Sunday 16 January, 2011

वर्ष ८८ वे, अंक १ व २, १३ जानेवारी २०११

संपादकीय
८८व्या वर्षात पदार्पण!
या अंकापासून ‘किरात‘ ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्षभरात साप्ताहिक ‘किरात‘चे प्रत्येकी ८ पृष्ठांचे (काही विशेष प्रसंगी १६ पृष्ठांचे) रंगीत छपाईसह एकूण ४७ अंक प्रसिद्ध झाले. या सर्व अंकांतून विविध विषयांवर विविध सदरे आणि विशेष लेख प्रसिद्ध केले. पहिल्या पृष्ठावर समर्पक रंगीत छायाचित्रांसह अधोरेखित या सदरामधून विविध विषय वाचकांसमोर आणले. पृष्ठ २ वरील संपादकीय लेख हे तर ‘किरात‘चे पूर्वीपासूनचे वैशिष्ट्य आहे. शेवटच्या पृष्ठावरील मालवणी बोलीभाषेतील विजय पालकर यांचे ठेवणीतले लोणचे वाचकांना खूपच रुचकर लागले डॉ. मधुकर घारपुरे याचे ‘स.सु.ली.‘ हे मिश्किल परंतु अंतर्मुख करणारे प्रासंगीक विषयावरील लेखांचे सदरही वाचकप्रीय ठरले आहे.
अधोरेखित लेखांमध्ये किशोर बुटाला यांचे योगदान मोठे आहे. रस्ते, बंदरांचा विकास, पर्यटन यावरील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण असतात. पर्यटन विषयावर आम्ही ‘वेध पर्यटनाचा‘ या शीर्षकाचे सलग तीन अंकात लेख लिहिले. पर्यटन विकासाकरिता काय हवे? यासाठी सरकारी समित्या किवा सल्लागार कंपन्यांची सेवा सरकारला घ्यावी लागणार नाही इतकी विविधांगी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘आय.ए.एस. हवे कशाला?‘ या मोहनराव केळुसकरांच्या लेखांशी ब-याच वाचकांनी सहमती दर्शविली. याखेरीज कॅप्टन आनंद बोडस, अॅड. शशांक मराठे, समीर बागायतकर, भरत सातोसकर, आनंद हुले, कोकणातील मच्छिमारी व्यवसायाच्या समस्या मांडणारे रजनीश जोशी यांचे लेख वैशिष्ट्यपूर्ण होते.
संपादकीय लेखांतून ‘बंदर विकासाचा झपाटा कोणासाठी?‘, ‘राजकारणामुळे विधायक कार्याला गती कशी येणार?‘, ‘छोटी गावे कोती मने‘, ‘जलस्वराज्य बुडाले‘, ‘रस्ते तेथे खड्डा‘, ‘खेड्यांकडे चला‘ या लेखांबद्दल ब-याच सहमतीदर्शक प्रतिक्रिया आल्या. त्याचबरोबर अणुवीज प्रकल्पाचे समर्थन करणा-या लेखाबद्दल प्रतिकूल प्रतिक्रियाही आल्या.
डॉ. श्रीराम हिर्लेकर यांचे ‘मनाचिये गुंती‘ हे मानसिक आरोग्य विषयक सदर, वैद्य सुविनय दामले यांचे भारतीय परंपरेतील सणांची आरोग्य रक्षणाशी सांगड घालणारे ‘सण आणि आरोग्य‘ याविषयी अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. या अंकापासून निसर्गोपचारावर एक नवे आरोग्य विषयक सदर सुरु करीत आहोत. वास्तूंमधील बांधकाम या विषयावर पं. विनायक परब यांनी ‘वास्तू तथास्तु‘मध्येलिहिलेल्या अनेक लेखांमुळे त्यांना आता वास्तु बांधकामाविषयी सल्ला मागणा-यांमुळे लिहायला वेळ मिळत नाही अशी स्थिती आली आहे. ठेवणीतले चविष्ठ लोणचे लिहिणारे पत्रकार विजय पालकर यांनाही मी मराठी या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिझम आणि त्यांचा व्यवसाय सांभाळून किरातचे लोकप्रिय सदर लिहिणे ही एक प्रकारे तारेवरची कसरत असते.
किरातसाठी अनेकांनी विविध विषयांवर लेख दिले आहेत. त्यासाठी अभ्यास केला आहे. आजच्या टीव्ही, संगणक आणि चंगळवादी युगात स्वतंत्र विचार करुन ते मांडणे - लिहीणे ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे. विशेषतः शिक्षक-प्राध्यापकांची (भरपूर वेतन वाढूनही) अभ्यास आणि लेखन यामधील अनास्था ही चिताजनक आहे. पण ‘किरात‘ने नवोदितांना लिहायला प्रवृत्त करण्याचे व्रत पूर्वीपासूनच स्विकारले आहे. आता गेली काही वर्षे पृष्ठसंख्या वाढल्याने स्थानिक व जिल्हास्तरीय बातम्यांसह विविध विषयांवरील लेख, पुस्तक परिचय, व्यक्तिविशेष नियमित देता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी लेखकांचे जसे सहकार्य मिळते तसेच हा अधिक खर्चाचा रंगीत छपाईतील अंक नियमित चालू रहावा यासाठी आवश्यक असणा-या व्यापारी जाहिरातीही वाढू लागल्या आहेत. प्रासंगीक विशेष अंकासाठीही अनेकांकडून जाहिरात रुपाने सहकार्य मिळत असते.
किरातवर प्रेम असणारे वाचक नियमित वर्गणी भरतात. अनेकजण प्रसंग विशेष देणग्या देतात. दिवाळी अंकासाठीही जाहिरात रुपाने अनेकांचे सहकार्य मिळते. ही सर्व ‘किरात‘ची आपली माणसे आहेत. त्यांचे आभार मानलेले त्यांनाही रुचणार नाहीत. त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. पुढेही साप्ताहिक ‘किरात‘ कोकणातल्या समस्या मांडणारे व्यासपीठ राहील. तसेच नवीन सदरे, संक्षिप्त पण आशयघन मजकूर आणि नव्या विषयांसह आपल्यासमोर येत राहील. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.
सर्वांनाच नववर्ष २०११ च्या शुभेच्छा!
विशेष
तणावमुक्त जगण्यासाठी
तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश धुरींची लेख वजा मुलाखत प्रेरणादायी ठरेल.........
आयुष्यात आपण प्रत्येकजण सुखी रहाण्यासाठी झटत असतो. पण खरे तर आपल्या प्रत्येकाची अवस्था ही काखेत कळसा नि गावाला वळसा या उक्तीप्रमाणे झालेली आहे. कारण आपणच आपल्या आशा, अपेक्षांच ओझं इतकं वाढवलं आहे की त्यातून आनंदी जीवनात तणावग्रस्ततेकडे आपण आपोआपच वाटचाल करत असतो. रोजच्या बदलत्या आयुष्याचं स्वागत करणे म्हणजे मजेत जगणे. वरवर पाहता लिहीताना किवा वाचताना हे वाक्य किती सोप वाटत पण वास्तव जगताना .......? असो अगदी साध आणि ताज उदाहरण - पेट्रोल दर वाढलेत ते तर आपल्या हातात नाहीत मग चिडचिड किवा त्या विषयावरून काथ्याकूट करत बसण्यापेक्षा आपल्या गरजा मर्यादित ठेवून त्याचा आनंद कसा लुटता येईल हे महत्त्वाचं!
एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं. परिस्थिती प्रमाणे वस्तुची किमतही वाढते. हल्ली एका बॉलपेनला पैसे किती पडतात अगदी रुपयापासुन रस्तोरस्ती मिळतात. पण दहावीची परीक्षा आहे पेपर अगदी सोपा आहे अगदी ८० टक्के मार्क हमखास आहेत आणि पेनच सापडत नाहीये. अशावेळी सुपरवायझरने आपलं स्वतःच पेन आपल्याला दिलं तर त्या पेनाची किमत किती होईल? ह्याचाच अर्थ संकट ही आपल्याला सुदृढ बनवत असतात. त्यातून प्रगल्भता, सजगता या गोष्टींची जाणीव आपल्याला होत असते.
बालपणात पावसात भिजायला मिळावं म्हणून बहुतांशी मुलं आई-वडिलांच्या मनाविरूद्ध भिजत असतात. पण हिच मुलं जेव्हा मोठी होतात, व्यक्ती म्हणून लेबल त्यांच्यामागे येत तेव्हा लहानपणी मी खूप भिजायचो पण आता लाज वाटते किवा आपलं हे काय वय आहे का भिजायचं? असं म्हणून आपल्या आनंदावरच विरजण घालतात. तसंच काही व्यक्ती आपल्याकडे छत्री नाही म्हणून पावसात भिजायला झालं अशी चिडचिडही व्यक्त करतात. पण ह्यावेळी पावसात भिजण्याचा आनंद लुटला असं सांगणा-या मोजक्याच व्यक्ती भेटतात. काही व्यक्ती ह्या आनंददायी गोष्टींचाही ताण घेतात (eustress) उदा. बढती मिळणे, पास होणे,नवीन एखादी गोष्ट खरेदी करणं इ. तर काही काही व्यक्ती ह्या कुठल्याही मनाविरूद्ध घडणार्‍या गोष्टीचा ताण घेतात. (Distress) उदा. घरात किवा बाहेर भांडण, मिटींग कॅन्सल. थोडक्यात आपला हा ताण चिडचिडेपणा, अवस्थता, निर्णय घेता न येणे, व्यवस्थित झोप न येणे किवा एकाग्रता साधणे अशक्य होणं या माध्यमातून बाहेर पडतो. हे जे टेन्शन मनात असतं ते शरीरात दिसतं. आपल्या प्रकृतीतून, तब्येतीवरून, नाट्यातून बोलत, चिडचिड व्यक्त करून म्हणजेच काही वेळेला आपला ताण न बोलूनही समोरील व्यक्तीला कळतो तो आपल्या कृतीतून.
ताणतणाव वाढवणारे घटक हे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेंगळे असतील परंतु सर्वसाधारणपणे-
१) अपेक्षा पूर्ण करण्याची अक्षमता --
अगदी परीक्षेसाठी खूप अभ्यास केलाय पण वेळेत पेपर पूर्ण न झाल्याने कमी गुण मिळाले किवा जेवण करता करता अचानक गॅस संपला त्यामुळे वेळेत काम ओटोपली नाहीत किवा बॉसने आजच्या आजच काम पूर्ण करायला सांगितलय पण ऐनवेळी कॉम्प्युटरच बिघडला या सर्व उदाहरणा मध्ये व्यक्ती आपली प्रतिष्ठा कमी होईल ह्या न्यूजगंडातून आपलाच ताण ओढवून घेते.
२) आराम किवा उसंत न मिळणं --
काही व्यक्तींना उगीचच आपण किती कामात असतो या विषयावर अर्धा - अर्धा तास चर्चा करण्यात स्वारस्य असते त्यामुळे मी किती बिझी व टेन्शनमध्ये हे सांगून काय हलकेपणा मिळतो काय माहिती पण केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी किवा मीपणामुळे आपण केलेल्या कामाचा आपणच स्वतः कसा काय आनंद उपभोगू शकणार?
३) हाती असलेल्या कामाबद्दल नकारात्मक विचार
आपल्या मनाविरूद्ध आपण काम करत असू किवा त्या कामाबाबत मनात जमेल की नाही असे नकारात्मक भाव असतील तरीही मनावर ताण येतो काही वेळेस काम दुस-यावर सोपवलेले असेल तर ती व्यक्ती ते काम वेळेत पूर्ण करून देईल की नाही याबाबत किवा वेळेत देऊनही आपल्यापेक्षा वरचढ काम केलेले असल्याने त्या व्यक्तीबाबत असूया यातून आपण आपल्या जीवनात व्याधींना जवळ करतो.
४) सहकां-यांशी पुरेशी साथ नसणे --
हाती घेतलेल्या कामात सहका-यांची साथ अपेक्षित आहे पण पुरेशी मिळत नाहीय तर होणा-या कोंडमा-याचादेखील स्वतःच्या मनावर परिणाम होतोच. सहका-यांना धड बोलताही येत नाही व कामही पूर्ण करता येत नाही. हाताखालच्या माणसांना निदान चिडचिड व्यक्त करून काम करवून घेता येतं. पण याहीवेळी आपण आपली मानसिक स्थिती बिघडवूनच घेत असतो. प्रत्येक कामाची एक वेळ असते. त्या त्या वेळीच ती कामे होतात. अर्थात प्रयत्न आपल्या हातात आहेत ते न कंटाळता करणं एवढ मनात ठेवलं तरीही आपलं जीवन सुकर होईल.
५) आत्मविश्वासाचा अभाव --
आपल्या प्रत्येक कामाबाबत कमी आत्मविश्वासामुळे मानसिक ओढाताण करणारी कितीतरी माणसं दिसतात. आपण केलेल्या कामाबाबत परिपूर्णता, अचूकता कष्ट हे आपल्यालाच माहिती असतात. त्यामुळे त्या बाबत पूर्ण आत्मविश्वास राखायला काहीच हरकत नसते. पण त्याचबरोबर एखाद्याने कामाबाबत चूक दाखवली तर ती स्वीकारायचीही मानसिकता ठेवली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आत्विश्वासाचा अभाव धोकादायक तसा अति आत्मविश्वासही घातकच!
६) समवयस्क लोकांकडून येणारे दडपण --
नववधू जेव्हा पहिल्यांदाच स्वयंपाक घरात जेवण करण्यासाठी प्रवेश करते तेव्हा तिच्या मनावर प्रचंड दडपण असतं. पण रोजच्या सवयीने हे दडपण नाहिसं होतं. मात्र इतर कामात काही व्यक्तींना उगाचच कोणाच्यातरी सतत दडपणखाली वावरण्याची सवय असते. मग ते शिक्षक, आई-वडील, भावंड, शेजारी, अगदी आपल्या जवळचे सगळेच. आदरयुक्त भीती ही वेगळी परंतु सततच्या दडपणानेही आपली अवस्था आपण वाढवून घेत असतो.
७) कामाच्या बाबतीत स्वातंत्र्याचा अभाव --
काही वेळेला एखादं काम परिपूर्ण होऊनही ते पुढे जात नाही. उदाहरणार्थ एखादा लेख आपण लिहीलाय, आपल्याला तो वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर छापून हवाय पण तो आता शेवटच्या पानावर आलाय. केवळ त्यामुळे काहीजण उदास होऊन जातात. त्यामुळे केलेल्या कामाचा निव्वळ आनंद घ्यायचाच राहून जातो.
थोडक्यात ढासळलेला आत्मविश्वास, त्यामुळे कामात होणा-या चुका साहजिकच खालवलेल्या कामाच्या दर्जामुळे येणारे अपयश न्यूनगंड वाढवून ताणाच्या रुपात बाहेर पडतो. आयुष्यात आत्मपरिक्षण हे मानसिक जडणघडणीत खूप महत्वाचं ठरत. आपणच आपलं केलेलं सिंहावलोकन केलेल्या चुका टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात टर्निग पाँईट हे येतातच फक्त डोळस वृत्ती महत्त्वाची आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की रिकामा हा पहाण्याचा दृष्टीकोन जीवनाची वाटचाल यशस्वी व आनंदी बनवत असतो. कारण मन! मनाच्या बाबतीत त्याची रचनात्मक व्याख्या करता येणार नाही पण ती कार्यात्मक नक्कीच येईल. विचार मनात निर्माण होतात. जे आपल्या भावनांशी, संवेदनाशी निगडीत असतात. बुद्धीप्रमाणे आपण आपल्या स्मृतींमधून प्रेरणा घेऊन विवेकबुद्धीने परिस्थितीशी तारतम्याने वागण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एखादी गोष्ट किवा व्यक्ती मला हवी तशीच असली पाहिजे, या हट्टी मागणीला वस्तुस्थितीचा आधार नाही व त्यामुळे मनस्तापाशिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही. एखाद्याने आपल्याला उद्देशून शिवी दिली, विनाकारण जर मी तिचा उहापोह केला तर त्याचा मलाच त्रास होईल. पण दुर्लक्षच केले तर समोरच्याची वाक्ये हवेत त्याक्षणी विरून जातील.
थोडक्यात तणाव वाढविणारा दृष्टीकोन व कमी करणारा दृष्टीकोन पुढीलप्रमाणे सांगता येईल.
तणाव वाढविणारा दृष्टीकोन तणाव कमी करणारा दृष्टीकोन
१) इतर लोक मला त्रास देतात १) मी स्वतःच्या इच्छेने त्रास करून घेतो
२) प्रत्येक घटनेची प्रतिक्रिया २) प्रत्येक घटनेला कोणता
ठरलेली असते. प्रतिसाद द्यायचा हे निवडणे
आपल्या हातात आहे.
३) सुख हे बाह्य गोष्टीमध्ये ३) सुखदुःख हे बदलत
आहे ते सतत मिळालेच रहाणारे आहे. आनंद अंतर्यामी
पाहिजे. आहे.
४) आयुष्य हे निरर्थक व ४) प्रत्येकाच्या आयुष्याला
हेतूशून्य आहे. निश्चित अर्थ व उद्देश आहे.
५) विश्व म्हणजे कोणतीही ५) प्रत्येक कृतीचे परिमाण
कारण परंपरा नसलेली निश्चित ठरलेले आहेत प्रत्येक
अपघाताची साखळी आहे. घटनेला काही कारणं आहेत.
६) प्रत्येक कर्माचे फळ माझ्या ६) चांगल्या कर्माचे चांगले फळ
इच्छेप्रमाणेच मिळाले पाहिजे. फळ मिळणारच मात्र ते माझ्या अपेक्षेप्रमाणेच असेल असे नाही.
७) विकासासाठी सतत स्पर्धाच ७)परस्पर सहकार्यातूनही
आवश्यक आहे. विकास होत असतो.
८) मी कधीच चूक करीत नाही ८) माणसाकडून चूक होऊ शकते
माझ्या किवा इतरांच्या चुकीला ती परत होऊ नये यासाठी ती क्षमा नाही. मान्य करुन त्यातून शिकणे महत्वाचे.
९) कमीत कमी श्रमात ९) भान विसरून आवडीचे काम
अधिकाधिक उपभोग मिळाला करायला मिळणे व संयमित
पाहिजे हेच सुख आहे. उपभोग घेणे यात आनंद आहे.
कोणतीच व्यक्ती ही स्वतःच्या कामात परफेक्ट नसते. लहान असताना एखादी गोष्ट मोडली, तुटली तर त्याचं दुःख, राग तात्कालिक असतो, पण मोठेपणी तो मनात सतत रहातो. कारण नव्वद टक्के चांगल्या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा दहा टक्के वाईट गोष्टींनाच आपण महत्व देत रहातो. त्यामुळे काही वेळेला वेळ जाऊ द्यावा लागतो. जितक महत्व शब्दाला असत तितकच निःशब्दाला. कारण शांतता म्हणजे एकमेकांना दिलेला अवकाश व मुल्य म्हणजे मनाला स्थिर करणं हे होय. याचा अर्थ बोलण्यापासून दूर पळणे नव्हे. आवश्यक तिथे बोललंच पाहिजे संवाद साधला पाहिजे. पण हा संवाद साधण्याची पद्धत मनापासून असली की, त्याचे परिणाम निश्चितच चांगले मिळतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा आपणच केलेल्या पूर्वीच्या कामाशी केली तर नैराश्य पदरी पडणार नाही. त्यासाठी HAPPY WAY.
H-HEALTH - उत्तम आरोग्य असल्या शिवाय व राखल्या शिवाय आपण सुख-सुविधांचा उपभोग घेऊ शकणार नाही.
A-AWARENESS - जाणीव, सजगता.
आपल्या माणुसपणाच्या ताकदीची व मर्यादेची सतत जाण असणं म्हणजे आत्मभान.
P-POSITIVE THINKING - सकारात्मक विचार जे होत आहे त्यातून चांगल निघू शकत यावर विश्वास म्हणजे होकारात्मक विचार. यातूनच पॉझिटीव्ह कृतीला प्रेरणा मिळते.
P-PERCERVERANCE - चिकाटी
एकाग्रतेने काम करत रहाणं, अडचण आली असता प्रयत्न न सोडण.
Y-YOUTHFUL - जवानी - मनाचं तारूण्य आणि तारूण्य म्हणजे तरी काय? भरपूर उत्साह आणि जिद्द.
फक्त हे बदल आपल्याकडून एकाचवेळी व्हायला हवेत असा हट्ट न धरता आठवड्यातून काही तास स्वतःसाठी जगायला पाहिजे, योग्य आहार, व्यायाम, योगा, अभ्यास, मेडीटेशन, पार्लर व्हीजीट यात निव्वळ आनंदाचा स्पर्श आपण घेऊ शकतो. त्यात रमायला पाहिजे कारण --
नासक्या दुधाचा सुद्धा आपण पदार्थ करतो चविष्ट
मग छोट्याश्या अपयशाने आयुष्य का करायचं नष्ट?
मुळातच हे आयुष्य मिळतं आपल्याला एकुलत एक
म्हणून सगळ्यांनी हसत – खेळत घ्यायचा त्यात आनंदाचा केक.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मध्वानुभव
नमस्कार! १-१-११ या वैशिष्ठपूर्ण अंकानी सुरुवात होणा-या इंग्रजी नववर्षाच्या, सर्व वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा! येणारे वर्ष ‘‘मनोकामना‘‘ पूर्ण करणारे जावो ही परमेश्वरापाशी प्रार्थना.
१५ मार्च २००७ पासून ‘स-सु-लि‘ या सदराच्या माध्यमातून आपणा सर्वांशी यथामति संवाद साधला. ब-याच वाचकांनी फोनद्वारे, पत्राद्वारे लेखनाचे कौतुक केले. त्यामुळे उत्साह दुणावला आणि स-सु-लि साठी उर्जा मिळत गेली. आणि किरात किती सर्व दूर पोहोचतो याचाही प्रत्यय आला. या सर्व संवादी वाचकांचे मनःपूर्वक आभार! आता सन २०११ पासून स-सु-लि ऐवजी मध्वानुभव (मधुचे अनुभव) या शिर्षकाने लेखनाचा प्रयत्न करणार आहे. ‘स-सु-लि‘ प्रमाणेच संभाळून घ्या, ही विनंती.
सन २०११ कसे जाईल हे सांगण्यास भविष्यकथनाची गरज नाही. महागाई अस्मानाला भिडेल, घोटाळ्यांची संख्या, व्याप्ती वाढेल, शिक्षण घेणंही सामान्यांना परवडणार नाही, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी रुंदावेल, रस्ते चौपदरी, सहापदरी सुद्धा होतील त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढेल, घरा-घरातून ‘चिअर्स‘ असे शब्द ऐकू येऊ शकतील हे असं (वि)चित्र दिसणारं असलं तरीही आशावादी राहून चांगलंही काही घडेल असं म्हणूया. ज्या भूमीत विवेकानंद, गौतमबुद्ध संत ज्ञानेश्वर, प्रभू रामचंद्र, ‘श्रीकृष्ण‘ जन्मले त्यांच्या पुण्याईने आशीर्वादाने जगणं सुसह्य होईल. जगताना ‘अर्जुन‘ होण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. येतील. मार्गदर्शनार्थ गीता सांगणारा श्रीकृष्ण भेटणे महत्वाचे! (व. पु. काळे यांचे ‘आम्ही सारे अर्जुन‘ हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना मला काय म्हणायचय हे कळेल!)
वास्तविक संपादकांचा ताण-तणाव या विषयावर काही लिहा असा निरोप होता. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात ‘‘ताण-ताणाव‘‘ ही गोष्ट अपरिहार्य आहे. या विषयावर वृत्तपत्रातून, टि. व्ही वर विविध पुस्तकांमधून मार्गदर्शनपर खूपच लिहिले. सांगितले, दाखवले जाते त्यांमुळे ताण-तणावावर काय लिहायचे याचाच मला ‘ताण आला‘! सध्याच्या युगात परमेश्वरालाही ताण येत असेल कारण भक्त (म्हणविणा-या) मंडळीचे वर्तन !!! वाचकहो, तुम्हीच सांगा, सर्व आयुष्य फकिरावस्थेत काढलेल्या साईबाबांना सोन्याच्या सिहासनावर बसून ‘ताण‘ येत नसेल कां? भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या ‘‘देणगीच्या पैशाचा विनियोग?‘‘ पाहून कुठला देव तणावमुक्त अवस्थेत असेल का? एकूणात ताण-तणावापासून परमेश्वरसुद्धा मुक्त नसावा.
व्यक्तिगत सांगायचे तर उत्तम पेन्शन मिळत आहे, (अजूनतरी) प्रकृती धडधाकट आहे, मुलं - बाळं संसारात रमली आहेत. असं सगळ छाऽऽन असताना ‘टेन्शन‘ येण्याचं कारण नाही. पण आजूबाजूला घडणा-या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की टेन्शन येतंच! आता टेन्शनचे टेन्शन किती घ्यायचे? हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न! टेन्शनवर उतारा म्हणून काय आणि किती घ्यायचे हाही ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग!!!
मध्यंतरी ‘आदर्श‘ या शब्दाचेच मला टेन्शन येत होते. उतारा म्हणून मी आदर्श हा शब्द जेथे दिसेल अशी ठिकाणे टाळत असे. उदा. विविध आदर्श पुरस्कार विजेत्या व्यक्ती, आदर्श वस्त्र भांडार आदर्श रेस्टॉरंट, ‘आदर्श‘ राजकारण्यांच्या सभा इत्यादि. ‘आदर्श‘ या शब्दाचे टेन्शन जाण्यासाठी मी आजूबाजूला घडलेल्या ‘स्कॅम‘ची मुळाक्षरेच तयार केली. अगदी ऋृ टू झ् नाही जमली. पण ३०.३५ टक्के यश आले. म्हणजे बघा हं!
ऋृ ढदृद्ध आदर्श, ए ढदृद्ध बोफोर्स, क् ढदृद्ध कॉमनवेल्थ, क् ढदृद्ध डेव्हलपमेंट ऑफ एनी लँड, क ढदृद्ध एन्रॉन, ख्र् ढदृद्ध लवासा, ग् ढदृद्ध म्हाडा, घ् ढदृद्ध प्रॉव्हीडंड फंड, च् ढदृद्ध स्पेक्ट्रम - - - - -, झ् ढदृद्ध झोपु - योजना!!!
मी मनाला बजावलं, इतके सारे ‘घोटाळे‘ होत आहेत त्यात‘आदर्श‘चं एवढ काय लावून घेतोस? माझ्या मनाचीही समजूत पटली. (मनाचे श्लोक म्हणत मी झोपलो सुद्धा!!!)
तर टेन्शन जाण्यासाठी अमुक एक उपायच लागू पडेल असं नाही सांगता येणार. हलकं-फुलकं वाचन, संगीत, एखादं वाद्य ऐकणे, येत असल्यास वाजवणे, विनोद सांगणे-ऐकणे, दिलखुलास गप्पा मारणे, रमणीय ठिकाणी सहलीला जाणे, जुन्या काळातील सुखद गोष्टींचा ‘स्मरणरंजनी आनंद‘ घेणे अशा काही उपायांनी मला ‘गुण‘ येतो. अर्थात हे सर्व काही ‘रामबाण‘ उपाय नव्हेत. ज्याच्या त्याच्या प्रकृती गुणाधर्मानुसार कमीजास्त परिणाम दिसणार.
तर मंडळी ‘टेन्शन‘ बाबत फारसं टेन्शन घेण्यात अर्थ नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. ज्या गोष्टी आपल्या कर्मानेच आपण निवडल्या आहेत. उदा-राज्यकर्ते, जीवनशैली, त्याचे भोग-परिणाम याची जबाबदारी आपलीच असते. त्या आहेत तशा ‘स्विकारणे‘ हा सुद्धा एक ‘उपायचं‘ आहे बरं कां!!! सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या तर आयुष्य बेंचव, अळणी, मिळमिळीत होईल. थोडा फार तरी संघर्ष हवाच. पतंग उडवण्याची मजा घ्याची असेल तर दोरा (मांज्या) ढिला केव्हा सोडायचा, ताण केव्हा घ्यायचा हे अनुभवानीच कळते. ‘बाण‘ लक्ष्यावर अचूक मारायचा असेल तर धनुष्याचे प्रत्यंचेला ‘ताण‘ द्यावाच लागतो. किरात कारांनाही हा अनुभव आहेच आयुष्याच, संसाराच सुद्धा असंच असावं. किती आणि केव्हा ताणायचं हे ज्याला उमजलं त्याची जीवन नौका (टेन्शनचा बाऊ न केल्यास) किना-याला लागणार हे निश्चित!
श्री. मधुकर घारपूरे, सावंतवाडी
-----------------------------------------------------------------------------------------------------------

व्यवस्थापन ताण-तणावाचे
अलिकडे काही वर्षात ‘ताण-तणाव‘ हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. ताण-तणावाशिवाय माणूस असूच शकत नाही अशी सर्वसाधारण समजूत झालेली आहे.
ताण-तणाव म्हणजे मनाला लागून राहिलेल्या चिता किवा काळज्या कोणीतरी म्हटले आहे की, काळजी करु नका, काळजी घ्या अर्थात ह्या वचनाचा अर्थ वेगळा सांगायची जरूरी नाही.
ताण-तणावाचे टेन्शन हे एक आधुनिक रुप आपल्या आजूबाजूला आपल्या परिचयाचे कुणी आपल्याशी बोलताना आपल्याला अमुक अमुक गोष्टींचे टेन्शन आहे, त्यामुळे माझी शांती हरवली आहे, अशा प्रकारे काहीतरी सांगतात. अशा प्रकारे टेन्शन घेणारे लोक पुष्कळ दिसतात. मला तर वाटते की ही एक फॅशनच होऊन बसली आहे. ह्या माणसाना कसले ना कसले तरी टेन्शन हवेच असते. अशी माणसे आपल्या टेन्शनची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगताना दिसतात. त्यांना हे कळत नाही, की त्या टेन्शनमुळे आपली सुखशांती आपल्यापासून दूर गेली आहे. त्यामुळे काही लोकांच्या तब्येतीवर ह्या टेन्शनमुळे परिणाम होतो. कधी कधी त्याचा अतिरेक झाल्यामुळे मोठ्या आजारालादेखील त्यांना तोंड द्यावे लागते. हे ‘ताण-तणाव‘ आपणच आपल्यामागे लावून घेतो. आपणच त्यांना गोंजारतो आणि ते आपल्या मनावर अधिराज्य करतात. खरंतर अस होता कामा नये आपल्या मनाचे स्वामी आपणच असतो. ह्या ताणतणावाना आपण जवळ करून आपले मन त्यांच्या स्वाधीन करतो आणि त्यांच्या आहारी जातो. मग ते आपल्या शरीराचीही नासाडी करायला वेळ लावत नाहीत. काही लोकांना ह्या टेन्शनपायी रात्रीची झोपदेखील येत नाही.
काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचेदेखील टेन्शन येते उदाहरणार्थ गाडीला उशीर झाला, त्यामुळे आता कामावर जायला उशीर होणार, साहेबांची बोलणी ऐकावी लागणार. वगैरे. तुम्ही जर आपल्या कामात चोख असाल तर साहेब एवढ्या तेवढ्या कारणावरून तुम्हाला धारेवर धरणार नाहीत.
कधी कधी गैरसमजामुळे एखाद्या व्यक्तीला ताण निर्माण होतो. अशावेळी तो दूर करण्याचा प्रयत्न केल्यास तणावही लगेच दूर होतो.
कधी कधी एखादी आई आपल्या मुलीबद्दल सांगते, हिला परीक्षेचे टेन्शन येते आणि ती परीक्षेच्या तोंडावर आजारी पडते.
अशा परिस्थितीत आईने मुलीला त्या टेन्शन पासून दूर रहाण्यासाठी काही हिताच्या गोष्टी सांगायला हव्यात वर्षभर त्या मुलीने चांगला अभ्यास केलेला असेल, तर तिने ऐन परीक्षेच्या वेळी टेन्शनचया आहारी जावून आपले नुकसान करून घेऊ नये. तिला परीक्षेची भिती न वाटता आपल्या केलेल्या अभ्यासाचा तिला आत्मविश्वास वाटायला हवा.
एकंदरीत ताणतणाव टेन्शन यांच्या आहारी न जाता प्राप्त परिस्थितीला धीराने तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार माणसाने स्वतःच करायचा आहे. हेच त्याचे ताणतणावाचे स्वतःचे व्यवस्थापन असते.
-- वीणा मोये, अंधेरी, मुंबई
फोन-०२२-२८३८१७६९
-----------------------------------------------------------------------------------------------------------
शुभ कल्पना
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात तळवडे या गावात यज्ञनगर ‘नेचर क्युअर‘ हे निसर्गोपचार केंद्र डॉ. सौ. रोहिणी रविद्र वाडेकर यांनी अनेक वर्षापूर्वी सुरू केले आहे. शहरी सुखवस्तू जीवन सोडून त्या आपले पती रविद्र आणि कन्या डॉ. पल्लवी यांच्यासह पाचल जवळच्या या खेडे गावात हे निसर्गोपचार केंद्राद्वारे रुग्णसेवा करीत आहेत. शेकडो रुग्ण या केंद्रात उपचार घेऊन बरे झाले आहेत. निसर्गोपचार पद्धतीची लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी ‘आरोग्य जीवन‘ नावाचे एक मासिक सुरू केले आहे. त्यामध्ये शारिरीक आणि मानसिक स्वास्था संबंधी निसर्गोपचार प्रबोधन केले जाते. या केंद्राशी संफ साधण्या करिता पत्ता पुढीलप्रमाणे- यज्ञनगर नेचर क्युअर (निसर्गोपचार केंद्र), तळवडे (पाचलमार्ग) राजापूर, जि. रत्नागिरी -१६७० दूरध्वनी -०२३५३ - २२३४८६ / २२३५८६ भ्रमणध्वनी - ९४२३८५५८१५/८३५या आरोग्यजीवन मासिकाची वार्षिक वर्गणी ३०० रु. आहे. (लोकांच्या माहितीसाठी या मासिकातील काही उपयुक्त लेख संपादकाच्या सौजन्याने किरात मधून क्रमशः प्रसिद्ध केले जाणार आहेत.)
काही लोक शरीराने आजारी असतात, तर काही मनाने. परंतु आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात शरीराने आजारी असणा-यांपेक्षा मनाने आजारी असलेले तुलनेने अधिक असतील. आपल्या आजुबाजुला मनाने आजारी असलेल्या या व्यक्ती निरोगी होऊ शकतात. त्यासाठी स्वतःच्या जीवनाप्रती असलेला नकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कायमचा बदलायला हवा.
जे लोक इतरांचे चांगले व्हावे असा विचार करतात किवा शक्य असल्यास इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करतात, ते फक्त इतरांनाच मदत करीत नाहीत तर त्यावेळी ते आपले शरीर आणि आत्मा यांचे आरोग्य अबाधित राखत असतात. इतरांना मदत करण्याची कल्पना आणि प्रत्यक्षात केलेली कृती यामुळे शरीरात होणा-या रासायनिक बदलांमधून तयार होणारे रसायन म्हणजे एक प्रकारचे औषधच असते. जे शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी उपयोगात येते. दुस-यांना मदत करताना जर आपण स्वतःला विसरलो तर रोगाची तीव्रता कमी होऊन ते बरे होण्यास मदत होते. दुस-याचे भले चितिल्यामुळे आणि प्रत्यक्षातील कृतीमुळे आपल्याला संतोष आणि आरोग्य प्राप्त होते.
परोपकाराचा आनंद मनाला उत्साही अवस्थेत ठेवतो आणि हाच उत्साह सा-या नैराश्याला दूर करून शरीराला योग्य अवस्थेत ठेवतो. उपकार करणा-या व्यक्तीचा चेहरा आनंदाने चमकतो. त्याच्या मुद्रेवर आत्मविश्वास आणि उच्चकोटीच्या समाधानाच्या भावनांचे दर्शन होते. याउलट स्वार्थी माणसाचा चेहरा उतरलेला, कोणत्यातरी मानसिक दबावाखाली असलेला व रंग उडालेला दिसतो. मनातील कुटील विचारांचे सावट चेह-यावर दिसते. सतत स्वतःसंबंधी आणि स्वार्थी विचार करीत राहणे म्हणजे कायम आजारांची सोबत राखणे होय. इतरांसाठी व्यक्त केलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आजारांना दूर ठेवण्यासाठी एखाद्या औषधी रसायनाचेच काम करतात. अशाप्रकारे शुभ इच्छिल्यामुळे इतरांचे सहाय्य कायम स्वरूपी प्राप्त होत राहते आणि आनंदमय जीवनाचा अनुभव मिळतो.
आजच्या विश्वात कष्ट करणा-यांची कमतरता नाही. प्रामाणिक कष्ट यश आणि आनंद मिळवून देतात. तर कधी कठीण प्रसंग आणि दुःख सुद्धा देतात. आनंद आणि दुःख यांची मालिका अशीच सुरू राहते. पण जे लोक यापैकी दुःखद अनुभवांच्याच कल्पनांचाच विचार करत राहतात ते आपल्या कष्टांना दुप्पटीने वाढवतात. विपरीत अवस्थेत किवा कठीण प्रसंगी आपण या प्रसंगातून वाचणार नाही असा विचार करून स्वतःला अभागी आणि दुर्दशाग्रस्त समजतात. या गोष्टींच्या परिणामांची सावली त्यांच्याबरोबर असणा-या आप्तस्वकीयांवर सुद्धा पडते. जीवन त्यांच्यासाठी एक अवजड ओझे बनते. ही अत्यंत वाईट आणि गंभीर समस्या आहे. ती आपण बदलू शकतो. त्यासाठी विचार योग्य रितीने करण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम करावे लागतील.
चुकीचे आचार-विचार आणि आजार यामध्ये कार्यकारण संबंध असतो. आपल्या शरीरातील स्नायू आणि पेशींचे जाळे अनंत अशा वायुमंडलांनी प्रभावित असते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एक छोटेसे ताररहीत संदेश परिवहनाचे तारघर असते. जेव्हा व्यक्ती चुकीची विचारधारा अवलंबिते तेव्हा ती चहुबाजूंनी स्वतःला तशाच प्रकारच्या चुकीच्या विचारांशी संबंध प्रस्थापित करते. हे रेडिओ किवा दूरदर्शन संचाच्या चॅनलच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करीत असते. हताश आणि निराश झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ती स्वतःही हताश आणि निराश होते.
जेव्हा व्यक्ती स्फुर्तिदायक विचार करते तेव्हा ती सशक्त आणि संतुलित विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येतेच. अनिष्ट आणि स्वार्थी विचारांच्या परिणामामुळे शरीरातील ग्रंथींवर परिणाम होऊन संपूर्ण रक्तप्रवाह विषाक्त होतो. म्हणूनच अशा विषासारख्या गोष्टीपासून वाचण्यासाठी सर्व धर्मामध्ये दया, बंधूभाव व विश्वप्रेमाची शिकवण आहे. दुस-यांचे भले केल्यास आपले सुद्धा भलेच होते. निखळ प्रेमाचा, मायेचा प्रभाव स्वतःसाठी रोगनिवारण म्हणून सिद्ध होतो. हा गुण रहस्यमय नसून त्याचा संबंध केवळ ग्रंथींच्या स्थूल कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता चुकीच्या विचारांमुळे येते. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख अधिक त्रासदायक ठरते. अशुभ कल्पना रोग निर्माण करतात आणि व्यक्तीला जन्मभर रोगी बनवून ठेवतात. परंतु याच व्यक्ती शुभ कल्पनांच्या विचारांनी स्वतःला आणि त्यांच्या मनाला निरोगी आणि स्वस्थ बनवू शकतात.
शुभ कल्पनांचे विचार आपल्या मनात सतत येण्यासाठी म्हणजेच मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रार्थना, ध्यानधारणा, प्राणायाम आणि शरीराची क्षमता सकारात्मक बनविण्यासाठी व्यायाम, योगासने तसेच शरीराच्या अंतर्गत शुद्धीसाठी निसर्गोपचार जीवनशैलीचे आचरण व वायुमंडल शुद्धीसाठी नित्य अग्रिहोत्र यज्ञविधी यांचा अवलंब केल्यास आपले जीवन सुखी, आनंदमय आणि आरोग्यपूर्ण होईल.
स्वामी रवी आनंद
-----------------------------------------------------------------------------------------------------------
अण्णासाहेब गावडे - दानशूर उद्योजक
ऐतिहासीक महत्व प्राप्त असलेल्या गावडे घराण्याकडे इंग्रज राजवटीत तालुक्याची फौजदारीची (पोलीस पाटील) सूत्रे होती. त्यावेळचे न्यायनिवाडे हे येथूनच चालत असत. परंतु मायनिग व्यवसाय हा पीढीजात आजोबांच्या कारकीर्दीपासून आजही व्यवसायाच्या व्याप्तीतून अधिक प्रगतपणे चालू आहे. या पी. झेड. गावडे उद्योग समुहाचे चेअरमन प्रभाकर (अण्णा) झिलाजी गावडे हे एक मायनिग व्यवसायातील टायचून होते.
वेंगुर्ल्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रभाकर गावडे हे हसतमुख, प्रसन्न, कायद्याचे जाणकार तसेच मायनींग व्यवसायाला औद्योगिकदृष्ट्या अधिक उंची प्राप्त करुन देणारे दानशूर व्यक्तीमत्व होते. शासन कसे चालवावे याचे घरातच धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाल्याने ते शिस्तप्रिय होते. त्याचा फायदाही त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी झाला. त्यांचे वडील झिलाजी पांडुरंग गावडे बाबू फौजदार या नावाने परिचित होते. त्यांना प्रभाकर व रावजी ही दोन मुले. यातील प्रभाकर हे वेंगुर्ल्यात वडिलांसमवेत राहिले. तर रावजी हे मुंबई वरळी येथे स्थायीक झाले. त्यांनी त्या ठिकाणी वरळी आदर्श सेवा समितीची स्थापना केली व शिक्षण, सामाजीक क्षेत्रात फार मोठी गरुडझेप घेतली. रावजी झिलाजी गावडे यांनी १९५० साली मुंबईतच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शाळा काढल्या.
एकोणीसशे सालापासून सिलीका व्यवसाय दाभोली-लोखंडेवाडी येथे सुरु होता. त्यावेळी वेंगुर्ल्यात मुख्यत्वे बंदराच्या भरभराटीच्या दिवसात वेंगुर्ले बंदर हे आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रमुख व्यापारी बंदर असताना त्यांची सिलीका ही या बंदरातूच मुंबई, गुजरात येथे जात असे. या व्यवसायाबरोबरच झिलाजी गावडे यांच्याकडे त्यावेळच्या वेंगुर्ले तालुक्याची सीमेपर्यंतची पोलीस फौजदारी होती. आताच्या मालवण तालुक्याच्या कोरजाई, सावंतवाडीच्या आजगांव, तेरेखोल या हद्दीपर्यंत न्याय निवाड्याचे काम हे याच गावडे घराण्याकडून चालत होते. झिलाजी गावडे यांच्याकडे इंग्रज सरकारने फौजदारीचा राजघराण्यातील मानाचा पट्टा व तलवार दिली होती. इंग्रजांच्या काळात घोड्यावरुन प्रवास करावा लागे. इंग्रजांच्या काळापासून या गावडे घराण्याकडे श्री देवी तुळजाभवानीची गौरी चतुर्थीच्या कालावधीत आजही पारंपारीक पद्धतीने पूजा होते.
प्रभाकर उर्फ अण्णा गावडे यांनी त्यावेळचे जॉर्ज इंग्लिश स्कूल आताचे पाटकर हायस्कूल येथे त्यावेळचे अकरावी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांचे इंग्रजी, संस्कृत, मराठी व कायदा या विषयावर प्रभुत्व होते. त्यांनी वडीलांचे शासनाचे काम व व्यवसाय जवळून पाहिला आणि आत्मसात केला होता. शालेय शिक्षणानंतर अण्णांनी व्यवसायाकडे लक्ष दिले. सिलीका सँडला औद्योगिक दृष्टिकोनातून कोणता उपयोग होवू शकतो यावर त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. यातच अण्णांनी १९५० साली सी सँडला सिलीका सँडचा दर्जा देण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोसकर यांच्याकडे या वाळूचा पॅटर्न पाठवून तो यशस्वी केला. त्यावरच ते थांबले नाहीत तर सी सँडला मिनरल्सचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे या नव्या प्रयोगाचा प्रस्ताव सादर करुन दर्जा मिळवून दिला व यातून शासनास रॉयल्टीद्वारे कशाप्रकारे उत्पन्न मिळू शकते याचा लेखा जोखा सादर केला. त्यामुळे पूर्वी टाकावू वाटणा-या समुद्री वाळूला एक वेगळा दर्जा मिळवून दिला. यातूनच पी. झेड. गावडे उद्योग समुहाची निर्मिती झाली. हा पॅटर्न एवढा प्रसिद्ध झाला की, शरद पवार यांचे बंधू उद्योगपती आप्पासाहेब पवार यांनीही या मिनरल्स सँडचा वापर आपल्या उद्योगामध्ये करुन घेतला.
या व्यवसायाची व्याप्ती एवढी वाढत गेली की, आज महाराष्ट्र, गुजरात (सील्व्हासा), कर्नाटक येथे पी. झेड. गावडे मिनरल्स सँडचा लौकिक आहे. आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा, केरळ या किना-यावर मुबलक प्रमाणात वाळू आहे. परंतु वेंगुर्ले किना-यावरील वाळू ही अधिक दर्जेदार असल्याचे पी. झेड. गावडे यांनी यापूर्वीच जाणले होते. हा त्यांचा व्यावसायीक दृष्टिकोन ही जमेची बाजू आहे.
पी. झेड. गावडे यांनी आपल्या मायनींग व्यवसायातील पुढचे पाऊल टाकण्यासाठी या कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग निर्माण करावा ही खुणगाठ मनाशी बाळगली होती. त्यातून त्यांनी १९९० साली कोल्हापूर येथे केमीकल रॉ मटेरीयल प्रक्रिया करणारे उद्योग ‘कोहीनूर इंडस्ट्रीज‘ युनिट १ व २ यांची निर्मिती केली. यापूर्वीच सिलीका व्यवसायात ‘साई समर्थ रोड लाईन्स‘ या व्यवसायाचे जाळे दूरवर पसरले होते. पी. झेड. गावडे यांचे सुपूत्र विलास गावडे यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर वडिलांच्या या व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत केले. त्यातून या व्यवसायाला अधिक व्यापक बनविण्याच्या हेतूने साई समर्थ स्टील इंडस्ट्रीज नावारुपास आली. त्यानंतर अलिकडेच २००९ मध्ये ‘अथर्व सिमेंट‘ कंपनीची निर्मिती करण्यात आली. याद्वारे कच्च्या मालावर प्रक्रिया हे त्यांचे स्वप्न त्यांनी आपल्या मुलांना व्यवसायात घेऊन सत्यात उतरविले. ज्यावेळी जागतीक बाजारपेठेत स्टिल उद्योगाला घरघर होती त्यावेळी पी. झेड. गावडे यनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज स्टील उद्योग भरभराटीच्या दिशेने आहे. ही त्यांची उद्योगाची दूरदृष्टी यातून दिसून येते. या उद्योगाबरोबरच कोल्हापूर येथे बॉक्साईट माईन्स, कर्नाटकमध्ये लाईनस्टोन हे उद्योगही सुरु केले. त्यांची उद्योगक्षेत्रातील ही नेत्रदिपक भरारी ही केवळ आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांना लाभली. ते वडिलांनाच दैवत मानत. पहाटे उठून मंत्रघोष हा त्यांचा नित्यक्रम. यानंतर ते आपल्या व्यवसायात लक्ष घालीत असत. वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपूत्र विलास गावडे यांनीही आपल्या वडिलांनाच दैवत मानले. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे अण्णांचे शांतीधाम स्मारक उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ते त्यांना नेहमीच यशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
पी. झेड. गावडे यांनी व्यवसायातून समाजकारण व राजकारणही साधले. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पूर्वी काँग्रेस नेत्यांच्या सर्व बैठका पी. झेड. गावडे यांच्या निवासस्थानीच होत. जिल्ह्याचे राजकारण येथूनच चालविले जाई. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, भाईसाहेब सावंत, एस. एन. देसाई, माजी विरोधी पक्षनेते अॅड. दत्ता पाटील, कर्नल सुधीर सावंत, जयानंद मठकर, पुष्पसेन सावंत, प्रविण भोसले, अॅड. गुरुनाथ कुलकर्णी असे दिग्गज नेते त्यांच्या निवासस्थानी चर्चेस येत. औद्योगिक क्षेत्रात त्यांचा शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांच्याशी गेली चाळीस वर्षे कौटुंबिक संबध तर शंतनुराव किर्लोसकर व बी. एम. गोगटे यांच्याशी औद्योगिक संबंध होते. राजकारणाबरोबर समाजकारण करतांना बहुजनांचा आदर मानत त्यांनी कोणताही भेदभाव व प्रसिद्धीची आस न बाळगता सहभागी होत. मदत करीत. त्यांचा दूरदूरवर पसरलेला व्यवसाय याचा त्यांनी कधी गर्व केला नाही. त्यामुळेच ते घरात सर्व सुखसोयी असतानाही आपल्या मित्रासमवेत रिक्षाने प्रवास करत. यातून ते समाजाशी किती बांधील होते हे स्पष्ट होते. एका कोकणी माणसाने आपल्या व्यवसायाची व्याप्ती दक्षिणोत्तर नेऊन आजच्या पिढीला प्रेरणा दिली आहे. अण्णा आज जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्यातील दूरदृष्टी, श्रम, प्रतिष्ठा, दातृत्व यांचा आदर्श प्रत्येकाला जीवनात मार्गदर्शक ठरु शकतो.
शब्दांकन - सुरेश कौलगेकर
९४२०७४२२५८
Email ID – sureshkoulagekar@gmail.com

No comments:

Post a Comment