Friday, 24 February 2012

अधोरेखित *
अंडे का फंडा

युरोपियन देशामध्ये जेवण करण्याचा वेळ अवघा १८ मिनिटे आहे. सिनजेन्टामधील वरीष्ठ अधिकारी श्री. गोखले (पुणे) यांनी सांगितलं तेव्हा रोज ४ तास चूल, इंधन, स्वयंपाक व भांडी घासणारी भारतीय ग्रामीण महिला डोळ्यासमोर आली. युरोपमध्ये तयार अन्न अधिक वापरतात. पण बायोगॅस, प्रेशर कुकर यांच्या वापरामुळे जेवण करण्याचा वेळ चार तासावरुन १ तासावर येतो. म्हणजे रोजचे ३ तास प्रमाणे साधारण १००० तास महिलेचे वाचतात. या वेळेचे रुपांतर आर्थिक प्रगतीमध्ये करण्याचे आम्ही ठरविले. इंधन ठेवायची २०० चौ. फूट जागा व रोजचा १ तास कुक्कुटपालनासाठी हा तो फॉर्मुला होता. प्रचंड यशस्वी ठरला. आज १०० कुटुंबे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. काहीजण तर यामध्ये यशस्वी व्यवसाय करणारे आहेत. ‘कुक्कुटपालन‘ हा पूरक उद्योग न राहता त्यांनी तो ‘मुख्य व्यवसाय‘ म्हणून स्विकारला आहे. आजचा लेख हा या फंड्याबद्दल आहे.
एकूणच शेतीची अर्थव्यवस्था ही फायदा-तोटा यामधील कसरत आहे. खरं तर तो जुगार आहे निसर्गाशी खेळलेला. कोंबडी माणसाने पाळली कारण पहिल्या दिवसापासून ‘पिल्लू‘ स्वतःच आपल्या चोचीने खाते. त्याला भरवावं लागत नाही. परसबागेतील ‘लक्ष्मी‘ असं तिचं अर्थशास्त्रीय नामकरणं. पुरेसे प्रशिक्षण नसताना ‘कुक्कुटपालन‘ म्हणजे १०० टक्के तोटा. लसीकरण, खाद्य व्यवस्थापन, विक्री व्यवस्था व या सर्वांसाठी लागणारे बँकेचे अर्थसहाय्य हे चार स्तंभ महत्वाचे ठरतात. सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे श्री. ढोलम सर चेअरमन असताना यासाठी १५००० रु.चे कर्ज देण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसाचे प्रशिक्षण, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक यातून लाभार्थी निवडले गेले. सकाळी १० ते ५ असे तीन दिवसांचे प्रशिक्षण होते. डॉ. बापू भोगटे, श्री. मधुसूदन कांदे, श्री. मनोहर (पप्पू) ठिकार यांची प्रशिक्षण टीम तयार झाली. कुक्कुटपालनाचा पॅटर्न तयार झाला. व्यवस्थापन शास्त्रामध्ये च्ग्र्घ् (च्द्यठ्ठदड्डठ्ठद्धड्ड ग्र्द्रड्ढद्धठ्ठद्यत्दृद) तयार होणे महत्वाचे असते. आज आमचा कुक्कुटपालनाचा च्ग्र्घ् तयार आहे. ६०० रुपये फी देवून लोक प्रशिक्षणासाठी येतात. पूर्ण मोफत काही द्यायचं नाही हा आपला प्रथमपासूनच निर्णय होता. यशाचे गमकही तेच आहे.
परसबागेतील सुधारित (गिरीराज, वनराज, ग्रामप्रिया) जातीचे पक्षी आहेत. २०० पक्ष्यांचा एक फार्म, छोटे स्वरुप. ४०० पक्ष्यांचा एक फार्म जरा मोठे स्वरुप व १००० पक्ष्यांचा फार्म मोठे स्वरुप असे तीन प्रकार किवा टप्पे आपण केले. १०,००० रु., २०,००० रु. व १ लाख रुपये भांडवली खर्चाचे हे ३ प्रकल्प यशस्वी ठरत आहेत. आपला एकूणच कार्यक्रम टार्गेटसाठी नाही. तो गरजेवर आधारीत आहे. लोकवर्गणी, श्रमदान व मनापासून काम करण्याची इच्छा असणं महत्वाचं.
श्री. विनायक माने हा हुमरस गावचा युवक आज स्वतःचे चिकन सेंटर चालवितो. श्री. मधुसूदन कांदे हा शेतकरी ५०-६० शेतक-यांना पिल्ले-खाद्य पुरवितो. तयार पक्षी विकत देतो. संदिप जांभेकर व अन्य मित्र खारेपाटणला व्यावसायीक कुक्कुटपालन यशस्वी पद्धतीने करतात. अनेक नावे सांगता येतील. या सर्वांचे बँकेमधील आजचे क्रेडीट ५० हजार रु.चे आहे. पर्यटन जिल्हामध्ये अजून संघटीत स्वरुपाचे ‘कुक्कुटपालन‘ उभं राहीलं पाहिजे. नाहीतर सांगली, मिरजवाले गोवा मार्केट करतातच, आपले मार्केट ताब्यात घेतील. परप्रांतीय/परगाव हा संघर्षाचा हेतू नाही. आपणाला काय करता येईल त्याचा विचार करण्याची ही पुन्हा न मिळणारी संधी आहे.
कुपोषणासाठी कुक्कुटपालनाचा प्रयोग यशस्वी केला. आज गरज आहे अनुकरणाची. कस्तुरी मृगाचं सांगतात की, सुवास कोठून येतो ते न समजल्यामुळे तो शोधासाठी सैरावैरा पळतो. थकून-भागून बसल्यावर शोध लावतो उगमाचा! आपली अवस्था तशीच आहे. समृद्ध निसर्गातील गरीब माणूस व रेशन दुकानातील रांगा व दारिद्र्य रेषेचे कार्ड मिळवण्यासाठी तमाम भरणा-या ग्रामसभा या सर्वांतून बाहेर पडण्याची गरज आहे. महात्मा गांधी म्हणायचे ‘करके देखो.‘ आम्हालाही तेच वाटते ‘चर्चा नको, करुन पहा.‘ कारण आम्ही याची पायवाट केली आहे, गरज आहे हमरस्त्यामधील रुपांतराची!
डॉ. प्रसाद देवधर, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप, ता. कुडाळ. ९४२२५९६५००

संपादकीय *
राणे संपलेले नाहीत!
नगरपालिका निवडणुकांप्रमाणे सिधुदुर्ग जिल्हा परिषदेतही नारायण राणे यांच्या काँग्रेस पक्षाला हार पत्करावी लागेल असा सर्वच विरोधकांचा हेरा सपशेल चुकला. राणे काँग्रेसने सिधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा बहुमत प्रस्थापित केला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ३३ जागा काँग्रेसने जिकल्या. विरोधकांना फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले.
पंचायत समित्यांमध्ये पूर्वी देवगड वगळता काँग्रेसचीच सत्ता होती. पण आता मात्र वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या चारही पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्या आहेत. आतापर्यंत देवगड पंचायत समितीवर भाजपची सत्ता होती. तिथे काँग्रेसने ९ जागा जिकत बहुमत प्रस्थापित केले आहे. काँग्रेसच्या या यशात नारायण राणे यांच्या करिष्म्याचा भाग किती? आणि राणे यांच्यावरती सर्वच विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेचा परिणाम किती? हा ही विचार करण्याजोगा मुद्दा आहे. काँग्रेसला मिळालेले यश हे ब-याच अंशी उमेदवाराच्या व्यक्तीगत लोकप्रियतेवर म्हणा किवा साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब म्हणा या मार्गाने मिळालेले आहे. तसेच यावेळी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने त्याचाही बराचसा भाग काँग्रेसच्या विजयाशी निगडीत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे सपशेल आपटले. यावरुन दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी मतदारांनी काँग्रेसलाच पसंती दिल्याचे दिसून आले. परंतू तरीही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आहेच कोठे? जिल्ह्याचा विकास मीच करणार वगैरे वक्तव्य करणा-या नारायण राणे यांना मतदारांनी नुसत्या विकासाच्या गप्पा व भाषणे नको. प्रत्यक्ष काम दिसू द्यात असा इशाराही या निकालात देऊन ठेवला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी, सेना, भाजप अशी महायुती होईल असा अनेकांचा अंदाज होता आणि तसे झाले असते तर या निवडणुक निकालात बराच फरक पडला असता अशी मतदानाची आकडेवारी दर्शविते. परंतू सिधुदुर्गात सावंतवाडी वगळता इतर कोठेही अशी महायुती अस्तित्वात आली नाही. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीवर आमदार केसरकर महायुतीद्वारे राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित करु शकले. अन्यथा इथे काँग्रेसच्या निसटता पराभव झाला आहे. दोडामार्ग पंचायत समिती काँग्रेसला गमवावी लागली. यामागे विरोधी पक्षांनी पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्षांनी केला आहे. हा एक या निवडणुकीतील सर्वात मोठा विनोद आहे.
जिल्हा परिषद हा एक राज्यकर्त्यांनी आपल्या आणि राजकीय पक्षाच्या लोकांना सत्तास्थाने मिळवून देण्यासाठी केलेली राजकीय रचना आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्तेही ‘एंगेज‘ राहतात. स्वतःची स्थावर जंगम मालमत्ता उभारतात. हे राज्यात सर्वच जिल्ह्यात चालू असतेच. त्याला सिधुदुर्ग जिल्हाही अपवाद नाही. सिधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भ्रष्ट कारभाराची अनेक प्रकरणे उघडकीला येऊनही पुन्हा काँग्रेसलाच लोकांनी पसंती दिली यामागे ५० टक्के महिला आरक्षणाचा ही भाग असावा. पुरुष सदस्यांइतक्या निर्लज्जपणे महिला सदस्य भ्रष्ट कारभार करणार नाहीत अशीही लोकांना खात्री वाटली असावी. अर्थात या महिलांवरती सत्ता कोणाची? हाही भाग येतोच. ५० टक्के निवडून आलेल्या महिलांनी एकत्र बसून, ठरवून, प्रशिक्षित होऊन चांगला भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचे ठरविले तर पुरुष सदस्यांना पळताभुई थोडी ठरेल. अर्थात हे कोणालाही स्वप्नरंजन वाटेल. परंतू वास्तवात येऊ शकणारे उदाहरण आहे. कुडाळ तालुक्यातील बिबवणे ग्रामपंचायत स्वच्छ आणि गतिशील कारभारासाठी ओळखली जाते.
विकासाचा मुद्दा राणे प्रत्येक सभेत मांडत असत. पण नेमका विकास कोणाकोणाचा झाला? प्रत्यक्षात सर्वसामान्य मनुष्य आहे तिथेच आहे. जिल्हा टँकरमुक्त करण्याची घोषणा फक्त झाली. प्रत्यक्षात अनेक नळयोजना बंद आहेत. ब-याचशा कूपनलिकाही बंद आहेत. जलस्वराज्य प्रकल्प, लघुपाटबंधारे यांचा तर बोजवाराच उडालेला आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात पुरविण्यात येणा-या सोई-सुविधा लोक कल्याणकारी योजना याविषयी न बोललेलेच बरे. आरोग्य यंत्रणेची पूर्णतः दूर्दशा झालेली आहे.
जिल्हा नियोजन मंडळाला राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच दुप्पट निधी वाढवून मिळाला. परंतू त्यातील बराचसा निधी अखर्चित राहीला आहे. तो जर नियोजनपूर्वक खर्ची पडला (अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या खिशात नव्हे) तर जिल्ह्याच्या विकासाला गतिमानता येऊ शकेल.

विशेष *
सुरक्षित रंगांची होळी
जानेवारीत थंडी पडू लागली की सिधुदुर्गात जत्रांची लगबग सुरु होते. कुणकेश्वर, आंगणेवाडी, कलेश्वर चाकरमान्यांनी कोकण रेल्वे फुल होते. जत्रांसोबतच सिधुदुर्गाला रंग चढतो तो होळीचा, धुळवडीचा. यावर्षी मार्चचा दुसरा आठवडा हा होलीकोत्सवाचा. नेहमीच उत्सवप्रिय असणा-या सिधुदुर्गवासियांच्या उत्साहाला यावर्षीही उधाण आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थोरामोठ्यांसोबत लहान मुलेही पंचमीच्या या रंगोत्सवात आकंठ बुडतील. अशा या आनंद मेळाव्याच्या उत्सवास कोणतेही गालबोट लागू नये असे सा-यांनाच वाटते. पण केवळ असं वाटून चालणार नाही. त्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. रंगपंचमीच्या उत्सवात रंगांची मोठ्या प्रमाणावर उधळण होते. ही धुळवड रंगपंचमीच्या खेळात प्रत्येकालाच नखशिखांत भिजवते. मग त्यापासून त्वचा, डोळे यासारखे नाजूक भागही वाचत नाहीत. या उत्सवाला रंगीबेरंगी करण्यासाठी आधार घेतला जातो तो रंगांचा. हे रंग चिखलापासून ते केमिकल्स पर्यंत विविध प्रकारचे असतात. प्रसंगी डांबर, ऑईलपेंट यांचाही वापर केला जातो. रंगपंचमी खेळण्याच्या व समोरच्याला रंगांमध्ये आकंठ बुडवण्याच्या नादात किवा कधीकधी जुना राग शत्रूत्व धरुन स्वैरपणे कितीतरी हानीकारक विषारी पदार्थ एकमेकांना फासले जातात.
रंगपंचमीच्या या स्वरुपाचे कितीतरी तात्काळ व दूरगामी दुष्परिणाम दिसून येतात. आज बाजारात प्रामुख्याने तीन प्रकारचे रंग रंगपंचमीसाठी उपलब्ध असतात. पेस्ट, पावडर व पाण्याचे रंग. हे तीनही रंग केमीकल्सपासून बनविलेले असून आरोग्यास अपायकारक असतात. हिरव्या रंगातील कॉपर सल्फेट हे डोळ्यांची अॅलर्जी, सूज व तात्पुरते अंधत्व देवू शकते. लाल रंगातील मक्र्युरी सल्फाईट त्वचारोग निर्माण करु शकतो. निळा रंग त्वचारोग तर काळ्या रंगातील लेड ऑक्साईड हे मुत्रपिडांचा विकार निर्माण करु शकते. रंगपंचमीला या रंगांचा सर्वाधिक वापर प्रामुख्याने लहान मुले करत असतात. मुळातच नाजुक असलेल्या त्यांच्या शरीराला अपाय होवू शकतो. गुलालासारख्या रंगांमुळे दमा, त्वचा रोग, नेत्र रोग होऊ शकतात. असे हे धोकादायक रंग आपण होळी रंगपंचमीच्या उत्सवाला द्विगुणीत करण्याच्या उत्साहात वापरत असतो. हा उत्साह, आनंद ख-या अर्थाने टिकवून ठेवायचा असेल तर वरील सा-या बाबी टाळणे आवश्यक आहे.
संस्कृती आणि उत्सवाचे समर्थन करणा-या माझ्या एका मित्राने मग रंगपंचमी खेळायचीच नाही काय? असा प्रश्न विचारला. आपण सर्वांच्याही मनात हाच प्रश्न आला असेल. त्याचेच उत्तर देण्यासाठी हा लेखप्रपंच.
होळी, रंगपंचमी हे उत्सव आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरे केले जात आहेत. अगदी भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून रंगोत्सव खेळले जातात, हे आपणास माहीत आहे. चित्रपटात श्रीकृष्ण पिचकारी उडवताना आणि गोपिका रंगीबेरंगी होतांना आपण नेहमीच पाहतो. मग त्या काळात हे रंग आले कोठून? तर हे रंग नैसर्गिक उपलब्ध फुले, फळे, पाने यापासून बनविले जायचे. पारिजात, पळस यासारख्या फुलांपासून रंग तयार केले जायचे. परंतु आजच्या स्पर्धात्मक युगात आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनुपलब्धीमुळे आपण विषारी धोकादायक अशा रासायनिक रंगांकडे वळलो. पण आपले जीवन सुखकर व निरोगी करण्यासाठी नैसर्गिक रंगांचाच वापर अशा उत्सवामध्ये केला पाहिजे. यापैकी काही रंग कसे तयार करावेत हे थोडक्यात पाहूया.
मेहंदी पावडर ही समान मात्रेमध्ये गव्हाच्या पिठात मिसळल्यास सुंदर असा हिरवा रंग तयार होतो. दोन चमचे हळदीमध्ये चार चमचे बेसन घालून मिसळल्यास पिवळा रंग तयार होतो. विविध रंगांच्या सुक्या पाकळ्यांची पुड बेसन किवा सुक्या पिठात मिसळून त्या त्या रंगाचे रंग करता येतात. ओले रंग तयार करण्यासाठी जास्वंदीच्या सुक्या फुलांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास लाल रंग मिळतो, पळसाच्या फुलांना रात्रभर भिजत ठेवल्यास केशरी रंग मिळतो. बीट रात्रभर पाण्यात घालून मॅजेन्डा रंग तर कांद्याबरोबर उकळल्यास गुलाबी रंग मिळतो. मेहंदी पाण्यामध्ये घालून लालसर रंग मिळतो. लोखंडाच्या भांड्यात आवळापूड रात्रभर भिजत ठेवल्यास काळा रंग मिळतो. असे रंग आपण घरच्या घरी बनवा. बाळगोपाळांसोबत सुरक्षित होळी खेळून रंगपंचमीचा आनंद लुटा. होलीकोत्सवाच्या शुभेच्छा!

असनियेचा शिमगोत्सव
होळी पौर्णिमेच्या आठव्या दिवशी असनियेच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. त्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरी राधेचे नृत्य होते. त्यामध्ये कृष्ण, गोपी आणि दशावतारातील सोंगे असतात. रात्री आगीचे रोंबाट असते. त्याची पहाटे ४ ला सांगता होते. ४ ते ६ दशावतारी नाटक होते. दुस-या दिवशी सकाळी ९ च्या सुमाराला होळीच्या मांडावर गावकरी जमतात. तिथे हळदवणी म्हणजेच हळदीचे पाणी सर्वांना तीर्थ म्हणून दिले जाते. यानंतर दोन लहान मुलांना सजवून गावात सोडले जाते. ही मुले घरोघरी जाऊन खेळ्यातील आरती म्हणतात.
दुपारनंतर काही तासांसाठी असनिये गावातील दारुबंदी उठते. गावात दुपारी रोंबाट असते. होळीचा नारळ दोन गटांत स्पर्धा होऊन फोडला जातो. नारळ फोडल्यानंतर गावात चोर सोडले जातात. हे चोर घरात कोंबड्या, नारळ अशा वस्तू नेतात.
इकाच्या वाटीचे तीर्थ
होळी नंतरच्या ९ व्या दिवशी या महत्वाच्या विधीसाठी ग्रामस्थ, चाकरमानी गर्दी करतात. विशिष्ट प्रकारच्या धातूच्या या वाटीला वर्षभर कोणी हात लावत नाहीत. त्याची पूजा होते. गोसाव्याच्या रुपातील व्यक्ती इकाच्या वाटीतील तीर्थाचे घरोघरी वाटप करते. या वैशिष्ट्यपूर्ण अशा शिमगोत्सवाला ग्रामस्थांबरोबरच चाकरमानी, पर्यटकही सहभागी असतात. यावर्षी दि. १४ व १५ मार्चला हा उत्सव होत आहे.
सहभागी होण्यासाठी संफ- बापू सावंत, ९४०४४४४१५५.
साळच्या शिमगोत्सवातील गडे
दोडामार्ग-साळच्या शिमगोत्सवात होळीच्या दुस-या दिवसापासून ते चौथ्या दिवसापर्यंत हा उत्सव चालतो. गावातील राऊत आणि परब घराणी मानकरी असून संध्याकाळनंतर कार्यक्रमांना रंग चढतो. प्रत्येक घरी रोषणाई असते. गडे म्हणजे दिवट्या घेऊन देवचार अंगात आलेल्या व्यक्ती डोंगरामध्ये जातात. रात्रीच्या वेळी होणारा हा कार्यक्रम पहायला ग्रामस्थ गर्दी करतात.
कुणकेरीचा हुडोत्सव
होळीच्या सातव्या दिवशी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा हुडोत्सव हे खास आकर्षण असते. अंदाजे १०० फूट उंचीच्या हुड्यावर देवाचा अवसार आलेल्या व्यक्ती चढतात. त्यांच्यावर दगड मारण्याची प्रथा आहे. भाविकांच्या श्रद्धेमुळे आजवर एकही अनुचित प्रकार घडलेला नाही. यंदा नवीन हुडा बसविण्यात आला आहे. आदल्या रात्री होणारे आगीचे रोंबाट पहाण्यासारखे असते.
नेरुरच्या शिमगोत्सवातील आकर्षण
सायचे टेंब-सुतारवाडी येथील हलते देखावे (ट्रीक सीन्स)
नेरुर येथील प्रख्यात कवी, साहित्यिक के. व्ही. नेरुरकर यांच्या नेरुर या गावातील सायचे टेंब सुतारवाडी येथील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. होळीच्या तिस-या दिवशी (यंदा ९ मार्च २०१२) रात्रीच्या वेळी पौराणिक कथांवरती लोकांच्या मनोरंजनासाठी सादर होणारे हलते देखावे हे खास आकर्षण असते. सिधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, मुंबई, पुणे येथील लोक खास ही ‘शिमग्यातली सोंगा‘ आणि आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘ट्रीक सीन्स‘ पहायला गर्दी करतात.
आख्यायिका- कुडाळ-माड्याचीवाडी येथील गावडोबाच्या मंदिराकडून गावडे समाजाचे रोंबाट तळी घेऊन नेरुरच्या कलेश्वराला भेटायला येते. याला गोडा रोंबाट (म्हणजे दारु, मांसाहार नसतो.) असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात. नवस बोलले जातात. मेस्त्रीवाडी येथे रोंबटात रात्री १० ते २ वाजेपर्यंत मांडावर खेळ चालतात.
होळीच्या नंतर अवघ्या तीन दिवसांत सुतारवाडीतील ७० ते ७५ उत्साही कार्यकर्ते अहोरात्र झटून या सोंगांची तयारी करतात. टाकावू वस्तू म्हणजे कागद, माणग्याची भेते, फेव्हीकॉल, सुतळ, माडांच्या झावळ्या, पीडे, पोफळ, कापूस, रंग आणि या मंडळींच्या डोक्यातल्या सुपीक कल्पनांनी देखावे तयार होतात. सुरुवातीला राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड श्री. विकास मेस्त्री आणि त्यांच्या सहका-यांच्या हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. आता या वाडीतील ५ मंडळे देखावे तयार करतात. त्यांच्यात स्पर्धाही असते. १) आना मेस्त्री आणि सहकारी, २) विलास मेस्त्री आणि सहकारी, ३) बाब मेस्त्री आणि सहकारी, ४) दिनू मेस्त्री आणि सहकारी, ५) सुधाकर नेरुरकर आणि सहकारी मिळून देखावे सादर करतात. ही मंडळी वैयक्तीक पदरमोड करुन स्वतःच्या खर्चाने हे देखावे लोकांसमोर सादर करतात.
सध्या तरी फक्त खेळ पहाण्यासाठी रात्री १० वाजता लोक येतात. नियोजन केले तर त्यादिवशी सकाळपासून पर्यटकांना याठिकाणी आमंत्रित करता येईल. त्यांच्या निवास, न्याहारी आणि जेवणाची माफक दरात सोय केल्यास पर्यटक आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतील. दिवसेंदिवस वाढत जाणा-या गर्दीच्या संख्येमुळे इथे लोकांना बसण्याच्या व्यवस्थेची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांकडून वर्गणी अगर शुल्क आकारता येईल. आपल्या गावासाठी आपणच पुढाकार घेतला, प्रयत्न केले तर नक्कीच या गोष्टी शक्य आहेत. प्रत्येक वर्षी यशाच्या आणि गर्दीच्या वाढत्या आलेखाने शासनालाही त्याची दखल घेणे भाग पडेल.
नेरुरच्या शिमगोत्सवात सहभागी होण्यासाठी संफ- विकास मेस्त्री- ९४२३८२०६३८, प्रविण मेस्त्री- ९४२२११९९३५.

सिधुदुर्ग ः पर्यटन जिल्हा लोकांचा पुढाकार
आम्ही आता ‘शापलोपु‘ पुरवणीच्या ७व्या आवृत्तीवर पोहोचलो आहोत आणि आम्हाला अजून बरेच अंतर कापायचे आहे याची जाणीव आहे. आमच्या प्रिय सिधुदुर्गवासीयांपैकी अजून अनेक जणांचे लक्ष वेधण्यात आम्हाला यश मिळो. सुरुवातीच्या उत्साहाच्या लाटेचे आता माझ्या संवेदनशीलतेवर हलके तरंग मात्र राहिलेत. ‘पुढे काय?‘ हा प्रश्न आ वासून माझ्या पुढे उभा राहिल्याने या लेखाला बरेच दिवसांचा उशीर झालाय. आमच्या टीमच्या शशांक कडून मला डझन वेळा तरी प्रोत्साहीत करण्यासाठी विचारणा होत होत्या आणि मला एक खास एसएमएस मिळाला की, ‘यशस्वी माणसे नेहमी तिथून मैलो पुढे चालत राहतात, जिथून अयशस्वी माणसे परतात.‘
आमच्या चमूतील एकाकडून मिळालेल्या या एसएमएसने मला माझा विषय मिळवून दिला. मी विचार केला की यापेक्षा अजून काय चांगलं असेल की, जगभरातून हे असे पुढचे अंतर कापून गेलेल्या माणसांच्या वास्तवकथा मी तुम्हाला सांगाव्यात. मी तुम्हा सर्व वाचकांबरोबर या अशा ‘केस स्टडी‘ उदाहरणांची पुनर्भेट घेऊ इच्छितो. घ्त्र*ृच्र्ऋृ म्हणजे पॅसिफिक आशिया ट्रॅव्हल असोसिएशनकडे अशा वैयक्तिक, सांघिक आणि व्यापारी प्रयत्नांची नोंद आहे. ज्यांनी पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि समाजासाठी दखलपात्र यांनी नाविन्यपूर्ण काम केलेले आहे. पहिले उदाहरण नेपाळ मधील आहे.
तीन बहिणी साहस गिर्यारोहण आणि नेपाळ महिला सबलीकरण स्त्री ट्रेकिग गाईड प्रशिक्षण
१९९३ साली लकी, डिकी आणि निकी या तीन छोट्या बहिणी नेपाळमधील पोखरा येथे एक खाणावळ आणि लॉज चालवित होत्या. तिथे त्यांना जगभरातून आलेल्या स्त्रिया भेटत. त्यातच पुरुष गिर्यारोहक, गाईडकडून वाईट वर्तनांच्या अनुभवांमुळे जेरीस आलेल्या व घाबरलेल्या एकट्या - दुकट्या पर्यटक स्त्रिया देखील होत्या. त्यातूनच स्त्रियांच्या स्त्रियांसाठी असलेल्या गिर्यारोहण व्यवसायाची कल्पना त्यांच्या मनात रुजली. आपली सारी हिमत गोळा करुन १९९४ साली त्यांनी स्त्रियांसाठी असलेल्या त्यांच्या स्त्री गिर्यारोहण गाईड आणि हमाल सेवेची सुरुवात केली. त्यासाठी तीन महत्त्वाच्या बाबी त्यांना स्फुर्तीदायक झाल्या.
१)एकट्या स्त्री गिर्यारोहका -कडून नेहमी होत असणारी विचारणा.
२) सर्वात मोठ्या बहिणीला गिर्यारोहण प्रशिक्षण आधी पासून जमत होते.
३) पश्चिम नेपाळमधील स्त्रियांची खडतर परिस्थिती.
त्या पुरुषी वर्चस्वाखाली दबलेल्या व्यवसाय क्षेत्रात शिरु इच्छित होत्या. जिथे स्त्रियांना विरोध होता आणि प्रशिक्षणाच्या संधी मर्यादित होत्या.
या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार दरबारी तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायीक प्रशिक्षण संस्थेच्या मागणीचा त्या सातत्याने पाठपुरावा करत राहिल्या. परिणामी तो कोर्स ग्रामीण पर्वतीय भागातील महिलांना समजता येईल असा सोपेपणाच्या पातळीवर आणला गेला. ज्यातून त्या महिलांना ‘शिका आणि कमवा‘ अशी संधी उपलब्ध झाली व आत्मविश्वास दुणावला. १० जणींचे पहिले प्रशिक्षण १९९६ साली पार पडले. या बहिणींची स्वतःची ‘तीन बहिणी साहस गिर्यारोहण कंपनी‘ १९९८ साली नोंदणीकृत झाली. प्रशिक्षण कार्यक्रम पुढे चालूच ठेवण्यासाठी त्यांनी अधिकृतरित्या ‘नेपाळ महिला सबलीकरण‘ या संस्थेची स्थापना केली. १९९९ ते २००० या कालावधीत संस्थेने पायाभूत महिला गिर्यारोहक गाईड प्रशिक्षणाचे १८ कार्यक्रम पार पाडले. ज्यात ६०० जणींनी मिळून भाग घेतला. देशातल्या सर्व भागांतून आणि थरांतून स्त्रिया यात सहभागी झाल्या होत्या. त्यात खालच्या जातीतील स्त्रियादेखील होत्या. काही सामाजिक चालींच्या बळी आणि खडतर जीवनाचा सामना करत असलेल्या होत्या.
गिर्यारोहण प्रशिक्षणात जीवनात उपयोगी पडणा-या व्यावहारीक कौशल्यांचा आणि उदार जागतिक दृष्टीकोनाचा मेळ घालण्यात आला. प्राथमिक कुशलतांमध्ये सुधारण केल्या आणि स्वतंत्र विचारांना चालना देण्यात आली. व्यवसायामध्ये महिला गिर्यारोहक सेवेची प्रचंड मागणी आहे. पण तंत्रकुशल महिलांचा तुटवडा आहे. या तीन बहिणींच्या गिर्यारोहण कंपनीने आणि संस्थेने ही मधली दरी मिटवण्याचा आणि पुरुषी वर्चस्वाला झुगारायचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
अंमलबजावणीची प्रक्रिया -
सहा महिन्यांची गिर्यारोहण प्रशिक्षणांची अप्रेन्टिसशीप वर्षातून दोनदा, पोखरा येथे हिमालयाच्या पायथ्याशी घेतली जाते. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ४ आठवड्यांचा तांत्रिक परिभाषा आणि संवादात्मक इंग्रजी शिकवणारा तसेच गिर्यारोहक वाटाड्या बनण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या इतर तांत्रिक माहिती आणि कौशल्ये शिकवणारा भाग असतो. प्रशिक्षणात याशिवाय आरोग्य, पर्यावरण सुरक्षितता, पाण्याचे शुद्धिकरण, पिकांची फेरपद्धत, कच-याचे व्यवस्थापन आणि पर्यायी इंधनाविषयी योग्य त्या माहितीचाही अंतर्भाव असतो.
या सहभागी महिला जेव्हा साहसी व्यावसायीक बनतात तेव्हा आपले हे सर्व चांगल्या पर्यावरणासाठी जरुरी कृतींचे ज्ञान, आपल्या ग्राहकांना आणि वाटेतल्या सर्व गावांमध्येही वाटतात. जसे की त्या आयोडीनने पाण्याच्या निर्जुंतकिकरणाची पद्धत शिकवतात ज्यामुळे मिनरल वॉटरच्या बाटल्यांची गरज उरत नाही आणि त्यांचा वाटभर होणारा कचरा, त्रास टळतो. त्या अशा प्रोजेक्टसाठी लागणारे पैसे उभारण्यासाठी अशा पाण्याच्या बाटल्या धरणारे बाटली होल्डर सुद्धा विणून देतात. त्यांच्या वाटेतील चहाच्या टप-यांमध्ये त्या सुरक्षित स्वयंपाक करायच्या पद्धती शिकवतात. कच-याचे व्यवस्थापन शिकवतात. ज्यामुळे स्थानिक अर्थकारण उंचावते आणि शाश्वतीचा गिर्यारोहण व्यवसाय उभा राहतो. प्राथमिक प्रशिक्षणात नेपाळी संस्कृती आणि इतिहासाची माहिती शिकवली जाते जी प्रशिक्षणार्थ्यांना तोपर्यंत ठाऊकच नसते.
एका महिन्यातच ज्या महिलांना स्वतःचे पैसे बनवायचा कोणताच मार्ग उपलब्ध नसतो. त्या स्वयंपूर्णतेच्या मार्गावर चालू लागतात. या प्रशिक्षणाच्या अखेरीस प्रशिक्षणार्थी ‘तीन बहिणी गिर्यारोहक साहसी‘ मध्ये अप्रेन्टीस म्हणून पगारावर रुजू होतात, जो पुरुषांना मिळतो इतकाच असतो आणि कामाचा प्रत्यक्षानुभव घेतात.
१९९९ सालापासून बाजारातील मागणी पुरवठ्यातील दरी मिटवायचा तीन बहिणी प्रयत्न करताहेत आणि त्यांनी यशस्वीपणे महिला सबलीकरण साधावे असे. त्यांची कथा ही अनेक देशी-विदेशी प्रकाशनांचा, डॉक्युमेन्टरींचा आणि माध्यमांचा प्रसिद्ध विषय झाला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळेच अधिकाधिक स्त्रिया आता गिर्यारोहण क्षेत्रात येऊ लागल्यात. या कामाला जागतिक मान्यता आणि पारितोषिके वेगवेगळ्या संस्थामार्फत प्राप्त झालीत. नॅशनल जिओग्राफीक ट्रॅव्हल प्लस, लेसर वगैरे वगैरे.
या उदाहरणावरुन आम्हाला हे कळून येते की, मळलेल्या वाटेवरुन जाण्यापेक्षा आम्ही आमच्या सभोवतालच्या खासियतींबाबत जागरुकता, निरिक्षण आणि जाण ठेवली पाहिजे. त्यांची दखल घेण्याचे मार्ग शोधले पाहिजेत आणि सिधुदुर्गात येणा-या पर्यटकांबरोबर आवडीने त्यांचे अनुभव वाटून घेतले पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक महिलांना सामील करुन घेण्याचा हा तीन बहिणींनी शोधून काढलेला मार्ग आम्हाला सांगतोय की, समाजाच्या मोठ्या भागाचा समावेश करुन घेणारा मार्ग आम्ही देखील शोधू शकतो. ज्याचे अंतिम ध्येय जीवनाचा सर्वांगाने विकास हाच असेल.
म्हणनूच आम्ही नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, जे पहिल्या आवृत्तीपासून आम्ही सांगतो की, सिधुदुर्ग म्हणजे निव्वळ मालवण, आंबोळी, कोंबडी - वडे, हापूस, गंजिफा वा सावंतवाडीची लाकडी खेळणी नव्हे.
आरोग्य संपन्न, जास्त चांगल्या आणि रंगतदार सिधुदुर्गाच्या ख-या गरजांप्रती आम्ही संवेदनशील राहिले पाहिजे. नेहमीच पारंपारिक मार्ग जसे हॉटेल, रिसॉर्ट वा निवास न्याहारी, बोटींग, साईट सिईंग आणि गोव्यातल्याप्रमाणे बनाना बोटी आणि जेट स्की ने भरलेल्या किना-यांपेक्षा आम्ही देखील वेगळे आणि आमच्या जीवनाची अंगे, संस्कृती, निसर्ग आणि खाणंपिणं त्यांच्या ख-या मूळ स्वरुपात मांडू शकतो. हे खरोखर आमच्याच हातामध्ये आहे की आम्ही ते ‘जास्तीचे पुढचे अंतर‘ चालणार की नाही.
पर्यटकांसाठी नंदनवन
आम्हाला हॉटेलमध्ये रुम्स नको आहेत. आम्हाला कोकणात घरामध्ये राहयचय. पूर्वी आमचं इथं घर होतं. नोकरी-धंद्यासाठी पूर्वजांनी तीन पिढ्यांपूर्वी गाव सोडलं ते कायमचच.पण आठवणीतल्या, आजोबांनी सांगितलेल्या ‘गावाकडच्या गोष्टी‘ प्रत्यक्ष अनुभवायच्या आहेत. अशा प्रकारे ‘नॉस्टेलेजिया‘ जपणा-या व्यक्ती फिरस्तीच्या निमित्ताने आपुलकी शोधत असतात. तर काहींना अगदी नैसर्गिक वातावरणात रहायच असतं, साधेपणा हवा असतो. अशा पर्यटकांसाठी सावंतवाडी -आंबोली रस्त्याजवळ सौ. अमृता आशिष पाडगांवकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं ‘नंदन फार्म‘ हा(क्तदृथ्र्ड्ढ च्द्यठ्ठन्र्) म्हणजे घरगुती निवास तुमचं स्वागत करतो. हिरव्यागार झाडांच्या गर्द राईतल्या दोन छोटेखाली टुमदार घरांमध्ये दोन कुटुंबांना अगर अगदी १० ते १२ व्यक्तींना आरामदायी राहता येतं.
घरांमध्ये जपली नैसर्गिकता
अमृता आणि आशिष यांनी जेव्हा पर्यटनात काही वेगळं करायचं ठरवलं तेव्हा जुन्या घरांच्या मूळ ढाच्याला धक्का लावायचा नाही, त्यातला नैसर्गिकपणा जपायचा हे मनाशी पक्क ठरविलं होतं. त्यामुळे दोन्ही घरे कौलारु, मातीची आहेत. गरज आहे तिथं गिलाव केलाय. फर्निचर, खुर्च्या, टेबल, पलंग सर्व लाकडाचेच आहेत. असा नैसर्गिक मूड कायम ठेवणा-या घराच्या आजूबाजूला नारळ, काजू, आंब्याची झाडे आहेत. तसेच या भागात पिकणा-या स्थानिक भाज्या म्हणजे मूळा, वाली, लाल भाजी, कुळीथ ह्या पिकविल्या जातात.
स्वतःची जागा आणि आदरतिथ्याची आवड असेल तर सहज शक्य
अमृताची स्वतःची जागा आणि जुनी घर असल्याने तिला अशी घरगुती निवासाची व्यवस्था करणे शक्य झाले. पण केवळ जागा असून चालत नाही. तर आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची आवड पाहिजे. थोडक्यात... आलात...या...फिरा...जा... अशी मनोवृत्ती टिकाव धरणार नाही. अमृता आणि तिच्या कुटुंबियांनी पाहुण्यांसाठी विशेष पॅकेजेस तयार केली. त्यांच्याकरिता उपक्रमांची आखणी केली. साईट सिन्स बरोबरच पर्यटकांचा एक दिवस हा किचनसाठी असतो म्हणजे बाजारातून भाज्या, मासे व अन्य वस्तू आणण्यापासून पर्यटकांना सहभागी करुन घेतले जाते. नंतर भाज्या चिरणे, मासे सुटे करणे अशा कामात पाहुणे मदत करतात. त्यांच्या मदतीने अस्सल स्थानिक चव जपणारं जेवण केळीच्या पानांमध्ये वाढलं जातं. संध्याकाळच्या वेळेला जात्यावर तांदळाचं पीठ पाहुणे दळतात आणि दुस-या दिवशी सकाळी न्याहारीला त्याच पिठाचे घावने घातले जातात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पर्यटक हे केवळ ‘ग्राहक‘ न बनता घरातीलच एक सदस्य होतात आणि कामांना मदत होते ती वेगळीच. सुरुवातीला विदेशी पर्यटकांसाठी म्हणून तयार केलेल्या या उपक्रमांमध्ये आपल्याकडचे पर्यटकही आनंदाने सहभागी होतांना दिसतात. नंदन फार्ममध्ये गाई-वासरे आहेत. शेतीसाठी लागणा-या खताकरीता गांडुळ खताचा प्रकल्पही आहे. पर्यटक ह्या सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद घेतात.
संध्याकाळच्या वेळी मनोहर परबांच्या खिल्लारी सजविलेल्या बैलगाडीतून शेताला अगर सावंतवाडीच्या मार्केटमध्ये सफर असते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढणे, स्थानिक जत्रा असतील तर तिथे घेऊन जाणे, नाटक दाखविणे असे कार्यक्रम असतात.
टीमवर्कनेच मिळाले यश
अमृतासोबत तिला प्रोत्साहन देणारी आई सुरेखा कळसुलकर. पती आशिष, भाऊ निनाद कळसुलकर तिथे व्यवस्थापन करणारे संतोष आणि स्वानंदी सावंत यांच्या टीमवर्कमुळेच अशा प्रकारच्या उपक्रमशील निवास-न्याहारी योजनेला पर्यटक प्रतिसाद देऊ लागलेत.
अमृता म्हणते, सुरुवातीची दोन - तीन वर्षे ही शिकण्यातच जातात. यामध्ये तुमच्या आदरातिथ्यामुळे होणारी ‘माऊथ पब्लिसिटीच‘ महत्त्वाची असते. तीच तुमच्याकडे नवे पर्यटक पाठविते. मात्र मुद्दाम जागा विकत घेऊन घर बांधणे आणि मग त्यामधून काही व्यवसाय होईल अशी आशा सध्यातरी ठेवता येणार नाही. पण स्वतःची जागा असेल आणि शेती-बागायती असेल तर त्याला पुरक ठरणारा हा व्यवसाय पैसे आणि आनंद दोन्ही मिळवून देईल.
माहितीसाठी संफ - सौ. अमृता आशिष पाडगांवकर (९४२२३७४२७७)
विशेष बातम्या *
जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता
जि. प. म्हापण मतदार संघ
एकूण मतदार - १०७७१, झालेले मतदान - ७५८७
वंदना किनळेकर - काँग्रेस - ३५५७ (विजयी)
श्रद्धा ठाकूर - राष्ट्रवादी - ३४०३
मोहिनी रावले - शिवसेना - ६६०
आडेली
एकूण मतदार - १०७६९, झालेले मतदान - ७६२८
समीर शंकर नाईक - राष्ट्रवादी - २४८० (विजयी)
विलास अनंत ठाकूर - काँग्रेस - २१५२
बाबू राऊत - भाजप - ९६२
न्हानू वराडकर - मनसे - ५७६
ललितकुमार बाळकृष्ण ठाकूर - अपक्ष - १४६१
तुळस - सर्वसाधारण महिला
एकूण मतदार - १००८३, झालेले मतदान - ७१३५
योगिता परब - राष्ट्रवादी - ३३१७ (विजयी)
कुंदा प्रसाद पै - काँग्रेस - ३०१०३
रविना राऊळ - शिवसेना - ७१४
विनिता विजय परब - अपक्ष - ८२
उभादांडा -ना.मा.प्र. महिला
एकूण मतदार - ९७२०, झालेले मतदान - ६६५५
सुकन्या नरसुले - राष्ट्रवादी - २९३२ (विजयी)
सारिका काळसेकर - काँग्रेस - २३७०
रामेश्वरी गवंडे - राष्ट्रवादी - ४७१
तृप्ती साळगांवकर - शिवसेना - ८८४
रेडी - सर्वसाधारण महिला
एकूण मतदार - १०१७९, झालेले मतदान - ६९७०
निकिता नितीन परब - काँग्रेस - ३१५३ (विजयी)
शितल साळगांवकर - राष्ट्रवादी - २३८८
अर्चना हडकर - शिवसेना * १०९७
श्रद्धा धुरी - मनसे * ३३५

वेंगुर्ले पंचायत समिती राष्ट्रवादीकडे
वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ मतदार संघापैकी ३ जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तर २ जागी काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला. तर पंचायत समितीच्या १० जागा पैकी ६ जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. ३ जागी काँग्रेसचे, १ जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
पंचायत समिती म्हापण मतदार संघ
एकूण मतदार - ५०६०, झालेले मतदान - ३८००
पुरुषोत्तम परब - काँग्रेस - १६६१ (विजयी)
अवधूत रेगे - राष्ट्रवादी - १६३७
विलास राऊळ - शिवसेना - १९२
संजय विश्राम परब - शिवसेना - १४८
मंगेश मुडये - भाजप - १२५
पंचायत समिती परुळे मतदार संघ
एकूण मतदार - ४८५८, झालेले मतदान - ३२८२
प्रणाली बंगे - राष्ट्रवादी - १७९६ (विजयी)
प्राजक्ता चिपकर - काँग्रेस - १५४१
भूमिका पवार - शिवसेना - ५२०
पंचायत समिती आडेली मतदार संघ
एकूण मतदार - ५३०७, झालेले मतदान - ४००५
स्वप्नील चमणकर - अपक्ष - १२२८ (विजयी)
समीर कुडाळकर - काँग्रेस - १००८
नितीन मांजरेकर -राष्ट्रवादी - १०५१
नंदकिशोर तळकर - शिवसेना - ३६७
प्रसाद नाईक - अपक्ष - ३५५
पंचायत समिती वायंगणी मतदार संघ
एकूण मतदार - ५४९२, झालेले मतदान - ३६२३
समाधान बांदवलकर-राष्ट्रवादी-११३२ (विजयी)
आप्पा गावडे - काँग्रेस - १०१६
नरेश बोवलेकर - शिवसेना - १०२८
कृष्णा गावडे - अपक्ष - ४४७
पंचायत समिती तुळस मतदार संघ
एकूण मतदार - ५०५३, झालेले मतदान - ३७०९
सुचिता वजराठकर - राष्ट्रवादी - १६९३ (विजयी)
मानसी तुळसकर - काँग्रेस - १५२०
अस्मिता तांबोस्कर - शिवसेना - ४९७
पंचायत समिती मातड मतदार संघ
एकूण मतदार - ५०३०, झालेले मतदान - ३४२६
सावरी गावडे - काँग्रेस - १६७७ (विजयी)
शुभदा परब - राष्ट्रवादी - १३९२
आनंदी गावडे - शिवसेना - ४३७
पंचायत समिती उभादांडा मतदार संघ
एकूण मतदार - ४८४५, झालेले मतदान - ३२६६
अभिषेक चमणकर - राष्ट्रवादी - ९७७ (विजयी)
अनंत(दादा)केळुसकर- काँग्रेस- ६८४
चितामणी(दाजी)धुरी- शिवसेना - ४९९
रमेश नार्वेकर - शिवसेना - ८६४
बाबुराव साळगांवकर - अपक्ष - २४३
पंचायत समिती आसोली मतदार संघ
एकूण मतदार - ४८७५, झालेले मतदान - ३३८९
सुनील मोरजकर - राष्ट्रवादी - १२२१ (विजयी)
आनंद उर्फ विठू गावडे -काँग्रेस - ८०८
गणेश चोपडेकर - शिवसेना - २०४
संजय दत्ताराम गावडे - भाजप - ९८२
नामदार सारंग - अपक्ष - १७५
पंचायत समिती रेडी मतदार संघ
एकूण मतदार - ५३२१, झालेले मतदान - ३६८८
चित्रा कनयाळकर - काँग्रेस - १५९० (विजयी)
शिल्पा नाईक - राष्ट्रवादी - १२९०
सुरेखा कांबळी - शिवसेना - ८०९
पंचायत समिती आरवली मतदार संघ
एकूण मतदार - ४८५८, झालेले मतदान - ३२८२
उमा मठकर - राष्ट्रवादी - १५५० (विजयी)
शिल्पा चिपकर - काँग्रेस - १२३२
अर्चना राणे - शिवसेना * ५०२

Saturday, 11 February 2012

अंक ६वा, ९ फेब्रुवारी २०१२

अधोरेखीत *
पौरोहित्य करणारा नकोच*.!

विवाह विषयक निर्माण होणारे विविध प्रश्न, उद्भवणा-या वेगवेगळ्या समस्या याचा अभ्यास करीत असतानाच अलिकडच्या काळात ब्राह्मण समाजामध्ये पौरोहित्य करणा-या वा भिक्षुकी करणा-या मुलांचे ‘विवाह न ठरणे‘ ही एक खरोखरच गंभीर समस्या बनली आहे. केवळ कोकणच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक वगैरे ठिकाणी कमी अधिक फरकाने हीच समस्या सर्वत्र जाणवते आहे.
वास्तविक पहाता भिक्षुकी हा व्यवसाय खरंतर बिन भांडवली व्यवसाय मानला जातो. बिनभांडवली याचा अर्थ यामध्ये स्वतःची अशी खूप काही आर्थिक गुंतवणूक निश्चितच नसते आणि उत्पन्नाची प्राप्तीही उत्तम असते. शिवाय मिळणारा शिधा, फळ-फळावळ हे वेगळेच! तसेच पौरोहित्य करणे हे वाटते तेवढे सोपेही नाही. आपण जशी पदवी घेतो तसेच वेदपाठशाळेत राहून अक्षरशः आठ-दहा वर्षे हे अध्ययन केले जाते. यामध्येही प्राविण्य मिळवले जाते. त्यामुळे हे शिक्षणही घेणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी निश्चितच नाही. संस्कृतमधील उच्चार, अर्थ, तासन तास मंत्रोच्चारण हे निश्चितच क्लिष्ट आहे. शिवाय पौरोहित्य करणारे लोक जिथे जातात तिचे त्यांच्या ज्ञानाला आदरपूर्वक वाकून नमस्कार केला जातो. नमस्कार करणारी व्यक्ती कलेक्टर आहे की मंत्री आहे हा तिथे विषयच नसतो. याचाच अर्थ पौरोहित्य करणा-यांना मान दिला जातो.
इतके असूनही ‘पौरोहित्य करणारा मुलगा नको!‘ असं म्हणण्याकडे मुलींचा वाढणारा कल पाहून अनेक मुलांजवळ आणि मुलींजवळही चर्चा केली.
पौरोहित्य करणारी नाशिक आणि नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्रातील मुले म्हणतात की लाखांच्या घरात आमचे महिन्याचे उत्पन्न आहे. दारात दिमतीला गाड्या उभ्या आहेत. परंतु ‘भटजी नको हो!‘ अलं बिनधास्तपणे मुली सांगतात. मग त्यावेळी त्या इतर आर्थिक स्थिती, संपन्नता, मुलाचे नीट वर्तन या कशाचाच विचार करीत नाहीत. पुणे-मुंबई येथील पौरोहित्य करणारी मुलेही हाच अनुभव सांगतात. अनेकांची तर पस्तिशी-चाळीशी उलटून चालली आहे. संपन्नता आहे. परंतु केवळ पौरोहित्य करणारा म्हणून तो मुलगा नको ही मुलींची तसेच पालकांची मानसिकता सर्वत्र आढळते आहे.
तर कोकणात रहाणारा सागर यावर आपलं परखडं मत मांडतो. तो म्हणतो मी अनेक ठिकाणी फिरलो. एका ब्राह्मण मुलीच्या घरी तर घरात चहात घालायला दूध नाही, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण एकदम कमी अशी स्थिती होती. त्यांच्या घरी उत्तम कमाई असलेल्या सागरने स्वतःसाठी जेव्हा लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा केवळ तो भिक्षुकी करणारा म्हणून मुलीने नकार दिला. ही अतिशयोक्ती नाही, वास्तव आहे. सागर परखडपणे म्हणतो की, या मुलींना भिक्षुकी करणारा मुलगा नको असतो. पण ज्यावेळी याच मुली आंतरजातीय विवाह करतात त्यावेळी मग तो अगदी दरिद्री असला तरी खुशीने त्याच्याबरोबर जातात हे चित्र पाहून अत्यंत वाईट वाटल्याचे तो सांगतो.
अनेक मुलींजवळ याविषयी चर्चा केली असता पौरोहित्य करणा-यांकडे सोवळे-ओवळे पाळले जाते, मासिक अडचण पाळणे जाचक असल्याचे सांगतात, तर काहीजणी ‘भटजी नवरा आहे हे सांगायला कसंतरीच वाटतं‘, असेही म्हणतात. शिवाय अनेक ठिकाणी परंपरागत उत्तम प्रकारे पौरोहित्य करणारे पणजोबा, आजोबा, वडील अशी परंपरा असताना वडीलांना चालेल परंतु मुलीला पौरोहित्य करणारा मुलगा नको म्हणून स्थळे नाकारली जातात. उच्चशिक्षित मुलींचं सोडाचं परंतु शिक्षण कमी असलेल्या मुलीही महिना लाखाचे उत्पन्न मिळवणारा मुलगा केवळ पौरोहित्य करतो म्हणून नको म्हणतात.
सोवळे-ओवळे यावर बोलताना सागर म्हणतो की, आम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार असतो. मग अशावेळी घरात मासिक अडचण न पाळणे योग्य वाटत नाही. शिवाय याच मुली जर असे विचार मांडतात पण मासिक अडचणीच्या वेळी थेट देवाला जावून हात लावणे यांना तरी शक्य होईल का? ही गोष्ट जरी नैसर्गिक असली तरी आजही कुणी देवाजवळ अशावेळी जात नाही.
सारी मतमतांतर ऐकेली की अवाक व्हायला होतं. सागर म्हणतो तेही पटतं. परंतु या समस्येवर नेमका मार्ग काय आणि कसा हे स्पष्ट होत नाही. परंतु मुलींची ही अचाट मत ऐकल्यावर मुला-मुलींच्या
सा-यांच्याच पालकांना हे सांगावस वाटतं की, आपल्या मुलांजवळ मित्रत्वाचं नातं जरुर असू द्या. पण त्याचबरोबर शंभर टक्के स्वातंत्र्य देवू नका. थोडा धाक, आदरयुक्त भिती गरजेची आहेच. त्यांच्यावर कोणताही निर्णय घेण्याची सक्ती करावी असं मी बिल्कुल म्हणत नाही. परंतु मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विवाहेच्छुक वधू-वराने आपापले च्ज़्ग्र्च्र् ठ्ठदठ्ठथ्न्र्द्मत्द्म म्हणजेच च्द्यद्धड्ढदढद्यण् (क्षमता), ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्म (कमतरता), दृद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म (संधी), द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म (संभाव्य धोके) या सा-यांचा विचार करायला हवा. आत्मपरीक्षण व्हायला हवं. पालकांनी वास्तवाची जाणीव करुन द्यायला हवी.
केवळ चार तास नेसलेल्या धोतरामुळे कोणाला कमी लेखण्याची जरुरी नाही. व्यक्ती किती ज्ञानसंपन्न आहे हे पहायला हवं. त्याचबरोबर आपण किती शिकलो आहोत, खरोखरच जीवनामध्ये त्या शिक्षणाचा ख-या अर्थाने उपयोग करणार आहोत का? याचाही विचार व्हायला हवा. स्वप्न आणि वास्तव हे उमजायला हवं. केवळ शिकलो म्हणजे क्रांती केली हा अनेकांच्या बोलण्यामधून जाणवलेला ‘अहंम्‘ बाजूला ठेवून दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे. तरच यातून काही मार्ग निघेल अशी आशा करुया.
-सौ. सुमेधा देसाई, - ९७६५८४७२९७.


संपादकीय *
दृष्टिक्षेपात जिल्हा परिषद निवडणुक

या वेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्षातली शारिरीक नसली तरी शाब्दिक राडेबाजी पहावयास मिळाली. राज्य पातळीवरील नेते,मंत्रीगण या स्थानिक निवडणुक प्रचारामध्ये हिरिरीने उतरले. दोन महिन्यांपूर्वीच नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यात जसा काँग्रेसचा दारुण पराभव झाला तसे काही होऊ नये म्हणून पालकमंत्री नारायण राणे आपल्या दोन्ही पुत्रांसह जिल्ह्यातच तळ देऊन बसले होते. लोकमत बिथरु नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी संयमाने प्रचार करावयास सांगितले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करताच राणेंचाही तोल सुटला आणि त्यांनी ‘एकेकाला बघून घेईन, सोडणार नाही‘ वगरे भाषा वापरली. मग काय, त्यांचे जवळचे कार्यकर्तेही ताळतंत्र सोडून बोलू लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर्.आर्.पाटील, नगरविकास मंत्री भास्कर जाधव असे राष्ट्रवादीचे मंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आमदार विनोद तावडे हेही प्रचारात उतरले. एकंदरीत राज्य सरकारमध्ये एकत्रित सत्ता आघाडी करुन राहिलेले राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात तरी एकमेकांच्या उरावर बसलेले लोकांना पहायला मिळाले.
एकंदरीत प्रचार वैयक्तिक पातळीवर उतरला, एकमेकांची उणीदुणी काढतानाच घराणेशाहीचा उध्दार झाला. नेत्यांच्या डागाळलेल्या कारकिर्दीचाही पंचनामा झाला. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव झाल्याने कित्येकांची राजकीय कारकीर्द कोळपून गेली. आता आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पुरुष कार्यकर्त्यांना पक्षामध्ये पदे मिळविण्यासाठी किवा ते नाही मिळाले तरी किमान कार्यकर्ता म्हणून तरी वावरण्याची पाळी किमान पाच वर्षे तरी आली आहे. त्यातूनही काहीजण ग्रामपंचायत स्तरावर उतरतील. पण तिथेही महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आणि प्रस्थापित असलेल्या कार्यकर्त्यांशी स्पर्धा असणारच.
काँग्रेसच्या म्हणजेच नारायण राणेंच्या पाडावासाठी राष्ट्रवादी-सेना-भाजप-आरपीआय अशी महायुती प्रत्यक्षात झाली नाही तरी बर्‍याच जागांवर समझोता करुन किवा मैत्रीपूर्ण (?) लढती करुन ही निवडणूक लढविली गेली. त्याचा कितपत फायदा या अजब युतीला होतो, ते निवडणूक निकालानंतर समजेल. काँग्रेसने मात्र कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवून आणि बंडखोरी केलेल्यांना पक्षातून निलंबित करुन आपण एक जबाबदार राष्ट्रीय पक्ष आहोत हे दाखवून देण्याची संधी साधली.
निवडणूक आयोगाचा धरसोडपणा
जिल्हा परिषद निकालाबाबत निवडणुक आयोगाचा धरसोडपणा याही वेळी दिसून आला. नगरपालिका निवडणुकांच्या तारखा तर दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका झाल्याने जि. प. निवडणूक निकालांचा महापालिका निवडणुकांच्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जि.प.निवडणुकांचे निकाल महानगरपालिकांच्या बरोबरच जाहीर करावेत अशी निवडणुक आयोगाकडे मागणी केली होती. काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाने तशी मागणी केली नाही. निवडणूक आयुक्तानी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध होणार नाहीत म्हणून राज ठाकरे यांची मागणी फेटाळली होती. मग आता एकाएकी मतदान यंत्रांची उपलब्धता कशी काय झाली? यातून निवडणूक आयोगाचा धरसोडपणाच दिसून आला.
टी. एन. शेषन देशाचे निवडणुक आयुक्त झाले त्यावेळी त्यांनी आधीपासूनच अस्तित्वात असलेली निवडणूक नियमावली कठोरपणे अंमलात आणली. त्याचा धसका नोकरशाही आणि लोकप्रतिनीधींनीही घेतला होता आणि याच नियमावलीचा आधार घेत तालुका आणि जिल्हा पातळीवरील ‘शेषन‘ ही मनमानी करु लागले. राजकीय पक्षांनीही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परिणामी उमेदवारी अर्ज भरणे, फेटाळणे, निवडीलाच हरकत घेणे इत्यादी प्रकरणे न्यायालयात जाऊ लागली. कायद्याच्या राज्यात नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अपेक्षित असले तरी त्याबाबत तारतम्य न ठेवल्याने लोकांसाठी कायदे असण्यापेक्षा कायद्यांसाठी लोक आहेत. असे चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे निवडणूक आचार संहिता ही आधीच कामे न करणार्‍या अथवा टाळणार्‍या नोकरशाहीला वरदान आणि जनतेला त्रासदायक ठरलेली आहे. त्यात निवडणूक आयोग धरसोडपणामुळे आणखी भर घालीत आहे.


विशेष *
एकनाथ ठाकूर ः एक बहुआयामी व्यक्तिमत्व
देशातील सर्वांत मोठी व अव्वल दर्जाची सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेचे अध्यक्ष या नात्याने बँकेच्या वृध्दीसाठी अथक कार्य करीत असलेले श्री. एकनाथ केशव ठाकूर हे नाव आज महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. त्यांचा जन्म सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ह्या नितांत सुंदर गावात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हिरावलेले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे भावंडांना जास्त शिक्षण घेता आले नाही व त्यांना उपजिवीकेची व्यवस्था करावी लागली. सर्व भावंडात लहान असलेले एकनाथ जन्मतःच हुशार असल्याने त्यांनी पुढे शिकावे अशी सर्व भावंडांची इच्छा होती. त्याप्रमाणे कुडाळ शहरात राहणा-या आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी शिक्षणासाठी येऊन कुडाळ हायस्कूल मधून एकनाथ एस्.एस्.सी. परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. कुडाळ हायस्कूलमधील इंग्रजीचे अध्यापक आंगचेकर सर ह्यांच्या अध्यापनाने इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली व इंग्रजी विषयात त्यांनी एस.एस.सी.परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले. पुढे पुण्याच्या स.प.महाविद्यालयातून बी.ए.पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे शहरात सरकारी खात्यात नोक-या करुन व शिष्यवृत्यांद्वारे मिळविले. केवळ कारकुनी करावयाची नाही हे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. त्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून बँकेत १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले. अगदी जन्मापासून ते ही मानाची नोकरी मिळेपर्यंतचा कालखंड त्यांच्या जीवनातील संघर्षमय काळ होता. ह्या काळात त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आले असतील परंतु, त्यांच्या बोलण्यातून कधी कुणाबद्दल कसलीही तक्रार नसते. उलट आपल्याला ह्या काळात सर्वांकडून भरपूर प्रेम मिळाले असे ते आवर्जून सांगतात.
स्टेट बँकेत नोकरी करताना त्यांनी अनेक वेळा आपले बुध्दिचातुर्य व प्रशासकीय कौशल्य प्रत्ययास आणून दिले. स्टेट बँकेत कार्यरत असताना स्टेट बँक व तिच्या संलग्न बँकांच्या सुमारे ७०,०००/- अधिका-यच्या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषविले. सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिका-यांच्या महासंघाचे अध्यक्ष तसेच बँकांव्यतिरिक्त देशातील सर्व उद्योग धंद्यातील अधिका-यांच्या समन्वय समितीचे सेक्रेटरी जनरल ही पदेही त्यांनी भूषविली. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन १९७७ साली युनो अंतर्गत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जिनिव्हा येथे संपन्न झालेल्या जागतिक अधिकारी परिषदेला सुमारे २५ लाख भारतीय अधिका-यांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून जनता पक्षाच्या सरकारने त्यावेळी त्यांची नियुक्ती केली. त्या परिषदेत १२७ देशांच्या अधिकारी प्रतिनिधीनी ठाकूर ह्यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करुन त्यांच्या प्रतिनिधीत्वाचा सन्मान केला.
कार्यकर्ते जोडणे, जपणे, प्रथम संस्था, नंतर कर्मचारी ही विचारधारा मनापासून जोपासणे, संस्थेचा कसलाही तोटा न करता संस्थेच्या प्रत्येक कर्मचा-याला त्याच्या हक्काचा न्याय्य वाटा मिळवून देण्याची मनोधारणा असल्यामुळे त्यांना संस्थाचालक आणि कर्मचारी ह्या दोन्ही बाजूंकडून भरपूर सहकार्य आणि मान सन्मान मिळाला आणि म्हणूनच ते एक यशस्वी संघटना नेता होवू शकले. स्टेट बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी ह्यांचे ठाकूरसाहेब हे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व. स्टेट बँकेचे त्यावेळचे चेअरमन आर.के.तलवार ह्यांच्या बरोबर त्यांचे जसे सौहार्दपूर्ण संबंध असत तसेच ते बँकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्याबरोबरही असत. मतभेद व्यक्त करतानाही त्यांची सुसंस्कृतता कधीही सुटत नाही. त्यांच्या मनाची कवाडे सदैव उघडी असतात आणि त्यामुळेच त्यांना सगळीच माणसे आपली भावंडे वाटत असतात.
राष्ट्रीय आणिबाणीच्या काळीत सर्व स्तरांवर होत असलेल्या अन्यायांनी ते व्यथित झाले आणि त्यांनी स्टेट बँकेतील प्रतिष्ठेच्या अधिकारीपदाचा राजीनामा दिला. परंतू, नियतीला त्यांचे स्टेट बँकेतून बाहेर जाणे मान्य नव्हते, त्यामुळेच की काय राजीनाम्यानंतर पंचवीस वर्षांनी त्याच बँकेचे केंद्रीय संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नेमणूक केली. ही बँकिग विश्वातील अद्वितीय घटना होय. संचालक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी कर्मचा-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिले. ते जरी स्टेट बँकेतून बाहेर पडले तरी त्यांनी स्टेट बँक अधिका-यांची जी संघटना नावारुपाला आणली त्या संघटनेविषयी त्यांना आजही आस्था आणि जिव्हाळा वाटतो.
श्री. ठाकूर साहेबांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती व त्यातूनच विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणे हा त्यांचा सहजधर्म झाला. जे ज्ञान त्यांनी प्राप्त केले त्याचा उपयोग समाजातील असंख्य तरुण तरुणींना व्हावा ह्या विचाराने प्रेरीत होऊन स्टेट बँकेची नोकरी सोडल्यानंतर सन्मानाच्या व चांगल्या वेतनाच्या नोक-यांच्या आलेल्या संधी नाकारुन आज संपूर्ण देशात विस्तार पावलेली व प्रसिध्द असलेली नॅशनल स्कूल ऑफ बँकींग ही संस्था स्थापन केली. ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व इतर भागातील लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठीची दारे उघडली व त्याचा दृश्य परिणाम म्हणजे देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, केंद्र व राज्य सरकारी आस्थापना इत्यादी मधून हजारो तरुण तरुणींना नोक-या मिळाल्या. स्टेट बँकेत असतानाही स्थानीय लोकाधिकार समिती, मराठी मंडळ ह्यांच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी महनीय कार्य केले.
प्रसिध्द संसदपटू व वक्ते कै.बॅ.नाथ पै हे राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी श्री.ठाकूर कुडाळ येथे माध्यमिक शिक्षण घेत होते. बॅ.नाथ पैंची भाषणे ऐकून प्रभावित झालेल्या श्री. ठाकूर ह्यांनी इंग्रजी आणि मराठी वाङ्मयातील विविध विषयावरील उत्तमोत्तम पुस्तके वाचून काढली व पुढे पुणे येथे शिकत असताना महाविद्यालयीन व अन्य वक्तृत्व स्पर्धामधून भाग घेत त्यांनी अनेक पारितोषिके मिळविली. त्यांचे आचार्य अत्रे, ना.सि.फडके, पु.ल.देशपांडे इ.मान्यवरांकडून चांगल्या वक्तृत्वाबद्दल कौतुकही झाले. पुढे शिवसेनेने त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या सांसदिय काळामध्ये राज्यसभेत अनेक विषयांवर त्यांनी केलेली भाषणे ही आदर्श विचारांचा आणि सुंदर वक्तृत्वाचा नमुना आहे. स्टेट बँकेचे केंद्रीय संचालक झाल्यानंतर कुडाळ शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला झालेल्या प्रचंड गर्दीने लोकांच्या प्रेमाचे एक आगळेच दर्शन घडले.
सत्काराला उत्तर देताना केलेल्या अविस्मरणीय भाषणाच्या वेळी श्री.ठाकूर यांनी आपली बहिण श्रीमती माळगांवकर आणि शाळेत शिकत असताना ज्यांच्या दुकानात त्यांनी काम केले त्या श्री.तेली ह्यांचा आपल्या जीवनातील जडणघडणीत मोठा वाटा असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन त्यांच्या समोर ते जेव्हा नतमस्तक झाले तेव्हा सभेला उपस्थित असलेल्या सर्वांची मने हेलावली. इंग्रजी आणि मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व थक्क करणरे आहे. त्यांची स्मरणशक्ती हे त्यांना मिळालेले दैवी वरदानच ठरावे. काही वर्षांपूर्वी ते एका जाहीर सभेत *घोडा* या मराठी शब्दाला इंग्रजीतील अठरा समानार्थी शब्द स्पेलिगसह सांगताना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात श्रोत्यांकडून त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाला दिलेला पसंतीचा तो प्रसंग मला आजही स्पष्टपणे आठवतो. त्यांचे भाषण म्हणजे एक बौध्दिक मेजवानीच होय.
ठाकूर साहेबांचे अंतरंग निर्मळ आहे. त्यामुळेच त्यांचे इथल्या मातीशी घट्ट नात आहे. ह्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी त्यांनी सहजपणे पत्करली. आज कोकणातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. ग्रंथालीच्या ज्ञानयज्ञाचे अध्यक्ष, कोकण भूमी प्रतिष्ठान, भारत जोडो यात्रा, कोकण मराठी साहित्य परिषद, चि.त्र्यं.खानोलकर स्मारक समिती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज इ.विविध संस्थांतून ते कार्यरत आहेत. अनेक नामांकित साहित्यिक, समाजसेवक, राजकारणी, उद्योगपती, अर्थशास्त्रज्ञ इत्यादींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. प्रज्ञावंत, गुणवंत, कलावंत व्यक्तीबद्दल त्यांना अतीव आदर वाटतो. सिधुदुर्गातील अनेक शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आपण जे काही मिळविले त्यातील काही हिस्सा समाजासाठी द्यावा या उदात्त हेतूने अनेक संस्थांना देणग्या देवून कसलाही गाजावाजा न करता समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करतात.
आज श्री. ठाकूर साहेबांचे नांव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्व दूर पसरले ते सारस्वत बँकेच्या माध्यमातून. स्वतःच्या प्रकृतीस्वास्थाला दुय्यम स्थान देऊन सजगतेने बँकेच्या प्रगतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. भारतातील सर्वांत मोठी सहकारी बँक ही बिरुदावली सार्थ ठरविणा-या सारस्वत बँकेची चौफेर प्रगती झाली ती श्री. ठाकूरांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली. ठाकूर साहेब आणि बँकेचे सर्व संचालक ह्यांच्या योगदानातून आणि सहयोगातून आज सारस्वत बँकेचे नांव घरोघर पोहोचलेले आहे. बँकेच्या प्रगतीचा हा उंचावणारा आलेख बँकेच्या असंख्य सभासदांना भावला व त्यामुळेच सारस्वत बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या वर्षीची संचालक मंडळाची निवड बिनविरोध होऊ शकली. श्री. ठाकूर व त्यांच्या टीमवर सभासदांचा दृढ विश्वास असल्याचे हे द्योतक आहे. बँकेने नुकताच ३०००० कोटींचा पल्ला गाठला ह्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष ह्या नात्याने श्री. ठाकूर, बँकेचे कर्मचारी व ग्राहक यांना देतात आणि नकळतच स्नेहबंध निर्माण करतात आणि ते जपण्याचा सदैव प्रयत्न करतानाही दिसतात. सारस्वत बँकेचा विस्तार महाराष्ट्राव्यतिरीक्त कर्नाटक, दिल्ली, गुजरात, म.प्रदेश आदी राज्यांत करुन हा अश्वमेध असाच चालू रहावा ह्यासाठी सर्व थरातील लोकांच्या सदिच्छा आणि सद्भावना श्री. ठाकूर साहेब व त्यांच्या सहका-यांबरोबर निश्चित आहेत. सारस्वत बँकेचे क्षेत्र विस्तारतांना त्यांनी फक्त बँकेची आर्थिक बाजूच पाहिली नाही तर सामाजिक जबाबदारीचे एक नवं भान दिलं हे निश्चितपणे नमूद करावेसे वाटते. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात संपूर्ण जीवन व्यतीत करणा-या कै.बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन प्रकल्पाला केलेली मदत, *ताज* वर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलेला मदतीचा हात, अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कुटुंबियांना दिलेला आधार, ग्रंथालीच्या वाचन चळवळीला आर्थिक सहाय्य इ.अनेक घटनामधून बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करता येते.
गेली अनेक वर्षे कॅन्सर सारख्या व्याधीला जबरदस्त इच्छाशक्तीने आणि धिरोदात्तपणे ते तोंड देत आहेत. स्वतःला नवनवीन कार्यात गुंतवून घेत आहेत आणि यशाची शिखरे गाठत आहेत. ज्या क्षेत्रात गेले तिथे ते यशस्वी झाले. कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलेला असावा. जे काही करायचे ते सर्वस्व झोकून, पूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने हे त्यांचे जीवनसूत्र आहे. म्हणूनच एक कुशल प्रशासक व अधिकारी, उत्तम वक्ता, यशस्वी संस्था चालक, उत्कृष्ट सामाजिक आणि राजकीय भान असलेला संघटक, कसलीही अपेक्षा न बाळगता दातृत्व जपणारा दाता, अर्थशास्त्र आणि बँकींग क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्व असे अनेक कंगोरे असलेले त्यांचे जीवन बहुआयामी बनलेले आहे. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव, कै.बाबा आमटे आणि माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या श्रध्देयांचा लाभलेला सहवास, पत्करलेल्या कार्यासाठी केलेला त्याग, निश्चित ध्येयपूर्ती वंचिता बद्दल कळकळ ह्या सर्व गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. त्यांची श्रवणक्षमता उच्च दर्जाची आहे. त्यांना दररोज अनेक माणसे भेटायला येतात त्या प्रत्येकाचे म्हणणे प्रथम ते शांतपणे ऐकून घेतात व मगच स्वतः बोलतात. रोजच्या कामाच्या व्यापात त्यांना हे कसे जमते हे एक कोडे आहे. त्यांच्या विचारांतून व्यक्त होणारा समजसपणा, विचारांची परिपक्वता, सखोलता आणि सुसंस्कारीत वृत्ती यांचा ठसा त्यांच्या सहवासात येणा-या प्रत्येकाच्या मनावर उमटतो आणि हेच त्यांच्या नेतृत्वाचे आणि लोकप्रियतेचे कारण आहे.
मोठा मित्र परिवार असणारे, स्नेहबंध निर्माण करुन जपणारे, पूर्व सुरींची स्मृती जागवणारे, पूर्वसरी विषयी आदर राखणारे, कृतज्ञतेची जाणीव कायम ठेवणारे, अनेक संस्थांचे आधारस्तंभ असलेले, तृप्त संसारिक जीवन लाभलेले, मातीची वीण घट्ट ठेवणारे, सन्मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले, साहित्य, संस्कृती यांची जाण असणारे प्रसन्न व्यक्तिमत्वाचे कोकणचे लाडके एकनाथ ठाकूर १५ फेब्रुवारीला एकाहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. परमेश्वराने त्यांना निरामय दीर्घायुष्य द्यावे आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व सर्वतोपरी बहरावे हीच वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना.
- ग. रा. तथा बाळ खानोलकर - (निवृत्त स्टेट बँक अधिकारी


स्त्री-पुरुष समानता
आतापर्यंत आपण स्वतःची ओळख करुन घेतली, पैशांविषयीची विचारसरणी, मासिक प्राप्ती याविषयी विचार केला. वैयक्तिक जीवनातील प्रत्येक महत्त्वाची गोष्ट सहजीवनातही तितकीच महत्त्वाची असते. स्त्री-पुरुष यांचे आचार-विचार कसे असावेत? माणूस म्हणून दोघांनीही समानतेने वागावं आणि एकमेकांना समानतेने वागवावं. तत्वतः सुध्दा काही वेळा हा विचार व्यक्तींना पटत नाही. शेवटी काय? बायका त्या बायका किवा पुरुष ते पुरुष, असा नाईलाजी सूर सर्वत्र ऐकू येतो. परंतू, जननेंद्रियातील फरक वगळता स्त्री आणि पुरुषाच्या शरीररचनेमध्ये कोणताही फरक निसर्गाने केलेला नाही. कोणत्याही माणसाला त्याच्या जगण्यासाठी आवश्यक किवा आवड म्हणून ज्या प्रकारचं काम करण्याची इच्छा असते त्या प्रकारचं काम त्याला करता येते. म्हणूनच पुरुष उत्तमप्रकारे स्वादिष्ट चवीचा स्वयंपाक करु शकतात आणि स्त्रिया विमान चालवू शकतात. निसर्गाचा हा समान न्याय, वेगळ्या वाटा शोधण्याची हिमत बाळगणा-या अनेक स्त्री-पुरुषांनी समाजासमोर आणला आहे. तरीही......
अजूनही अनेक घरांमध्ये शक्य असूनही काही ठराविक कामं बायकांनीच करायची असा गैरसमज आढळतो. या विचारसरणीचा वैवाहिक जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. ही विभागणी जितकी लवचिक राहील. तितके विवाहातील स्त्री-पुरुष संबंध दृढ होतील.
पुरुषांनी घरात स्वयंपाक केला किवा स्त्रियांनी स्वयंचलित वाहने वापरली म्हणजे स्त्री-पुरुष समानता नव्हे. ही समानतेची एक पायरी आहे. यातही अपरिहार्यता किती? आणि सहजता किती? हा भाग पुन्हा खूप महत्त्वाचा. कारण त्याला सोय किवा तडजोड हे ही कारण असू शकतं.
समानता म्हणजे दोघांनीही जबाबदारीने वागणं, एकमेकांना सन्मानाने वागवणं. स्त्री म्हणून किवा पुरुष म्हणून कुठचेही खास फायदे न मागणे. यामध्ये थोडेथोडे बदल होतायत हेही खरं आहे. पण ते फार सावकाश होत आहेत.
काही पुरुषांना स्त्री-पुरुष समानतेची कल्पना म्हणजे स्त्रीची स्वैराचाराची इच्छा एवढंच समजतं, किवा स्त्रिया पुरुषांसारखं वागणार असं वाटतं आणि हे वारं आपल्या घरात नको असं ते म्हणत रहातात. घरकाम करणार्‍या पुरुषांच प्रमाण कमी आणि लहान बाळांना सांभाळणे तर त्याहून कमी.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विवाहानंतर आपल्या जोडीदाराची याबाबतची विचार करण्याची आणि वागण्याची पध्दत खूप प्रभाव टाकते.
आमच्या परिचयातला एक मित्र स्वतः निमसरकारी कार्यालयात अधिकारी आहे आणि त्याची बायको स्त्री-रोग तज्ञ आहे. अर्थात दोघांच्या कामाच्या वेळा आणि जबाबदारीत फरक आहे. तिला वेळी, अवेळी बाळंतपणाच्या रुग्णासाठी हातातलं काम बाजूला ठेवून जावं लागतं. अशावेळी आमचा मित्र घरातील केर काढणे, लादी पुसणे ही काम तर करतच असे पण ज्यावेळी त्यांची मुलं लहान होती. तेव्हा त्यांची शी-शू आणि आंघोळ अशी सुध्दा कामं अतिशय आनंदाने करताना आम्ही स्वतः पाहिलं आहे. पण अशी माणसं अपवादानेच आढळतात. आता या घरातील मुलांनी स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्ष अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही आपल्या जोडीदाराशी ते अशा पध्दतीने वागण्याची शक्यता वाढते.
एकूणच स्त्री-पुरुष समानतेचा विचार यशस्वी सहजीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. एवढं मात्र नक्की.
वंदना करंबेळकर * ९८५०४७३०१२


विशेष बातम्या *
वेंगुर्ले-सागरेश्वर समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची अंडी सापडली
८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले-सागरेश्वर येथील मंदिराच्या मागे समुद्रकिना-यावर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या समुद्री कासवाने अंडी घातली. समुद्री कासव अंडी घातल्यानंतर लगेचच समुद्रात निघून जाते. कासवांच्या पावलांच्या ठशांवरुन स्थानिक मच्छिमारांना येथे कासवांनी अंडी घातली असल्याचे लक्षात आले. काही जागरुक ग्रामस्थांनी वायंगणी येथे कासव संवर्धनाचे काम करणा-या सुहास तोरसकर यांना फोन करुन सांगितले. तातडीने सुहास तोरसकर व त्यांचे सहकारी प्रसाद पेडणेकर घटनास्थळी हजर झाले. पण ते पोहोचेपर्यंत सुमारे ६० ते ७० अंडी क्षणिक मोहापायी काही लालची ग्रामस्थांनी पळवली होती. वाळूमध्ये शोधाशोध करुन केवळ चार अंडी वाचविण्यात तोरसकरांना यश आले. आता चार अंड्यांची काळजी सुमारे ५२ दिवस घेतल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतील.
दुर्मिळ प्रजातीचे रक्षण आवश्यक- ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवांची दुर्मिळ प्रजात म्हणून जाहीर झाली आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याचे काम ही कासवे करतात. कासवांची ही प्रजात झपाट्याने कमी होत आहे. भारतात फक्त ओरिसा, गोवा, वायंगणी, वेळास या किना-यांवर ही कासवे प्रजननासाठी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत येतात. अलिकडच्या काळात देवगड, देवबाग, वेळागर, वेंगुर्ला इथल्या किना-यावर देखील कासवे येत आहेत. केवळ क्षणिक मोहापायी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अंडी पळविणे हा कायदेशीर अजामिनपात्र गुन्हाही आहे. सिधुदुर्गात वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी वनविभागाच्या सहकार्याने गेली चार-पाच वर्षे कासव संवर्धनाची मोहीम स्वतः नुकसान सोसून राबवित आहेत. कासव संवर्धन पर्यटनात वाढही करु शकते. स्थानिकांना रोजगार आणि पैसे उपलब्ध करुन देवू शकते याचा अनुभव वायंगणी वासीयांनी कासव जत्रेच्या निमित्ताने घेतला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जर कोणाला कासवाची अंडी आहेत अशी माहिती मिळाल्यास सुहास तोरसकर (९४०३०७२९९१) यांना संफ करावा. योग्य बक्षिस दिले जाईल.
कासवांची अंडी चोरणे/कासवांना मारणे याला कायद्याने जबर शिक्षा- कासवाची अंडी पळविल्यास अगर कासवांना मारुन त्यांचे मांस खाणे, कवचाची तस्करी करणे हे सर्व अजामीनपात्र गुन्हे असून आरोपीला पाच वर्षे कारावास व २५ हजार रु. दंड अशी शिक्षा होऊ शकते. पोलिस आणि वनविभागाला संयुक्तपणे कारवाईचे अधिकार आहेत. समुद्री कासवे प्रजननाच्या हंगामात संभाव्य किना-यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी कासवप्रेमींकडून होत आहे.
जिल्हा व्यापारी एकता मेळावा संपन्न
ग्राहकांना काय हवं, काय नको याचा विचार करायचा नाही. ग्राहकाला बोलवायचं नाही, ग्राहक आला तर ‘पुड्या बांधायच्या‘ असा व्यापार चालणार नाही. ‘चिल्लर नको, नोटा मोजा‘, अशा पध्दतीने व्यापार करा. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कर भरणारे व्यापारी निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात व्यक्त केली. कुडाळ तालुक्याच्यावतीने कुडाळ हायस्कूलच्या रंगभवन हॉलमध्ये सारस्वत बँक नगरीत सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या आयोजित २४ व्या व्यापारी एकता मेळाव्यात ते बोलत होते सुट्या पैशाच्या टंचाईचा मुद्दा धरुन ते म्हणाले जिल्हा अजूनही सुटे पैसेच मोजतो आहे. मात्र, अन्य जिल्ह्यातील व्यापारी नोटा मोजताहेत. ते नियोजनबध्द व्यापार करीत आहेत.


पर्यटन अन् प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष द्या!
जिल्हा निसर्गरम्य आहे. दोन बंदरे, विमानतळ, चार वर्षांत चौपदरी रेल्वेची डबल लाईन अशी कामे लवकरच पूर्ण होतील. याचा फायदा व्यापा-यांनी घेतला पाहिजे. हा फायदा घेताना विचारसुध्दा मोठे पाहिजेत. चिल्लरसारखे ते नसावेत. असे विचार त्यांनी मांडले. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. महासंघाचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, मैत्रेय ग्रुपच्या वर्षा सत्पाळकर आदींची भाषणे झाली. व्यापारी महासंघांच्या मार्फत व्यापा-यांच्या मुलांसाठी लॅपटॉप देण्यात येतील अशी माहिती अनिल सौदागर यांनी दिली.
मान्यवरांचा गुणगौरव- व्यापारातील भीष्माचार्य भाऊ धडाम यांना व्यापार गौरव, महिला उद्योजक प्रमिला मुंडले यांना माई ओरोसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला व्यावसायिक पुरस्कार लक्ष्मी शिदे यांना गीता घुर्ये यांच्या हस्ते देण्यात आला. पुढील वर्षाचा रौप्य महोत्सवी व्यापारी एकता मेळावा सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन शर्यतीत श्री. भाऊसाहेब परब यांचा ९३ व्या वर्षी यशस्वी सहभाग
मुंबईत अलिकडेच झालेल्या ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन शर्यतीत ४.५ कि.मी. स्पर्धेत भाग घेऊन वयाच्या ९३ व्या वर्षी तरुणांच्या उत्साहालाही लाजवेल असा उत्साह दाखवत श्री. भाऊसाहेब तथा जी. एल. परब यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या कमी वेळात आघाडीवर राहून पूर्ण केली. श्री. परब गेली ६ वर्षे मुंबई मॅरेथॉन शर्यतीत भाग घेत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात. अंधेरी येथील प्रोग्रेसिव्ह सिनियर सिटीझन असो. स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. नियमित व्यायाम व योग्य आहार हे त्यांच्या निरोगी जीवनशैलीचे वैशिष्ट्य आहे. १९७७ साली भारत सरकारच्या शेती व अन्न महामंडळात उपव्यवस्थापक या पदावरुन निवृत्त झाले. निवृत्तीनंतर वेंगुर्ल्यात खादी महामंडळाच्या आर्थिक सहकार्याने फळप्रक्रिया उद्योग सुरु केला. तसेच युनिसेफची बालवाडीही सुरु केली. सातेरी प्रासादिक संघ, लोकन्यायालय पॅनेल सदस्य, सारस्वत बँक स्थानिक सल्लागार समिती सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांनी सिनियर सिटीझन वेलफेअर हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सातेरी व रामेश्वर देवस्थानचा ट्रस्ट करण्यातही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. संफ- मो. ९९३०५००१६८, ६५१५०८९८.

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुधीर वंजारी ‘सी‘ ग्रेड उत्तीर्ण - सिधुदुर्गला प्रथमच हा मान
दि. २६ ते २८ जानेवारीला कोलकत्तच्या खूदिराम इंडोर स्टेडियममध्ये २९ वी जेकेए राष्ट्रीय कराटे स्पर्धा भरविण्यात आली होती. ह्या स्पर्धेमध्ये १८ राज्यांचा सहभाग होता. त्यात ओपन टीम फाईटमध्ये महाराष्ट्र टीमने सिल्व्हर मेडल जिकले. मेघालय टीमने सुवर्णपदक जिकले. महाराष्ट्र टीममध्ये सेनसाय सुधीर वंजारी, अमर यादव, राम तुंबडे, सुरेश माळी व दिवेंश त्रिवेदी हे होते.
त्याआधी २२ ते २५ जानेवारी ला जपानचे शिहान ओसाका योशिहारु यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे कॅम्प भरविण्यात आला होता. त्यात काता व कुमिकोच्या विविध टेक्नीक शिकविण्यात आल्या. त्यात परीक्षाही घेण्यात आल्या. सेनसाय सुधीर वंजारी (फीप्थ डिग्री ब्लॅक बेल्ट) यांनी एक्झामिनर सी ग्रेड पास केली. स्पर्धेचे व कॅम्पचे आयोजन सेनसाय अनंत रत्ना (सिक्स डिग्री ब्लॅक बेल्ट) व वेस्ट बंगाल टीमने केले होते. सिधुदुर्ग जिल्हा कराटे-डो-असोसिएशन वेंगुर्ला या संस्थेचे अध्यक्ष सेनसाय सुधीर श्रीकृष्ण वंजारी सावंतवाडीचे सुपूत्र असून कराटे क्षेत्रात आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव कमावल्याबद्दल वेंगुर्ले येथे आल्यावर सिधुदुर्ग जिल्हा कराटे डो असोसिएशन वेंगुर्ले या संस्थेचे पदाधिकारी व पालक वर्गांकडून अभिनंदन करण्यात आले.