Thursday 10 May, 2012

अंक १८वा, १० मे २०१२


अधोरेखित *
नववधू प्रिया मी बावरते!
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मनोमिलन! परंतु प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आणि किबहुना याच दृष्टिकोनानुसार जीवनातील अनुकुलता वा प्रतिकुलता, प्रगती वा अधोगती हे सारं ठरत असतं. लग्न झाल्यावर नववधूची तर खरी कसरत असते. कारण तिला अनेक नाती, जबाबदा-या हे सारं सांभाळायचं असतं. प्रत्येकाचे स्वभाव, व्यक्तीनुसार आपल्या वागण्यात करावा लागणारा बदल हे तर कौशल्याचे काम!
     परंतु जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच जर निकोप असेल तर या जबाबदा-या ओझं वाटत नाही. उदा. माणसाला स्वतःचं जीवन हे कुंडीतल्या फुलासारखं आकर्षक आणि शोभिवंत असावं असं वाटत असतं. त्यापायी जरासुद्धा मनाविरुद्ध वाटणारी, वरकरणी आकर्षक नसणारी, कधी खुपणारी वस्तु (अगदी माणसंसुद्धा!) समोर नकोशी वाटते. केवळ वरकरणी दिसणा-या गुणदोषांवर आपण दुस-यांचं मूल्यांकन करु लागतो. कधी काही पटलं नाही तर मग डोळ्यात राग घालून घरातल्या माणसांबरोबर तू तू मै मैसुरु होते. परंतु संसाराची वाटचाल करत असताना माणसाचं जीवन कसं कलमाच्या बागेसारखं असावं. त्यात प्रसंगी दिसणा-या वाळक्या पाल्यापाचोळ्याचा आणि कधी न मोहरलेल्या कलमांचा तिटकारा नसावा. त्या बागेच्या वाढीतलं काटेरी झुडुपाचंही महत्व ओळखलं जावं. अगदी वठलेल्या झाडाच्या फळ्यादेखील मोलाच्या असतात हे लक्षात ठेवून त्या वठलेल्या खोडाबद्दल त्रागा नसावा. समोरच्या व्यक्तीमध्ये वरकरणी दिसणारा दोष सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचं अविभाज्य अंग म्हणून स्विकारार्ह वाटावा. पालापोचाळा किवा न मोहरलेल्या कलमावरुन संपूर्ण बागेच्या किमतीवर फुली मारली जात नाही; तशीच एखादा दोष दिसला म्हणून एका व्यक्तीवर, नाहीतर जीवनात थोडी प्रतिकुलता जाणवली म्हणून एकदम आपल्या जीवनाच्या संपूर्ण सुखावर फुली न मारली जावी. उलट वरकरणी दोष दिसले, प्रतिकुलता जाणवली तरी आपलं आयुष्य ही दीर्घकाळ पर्यंत भरभरुन सफल होणारी बाग आहे लक्षात ठेवून त्याच्या जोपासनेचा प्रयत्न व्हावा.
     नाहीतर अनेकदा समोर एखादी गोष्ट मनाला न पटणारीशी वाटली की लगेच तिला जीवघेणा प्रश्न मानून त्याचं उत्तर शोधण्यासाठी बाकीचं सगळं सोडून दिलं जातं. जीवन म्हणजे प्रश्नपत्रिका नाही आणि किती प्रश्न सोडवले यावर पास-नापासाचा निकालही लागणार नसतो. जीवन हे परमेश्वरानं आपल्या कपाळी लिहीलेलं एक सुंदर काव्य आहे. त्याचा अधिकाधिक आनंद कसा घेता येईल यावर भर द्यायला हवा.
     डोळ्याला दिसेल तेच सत्य किवा बुद्धीला जेवढं समजतं तेवढंच बरोबर असा संकुचित दृष्टिकोनही जीवनाला चुकीची दिशा देऊ शकतो. आपलं मत किवा आपल्याला जाणवलेला गुण वा दोष हा ह्या गोष्टीचा एक पैलू असला तरी तेवढंच खरं नसून अगदी विरुद्ध वाटणारं दुस-याचं मत सुद्धा त्याच गोष्टीचा दुसरा पैलू असू शकतो. हा मुद्दा लक्षात ठेवता आला तर जीवनाकडे पहाण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक आणि उदार होवू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयानुसार, परिस्थिती नुसार व संस्कारानुसार मिळविलेला अनुभव हा एका मर्यादित चौकटीपुरता बरोबर असला तरी ते जीवनाचे सार्वत्रिक व सर्वकालिक सत्य ठरु शकत नाही. तेव्हा दुस-याच्या मताचा आदर करण्याची, त्यावर विचार करण्याची तयारीही हवी.
     लग्नानंतर अपेक्षा केवळ नव्यानवरीकडून न ठेवता, पती -पत्नी दोघांनाही सहजीवनाच्या अपेक्षा समजून घ्यायला हव्यात. दोघांनाही रुळायला थोडा वेळ द्यायला हवा.
     सारासार विचार करत आणि तटस्थपणे स्वतःकडे पाहून मार्गक्रमण केले तर संसाराचा गाडा निश्चितच सुखावह रितीने चालेल आणि सारेच सुजलाम - सुफलाम होईल यात शंकाच नाही!
-सौ. सुमेधा देसाई, ९७६५८४७२९७.

संपादकीय *
खोल खोल पाणी
     महाराष्ट्रात सगळीकडेच पाण्याची पातळी मार्चपासूनच खोल जाऊ लागल्याने यंदाची पाणी टंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. उन्हाळ्यातही पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून सरकार पाट बंधारे, लघुपाटबंधारे, लहान - मोठी धरणे, विहीरी, बोअरवेल्स, पाझर तलाव, नळपाणी पुरवठा योजना यांची आखणी करत असते. आता या खात्याला जलसंधारण खाते असे नामाभिमान आहे. एकूणच पाण्यासाठी करोडो रुपयांच्या योजना येऊन सुद्धा पाणी टंचाईचा प्रश्न काही सुटलेला नाही. साठविलेले पाणी देखील नियोजनाने, काटकसर करुन वापरायला न जमल्याने पाण्याची पातळी खोल खोल जाऊ लागली आहे.
     करोडो रुपयांच्या जलसंधारणाच्या योजना एकतर दप्तर दिरंगाईत अडकतात किवा राजकारणामध्ये संपतात. या सर्वातून सुटल्या तर पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहतो. पारदर्शी प्रशासन आणि निःस्वार्थी राज्यकर्त्यांची कमतरता असल्याने या योजना काही लवकर मार्गी लागत नाहीत.
     वर्षातले चार महिने सर्वाधिक पाऊस पडणा-या कोकणातही स्थिती फारशी वेगळी नाही. भरपूर पाऊस पडून देखील एप्रिल - मे मध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटाकवे लागते. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी डोंगर उतारावरुन नद्या नाल्यांमुळे समुद्राला मिळते. पूर्वी कोकणातील गावांमधून वाडीवरचे शेतकरी - बागायतदार जेथे शक्य असेल तेथे श्रमदानाने बंधारे घालत असत. त्यावर उन्हाळ्यातही नारळ - सुपारीच्या झाडांना पाणी मिळत असे. तसेच भाजीपाला पिकत असे. जवळच्या विहीरींना पाणी टिकत असे. आता सरकारी योजना असल्याने आणि श्रमप्रतिष्ठा कमी झाल्याने श्रमदानाने बंधारे घालण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. कोणी स्थानिक राजकीय पुढारी देखील यासाठी पुढाकार घेत नाहीत. सरकारने या कामात स्थानिक लोकांचा सहभाग मिळावा यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा‘, ‘जलस्वराज्ययासारख्या योजना राबविल्या. पण त्यातली लोकवर्गणी ठेकेदारानेच भरल्याने कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आहेत. लोकांच्या उदासिनतेमुळे ब-याच योजना कागदावरच राहिल्या आहेत. लोकसहभागाचं म्हणाल तर आता क्रिकेट, टीव्हीवरचे मनोरंजन आणि चैनबाजी यात अडकलेला तरुण वर्ग अशा कामासाठी स्वतःहून पुढे येताना दिसत नाही.
     सिधुदुर्गात सद्यस्थितीला २००६ पासून राबविलेल्या ६४७ पाणी योजनांपैकी २८० योजना अद्याप अपूर्ण आहेत. वैभववाडी, देवगड, कणकवली, विजयदूर्ग, कुरंगवाणे येथील पाण्याची स्थिती अतियश बिकट आहे.
     जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी तसेच पाण्याचे स्त्रोतांचे शुद्धीकरणासाठी सुमारे ४०० जलसुरक्षा रक्षक जिल्हा परिषदे अंतर्गत नेमले आहेत. मानधन तत्त्वावर काम करणा-या कर्मचा-यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींनाच जलसुरक्षा रक्षकहा काय प्रकार आहे हे माहितच नाही.
     प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात भेडसावणारा ह्या पाणी प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी आता लोकांनीच आपली उदासिनता झटकण्याची गरज आहे. मंदिर जिर्णोद्धाराला ज्या उत्साहात लोक सहभागी होतात त्याप्रमाणे प्रत्येक गावाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एक समिती तयार केली आणि ह्या समितीने आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला तरच सुस्तावलेली नोकरशाही हलून कार्यरत होईल. अन्यथा पुढीलवर्षी देखील परिस्थितीत फारसा फरक दिसणार नाही.

विशेष *
जागतिक पातळीवर अणुवीज निर्मितीचा अंत जवळ आला
     रविवार दि. ५ मे रोजी जपानमध्ये बालदिनहोता. या दिवशी जपानी जनतेने अगदी नाविन्यपूर्ण अशी बालदिनाची भेट जपानमधील लहान मुलांच्या भविष्यासाठी दिली. ही भेट केवळ जपानी बालकांसाठी नव्हती तर भारतासह अणूउर्जा निर्मिती करणा-या सर्व देशांतील बालकांसाठी होती.
     काय होती ही भेट? - जपानमधल्या जनतेने जपानच्या सरकारवर प्रचंड लोकमताचा दबाव आणला. जपानचे सरकार अणूउर्जा आपणाला आवश्यक आहे हे हर त-हेने जनतेला पटवून देत होते. काकोडकरांसारखे निवृत्त सरकारी नोकर देखील जपान सरकारने अणूउर्जेचे महत्व सांगण्यासाठी कामाला लावले होते. पण काकोडकरसदृश्य जपानी तथाकथीत अणूउर्जा प्रचारकांना जपानी जनतेनेच नामोहरम केले. फुकूशिमामध्ये अणूउर्जेच्या प्रकल्पात समुद्रातील भूकंप आणि त्सुनामीमुळे लागोपाठ फटाक्यांसारखे स्फोट झाले. प्रकल्पामध्ये उभारलेल्या अणूउर्जा सयंत्राला आगी लागल्या. या आगी विझवता विझवता जपानी सरकारला नाकीनऊ आले. अणूउर्जा सत्रंयाचे तीन-तेरा तर वाजलेच पण दूरवर पसरलेल्या भूभागावर आणि लोकांवर या स्फोटातून निर्माण झालेल्या किरणोत्साराचे अतिशय वाईट परिणाम जपानी जनतेला तात्काळ भोगावे लागले. ७० ते १०० कि.मी.च्या परिसरात किरणोत्सर्ग झाला. पिण्याचे पाणी देखील किरणोत्साराने बाधित झाले. ५० कि.मी.च्या परिसरातील लोकांना आपली घरे-दारे सोडून जावे लागले.
     अमेरिकी सरकारने तर जपानमधील अमेरिकी नागरिकांना फुकूशिमापासून १०० कि.मी.च्या बाहेर स्थलांतर करण्यास सांगितले. समुद्रातील पाण्यात झालेल्या किरणोत्साराचा परिणाम समुद्रातील मत्स्यजीवनावर झाला. जपानमधील मासे आणि फळभाज्या इ. किरणोत्साराने बाधित झालेले पदार्थ आयात करु नयेत अशी परिस्थिती निर्माण झाली. या सर्व परिस्थितीचा आढावा जपानी जनतेने घेतला. अणूउर्जा आता आम्हाला नको अशी स्पष्ट भूमिका जपानी जनतेने तसेच जपानमधील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये काम करणा-या संशोधकांनी घेतली. आपण निसर्गातील अन्य उपलब्ध साधनांपासून उर्जा तयार करुया असे अनेक पर्याय सरकारपुढे मांडले आणि त्याचा परिणाम होऊन शेवटी जपानच्या सरकारला अणूउर्जा प्रकल्प, ज्या प्रकल्पातून जपानच्या एकूण उर्जेच्या गरजे पैकी ३० टक्के गरज भागविली जात होती, हे सारे ५० प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आज तरी जपानच्या सरकारला घ्यावा लागला.
     दुस-या महायुद्धात अणूबॉम्बच्या वर्षावामुळे बेचिराख झालेले जपान जनतेच्या श्रमाने गेल्या ५० वर्षात परत एकदा उभे राहिले. त्याच ताकदीने अणूउर्जेला पर्याय उभे करण्याची धमक जपानी जनता पुढील एक दशकात दाखवेल याबद्दल कोणाच्या मनात शंका उभी राहण्याचे कारण नाही.
     आपल्या देशात हर माणसाला जेमतेम ३ टक्के अणूउर्जा गेल्या ७ वर्षांच्या करोडो रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीनंतर मिळत आहे. जपानने जनतेचे हित लक्षात घेऊन ३० टक्के अणूउर्जेवर लाथ मारली, तर आपल्या देशात ३ टक्के उणूउर्जेला अनेक पर्याय निर्माण करण्याची संधी नैसर्गिक साधनसामग्रीने दिली आहे. त्यापैकी सौरउर्जा, पवनउर्जा, समुद्राच्या लाटांपासून निर्माण होणारी उर्जा, जलविद्युत असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जपान हा आपल्या खंडातील आशियाई देश आहे. आपणही आशिया खंडातील आहोत. जपानमध्ये अणूउर्जा निर्माण करणा-या अनेक कंपन्यांचे दडपण जपानी सरकारवर होते. पण जनक्षोभापुढे या कंपन्या आणि जपानचे सरकार काही करु शकले नाहीत. आपण जपानपासून काही धडा घेणार आहोत का? हा प्रश्न भारतीय जनतेसमोर उत्तरासाठी उभा आहे.
- प्रा. गोपाळ दुखंडे, ९८६९९४९०२५

मुलं
     लग्नाच्या अनेक हेतुंपैकी, मुलं होणं म्हणजेच पर्यायाने वंश सातत्य हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा हेतु असतो तसंच वैयक्तिक पातळीवरही मुलं होणं आणि मुलं वाढवण्याचा आनंद आणि त्याबरोबरच त्रास किवा जबाबदारी घेणं हा ही लग्न संस्थेचा एक प्रमुख हेतु असतो.
     त्यामध्ये सुद्धा मुलं नको, तीन मुलं असावीत, पहिलाचा मुलगा झाला, पहिलीच मुलगी झाली तर एकच पुरे.अशी अनेक मतं असू शकतात.
     काही नकारात्मक, अभद्रही वाटणा-या भविष्याबाबत कधीतरी मनात विचार करणं शक्य असतं. कारण आपल्यापैकी एकाची मुल होण्यासाठी आवश्यक असणारी शारिरीक क्षमता नसेल तर, किवा मतिमंद मूल जन्माला आलं तरी त्याला जगवायचं की नाही हा निर्णय कधीकधी ऑपरेशन थिएटरमध्ये त्याक्षणी घेणं जरुर असतं. त्यासाठी आधी विचार केलेला असला तर काही वाईट नाही. कारण, माणसाचं आयुष्य हे नकारात्मक, सकारात्मक, आनंददायी, त्रासदायक अशा दोन्ही प्रकारच्या घटनांनी भरलेलं असतं. त्यामुळे वास्तव स्विकारतांना कटुता टाळून योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले तर जगणं थोड अधिक सोपं आणि अधिक आनंददायी करता येतं.
     आजच्या परिस्थितीत मुलं जन्माला घालतांना आपलं दोघांच करिअर, आर्थिक परिस्थिती आणि आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे किमान पहिली १ ते २ वर्षे बाळाला सांभाळण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार त्या त्या वेळी करता आला पाहिजे.
     आपल्याला मुलं हवच आहे. आपल्याला नाही होऊ शकलं तर दत्तक घ्यायचं. पण कुटुंबात आपलं मुलं हवच याविषयी ठामपणा असेल तर जोडीदाराशी याविषयी बोलता आलं पाहिजे. जेणेकरुन त्यानेही या विषयावर कधी विचार केला नसेल तर त्याची विचार करण्याची तयारी आहे किवा नाही किवा यासंबंधी काय विचार आहेत ते समजून घेता येईल.
     सुमारे ५०/६० वर्षापूर्वीच, कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते श्री.र.धो. कर्वे यांनी आपल्याला मुल नकोअसं आपल्या पत्नीला सांगितलं होतं आणि तिने ते ऐकलही होतं. मानलही होतं. पण आता आजच्या काळात जोडिदार स्त्री जर स्वतंत्र विचारांची, आर्थिदृष्ट्या सक्षम असेल तर तिच्यावर हे मत ऐकण्याची सक्ती ती सहजपणे नाकारु शकेल आणि विवाह करण्यापूर्वीच जर ह्या गोष्टींबाबत चर्चा करुन ती समजली तर दोघांचाही पुढचा मनस्ताप टळेल.
     काहींच्या मते मुलं हे आपल्या जगण्याचं एक अत्यंत आव्हानात्मक असं उद्दिष्ट असतं. स्वतःचा कस लावून घेण्याची ती एक परिक्षा असते. मुल जर गुणवंत, यशवंत निघालं तर जगण्याचं सार्थक होतं. एका नव्या जीवाला चांगल्या जगात आणल्याच किवा आपल्यातून निर्माण झालेल्या जीवाने जगाचं काही भलं केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो.
     सावित्रीबाईंसारखी मुलगी किवा सचिन तेंडुलकर -सारखा मुलगा झाला तर कुठल्या आईबापाला आनंद झाल्याशिवाय, जीवनाच सार्थक झाल्याशिवाय राहील.
- वंदना करंबेळकर, समुपदेशक - मोबा. ९८५०४७३०१२

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कै. महाबळेश्वर मोर्जे - उत्साहाचा झरा
कोकणाला बुद्धिमत्तेचे नि प्रतिभेचे वरदान लाभले आहे. लाल मातीत हिरवागार निसर्ग फुलतो तर अथांग सागर मनाला विशाल बनवतो. अशा वातावरणात कायदेतज्ञ महाबळेश्वर मोर्जे यांचा जन्म वेंगुर्ले येथे १९३५ साली झाला. मोर्जेंचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले-नवाबाग येथे झाले तर माध्यमिक शिक्षण पाटकर हायस्कूल वेंगुर्ले,हुबळी व मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले आणि मुंबईत वकिली सुरु केली. ज्येष्ठ वकिल आर.सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या.जी. एन. वैद्य यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. वकिली करत असतांना गव्ह.लॉ कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच असि.गव्हर्नमट प्लिडर म्हणून काम करतांना त्यांनी काही महत्त्वपूर्ण केसेस कुशलतेने हाताळल्याबद्दल सरकारकडून प्रशंसा मिळाली. १९८७ मध्ये ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांचे सदस्य होते. त्यांचे वडिल बंधु श्री. आप्पा मोर्जे यांचा सुरुवातीच्या काळात त्यांना आधार मिळाला.
     त्यांनी अनेक मराठी दैनिकांमधून गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भातील कायदेया विषयावर स्तंभलेखन केले होते. दूरदर्शन, रेडिओ याद्वारे त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भातील प्रश्नोत्तरांचे अनेक कार्यक्रम केले. फंडामेंटल ड्युटी, पंचायत राज, जनहित याचिका आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली होती. आणीबाणीच्या दरम्यान मिसा कायद्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची श्रीमती इंदिरा गांधी यांनीही प्रशंसा केली होती. तसेच वकिलांच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी अनेक परदेशी दौरे करुन तेथील गृहनिर्माण क्षेत्राचा व कायदेकानून विषयांचा अभ्यास केला व  सरकारला उपयुक्त अहवाल सादर केले.
     शहरातील मराठी माणूस उपनगरांकडे फेकला जात आहे, याची खंत त्यांना होती. १९८३ मध्ये स्थापन केलेल्या फ्लॅट ओनर्स असोसिएशनमार्फत त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांची तड लावली होती. रजिस्टेशन फी, स्टँप ड्युटी भरण्याचे सुलभीकरण, भाडेकरु कायदा सोपा करणेआदी सुधारणांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या शेरिफ समिती तसेच द.म.सुखथनकर समिती यांच्यावरही त्यांनी काम करुन महत्त्वपूर्ण सूचना केला होत्या.
     आपल्या वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीलाही ते तेवढेच महत्त्व देत असत. आय लव्ह मुंबईया समितीचे ते ट्रस्टी होते. मुंबईचे माजी शेरिफ नाना चुडासामा व तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी.अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामासंबंधी त्यांचा गौरव झाला. सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातूनही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
     कोकण आणि कोकणी माणसाबद्दल त्यांना आपुलकी होती.  ते वेंगुर्ल्यात आल्यानंतर शालेय मुलांसाठी साहित्याचे वाटप करत असत. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेल्या नवाबाग शाळेचा शतकमहोत्सव त्यांनी अनेक मान्यवरांना वेंगुर्ल्यात आणून साजरा केला होता. बॅ.नाथ पै विक्रोळी विद्यालय येथील मुलांसाठी मुलभूत कर्तव्येया विषयावर वक्तृत्व स्पर्धा ठेऊन दरवर्षी ते पारितोषिके देत असत.
   वयाच्या ७६व्या वर्षी त्यांचे ३०/४/२०१२ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत झालेल्या शोकसभेला वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या परिचयाची मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. महा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुस्ताक अंतुले, आमदार दिवाकर रावते, न्यायमूर्ती पाटणकर, बिल्डर्स अवरसेकर, वकिल मंडळी,पाटकर हायस्कूलमधील त्यांचे बालमित्र सुमन खानोलकर, पी.ए.मडकईकर, सगुण (आबा) नाईक आदी उपस्थित होते. उदयोन्मुख अशा अनेक वकिलांना त्यांनी वकिली व्यवसायात मार्गदर्शन करुन पुढे आणले. मोर्जे साहेबांच्या आठवणी सांगतांना त्यांना आपले अश्रु आवरणे मुश्किल झाले. त्यांच्या मुलींनी आपले दुःख आवरुन मोर्जे साहेबांचा जीवनपट स्लाईड शोच्या माध्यमातून उघड केला याचे सर्वांनी कौतुक केले. मोर्जे यांना वेंगुर्ले येथे यायचे होते. परंतू त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांना आणता आले नाही याची खंत त्यांचे पुतणे अॅड. श्रीकांत मोर्जे यांनी व्यक्त केली. मोर्जे यांच्या पत्नी सुमन यांचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या कन्या अॅड.शिल्पा, इंजिनिअर प्रज्ञा, वास्तुशास्त्रज्ञ पूजा या तिन्ही कर्तबगार मुलींनी आपल्या वडिलांचे कार्य पुढेही चालू राहिल असे सांगितले. अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत याची सर्वांनी हळहळ व्यक्त केली.  
शब्दांकन - श्री. बापू गिरप, गोरेगांव-मुंबई. मोबा.९९२०९५५१७५

विशेष बातम्या *
सिधुदुर्गात पाणी टंचाई पाठोपाठ दूषित पाण्याचे संकट
     सिधुदुर्गातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याच्याच जोडीला एप्रिल अखेरीस झालेल्या तपासणीत १३०८ पैकी १४३ पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यात पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे ४०० जलसुरक्षा रक्षक पाणी पुरवठा योजनांचा प्रचार आणि प्रसार यासाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर पाणी शुद्धीकरणाची जबाबदारीही आहे. त्यांना दरमहा ५००० रु. मानधनही दिले जाते. मात्र या सुरक्षा रक्षकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने पाणी स्रोत शुद्धीकरणाचे काम होत आहे की नाही याकडे लक्ष दिले जात नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक ग्रामपंचायतींना जलसुरक्षा रक्षकहा काय प्रकार आहे हे माहितच नाही. दरम्यान या कर्मचा-यांच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश जि.प. अध्यक्ष निकीता परब यांनी दिले आहेत.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतले पाट येथील श्री रवळनाथाचे दर्शन
     मुंबई-ठाणे महानगर पालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पाट येथील रवळनाथाच्या दर्शनास येतील, असे गा-हाणे मुंबई येथे भरलेल्या मालवणी जत्रौत्सवात घालण्यात आले होते. नवसफेड करण्यासाठी श्री. ठाकरे ६ रोजी हेलिकॉप्टरने आले. त्यांनी श्री देव रवळनाथ, श्री देवी माऊली व परुळेच्या श्री वेतोबाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दूर होऊन बहरलेला दिसावा असे साकडे त्यांनी श्री देव रवळनाथ चरणी घातले.
     माजी खासदार व सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयास सदिच्छा भेट दिली.  यावेळी त्यांच्यासमवेत मुंबईचे महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे, सचिव विनायक राऊत, गुरुनाथ खोत, नगरसेवक नाना आंबोले, आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख वैभव नाईक, जिल्हा संफ प्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख एकनाथ नाडकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

खा. एकनाथ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार
सारस्वत बँकेचे संचालक व माजी खासदार एकनाथ ठाकूर यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मॅक्सेल फाऊंडेशनया संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. मॅक्सेल फाऊंडेशनच्या वतीने कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना महाराष्ट्र कॉ. पेरिट एक्सेलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सोहळा ६ मे रोजी नरिमन पॉईंट एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये संपन्न झाला.

तुळस येथील जैतिर उत्सव २० मे पासून
     वैशाख महिन्यातील दर्श अमावस्येला तुळस येथील प्रसिद्ध जैतीर उत्सव होतो. यावर्षी २० मे रोजी उत्सवास सुरुवात होऊन २९ मे रोजी कवळासाने उत्सवाची सांगता होईल. या उत्सवास परिसरातील, मुंबईनिवासी जैतिराचे भक्तगण बहुसंख्येने उपस्थित रहातात. उत्सवानिमित्त भरणा-या जत्रेत शेती अवजारांची मोठी उलाढाल होते.

No comments:

Post a Comment