अधोरेखीत
भारतीय परंपरेतील आरोग्य
शालेय क्रमिक पुस्तकातील ही प्रतिज्ञा आपण म्हणत आलेलो आहोत. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.... समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या ‘परंपरांचा‘ मला अभिमान आहे. या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन....‘ या ‘परंपरा‘ नेमक्या कोणत्या? कोणी सुरु केल्या? इथे आपण फक्त आरोग्यविषयक आणि भारतीय प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदाचाच विचार करु.
काही मान्यता/धारणा अशा आहेत की त्या आज भारतीयच वाटतात, पण त्या मूळ भारतीय नाहीत. पाश्चात्य वैद्यकांनी करुन दिलेल्या चुकीच्या संकल्पाना अशा-
० वैद्यकीय क्षेत्रामध्ये फक्त ब्रिटिशांनी किवा परदेशी लोकांनीच खूप संशोधन केले आहे.
० भारतात जे पारंपारीक वैद्यकीय ज्ञान आहे ते अत्यंत तुटपुंजे आहे.
० नवीन काळानुसार नवीन रोग शोधले पाहिजेत.
० आपणाला केवळ डॉक्टरच जगवतो.
० औषधे खाल्याशिवाय जगता येत नाही वगैरे.
भारतीय अध्यात्म शास्त्र सांगते की, होणारे बहुसंख्य आजार हे प्रारब्धामुळे होत असतात. गृहित धरु पन्नास टक्के! उरलेल्या पन्नास टक्क्यांमध्ये मानसिक आजार असतात चाळीस टक्के आणि शारिरीक असतात फक्त दहा टक्के!
आपला असा समज आहे की, ‘ब्लड प्रेशर‘ हा काहीतरी फार मोठा गंभीर आजार आहे, तो वाढला की ‘हार्ट अॅटॅक‘ येतोच की! बरं ही वाढ कोण करवतो? का करवतो? याची उत्तरे लिहिण्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. फक्त ‘रक्तदाबवृद्धी हा रोग आहे‘ हाच मोठा गैरसमज आहे एवढे आता ध्यानात ठेवावे.
आमचा विश्वास डॉक्टरवर जास्त असतो. डॉक्टर संगतील त्या सर्व प्रयोगशालेय तपासण्या करुन, देतील तेवढी सर्व औषधे, होणा-या सर्व गंभीर परिणामांची जबाबदारी आपणच स्वतः स्विकारुन, आपलेच पैसे खर्च करुन, डॉक्टरांवर विश्वास ठेवून घेत असतो. (एवढी श्रद्धा, एवढा विश्वास आपण परमेश्वरावर क्षणभर जरी ठेवला तरी आपण कायमचे सुखी होऊ.) एवढे करुनही औषधे आयुष्यभर खावीच लागतात आणि गुण मात्र नाही. मग नेमके काय चुकते आहे? कोठे चुकत आहे? याचे परीक्षण डॉक्टर आणि रुग्ण सर्वांनीच करणे आवश्यक आहे.
साथीचे रोग दरवर्षी येतच राहाणार आहेत. नवीन नावाने येतील, लक्षणे थेडी फार सारखीच दिसतील, ‘‘यावर मृत्यूशिवाय औषधे उपलब्ध नाहीत. लस शोधण्याचे काम सुरु आहे‘‘ असे सांगितले जाईल, हे असेच सुरु राहाणार! आपली प्रतिकारशक्ती वाढवणए हा सर्वात सुरक्षित मार्ग, पण याविषयी कोणीही पाश्चात्य वैद्यक बोलतच नाहीत. कारण त्यांच्या परंपरेमध्ये ते नाही.
काळजी घ्यावी - काळजी करु नये
जो जीव जन्माला आला आहे तो सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी काळजी घ्यायलाच हवी. यासाठीच तर आयुर्वेद परंपरेत दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहाराचे नियम सांगितले गेले आहेत. पण हे नियम म्हणजेच पथ्यपालन. हे व्यक्ती परत्वे बदलणारे आहे. या नियमांचे ‘विवेकाने‘ पालन करणे म्हणजे काळजी ‘घेणे‘. आणि या नियमांचे ‘काटेकोरपणे‘ पालन करणे म्हणजे काळजी ‘करणे‘ होय!
मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गावर मात करणे कालत्रयी शक्य नाही. निसर्गाप्रमाणे जसा जन्म होतो तसाच मृत्यूदेखील आहे. त्याला विरोध करण्याचे काही कारणच नाही. पण आपण डॉक्टरला शरण जातो आणि नैसर्गिक जन्म आणि नैसर्गिक मृत्यू दोघांनाही मुकतो! शेवटी जे आयुष्य ठरलेले आहे ते डॉक्टर समोर असला तरी कमी करु शकणार नाही अथवा वाढवूही शकणार नाही.
ढोपर, छाती, नाक, कपाळ, मन आणि आत्मा यांच्यासह केलेला सूर्यनमस्कार म्हणजेच साष्टांग नमस्कार!
या सूर्यनमस्कारांचे महत्व समर्थ रामदास स्वामींनी खूप छान वर्णन केले आहे. ते स्वतः १२०० सूर्यनमस्कार रोज घालीत असत. आम्हाला १२ सुद्धा घालता येत नाहीत. समर्थ सूर्योपासक होते, तेजोपासक होते, बलोपासक होते. म्हणूनच मारुतीची स्थापना त्यांनी प्रत्येक गावात केली. मुळातच सूर्य ही आरोग्याची देवता आहे. भारतीय जीवनशैलीचा आत्मा आणि एक विनयशील संस्कार म्हणजे सूर्यनमस्कार.
भारतीय मानसिकता-
जे पूर्वजांनी सांगितले तेच करायचे असते ही भारतीय मानसिकता आहे. आप्तांनी जे सांगितले त्याला प्रतिप्रश्न न करता निमूटपणे कृती करायची ही भारतीय मानसिकता आहे. आप्त म्हणजे वयाने, अनुभवाने, ज्ञानाने श्रेष्ठ व ज्येष्ठ!
भारतीय परंपरेनुसार जेवण बनवण्याची भांडी मातीची असत. आपली माती ज्या मूल अठरा द्रव्यांनी बनलेली आहे, त्याच अठरा मूलद्रव्यांनी आपले शरीरदेखील बनले आहे. जन्म घेतल्यानंतर जी अठरा द्रव्ये प्राथमिक स्वरुपात शरीरात असतात तीच अठरा द्रव्ये आपल्या देहाला दहन केल्यानंतर मूठभर राखेतही असतात. म्हणून या मातीच्या भांड्यातून मिळणा-या अठरा मूलद्रव्यांचा वापर आपल्या जेवणात नियमितपणे केला गेला तर शरीरातील अठरा द्रव्यांचे पोषण आपोआप होत राहाते.
घरात विज्ञानाने प्रवेश केला आणि आरोग्याचा नाश होत गेला. काही गोष्टीत वेळ वाचला. पण जी गोष्ट जेवढ्या वेळात शिजली पाहिजे ती जर त्यापेक्षा लवकर शिजली तर त्यातील गुणमूल्य नक्कीच कमी होतात. जसे, कुकरमध्ये दहा मिनिटात पण प्रचंड तापमानाला शिजवलेला भात ‘जिवंत‘ राहील का? म्हणूनच पारंपारिक पद्धतीने पेज गाळून बनवलेला मंद विस्तवावर तयार केलेला भात जेवताना समाधान मिळते. तो मोकळा आणि पचायला हलका होतो. कुकर असतो अॅल्युमिनीयमचा, नाहीतर हिडालीयमचा! हे दोन्ही धातू शरिरात गेल्यानंतर मेंदुपर्यंत पोचतात आणि स्मृतीभ्रंश हा आजार करतात. हे धातु आपल्याकडे जेवणात वापरले जात नव्हते. ज्या भारतीयांनी जगातील उत्तम प्रतीचे पोलाद बनवले त्यांना हे चिल्लर मिश्र धातू तयार करता आले नसते का? इंग्रजांनी ही भांडी भारतात आणली, ती कारागृहातील कैद्यांना जेवण देण्यासाठी! कल्हईची भांडी मोडीत निघाली आणि स्टील, निर्लेप इ. भांडी आली... आणि आपल्या शरीरातील ‘जस्ताचे‘ प्रमाण कमी झाले. मधुमेह, रक्तदाब वृद्धी हे विकार वाढले.
सण, परंपरा आणि आरोग्य-
सणांच्या माध्यमातून आरोग्याचे रक्षण कसे होते हे आपण मागील काही लेखांत पाहिले आहे. माझे ‘सण आणि आरोग्य‘ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पण इथे काही गोष्टींचा थोडक्यात उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरेल. सणांची रचना ही विशिष्ट ऋतुनुसार केली गेली आहे. भारतीय सण, व्रते, उत्सव यातून आपणाला आरोग्याचे नियम सांगितले जातात, पण आजकाल पुढच्या पिढीतल्या, पाश्चात्यांच्या अनुगृहित, तथाकथित पुढारलेल्या बुद्धिवादी लोकांना, सण, व्रत-वैकल्ये साजरे करणे म्हणजे बुरसटलेले, मागासलेले, अंधश्रद्धेने भारलेले आणि सनातनी धार्मिक विचार गावंढळपणाचे वाटतात! जुन्या रुढी, परंपरा, संस्कृती जपण्याच्या प्रक्रियेतील विज्ञान व शास्त्र समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. जो तो उठतो आणि पाश्चात्यांच्या विचारांनी भारीत होऊन आमच्या भारतीय कल्पनांना वेडगळ आणि कालबाह्य ठरवितो.
आपली आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा दागिने घालण्याची ! प्राचीन काळापासून आजमितीपर्यंत अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धाटणीचे दागिने घातले जातात. डोक्यावरील बिदीपासून पायातील वेडण्यापर्यंत सर्व ठिकाणी दागिने असतात. हे फॅशन म्हणून मुळीच नाहीत. त्यातही आरोग्य दडलेले आहे.
उठल्यावर सर्वात पहिले काम करायचे असते ते म्हणजे मलमूत्र विसर्जन! भारतीय परंपरेनुसार मलमूत्र विसर्जन उकीडवे बसून करावे, म्हणजे मांडीवर, कंबरेवर, पोटावर, संडासच्या जागेवर योग्य ताण निर्माण होतो व मलनिस्सरण सुखप्रद होते. पाश्चात्य वैद्यक पद्धतीनुसार कधीही गुडघे दुडले जाऊ नयेत असे ‘त्यांचे‘ शास्त्र म्हणते. म्हणून त्यांचे जेवण टेबल खुर्चीवर बसून, कारकूनी टेबल खुर्चीवर आणि मलविसर्जन देखील ‘कमोडवर‘ अगदी काटकोनात बसून! आपल्याकडे गोरी पाश्चात्य मंडळी जशी वागतात, बोलतात, व्यवहार करतात अगदी तस्सं वागायचा आपण प्रयत्न करीत अनुकरण अगदी मलविसर्जनापर्यंत येऊन पोचलंय, यापेक्षा दुर्दैव ते काय असणार? असो! त्यांचं विसर्जन सुख त्यांना अगदी लखलाभ होवो. आम्हाला आपला लघुकोन चांगला!
गुळण्या करणे यासारखा उत्तम व्यायाम नाही. पाणी घशापर्यंत नेऊन, मान मागे करुन, शक्य तेवढ्या जोरात गडगड असा आवाज करीत वीस पंचवीस वेळा पाण्याच्या गुळण्या केल्या तर मस्तकातील दोषांचे शमन व शोधन दोन्ही क्रिया एकदम होतात. स्वरयंत्र, तालु, कंठ, गळा, हिरड्या, दात, जीभ, गलग्रंथी इ. अवयवातील दोष कमी होतात. त्या स्नायूंना बल मिळते. विशेषतः लहान मुलांना केवळ कोमट पाण्याच्या गुळण्या करायला देखील खूप आवडते. बाकी किरकोळ सर्दी, खोकला, घसा दुखणे, वारंवार टॉन्सिल सुजणे असे आजार केवळ गुळण्या करुन कमी होतात. मोठ्यांसाठी देखील हा उत्तम बिनखर्चाचा उपाय आहे.
आपण आंघोळ करता. त्यावेळी सर्वांग सुंदर व्यायाम आपणाकडून होत असतो. साबणाऐवजी उटणे वापरले तर अधिक फायदा होतो. उटणे हे खरखरीत असल्याने प्रत्येक पेशीबाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीरांतर्गत पेशीस्तरावरील मलनिस्सारण होण्यास अधिक फायदा होतो. पाश्चात्यांचा साबण बुळबुळीत! त्या साबणाने कदाचित वरुन चामडीची स्वच्छता होत असेल! पण आतून स्वच्छता करण्याचे सामर्थ्य त्यात नाही हे खास.
नंतर घरात असलेल्या देवाच्या समोर उभे राहून ‘आजचा दिवस चांगला जाऊ दे, तुझी कृपादृष्टी सर्वांवर राहू दे,‘ अशी प्रार्थना करावी व एक साष्टांग नमस्कार घालावा. असा नमस्कार स्त्रियांनीदेखील घालावा. केवळ खाली वाकून ‘असा स्त्री विशिष्ट‘ नमस्कारदेखील पाठीच्या कण्यातून वाकून घातला जातो. कमरेतून ओणवे राहून एकदा डावीकडून उजवीकडे जोडलेले हात अर्धवर्तुळात फिरवल्याने त्रिकस्थी म्हणजे कमरेची हाडे, कणा आणि पायाचे स्नायू यांना उत्तम व्यायाम होतो. गर्भाशयाची शुद्धी उत्तमरीत्या होत राहते. पोटावरील मेद म्हणजे चरबीच्या वळ्या कमी होतात. असा नमस्कार करण्याने कोणताही कमीपणा येत नाही. हे आधुनिक बॉबकट आणि बॉयकटवाल्या स्त्रियांनी लक्षात ठेवावे. ज्यांना शक्य आहेत त्या स्त्रिया आंघोळीनंतर तुळशीवृंदावना भोवती फे-या घालतात. त्याचे अध्यात्मिक फायदेही मिळतात.
भारतीय संस्कृतीत जेवणानंतर तांबूल सेवन केले जाते. घास बत्तीसवेळा चावायला सांगीतला आहे, पण ते काही आता या धकाधकीच्या जीवनात जमेल असे वाटत नाही. म्हणून जेवण झाल्यावर किमान बत्तीसवेळा पान चावून खाल्ले तर लाळ चांगली तयार होऊन पचन सुधारतेच. जबड्याला, हनुवटीला व्यायाम होतो. चेहरा फ्रेश राहतो.
रोज रात्री झोपतांना सर्वांगाला तेल मालीश करायला सांगितले आहे. पाश्चात्य पद्धतीत हे तेल लावणे म्हणजे खुळचटपणाचे लक्षण! पण हे तेल मालीश खरोखरीच झोप आणणारे, दिवसभराचा थकवा दूर करणारे असते. लहान मुलांना बाळसे धरण्यासाठी हे मालीश खूपच उपयुक्त आहे.
शालेय शिक्षणातील आरोग्य -
भारतीय परंपरा विचारात घेऊन क्रमिक पुस्तकातील धडे निवडले जातात. (म्हणजे अजूनपर्यंत तरी! पुढे सर्व बदलणार आहे. त्याची सुरुवात देखील झाली आहे.) इयत्ता तिसरीच्या पुस्तकात दात घासण्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रश वापरायचा सल्ला दिला आहे. मूल अठरा द्रव्यांच्या व्यतिरिक्त तयार केलेली केमिकलची पेस्ट दातांचे आरोग्य चांगले कसे ठेवील? आमच्या परंपरेनुसार गाईच्या शेळकुंड / गोव-या जाळून तयार केलेली राखुंडी हे उत्तम दंतमंजन आहे हे आयुर्वेदानेही मान्य केले आहे. आज शाळेत जाणा-या लहान मुलांना देखील पाश्चात्य संस्कारांना सामोरे जावे लागत आहे. कसे होणार परंपरांचे जतन आणि आरोग्याचे रक्षण? हात धुण्यासाठी साबण वापरावा, असेही सांगितले आहे. ‘राखही वापरली जाते‘ असं वाक्य अगदी शेवटी शेवटी दिसते. साबण विकत घ्यावा लागतो आणि राख फुकट मिळते म्हणजे साबण खपवण्यासाठी केले जाणारे हे शालेय स्तरावरील ‘मार्केटींग‘ आहे. हे आम्हाला कधी कळणार?
धार्मिक ग्रंथांतील आरोग्य -
अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आरोग्याचे रक्षण कसे करावे हे सुंदररीत्या वर्णन केलेले आढळते. श्री गुरुचरित्र, शिवलीलामृत, दासबोध, गोंदवलेकर महाराजांची ‘३६५ प्रवचने‘ इ. ग्रंथातून शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन कसे करावे याचे वर्णन उपलब्ध आहे. गोंवदलेकर महाराज म्हणतात, ‘ज्या वयात जे रोग व्हायला पाहिजेत, त्या वयात रोग झाले म्हणजे आपण निरोगी आहोत असे समजावे!‘
शेणखतावरील शेती -
भारतात अनेक वर्षे परंपरेने कोणतेही किटकनाशक न वापरता कोणतेही रासायनिक खत न वापरता कृषी उत्पादने घेतली जातात. उत्पादन इतके भरघोस मिळते की, आमच्या कृषीमंत्री महोदयांना ते कुठे ठेवावे असा प्रश्न पडतो. सरकारच्या आताच्या विघातक योजनांमुळे शेतकरी राजाला रासायनिक खते वापरावीच लागत आहेत. परंपरागत बियाणे वापरुन उत्तम दर्जाचे धान्य उत्पादन होत असे. परदेशी कंपन्यांकडून मिळणा-या मलीद्यामुळे नको ती रासायनीक खते, कीटकनाशके महागडी आणि अत्यंत घातक बियाणी सरकारकडून शेतक-याला आता विकत घ्यावी लागत आहेत. शेतीवरील हे आक्रमण आपल्या मूळ परंपरांच्या आड आले की, विनाश जवळ आला असे समजावे. ही धोक्याची घंटा आहे.
ध्यान, धारणा आणि मानसिक शांती -
इतर कोणत्याही देशात मिळत नाही एवढी मानसिक शांती भारत देशात मिळते असे अनेक परदेशी पर्यटकांनी लिहून ठेवले आहे. आजही अनेक परदेशी पर्यटक केवळ ध्यान, धारणा, उपासना जाणून घेण्यासाठी आणि त्यातून मिळणारी मानसिक आणि आध्यात्मिक शांती अनुभवण्यासाठी येत असतात.
आजीबाईचा बटवा -
‘घरोघरी आरोग्य‘ मालिकेतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘आजीबाईवा बटवा!‘ या औषधी थैलीला ‘आजोबांची पिशवी‘ म्हटलेले नाही. यावरुन घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य फक्त आईच्या, आजीच्या हातात होते. एका स्त्रीच्या हातात होते. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारी ही ‘आरोग्यगंगा‘ आज कुठेतरी लुप्त झाली आहे. गरज आहे तिला पुनरुज्जीवित करण्याची! जरा सर्दी झाली की, ‘‘चल, डॉक्टरकडे!‘‘ असं जगायला सांगणारी आजची आरोग्य यंत्रणा काय कामाची? किरकोळ पोटदुखी, उलटी, संडास, दात दुखी, अंग मोडून येणारा ताप इ. गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाण्याची वेळ हा आजीबाईचा बटवा आणू देत नव्हता. ही बटवावाली आजी फक्त भारतीय परंपरेतच आहे.
शुभंकरोती -
सायंकाळी देवघरात दिवा लावून केली जाणारी विश्व प्रार्थना आणि दिव्याचे महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ‘सर्वासी सुख लाभावे, सर्वांनी निरोगी राहावे, सर्वांचे कल्याण व्हावे, दुःखी कोणी असू नये‘ ही प्रार्थना जगातील कोणकोणत्या देशात म्हटली जाते? एकाही नाही! एवढा उदात्त विचार शिकवणारी आमची संस्कृती! देश विचारापेक्षा राष्ट्रविचार हा अधिक महत्त्वाचा मानते. चार/दोन तथाकथित सुधारणा केल्या म्हणून विदेशी संस्कृतीचा पुळका येणा-या लोकांना ही प्रार्थना म्हणजे काय ‘टाईमपास‘ वाटतो?
इतर कोणत्याही देशात राष्ट्र ही संकल्पना नाही. भौगोलिक सीमांनी बांधलेला हा देश आणि या सीमासंकट या भूभागातील यच्चयावत प्राणीमात्र, वनस्पती, सजीव - निर्जिव वस्तूंनी भरलेला हा भारत देश याला ‘राष्ट्र‘ असे म्हणतात. हे आम्हाला शुभंकरोतीच्या वेळी शिकवले जाते. मग ही परंपरा इतर कोणत्याही परंपरेपेक्षा अत्युच्च दर्जाची आहे असे मी म्हटले तर कुठे चुकले?
संस्कार - भोग संस्कृती त्याग संस्कृती -
आपल्या भावाच्या नावे राज्यकारभार हाकणारे भरतासारखे राजे या देशात होऊन गेले. स्वप्नामध्ये आपले सर्व राज्य दान दिल्याचे पाहून खरोखरच सर्व राज्य दान देणारा राजा हरिश्चंद्रही याच देशातला. रावणाचे सर्व राज्य स्वपराक्रमावर जिकूनदेखील ते राज्य बिभिषणाला दाने देणारे प्रभू श्रीरामचंद्रही या भूमीमधले. स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आपले सर्व आयुष्य स्वराज्यासाठी देणारे शिवरायही याच मातीतले. स्वतःच्या ‘जीवाशी‘ खेळले म्हणून ‘शिवाजी‘ बनले! या मातीचा वारसा म्हणजेच आमच्या परंपरा होत. या पुण्यश्लोक कर्तृत्वाचे, दातृत्वाचे संस्कार या मातीवर झालेले असल्याने आमची संस्कृती त्यागाची संस्कृती बनली.
भारतीय मानसशास्त्र हे त्यागावर आधारलेले आहे. तिथे भोगाला वाव नाही. परमेश्वराला नैवेद्य दाखवण्यासाठी जे अन्न तयार केलेले असते त्याला ‘भोग‘ म्हणतात. देवाला भोग देऊन जे उरेल ते ‘महाप्रसाद‘ म्हणून खाण्यात धन्यता मानणारी आपले संस्कृती! ‘या जगाचा भरपूर व यथेच्छ उपभोग घ्यावा.‘ या पाश्चात्य उपभोगवादी दृष्टीच्या तुलनेत आमची त्यागाची संस्कृती कितीतरी पटीने सरस ठरते. यासाठीच विवाह संस्था भारतात अस्तित्वात आहे.
पाश्चात्य जीवन लैंगिक व्यभिचारावर आधारलेले आहे. केवळ नर आणि मादी या दोनच नात्याचा संबंध तेथे पाहिला जातो. (आता तर तेही बंधन पाळले जात नाही आणि दुर्देव म्हणजे भारतात देखील कायद्याने याला मान्यता दिली जाते. कलियुग म्हणतात ते हेच!) भारतीय व्यवस्थेमध्ये विवाहाला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढे महत्त्व अन्य कोणत्याही धार्मिक कार्याला दिले जात नसेल.
भारत देशाची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न विचारला तर, ‘‘अध्यात्मधिष्ठित जीवन प्रणाली, आरोग्यधिष्ठित आहार पद्धती आणि मानसिक शांततेसाठी योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार!‘‘ हेच उत्तर सर्वाधिक बरोबर असेल असे मला वाटते. या परंपरा, संस्कृती, संस्कार, आहारपद्धती, आयुर्वेद, स्वदेशी विचार या सर्व गोष्टी एकमेकांमध्ये एवढ्या मिसळून गेल्या आहेत की, एका कोणत्याही गोष्टीला या साखळीतून वेगळे काढताच येणार नाही. आज आम्ही जगतो, पण कसे जगावे, हे आम्हाला माहित नाही, कसे जेवायचे हे आम्हाला माहित नाही, कसे झोपायचे हेही आम्हाला माहित नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या परंपरेमध्ये दडलेली आहेत. काही गोष्टी स्विकारण्याची तयारी ठेवली तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाला ताबडतोब मिळू लागतील. प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत तर केव्हाही संफ करा. आपण सर्वांनी मिळून उत्तरे शोधूया! कृपया भारत ‘माझा‘ देश आहे हे विसरुन भारत ‘कधी कधी‘ माझा देश आहे, असे चुकूनही म्हणू नका! जय हिद ! जय भारत !! जय परंपरा !!!
वैद्य सुविनय दामले
विशेष लेख *
पुरक पंचकर्म
काही नाटकं अजरामर असतात. गडक-यांचं एकच प्याला हे त्यातलंच एक. त्यात एक भन्नाट सीन आहे. एक डॉक्टर आणि वैद्य पेशंटला कुठला उपचार द्यायचा यावर भांडत आहेत. खरंच दोन उपचार पद्धतीचे पुरस्कर्ते पेशंटचं काय करुन ठेवतात हा सीन अनेक सिनेमावाल्यांनीही उचलला आहे. कारण एखाद्या उपचार पद्धतीची बाजू घेऊन भांडणं लोकांना फार आवडतं. आपलाच अनुभव काय तो खरा या भूमिकेतून हे येतं.
अत्र्यांनी साष्टांग नमस्कार नाटकात असंच नमस्कारांचं महत्व सांगणारं पात्र रंगवलंय. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद वदवले कसे? तर म्हणे नमस्कार घालून तब्येत इतकी खणखणीत झाली होती की एक कानाखाली वाजवली, लागला की रेडा घडा घडा बोलायला!!! हा अतिशयोक्ती अलंकार लोकं उपचार पद्धतीबद्दल बोलतांना नेहमीच वापरतात. एक गोळी घेतली आणि झालो की ठणठणीत. किवा अहो अमुक डॉक्टरकडे पेशंट गेला... पाय तुटल्यावर. यांनी एक ऑपरेशन केलं आणि तुरुतरु चालायलाच काय धावायला लागला. ही उदाहरणं नवी नाहीत आपल्याला. डॉक्टर काही देव नसतात आणि उपचारांनाही मर्यादा असते. ते पेशंटच्या आजारावर व शरिराच्या उपचारांना तोंड देण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात.
बदलत्या जीवनशैलीनं, साधन सुविधांनी माणसाचं आयुष्य सोपं केलं. आरामदायी तर केलंच पण त्याचबरोबर काही आजारही एकावर एक फ्री द्यावेत तसे दिले. अगदी अॅसीडीटीपासून ते सांधेदुखी, डायबेटीस, बीपी, कॅन्सर आणि हृदयविकार! या सगळ्यावर अॅलोपॅथीनं औषध शोधून काढली, उपचार शोधले. ऑपरेशनच्या माध्यमातून. प्रकृती केंद्रात अॅलोपॅथी सोडा व फक्त आयुर्वेदच जवळ करा असं कधीच सांगितलं जात नाही. उलट मानवानं शोधून काढलेल्या या उपचार पद्धती एकमेकांना कशा पुरक ठरतील याचाच विचार केला आहे. इथे ज्या आजारांवर ऑपरेशन करायला हवं त्यावर ऑपरेशनचाच सल्ला दिला जातो. पण ऑपरेशननंतर शरिराची काळजी घेणं व त्याला आतून बाहेरुन तंदुरुस्त बनवणं हे काम महत्वाचं मानलं जातं. कारण ऑपरेशननंतरही शरिराला सक्षम बनवणं व परत ते विकार उद्भवू नये म्हणून शरिराचं शुद्धीकरण करणं महत्वाचं आहे असं मानलं जातं.
बीपी, डायबेटीस, हृदयविकार या सगळ्यातच ही पुरक उपचारपद्धती आहे. त्यासाठी वेगवेगळे लेप, शेक व इतर माध्यमातून उपचार केले जातात. सांधेदुखीवर तर प्रकृतीची मास्टरीच आहे. त्यावर इथल्या उपचार पद्धतीने जे रिझल्ट दिलेत ते इतर कुठेही दिसत नाहीत.
आता मला नेहमीच नाटकांच्या दौ-यांमुळे अॅसीडीटी आणि पाठदुखीचा त्रास असायचा. अॅलोपॅथीनं तात्पुरतं बरंही वाटायचं. पण त्या उपचारांबरोबरच मी प्रकृतीत उपचार घेतले आणि आजाराच्या मूळाशी गेलो. आणि मूळच समूळ नष्ट केलं गेलं. कारण इथे तुमची प्रकृती काय आहे. पित्त आहे, कफ आहे की वात... कुठली याचा विचार होतो. तुम्ही कुठल्या महिन्यात म्हणजे कुठल्या ऋतूत जन्माला आलात याचाही विचार होतो. कारण त्याप्रमाणेच तुमची प्रकृती घडली असते, आणि त्यानुसारच इलाज होणं महत्वाचं असतं, हे इथे पाहिलं जातं.
नुसती पेशंटची नस सापडून उपयोग काय हो, आजाराची नस सापडणंही महत्वाचं असतं. ही नस पकडण्याचं काम आधी केलं जातं. अॅसीडीटी हा विकार पोटाची अबाळ आणि जीवनशैली आहारविहाराशी निगडीत तसा मानसिक तणावाशीही. त्यामुळे तात्पुरतं बरं वाटून चालत नाही. लांबचा विचार करुन चिवटपणे उपचार करावे लागतात, निसर्गाच्या सानिध्यात राहून शरिराची ओळख करुन घेण्यासाठीही प्रकृती उत्तम आहे. आपण आपल्या शरिराला जितकं गृहीत धरतो तितकं कुणालाच धरत नाही. कदाचित भारतीय तत्वज्ञानातला को अहं को अहं या प्रश्नाचा हाही एक भाग असेल. आपली प्रकृती जाणून घेणं! आणि त्यानुसार उपचार करणं महत्वाचं.
मी नेहमी प्रकृतीत पहातो, लोक एका आजाराची तक्रार घेऊन येतात आणि सोबत एकावर एक फ्री मिळावे तसे अनेक आजारांवर उपचार मिळाल्याचं सांगतात. कारण एकूणच त्या पर्टीक्यूलर आजारावर लक्ष केंद्रीत केलं जातंच.
पण शरिरशुद्धीमुळे सर्व शरिरातलं अनारोग्य बाहेर टाकलं गेल्याने लहान सहान तक्रारीही गायब होतात. हा मोठ्ठा फायदा आहे. म्हणूनच मी म्हणेन प्रकृती हा आपल्या शरिराला सर्वार्थाने सक्षम व आजारांशी लढण्यास तयार करणारं केंद्र आहे. कुठल्याही पॅथीचे उपचार घेण्यासाठी शरीर सक्षम बनवणं महत्वाचं नाही का? आता आजार काही सांगून येत नाहीत पण ते झाल्यावरच कशाला उपचार घ्यायचे? ते होऊच नयेत म्हणूनही प्रयत्न करायला नको का? त प्रयत्न म्हणजेच प्रकृतीचं पंचकर्म आहे....
प्रकृती आयुर्वेदीक हेल्थ रिसॉर्ट
मु. पो. यवतेश्वर, ता. जि. सातारा.
मोबा. ९८५०९९४४७३.मुंबई संफ - नम्रता- ९९३०१६७७१५
अक्षम्य गुन्हा
आयुष्य जर चांगल्याप्रकारे जगायचे असेल व त्याचा आनंद उपभोगायचा असेल तर निरोगी जगण्यासाठी असलेल्या काही नियमांचे पालन करावेच लागते. उदा. आहार-विहार योग्य असावा, व्यायाम करावा इत्यादी. परंतु या नियमांचे उल्लंघन आपल्याकडून जाणते-अजाणतेपणी होत असते. त्याची शिक्षा म्हणून आपणास शारिरीक वेदना, कष्ट, वेगवेगळे आजार यांच्या स्वरुपात भोगाव्या लागतात. त्या सर्व एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रत्येकजण आपआपल्या शारिरीक क्षमतेनुसार भोगत असतो. परंतु पुढे जाऊन या नियमांचे उल्लंघन वाढत जाते व शरिराच्या बाबतीत अक्षम्य असे गुन्हे घडतात.
तीव्र रोगांच्या आजारपणात रुग्ण व्यक्तीला काही ठोस आहार देऊ नये, हा एक निसर्गोपचारामधील मूलभूत असा नियम आहे. तरीही तीव्र रोगांमध्येही रुग्णाला खायला घाला असे आधुनिक औषध आणि आहारशास्त्राचे वैज्ञानिक आहार देण्याच्या बाबतीत जणू काही हुकूमच सोडतात जे गुन्ह्यांपेक्षाही भयानक असतात. रोगाच्या तीव्र अवस्थेमध्ये रुग्ण व्यक्तीला ठोस आहार दिल्याचे दुष्परिणाम म्हणून ती व्यक्ती रोगाचे कष्ट, त्रास आणि वेदना अधिक प्रमाणात सहन करत राहते. आता हा सल्ला देणे आणि तो पाळणे म्हणजे आपण आपल्या शरीराप्रती केलेला अक्षम्य गुन्हाच ठरतो.
वास्तविक तीव्र रोग म्हणजे काय? त्यामागे कारण काय? हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा तीव्र रोगाच्या अवस्थेमध्ये रुग्ण व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा ठोस आहार खायला देणे हा खरोखरच अक्षम्य गुन्हा आहे हे आपल्याला कळेल.
तीव्र रोग म्हणजे ‘अॅक्युट डिसीज‘. जे रोग तीव्रतेने, काहीही लक्षात येण्याआधी किवा अचानकपणे येतात परंतु योग्यरितीने हाताळले किवा योग्य उपचार घेतले की तेवढ्याच गतीने बरेही होतात. उदा. सर्दी, पडसे, उलट्या, जुलाब, ताप, फोड्या, पुटकुळ्या वगैरे.
खरे पाहता तीव्र रोग म्हणजे निसर्गाने शरीर स्वच्छ करण्यासाठी योजलेले उपचारच असतात. जेव्हा शरिरात किवा कोणत्याही एका अवयवात विजातीय द्रव्ये (रोगांचे कारण) एकत्रित होतात तेव्हा होणारे विसर्जन शरीर तीव्र रोगांच्या लक्षणांच्या स्वरुपात प्रकट करुन स्वतःला निर्मल करण्याचा प्रयत्न करते. तीव्र रोग प्रकट होण्यासाठी शरिराची जीवनशक्ती प्रबळ हवी. वृद्धांपेक्षा ती मुले आणि तरुणांमध्ये भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच शरिरात विजातीय द्रव्यांचा संचय झाला की त्यांना तीव्र आजारांचा त्रास होतो व तो आजार बरा झाल्यावर त्यांचे शरीर स्वच्छ निर्मल होऊन जाते.
प्रत्येक तीव्र रोगांमध्ये सर्दी असो किवा कोणत्याही प्रकारचा ताप असो. अशा वेळी शरीर साठलेले विजातीय द्रव्य शरिराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यावेळी शरिराचा प्रत्येक कण, प्रत्येक पेशी आपली सर्व शक्ती त्याच कार्यासाठी वापरत असते. अशा परिस्थितीमध्ये शरिराला आहार पचविण्याची शक्ती अजिबात नसते. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे अशा वेळी घेतलेला पातळ किवा घट्ट कुठल्याही प्रकारच्या आहारामुळे शरिराला पोषण मिळत नाही. आहाराची मात्रा कितीही जास्त असली तरीही त्यामुळे पोषण प्राप्त न होता उलट शरीर रोडावले जाते. रुग्ण अशाप्रकारे ठोस आहार घेत राहिला तर अशक्तपणाचे प्रमाण अधिक वाढते.
तीव्र रोगांच्या त्रासाच्या वेळी नैसर्गिकरित्याच रुग्ण व्यक्तीला भूक लागत नाही. त्याला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या तोंडाची चव जाते. शरीर आहार पचविण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे आहार ग्रहण केल्यास शरीर स्वच्छ करण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. शरीर शुद्धीचे कार्य जे शरिराने स्वतःच नैसर्गिकरित्या आरंभिले आहे ते संपल्याशिवाय जीवनशक्ती दुसरे कुठलेही कार्य व्यवस्थितरित्या करु शकत नाही. कारण ते झाल्या शिवाय शरीर अन्न पचविण्याचे काम व्यवस्थित करु शकत नाही.
तीव्र रोगांमध्ये रुग्णाला खाण्याची जरासुद्धा इच्छा होत नाही. अशा वेळी ठोस आहार घेणे सर्वथा चुकीचे आहे. मनुष्य असो वा पशुपक्षी, जोपर्यंत रोगनिवारण होत नाही तोपर्यंत आहार घेण्याची इच्छा होत नाही. अशावेळी रुग्णाला कोणत्याही प्रकारचा ठोस आहार खाण्याची जबरदस्ती करणे अक्षम्य असा गुन्हाच ठरेल.
तीव्र रोगांमध्ये रुग्णाला काहीही ठोस आहार देऊ नये. आजार बरा झाल्यावर रुग्णाला आपोआपच भूक लागते. त्यावेळी रुग्णाला योग्य असा सुपाच्य आहार देणे योग्यच ठरेल. जेव्हा तीव्र रोगांच्या निवारणासाठी निसर्गोपचार चिकित्सापद्धती अवलंबिली जाते तेव्हा उपवासाचे तंत्र वापरले जाते. त्यामुळे रोगाचा कालावधी कमीतकमी अर्धा नक्कीच होतो. शिवाय रुग्णाचा मृत्यू होईल अशी रोगाची उग्रता रहात नाही.
- डॉ. सौ. रोहिणी रविद्र वाडेकर, निसर्गोपचार तज्ञ
सौजन्य- ‘आरोग्य जीवन‘ (०२३५३) २२३४८६, २२३५८६.
बातम्या *
जैतापूर आंदोलनात हिसक वळण - पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू
० माडबन येथे आंदोलकांनी जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाच्या भितीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तरीही जमाव काबूत न आल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. संतापलेल्या जमावाने नाटे पोलिस स्थानक उद्ध्वस्त केले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तब्रेज अब्दुल्ला सुगारेकर (३६) याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलिस अधिकारी आणि कमांडोजही जमावाच्या आक्रमकतेमुळे जखमी झाले.
० पोलिसांच्या दंडुकेशाहीपासून शाळकरी मुलेही बाचवली नाहीत. माडबन येथील श्री. राजू वाडेकर यांच्या घरात घुसून १३ वर्षाचा मुलगा कु. तन्मय वाडेकर याला पोलिसांनी लाठ्यांनी बदडून काढले. सर्वत्र या घटनेचा निषेध होत आहे.
० दि. १९ रोजी शिवसेनेने पुकारलेला रत्नागिरी जिल्हा बंद यशस्वी झाला. रत्नागिरी शहराबरोबरच ग्रामिण भागातही कडकडीत बंद पाळून सरकारच्या संवेदनहिनतेचा निषेध करण्यात आला.
० यावर प्रतिक्रिया देताना पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी पलटी मारत जैतापूर प्रकल्पाला सुरक्षेचा पूर्ण विचार करुन ३५ अटींसह मंजूरी दिली आहे असं सांगत देशातील अशा महत्वाकांक्षी
प्रकल्पाला विरोध होणारच असे म्हटल्याने प्रकल्पग्रस्थांची एक प्रकारे कुचेष्टा होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
० भारतातील सर्व अणूउर्जा प्रकल्प रद्द करावेत, तसेच जैतापूर-माडबन भागातील दडपशाही बंद करावी यासाठी २१ ते २३ एप्रिल दरम्यान तारापूर ते जैतापूर अशी अणूउर्जा विरोधी यात्रा संपन्न होणार आहे. पर्यायी उर्जेला प्रोत्साहन मिळावे, सरकारची दडपशाही बंद व्हावी आणि कोकण किना-याला संरक्षण मिळावे याकरिता या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
० जैतापूरमध्ये घडणा-या घटनेबाबत काँग्रेस हाय कमांडने तीव्र नाराजी दर्शवली असून नारायण राणेंना बाजूला ठेवून प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधून त्यांची समजूत घाला अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.
० काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जैतापूरमधील हिसक आंदोलनाला शिवसेनेला जबाबदार धरले आहे. आतापर्यंत सरकारने केलेल्या बळजबरीमुळे तीन नाहक बळी गेले आहेत.
० कोणत्याही राजकीय पक्षाने जैतापूर अणू उर्जा प्रकल्प नको अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनाच आपला लढा शांततामय मार्गाने चालू ठेवावा लागणार आहे.
येत्या दोन वर्षात सारस्वत बँक देशभर विस्तारणार - एकनाथजी ठाकूर
सारस्वत को. ऑपरेटीव्ह बँक येत्या दोन वर्षात देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सुरु होणार असून पुढील काळात विदेशातही सारस्वत बँकेच्या शाखा सुरु होतील असे बँकेचे अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी मालवण येथील सारस्वत बँकेच्या नूतनीकरण झालेल्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलतांना सांगितले. कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी बँकेच्या विश्वासार्ह कार्यपद्धतीचे कौतुक करुन भविष्यात बँकेची अधिक प्रगती होत राहील असे शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी मालवणचे डॉ. शशिकांत झांटये, डॉ. विवेक रेडकर, नगराध्यक्षा सौ. रंजना गांवकर, बँकेच्या प्रारंभीच्या काळातील स्थानिक समितीचे सदस्य मोहनदास खांडाळेकर, व्यापारी नितीन वाळके तसेच संचालक समीर शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक सीए. सुनिल सौदागर यांनी सर्वांचे स्वागत केले. एकनाथजी ठाकूर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन कोकणात सहकार रुजत नाही असे म्हणणा-यांना प्रामुख्याने सिधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी सारस्वत बँकेच्या उत्तुंग कामगिरीने योग्य उत्तर दिले असल्याचे सांगितले. त्यामध्ये बँकेचा पहिल्या आदर्श ग्राहक पुरस्कार मिळालेले नितीन वाळके गेली दहा वर्षे बँकेकडे ए.टी. एम. सेवेची मागणी करीत होते. त्यांच्या हस्ते नूतन इमारतीत सुरु करण्यात आलेल्या ए.टी.एम.सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँकेच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ सहाय्यककर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मोहनदास खांडाळेकर, वेंगुर्ल्याचे मनमोहन दाभोलकर, आनासाहेब महाले, मालवण व्यापारी संघाचे उमेश नेरुरकर, टोपीवाला हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष श्री.चव्हाण, श्रीपाद पंतवालावलकर आदींचा समावेश होता. २०१२ पर्यंत बँकेच्या शंभर जुन्या शाखांचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे श्री.ठाकूर यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी शाखाधिकारी राम जोशी यांनी केले. तर गोवा विभागाचे प्रमुख अनिल आंबेसकर यांनी आभार मानले.
संभवामी युगेयुगे - सावंतवाडीत
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्माण केलेल्या ‘जाणता राजा‘ या शिवाजी महाराजांवरील महानाट्याच्या धर्तीवर भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरील ‘संभवामी युगेयुगे‘ हे महानाट्य गोव्यातील केरी - फोंडा येथील विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने निर्माण केले असून ३०० हून अधिक कलाकार, हत्ती,घोडे,उंट,बैलगाड्या अशा सरंजामासह तीन ते चार तासांचे भव्य महानाट्य, भव्य मैदानावर सादर करतात. आतापर्यंत या महानाट्याचे ६६ प्रयोग झाले असून सावंतवाडी येथे ४ ते १० मे या कालावधीत पोलीस परेड मैदानावर हे महानाट्य सादर होणार आहे. त्याला जोडूनच शेतक-यांसाठी कृषि प्रदर्शन व मेळावा आयोजित केला असून खेड्यापाड्यातील लोकांना या महनाट्याचा लाभ घेता यावा यासाठी खास एस. टी. बस सेवेचे नियोजन करण्यात येणार आहे. आमदार दीपक केसरकर यांनी या महानाट्याचे संयोजन केले आहे.
म्हापणात कॉलेज
भौगोलिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणामध्ये कोकणातील प्रमाण तीन टक्के एवढे असल्प आहे ते वाढण्यासाठी कोकणात महाविद्यालयांची संख्या वाढवावी यासाठी कोकण विकास आघाडीचे केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यास अनुसरुन राज्य सरकारच्या सहकार्याने कोकणात रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात म्हापण गावी महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याने को. वि. आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी जाहीर केले आहे. देशातील उच्च शिक्षणाचे प्रमाण साडे आठ टक्के तर प्रगत म्हटल्या जाणा-या महाराष्ट्रात ते तीन टक्के आहे. कला, वाणिज्य, विज्ञान पदवी देणारी ही महाविद्यालये कुठल्याही संस्थेची असणार नाहीत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न राहतील. म्हापण येथील महाविद्यालयामुळे वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यातील गावांना त्यांचा लाभ मिळणार आहे.
खर्डेकर महाविद्यालयास कुलगुरुंची सदिच्छा भेट
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांनी खर्डेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्राचार्य सिद्धार्थ फडतरे यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. राजन वेळूकर यांचा सत्कार केला. यावेळी प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. विनायक दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. मुंबई शहर हे माझी जन्मभूमी, कर्मभूमी आहे पण कोकणभूमीत माझे ग्रामीण लोकांशी, परिसराशी नाते जवळचे आहे. ग्रामीण महाविद्यालये प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शिक्षण उपलब्ध करुन देतात. विद्यार्थी परीक्षेत, खेळ व इतर उपक्रमात प्राविण्य मिळवितात याबद्दल कुलगुरुंनी कौतुक केले. यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, विरेंद्र देसाई, कार्यालयीन अधिक्षक प्रदिप परब, वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य सी.एस. काकडे,पर्यवेक्षक,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
हिदी प्रचार सभेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा
५५ वर्षापूर्वी वेंगुर्ले शहरात स्थापन करण्यात आलेली हिदी प्रचार सभा ही स्वयंसेवी संस्था आपल्या विविध उपक्रमातून हिदी भाषेचा प्रचार व प्रसार करुन राष्ट्रीय कार्यास हातभार लावत असल्याने ही संस्था अभिनंदनास पात्र आहे. असे विचार गौड सारस्वत समाज उपसमिती वेंगुर्लाचे अध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी हिदी प्रचार सभेच्या ५५व्या वर्धापनदिनी बोलतांना व्यक्त केले. व्यासपीठावर अध्यक्ष का. हु. शेख, सचिव विद्याधर कडुलकर व श्रीमती सुशिला खानोलकर उपस्थित होते.
का.हु.शेख यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय कैवल्य पवार यांनी करुन दिला. यावेळी विविध स्पर्धांतील यशस्वी स्पर्धकांना तसेच शाळांमधून हिदी परीक्षांचे वर्ग घेणा-या हिदी शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. पुरस्काराचे वाचन सुशिला खानोलकर यांनी केले. संजय पुनाळेकर यांनी संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी दिली. सचिव विद्याधर कडुलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.