Thursday, 10 May 2012

अंक १८वा, १० मे २०१२


अधोरेखित *
नववधू प्रिया मी बावरते!
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मनोमिलन! परंतु प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आणि किबहुना याच दृष्टिकोनानुसार जीवनातील अनुकुलता वा प्रतिकुलता, प्रगती वा अधोगती हे सारं ठरत असतं. लग्न झाल्यावर नववधूची तर खरी कसरत असते. कारण तिला अनेक नाती, जबाबदा-या हे सारं सांभाळायचं असतं. प्रत्येकाचे स्वभाव, व्यक्तीनुसार आपल्या वागण्यात करावा लागणारा बदल हे तर कौशल्याचे काम!
     परंतु जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच जर निकोप असेल तर या जबाबदा-या ओझं वाटत नाही. उदा. माणसाला स्वतःचं जीवन हे कुंडीतल्या फुलासारखं आकर्षक आणि शोभिवंत असावं असं वाटत असतं. त्यापायी जरासुद्धा मनाविरुद्ध वाटणारी, वरकरणी आकर्षक नसणारी, कधी खुपणारी वस्तु (अगदी माणसंसुद्धा!) समोर नकोशी वाटते. केवळ वरकरणी दिसणा-या गुणदोषांवर आपण दुस-यांचं मूल्यांकन करु लागतो. कधी काही पटलं नाही तर मग डोळ्यात राग घालून घरातल्या माणसांबरोबर तू तू मै मैसुरु होते. परंतु संसाराची वाटचाल करत असताना माणसाचं जीवन कसं कलमाच्या बागेसारखं असावं. त्यात प्रसंगी दिसणा-या वाळक्या पाल्यापाचोळ्याचा आणि कधी न मोहरलेल्या कलमांचा तिटकारा नसावा. त्या बागेच्या वाढीतलं काटेरी झुडुपाचंही महत्व ओळखलं जावं. अगदी वठलेल्या झाडाच्या फळ्यादेखील मोलाच्या असतात हे लक्षात ठेवून त्या वठलेल्या खोडाबद्दल त्रागा नसावा. समोरच्या व्यक्तीमध्ये वरकरणी दिसणारा दोष सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचं अविभाज्य अंग म्हणून स्विकारार्ह वाटावा. पालापोचाळा किवा न मोहरलेल्या कलमावरुन संपूर्ण बागेच्या किमतीवर फुली मारली जात नाही; तशीच एखादा दोष दिसला म्हणून एका व्यक्तीवर, नाहीतर जीवनात थोडी प्रतिकुलता जाणवली म्हणून एकदम आपल्या जीवनाच्या संपूर्ण सुखावर फुली न मारली जावी. उलट वरकरणी दोष दिसले, प्रतिकुलता जाणवली तरी आपलं आयुष्य ही दीर्घकाळ पर्यंत भरभरुन सफल होणारी बाग आहे लक्षात ठेवून त्याच्या जोपासनेचा प्रयत्न व्हावा.
     नाहीतर अनेकदा समोर एखादी गोष्ट मनाला न पटणारीशी वाटली की लगेच तिला जीवघेणा प्रश्न मानून त्याचं उत्तर शोधण्यासाठी बाकीचं सगळं सोडून दिलं जातं. जीवन म्हणजे प्रश्नपत्रिका नाही आणि किती प्रश्न सोडवले यावर पास-नापासाचा निकालही लागणार नसतो. जीवन हे परमेश्वरानं आपल्या कपाळी लिहीलेलं एक सुंदर काव्य आहे. त्याचा अधिकाधिक आनंद कसा घेता येईल यावर भर द्यायला हवा.
     डोळ्याला दिसेल तेच सत्य किवा बुद्धीला जेवढं समजतं तेवढंच बरोबर असा संकुचित दृष्टिकोनही जीवनाला चुकीची दिशा देऊ शकतो. आपलं मत किवा आपल्याला जाणवलेला गुण वा दोष हा ह्या गोष्टीचा एक पैलू असला तरी तेवढंच खरं नसून अगदी विरुद्ध वाटणारं दुस-याचं मत सुद्धा त्याच गोष्टीचा दुसरा पैलू असू शकतो. हा मुद्दा लक्षात ठेवता आला तर जीवनाकडे पहाण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक आणि उदार होवू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयानुसार, परिस्थिती नुसार व संस्कारानुसार मिळविलेला अनुभव हा एका मर्यादित चौकटीपुरता बरोबर असला तरी ते जीवनाचे सार्वत्रिक व सर्वकालिक सत्य ठरु शकत नाही. तेव्हा दुस-याच्या मताचा आदर करण्याची, त्यावर विचार करण्याची तयारीही हवी.
     लग्नानंतर अपेक्षा केवळ नव्यानवरीकडून न ठेवता, पती -पत्नी दोघांनाही सहजीवनाच्या अपेक्षा समजून घ्यायला हव्यात. दोघांनाही रुळायला थोडा वेळ द्यायला हवा.
     सारासार विचार करत आणि तटस्थपणे स्वतःकडे पाहून मार्गक्रमण केले तर संसाराचा गाडा निश्चितच सुखावह रितीने चालेल आणि सारेच सुजलाम - सुफलाम होईल यात शंकाच नाही!
-सौ. सुमेधा देसाई, ९७६५८४७२९७.

संपादकीय *
खोल खोल पाणी
     महाराष्ट्रात सगळीकडेच पाण्याची पातळी मार्चपासूनच खोल जाऊ लागल्याने यंदाची पाणी टंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. उन्हाळ्यातही पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून सरकार पाट बंधारे, लघुपाटबंधारे, लहान - मोठी धरणे, विहीरी, बोअरवेल्स, पाझर तलाव, नळपाणी पुरवठा योजना यांची आखणी करत असते. आता या खात्याला जलसंधारण खाते असे नामाभिमान आहे. एकूणच पाण्यासाठी करोडो रुपयांच्या योजना येऊन सुद्धा पाणी टंचाईचा प्रश्न काही सुटलेला नाही. साठविलेले पाणी देखील नियोजनाने, काटकसर करुन वापरायला न जमल्याने पाण्याची पातळी खोल खोल जाऊ लागली आहे.
     करोडो रुपयांच्या जलसंधारणाच्या योजना एकतर दप्तर दिरंगाईत अडकतात किवा राजकारणामध्ये संपतात. या सर्वातून सुटल्या तर पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहतो. पारदर्शी प्रशासन आणि निःस्वार्थी राज्यकर्त्यांची कमतरता असल्याने या योजना काही लवकर मार्गी लागत नाहीत.
     वर्षातले चार महिने सर्वाधिक पाऊस पडणा-या कोकणातही स्थिती फारशी वेगळी नाही. भरपूर पाऊस पडून देखील एप्रिल - मे मध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटाकवे लागते. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी डोंगर उतारावरुन नद्या नाल्यांमुळे समुद्राला मिळते. पूर्वी कोकणातील गावांमधून वाडीवरचे शेतकरी - बागायतदार जेथे शक्य असेल तेथे श्रमदानाने बंधारे घालत असत. त्यावर उन्हाळ्यातही नारळ - सुपारीच्या झाडांना पाणी मिळत असे. तसेच भाजीपाला पिकत असे. जवळच्या विहीरींना पाणी टिकत असे. आता सरकारी योजना असल्याने आणि श्रमप्रतिष्ठा कमी झाल्याने श्रमदानाने बंधारे घालण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. कोणी स्थानिक राजकीय पुढारी देखील यासाठी पुढाकार घेत नाहीत. सरकारने या कामात स्थानिक लोकांचा सहभाग मिळावा यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा‘, ‘जलस्वराज्ययासारख्या योजना राबविल्या. पण त्यातली लोकवर्गणी ठेकेदारानेच भरल्याने कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आहेत. लोकांच्या उदासिनतेमुळे ब-याच योजना कागदावरच राहिल्या आहेत. लोकसहभागाचं म्हणाल तर आता क्रिकेट, टीव्हीवरचे मनोरंजन आणि चैनबाजी यात अडकलेला तरुण वर्ग अशा कामासाठी स्वतःहून पुढे येताना दिसत नाही.
     सिधुदुर्गात सद्यस्थितीला २००६ पासून राबविलेल्या ६४७ पाणी योजनांपैकी २८० योजना अद्याप अपूर्ण आहेत. वैभववाडी, देवगड, कणकवली, विजयदूर्ग, कुरंगवाणे येथील पाण्याची स्थिती अतियश बिकट आहे.
     जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी तसेच पाण्याचे स्त्रोतांचे शुद्धीकरणासाठी सुमारे ४०० जलसुरक्षा रक्षक जिल्हा परिषदे अंतर्गत नेमले आहेत. मानधन तत्त्वावर काम करणा-या कर्मचा-यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींनाच जलसुरक्षा रक्षकहा काय प्रकार आहे हे माहितच नाही.
     प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात भेडसावणारा ह्या पाणी प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी आता लोकांनीच आपली उदासिनता झटकण्याची गरज आहे. मंदिर जिर्णोद्धाराला ज्या उत्साहात लोक सहभागी होतात त्याप्रमाणे प्रत्येक गावाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एक समिती तयार केली आणि ह्या समितीने आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला तरच सुस्तावलेली नोकरशाही हलून कार्यरत होईल. अन्यथा पुढीलवर्षी देखील परिस्थितीत फारसा फरक दिसणार नाही.

विशेष *
जागतिक पातळीवर अणुवीज निर्मितीचा अंत जवळ आला
     रविवार दि. ५ मे रोजी जपानमध्ये बालदिनहोता. या दिवशी जपानी जनतेने अगदी नाविन्यपूर्ण अशी बालदिनाची भेट जपानमधील लहान मुलांच्या भविष्यासाठी दिली. ही भेट केवळ जपानी बालकांसाठी नव्हती तर भारतासह अणूउर्जा निर्मिती करणा-या सर्व देशांतील बालकांसाठी होती.
     काय होती ही भेट? - जपानमधल्या जनतेने जपानच्या सरकारवर प्रचंड लोकमताचा दबाव आणला. जपानचे सरकार अणूउर्जा आपणाला आवश्यक आहे हे हर त-हेने जनतेला पटवून देत होते. काकोडकरांसारखे निवृत्त सरकारी नोकर देखील जपान सरकारने अणूउर्जेचे महत्व सांगण्यासाठी कामाला लावले होते. पण काकोडकरसदृश्य जपानी तथाकथीत अणूउर्जा प्रचारकांना जपानी जनतेनेच नामोहरम केले. फुकूशिमामध्ये अणूउर्जेच्या प्रकल्पात समुद्रातील भूकंप आणि त्सुनामीमुळे लागोपाठ फटाक्यांसारखे स्फोट झाले. प्रकल्पामध्ये उभारलेल्या अणूउर्जा सयंत्राला आगी लागल्या. या आगी विझवता विझवता जपानी सरकारला नाकीनऊ आले. अणूउर्जा सत्रंयाचे तीन-तेरा तर वाजलेच पण दूरवर पसरलेल्या भूभागावर आणि लोकांवर या स्फोटातून निर्माण झालेल्या किरणोत्साराचे अतिशय वाईट परिणाम जपानी जनतेला तात्काळ भोगावे लागले. ७० ते १०० कि.मी.च्या परिसरात किरणोत्सर्ग झाला. पिण्याचे पाणी देखील किरणोत्साराने बाधित झाले. ५० कि.मी.च्या परिसरातील लोकांना आपली घरे-दारे सोडून जावे लागले.
     अमेरिकी सरकारने तर जपानमधील अमेरिकी नागरिकांना फुकूशिमापासून १०० कि.मी.च्या बाहेर स्थलांतर करण्यास सांगितले. समुद्रातील पाण्यात झालेल्या किरणोत्साराचा परिणाम समुद्रातील मत्स्यजीवनावर झाला. जपानमधील मासे आणि फळभाज्या इ. किरणोत्साराने बाधित झालेले पदार्थ आयात करु नयेत अशी परिस्थिती निर्माण झाली. या सर्व परिस्थितीचा आढावा जपानी जनतेने घेतला. अणूउर्जा आता आम्हाला नको अशी स्पष्ट भूमिका जपानी जनतेने तसेच जपानमधील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये काम करणा-या संशोधकांनी घेतली. आपण निसर्गातील अन्य उपलब्ध साधनांपासून उर्जा तयार करुया असे अनेक पर्याय सरकारपुढे मांडले आणि त्याचा परिणाम होऊन शेवटी जपानच्या सरकारला अणूउर्जा प्रकल्प, ज्या प्रकल्पातून जपानच्या एकूण उर्जेच्या गरजे पैकी ३० टक्के गरज भागविली जात होती, हे सारे ५० प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आज तरी जपानच्या सरकारला घ्यावा लागला.
     दुस-या महायुद्धात अणूबॉम्बच्या वर्षावामुळे बेचिराख झालेले जपान जनतेच्या श्रमाने गेल्या ५० वर्षात परत एकदा उभे राहिले. त्याच ताकदीने अणूउर्जेला पर्याय उभे करण्याची धमक जपानी जनता पुढील एक दशकात दाखवेल याबद्दल कोणाच्या मनात शंका उभी राहण्याचे कारण नाही.
     आपल्या देशात हर माणसाला जेमतेम ३ टक्के अणूउर्जा गेल्या ७ वर्षांच्या करोडो रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीनंतर मिळत आहे. जपानने जनतेचे हित लक्षात घेऊन ३० टक्के अणूउर्जेवर लाथ मारली, तर आपल्या देशात ३ टक्के उणूउर्जेला अनेक पर्याय निर्माण करण्याची संधी नैसर्गिक साधनसामग्रीने दिली आहे. त्यापैकी सौरउर्जा, पवनउर्जा, समुद्राच्या लाटांपासून निर्माण होणारी उर्जा, जलविद्युत असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जपान हा आपल्या खंडातील आशियाई देश आहे. आपणही आशिया खंडातील आहोत. जपानमध्ये अणूउर्जा निर्माण करणा-या अनेक कंपन्यांचे दडपण जपानी सरकारवर होते. पण जनक्षोभापुढे या कंपन्या आणि जपानचे सरकार काही करु शकले नाहीत. आपण जपानपासून काही धडा घेणार आहोत का? हा प्रश्न भारतीय जनतेसमोर उत्तरासाठी उभा आहे.
- प्रा. गोपाळ दुखंडे, ९८६९९४९०२५

मुलं
     लग्नाच्या अनेक हेतुंपैकी, मुलं होणं म्हणजेच पर्यायाने वंश सातत्य हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा हेतु असतो तसंच वैयक्तिक पातळीवरही मुलं होणं आणि मुलं वाढवण्याचा आनंद आणि त्याबरोबरच त्रास किवा जबाबदारी घेणं हा ही लग्न संस्थेचा एक प्रमुख हेतु असतो.
     त्यामध्ये सुद्धा मुलं नको, तीन मुलं असावीत, पहिलाचा मुलगा झाला, पहिलीच मुलगी झाली तर एकच पुरे.अशी अनेक मतं असू शकतात.
     काही नकारात्मक, अभद्रही वाटणा-या भविष्याबाबत कधीतरी मनात विचार करणं शक्य असतं. कारण आपल्यापैकी एकाची मुल होण्यासाठी आवश्यक असणारी शारिरीक क्षमता नसेल तर, किवा मतिमंद मूल जन्माला आलं तरी त्याला जगवायचं की नाही हा निर्णय कधीकधी ऑपरेशन थिएटरमध्ये त्याक्षणी घेणं जरुर असतं. त्यासाठी आधी विचार केलेला असला तर काही वाईट नाही. कारण, माणसाचं आयुष्य हे नकारात्मक, सकारात्मक, आनंददायी, त्रासदायक अशा दोन्ही प्रकारच्या घटनांनी भरलेलं असतं. त्यामुळे वास्तव स्विकारतांना कटुता टाळून योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले तर जगणं थोड अधिक सोपं आणि अधिक आनंददायी करता येतं.
     आजच्या परिस्थितीत मुलं जन्माला घालतांना आपलं दोघांच करिअर, आर्थिक परिस्थिती आणि आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे किमान पहिली १ ते २ वर्षे बाळाला सांभाळण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार त्या त्या वेळी करता आला पाहिजे.
     आपल्याला मुलं हवच आहे. आपल्याला नाही होऊ शकलं तर दत्तक घ्यायचं. पण कुटुंबात आपलं मुलं हवच याविषयी ठामपणा असेल तर जोडीदाराशी याविषयी बोलता आलं पाहिजे. जेणेकरुन त्यानेही या विषयावर कधी विचार केला नसेल तर त्याची विचार करण्याची तयारी आहे किवा नाही किवा यासंबंधी काय विचार आहेत ते समजून घेता येईल.
     सुमारे ५०/६० वर्षापूर्वीच, कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते श्री.र.धो. कर्वे यांनी आपल्याला मुल नकोअसं आपल्या पत्नीला सांगितलं होतं आणि तिने ते ऐकलही होतं. मानलही होतं. पण आता आजच्या काळात जोडिदार स्त्री जर स्वतंत्र विचारांची, आर्थिदृष्ट्या सक्षम असेल तर तिच्यावर हे मत ऐकण्याची सक्ती ती सहजपणे नाकारु शकेल आणि विवाह करण्यापूर्वीच जर ह्या गोष्टींबाबत चर्चा करुन ती समजली तर दोघांचाही पुढचा मनस्ताप टळेल.
     काहींच्या मते मुलं हे आपल्या जगण्याचं एक अत्यंत आव्हानात्मक असं उद्दिष्ट असतं. स्वतःचा कस लावून घेण्याची ती एक परिक्षा असते. मुल जर गुणवंत, यशवंत निघालं तर जगण्याचं सार्थक होतं. एका नव्या जीवाला चांगल्या जगात आणल्याच किवा आपल्यातून निर्माण झालेल्या जीवाने जगाचं काही भलं केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो.
     सावित्रीबाईंसारखी मुलगी किवा सचिन तेंडुलकर -सारखा मुलगा झाला तर कुठल्या आईबापाला आनंद झाल्याशिवाय, जीवनाच सार्थक झाल्याशिवाय राहील.
- वंदना करंबेळकर, समुपदेशक - मोबा. ९८५०४७३०१२

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कै. महाबळेश्वर मोर्जे - उत्साहाचा झरा
कोकणाला बुद्धिमत्तेचे नि प्रतिभेचे वरदान लाभले आहे. लाल मातीत हिरवागार निसर्ग फुलतो तर अथांग सागर मनाला विशाल बनवतो. अशा वातावरणात कायदेतज्ञ महाबळेश्वर मोर्जे यांचा जन्म वेंगुर्ले येथे १९३५ साली झाला. मोर्जेंचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले-नवाबाग येथे झाले तर माध्यमिक शिक्षण पाटकर हायस्कूल वेंगुर्ले,हुबळी व मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले आणि मुंबईत वकिली सुरु केली. ज्येष्ठ वकिल आर.सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या.जी. एन. वैद्य यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. वकिली करत असतांना गव्ह.लॉ कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच असि.गव्हर्नमट प्लिडर म्हणून काम करतांना त्यांनी काही महत्त्वपूर्ण केसेस कुशलतेने हाताळल्याबद्दल सरकारकडून प्रशंसा मिळाली. १९८७ मध्ये ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांचे सदस्य होते. त्यांचे वडिल बंधु श्री. आप्पा मोर्जे यांचा सुरुवातीच्या काळात त्यांना आधार मिळाला.
     त्यांनी अनेक मराठी दैनिकांमधून गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भातील कायदेया विषयावर स्तंभलेखन केले होते. दूरदर्शन, रेडिओ याद्वारे त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भातील प्रश्नोत्तरांचे अनेक कार्यक्रम केले. फंडामेंटल ड्युटी, पंचायत राज, जनहित याचिका आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली होती. आणीबाणीच्या दरम्यान मिसा कायद्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची श्रीमती इंदिरा गांधी यांनीही प्रशंसा केली होती. तसेच वकिलांच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी अनेक परदेशी दौरे करुन तेथील गृहनिर्माण क्षेत्राचा व कायदेकानून विषयांचा अभ्यास केला व  सरकारला उपयुक्त अहवाल सादर केले.
     शहरातील मराठी माणूस उपनगरांकडे फेकला जात आहे, याची खंत त्यांना होती. १९८३ मध्ये स्थापन केलेल्या फ्लॅट ओनर्स असोसिएशनमार्फत त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांची तड लावली होती. रजिस्टेशन फी, स्टँप ड्युटी भरण्याचे सुलभीकरण, भाडेकरु कायदा सोपा करणेआदी सुधारणांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या शेरिफ समिती तसेच द.म.सुखथनकर समिती यांच्यावरही त्यांनी काम करुन महत्त्वपूर्ण सूचना केला होत्या.
     आपल्या वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीलाही ते तेवढेच महत्त्व देत असत. आय लव्ह मुंबईया समितीचे ते ट्रस्टी होते. मुंबईचे माजी शेरिफ नाना चुडासामा व तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी.अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामासंबंधी त्यांचा गौरव झाला. सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातूनही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
     कोकण आणि कोकणी माणसाबद्दल त्यांना आपुलकी होती.  ते वेंगुर्ल्यात आल्यानंतर शालेय मुलांसाठी साहित्याचे वाटप करत असत. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेल्या नवाबाग शाळेचा शतकमहोत्सव त्यांनी अनेक मान्यवरांना वेंगुर्ल्यात आणून साजरा केला होता. बॅ.नाथ पै विक्रोळी विद्यालय येथील मुलांसाठी मुलभूत कर्तव्येया विषयावर वक्तृत्व स्पर्धा ठेऊन दरवर्षी ते पारितोषिके देत असत.
   वयाच्या ७६व्या वर्षी त्यांचे ३०/४/२०१२ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत झालेल्या शोकसभेला वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या परिचयाची मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. महा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुस्ताक अंतुले, आमदार दिवाकर रावते, न्यायमूर्ती पाटणकर, बिल्डर्स अवरसेकर, वकिल मंडळी,पाटकर हायस्कूलमधील त्यांचे बालमित्र सुमन खानोलकर, पी.ए.मडकईकर, सगुण (आबा) नाईक आदी उपस्थित होते. उदयोन्मुख अशा अनेक वकिलांना त्यांनी वकिली व्यवसायात मार्गदर्शन करुन पुढे आणले. मोर्जे साहेबांच्या आठवणी सांगतांना त्यांना आपले अश्रु आवरणे मुश्किल झाले. त्यांच्या मुलींनी आपले दुःख आवरुन मोर्जे साहेबांचा जीवनपट स्लाईड शोच्या माध्यमातून उघड केला याचे सर्वांनी कौतुक केले. मोर्जे यांना वेंगुर्ले येथे यायचे होते. परंतू त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांना आणता आले नाही याची खंत त्यांचे पुतणे अॅड. श्रीकांत मोर्जे यांनी व्यक्त केली. मोर्जे यांच्या पत्नी सुमन यांचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या कन्या अॅड.शिल्पा, इंजिनिअर प्रज्ञा, वास्तुशास्त्रज्ञ पूजा या तिन्ही कर्तबगार मुलींनी आपल्या वडिलांचे कार्य पुढेही चालू राहिल असे सांगितले. अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत याची सर्वांनी हळहळ व्यक्त केली.  
शब्दांकन - श्री. बापू गिरप, गोरेगांव-मुंबई. मोबा.९९२०९५५१७५

विशेष बातम्या *
सिधुदुर्गात पाणी टंचाई पाठोपाठ दूषित पाण्याचे संकट
     सिधुदुर्गातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याच्याच जोडीला एप्रिल अखेरीस झालेल्या तपासणीत १३०८ पैकी १४३ पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यात पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे ४०० जलसुरक्षा रक्षक पाणी पुरवठा योजनांचा प्रचार आणि प्रसार यासाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर पाणी शुद्धीकरणाची जबाबदारीही आहे. त्यांना दरमहा ५००० रु. मानधनही दिले जाते. मात्र या सुरक्षा रक्षकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने पाणी स्रोत शुद्धीकरणाचे काम होत आहे की नाही याकडे लक्ष दिले जात नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक ग्रामपंचायतींना जलसुरक्षा रक्षकहा काय प्रकार आहे हे माहितच नाही. दरम्यान या कर्मचा-यांच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश जि.प. अध्यक्ष निकीता परब यांनी दिले आहेत.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतले पाट येथील श्री रवळनाथाचे दर्शन
     मुंबई-ठाणे महानगर पालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पाट येथील रवळनाथाच्या दर्शनास येतील, असे गा-हाणे मुंबई येथे भरलेल्या मालवणी जत्रौत्सवात घालण्यात आले होते. नवसफेड करण्यासाठी श्री. ठाकरे ६ रोजी हेलिकॉप्टरने आले. त्यांनी श्री देव रवळनाथ, श्री देवी माऊली व परुळेच्या श्री वेतोबाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दूर होऊन बहरलेला दिसावा असे साकडे त्यांनी श्री देव रवळनाथ चरणी घातले.
     माजी खासदार व सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयास सदिच्छा भेट दिली.  यावेळी त्यांच्यासमवेत मुंबईचे महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे, सचिव विनायक राऊत, गुरुनाथ खोत, नगरसेवक नाना आंबोले, आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख वैभव नाईक, जिल्हा संफ प्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख एकनाथ नाडकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

खा. एकनाथ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार
सारस्वत बँकेचे संचालक व माजी खासदार एकनाथ ठाकूर यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मॅक्सेल फाऊंडेशनया संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. मॅक्सेल फाऊंडेशनच्या वतीने कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना महाराष्ट्र कॉ. पेरिट एक्सेलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सोहळा ६ मे रोजी नरिमन पॉईंट एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये संपन्न झाला.

तुळस येथील जैतिर उत्सव २० मे पासून
     वैशाख महिन्यातील दर्श अमावस्येला तुळस येथील प्रसिद्ध जैतीर उत्सव होतो. यावर्षी २० मे रोजी उत्सवास सुरुवात होऊन २९ मे रोजी कवळासाने उत्सवाची सांगता होईल. या उत्सवास परिसरातील, मुंबईनिवासी जैतिराचे भक्तगण बहुसंख्येने उपस्थित रहातात. उत्सवानिमित्त भरणा-या जत्रेत शेती अवजारांची मोठी उलाढाल होते.

Sunday, 6 May 2012

अंक १७ वा, ३ मे २०१२


संपादकीय -

मायबोलीची भरारी

   साप्ताहिक किरातचा हा भरारी विशेषअंक. मागील वर्षी मूळच्या कोकणातील असलेल्या अनेकांनी बाहेर जाऊन, अगर आपल्याच गावात राहून स्वकर्तृत्वाने स्वतःचे उद्योग विश्व उभारणा-या व्यक्तीमत्त्वांची माहिती दिली होती. तेव्हा प्रत्येकवर्षी मे महिन्यात या स्वरुपाचा अंक प्रकाशित करावा अशा आशयाच्या अनेकांच्या सूचना फोन, पत्रातून व्यक्त झाल्या.
      यंदाच्या भरारी विशेषअंकामध्ये केवळ उद्योग - व्यवसाय एवढीच मर्यादा न ठेवता, नोकरी, व्यवसाय, सैन्यदल अशा विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या व्यक्तीमत्त्वांची ओळख करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्व मुलाखत घेतलेल्या मंडळींमध्ये एक धागा समान आहे तो म्हणजे सर्वांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत म्हणजे मराठी माध्यमातून झाले आहे. यामध्ये एपीकॉन्स कन्सल्टन्स् प्रा. लि. चे संचालक अरविद परुळेकर, मनोविकारशास्त्रज्ञ अनिल डोंगरे, महिद्रा ग्रुपचे सी.ई.ओ. प्रशांत कामत, बांधकाम व्यवसायात गुजराथपासून कोकणपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे रघुवीर तथा भाई मंत्री, लेफ्टनंट कर्नल संजीव पटवर्धन, इन्साईट क्वॉलेटी सव्र्हसेसचे दिवाकर जोशी, कम्प्युटर म्हणजेच संगणक प्रणालीमध्ये विशेष कौशल्य प्राप्त केलेल्या देश - विदेशात नामांकीत कंपन्यांसोबत काम केलेल्या श्रृती संकोळी, आरती खटखटे, एक्सेल क्रॉप केअरचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अरुण धुरी, स्टर्डी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक सहदेव दीपनाईक, स्टर्लिग ऑईल इंडस्ट्रीजचे अजय गावडे या व्यक्तीमत्त्वांच्या मुलाखती आहेत. स्वतःच्या जडणघडणीबद्दल सांगतांना, मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत भाषा महत्त्वाची की शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा याविषयी आपली मते व्यक्त केली आहेत. सर्वांची माध्यमिक शिक्षणे ही मराठी माध्यमात झाली आहेत. त्यांचा पाया पक्का असल्याने ही मंडळी आपापल्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु शकली. जगाच्या व्यवहाराची भाषा इंग्रजीही सर्वांनी प्रयत्नाने आत्मसात करुन घेतली.
      मुलाखतींची प्रश्नावली तयार करतांना श्रुती संकोळी यांनी शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मराठी माध्यमात शिकून आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावे लागले का? अशाप्रकारे माध्यम निवडीच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील, यावर विशेष लक्ष केंद्रित केले. यामधील बहुतेक सर्वांनी प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा म्हणजे मराठी असावे असे सांगितले आहे किवा माध्यमाला महत्व नाही तर तुम्हाला विषय नीट समजला आहे ना? हेच महत्त्वाचे असल्याचे म्हटलयं. आपल्या क्षेत्रात टॉपच्या असणा-या या मंडळींनी प्राथमिक शिक्षणात आपला पाया पक्का असल्याने, पुढील शिक्षण घेतांना कोणतीही अडचण आली नाही आणि त्यामुळे आपण या स्थानावर पोहोचल्याचे मान्य केलयं.
      या भरारी विशेषअंकामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्वांची ओळख करुन देतांना शिक्षणाचे माध्यम मातृभाषा म्हणजे मराठी की इंग्रजी यावरविशेष भर देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, अलिकडच्या काही वर्षांत अगदी ग्रामीण भागात देखील पालकांच्या तोंडून यू नो, आपली मुलं, स्मार्ट व्हायची असतील, काँम्पिटीशनमध्ये सक्सेस मिळविण्यासाठी इंग्लिश मिडियमशिवाय पर्याय नाही.असे भाषेचे मिक्सचर ऐकायला मिळते. तर मराठी माध्यमात (अगदी पहिलीपासून इंग्रजी विषय असूनसुद्धा) शिकणारी मुले, त्यांचे पालक आपण कुठेतरी कमी तर पडत नाही ना? अशा न्यूनगंडात असतात. यामध्ये कोणत्याही भाषेला कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाही तर शिक्षणामध्ये माध्यम कोणते निवडावे, आपल्याला काय जमेल, यांची काही उत्तरे मुलाखतींमधून मिळतील.
      मुलाखतींची मांडणी मुद्दामच आत्मकथन पद्धतीने ठेवली आहे. जेणेकरुन मुलांना, वाचकांना, स्वतःशी त्यांना जोडता येईल. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर या सर्वांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे अशी मते लिखाणातून, भाषणातून मांडली आहेत. मुळात जर पाया पक्का असेल, विषयाचे ज्ञान चांगले असेल तरच पुढच्या शिक्षणाची वाटचाल सुकर होते. कोणतीही भाषा प्रयत्नाने शिकता येते, सरावाने सफाईदारपणे बोलणेही शक्य होते. आता तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हा विषय आहे. घरी पालकांनी जर मुलांना इंग्रजी वाचनाचा सराव दिला, इंग्रजी पेपरचे वाचन ठेवले तर मुले इंग्रजी या भाषेत संवाद साधायला कुठेच कमी पडणार नाहीत. पण केवळ इंग्रजीच्या आकर्षणापायी मराठीचा बळी देण्याची काही गरज नाही.
   या विशेष अंकाचे प्रकाशन निरामय संस्था, कोलगांव येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिबिरामध्ये होणार आहे. निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणा-या या अंकांच्या प्रती वितरीत केल्या जाणार आहे.
किरात ट्रस्टच्या उपक्रमाविषयी
  किरात ट्रस्टतर्फे गेल्यावर्षीपासून सिधुदुर्गातील निवडक शाळांमध्ये, तथापी ट्रस्ट पुणेच्या मदतीने शरीर साक्षरताहा उपक्रम राबविला जात आहे. किरातच्या या अंकाचा निर्मिती खर्च वगळता जाहीरात अगर देणगीमधून मिळणारी रक्कम ट्रस्टच्या शरीर साक्षरता या उपक्रमासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे या मुलाखती (इंटरव्ह्यु) सशुल्क मुलाखती नाहीत. हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
   या अंकासाठी प्रश्नावली बनविण्यापासून मुलाखत शब्दांकन भाषांतर करण्यासाठी श्रुती संकोळी पूर्वाश्रमीच्या स्मिता करंदीकर, प्रसाद घाणेकर, वंदना करंबळेकर, उपेंद्र मांजरेकर, शशांक मराठे यांच्या प्रयत्नातून हा अंक साकारला आहेत.
  किरात ट्रस्टच्या शरीर साक्षरता उपक्रमाला जाहीरात अगर देणगीच्या माध्यमातून सहकार्य करणा-या सर्व मुलाखत देणा-या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
   या अंकावरील वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

भरारी विशेष *

छोट्या उद्दिष्टांनी जगणे करा आनंददायी

      माझं नाव अरविद श्रीपाद परुळेकर.मी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमधून १९८१ साली दहावी व १९८३ साली बारावी सायन्स उत्तीर्ण झालो. पुढे मुंबईला सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून सीई (सिव्हिल इंजिनअरिग) १९८७ साली व बडोद्याच्या महाराजा सयाजीरावच विद्यापिठामधून एम.ई. (इंजिनिअरींग) १९८९ साली पूर्ण केले. मी एपीकॉन्स कन्सल्टन्स प्रा. लि.या मुंबईस्थित कंपनीमध्ये संचालकम्हणून काम पहातो. आमची कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या अभियांत्रिकी प्रकल्पांना आमच्या विषयांमध्ये सल्ला देण्याचे काम करते. आमच्या कंपनीमध्ये एकूण १२५ लोक काम करतात.
      खरं म्हणजे हा पल्ला गाठण्यासाठी मला कोणतेही विशेष परिश्रम करण्याची कधी गरजच भासली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या त्या वेळी मनाला भावलेला निर्णय, परिणामांचा विचार न करता घेत गेलो. ते निर्णय योग्य ठरत गेले. काही चुकीचे असूही शकतील, पण त्यांचा कधी विचारच केला नाही, त्यामुळे कधी कुठलीही खंतच वाटली नाही. खरं सांगायचं म्हणजे मुळात कुठली मोठी महत्त्वाकांक्षाच नव्हती. आताच्या जीवघेण्या स्पर्धेच्या व राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या युगात कदाचित माझे म्हणणे अस्थायी वाटेल, पण छोटी छोटी तत्कालिक उद्दिष्टे समोर ठेवून जर आपण जगलो, तर यशस्वी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते आणि मुख्य म्हणजे जगणे आनंददायी होते.
      दृढ डदृद्वद्धद्मड्ढ, या प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो व याचे संपूर्ण श्रेय हे माझ्या अर्धशिक्षित पण शिक्षणाचे महत्त्व कळलेल्या माझ्या पालकांकडे व इतर वडीलधा-या कुटुंबियांकडे जाते. कां कोण जाणे, पण कळत्या वयापासून, माझ्या कुठल्याही शैक्षणिक निर्णयाची घरी कधी चर्चाच झालेली मला आठवत नाही. आठवतात ते फक्त आलेले मदतीचे हात. किती नावं घेऊ? आईवडील, माझा मोठा भाऊ व बहिण, इतर नातेवाईक, माझी सुंदर शाळा व शिक्षक, प्रागतिक विचार जोपासणारे मालवण शहर, माणूस म्हणून घडणारं राष्ट्रसेवा दल आणि माफक दरात, जवळजवळ मोफतच, उत्कृष्ट प्रतीचे अभियांत्रिकी शिक्षण देणारे मायबाप सरकार या सर्वांनी केलेली मदत व दिलेला आत्मविश्वास या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.
      माझं शालेय जीवन म्हणजे एक आनंददायी काळ होता. आत्ता विचार केला तर त्यावेळीची घरची गरिबी जाणवते, पण त्यावेळी कधीच जाणवली नाही. कारण, काही गरजाच नव्हत्या आणि तुलना करायलाच काही नव्हतं. वर्गात भरपूर श्रीमंतांची मुलं असूनसुद्धा असं कधी जाणवलं नाही. कारण, असं काहीच नव्हते की, जे त्यांच्याकडे होतं आणि माझ्याकडे नव्हतं. आमचं जगचं वेगळं होते. मला अजूनही मालवणमधील घरात घालवलेला रिकामा वेळ आठवत नाही. कारण घरात कधी मी नसायचोच. ८वी - ९वी नंतर तर संपूर्ण अभ्याससुद्धा आम्ही एकत्र शाळेतच करु. आमच्याबरोबर त्यावेळी सर्वप्रकारची मुलं असायची. अभ्यासू, खोडकरव्रात्य, गुंड प्रवृत्तीची. त्यामुळे अभ्यासाबरोबरच वयानुरुप इतर धमाल असायचीच. पण आमच्या पालकांना कधी वाईट संगतीच्या परिणामांची भिती वाटली नाही किवा त्यामुळे एखाद्या अभ्यासू मुलाचं नुकसान झाल्याचं पण उदाहरण घडले नाही. ह्या सर्वांमुळे व त्याबरोबरील अवांतर वाचनाने माझं अनुभव विश्व मात्र समृद्ध होत गेले. इ. ५वी ते १२वी पर्यंत माझी लायब्ररी अखंड चालू होती. त्यात कधी परिक्षेच्या दिवसांचा पण खंड पडला नाही. जे जे मिळेल ते ते वाचत गेलो. त्याचा पुढील आयुष्यात आत्मविश्वास येण्यासाठी फार उपयोग झाला.
      माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले. मी स्वतःला सुदैवी समजतो की आमच्यावेळी आमच्या पालकांसमोर दुसरा कुठला पर्याय नव्हता.
      वेळोवेळी अनेक शिक्षणतज्ञांनी सिद्ध केलेले आहे की, मुलांच्या मूलभूत शिक्षणाच्या वयात विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या वयात, मातृभाषेतून झालेलं विषयाचे आकलन हे जास्त परिणामकारक व टिकाऊ असते. हे त्यावेळी माहित नसूनसुद्धा आम्ही मराठी माध्यमात शिकलो. मला सांगायला अभिमान वाटतो की, पुढील शिक्षणात किवा करिअरमध्ये त्याचा काहीही तोटा झाला नाही. यात इंग्रजीचे महत्त्व कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही. इंग्रजी ही पुढील आयुष्याची ज्ञानभाषा आहे व तिच्यावर प्रभुत्व मिळणे ही काळाची गरज आहे. पण खरं म्हणजे त्याचा व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा काहीही संबंध नाही, हे जाणून घ्यायची गरज आहे.
  हा संबंध लावला जातो. कारण आकलनाचे माध्यम (ग्ड्ढड्डत्द्वथ्र् दृढ द्वदड्डड्ढद्धद्मद्यठ्ठदड्डत्दढ) आणि संवादाचे माध्यम (क्दृथ्र्थ्र्द्वदत्डठ्ठद्यत्दृद ग्ड्ढड्डत्द्वथ्र्) यामध्ये असलेला फरक आपण लक्षात घेत नाही आहोत. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. शालेय शिक्षणामध्ये आकलनाचे माध्यम हे महत्त्वाचे आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांना माध्यमाचा काहीच फरक पडत नाही, पण सर्वसाधारण मुलांना आकलनाची भाषा जर नेहमीची बोलीभाषा नसेल तर ते पूर्ण पोचत नाही व नंतर ती मुले वरवरच्या अभ्यासावर, तयार उत्तरांवर व पाठांतरावर भर देतात. याउलट संवादाचे माध्यम हे एक स्किल आहे व ते प्रयत्नपूर्वक मिळवता येते. त्यासाठी मराठीचा बळी देण्याची आवश्यकता नसते. आमच्या नंतरच्या पिढीतील सुद्धा अशी बरीच मुलं मला माहित आहेत, ज्यांनी मराठी माध्यमात शिकून इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व मिळवलं आहे. ती दोन्ही माध्यमातून संवाद साधू शकतात. याउलट सर्वसाधारपणे इंग्रजी माध्यमातील मुलांचा मराठी शब्दसंग्रह फारच तोकडा असल्यामुळे, ती जरी मराठी बोलत असली, तरी मराठी वर्तमानपत्र वाचण्यात सुद्धा त्यांना अडचणी येतात.
      माझ्यापुरतं बोलायचं झालं तर महाविद्यालयामध्ये मराठीतून इंग्रजी माध्यमात शिरतांना मला कसलाच त्रास जाणवला नाही. त्याची दोन कारणं आहेत. अभ्यासापुरतं किवा अभियांत्रिकी विषयांबद्दल बोलायचं म्हणजे, ते समजण्यापुरतं इंग्रजी मला नक्की येत होतं. माझी खात्री आहे की, ते सर्व मराठी माध्यमाच्या मुलांना व्यवस्थित येत असतं. मुलांना भीती वाटते ती संवादाच्या माध्यमाची. आपल्याला इंग्रजी नीट बोलता येत नाही याचा न्यूनगंड ब-याच मुलांच्या मनात असतो. त्यामुळे सर्व नुकसान होते. खरं म्हणजे अशा न्यूनगंडाची काही गरज नसते. महत्त्वाच्या असतो तो तुमचा आत्मविश्वास आणि माणसं जोडण्याची कला. एकदा का जीवाभावाची मित्रमंडळी तुम्ही जमवलीत की संवादाच्या माध्यमाचं महत्त्व संपून जाते व उरते फक्त निखळ मैत्री व पुढची चार वर्षे कशी भुर्रर्र उडून जातात ते समजत पण नाही. या सर्व काळात तुम्हाला इंग्रजी संभाषण सुधारण्याच्या भरपूर संधी मिळतात व कॉलेजमधून बाहेर पडतांना त्यांच्यामध्ये व तुमच्यामध्ये काहीही फरक नसतो.
      पुढे करियरमध्ये तर सेल्स / मार्केटिग सारख्या काही ठराविक संधी सोडल्या तर इतर क्षेत्रांमध्ये तुमच्या इंग्रजी संभाषणाच्या प्रभुत्वाला काहीही किमत नसते. अर्थात, आधीच सांगितल्याप्रमाणे ते प्रयत्न करुन मिळवता येते आणि ते मिळविले तर फायदाच होतो. पण तुमचे तुमच्या क्षेत्रातले मूलभूत ज्ञान (एठ्ठद्मत्ड) जर पक्कं असेल तर तुम्ही किती सराईतपणे इंग्रजी बोलता किवा नाही ह्याचा काहीही फरक पडत नाही. हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो कारण मी सतत इंटरव्ह्यूज घेत असतो.
      दुर्दैवाने आता प्राथमिक शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल वाढत चाललाय व मराठी माध्यमाच्या शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. त्या वाचविण्यासाठी आपण काय करु शकतो असं मला विचारलं गेलंय. मी यावर असं सांगेन की, शाळा वाचविण्यासाठी नव्हे, तर आपल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण मराठी माध्यमाची निवड करायची गरज आहे. आपण सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला तर शाळा आपोआपच वाचतील.
      एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. इतरांना पटवायचं असेल तर स्वतः उदाहरण होते गरजेचे आहे. मला इथे सांगायला अत्यंत आनंद होतोय की, माझा मुलगा ठाण्यात मराठी माध्यमाच्या एका उत्कृष्ट शाळेत शिकतोय. इतर अनेक सर्व मार्ग उपलब्ध असतांना (व परवडत असतांना) आम्ही दोघांनी जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता व त्याची सध्याची सर्वांगीण प्रगती पहाता आम्ही तिघेही त्याबद्दल अत्यंत आनंदात आहोत. तो सध्या आठवीत आहे. त्याच्या शाळेमध्ये मुलांमध्ये इंग्रजी संभाषणात प्रभुत्व मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तो उत्तम मराठी बोलतोच. पण रोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचतो. लायब्ररीतून आणून त्याच्या वयाला अनुरुप इंग्रजी पुस्तकेपण वाचतो.
   मला वाटतं पालकांना वेगळा सल्ला द्यायची गरज नाहीय.

यशस्वी होण्यासाठी हवी मूल्यांवर निष्ठा!

मी, प्रशांत कामत. (खूप जण मला पप्याया नावाने ओळखतात.) सध्या महिद्र ग्रुप या महिद्र इंजिनिअरींग सव्र्हसेस लि. या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
      कठोर मेहनत, सचोटी व एकात्मता आणि लक्ष्यकेंद्री दृष्टिकोन या त्रिसूत्रीमुळेच मी या पदाला पोहोचलो आहे. ही माझी जीवनमूल्ये आहेत. यातल्या कोणत्याही एका अथवा तिन्ही मूल्यांची कसोटी पाहणारे प्रसंग माझ्यावर आले त्यावेळी निर्णय घेणे कठीण जाऊ शकले असते. पण या तिनही मूल्यांवरची माझी अविचल निष्ठा मनातला गोंधळ कमी करत तर्कशुद्ध निर्णय घेण्यास सहाय्य करीत आली आहे.
      एखाद्या कंपनीत काम करत असताना ब-याच वेळा विशिष्ट व्यक्तीकरता काम की कंपनीच्या उद्दिष्ठांसाठी काम या द्वंद्वात सापडण्याची चूक लोक करतात. खूप वेळा अशी परिस्थिती येते की, इतरांच्या विरोधात जाऊनही तुम्हाला मूल्ये जपण्यासाठी ठाम उभे रहावे लागते आणि या परिस्थितीवर इतरांचे बारीक लक्ष असते. अशा वेळी तुम्ही कसे वागता, कशा प्रतिक्रिया देता यावर तुमचे यश-अपयश अवलंबून असते. उदाहरणादाखल आपण असे मानू- कंपनीच्या मूल्यांशी तडजोड करावी लागले किवा हातात जो प्रकल्प आहे त्याला यामुळे कोणतीही मदत होणार नाही अशी मला खात्री आहे असे काहीतरी मी करावे ही माझ्या वरीष्ठांची अपेक्षा आहे. अशा वेळी मी कसे वागावे? माझे स्पष्ट मत वरीष्ठांना सांगावे? ते पटवून देऊन त्यांच्या मतात बदल करावा? काहीच मत व्यक्त न करता त्यांच्या सांगण्याप्रमाणे करावे की मला जे पटले नाही ते करण्यास ठाम नकार द्यावा? चर्चेसाठी आणि सकारात्मक बदलासाठी स्वागतशील असणे, बदलत्या परिस्थितीत/ वातावरणातही मूल्यांविषयी आग्रही असणे आणि तुमची टीम, तुमचे सहकारी आणि वरीष्ठ यांच्याशी सुसंवाद असणे सर्वोच्च पदापर्यंत पोचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
      मी आत्ता ज्या पदावर आहे आणि आत्तापर्यंत जे मिळविले आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आणि समाधान आहे, पण मी अजूनही अतृप्त आहे. माझ्या अतृप्तीचे कारण शोधायचे तर मला अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जच्या स्टे हंग्री, स्टे फुलीशया उद्गारांचा आधार घ्यावा लागेल.
      ‘यशयाबद्दल बोलण्यापूर्वी माझी यशया संकल्पनेची व्याख्या करु द्या. या मुलाखतीसाठी मी जेव्हा लिहीतो आहे तेव्हा व्यावसायिक यशस्विताएवढाच मर्यादित अर्थ मला अपेक्षित आहे. हा खुलासा करणे आवश्यक वाटते. कारण यशाची अनेक परिमाणे असतात. मी केवळ एका छोट्या परिणामाबद्दल लिहीतो आहे.
      कुणीतरी कधीतरी मला यशाचे एक सूत्र सांगितलेः कौशल्य न् इच्छा न् संधी हा गुणाकार म्हणजे यश. यातला शेवटचा गुणक संधी‘. याची खूप लोक योगायोग / योग येणे अथवा सुदैव याच्याशी गल्लत करतात. माझा अनुभव मला असे सांगतो की, वरील सूत्रात दैवाचा वाटा असलाच तर अंशमात्र किवा अजिबात नाही. माझ्या कॉर्पोरेट जगातील अनुभवावरुन मी अशा निष्कर्षापर्यंत आलो आहे की, खरी वानवा आहे ती पहिल्या दोन गुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तींची. जर एखाद्याकडे हे दोन्ही गुण असतील तर ती व्यक्ती फार काळ दुर्लक्षित रहात नाही. आपल्या प्रयत्नांनी आपण कौशल्य आत्मसात व वृद्धिगत करु शकतो (म्हणून कठोर मेहनत आवश्यक) व इच्छाशक्तीने इच्छा वाढवू शकतो. (यासाठी लक्षकेंद्री दृष्टीकोन आवश्यक) असा आपला ठाम विश्वास असेल तर हे सहजसाध्य आहे.
      माझे आई-वडील (प्रमिला व प्रभाकर कामत) आणि आजोबा (रामचंद्र कामत) जे लहानपणी माझ्या आई-वडीलांइतकेच माझे गुरु-मार्गदर्शक होते. आताच्या स्थानापर्यंत पोहचण्याच्या प्रवासात मला मदत करणारे व मी निर्धारीत पथावरुन ढळू नये यासाठी सदैव सावध असलेले माझी मित्रमंडळी यांना मी माझ्या यशाचे श्रेय देईन. नंतरच्या काळात माझी पत्नी आणि मुलगी ज्यांनी कधीच माझ्या करीअरसाठी एकाग्र होण्यावर आणि त्यासाठी घरापासून दूर रहाण्यावर तक्रार केली नाही. (क्वचितच जेव्हा कधी त्याबद्दल कुरकुर/तक्रार केली तेव्हा मी त्यांचे त्यामागचे माझ्याबद्दलचे प्रेम लक्षात घेऊन आनंदाने ती मान्य केली.)
      माझे दहावीपर्यंतचे शिक्षण अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे झाले. शालेय जीवनाचा कालखंड मी मनसोक्त उपभोगला. त्या काळात (निदान माझ्या मते तरी) मी काही खूप हुशार मुलांच्यात गणला जात नव्हतो आणि वर्गातल्या इतर मुलांच्या किवा शिक्षकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षाही नव्हत्या. मी अभ्यासात नव्हतो पण वर्गातल्या टॉपर्समध्येही कधी गणला जात नव्हतो आणि मी या पहिल्या दहा-वीस क्रमांकात नसल्यामुळे की काय, जेव्हा मी मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तेव्हा मी त्यात उत्तीर्ण होणार नाही अशी मुख्याध्यापकांची ठाम खात्री होती आणि ती त्यांनी मला बोलूनही दाखवली होती.
      माझ्या शिक्षकांनी तरी मी आयुष्यात काही भव्य-दिव्य करुन दाखवेन अशी शक्यताही विचारात घेतली नव्हती. तरी माझ्या पालकांना मात्र मी काहीतरी चांगले नक्की करेन असा विश्वास होता. त्या काळी तरी करीअर, प्रगती, उच्चपद मिळविणे हे जणू परभाषिक शब्द होते. आयुष्याकडे गंभीरपणे पहायचे असते हेच माहित नव्हते. मी आयुष्यात काय होणार हे मला स्पष्ट होते. मला माहीत होते मला इंजिनिअर व्हायचे आहे आणि ते बहुधा मेकॅनिकल इंजिनिअरच. पण त्यामागची कारणे मलाही अज्ञात होती. जास्तीत जास्त असे म्हणता येईल मला मेकॅनिकल इंजिनिअर बनण्याची क्रेझहोती. तो काही विचारांती घेतलेला निर्णय नव्हता. मला माहित नव्हते की मला का मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे आहे आणि कहर म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनिअर का व्हावे हे माझ्या पालकांनाही माहित नव्हते.
      मराठी ते इंग्रजी हे माध्यमांतर (आज जरी खूप नैसर्गिक, सहज वाटत असले) तरी प्रत्यक्ष त्या बदलाच्या अवस्थेत काही नवीन धडे आयुष्य शिकवते. खडतर परिस्थितीतून जावे लागते आणि मगच ते सहज, नैसर्गिक वाटते. पदवीधर होईपर्यंत इंग्रजी संभाषण आणि वक्तृत्व माझ्यासाठी फार अडचणीचे होते. आणि हेच या व्यावसायिक क्षेत्रात येताना माझ्यासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान होते. पदवी मिळवल्यानंतर माझी पहिली नेमणूक बंगलोर येथे झाली आणि त्या तीस इंजिनिअर्सच्या गटात मी एकमेव मराठी माध्यमातला मुलगा होतो. आणखी दोन-तीन मराठी मुले होती. पण त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले होते आणि त्यांना इंग्रजीतून संवाद साधण्याची सफाई होती. जवळ जवळ लगेचच मला हे प्रकर्षाने जाणवले की, इंजिनिअरींगच्या मूलभूत संकल्पानात मी कितीही उत्तम असलो तरी जोपर्यंत मी माझ्या सहका-यांशी संवाद साधू शकत नाही तोपर्यंत त्या निरुपयोगी आहेत. मराठी माध्यमातून शिकलो असलो तरी आपले इंग्रजीचे व्याकरण उत्तम आहे याची मला जाणीव होती. उणीव होती ती अपु-या शब्दभांडाराची. शिवाय गावातून आल्यामुळे येणारा नैसर्गिक संकोच, इंग्रजी भाषा किवा मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा बोलताना येणारे हे प्रमुख अडथळे पार करणे ही माझी प्रमुख गरज होती. माझ्या एका शिक्षकांनी मला एक सिद्धांत सांगितला होता की, कुठल्याही भाषेत सफाईदारपणे बोलायचे असल्यास त्या भाषेतून विचार करता आला पाहिजे. हा सिद्धांत मला माहित होता. विचारभाषा - बोलीभाषा या क्रमाचे महत्व मला कळले होते पण प्रत्यक्षात मात्र ते येत नव्हते. म्हणजे काय होत होते की मी अजूनही मराठीत मनात वाक्ये तयार करायचो आणि बोलण्यापूर्वी त्याचे इंग्रजीत भाषांतर व्हायचे.
      मुंबई आय.आय.टी. मधल्या प्रवेशाने हे सगळे आपसूकच बदलले. तिथल्या अठरा महिन्यातल्या माझ्या वास्तव्यानंतर मी इंग्रजी सफाईदारपणे बोलू लागलो. अर्थात यासाठी अतिशय महत्वाचे ठरले ते आजूबाजूचे वातावरण. इथे प्रत्येकजण इंग्रजीत संवाद करत असे आणि ऐतिहासिक उपमा द्यायची तर परतीचे दोर कापले गेले होते. आता अस्तित्वासाठी इंग्रजी अनिवार्य होते आणि अशी निर्वाणीची परिस्थिती आल्याबरोबर लगेचच इंग्रजी माझी झाली.  आता तर ती इतकी माझीझाली आहे, नंतरच्या काळातला माझा एक सहकारी मला बोलता-बोलता असे म्हणाला की, ‘तू अजिबात मराठी मिडीयमवाला वाटत नाहीसआणि हे मत व्यक्त करणारा तो सहकारी स्वतः इंग्रजी माध्यमाचा होता.
      प्राथमिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमातले असावे की, मातृभाषेतून या प्रश्नाचे उत्तर सर्वांच्याच बाबतीत सुयोग्यअसे देता येणार नाही. कारण केवळ होय किवा नाही उत्तर देता येईल असा हा प्रश्न नाही. माझ्याबाबतीत हे सगळे परत घडणार असेल तर मी पुन्हा मराठी माध्यमाचीच निवड करेन, पण त्याचवेळी मला हे मान्य करावे लागते आहे की माझी मुलगी (मैत्रेयी) इंग्रजी माध्यमात शिकली आहे. ही विसंगती कशासाठी? मी थोडे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो- मी जेव्हा पुन्हा माझ्याबाबतीत मराठीच निवडेन असे म्हणतो याचे कारण मला नंतर इंग्रजी संभाषणाच्या शब्दसामर्थ्याच्या अडचणींना तोंड द्यावे लागले तरी विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना मला जितक्या चांगल्या समजल्या होत्या तितक्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांनाही समजल्या नव्हत्या. याचे श्रेय अर्थातच परभाषेचा अडसर मला आला नाही. कारण माझ्या घरात, आजूबाजूला, मित्रांच्यात मराठीतच व्यवहार होत होते आणि मराठी माझी मातृभाषा होती. म्हणूनच विज्ञान आणि गणित शिकवताना जे बोलेले/वाचले जात होते त्याचे मला सहज आकलन होत होते. जर अशी कल्पना केली की मला त्यावेळी ते इंग्रजीतून शिकावे लागले असते तर मला विज्ञान, गणिताच्या बरोबरच परभाषेच्या अडथळ्याचाही सामना करावा लागला असता.
      आता थोडा खुलासा - माझी मुलगी इंग्रजी माध्यमात का शिकते आहे? घरी विज्ञानविषयक चर्चा करताना आम्ही जास्तवेळ इंग्रजीचाच वापर करतो. समाजात वेगाने बदल होत आहेत आणि खूपच ठिकाणी इंग्रजीचा वापर होतो आहे. दूरचित्रवाणीवर इंग्रजीतून कार्यक्रम प्रसारीत करणा-या अनेक वाहिन्या आहेत, या मुलांची जवळ-जवळ सर्व मित्रमंडळी मराठीपेक्षा इंग्रजी अधिक सफाईदारपणे बोलणारी आहेत. विषयांच्या मूलभूत संकल्पना त्यांना अधिक स्पष्टपणे कळल्या आहेत का नाहीत, हा प्रश्न या टप्प्याला तितकासा महत्वाचा नाही, जर त्यांना विज्ञानक्षेत्रातच करिअर करायचे असेल तर ते महत्वाचे ठरते आणि त्याची उत्तरे मुले शोधतील. त्यांना या संकल्पना स्पष्ट नसतील असे मानणे मूर्खपणाचे होणार आहे. कारण या मुलांना इंग्रजी ही परभाषा राहिलेलीच नाही. म्हणजे माझ्यावेळी जो लँग्वेज बॅरीअरहोता तो आता नाही.
      आपल्या घरातले आणि ज्या समाजवर्गात आपण राहतो त्या वातावरणाशी सुसंगत असे शिक्षण-माध्यम आपण निवडावे असा माझा याबाबतचा दृष्टिकोन आहे. मुले ही भाषाकौशल्य जलद रीतीने आत्मसात करतात. पण प्रश्न आहे तो आपण पालक म्हणून यात त्यांना किती मदत करु शकतो याचा. पालक मुलांशी इंग्रजीत बोलत नसतील, विषय इंग्रजीत समजावून देऊ शकत नसतील, मुलांचा मित्रपरिवार इंग्लिश बोलणारा नसेल तर अर्थातच मुलांवर इंग्लिश माध्यमाची सक्ती करु नये. इंग्रजीवरचे प्रभुत्व नंतरही साध्य करता येण्यासारखी गोष्ट आहे. ते असाध्य नाही.
      जेव्हा एखाद्या परिस्थितीत मुलांसमोर ती भाषा शिकण्याशिवाय पर्यायच रहात नाही तेव्हा ती येनकेन प्रकारे ती भाषा शिकतात आणि हे केवळ इंग्रजीबद्दलच नाही तर मातृभाषेशिवायच्या अन्य कुठल्याही भाषेला लागू पडते. मला जेथे जर्मन भाषा ही व्यवहारभाषा आहे अशा जर्मनीच्या दक्षिणेला असलेल्या ऑस्ट्रिया देशात दोन वर्षासाठी रहाणे अनिवार्य होते तेव्हा मला तिथे टिकून रहाण्यासाठी जर्मन शिकणे अपरिहार्य बनले.
      मराठी माध्यमांतील शाळांच्या स्थिती विषयी बोलायचं झालं तर परिस्थिती खरोखरच इतकी वाईट आहे का? त्यांचे अस्तित्व गरजेचे आहे का? मराठी माध्यमाच्या शाळा काही वेगळे पर्याय स्विकारुन अस्तित्व टिकू शकतील का? अगदी मूलभूत गोष्ट म्हणजे मराठी भाषा टिकली तर मराठी माध्यम टिकेल. आपण मराठीच्या जतनासाठी काय प्रयत्न करतो आहोत? मराठी शिकण्याचे काही अतिरिक्त फायदे आहेत का? सगळे व्यावसायीक अभ्यासक्रम इंग्रजीतच का? जापनीज, इटालियन, फ्रेंच,जर्मन या भाषांमध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकांचे अभ्यासक्रम आहेत. कुठल्याही विकसीत देशात त्यासाठी इंग्रजी शिकावे लागत नाही. मग भारतातच ही परिस्थिती का? आपण मराठी भाषिक आहोत याचा आपल्याला अभिमान आहे की लाज वाटते? महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत आपण मराठी बोलतो? जगातल्या दुस-या प्रत्येक देशात त्यांची त्यांची भाषा बोलली जाते का? इंग्रजी भाषा ही भारताची अधिकृत भाषा का आहे? प्रत्येक सरकारी, कार्यालयीन सभेमध्ये भारताचे पंतप्रधान इंग्लिशमध्येच का बोलतात? चीनचे राष्ट्राध्यक्ष आवर्जून चीनी भाषेतच का बोलतात आणि दुभाषे मग आपल्या पंतप्रधानांसाठी ते इंग्रजीत करतात. अटलबिहारी वाजपेयींचा सन्मानीय अपवाद सोडल्यास संयुक्त राष्ट्रसंघात इतर कुणीही भारतीयाने हिदीत भाषण केलेले नाही. युरोपीयन देश, जपान, चीन, कोरीया यांची प्रगती जर त्यांच्या त्यांच्या भाषेत होते तर भारतीयांनाच इंग्रजीत का बोलावे लागते? माझा असा तर्क आहे की जर सगळ्या मराठी लोकांनी एकमेकांची भेट कुठल्याही ठिकाणी झाली तरी मराठीतच बोलण्याचा निश्चय केला तर मराठी जगेल आणि पर्यायाने मराठी माध्यमही जगेल आणि हे करण्यात जर आपण कमी पडलो तर हळू हळू मराठी भाषिक लोकसंख्या कमी-कमी होईल आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी दुर्लक्षित होईल.
      निष्कर्ष काढायचा तर मला असे खात्रीने वाटते की तुम्ही यशस्वी होणार का अयशस्वी याची जबाबदारी शिक्षणाची माध्यम भाषा कोणती केवळ एवढ्यावरच अवलंबून नाही. कठीण परिस्थिती, अडचणी असणारच. फक्त त्याचे स्वरुप गांभीर्य शिक्षणाच्या माध्यम-भाषेप्रमाणे बदलेल. मराठी माध्यमाच्या शाळा जगवण्यासाठी शक्ती खर्च करण्यापूर्वी मराठीच जगवण्याचा प्रयत्न आधी करावा लागेल तर मराठी माध्यमाच्या शाळा टिकतील. मराठी जतन झाली, समृद्ध झाली, राजभाषा म्हणून प्रतिष्ठीत झाली तर मराठी माध्यमाच्या शाळा टिकतील. जर आपण राजभाषाम्हणून मराठीचा दर्जा टिकवू शकलो नाही तर मराठी माध्यमाच्या शाळा नाहीशाच होतील. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी मराठी शिकला नाही तर त्याला महत्वाच्या एखाद्या गोष्टीपासून वंचित रहावे लागेल का? याचे उत्तर जर होयअसेल तरच शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून मराठी यशस्वी होईल.

प्राथमिक शिक्षण हवे मातृभाषेतूनच

मी मनोविकारशास्त्र या शाखेत एम.डी. केले आहे. सध्या अलिबाग येथे गेली २३ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. माझ्या घरी शिक्षणासाठी खूप पोषक वातावरण होते. तसेच शाळेत सुध्दा तळमळीने शिकवणारे शिक्षक होते. माझ्या सर्व प्रगतीचे श्रेय मी माझे आई वडील व माझ्या शाळेतील शिक्षकांना देईन. व्यावसायिक म्हणून काम करतानाच मनोविकार आणि अंधश्रध्दा‘, ‘ताण तणावाचे संयोजन‘, ‘ज्योतिष शास्त्र-एक थोतांडइत्यादी विषयांवर व्याख्याने देतो. गायन, हार्मोनियम वादन, कवितांची आवड आहे. इतिहास,भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादींमध्ये खूप रस आहे. घरी एक चार इंची दुर्बिण आहे. कधीतरी ती गच्चीवर लावून ग्रह तारे मुलांना दाखवतो. व्यवसायातून जमेल तेवढे करण्याचा प्रयत्न करतो.
१९८७ साली अलिबागसारख्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरु करणे हा निर्णय ब-याच लोकांना आवडला नव्हता. परंतू जिथे खरोखरी गरज आहे आणि सोय उपलब्ध नाही अशाच ठिकाणी काम करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे मी माझ्या निर्णयाशी ठाम राहिलो. वैद्यकीय पेशात फक्त पैसे मिळवणे हा माझा हेतू कधी नव्हता, गरजू लोकांना माझे ज्ञान व सेवेचा फायदा व्हावा या शुद्ध हेतूने मी आजवर हे काम करत आहे. यासाठी मी नवनवीन औषधांचा, शोधांचा मिळेल तेव्हढा अभ्यास करत असतो. या क्षेत्रात मला डॉ. पाटकर, डॉ.विजय साळगांवकर व डॉ. आनंद नाडकर्णी यासारख्या नामवंत डॉक्टर्सचे मार्गदर्शनही मिळाले आहे.
माझे शालेय शिक्षण टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे झाले. मला असे वाटते की, आमच्या शाळेत परीक्षा आणि त्यातली प्रश्नोत्तरे या पलीकडे जाऊन विषयात आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने शिक्षक शिकवत असत. श्री.रूघे सरांमुळे मला साहित्याची, श्री.गोखले सरांमुळे इतिहासाची,श्री.केळूसकर सरांमुळे इंग्लिशची आवड निर्माण झाली. श्री. करंदीकर सर सायन्स क्लब चालवीत असत. श्री. पराडकर सर गणित, सायन्स अतिशय सोपा करून दाखवीत असत. श्री.तोरगलकर सर स्पोर्ट्स मधले तंत्र दाखवीत. अशा अनेक अनेक शिक्षकांची नावे घेता येतील. शाळेमध्ये खेळासकट सर्व विषय तेवढ्याच आत्मीयतेने शिकवले जात असत. अनेक प्रकारच्या ज्ञान शाखांची शाळेत ओळख दिली जात असे.
माझे वैद्यकीय शिक्षण नायर हॉस्पिटल, मुंबई येथे झाले. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजीत संवाद करणे कठीण जात असे. काही प्रमाणात न्यूनगंड त्या काळात निर्माण झाला होता. पण काही वर्षांत संभाषणाची सवय झाली. शालेय शिक्षण मराठीत झाल्यामुळे इंग्रजी वाचताना वेग कमी होता. त्याचीही सवय करावी लागली. पण एकूण फार मोठा परिणाम झाला नाही.
मी वेगवेगळ्या शाखांमध्ये लैंगिक शिक्षणावरती व्याख्याने देतो. लहानपणी व्हायोलिनच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झालो होतो, माझे वडिल स्वतः बासरी तयार करत असत, त्यांच्यामुळे मला बासरीवादनाचीही आवड लागली. माझ्या आईचेही शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले होते. संगीताची मनापासून आवड व जाण असल्यामुळे अलिबाग येथील मित्रमंडळासमवेत गाण्याचे छोटेखानी कार्यक्रम बसवणे, हार्मोनियमवरती साथ देणे व गाणी म्हणणे यासाठी मी आवर्जून वेळ काढतो.
मी मराठीतून शिकलो हे माझे भाग्य समजतो. मी जर इंग्रजीतून शिकलो असतो तर शिक्षणाची मला आवड निर्माण झाली असती का? ही शंकाच आहे. मी माझ्या कॉलेजमधल्या खूप हुशार मुलांचे असे पाहिले आहे की, त्यांचे शिक्षण इंग्लिश माध्यमातून होते पण घरी पूर्ण मराठी! याचा असा परिणाम व्हायचा की, सायन्स पुरते इंग्लिश नक्कीच यायचे पण साहित्याची आवड इंग्लिशचीही नाही आणि मराठीचीही नाही अशी परिस्थिती व्हायची.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावे असे सर्व शिक्षण तज्ज्ञ मानतात. प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ हेलन अबद्झी यांनी काही महिन्यापूर्वी लिहिलेल्या एका लेखात असे म्हटले आहे कि, एका भाषेवर ब-यापैकी प्रभुत्व आले कि मग दुसरी भाषा शिकणे खूप सोपे जाते. कारण एका भाषेसाठी मेंदूत पुरेसे सर्किट निर्माण झाले की नंतर दुस-या भाषेच्या सर्किटचे त्यावर सहज आरोपण होऊ शकते. म्हणून मला वाटते कि, मराठीतूनच प्राथमिक शिक्षण झाले पाहिजे व तिसरी, चौथी नंतर इंग्रजी सुरू करावी किवा पाचवीपासून सेमी इंग्लिश माध्यम सुरू करावे.
आज युरोपियन देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. उदा. फ्रान्समध्ये फ्रेंच मधून, जर्मनीत जर्मन भाषेतून, जपानमध्ये जपानीत शिक्षण दिले जाते ही गोष्ट खूप लोकांना माहित नसते.
सध्या मराठी ही फक्त वाड्.मयीन भाषा आहे. तिची ज्ञान भाषा होण्यासाठी मराठीत अधिकाधिक वैज्ञानिक साहित्य निर्माण झाले पाहिजे. त्याचा प्रसार झाला पाहिजे. इंग्लिश-मराठी पारिभाषिक प्रमाणित शब्दकोश निर्माण झाले पाहिजेत.
आज मराठी शाळांतील पटसंख्या रोडावते आहे. शाळा बंद पडत चालल्या आहेत. पण मला वाटते की काही दिवसात हे चित्र पालटेल. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व जसे समजेल तसे लोक पुन्हा मराठी माध्यमाकडे वळतील.

इच्छाशक्तीनेच होईल सारे शक्य

मी रघुवीर मंत्री, जन्म वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावचा अकरावीपर्यंतचे शिक्षण शिरोड्यामध्ये तेव्हाच्या ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. (आताचं वि.स.खांडेकर विद्यालय) अकरावीनंतर पुढे काय करायचं हे नीटसं ठरवलं नव्हतं. वडिलांची इच्छा होती कि, बी.एस्स.सी. पूर्ण करून नोकरी करावी. पण त्या वेळचे आदरणीय श्री. दळवी सर आणि गुरूवर्य वि.स.खांडेकर सरांनीच माझ्या जीवनाला कलाटणी दिली. *तुझे गणित चांगले आहे तर तू चांगला इंजिनिअर हो* असा सल्ला दिला. मग जे.पी. नाईकांनी स्थापन केलेल्या मौनी विद्यापीठ, गारगोटी इथून डिप्लोमा इन सिव्हिल अॅण्ड रूरल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केलेला हा कोर्स १९६२ साली पूर्ण झाला.
कोकणातील बहुतांश माणसं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात रोजगाराचं साधन नसल्याने पोटा-पाण्यासाठी मुंबईला जातात. त्याप्रमाणे मी ही नातेवाईक, ओळखीची माणसे भेटतील म्हणून मुंबईचीच वाट धरली. १९६२ ते १९६५ सालापर्यंत मुंबईत खाजगी कंपनीत नोकरी केली. नंतर १९६५ पासून १९८५ पर्यंत २० वर्षे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांवर सेवा बजावली. सुरूवातीला सुपरवायझर म्हणून लागलो आणि स्वेच्छानिवृत्ती घेतेवेळी सिनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर होतो. जेमतेम १ वर्ष ऑफिसमध्ये काम करावं लागलं आणि नंतरची सर्व वर्षे इंजिनिअर असल्याने साईटवर गेली.
नोकरी करत असताना स्वतः उभारलेलं विश्व असावं असा विचार नेहमी मनात यायचा. म्हणून कंपनीकडून क्वार्टर्स मिळत असतानाही घेतली नाही. कारण एकदा घराची सोय झाली असती तर मी तिथेच राहिलो असतो. त्यामुळे कर्जप्रकरण करून भांडूपला घर घेतलं. *सर्व सोयी-सुविधा मिळत असताना २० वर्षे नोकरी केल्यानंतर डोक्याला ताप देणा-या बांधकाम व्यवसायात तू कशाला पडतोस?* अशी ब-याच जणांनी विचारणा केली. परंतु काही वेगळे आणि स्वतःचे असे करायचे असल्याने धाडसाने व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय म्हटला की, भांडवलाचा प्रश्न येतो. १९८५ साली स्वेच्छानिवृत्तीनंतर पी.एफ. आणि ग्रॅज्युटीचे २ ते २.५ लाख रूपये व्यवसायात गुंतवले. सुरूवातीपासून बांधकाम व्यवसायात उतरताना स्वतःची काही मूल्ये जपण्याचं ठरविल्याने कोणतंच सरकारी काम संधी असूनदेखील स्विकारलं नाही. सर्वोच्च गुणवत्ता आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून देण्याची हमी प्रत्यक्षात उतरविल्याने अनेक खाजगी कामं मिळत गेली. हिदुस्थान सिबा-मुंबई, सन फार्मा-नगर, जर्मन रेमेडीज-मुंबई, के.ई.सी.-मुंबई, इंडियन स्मेल्टीन रिफायनिग कंपनी, आचार्य केमिकल्स अशा नामांकित फार्मसी कंपन्यांची फाऊंडेशनपासून ते फिनिशिगपर्यंतची बांधकामाची सर्व कामे केली. ८० टक्के काम हे फार्मसी कंपन्यांकरिता केले. यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखा प्रसंग म्हणजे, जर्मन रेमेडीमध्ये नॉर नावाचा मॅनेजर होता. काही कारणाने पटेल नावाच्या भारतीय माणसाने ही कंपनी टेकओव्हर केली. त्यानंतर नॉर हे राजीनामा देऊन डिबुसामध्ये एम.डी. म्हणून रूजू झाले. जेव्हा त्यांना दिल्लीचं ऑफिस बनवायचं होतं तेव्हा जर्मन रेमिडीजमधील आपले काम लक्षात ठेवून त्यांनी दिल्लीमधील ऑफिसचं काम पूर्ण करण्याकरिता ह्या जर्मन माणसाने मुंबईच्या सुयोग कन्स्ट्रक्शनकडूनच काम पूर्ण करून घ्या असे आदेश देऊन ठेवले होते.
२००७ मध्ये सिधुदुर्गात पदार्पण केलं. आरवलीमध्ये भूमैया पार्कमध्ये ३७ बंगले आणि ३६ फ्लॅट बांधले. फेज २चे काम सुरू आहे. सावंतवाडीमध्ये दत्तराज कन्स्ट्रक्शनअंतर्गत २५ फ्लॅटस् आणि १९ बंगले तयार होत आहेत. येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. भविष्यात रेडी, मळगाव, वेंगुर्ले इथे निवासी संकुले प्रस्तावित आहेत.
माझ्या आजवरच्या वाटचालीविषयी मी पूर्णपणे समाधानी आहे. आत्मविश्वास आणि वैयक्तिक आयुष्यात गुणवत्तेशी कधीही न केलेली तडजोड यामुळेच समाधानी राहता आले. शालेय जीवनातील आठवणी सांगायच्या तर, आरवलीपासून जाता-येता ६ मैलाची पायपीट असायची. सकाळी ९.०० वाजता पेज जेवून शाळेत जायचं आणि ६.०० वाजता घरी परत. तेव्हा वडील २५ पैसे देत असत. त्यातील ५ पैसे मी शिल्लक ठेवायचो. त्याची तिकीटे घेऊन पाच रूपये झाले की पोस्टाची सर्टिफिकेट मिळायची. ती सर्टिफिकेट आजही जपून ठेवली आहेत. माझं अकरावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालं असलं तरी इंजिनिअरिगला गणित पक्कं असल्याने काही फारशी अडचण आली नाही. पहिले वर्ष सोडले तर शेवटची तिन्ही वर्ष फर्स्ट क्लास, फर्स्ट येण्याची सवय कधी मोडू दिली नाही. ६० पैकी ५५ मुले ही बारावी करून (इंटर सायन्स) आली होती. जेवणाच्या पध्दतीचं सोडलं तर शिक्षण घेताना समस्या आली नाही.
शिक्षणानंतर व्यावसायिक अगर नोकरीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, निर्णयक्षमता, स्वतःजवळ असणारे कौशल्य, इच्छाशक्ती आणि आजचं काम आजचं करण्याचा निग्रह या गोष्टी आवश्यक असतात. तसेच, चिकाटी, आहे त्या परिस्थितीत अॅडजस्ट करण्याची तयारी आणि ध्येयावरील निष्ठा या गोष्टी कठीण परिस्थितीत देखील जगायला शिकवतात. मी जेव्हा बी.आर.सी.त नोकरीला लागलो तेव्हा दरमहा ४५० रू. पगार होता. भांडुपला २० हजार रूपयांचे घर कर्ज घेऊन घेतलं होतं. आता भरपूर घरे आहेत पण तेव्हाचा ३००० रू.चा हप्ता भरणेही कठीण गेले होते. या गोष्टी विसरता येत नाहीत आणि विसरायच्याही नसतात. आयुष्यात चढ-उतार हे असायचेच पण कष्ट करण्याची तयारी असेल तर स्वकर्तृत्वाने दिवस बदलण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते ती फक्त ओळखता यायला हवी. इच्छाशक्ती असेल तर काहीच अवघड नाही. स्वतंत्र बांधकाम व्यवसायात आज मला २७ वर्षे तर या सिव्हिल लाईनमध्ये ५० वर्षे झाली आहेत. आता मुंबईतील काम मुलगा पाहतो.
कौशल्य आणि आकलन क्षमतेचा विचार केला तर मराठी मुले कुठेच मागे पडत नाहीत. इंग्रजीचा उगाचच बाऊ केला जात आहे. इंग्रजी ही एक सरावाने सफाईदारपणे बोलता येणारी भाषा आहे. इतकंच महत्त्व त्याला द्यायला हवं. पूर्वीच्या शिक्षकांमध्ये हा *माझा विद्यार्थी* आहे आणि मला तो घडवायचा आहे अशी तळमळ दिसायची. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील शिक्षकांविषयी आपुलकी असायची. दुर्दैवाने आज काही अपवाद वगळता शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांविषयी तळमळ नाही. पगारापुरते काम करणा-या शिक्षकांना मग विद्यार्थ्यांकडून आपुलकी कशी मिळणारसरकारही अनुदाने बंद करून शिक्षणाच्या व्यापारीकरणाला प्रोत्साहन देत आहे. सर्वांनीच यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. इच्छाशक्ती असेल तरच चांगले विद्यार्थी घडविणा-या शाळा टिकतील अशी आजची स्थिती आहे.

बदलत्या माध्यमांचा स्विकार करा

      मी एक सैन्यातील अधिकारी आहे. सध्या लेफ्टनंट कर्नलच्या पदावर कार्यरत आहे. आतापर्यंत जवळ जवळ १५ वर्षे सैन्यात नोकरी केली आहे.
      काही संपादन करणे म्हणजे काय? याची व्याख्या करणे कठीण आहे. इतरांच्यादृष्टीने एखाद्याने किवा एखादीने एखाद्या बाबतीत यशाचे शिखर जरी गाठले असले तरी तिला / त्याला सतत वाटत रहाते की, जे मिळविण्याकरिता त्यांनी इतके श्रम केले ते अजून तरी मिळालेले नाही. याउलट एखाद्याने विशेष नेत्रदिपक अशी काही कामगिरी केलेली नसुन सुद्धा आपण खूप काही मिळविलेले आहे अशी त्याची किवा तिची धारणा होऊन तेवढ्यामध्येच संतुष्ट रहातात आणि त्याचा त्यांना गर्व वाटतो. म्हणून यशाचे मोजमापन निश्चित करण्यात व्यक्ती व्यक्तींमध्ये फरक असू शकतो.
      सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या मराठी माध्यमांच्या शासकीय शाळांमधून माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सव्र्हसेस प्रीपरेटरी इन्स्टीट्युट येथील एन.डी.ए.पुणेच्या प्रवेश परीक्षेची तयारी करीत असतांनाच मी माझे उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. एन.डी.ए.परीक्षा मी पहील्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो आणि जून १९९३ मध्ये भरती झालो. एन.डी.ए.चे तीन वर्षांचे शिक्षण आणि आय.एम.ए.डेहराडून येथून एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माझी भारतीय सैन्यदलात सेकंड लेफ्टनंटच्या पदावर नेमणूक झाली.
      शालेय जीवन खूप मजेदार होते आणि मला ते अगदी चांगल्या त-हेने लक्षात आहे. शाळेत असतांना मी ज्यांच्याशी मैत्री केली ते आजतगायत माझे अत्यंत विश्वासू असे मित्र आहेत. तरीसुद्धा, सैन्यात असतांना अत्यंत धोकादायक प्रसंगांशी तोंड देतांना माझ्या पुष्कळशा सहका-यांबरोबर जुळलेले माझे नाते इतके घनिष्ठ आहे की, सामाजिक प्रतिष्ठा, भाषा, वर्ण, जात या सर्वांच्या आणि केवळ मैत्रीच्याही पलिकडे आहे.
     आजच्या जगामध्ये इंग्रजीच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. इंग्रजी भाषेचे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व आहे आणि तिचा अपेक्षित प्रभाव तिचा आटोका आणि विस्ताराशी विसंगत आहे हे सत्य आहे. पण मराठी माध्यमातून शिकणा-या विद्यार्थ्यांना तितकासा अडथळा येणार नाही. खरे पहाता, आपला भाषिक आणि सांस्कृतिक वारसा यांना धक्का न लावता समाजातील मुख्य प्रवाहात मिसळणे ही एक लोकशाहीवादी सुसंधी प्रत्येकाला मिळालेली आहे. उलट बहुसंख्य लोकांचा असा विश्वास आहे की, इंग्रजी भाषा ही तिच्या बांधणीमुळे तसेच सर्व लोकप्रिय लोक-माध्यमांमध्ये इतर सर्व भाषांपेक्षा शिकायला आणि प्रभुत्व मिळविण्यासाठी सोपी भाषा आहे आणि इतर कोणत्याही भाषेपेक्षा अधिक सुगम्य आहे. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषेमध्ये ज्ञानाचे भांडार अधिक आहे. आपण निवडलेला कोणताही विषय शिकत असतांना सुद्धा कोणीही इंग्रजी भाषेचा अभ्यास करु शकतो. शिकण्यात जर स्वारस्य असेल तर ही बाब यापेक्षा सोपी बनू शकते.
      माझ्या मते, जरी मी विशेषज्ञ नसलो आणि या बाबतीत जरी माझी चूक होत असेल तर मी सांगू इच्छितो की, भाषिक कौशल्य मिळविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी वयाची अट मुळीच लागू नाही. भाषिक कौशल्य व्यक्तीनुरुप बदलते. पण जर एखाद्याने निर्धार केला, नियमितपणा ठेवला आणि मनात कोणताही संशय ठेवला नाही तर योग्यरित्या लेखी आणि बोली स्वरुपात व्यक्त करणे यासह इंग्रजी भाषेचे कार्यकारी ज्ञान थोडक्याकाळामध्ये प्राप्त करता येईल.
      माझा अनुभव असा आहे की, पूर्णपणे इंग्रजी वातावरणात वावरतांना मला सुरुवातीला खुप अडचणींना तोंड द्यावे लागले. पण यावर मात न करता येण्यासारखे काहीही नव्हते. ज्या पद्धतींनी मला माझे इंग्रजी सुधारण्यासाठी मदत केली त्या पद्धती अशा होत्या.
      द्व इंग्रजी माध्यमातील शाळांमधून शिकणा-या माझ्या शुभचितक आणि परोपकारी मित्रांशी आलेला परस्परसंबंध.
      द्व नियमित व प्रचंड वाचन आणि कटाक्षाने फक्त इंग्रजीतच संभाषण करण्याविषयीचा स्वनिग्रह करुन त्याचे काटेकोरपणे केलेले पालन. (अर्थात मी स्वतःलाच लावून घेतलेल्या माझ्या शिस्तीच्या अभ्यासक्रमात ही आणखी एक बेरीज होती.)
      द्व हळुहळू पण निश्चितपणे या भाषेची अद्वितीय ढब आणि वळणांविषयी माझ्या मनात आवड निर्माण झाली.
      आज मला नक्की वाटते की, हिदी आणि मराठीपेक्षा मी माझे विचार इंग्रजीमध्ये किचित चांगल्याप्रकारे प्रकट करु शकतो. यात दुस-या दोन भाषांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. परंतू इतर कोणत्याही भाषेप्रमाणे इंग्रजी सुद्धा सहजगत्या आणि उत्तमरितीने शिकता येते या मुद्दयावर भर देण्याचा हेतू आहे.
      मातृभाषेत शिकण्याचे फायदे नक्कीच आहेत. सर्वात प्रथम म्हणजे, निवडलेली ज्ञानशाखा, शिकण्याची पद्धत आणि विषय समजून घेतांना विद्यार्थ्याला खूपच सोईस्कर पडत. दुसरं म्हणजे मातृभाषेमध्ये लिहिण्याच्या कौशल्यापेक्षा मातृभाषेत संभाषण करण्याचे कौशल्य अगोदर प्राप्त होते आणि त्यामुळे मनातले विचार अधिक अर्थपूर्णरित्या आणि उचितपणे प्रकट करता येतात. दुस-या शब्दांत सांगायच तर, एखाद्याला शब्दांशी संघर्ष करावा लागत नाही.
      पण मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे असलेल्या अनिवार प्राबल्यामुळे इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष्य करणे जोखमीचे ठरेल. म्हणूनच जरी मुले त्यांच्या मातृभाषेच्या माध्यमातून शिकत असली तरी त्यांना इंग्रजी लेखनासाठी आणि संभाषणासाठी प्रोत्साहन देणे फायद्याचे ठरेल. प्रसिद्धी माध्यमे, दळणवळण आणि इंटरनेटमुळे हे काम खुप सोप झालं आहे. खरं सांगायचं तर इंग्रजीची भिती मनातून काढून टाकण्यासाठी मन कठोर करुन या माध्यमांचा स्विकार करणे उपयोगी ठरेल.

माध्यमापेक्षा शिक्षणाचा दर्जा महत्त्वाचा

मी सौ. श्रुती अभिनंदन संकोळी, पूर्वाश्रमीची स्मिता करंदीकर, मालवण (जि. सिधुदुर्ग) येथील अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थिनी. १९८२ पर्यंत म्हणजे बारावी सायन्स पूर्ण होईपर्यंत मी मालवणमध्ये शिकत होते. त्यानंतर सायन्स कॉलेज मालवणात नसल्याने मालवण सोडणे आणि पर्यायाने घर सोडून शिक्षणासाठी बाहेर पडणे क्रमप्राप्तच होते. सावंतवाडीला ग्रॅज्युएशन मग नवीनच लाट आलेल्या कॉम्प्युटर क्षेत्रात मास्टर्स करायचे ठरवले. त्या काळी कॉम्प्युटरचे छोटे कोर्सेस सुरू होऊ लागले होते पण मास्टर्सची आमची पहिलीच बॅच! त्यामुळे कोणालाच काहीच कल्पना नव्हती. त्यामुळेच की काय आम्ही सर्व विद्यार्थी एकमेकांना धरून होतो. घरोघरी पर्सनल कॉम्प्युटर असण्याचा तो काळ नव्हता. मिनिफ्रेम झेनिथ वर आम्ही शिकलो. प्रिटरसुध्दा पहिल्यांदाच पाहिला. थोडीशी भीती मनात होतीच पण जसाजसा अभ्यास सुरू झाला तसतशी भीती कमी होऊ लागली. मास्टर्सची डिग्री हातात पडल्यावरही कोठे अर्ज द्यावा, इंटरव्ह्यूसाठी तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे फारसे लोक नव्हते. घरात आणि नातेवाईकात आम्हीच प्रथम मास्टर्स घेणारे आणि कॉम्प्युटरविषयी कोणाला माहितीच नाही. अशा परिस्थितीत पुण्यापासून ३० किलोमीटरवर असलेल्या इसपात प्रोफाईल्स या मित्तल ग्रुपच्या कंपनीच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी इंजिनीअर म्हणून नोकरी लागली. पहिलाच पगार रू. २०००/- च्या वरती मिळाल्याने घरच्यांना हायसे वाटले (ही १९८८ ची गोष्ट, त्यावेळेला लोकांना एवढा पगार मिळत नसावा असे तेव्हाच कळले).
      पुढे मजल दरमजल करत वय वर्षे २६ला मी गरवारे वॉलरोप्स या कंपनीत मॅनेजरच्या हुद्यावरती विराजमान झाले. त्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेत पदार्पण केले, बाळ लहान असल्याने वर्षभर नोकरी केली नाही. पण त्याचा फायदा घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ मासाच्युसेट्स मध्ये भारतात शिकायला न मिळालेली काही सॉफ्टवेअर्स संध्याकाळचे कोर्सेस जॉइन करून शिकून घेतली. माझा नवरा पहिल्यापासूनच माझा नुसता सखाच नाही तर भक्कम पाठीराखा असल्यामुळे हे सर्व शक्य झाले. तो ऑफिसमधून आला की मुलीला सांभाळत असे व मी शिकायला बाहेर पडत असे. सुरूवातीला प्रोफेसर्सचा, बरोबर शिकणा-या विद्यार्थ्यांचा अॅक्सेंट समजत नसे. परत परत प्रश्न विचारायला लाट वाजे पण माझा स्वभाव बोलका असल्यामुळे हा प्रॉब्लेमही प्रॉब्लेम राहिला नाही. मला गाडी चालवायचा अनुभव नव्हता. तेही साइड बाय साइड शिकून घेतले. मला शिकवायला येणारा प्रशिक्षक कंबोडियन होता. त्यांचे इंग्लिश अफलातून होते. पण त्याच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. हा जर असे बोलून इथे आनंदाने जीवन व्यतीत करू शकतो तर आपण कशाला रडत बसायचं! पुढे ९४ सालापासून परत नोकरी सुरू झाली. बाहेरच्या देशात इंटरव्ह्यू देण्याची पहिलीच वेळ! परंतु ती भीतीही व्यर्थ ठरली. पहिल्याच फटक्यात मला एका भारतीय एम्प्लॉयरनेच संधी दिली आणि लगेच जॉइन करायला सांगितले. काम डेटाबेस डेव्हलपमेंटचे असणार होते पण क्लाएंट साइटवर! जिथे कोणीही ओळखीचे दिसणार नव्हते. पण हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग सुरू झाली खरी तारेवरची कसरत! सकाळाी मुलीला डे-केअरमध्ये सोडायचे तिथून सुरूवातीला माझा नवराच मला बर्लिगटनला सोडायचा, त्याचे ऑफिस बरोबर विरूध्द दिशेला होते. परत संध्याकाळी मुलीला पिक-अप करायचा, मग मला पिक-अप करायचा आणि आम्ही घरी यायचो. मग झाली माझी पहिली गाडी खरेदी! आयुष्यात कधी सायकल न चालवलेली मी डायरेक्ट होंडा सिविकचालवायला लागले. बर्फाळ प्रदेशात जाता ३५ येता ३५ मैल गाडी चालवायला लागे. दोन वर्षात या कंपनीतही मी बरेच क्लाएंट हँडल करू लागले. फिरतीवर दोन चार वेळा फिलाडेल्फिया, वॉशिग्टन, तर कधी मेक्सिको सारख्या वेगळ्या देशीही जाऊन आले. आत्मविश्वास चांगलाच वाढला. मग बोस्टन टेक्नोलॉजी या अमेरिकन कंपनीत सिस्टिम इंजिनीअर पोस्टवर काम करू लागले. इथे मला आधी शिकलेले सोडून बरेच वेगळे काम करावे लागले. ती टेलिकॉम कंपनी होती. पण ते शिकतानाही खूप मजा आली व त्यातही माझी गती पाहून मला पटापट बढती मिळाली. भारतीयांच्याव्यतिरिक्त इतर देशीय खूप लोक इथे भेटले आणि त्यांच्याशी खूप छान दोस्ती झाली, नवनवीन गोष्टींची माहिती कळाली. तिथल्या लोकांना मीही भारताविषयी अनेक चांगल्या व वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. नाहीतर तेथील बर्‍-याच लोकांना भारत म्हणजे जंगली, अशिक्षित किवा आदिवासी लोकांचा देश वाटे (डिस्कवरी, नॅशनल जिऑग्राफीसारख्या चॅनल्सची कृपा जिथे त्याकाळी भारताविषयी काहीही दाखवताना गरीबी, जंगले नाहीतर डोंबार्‍-याचे खेळ दाखवले जात) त्यांना भारताविषयी चांगली माहिती मिळावी म्हणून आमच्यापैकी काही जणांनी बोस्टन ग्लोब या वृत्तपत्राला संफ करून लेख लिहायला सुरूवात केली. भारताच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही बर्लिगटनच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन समोर ध्वजारोहण केले व आपले राष्ट्रगीत म्हटले. बर्लिगटनचे मेयर तेव्हा चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते.
सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इथे असलेल्या टोस्टमास्टर्स क्लब नावाच्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑर्गनायझेशनची मी सभासद झाले व दर गुरूवारी लंच टाईममध्ये या क्लबचे सेशन अटेंड करू लागले. इथे वेगवेगळ्या देशाच्या लोकांना इंग्लिश संभाषण कसे करावे हे खूप वेगळ्या व सकारात्मक पध्दतीने शिकविले जात असे. कधी संभाषणासाठी विषय दिला जात असे तर कधी अचानक कुठल्याही विषयावर बोलावे लागत असे. कधी परिक्षकाची भूमिकाही निभवावी लागत असे. दुसर्‍-याच्या चुका त्याला न दुखावता, त्याला समजतील अशा प्रकारे कशा सांगाव्यात याचेही प्रशिक्षण मिळत असे. एका वर्षाच्या कोर्समध्ये वेगवेगळ्या विषयावरची व वेगवेगळ्या प्रकारची दहा भाषणे द्यावी लागत. वर्षाच्या शेवटी वर्षभराच्या परफॉर्मन्सवर आधारित वेगवेगळी बक्षीसे दिली जात. त्यावर्षी सर्वात जास्त बक्षीसे मला मिळाली. माझ्या पहिल्याच भाषणाला गोल्ड मेडल मिळाले. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की मालवणसारख्या लहान गावात मराठी मिडियमच्या शाळेत शिकूनही, कोणताही न्यूनगंड न बाळगल्यामुळे हे साध्य झाले. आज मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मुलांना इंग्लिश वेगळ्या प्रकारे व चांगल्या प्रकारे शिकविण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून मला जी काही १० टक्के भीती वाटली असेल तीही त्यांना वाटू नये.
मालवणच्या शाळेतील शिक्षण म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर व संस्कारी अनुभव होता. माझ्या शाळेमुळेच व त्या शाळेत लाभलेल्या गुरूजनांमुळे माझा शिक्षणाचा पाया भक्कम झाला. विषय कोणताही असो तो सोपा व इंटरेस्टिग करून कसा शिकवावा याचे कौशल्य आमच्या शाळेतील शिक्षकांना अवगत होते. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त इतर कलागुणांचा विकासही शाळेमुळेच झाला. यात उल्लेख करावा असे आमचे शिक्षक म्हणजे गोखले सर, बिरमोळे सर, परूळेकर सर, केरिपाळे सर व माझे परमपूज्य गुरू कै. सांगावकर सर! या सर्वांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. १९७८ साली श्री. गोखले सरांच्या मार्गदर्शनामुळे मला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान मंचच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यावेळी सिधुदुर्ग हा वेगळा जिल्हा नव्हता. याच मराठी मिडियम शाळेतल्या शिक्षकांनी मला इंग्लिशचीही गोडी लावली. यात कै. मोरे सरांचाही उल्लेख करावाच लागेल. त्याकाळी आम्हाला इंग्लिश सिनेमा कसा असतो हे माहितही नसे, तेव्हा ते रंगवून त्या सिनेमांच्या कथा वर्गात सांगत.
मराठी मिडियमच्या शाळेत घातल्यामुळे मी कुठे कमी पडले असे मला कधीच वाटले नाही पण माझ्या जोडीचे काही व नंतरचे काही या विषयी सतत तक्रारी करताना किवा पालकांना दोष देताना दिसतात. माझ्या जोडीने शिकणारी पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील इंग्लिश स्टाईलीत बोलणारी माझी काही मावस-चुलत भावंडे अजून आहेत त्याच ठिकाणी आहेत. त्याकाळी त्यांचे ज्ञान (?) पाहून मला आपले कसे निभावणार असे वाटले नसेल का? पण मातृभाषेत शिकल्यामुळे मला सुरूवातीचा पाया मजबूत करायला फारच कमी कष्ट घ्यायला लागले. त्यात ही मुले कमी पडली त्यामुळे त्यांचा पायाच कच्चा राहिला आणि पुढील जीवनात त्यांना माझ्यापेक्षा जास्त अडथळ्यांना सामोरे जावे लागले.
ज्या पालकांना बदलीचे भय नसेल, एका ठिकाणी किवा महाराष्ट्रात राहणे शक्य असेल त्यांनी तरी आपल्या मुलांना मराठी मिडियमच्या शाळेत घालावे. तसेही हल्ली पहिलीपासून इंग्लिश शिकविले जातेच. इंग्लिश सुधारण्यासाठी विविध पुस्तके उपलब्ध आहेत. सीडीज आहेत. त्याचा आधार घ्यावा. सुट्टीत एखादा स्पोकन इंग्लिशचा क्लास लावावा म्हणजे ग्लोबलायझेशनच्या काळात माझे मुल मागे पडायला नको ही भीती तुमच्या डोक्याला सतावणार नाही. हल्लीची मुले फार हुशार आहेत, पटकन शिकून घेण्याची कला त्यांना अवगत आहे. फक्त वेगवेगळ्या भाषेची आवड मात्र आपणच त्यांना लहानपणापासून लावली पाहिजे. कुठल्याही माध्यमाला किवा भाषेला कमी लेखू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. मुलांशी सतत संवाद करणे आवश्यक आहे. त्यांना वाचनाची आवड लावणे आवश्यक आहे.
१६व्या वर्षापर्यंत मातृभाषेत शिक्षण घेणे रास्त, नंतर ग्लोबलायझेशनला सामोरे जाण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. तसेही सेमी इंग्लिश मिडियम मध्ये वैज्ञानिक व तांत्रिक विषय इंग्लिश मधून शिकवले जातात त्यामुळे पुढच्या प्रवासाला मदत होते.
शाळेची निवड करताना विद्यार्थ्याची मानसिकता, त्याची क्षमता व शिक्षणला पुरक/पोषक वातावरण हे सगळं पडताळून पाहायला हवं. पालकांचं शिक्षण हा ही महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. नाहीतर भरमसाठ खर्च करून कॉन्व्हेंटसारख्या शाळेत घालायचं आणि घरात इंग्लिशची बोंबाबोंब! मग शिकवणी लावायची, त्याचा अधिक खर्च आणि परत शिकवणीच्या ठिकाणी काय शिकविले जाते हे पडताळून पाहायला कोणी नाही.
माध्यम कुठलेही असो शिक्षणाचा, शिकविणा-यांचा आणि शिक्षणसंस्थेचा दर्जा चांगला असेल आणि पालकांचा सक्रिय सहभाग असेल तर कोणतेही मूल सरस ठरू शकेल.

ज्ञान आणि योगदानालाच व्यवसायामध्ये महत्त्व

मी डॉ. अरूण विष्णु धुरी. १९५७ साली माझा वेंगुर्लेत जन्म झाला. एका मान्यवर संस्थेतून (भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली) शेती विषयात एम.एस.सी., पी.एचडी शिक्षण पूर्ण केले. आर्थिक सहाय्याची आत्यंतिक गरज असल्यामुळे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी खूप कष्ट केले. सर्व तीन राष्ट्रीय शिष्यवृत्ती (ए.एस.पी.इ.इ, आय.सी.ए.आर. आणि आय.ए.आर.आय.) मिळविणारा भारतातील कदाचित मी एकमेव विद्यार्थी असेन.
भारतात आणि परदेशात विक्रीसाठी आमच्या कंपनीसाठी कित्येक नव्या उत्पादनांच्या विकासासाठी जबाबदार असणारा एक्सेल क्रॉप केअर लि., मुंबई या कंपनीच्या व्यवसाय विकास विभागाचा मी उपाध्यक्ष आहे. गेल्या २० वर्षांमध्ये व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण जगभर फिरलो आहे. वनस्पती रोपांच्या संरक्षणासाठी पुष्कळशा परदेशी परिषदांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे.
एका भारतीय कंपनीला यशस्वी करण्यासाठी मी माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करू शकलो याचा मला आनंद आहे. यु.एस.ए., ऑस्ट्रेलिया इत्यादि सारख्या विकसित देशांमध्ये आमची नवी उत्पादक सुसुत्रे (फॉर्म्युलेशन्स) विकसित करत विकली आहेत. या माझ्या यशामध्ये खूप लोकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. यामध्ये माझे आई-वडिल, माझे शाळा शिक्षक, संशोधन संस्था इत्यादींचा महत्त्वाचा वाटा आहे. पण याचा पाया माझे आई-वडिल आणि शिक्षक यांनी रचला. अर्थात यात कठोर परिश्रम करणे हे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.
काळाचौकी, मुंबई येथील हाऊसिग बोर्डमध्ये आम्ही रहात होतो. हा मुख्यत्वेकरून गिरणी कामगारांचा विभाग होता. माझी शाळा ही मराठी माध्यमातली शाळा होती. काही शिक्षक खरोखरच महान होते. शालेय जीवन अगदी साधे होते. आमच्या जेवणाच्या डब्यात फक्त चपाती-भाजी असायची. शाळेची पुस्तके नेहमीच मोठ्या भावाने वापरून झाल्यानंतर आमच्याकडे यायची.
शाळेत शिकत असताना माझे इंग्रजी चांगले नव्हते. मुळातच भाषा विषयाची मला आवड नव्हती. जेव्हा मी दापोली येथील कृषि महाविद्यालयात दाखल झालो तेव्हा मला खूप कठीण परिस्थितीमधून जावे लागले. वसतिगृहात रहाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. महाविद्यालयात खूपसे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातल्या शाळांमधून आले होते आणि मराठी माध्यमातल्या शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना शिकताना खूप कठीण पडत होते. पण अधिक परिश्रम घेतल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकलो. प्रथम वर्षाच्या शेवटी सर्वोत्कृष्ट तीन विद्यार्थी हे मराठी माध्यमातल्या शाळांमधलेच होते. यामुळे आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आणि माझे शिक्षण मराठी माध्यमातल्या शाळेतून झाले आहे याची भिती वाटणे बंद झाले. मोकळपणे सांगायचे तर, माझ्या व्यावसायिक जीवनात माझी गैरसोय झाली नाही. या पातळीवर असताना व्यवसायातील तुमच्या ज्ञान आणि योगदानाला इतके महत्त्व असते की, तुमच्या भाषेला दुय्यम स्थान असते. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, इतर सर्व देशांतील लोकांपेक्षा मराठी माणसे जास्त चांगले इंग्रजी बोलतात. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन जसे इंग्रजी बोलतात त्याप्रमाणे उच्चार आणि समजून घेणे यावर आपण अधिक भर देणे गरजेचे आहे.
मराठी माध्यमातील शाळांमध्ये शिकणा-या मुलांच्या पालकांना मी खात्रीपूर्वक सांगतो की, त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. खरं सांगायचं तर मुले आपल्या मातृभाषेतूनच चांगली शिकतात. त्याचबरोबर इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि शास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयीचे उच्च ज्ञान इंग्रजी भाषेमध्येच उपलब्ध आहे. इंग्रजीचा तिरस्कार करू नका. माझं वैयक्तिक मत असं आहे की, आपलं प्राथमिक शिक्षण मराठीतून व्हावं आणि आपण हळूहळू इंग्रजीकडे वळावं
मराठी माध्यमातील शाळेमध्ये शिकण्यात काहीच चूक नाही. मराठी शाळांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देणे जरूरीचे आहे. फक्त अमराठी लोकसंख्येचे प्रमाण खूपच अधिक असल्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा टिकणे कठीण झाले आहे. प्राथमिक मराठी शिक्षण देण्याच्या पध्दती योग्य स्वरूपात असणे आणि १०वी पर्यंत हळूहळू इंग्रजीकडे वळणे हे गरजेचे आहे. मराठी किवा इंग्रजीवर जास्त जोर देणे जरूरी नाही.
भाषा हे केवळ वरचे आवरण आहे
मी, दिवाकर दामोदर जोशी, मालवण येथे शालेय शिक्षण घेऊन वालचंद कॉलेज, सांगली येथे इंजिनिअरिगचे शिक्षण पूर्ण केले. आता गेल्या ३६ वर्षांत वेगवेगळ्या कंपनीत काम करत करत पुणे येथे *इन्साईट क्वालिटी सर्विसेस* हे स्वतःचे तंत्रप्रशिक्षण केंद्र सुरू केले, जेथे मी स्वतः डायरेक्टर आहे. *इन्साईट क्वालिटी सर्विसेस* ही व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारी व सर्टिफिकेशन करणारी एक प्रशिक्षण संस्था आहे. *इन्साईट क्वालिटी सर्विसेस*ची स्थापना १९९४ साली झाली. १७ वर्षे ही संस्था पुण्यामध्ये, भारतात व भारताबाहेर शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. कोणत्याही कंपनीतील कामगार, अभियंते व व्यवस्थापक यांचे कौशल्य दिवसेंदिवस वृध्दिगत व्हावे लागते. कुर्‍-हाडीला धार काढल्याशिवाय लाकूड चांगले कापले जाणार नाही. प्रशिक्षण म्हणजेच आपल्या कुर्‍-हाडीला धार काढणे, ही धार काढायला जर आपण विसरलो तर आपण स्पर्धेत कधीच टिकू शकणार नाही. हेच काम *इन्साईट क्वालिटी सर्विसेस* ही संस्था करते.
अभियांत्रिकी हा मूळ विषय इंग्लिशमध्ये असूनही संस्थेतील कामगार वर्गासाठी लागणारी सर्व पुस्तके इन्साईट क्वालिटी सर्विसेसमध्ये मराठीत भाषांतरित करून घेण्यात आली आहेत आणि कामगारांच्या परीक्षाही मराठीत घेतल्या जातात. डॉक्टर्सना ऑपरेशन करताना जे कौशल्य लागते तसेच कौशल्य मशीनवर एखादा जॉब तयार करताना कामगारांना लागते. ही कौशल्ये सतत उच्च दर्जाची व अद्ययावत असावीत यासाठी ही संस्था निरंतर कार्यशील असते.
मी स्वतःच्या व कंपनीच्या प्रगतीविषयी समाधानी आहे. ट्रेनिग हे माझे आवडीचे क्षेत्र होते व त्यात काम करण्याची संधी मिळाल्याने माझे ज्ञान व कौशल्य मी दाखवू शकलो. माझ्या यशाचे सारे श्रेय मी माझे आई-वडील, भाऊ-बहिणी, माझी मुले, पत्नी व विशेषतः माझे परमपूज्य गुरू कै. सांगावकर सर व माझी शाळा टोपीवाला हायस्कूल यांना देईन.
माझे शालेय शिक्षण सातवीपर्यंत अगदीच छोट्या शाळेत झाले. १९६६च्या जूनच्या दुसर्‍-या आठवड्यात टोपीवाला हायस्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेताना ८ वी (ब) च्या वर्गाशेजारी छोट्याशा खोलीवरील नाव आम्ही वाचले..... *व्य. ह. सांगावकर!* परंतु त्यावेळी आमच्या ध्यानीमनीही नव्हते की या खोलीतील व्यक्ती आमच्या पुढच्या करियरची व आयुष्याची दिशादर्शक शक्ती आहे. मराठीच्या एका धड्यातील वाक्य मला अजुनही आठवते.... *शिक्षक हे दीपस्तंभासारखे असतात. त्यांच्यापासून प्रकाश घेऊन विद्यार्थी पुढे पुढे जात असतात* अशा या टोपीवाला हायस्कूलमधील सांगावकर सर हे माझ्यासारख्या अनेक मुलांसाठी दीपस्तंभ ठरले. *तुम्ही किती पैसे मिळवलेत यावर माझे समाधान अवलंबून नाही, तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत राहा, प्राविण्य मिळवीत राहा त्यानेच मला आनंद मिळेल* हे सांगावकर सरांचे वाक्य माझ्या मनावर कोरले गेले.
त्या काळात इंग्रजी विषय हा विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटत होते. कारण बहुतेक सर्व विद्यार्थ्यांची ऋृ,,क्, आठवीत सुरू होत असे. इंग्रजी सोपे करून शिकविण्यात सरांचा हातखंडा! इंग्रजीतील मुलांसाठीची छोटी छोटी पुस्तके ते स्वतः विकत घेऊन ठेवत. त्यांच्या छोटेखानी लायब्ररीतील ही पुस्तके आम्ही आळीपाळीने घरी नेऊन वाचत असू. मुलांमधील इंग्रजीची भीती कमी करून, आवड निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न चालू असे. शिस्तप्रियता हा त्यांचा स्थायीभाव होता. मग ते शाळेत वेळेवर येणे असो, गृहपाठ नीट करणे असो वा गणवेश असो. त्यांच्या सर्व व्यापातून ते स्वतःचे तास अगदी वेळेवर घेत व तल्लीनतेने शिकवीत. कामातील व्यवस्थितपणा किवा कार्यकुशलता हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य! कोणतेही पत्र नीटनेटकेच, शुध्द लेखनाच्या चुका न करताच लिहावे असा त्यांचा कटाक्ष असे. माजी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा खूप पत्रव्यवहार चाले. त्यात बरेचदा लेखनिकाची भूमिका करायची संधी आम्हाला मिळत असे. या सर्वांतूनच आमचा इंग्रजीचा पाया भक्कम झाला. शालेय जीवन टोपीवाला हायस्कूलच्या प्रांगणात खूपच चांगले गेले.
शालेय शिक्षण संपवून वालचंद कॉलेज, सांगली येथे ए.क.(ग्कक्क्त) इंजिनिअरिग केले. सांगलीच्या कॉलेजमध्ये काही मुंबई-पुण्याचे विद्यार्थी, तर काही इंग्रजी माध्यमात शिकलेले, छान इंग्रजी बोलणारे विद्यार्थी आजुबाजुला असले की आम्हाला बुजल्यासारखे होई. मराठी माध्यमामुळे प्रथम काही दिवस त्रास झाला परंतु लवकरच लक्षात आले की तुमचे ज्ञान, कौशल्य, कष्ट व स्वयंस्फुर्ती यावर तुमची प्रगती अवलंबून असते. इंग्रजी संभाषण कला शिकण्यासाठी आम्ही सर्व मित्र मिळून कॉलेज संपल्यावर आम्ही क्रद्धदृद्वद्र-क्त्द्मडद्वद्मद्मत्दृद, क्ष्दद्यड्ढद्धध्त्ड्ढध्र् ची प्रॅक्टीस करत असू. तीन ते सहा महिन्यात आत्मविश्वास वाढला व काही दिवसातच आमचे ज्ञान व कौशल्य लोकांच्या नजरेत पडू लागले.
शिकण्याचे माध्यम कोणते असावे यावर मी सल्ला देणे बरोबर नाही पण माझ्या मते, मराठी मिडियमला असलात तरी इंग्रजीचा योग्य अभ्यास चालू ठेवणे व शक्य झाल्यास हायस्कूलमध्ये इंग्रजी मिडियम घेतल्यास दोन्ही भाषांचे फायदे घेता येतील. हल्ली वरच्या देखाव्याला किवा सुशोभिकरणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे असे सारखे बिबवले जाते पण इमारत तकलादू असेल तर सगळेच मुसळ केरात. जास्त भर हा ज्ञान संपादन करण्याकडे व दर्जा वाढवण्याकडे असायला हवा. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे जरूरीचे आहे की भाषा हे वरचे आवरण/पाकिट/कव्हर आहे. आतील पत्र/मजकूर म्हणजे तुमचे ज्ञान, कौशल्य! आत पत्रच नसेल किवा त्यातील मजकूर ठीक नसेल तर वरच्या पाकिटाचा काहीही उपयोग नाही. मग ते इंग्रजी पाकिट असो वा मराठी!

मराठीला समांतर महत्त्व दिलं पाहिजे

   मुळात कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा आत्ताच्या पालकांना मोठ्ठा प्रश्न पडतो. आई-वडील जर मराठी माध्यमातून शिकलेले असतील तर त्यांची कुतरओढ तर विचारुच नका.
      आमच्यावेळी तर हा प्रश्नच आला नाही. इंग्लिश माध्यमाची शाळाच त्यावेळी सा-या शिरोडा पंचक्रोशीत नव्हती. असली असती तरी आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेतच घातलं असतं.
      मी आरती खटखटे. अमेरिकेत पेनिसिल्वेनिया राज्यातल्या फिलाडेल्फिया शहराच्या उपनगरात रहाते. मी कम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर आहे. गेली जवळजवळ १५ वर्षे मी या क्षेत्रात काम करतेय. याला मराठी पर्यायी शब्द काही आठवत नाहीये. (संगणक प्रणाली)
      शिरोड्याच्या ट्युटोरीअल इंग्लिश स्कूलमधून पाचवी ते बारावी त्यापूर्वी पूर्व प्राथमिक मराठी शाळेतून तिसरी. आमच्यावेळी बालवाडी होती की नाही ते नाही आठवत. पहिली दुसरीचा अभ्यास आजोबांनी (माझ्या आईचे वडील) अण्णांनी, घरीच करुन घेतला. वेंगुर्ल्याला जाऊन दुसरीची परिक्षा देऊन सरळ तिसरीतच प्रवेश घेतला होता. शाळेची सवय व्हावी म्हणून दुसरीच्या वर्गात काही दिवस काढले तेवढेच.
      दहावी पर्यंत सगळेच विषय मराठीतून होते. अकारावी - बारावी मात्र शास्त्र शाखेत असल्यामुळे इंग्रजी माध्यमातून होता. पण त्या इंग्लिशसाठी व्याकरण शुद्ध असण्याची गरज नसते. त्यामुळे तेव्हा काहीच वाटलं नाही. पण इंग्लिश बोलता कुणाला येत होतं?
      बारावीनंतर बी.एस्सी.ला सावंतवाडीला पंखे महाविद्यालय. (पंचम खेमराज हो) तिथे तरी इंग्लिश बोलायची कुठे गरज होती. पण शेवटच्या वर्षी मात्र काळजी वाटायला लागली. कारण पुढे एम. एस्सी करायचं म्हटलं तर मुंबईसारख्या शहरात जावं लागणार आणि मग इंग्लिश बोलणं तर जमलचं पाहिजे. इथल्या काही सरांनी आम्हाला विषय आत्मसात करण्यासाठी खूप मदत केली. त्यापैकी आवर्जुन उल्लेख करावा असे श्री. फातर्फेकर सर, जोशी, घाटगे, कुलकर्णी सर आणि तिथेच मला भेटली मालवणला शिकलेली मैत्रीण स्मिता करंदीकर. तिच्यामुळे माझा बुजरेपणा कमी झाला असं म्हणायला हरकत नाही. दोघांनी ठरवूनच टाकलं की, आपण निदान आपापसात तरी इंग्लिश बोलायची सवय करायची. कुणी नाव ठेवली, कुणी हसलं तरी पर्वा करायची नाही. मग काय, आता ते आठवलं की फार गंमत वाटते आणि हसू येतं. आम्ही गोविद चित्रमंदिरमध्ये किस्मतनावाचा टुकार सिनेमा पहायला गेलो होतो आणि त्यावर सर्व चर्चा इंग्लिशमध्ये केली. चित्रपटाची समिक्षा म्हणजे काही सोपी गोष्ट आहे काय? बरं वाटतं होतं तेव्हा की, आपण अगदीच काही हेनाही.  थोडं फार चुकलं तरी ब-यापैकी इंग्लीश बोलू शकतो की! शिरोड्याच्या घरी आम्ही खूप इंग्लिश गाणी लावायचो. कधी सुट्टीला आलो की, ती गाणी लावून मनसोक्त नाचायचं आमचा आवडीचा टाईमपास होता. बाकी वाचनाची खुप आवड होती. ख-या परीक्षेची वेळ आली ती मुंबईला एम.एस्सीसाठी प्रवेश घेतल्यावर. कारण तिथे ओळखीचे कोणीच नव्हतं.
      एम.एस्सी.साठी मुंबईला आले. विल्सन कॉलेज, चर्नीरोडला अॅडमिशन मिळाली. बरोबरीची सर्वचं मुलं शहरातली, इंग्लिश मिडियमध्ये शिकलेली. सुरुवातीला फारच लाज वाटायची तोंड उघडायला. पण पाण्यात पडल्यावर पोहल्याशिवाय पर्याय नाही. येईल तसं बोलायला लागले. विल्सन कॉलेजचं वातावरण गिरगांवमुळे बरचं मराठी आहे. तिथले शिपाई, लॅब असिस्टंटस, सर एरव्ही माझ्याशी मराठीतच बोलायचे. फिजिक्सचे डिपार्टमेंटहेड धारकर सरांना तर माझं फार कौतुक होतं. सर्वांना सांगायचे की, बघा चारशे मैलावरुन ही इथे शिकायला आली आहे.
      मराठी माध्यमातल्या मुलांना परीक्षेत मार्कस मिळवितांना माध्यमामुळे काही अडचण येत नाही. पण जेव्हा इंग्लिश बोलायची वेळ येते तेव्हा आत्मविश्वास नसतो. कित्येकदा तर सहजतेने इंग्रजी बोलणा-या मुलांचा फार हेवा वाटतो. ज्ञानाला माध्यमाचं बंधन पडत नाही. पण कॉलेज जीवनात, मुख्यतः शहरात, अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमात भाग घ्यावा असं वाटत असूनही ही मुलं मागे मागे राहतात का? तर इंग्लिश बोलण्याचा सराव नसतो. म्हणून मग आत्मविश्वासही नसतो. चुकीचं बोललो तर इतर हसतील. चेष्टा करतील असं वाटत रहातं.
      शिक्षण संपल्यावर नोकरीसाठी मुलाखत घेतांना भरारी मारता येत नाही. शिक्षण नसेल तर नोकरी मिळणे कठीण म्हणून मुलं शिक्षण घेतांना सगळेच काही उच्च वर्गात उत्तीर्ण नाही होत. मग एवढ्या शिक्षणानंतर नोकरी शोधतांना इंग्लिशचा अडसर मधे येतो. काही वेळा तरी डीग्री असूनही सहजतेने बोलता न आल्याने नोकरीची संधी हुकते.
       याचा अर्थ असा नाही की मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालू नये. आई - वडील मराठी माध्यमात शिकलेले असतील तर त्यांना मुलांचा अभ्यास घेणं सोप पडत.
      मला वाटतं की, सध्याच्या जगात इंग्रजीला भवितव्याच्या दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे. मराठी, इंग्रजी, हिदी या भाषा, तर शास्त्र, बीजगणित, भुमिती, इंग्रजीत असावं. इंग्रजी आणि मराठीचा शाळेत समतोल असावा जेणेकरुन मुलाचं जेवढं मराठीवर तेवढचं इंग्रजीवर प्रभुत्व राहील.
      सध्याच्या जगात नोकरीची भाषा इंग्रजीच आहे आणि पुढेही तिच राहील. शेवटी भारतात, प्रत्येक राज्यात वेगळी, अशा इतर भाषा आहेत. पण इंग्लिश हीच सगळ्यांना जोडणारी भाषा आहे आणि त्यावर प्रभुत्व असणं ही वर्तमानकाळाची आणि भविष्यकाळाचीही गरज आहे.
      मुलांना मराठी जरुर यावं. मराठीत एवढं विपुल साहित्य भांडार आहे. त्याचा आस्वाद मुलांना जरुर घेता आला पाहिजे.
      ब्रिटिशांनी जरी इंग्रजी भाषा आपल्यावर लादली असं म्हटलं तरी ती आता जगाची भाषा आहे.
      मराठी ही माझी मातृभाषा आहे. इंग्लिश बोलता आलं तरी मनापासून एखादी गोष्ट व्यक्त करायची म्हटली जर मराठीतच होते. इंग्रजीत शब्द शोधावे लागतात. इंग्रजीला पर्याय नाही. पण मराठीला समांतर महत्त्व दिलंच पाहिजे असं मला तरी वाटतं.

स्टर्डी इंजिनिअरींगचे संचालक सहदेव दिपनाईक

माझे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाले. शाळेत असतेवेळी माझी इच्छा होती की आयुष्यात इंजिनिअर व्हायचे, कारखाना काढायचा, शिक्षणानंतर त्यासाठी सतत प्रयत्नात राहिलो. १९५३ मध्ये एस.एस.सी. झाल्यावर माझी इच्छा पुरी करण्यासाठी भावाकडे मुंबईत आलो. मी गरीब, अशिक्षित शेतक-याचा मुलगा. माझे स्वप्न कसे पुरे होणार? या विवंचनेत मी नेहमी असायचो. मुंबईत आल्यानंतर नियमित कॉलेजमध्ये जाणे परिस्थितीमुळे जमले नाही. म्हणून नॅशनल इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीजमध्ये अप्रेन्टीस म्हणून कामाला राहिलो. माझ्या बंधुंनी मला एका गो-या साहेबाकडे, त्याच्या बंगल्यावर मुलाखतीसाठी नेले. त्याने मला तुझे नाव काय? म्हणून विचारले. मी खेडेगावातून आलेला मुलगा, त्याच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो नाही. पण मला नोकरी मिळाली. मी दिवसा नोकरी करीत असल्याने रात्रीच्या कॉलेजात जाऊ लागलो. व्ही.जे.टी.आय. मध्ये मी दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. नोकरी करते वेळी कारखान्यात पूर्ण अनुभव घेतला. माझे काम पाहून वरिष्ठ अधिका-यांनी मला टूलसेंटर, सुपरवायझरचे काम दिले. ते काम पण चांगल्या त-हेने मी पार पाडले. हे करीत असताना दुस-या कंपनीत मला फोरमनची नोकरी मिळाली. नोकरी करतेवेळी फार भिती वाटत होती. पण धीराने, प्रामाणिकपणे मेहनत करून ती जागा स्थिर केली, तेथील अधिका-यांचे सहकार्य मिळाले. तेथे नोकरी करीत असताना बजाज इन्स्टिट्यूटमधून ऑपरेशन मॅनेजमेंटचा दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. तिथे मी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. निरनिराळी इंजिनिअरींगची व मॅनेजमेंटची पुस्तके नियमित वाचतच होतो. अशा प्रकारे माझ्या विचारांमध्ये भर पडली. तिथे दोन वर्षे काम करून मी ती कंपनी सोडली. पुण्यामध्ये रस्टन अॅण्ड हॉर्नस्वी कंपनीत ज्युनियर इंजिनिअर म्हणून कामावर रूजू झालो. तेथे सहा वर्षे सिनिअर इंडस्ट्रीयल इंजिनिअर, प्लॅनिग इंजिनिअर, प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून काम पाहिल. कंपनीची फार प्रगती केली. हे सगळे पाहून गो-या साहेबाने मला मुंबईत त्याच्या कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरी दिली. तेथे असिस्टंट वर्कस् मॅनेजर म्हणून मी काम पाहिजे. नवीन प्रॉडक्टस् डेव्हलप केले. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर पुण्यातील व्हॅन्सन इंडिया प्रा.लि. उच्च पदावर रुजू झालो.
अशा सर्व बाबतीत अनुभव घेऊन पुन्हा सहा वर्षानंतर मुंबईत नाथानी स्टिल इंडस्ट्रीज मध्ये वर्कस मॅनेजर म्हणून रूजू झालो. तेथे ६ वर्षे काम केल्यानंतर काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा असे वाटू लागले. म्हणून वयाच्या ४९ व्या वर्षी व्यवसाय चालू केला. एक पार्टनरची मशीन होती, त्याला मी काम आणून द्यायचो. माझे स्वप्न पूरे होत होते, मुले लहान होती. ज्यावेळी मी कंपनी सोडून आलो, त्यावेळी माझी पत्नी घाबरली व मला म्हणाली, आता काय करणार आहात तुम्ही? असा तिनं मला प्रश्न केला. मी तिला सांगितले की मी आता व्यवसाय करणार आहे. परंतु त्यावेळी माझ्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नव्हता. माझ्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मी व्यवसायात घालायचे ठरविले. सहा महिन्यांचा घरखर्च बायकोजवळ दिला आणि पुढच्या सहा महिन्यात मला घरात पैसे देता येणार नाही असे सांगितले. यात बायकोने मला प्रोत्साहन दिले. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही व्यवसाय चालू करा. हे ऐकून मला धीर वाटला. पार्टनरशीपमध्ये मला बराच फायदा झाला. माझे स्वप्न स्वतःचा कारखाना काढायचा असे होते. त्यासाठी अहमदनगर एम.आय.डी.सी. मध्ये कारखान्यासाठी १७०० स्क्वे. मीटर जागा घेतली. नातेवाईक घेऊन चार जणांत पार्टनरशीपमध्ये स्टर्डी इंजिनिअर्सम्हणून कारखाना चालू केला. कंपनीचे कन्स्ट्रक्शन चालू केले. बँकेकडे ३.५ लाखाचे कर्ज मागितले. पण नगरला जामीन नसल्यामुळे कर्ज मंजूर झाले नाही. शेवटी त्या बँकेच्या मॅनेजिग डायरेक्टरकडे गेलो व माझी परिस्थिती त्यांना नीट समजावून सांगितली. एम.डी. साहेबांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व माझे लोन पास केले ते फक्त आठ दिवसातच. नंतर फक्त पंचेचाळीस दिवसात मी माझा कामाचा पूर्ण अनुभव वापरून कंपनीचे काम पुरे करून प्रॉडक्शन चालू केले. अशा त-हेने कारखाना १९ जानेवारी १९८४ साली चालू केला तो वयाच्या ४९व्या वर्षी. या वयात व्यवसायात पडणे तसे फार मोठे आव्हानच होते. मुलगे लहान होते, ते शाळेत जात होते. बायकोने मुलांना मुंबईहून नगरला आणले. मुलांना नगरला शाळेत घातले. बायको मुंबईची असल्याने सुरूवातीला अहमदनगरमध्ये राहणे फार कठीण होत होते. तरीपण तिने अॅडजस्ट होऊन मला धीर दिला. तिने मला सांगितले की, तुम्ही पुढे चला, व्यवसायात लक्ष घाला, मी घर व मुलांचे शिक्षण बघते.
याच वेळी मला अॅक्सीडेंट झाला. माझ्या हाताला प्लॅस्टर घातले होते. कोणी पार्टनर अहमदनगरला येऊन कंपनीचे काम पाहण्यास तयार होत नव्हता. मुंबईहून मी दोन कामगार आणले होते. त्यांनी माझा कारखाना सांभाळला. अशा परिस्थितीत मला माझी पार्टनरशीप तोडावी लागली. चारही बाजूने अनंत अडचणी येत होत्या. मी व माझी पत्नी स्टर्डी इंजिनिअर्स (इं.) प्रा.लि. चे डायरेक्टर झालो. मी काही धीर सोडला नाही. सर्व पार्टनरचे पैसे देऊन टाकले. या बाबतीत मला बँकेने मदत केली. तेव्हापासून मी व्यवसायात फायद्यामध्ये आहे.
 १९८७ मध्ये स्पार्क हायड्रोन्युमॅटिक्स् प्रा.लि. असं ठेवले त्यात मी माझ्या मोठ्या मुलाला डायरेक्टर म्हणून घेतले व मी एक डायरेक्टर झालो. या कारखान्यात फॅब्रिकेशन चालू केले. मुलगे मोठे होत गेले. अभ्यास करतानाच ते कारखान्याच्या कामात लक्ष घालू लागले. मला तीन मुले. मोठा सचिन, दोन नंबरचा योगेश व तिसरा धीरज. या कारखान्यात शुगर इंडस्ट्रीजला लागणारे निकेल स्क्रिन तयार करायला लागलो. स्टर्डी इंजिनिअरींग (इं.) प्रा.लि. मध्ये डायमंड टुल्स, मोटर आणि अर्टलनेटरला लागणारे पार्ट तयार केले जाऊ लागले. ही माझी सर्व कामे झिरो रिजेक्शनमध्ये होत होती.
क्रॉम्प्टन ग्रिव्हजने माझ्या कंपनीला क्वालिटी अॅवॉर्ड दिले. एच.ए.एल.-नाशिक हिदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी भारतासाठी लढाऊ विमाने बनविते. त्या विमानांना लागणारे पार्टस् माझ्या नगर येथील कंपनीत तयार होतात. त्यांनीही मला क्वालिटी अॅवॉर्ड दिले आहे. १९९१ सालात मला प्रथम पुरस्कार रू. ५०००/- व स्मृती चिन्ह महाराष्ट्र शासनाकडून लघुउद्योगात चांगली कामगिरी केल्याबद्दल मिळाला.
मी तीन वर्षे (१९९४ ते १९९७) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरींग या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. ऑपरेशन मॅनेजमेंटचा कोर्स बजाज इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केला. या काळात सी.बी.डी. बेलापूर येथे संस्थेचे स्वतःचे ऑफिस लोकांच्या मदतीने उभे राहिले. संस्थेकडे निधी नसतानाही कठीण परिस्थितीत कार्यालय उभे केले. 
जिद्दीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आयुष्यात भरघोस यश व किर्ती मिळतेच. मी आता ७५ वर्षांचा आहे. माझ्या मोठ्या मुलाचे २००७ मध्ये अॅक्सिडेंटमध्ये निधन झाले. माझी दोन्ही मुले योगेश व धीरज ही अहमदनगरमध्ये काम पाहतात. मोठी सून अॅडव्होकेट असून ती अहमदनगर येथील कोर्टात आता प्रॅक्टिस करीत आहे. ती सकाळी कारखान्यात जाते. मोठ्या मुलाला ३ वर्षाची मुलगी देखील आहे. योगेशला दीड वर्षाची मुलगी आहे. धीरजला २ वर्षाचा मुलगा आहे. योगेश व धीरज यांनी डॉल्फीन नावाची कंपनी मुंबईत काढली आहे. ते इंटरनॅशनल सेफ्टीसाईनेजेस बनवितात. अशा तर्‍हेने वाटचाल चालू आहे. माझ्या दोन्ही सुना बी.कॉम आहेत आणि कॉम्प्युटर एक्सपर्ट आहेत. सध्या कंपनी वर्षाला चार कोटींचे उत्पादन करते. ते लवकरात लवकर १० ते १५ कोटींवर माझी मुले उत्पादन नेतील व येत्या दहा वर्षांत हे उत्पादन १०० कोटींवर नेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आमच्या दोन्ही कंपन्यांना आय.एस.ओ. ९००१ ते २००० चे सर्टिफिकेट मिळाले आहे. प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करणार्‍-यांना इश्वर मदत करतोच.
सध्याच्या काळात अगदी गावातही इंग्रजी माध्यमात शिकण्याचे पेव आले आहे. मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे आहात याला प्रॅक्टिकल जीवनात महत्त्व आहे. इंग्रजी ही एक भाषा आहे. आणि संवादाच्या माध्यमासाठी सरावाने ती शिकता येते. त्यासाठी त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि ध्येयावरील निष्ठा या गोष्टींची गरज असते. मराठी माध्यमात शिकणार्‍-या मुलांनी कोणताही न्यूनगंड अगर आपण कुठेतरी कमी आहोत अशी शंकाही मनात बाळगू नये. आता प्रश्न उरला मराठी शाळांच्या दर्जाविषयी. तर आता पहिलीपासूनच मराठी माध्यमांच्या शाळांत इंग्रजीचे धडे दिले जातात. फक्त घरी इंग्रजी वर्तमानपत्रे, टी.व्ही.वरील बातम्या ऐकण्याची सवय ठेवावी. पालकांनीही भाषेचा हावका करू नये. आपल्या मुलाचा कल ओळखून त्याला दिशा द्यावी. मुले आपले ध्येय साध्य करतातच.

मार्केटींगमध्ये हवा फकत आत्मविश्वास

      मी अजय श्रीराम गावडे जन्माने मुंबईकर असलो तरी मन सतत मूळगावी वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर गावी धाव घेत असते. माझं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भांडूप इथे मराठी माध्यमातून झाले. पुढे झुंझुनवाला महाविद्यालयातून बी. कॉम. नंतर ठाण्याला एल्.एल्.बी. पूर्ण केले.
      पुढे एशियन पेट्रोलियममध्ये दीड वर्ष अकाऊंटंट नंतर मार्केटींगचे काम चांगल्याप्रकारे केले. मार्केटींगमध्ये काम केल्याने विविध प्रकारचे लोक, विविध भाषा यांच्याशी संफ आला. व्यवसायाची गरज म्हणून त्या-त्या वेळी आवश्यक गोष्टी आत्मसात कराव्या लागल्या. नोकरीमध्ये मार्केटींगचा अनुभव घेत असताना, आपण इतरांसाठी एवढ काम करु शकतो तर स्वतःसाठी का नाही ? असा नेहमी विचार यायचा पण बहुतांश मराठी माणसांच्या घरात व्यवसायाची संस्कृती नसतेच. इमानेतबारे नोकरी करावी असेच संस्कार दिले जातात. आमचंही घर त्याला अपवाद नव्हतं.
      सुरुवातीला १९९० साली भांडुपला जेव्हा भाड्याच्या जागेत व्यवसाय सुरु केला तेव्हा आईचा पाठिबा होता पण वडिलांची काहीशी नाराजी होती. आपल्या मुलाने आखीवरेखीव आयुष्य जगावे अशी अपेक्षा होती. आम्ही स्टर्लिग ऑइल इंडस्ट्रीज या नावाने ऑईलच्या फिनिश्ड प्रॉडक्टचं मार्केटींग सुरु केले. पुढे २००४ साली इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जेव्हा स्वतःच्या जागेत युनिट सुरु झालं. तेव्हा वडील देखील खुष होते. भारतातील नामांकीत ९ कंपन्यांची सध्या आमच्याकडे डिलरशीप आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश इथे आमचे सन्मानीय ग्राहक आहेत. इंडीयन नेव्ही, कन्स्ट्रक्शन कंपन्या, इंजिनिअरींग कंपन्यांना आम्ही आमच्या प्रॉडक्टस्चा पुरवठा करतो.
      व्यवसायात सुरुवातीची दोन वर्षे स्ट्रगलमध्ये गेली आणि कोणताही व्यावसायिक वारसा, पाठिबा नसताना ती तशी जातातच. नंतर मात्र कंपनीचं मार्केटमध्ये चांगला नाव झालं.
      माझं शिक्षण मराठी माध्यमातून होऊन सुध्दा आणि मुंबईसारख्या शहरात मार्केटींगच्या क्षेत्रात काम करत असताना भाषेची अडचण कधीच जाणवली नाही. माझ्या मते गरजेप्रमाणे आपण भाषा शिकत जातो. त्यासाठी उगाचच इंग्रजीची भिती बाळगण्याची आवश्यकता नाही.
      व्यवसायात आपली मराठी अगर कोकणातली माणसे पुढे यायला बघत नाहीत. वाशी / मुंबई मार्केटमध्ये परप्रांतातले लोक कोणतेही काम करायला लाजत नाहीत. मग आपण कुठे कमी पडतोय यांचा सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. व्यवसायात स्थिर झालेल्या व्यक्तींनी शक्य असेल तिथे आपल्या माणसांना मदत केलीच पाहिजे. तरच नवोदितांची भीड चेपेल.
      आम्ही मुंबईत स्थायिक असलो तरी मनाची ओढ मात्र गावाकडेच असते. गावातील तरुणांसाठी शक्य असेल ती मदत करत असतोच. मात्र नोकरी - व्यवसायात अगर कोणतेही काम करताना प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पनांना फाटा देऊन आत्मविश्वासाने जगले पाहिजे. सचोटी, प्रामाणिकपणा आणि कामाविषयी आस्था माणसालाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून देतात. माझी पत्नी आकांक्षा गावडे मराठीची प्राध्यापक आहे. मार्केटींगसारख्या क्षेत्रात यश मिळवायच असेल तर भाषा ही सरावाने शिकता येते पण सर्वांत महत्वाचा असतो तो म्हणजे फक्त आत्मविश्वास!