३ व्या वर्षी यशस्वी सहभाग
मुंबईत अलिकडेच झालेल्या ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन शर्यतीत ४.५ कि.मी. स्पर्धेत भाग घेऊन वयाच्या ९३ व्या वर्षी तरुणांच्या उत्साहालाही लाजवेल असा उत्साह दाखवत श्री. भाऊसाहेब तथा जी. एल. परब यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या कमी वेळात आघाडीवर राहून पूर्ण केली. श्री. परब गेली ६ वर्षे मुंबई मॅरेथॉन शर्यतीत भाग घेत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात. अंधेरी येथील प्रोग्रेसिव्ह सिनियर सिटीझन असो. स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. नियमित व्यायाम व योग्य आहार हे त्यांच्या निरोगी जीवनशैलीचे वैशिष्ट्य आहे. १९७७ साली भारत सरकारच्या शेती व अन्न महामंडळात उपव्यवस्थापक या पदावरुन निवृत्त झाले. निवृत्तीनंतर वेंगुर्ल्यात खादी महामंडळाच्या आर्थिक सहकार्याने फळप्रक्रिया उद्योग सुरु केला. तसेच युनिसेफची बालवाडीही सुरु केली. सातेरी प्रासादिक संघ, लोकन्यायालय पॅनेल सदस्य, सारस्वत बँक स्थानिक सल्लागार समिती सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांनी सिनियर सिटीझन वेलफेअर हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सातेरी व रामेश्वर देवस्थानचा ट्रस्ट करण्यातही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. संफ- मो. ९९३०५००१६८, ६५१५०८९८.

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुधीर वंजारी ‘सी‘ ग्रेड उत्तीर्ण - सिधुदुर्गला प्रथमच हा मान
दि. २६ ते २८ जानेवारीला कोलकत्तच्या खूदिराम इंडोर स्टेडियममध्ये २९ वी जेकेए राष्ट्रीय कराटे स्पर्धा भरविण्यात आली होती. ह्या स्पर्धेमध्ये १८ राज्यांचा सहभाग होता. त्यात ओपन टीम फाईटमध्ये महाराष्ट्र टीमने सिल्व्हर मेडल जिकले. मेघालय टीमने सुवर्णपदक जिकले. महाराष्ट्र टीममध्ये सेनसाय सुधीर वंजारी, अमर यादव, राम तुंबडे, सुरेश माळी व दिवेंश त्रिवेदी हे होते.
त्याआधी २२ ते २५ जानेवारी ला जपानचे शिहान ओसाका योशिहारु यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे कॅम्प भरविण्यात आला होता. त्यात काता व कुमिकोच्या विविध टेक्नीक शिकविण्यात आल्या. त्यात परीक्षाही घेण्यात आल्या. सेनसाय सुधीर वंजारी (फीप्थ डिग्री ब्लॅक बेल्ट) यांनी एक्झामिनर सी ग्रेड पास केली. स्पर्धेचे व कॅम्पचे आयोजन सेनसाय अनंत रत्ना (सिक्स डिग्री ब्लॅक बेल्ट) व वेस्ट बंगाल टीमने केले होते. सिधुदुर्ग जिल्हा कराटे-डो-असोसिएशन वेंगुर्ला या संस्थेचे अध्यक्ष सेनसाय सुधीर श्रीकृष्ण वंजारी सावंतवाडीचे सुपूत्र असून कराटे क्षेत्रात आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव कमावल्याबद्दल वेंगुर्ले येथे आल्यावर सिधुदुर्ग जिल्हा कराटे डो असोसिएशन वेंगुर्ले या संस्थेचे पदाधिकारी व पालक वर्गांकडून अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment