Saturday 9 October, 2010

अंक ३५वा, २३ सप्टेंबर २०१०

किरात साप्ताहिक

संपादकिय

पर्यटन महामंडळाचे खाजगीकरण

२७ सप्टेबरला जागतिक पर्यटन दिन. या निमित्ताने सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणा-या व करु इच्छिणा-यांची एक सभा सिधुदुर्गनगरीत होणार आहे. अनेकजण या सभेत आपले विचार मांडतील. पर्यटन जिल्हा होऊन एक तप उलटले तरी सिधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही पायाभूत सोयींचा अभाव का? हा प्रत्येक वर्षी सरकारला विचारला जाणारा प्रश्न याहीवेळी विचारला जाईल. त्यावर सरकारचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर ते यातील आपल्या अडचणी तरी सांगतील किवा काही थातुर-मातूर आश्वासने देतील. प्रत्यक्षात काहीच होणार नाही.

सिंधुदुर्गची तुलना नजिकच्या गोवा राज्याशी केली जाते. परंतू गोवा हे राज्य स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांची वसाहत होती. हिंदू संस्कृतीच्या अंगभूत सामर्थ्यामुळे गोव्यात हिदू संस्कृती टिकून राहिली तरी ख्रिश्चन धर्मियांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होता व अजूनही आहे. पूर्वी पोर्तुगीजांची वसाहत असल्यामुळे गोव्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पूर्वीपासूनच होता आणि जागतीक पर्यटन नकाशावर गोव्याला पूर्वीपासून स्थान होते.

गोवा भारतात विलीन झाल्यावर तेथील संस्कृती, जीवनशैली (म्हणजे पाश्चात्य) जपली जाईल असे आश्वासन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी तेव्हा दिले होते. स्वतः जवाहरलाल पाश्चात जीवनशैली अंगिकारलेले, त्यामुळे त्यांचे आश्वासन म्हणजे आज्ञाच होती. परंतू त्यामुळेच महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष बहुमताने सत्तेवर येऊनही जनतेच्या सार्वमतात गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही. केंद्रशासित प्रदेश राहिला आणि नंतर त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. असो-हे थोडे विषयांतर झाले.

मुख्य मुद्दा पर्यटनामुळे विकसित झालेल्या गोव्याप्रमाणे पर्यटन प्रवण सिधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होईल काय? होकारार्थी उत्तर देणारे म्हणतील गोवा आणि सिंधुदुर्ग सख्खे शेजारी आहेत. गर्दीच्या हंगामात गोव्यात रहायला जागा मिळत नाही म्हणून, किनारे अस्वच्छ म्हणून किवा शहरी गजबजाटापासून दूर रहावे म्हणून गोव्यात येणारे देशी-विदेशी पर्यटक सिधुदुर्गातही मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. दोन्हीकडे भरपूर वनराई आणि सुंदर किनारपट्टी आहे. उघडपणे बाटलीची आणि छुपेपणाने बाईचीही सोय दोन्ही ठिकाणी आहे. पण ही काही मोजकी साम्य सोडली तर गोवा आणि सिधुदुर्गाच्या पर्यटन विकास प्रक्रियेत फार मोठे अंतर आहे आणि ते बरेचसे सरकारी नाकर्तेपणामुळे निर्माण झालेले आहे.

हा सरकारी नाकर्तेपणा कधी संपणारा नाही. तेव्हा केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे अनेक सरकारी उद्योगांचे जसे खाजगीकरण झाले. तसे पर्यटन महामंडळाचेही खाजगीकरण झाले पाहिजे. नाहीतरी पर्यटन महामंडळ हे एक मर्यादित क्षेत्र आहे. वर्दळीच्या पर्यटन क्षेत्रीच ते थोडेफार नफ्यात असते. अन्यत्र तोटाच तोटा! अधिकारी आणि कर्मचा-यांचे पगार मात्र चालूच. - आता वेतनवाढ आयोगामुळे ते फायद्यातच! - पर्यटन महामंडळ आणि खाजगी पर्यटन सेवा यांच्या दरात फारशी तफावत नाही. उलट खाजगीकरणामुळे खाजगी सेवेत स्पर्धा वाढून सर्वसामान्य जनतेला परवडणा-या दरात पर्यटन करता येईल ही शक्यताच जास्त.

पर्यटन व्यावसायीकांना पर्यटन महामंडळ हे एक असून अडचण आणि नसून खोळंबा ठरलेले आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या या पर्यटन महामंडळाचा मक्ता एखाद्या पर्यटन क्षेत्रातील अनुभवी उद्योग समुहाकडे दिला तर त्याच्या माध्यमातून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा (उत्तम रस्ते,पाणी,वीज इ.) जलदगतीने आणि दर्जेदार होतील. पर्यटन व्यवसायासाठी विविध प्रकारचे परवाने, सवलती संबंधीत व्यावसायीकांना विनाविलंब मिळतील. मोठ्या हॉटेल्स बरोबरच छोट्या प्रमाणावर निवास, न्याहारी योजना राबविणा-या व अन्य प्रकारच्या सेवा देणा-यांना रोजगार मिळेल. तेव्हा सिधुदुर्गचा पर्यटन विकास घडवू पाहणा-यांनी पर्यटन महामंडळाचा हा अडथळा दूर करण्यास प्राधान्य द्यावे यासाठी लोकप्रतिनिधींचेही सहाय्य घ्यावे हे झाले. तरच आपला पर्यटन सिधुदुर्ग जिल्हा गोव्याप्रमाणे जागतिक नकाशावर येऊ शकेल.

अधोरेखित

अजुनही गावकुसाबाहेर

गेली ३० वर्षे कातकरी (वानरमारे) समाजातील दहा ते बारा कुटुंबे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-खरी भागात राहत आहेत बरीच वर्षे एकाच ठिकाणी राहत असूनही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा ही कुटुंबे आजही पूर्ण करु शकत नाहीत. गेली ३ वर्षे सातत्याने या वस्तीवर गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो. पण यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. आपली समाजव्यवस्थाही त्यांच्या पुढच्या पिढीला मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला तयार नाही हे जळजळीत वास्तव एका घटनेने पुढं आलंय.

कातकरी समाजाची मुले शिक्षणापासून वंचित

जून २०१० मध्ये केंद्राचा सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा कायदा आला. या वस्तीवर १५ ते १६ शिकण्याचं वय असलेली मुले आहेत. त्यांना शिक्षणाची सक्ती करणे तर सोडाच पण शाळेत जाण्याची इच्छा असलेल्या या मुलांना मुख्याध्यापकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे. शाळेत जात नसल्याने पोषण आहार मिळत नाही. बहुसंख्य मुले कुपोषणग्रस्त आहेत.

मुलांना प्रवेश देण्यास तांत्रिक अडचणी

आरोंदा-तळवणे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुलं जात होती. मुलांना शाळेची ओळख होण्याअगोदर मुलांना नीट नावेही सांगता येत नाहीत, पालक शाळेत येत नाहीत. तळवणेपेक्षाही गुळदुवे शाळा जवळची आहे. त्यामुळे मुलांनी त्या शाळेत जावे असा सल्ला मुख्याध्यापकांनी दिल्याने मुलांची शाळा सुटली ती कायमचीच. हाता-पायाच्या काड्या आणि पोटाचे नगारे झालेली आणि अर्धवट कपड्यांमध्ये भटकणारी मुलं हक्काचं शिक्षण मागतायत. परंतु निर्ढावलेली लाल फितीतली प्रशासन यंत्रणा त्यांना माणसासारखे जगणेही नाकारत आहे.

ना रेशन ना घर

या वस्तीतल्या कुटुंबांची व्यथाही या मुलांपेक्षा वेगळी नाही. मोलमजुरी आणि वनौषधी गोळा करुन कसेबसे दिवस ढकलणा-या या लोकांची नावे अद्याप दारिद्र्यरेषेखाली नाहीत त्यामुळे रेशनकार्डावरील सरकारी सोयी-सवलतींचा लाभ घेता येत नाही. डोक्यावर स्थिर छप्पर मिळणं तर फारच लांबची गोष्ट.

पणशीकर गुरुजी, अभिनव फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष ओंकार तुळसुलकर, सचिव हेमंत मराठे समाजातील समविचारी लोकांसमवेत या समाजातील लोकांना काही प्रामाणात मदत करीत आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी कातकारी समाजाच्या मुलांना हव्या त्या शाळेत प्रवेश देवू असे आश्वासन दिले आहे. सावंतवाडीच्या तहसिलदारांनी पिवळ्या शिधापत्रिका देवू आणि शिक्षण, आरोग्याचा प्रश्न सोडवू असे सांगितले आहे.

गरज समाजाने स्विकारण्याची

कातकरी (वानरमारे) समाजाच्या प्राथमिक गरजा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुटतीलही. पण इथेच हा प्रश्न थांबणार नाही. ज्योतिबा फुलेंनी सर्वांसाठी खुली केलेली शिक्षण व्यवस्था आज या मुलांना शिक्षण नाकारते आहे. ही बाब आपण फारच लाईटलीघेत आहोत. संबंधीत अधिकारीही साचेबद्ध उत्तरे देत आहेत. कुणाकडेच याचे ठोस उत्तर नाही. वर्षानुवर्षे भटके जीवन जगल्यामुळे ही मुले अस्वच्छ रहातही असतील, त्यांची आकलन क्षमताही कमी असेल, पण हे समजून घेऊन किवा असं गृहीत धरुनच समाजाने त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन मुख्य प्रवाहात स्विकारणे आवश्यक आहे.

दोन वर्षांपूर्वी सा. किरातने वानरमारे-कातकरी समाजातील लोकांची समस्या मांडली होती. वेंगुर्ले तालुक्यातील काही मुले शालेय शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत. पण एकूण जिल्ह्याचा विचार करता हा समाज विकासाच्या प्रवाहात सामील झालेला नाही. यामध्ये त्यांचे प्रतिनिधीत्व राजकीय व्यासपीठावर करणा-या व्यक्तीही जबाबदार आहेत. या समाजातील लोकांमध्ये असलेली व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, राहणीमानाचे दारिद्र्य यासाठी समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. या गोष्टीसाठी पुढारलेला समाज जरुर ती आर्थिक मदत करीलही. पण खरी गरज आहे ती सरकारी लालफितीच्या कारभारातून त्यांचे प्रश्न सुटण्याची.

-अॅड. शशांक मराठे

बातम्या

उद्बोधक व्याख्यानसत्र

राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांचे पुतणे, सुप्रसिद्ध वक्ते, प्रवचनकार आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे श्री. मोहनराव कुलकर्णी हे त्यांचे गुरुबंधू प्रसिद्ध उद्योजक श्री.दादासाहेब परुळकर यांच्या खास निमंत्रणावरुन वेंगुर्ले - मालवण भेटीसाठी आले होते. त्यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचा लाभ वेंगुर्ले तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन युवकांना व्हावा यासाठी वेंगुर्ले येथे खर्डेकर महाविद्यालय, न्यू इंग्लीश स्कूल उभादांडा, तुळस येथील शिवाजी हायस्कूल, मालवण येथील भंडारी, हायस्कूल आणि वेंगुर्ल्याचे रामेश्वर मंदिर या ठिकाणी श्री. दादासाहेबांनी श्री.मोहनराव कुलकर्णी आणि दादासाहेबांच्या समवेत आलेले मालवण भंडारी हायस्कूल संस्थेचे पदाधिकारी आणि उद्योग, व्यवसाय स्पर्धा परीक्षा यांबाबत प्रभावी मार्गदर्शन करणारे श्री. विजय पाटकर यांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

५ सप्टेंबरला श्री देव रामेश्वर मंदिरात रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे झालेल्या व्याख्यानात श्री.मोहनराव कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता या विषयावर बोलतांना त्यांची जाज्वल्य देशभक्ती,द्रष्टेपण,त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांचे वर्णन केले. प्रारंभी देवस्थान ट्रस्टचे श्री.दाजी परब यांनी स्वागत केले. श्रीधर मराठे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. ट्रस्टतर्फे कुलकर्णी व पाटकर यांचा सत्कार करण्यात आला.

७ सप्टेबरला खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानामध्ये श्री. विजय पाटकर यांनी पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या नोकरी-व्यवसाय संधी आहेत. याविषयी मार्गदर्शन करतांना स्पर्धा, परीक्षा, मुलाखती यामध्ये कसे यशस्वी व्हावे, याविषयी महत्त्वाच्या टीप्सदिल्या. श्री. मोहनराव कुलकर्णी यांनी सापांविषयी समज, गैरसमज याविषयावर विनोदी ढंगदार शैलीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्र.प्राचार्य प्रदीप होडावडेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

शिवाजी हायस्कूल, तुळस आणि न्यू इंग्लीश स्कूल उभादांडा या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी श्री. विजय पाटकर आणि मोहनराव कुलकर्णी यांनी उद्बोधक मार्गदर्शन केले. तसेच मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्येही उभय वक्त्यांची व्याख्याने झाली.

न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संस्थेतर्फे दादासाहेब परुळकर यांचा सत्कार

मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर २०१० रोजी वेंगुर्ले रत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक दादासाहेब परुळकर यांचा सत्कार सोहळा न्यू एज्युकेशन सोसायटी, उभादांडा संस्थेतर्फे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्था खजिनदार विलास मेस्त्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन दीनानाथ वेर्णेकर, अधिक्षक देवेंद्र गिरप हे उपस्थित होते.

लोहार सर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दीनानाथ वेर्णेकर यांनी स्वागत केले. सुप्रसिद्ध वक्ते आणि राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांचे पुतणे, दादासाहेबांचे गुरुबंधू मोहनराव कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरांचे पसायदान या विषयावर तर विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांच्या समोरील आजची आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोहनराव कुलकर्णी व विजय पाटकर यांचा दीनानाथ वेर्णेकर व देवेंद्र गिरप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दादासाहेब परुळकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,‘जगातील इतर देश सर्वच क्षेत्रात पुढे गेले आहेत. मात्र शिस्तीचा अभाव व पूर्वांपार टिकून राहिलेल्या अंधश्रद्धेमुळे आपला देश मागे राहिला आहे. म्हणून सर्वप्रथम घरातील पालकांनी शिस्त पाळली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त निर्माण होऊन राष्ट्राचा विकास होईल.

कार्यक्रमास विष्णू मांजरेकर, सावंतवाडीचे निवृत्त प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव सौ. शुभांगी कनयाळकर, सदस्या सौ.शुभलक्ष्मी चौकेकर, सौ. साळगांवकर, सदस्य अजित गवंडे तसेच महादेव परुळकर-तुळस, शिरोडकर-वेंगुर्ला हे उपस्थित होते.

श्रुतीगंधच्या सीडीचे प्रकाशन

संगीत हे एक असे औषध आहे की, त्यामुळे आजारी व्यक्ती बरी होऊ शकते. शेखर कोयंडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार घेऊन ‘‘सिंधुदुर्गचा आवाज‘‘ ही स्वरसिधुडिओ सीडी काढली ही बाब गौरवास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी येथील प्रसिद्ध डॉ. राजेश नवांगुळ यांनी वेंगुर्ले येथे श्रुतीगंध निर्मित व चंद्रशेखर कोयंडे प्रस्तुत सिधुदुर्गातील उदयोन्मुख गायक व वादक कलाकारांचा सहभाग असलेल्या स्वरसिंधुया ऑडिओ सीडीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले. १० सप्टेंबरला रात्रौ साई मंगल कार्यालयात एड. महेश पोकळे यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन झाले. त्यावेळी आरवली येथील वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुवीर मंत्री, श्रुतीगंधचे जुने कलाकार सुधीर नाईक, सामाजिक कार्यकर्ते सचीन वालावलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर कोयंडे, निवेदक संजय पुनाळेकर, गायक शेखर पणशीकर (आरवली), नुतन परब (कुडाळ), सौ. संगीता वालावलकर (वेंगुर्ले), ध्वनी मुद्रण करणारे सदा कुडाळकर (कुडाळ), डिझाईन करणारे विलास दळवी, संगीत साथ देणारे निलेश मेस्त्री, सचिन कुडतरकर, आनंदे मोर्ये तसेच तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कार प्राप्त संजय मालवणकर व महेंद्र मातोंडकर यांचा सत्कार करण्यात आला.

नुतन परब, संगीता वालावलकर, शेखर कोयंडे, शेखर पणशीकर यांनी अभंगवाणीहा भक्तीसंगीताचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास वेंगुर्ल्यातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी केले. अॅड. महेश पोकळे यांनी उद्घाटनची पहिली सीडी पाच हजार देऊन विकत घेतली. रघुवीर मंत्री यांनी १०० कॅसेट खरेदी केल्या. आमदार दिपक केसरकर यांनी स्वरसिधुच्या उपक्रमास एक हार्मोनियम देण्याचे जाहीर केले.

वेंगुर्ले व सावंतवाडीत नवीन प्रशासकीय इमारती आणि स्मारक इमारती

सिधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने काही बांधकामांच्या निविदा काढल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ले व सावंतवाडी येथे मुख्य प्रशासकीय इमारतींचे बांधकाम प्रत्येकी अंदाजपत्रक वेंगुर्ले ३२५ व सावंतवाडी ३३६.७९ लाखाचे आहे. शिरोडा येथे कै.वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर स्मारक इमारतीसाठी व सावंतवाडी - माजगांव येथे कै.भाईसाहेब सावंत स्मारक इमारतीसाठी प्रत्येकी ९५ लाखाचे अंदाजपत्रक असून चारही कामे २ वर्षाच्या आत पूर्ण करावयाची आहेत.

वाहन तपासणीतून सरकारला महसूल!

स्वयंचलित दुचाकी, तिचाकी, चारचाकी वाहनांचे परवाने व अन्य त्रुटींबाबत तपासणी करुन संबंधित वाहनधारकांकडून तत्काळ दंड आकारुन रक्कम वसुल करण्याची मोहिम पोलीस खात्याने ऐन गणेश चतुर्थीच्या दिवसांतच राबविली. त्यातून अधिकृत सरकारी पावत्या फाडल्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे.

आर.टी.ओ.कडे नोंदणी न करताच वाहन वापरणे, वाहन चालकाकडे लायसन्स नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट नसणे, स्कूटर, मोटरसायकलवरुन तीन सीट नेणे. गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, गाडीची नंबर प्लेट नियमानुसार नसणे इत्यादी गुन्हे मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये येतात. सिधुदुर्ग जिल्ह्यात अशा शेकडो वाहनचालकांवर कारवाई करुन लाखो रुपयांचे महसूली उत्पन्न सरकार जमा झाले.

वनखात्याकडून नुकसान भरपाईत वाढ

वन्य प्राण्यांकडून होणा-या शेती, बागायतीच्या नुकसानीपोटी संबंधीत शेतक-यांना द्यावयाच्या नुकसान भरपाई रक्कमेत वनखात्याने वाढ केली असून हत्ती, रानगवे यांच्यामुळे होणा-या नुकसानीसाठी प्रतिझाड नारळ २ हजार,आंबा १६०० रु., सुपारी १२०० रु.,इतर फळझाडे २०० रु.,केळी ४८रु. याप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे. शेतीसाठी कमाल दोन ते १० हजार,किमान ५०० ते ६०० रु. (उसासाठी प्रतिटन ४०० रु.)

वन्य जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू आला किवा कायमचे अपंगत्व आले तर २ लाख, गंभीर जखमी ५० हजार, किरकोळ जखमी ७,५०० रु. पशुधनाचे नुकसान झाल्यास गाय, बैल,म्हैस यांना बाजार किमतीच्या ७५ टक्के किवा १०,०००, अपंगत्व आल्यास किमतीच्या ५० टक्के किवा ३०००, जखमींना किमतीच्या २५टक्के किवा १००० असे नवीन दर आहेत.

आतापर्यंत ३ कोटी रुपये नुकसान भरपाई दाखल शेतक-यांना देण्यात आले असून अजुनही काही प्रतिक्षेत आहेत.

प्रा. अरुण पणदूरकरना राज्य पुरस्कार

कुडाळ येथील राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक अरुण पणदूरकर यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपये देऊन सन्मानीत करण्यात आले. याखेरीज त्यांना दोन वेतनवाढीही मिळणार आहेत. त्यांच्या पत्नी सौ.अश्विनी यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यापूर्वी प्रा. अरुण यांना मुंबई विद्यापीठाचा (२००२) बेस्ट टीचरअॅवॉर्ड व अन्य पुरस्कार मिळाले आहेत. सिधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक सेवेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक व ग्रंथालय क्षेत्रातही प्रा. पणदूरकर हे सहभागी असतात.

खरा आदर्श शिक्षक!

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या पानोली, जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय काकडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतींच्या हस्ते हा २५ हजाराचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यातील १५ हजार रुपये त्यांनी पानोली शाळेतील मुलांना बक्षिसे देण्यासाठी तसेच १० हजार रुपये आपण ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या कानूर पठार शाळेतील मुलांना बक्षिसे देण्यासाठी त्या त्या शाळांकडे सुपूर्द केली.

व्यंगचित्र

No comments:

Post a Comment