Thursday 3 November, 2011

अंक ४०, ३ नोव्हेंबर २०११

अधोरेखीत *
ग्रामपंचायतीचा निधी पडून, विकास कामे ठप्प
मंत्रालय पातळीवर लाल फितीत योजना अडकू नयेत म्हणून पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतींना आता थेट निधी उपलब्ध होतो. गावच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधीत सरपंच, आपण निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पुढच्या पातळीवर पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी या सर्वांची असते.
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत असणा-या कोट्यावधी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
अशी आहे पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्रामयोजना!
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजने अंतर्गत गावाचा एकात्मिक विकास आराखडा बनवून लोकांच्या सहभागातून विविध योजना एकात्मिक पद्धतीने कायम राबवून गावाचा कायमस्वरुपी विकास साधण्यासाठी योजना बनविण्यात आली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध
या योजनेमध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी जमिनीचा विकास, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, उर्जा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण इ. च्या स्वतंत्रपणे सुरु असलेल्या योजनांचा समन्वय साधणेही अपेक्षित आहे.
‘इको व्हिलेज‘ची संकल्पना राबवून समृद्ध गाव निर्माण करणे, मोठ्या गावात शहराच्या तोडीच्या सुविधा निर्माण करणे, जलव्यवस्थापन, जलस्रोतांचे रक्षण, संवर्धन असे उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.
पाण्याचा प्रश्न सुटेल आणि पर्यटकांसाठीही आकर्षण
सिधुदुर्गातल्या गावांमध्ये असणा-या देवळांच्या जवळ पाण्याची तळी असते. यामध्ये अपवाद वगळता बहुतेक सर्व तळी सुकलेली किवा गाळाने भरलेली आहेत. या योजनेअंतर्गत उपलब्ध असणा-या या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे सहज शक्य होणार आहे. यामुळे तळ्यांची खोली तर वाढेलच त्याचबरोबर उन्हाळ्यात विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढेल आणि त्याचबरोबर मंदिरांना भेट देणा-या भाविक, पर्यटकांसाठी एक आकर्षण स्थळ वाढेल.
सिधुदुर्गातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केवळ पहिल्या टप्प्यातील निधी खर्च केला आहे. दुस-या आणि तिस-या टप्प्यातील कोट्यावधी रुपये ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे आणि सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे पडून आहेत.
पूर्वी गावातील लोकांनी साकव, अंतर्गत रस्ते, जलव्यवस्थापन वगैरे कामांची मागणी ग्रामसभेत झाल्यावर निधी उपलब्ध नसल्याची सबब सांगण्यात येत असे. पण आता तर अगदी १ हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीपासून ते १० हजार पर्यंत लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध आहे.
चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. लोकांकडून कामाची मागणी नाही असे सांगून निधी तसाच ठेवला जातो. हा निधी खर्च करण्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ती बदलत नसेल तर ज्या लोकांनी ग्रामविकासासाठी त्यांना निवडून दिले आहे त्या लोकांनीच त्यांना ही सर्वांच्या हिताची कामे करायला भाग पाडले पाहिजे. मुंबईत प्रत्येक गावचे एक ग्रामविकास मंडळ असते. त्यांनाही विनंती आहे की, मंदिर जीर्णोद्धाराप्रमाणेच अशा गाव समृद्ध करणा-या योजनांचा पाठपुरावा करावा आणि उपलब्ध असणारा निधी संबंधीत यंत्रणेकडून आपल्या गावात खर्च करुन घ्यावा.
-अॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९

संपादकीय *
आता नरकासुरांचा जयजयकार?
नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री गावागावांतून विशेषतः शहरांतून नरकासूर प्रतिमांच्या स्पर्धा झाल्या. त्यांच्या मिरवणुका निघाल्या. एका मिरवणुकीत घोषणा होती ‘‘नरकासुराचा विजय असो!‘‘ विद्यमान राजकारण आणि समाजकारणाला साजेशीच ही घोषणा होती यात काही संशय नाही.
नरकासुरांच्या लहान मोठ्या प्रतिमा बनविणे आणि रात्री त्या जाळणे, असूर प्रवृत्तीचे दहन झाले असे मानणे हा अनेक गावांच्या गावरहाटीतील एक भाग असतो.
पण, त्याच्या स्पर्धा घेऊन, त्यांचे क्रमांक लावून मोठमोठी बक्षिसे ते नरकासूर तयार करणा-या बालगोपाळ मंडळांना देणे, त्या नरकासुरांच्या वाजत गाजत मिरवणुका काडणे आणि त्यांचे पहाटे केव्हातरी दहन करणे हा प्रकार कोकणात अलिकडे फोफावू लागला आहे. कोकणात म्हणजे प्रामुख्याने सिधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून हे लोण आले आणि त्याला विकृत स्वरुप येऊ लागले आहे.
बरीच मंडळे रस्त्यावरच नरकासूर प्रतिमा उभ्या करतात आणि जाणायेणा-या वाहनधारकांकडून वर्गणी गोळा करतात. जुन्या जाणत्या मंडळींनी या प्रकारांना विरोध करुन पाहिला. पण आजकाल कोण कोणाचे ऐकतो? ज्यांनी असले विकृत प्रकार थांबवायचे ते पोलीस खाते आपणहून काहीच करीत नाहीत. कोणी तक्रार करील म्हणून वाट पहात बसतील आणि तक्रार केलीच तर त्या मुलांच्या विकृतीला आळा घालतील असे नाही. सगळेच असूर बनल्यावर कोण कुणाचे ऐकणार?
सनातन संस्थेसारखी राष्ट्र आणि हिदू धर्मप्रेमी संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने आपल्या नियतकालिकांमधून हिदू धर्माच्या सण-समारंभांना येत असलेले विकृत वळण थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ते करतांना ही संस्था कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. अगदी प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांचा सुद्धा! त्यामुळे राजकारणी विशेषतः असूरी प्रवृत्तीचे राजकारणी आणि विधि -निषेधशून्य प्रसारमाध्यमे या सनातन संस्थेच्या विरोधात! म्हणूनच या संस्थेविरोधात खोटेनाटे आरोप लावून बदनामी करणे यात सारेच धन्यता मानीत आहेत. तथाकथीत निधर्मी लोकांचा यात सहभाग विशेष आहे.
प्रश्न सनातनचा नव्हे, नरकासुरांचा-असुरांचा जयजयकार करुन आपला समाज, समाजातील नवी पीढी कुठे चालली आहे? कुठले संस्कार दाखवित आहे? हा आहे. याचे प्रत्यंतर या निमित्ताने येत असते. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमत जागृत होऊ लागले आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे हे शक्य होऊ शकले. त्यांच्या पाठीशी उभे राहणा-या,त्यांच्या आंदोलनाला योग्य दिशा देऊ शकणा-या मंडळींमुळे राजकारणातील या भ्रष्ट असुरांना धडकी भरली आहे. याच दरम्याने अब्जावधी रुपयांचे आर्थिक घोटाळे उघडकीला आल्याने केंद्रात मंत्रीपद भूषविणा-या (किवा दूषविणा-या) काहींना तुरुंगात जावे लागले आहे. प्रशासनातील काही बडे अधिकारीही याच कारणांनी सध्या तुरुंगवास भोगत आहेत. अशा असुरांचे समर्थन करण्यासाठी ज्यांच्यामुळे हे भ्रष्ट असूर लोकांसमोर आले, त्या अण्णा हजारे आणि त्यांच्या जवळच्या सल्लागार मंडळीना या ना त्या कराणाने बदनाम करण्याचे काम काही राजकारणी मंडळी आणि वृत्तपत्रेसुद्धा इमाने इतबारे करु लागलेली आहेत.
कोणत्याही सूक्तासूक्त मार्गाने सत्ता मिळविणे आणि त्या सत्तेच्या जोरावर देशाची म्हणजेच जनतेची सार्वजनिक संपत्ती ओरबाडणे हाच सर्व राजकीय पक्षांचा एकमेव कार्यक्रम ठरलेला आहे. त्याच दिशेने त्यांच्या हालचाली सुरु असतात. त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा अशा आसूरी प्रवृत्तींच्या विरोधात आपला आवाज उठवत नाहीत. असे हे नव्या जमान्यातले नरकासूर केवळ राजकारणात आणि वरीष्ट प्रशासनातच आहेत असे नाही. ते सर्वदूर अगदी ग्रामपंचायतीच्या राजकारणा -पर्यंत पोचलेले आहेत. आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याची स्वार्थी वृत्ती निर्माण झालेला मध्यमवर्गीयही याला अपवाद नाही.
महागाई वाढते म्हणून सुरक्षित नोकरी असलेला नोकरदार वेतनवाढ मागतो. ती मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्यासाठी संप करतो. शेवटी त्याला वाढीव वेतन मिळतेच. जीवनावश्यक गरजा भागल्या की चैनीच्या वस्तूंची खरेदी सुरु होते. त्यावर वारेमाप खर्च केला जातो. इतके करुनही तो पुन्हा पाच वर्षांनी महागाई वाढली म्हणून संप पुकारायला मोकळाच! यात सर्वसामान्य, हातावर पोट असणारा गरीब वर्गच नव्हे तर कारागीर,छोटे व्यावसायीकही भरडले जाताहेत याचे भान कोणालाच नाही. ही सुद्धा नरकासुराचीच प्रवृत्ती.
केवळ दिवाळीच्या आदल्या रात्रीला नरकासूराचे नव्हे तर नववर्ष प्रतिपदेला, गुढी -पाडव्याच्या आदल्या दिवशी होणारी रंगपंचमी किवा धुळवड, श्रावण मासारंभाच्या आदल्या रात्री ‘साजरी‘ केली जाणारी ‘गटारी‘ अमावास्या, देवतांच्या विसर्जन मिरवणुकांतून होणारी मद्यधुंद बिभत्स नृत्ये असे प्रकार खूपच वाढले आहेत. या सा-या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याची, किमान जाहीरपणे शाब्दीक विरोध करण्याची ज्यांची नैतिक जबाबदारी आहे ते हाताची घडी घालून समोर घडणारे प्रकार पहात राहतात. शिक्षक, प्राध्यापक आपल्या शाळा-महा विद्यालयांतील मुलांवर संस्कार करण्याची आपली जबाबदारी आहे असे मानीत नाहीत. एरवी वेतनवाढीसाठी संघटीत होणा-या या वर्गाने समाजातील नव्या पीढीवर चांगले संस्कार कसे होतील याकडेही लक्ष द्यायला हवे आहे. सरकारी निवृत्तीवेतन घेणा-या पेन्शनरांचीही ही आपली नैतिक जबाबदारी मानली पाहिजे. या गोष्टीना काही पैसा खर्च करावा लागत नाही. यातून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांनाही बळ येईल.
सुदैवाने भारतीय सण, समारंभ, उत्सवांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. शेकडो संस्था, संघटना, धर्ममठ, मंदिरे यांच्याकडून त्यांचा अवलंब होत असतो. त्यासाठी आपल्याला पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहायला नको. उलट तेच या खंडप्राय देशाच्या ‘विविधतेतून एकता‘ या सूत्रामुळे अचंबीत होऊन येथले समाजजीवन अभ्यासायला येत असतात.
म्हणूनच आता जयजयकार कोणाचा करायचा याचे भान समाजाला आणण्यासाठी सर्व थरावरुन प्रयत्न व्हायला वहेत. न पेक्षा सर्वचजण यापुढे नव्या नरकासुरांच्या तावडीत सापडण्याची शक्यता अधिक आहे!

विशेष *
घडवूया स्वतःला स्वयंसिद्ध!
माझे गुरुबंधू स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी लिहिलेली अल्प आयुष्याचं सार सांगणारी ही कविता मला स्वतःला फार आवडते.
क्षणभंगूर मी माझ्यापुरता, क्षणभंगूर ही माझी कविता
क्षणभंगूर डोळ्यातील आसू, क्षणभंगूर हे मधाळ हासू
क्षणभंगूर हे जिणे भोगणे, भातुकलीचा डाव मांडणे
क्षणभर येता शीतल लहरी, क्षणाभराचे वादळ जहरी
क्षणभर वाटे प्रेम अंतरी, क्षणाभराचा द्वेष नंतरी
क्षणभर वाटे श्रद्धा भक्ती, क्षणाभराची अन् आसक्ती
क्षणभर जिकून क्षणात हरणे, क्षणभर जगुनी क्षणात मरणे
क्षणभर जळता सरणावरती, क्षणभर त्यास्तव कोणी झुरती
या अशा क्षणभंगूर जीवनात किती तास झोपेत गेले (सुमारे २० वर्षे), किती तास रोजच्या दिनक्रमासाठी गेले (सुमारे १० वर्षे), किती काळ पैशाच्या मागे धावण्यात गेले (सुमारे २० वर्षे) याचा हिशेब काढत मनुष्य कधी इतिहासात जमा होतो हे सुद्धा लक्षात येत नाही.
सगळेच जण सजगपणे, जागरुकपणे जगतात असे नाही. स्वतःला जागवत जगणं फार थोड्यांना जमतं.
स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे सारं जग इच्छेवर चालतं! अनेक जन्म या इच्छा पूर्ण करता करता दमछाक होते. पण स्वतःला जागवू शकणा-या फार थोड्या व्यक्ती तीव्र इच्छा शक्तीला जागवतात आणि मग त्यातूनच कठोर निर्धार, जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास, साहसीपणा, मूल्यांची जपणूक, संयमीपणा या सा-या शब्दांचा पाऊस या व्यक्तीच्या जीवनात पडतो आणि अशी उत्तुंग व्यक्तिमत्व निश्चितपणे निर्माण होतात. त्यांचा इतिहास पुढच्या काही पिढ्यांना प्रेरणादायी म्हणून निश्चित जिवंत रहातो.
एकविसावं शतक खूप काही चांगलं घडवणार या आशेवर कितीतरी माणसं विश्वास ठेवून जगत आहेत. ११ वर्षे संपली. नवीन येणारी पिढी निश्चित भरकटणार नाही ना? मोहाचे, आकर्षणाचे बळी होऊन संस्कृती, मूल्ये यांना तिलांजली देणार नाहीत ना! या विचारांनी मन अस्वस्थ होते. नव्या पिढीची विवाहसंस्था आणि समाजव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा खूप मोठी आहे. क्षुद्र स्वार्थासाठी, अहंभावासाठी, सहनशीलतेला, संयमाला विसरुन आपली परंपरा, संस्कृती व नैतिक मूल्यांची जपणूक यांची पायमल्ली होणार नाही यासाठी गरज वाटते ती आपली जबाबदारी पूर्ण करण्याची.
आहेत, आमच्या भोवती स्वयंसिद्धा आहेत! न दमणा-या, न थकणा-या, स्वतःला जागवत जगलेल्या! डोळस रुपानं स्वतःची कुवत वाढविलेल्या. भरभरुन जगण्यासाठी हवी फक्त जिद्द. हवा प्रचंड आत्मविश्वास! मनात आणलं तर काहीही करु शकतो यावर हवी प्रचंड श्रद्धा! सभोवताली असणा-या मोहमायेचे, आकर्षणाचे, बळी न होण्यासाठी हवी आत्मपरिक्षण करण्याची वृत्ती. आपल्यासाठी योजलेल्या नाटकातल्या पात्राचे दिग्दर्शन करण्याची मानसिक तयारी. मी माझ्यासाठी लिहिलेल्या नाटकाचे लिखाणच बदलून टाकीन, असाही विश्वास काहीजण बाळगतात. तथापि नाटकाचे लिखाण बदलण्यापेक्षा आहे त्या नाटकात माझे पात्र मी कसे उत्तम रंगवेन याचा विचार माणसाला जगण्याची उमेद देईल हे निश्चित.
जग ही एक रंगभूमी आहे हे शेक्सपिअरचं म्हणणं. आहे रे म्हणणारे आस्तिक. नाही रे म्हणणारे नास्तिक. आशावादी जगायचं भरलेलं आणि असलेलं बघायचं की नाहीरे म्हणत निराशावादी वृत्तीला कवटाळून या भवसागरात गटांगळ्या खायच्या हे ज्याचं त्यानं ठरवायचं. ज्याला किना-याचं भान असतं, ज्याला लक्ष्मणरेषेचा अर्थ कळतो, तो स्वैर स्वातंत्र्याला कधीही जवळ करत नाही. अशीच व्यक्ती आमच्या संस्कृतीला जाणू शकते आणि जोपासू शकते. अशी संस्कृती जाणणारीच फक्त मोठी होतात आणि इतिहासजमा होऊनसुद्धा जिवंत रहातात. प्रत्येकाच्या हृदयात, नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी दीपस्तंभासारखी!
आपल्या भोवती खूप काही आहे. डोळसपणे पाहिले तर अनेक उत्तम शिक्षक, शिक्षिका, उत्तम लेखिका, चित्रकार, कवी, उद्योजक, उत्तम गृहिणी, उत्तम समाजरक्षक यांचा भरभरुन इतिहास आपल्या जवळच आहे. कदाचित नसेल फार प्रसिद्धी मिळालेली या व्यक्तिमत्वांना! आपण सर्वजण पुढील वर्षभरात हाच खरा इतिहास किवा भूतकाळात दडू पहाणारा वर्तमान जागवूया आपल्या संवादातून! मी तुमची सा-यांची मदत घेणार आहे, तुम्ही बिनधास्त माझ्याशी संवाद साधू शकता!
हा मिळून सा-यांचा असेल एक प्रामाणिक प्रयत्न. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ज्यांनी मोठ्या हिमतीनं, धीरानं, जिद्दीनं आपली पायवाट घट्ट केली, पुढच्या पिढीसाठी! या दिग्गज व्यक्तिमत्वांचं स्मरण आणि त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आपण जाणून घेऊया या स्वयंसिद्धांच्या कार्यकर्तृत्वातून!
-आरती कार्लेकर, कुडाळ, फोन- (०२३६२) २२२१५८.

आरवलीची जागृत देवता जागबाई!
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावात सोन्सुरे रस्त्यालगत असलेले श्री जागबाई देवीचे देवस्थान जागृत आहे. गोव्यातील पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या व मंदिरे उध्वस्त करण्याच्या जाचाला कंटाळून सन १५६७ साली गोव्यातील म्हापशाजवळील उसकई येथे असलेली ही मूर्ती भक्तांनी आरवली येथे आणली. मंदिरासमोरच श्री रामेश्वर, रवळनाथ, मूळपुरुष, धाडवस अशा देवता आहेत. देवीच्या उत्सवास दूरदूरहून भक्तमंडळी येतात. त्यांची भोजन, निवासाची उत्तम व्यवस्था मंदिर आवारातच आहे.
श्री देवी जागबाईची मूर्ती महिषासुरमर्दिनी स्वरुपात आहे. २००४ साली अक्षय्य तृतियेला या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.
येथील सर्व उत्सव परंपरेप्रमाणे पार पाडले जातात. वार्षिक जत्रौत्सव ७ दिवसांचा असतो.
या देवस्थानचे व्यवस्थापन श्री देवी जागबाई देवस्थान कमिटी, आरवली पहात आहे. देवीचे भक्त महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि परदेशातही सर्वदूर आहे.
यावर्षी जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला होत आहे. श्री देव वेतोबा देवस्थानने दिलेल्या मानाप्रमाणे देवीचा जत्रोत्सव वेतोबा देवस्थानच्या जत्रेच्या एक दिवस आधी येतो.

मध्वानुभव *
काहीही म्हणा पण गप्पा मारा!
गोष्ट तशी खूप जुनी, म्हणजे ३० वर्षांपूर्वीची! एस.टी.ने पुण्याहून दापोलीला व्हाया महाबळेश्वर जात होतो. एस.टी.मध्ये अजिबात म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. ड्रायव्हर, कंडक्टर, मी. पुढच्या बाकावर साधारण ४०-४५ वर्षे वयाचे एक गृहस्थ आणि शेवटच्या २-३ बाकावर ‘बेलदार‘ समाजातील ८-१० जण! या बेलदार मंडळींची कानडी भाषेतील ‘खडखड‘ आणि एस.टी.चा आवाज या ‘माहौल‘मध्ये ८-१० तासांचा प्रवास सुकर होणे शक्यच नव्हते. प्रवासात जर गप्पिष्ट शेजारी भेटला तर गप्पा मारण्यात तरी टाईमपास करता येतो. पण ही शक्यता आज मुळीच दिसत नव्हती. शिरवळलाही कोणी नवीन ‘पॅसेंजर‘ चढले नाहीत.
कंडक्टर तथा मास्तरांजवळ ‘संवाद‘ साधण्याचे प्रयत्न फारसे यशदायी ठरले नाही. २-३ प्रश्नांना त्यांनी जुजबी उत्तरे दिली आणि मग त्यांनी रितसर तंबाकूचा बार भरल्यामुळे ‘संवाद‘ थांबला. मी माझ्या जाग्यावर जाऊन बसलो. बरोबर असलेले वृत्तपत्र नजरेखाली घालून झाले. वेळ जाण्यासाठी परत एकदा अथ पासून इतिपर्यंत सिनेमा, नाटकांच्या जाहिरातींसह अन्य जाहिरातीही वाचल्या. एस.टी. खूपच कूर्मगतीने, खड्ड्यातल्या रस्त्याने चालली होती. त्यामुळे प्रवासाला १२-१४ तास लागणार असं दिसत होतं. प्रवास खूपच ‘बोअर‘ होत होता. शेवटी धीर करुन वृत्तपत्र मागण्याच्या इराद्याने पुढच्या बाकावरील पॅसेंजरकडे मोर्चा वळवला. सुरवातीपासूनच निरीक्षण केले होते त्याप्रमाणे हे गृहस्थ देशपांडे - कुलकर्णी वर्गातील असावेत हा माझा अंदाज होता. माझे वृत्तपत्र त्यांना देऊन त्यांचेकडील वृत्तपत्र घेऊन त्यांच्या शेजारीच (परवानगी घेऊन) बसलो.
मला फार वेळ गप्प नाही बसता येत. आता तर जवळ जवळ दोन अडीच तास मी ‘मौनात‘ होतो. त्यामुळे खूपच अस्वस्थ झालो होतो. शेजारचे देशपांडे/कुलकर्णी यांना कसं बोलकं करावं हे समजत नव्हतं. पँट, बुशशर्ट, चष्मा, नीट भांग पाडलेला यावरुन हे गृहस्थ सर्कारी अधिकारी असावेत असेही मी ठरवले. त्यांचा पेपर आभार मानून परत देता देता मी धाडस करुन विचारले, ‘‘सर, आपल्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. आपण देशपांडे का?‘‘
गृहस्थांनी एकदा माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, ‘‘हो, मी देशपांडे! पण मी आपल्याला कुठं पाहिल्याचं नाही आठवत मला. आपला परिचय?‘‘ मी माझं नाव, गाव, नोकरी इत्यादि तपशील सांगण्याच्या निमित्ताने गप्पांना प्रारंभ केला. गृहस्थ फारसे बोलके नव्हते. पण ‘घुमेही‘ नव्हते. खरं तर देशपांडे हे नाव मी अंदाजपंचे ठोकलं होतं आणि ते खरं निघाल्याने माझी खर तर पंचाईतच झाली होती. एकदा त्या गृहस्थांना मी ‘देशपांडे‘ ठरवलं होतं म्हणून सोंग चालू ठेवण्याचं ठरवलं.
‘‘सर, आपलं गाव कराड का हो?‘‘ अन् गंमत म्हणजे देशपांडे म्हणाले, ‘‘हो!‘‘ आता मात्र माझी खूपच गोची झाली. पण सोंग चालू ठेवण्यावाचून ‘गत्यंतर‘ नव्हते. सरना मी म्हणालो, ‘‘माझे कराडला अमुक-अमुक नावाचे नातेवाईक आहेत. त्यांच्याकडच्या लग्नात आपल्याला पाहिल्यासारखे वाटते.‘‘ देशपांडे म्हणाले ‘‘शक्य आहे. पण त्यावेळी आपली ओळख झाल्याचे मला नाही आठवत. पण ऋृदन्र् ध्र्ठ्ठन्र् तुम्हाला जर आठवतय तर ठीक आहे.‘‘ येथे त्या गृहस्थांनी आपल्या जवळची ‘आवळा सुपारी‘ ऑफर केली. मी साभार देणगी स्विकारुन अक्षरशः काही तरी विचारायचं म्हणून त्यांच्या सोनेरी फ्रेमच्या चष्म्याकडे पहात विचारलं,
‘‘सर आपण ‘बांधकाम‘ खात्यात आहात काय?‘‘ या माझ्या प्रश्नालाही त्यांनी ‘होकार‘ दिल्यावर मी उडालोच. देशपांडे हे आडनाव, कराड हे गाव, बांधकाम खात्यातील अधिकारी हे सर्व माझ्या मनाचे खेळ होते आणि ते खरे ठरत आहेत हे पाहून मी अवाक - दिग्मूढ का काय म्हणतात तसा झालो होतो.
एवढ्यात महाबळेश्वर आल्याने गाडी चहा-भोजनासाठी थांबली. देशपांडेंनी रॅकवरची बॅग काढली. ते येथे उतरणार होते. देशपांडे उतरता उतरता म्हणाले, ‘‘डॉक्टर, थॅक्स फॉर कंपनी. चला, चहा घेऊया!‘‘ चहा घेता घेता देशपांडे म्हणाले, ‘‘माझं नाव देशपांडे नाही, नाही माझं गाव कराड! मलाही तुमच्यासारखं गप्पा मारायला आवडतं. म्हणून तुम्ही मला देशपांडे ऐवजी कुलकर्णी, पाटील असं काहीही म्हणाला असतात तरी मी होच म्हटलं असतं. अच्छा! भेटूया पुन्हा योग आल्यावर! ‘‘
डॉ. मधुकर घारपूरे

विशेष बातम्या *
विलास दळवी यांचा सत्कार
राज्य शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानात परबवाडा गावात अध्यक्षपदाची जबाबदारी पेलून परबवाडा गावाला स्वच्छता पुरस्कार मिळवून देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस लोगो तयार करुन देणारे परबवाडा येथील विलास दळवी यांचा खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री.दळवी यांनी जिल्हा विकास यंत्रणेच्या ‘सिधु‘ ब्रॅन्डसाठी उत्कृष्ट लोगो तयार केल्याबद्दल केंद्रीय कृषीमंत्री एम.के.अण्णा पाटील यांच्या हस्ते तसेच ग्रामस्वच्छता अभियानात परबवाडा गावचे अध्यक्ष असतांना पुरस्कार मिळाला त्यावेळी नारायण राणे यांच्या हस्ते, मंत्री विनय कोरे यांनीही सत्कार केला होता. परबवाडा शाळा क्रमांक १ला स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोकण विभागात मिळाला होता. त्यावेळी विलास दळवी ग्रामस्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष होते. अलिकडेच राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या गणेश सजावट व गणेशमूर्ती स्पर्धेत परिक्षक म्हणून श्री. दळवी यांनी काम केले होते.

परबवाडा शाळेला लाखाची देणगी
परबवाडा शाळा नं.१ साठी लोकवर्गणीतून सभागृह बांधावयाचे आहे. त्याकरिता परबवाडा येथील दानशूर ग्रामस्थ श्री. लक्ष्मीकांत परब यांनी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्याध्यापिका सौ. रेश्मा पिगुळकर यांचेकडे सुपूर्द केला आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीतर्फे लक्ष्मीकांत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मुख्याध्यापकांनी सत्कार केला. यावेळी सरपंच इनासीन फर्नांडीस, पं.स.सदस्य सरिका काळसेकर, सदस्य रविद्र परब, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे निधन
कोकणातील सहकार महर्षी म्हणून मान्यता पावलेले सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवराम भाऊ जाधव यांचे २ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. लौकिक अर्थाने ते काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वावरले तरी सहकार क्षेत्रात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बरोबर घेऊनच त्यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात अगदी खेडोपाडीही सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले आणि कोकणात सहकार रुजत नाही हे टीकाकारांचे म्हणणे खोटे पाडले.
पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे ते सदस्य होतेच. त्यानंतर सिधुदुर्ग जिल्हा निर्माण झाल्यावर त्यांनी सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे समर्थपणे नेतृत्व केले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरही जिल्ह्याचे नेतृत्व करीत बँकेचे उपाध्यक्ष तसेच अध्यक्षपदही भुषविले.
शिक्षण क्षेत्रातही शिवरामभाऊंनी अनेक माध्यमिक शाळा स्थापन केल्या आणि शैक्षणिक कार्याला त्यांची मदत व सहकार्य लाभत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी सर्वोदय चळवळीत काम केले. तसेच विनोबाजींच्या भूदान चळवळीतही त्यांनी काम केले होते. राजकारणात ते शरद पवारांचे नेतृत्व मानी असत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
शिवराम भाऊ अलिकडे मधुमेहाने त्रस्त होते. त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. तसेच दोन्ही पायही काढावे लागले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गोवा येथील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची २ नोव्हेंबरच्या पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई व बंधू असा परिवार आहे. ३ नोव्हेंबरला माणगांव येथे त्यांचे पार्थिव दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. समाजाच्या सर्व क्षेत्रातील तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महादेवाचे केरवडे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment