Sunday, 10 October 2010

अंक ३७ वा, ७ ऑक्टोबर २०१०



अंक ३७ वा, ऑक्टोबर २०१०

।। संपादकिय।।

गांधी जयंती निमित्ताने.....

२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंतीचा दिवस देशभरातील सरकारी -निमसरकारी कार्यालयांना सुट्टी देऊन साजरा झाला. तशी दरवर्षीच २ ऑक्टोबरला सुट्टी असते. यावर्षी दुस-या दिवशी रविवार म्हणजे हक्काची साप्ताहिक सुट्टी असल्याने सर्वांनीच हे दोन्ही दिवस मौजमजेत घालविले. योगायोगाची आणि खेदाची गोष्ट म्हणजे ज्या ब्रिटिशांनी ज्या देशावर आपली जुलमी राजवट लादली त्या ब्रिटिश साम्राज्य शाहीतून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची राष्ट्रकुल नावाचा क्रीडास्पर्धा गांधी जयंतीच्या दुस-साच

दिवशी दिल्लीत सुरु झाली आहे आणि तीही त्या ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी युवराज चार्ल्स यांच्या प्रमुख उपस्थितीत! कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा या देशाच्या क्रीडा विकासाला, आपल्या देशाच्या विजेत्या खेळांडूमुळे देशाची प्रतिमा उंचावण्याला राष्ट्रभावना जागृत करण्यास पोषक असल्या तरी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा ही ब्रिटिशांच्या गुलामगिरीची खुण आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.

हा सगळा विरोधाभास पाहून बापूजींच्या आत्म्याला काय वाटत असेल असा भाबडा प्रश्न दरवर्षी गांधी जयंतीनिमित्ताने निरनिराळ्या व्यासपीठांवरुन केल्या जाणा-या भाषणांमधून केला जात असतो. आता गांधीजींच्या मनातला किवा स्वप्नातला भारत आणि आत्ताची देशाची सामाजिक स्थिती या गोष्टी विचारात घेतल्या तर गांधीजींचा आत्मा या भारत भुतलावर असणारच नाही. आहेत त्या गांधीजींबद्दलच्या बुजुर्गांच्या आठवणी. ज्यांचे वृत्तपत्रे आणि पुस्तकांच्या माध्यमांतून त्या दिवशी प्रगटीकरण होते.

गांधीजींचे जीवनकार्य जागतिक पातळीवर मान्यता पावलेले होते. अनेक देशांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी गांधीजींच्या सनदशीर आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींचे तत्त्वज्ञान, सत्याचे प्रयोग, समाजभिमुखता, ग्रामस्वराज्य या संकल्पनांवर आजही अभ्यासपूर्ण लेखन प्रसिद्ध होत असते. जगभरातील अनेक विचारवंतांनी एक लोकोत्तर महामानव अशी उपाधी गांधीजींना दिली. पण आपल्याच देशात आपल्या विचारांचा पराभव होत असल्याचे पाहण्याची पाळी गांधीजींवर त्यांच्या हयातीतच येऊ लागली होती. ती पाळी आणली त्यांच्या अनुयायांनीच. हे कटू असले तरी विदारक सत्य आहे. वस्तुनिष्ट इतिहास लिहिणा-या अनेक इतिहासकारांनी आणि विचारवंतांनी तत्कालीन घडामोडींचे विश्लेषण करुन हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. गांधीजींची हत्या नथुराम गोडसे या माथेफिरुने एकदाच केली. पण नंतरच्या आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गांधी विचारांची हत्या करणे चालूच ठेवलेले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करा अशी सूचना गांधीजींनी केली होती. ती काँग्रेसजनांना कधी मान्य होणे शक्यच नव्हते. कारण, काँग्रेस पक्षाच्या शिडीवरुन सत्तेचे शिखर गाठता येईल हे तत्कालीन राजकारण्यांना चांगलेच माहित झाले होते. आजही त्यामध्ये काही फरक पडलेला नाही.

या काँग्रेसची भारतात स्थापना कोणी केली तर ह्युमया ब्रिटिश राजकारण्याने! त्यामागे त्याचा उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा नव्हता तर सनदशीर मार्गाने जाणारी संघटना स्थापन करुन ब्रिटिशांना तापदायक ठरलेल्या सशस्त्र क्रांतीकारक संघटनांना आवर घालता यावा हाच उद्देश होता. सुदैवाने त्या काँग्रेसची सूत्रे अत्यंत चारित्र्यवान आणि लोकोत्तर अशा भारतीय नेत्यांच्या हाती आली म्हणूनच काँग्रेस ही स्वातंत्र्य प्राप्तीचे एक साधन ठरली. त्या ह्युमने स्थापन केलेल्या काँग्रेसलाही १२५ वर्षे झाली म्हणून काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरुन काँग्रेसचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभ साजरे केले जात आहेत.

देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरी दुस-या बाजूने बहुराष्ट्रीय कंपन्यांची आर्थिक गुलामगिरी आपण स्विकारु लागलो आहोत. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीला आणि ग्रामस्वराज्य या आदर्श संकल्पनेला आपण केव्हाच मूठमाती दिली आहे आणि आपली वाटचाल नव्या गुलामगिरीकडे सुरु झालेली आहे. कशी ते प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारातूनच पहावे. गांधीजींच्या स्वदेशी आणि ग्रामस्वराज्य या दोन्ही विचारांना प्रत्यक्षात आणायचे नव्या पिढीने ठरविले तर आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोचेल. तेव्हाच आपण गांधीजींचे पुण्यस्मरण करण्यास पात्र ठरु.

।। अधोरेखित ।।

रस्ता तेथे खड्डा!

रस्त्यांची दूर्दशा हा विषय कोकणाला नवीन नाही. मुळातच डोंगराळ प्रदेशामुळे गावागावात जाणारे छोटे मोठे रस्ते उंच सखल, चढ उतारांचे आणि वळणावळणांचे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून ज्याला नाव दिलेले आहे तो मुंबई-कोकण-गोवा महामार्गही या चढउतार आणि वळणावळणांतून सुटलेला नाही. अर्थात याला कोकणाची भौगोलिक परिस्थितीही कारण आहे. परंतु असे असले तरी अशा रस्त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती होत राहणे हा एकमेव उपाय हे वळणावळणांचे रस्ते सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक आहे.

दुसरी गोष्ट नैसर्गिक. कोकण हा राज्याच्या इतर भागांपेक्षा खूप पावसाचा प्रदेश. या दिवसात नवीन काही बांधकाम करणे सोडाच पण दुरुस्तीही करणे अवघड बनते. घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळून रस्ता बंद होणे हे नित्याचेच झाले आहे. यावर्षी आंबोली घाटात मोठ्या दरडी कोसळल्यामुळे अनेक दिवस वाहतुक बंद राहिली. या दरडींचाही धोका अद्याप टळलेला नाही. इतर सर्व घाटांप्रमाणेच आंबोली घाटही वळणावळणांचा, एका बाजूला खोल दरी तर दुस-या बाजूला उंच डोंगर असा आहे. या डोंगरावरील दगड ठिसूळ बनत चालला आहे. असे मोठमोठे दगड मातीसहित खाली रस्त्यावर येऊन पडतात. आंबोली घाटाचा डोंगराकडील भाग बराचसा धोकादायक झालेला आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता काढण्याचे काम आता सुरु झाले आहे. अर्थात ते प्रत्यक्षात सुरु होऊन पूर्ण व्हायलाही किमान दहा वर्षे लागतील. तोपर्यंत प्रत्येक पावसात व नंतरही लोकांना नशिबावर हवाला ठेवून या रस्त्याने प्रवास करीत रहावे लागणार आहे.

पावसाच्या या नैसर्गिक कारणामुळे घाटरस्त्यांची दुर्दशा होतच असते. पण महामार्गापासून गावागावात पोचलेल्या रस्त्यांचीही बरीचशी दुर्दशा झालेली आहे. निरनिराळ्या योजनांतून सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम खाते ग्रामीण-शहरी भागातील रस्त्यांची कामे करीत असते. त्या कामांसाठी मंजूर असलेला निधी काम पूर्ण होण्यास पुरेसा असतो. पण त्या निधीमध्ये संबंधीत खात्यांचे अधिकारी आणि गावापासून तालुक्यापर्यंतचे काही लोकप्रतिनिधी वाटेकरी असतात. ती कामे घेणारे ठेकेदार संबंधितांचे ठरलेले वाटे घालून पुन्हा आपला नफाही काढत असतात. मग प्रत्यक्षात या रस्त्यावर निधी खर्च होणार किती? आणि कामाचा दर्जा काय राहणार? मंजूर रक्कम सर्वच्या सर्व या रस्त्यांच्या कामासाठी खर्च होऊच शकत नसल्याने जेमतेम पावसाळ्यापर्यंत टिकेल, बरे दिसेल असे रस्त्याचे काम केले जाते. ते कसे हे संबंधितांना चांगलेच माहित असते. हा रस्ता मग पहिल्याच पावसाळ्यात उखडू लागतो. अवजड वाहतुक खूप असेल तर रस्त्याला भलेमोठे खड्डे पडतात किवा वरचे डांबरीकरण वाहून जाते. अगदी ग्रामीण भागातच हे घडते असे नाही तर राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गातही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. बरेच रस्ते उखडले आहेत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. याच रस्त्याने मंत्री, अधिकारी व अन्य नेते मोटारीतून प्रवास करीत असतात. पण कोणीच रस्त्यांच्या या स्थितीची दखल घेताना दिसत नाहीत. या खड्ड्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही घडले. अनेकांना त्यात जीव गमवावा लागला तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले. असे झाले की स्थानिक लोक ओरड करतात. वृत्तपत्रातून बातम्या अगदी फोटोसह प्रसिद्ध होतात. पण पुढे सर्व शांत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची ही परिस्थिती आहे.

कोकणातील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती विचारात घेऊन मुख्यतः रस्ते विकासाच्या कामांसाठी वेगळे निकष लावून अधिक निधी सरकार देईल अशा घोषणा गेली कित्येक वर्षे होत आहेत. परंतु ती घोषणा प्रत्यक्ष अंमलात आल्याचे, नव्या निकषांप्रमाणे अधिक निधी मिळाल्याचे कोणीच कधी जाहीर करीत नाही. कदाचित यातही काही गोलमाल असावी.

रस्त्यांमधले खड्डे ही गोष्ट अतीच झाल्यामुळे विद्यमान सत्ताधा-यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधातले राजकीय पक्षही आता जागे झाले आहेत. त्यांनी रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम जाहीरपणे करुन सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला आहे. यामुळे रस्त्यांमध्ये अपेक्षित सुधारणा होईल तेव्हा होईल, पण या प्रश्नाकडे सरकारचेच नव्हे तर एरवीही उदासीन असणा-या करदात्या जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.

सध्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही पक्षांत विविध कारणांनी जुंपली आहे. अर्थात ही भांडणे विकासाच्या मुद्द्यावरुन नव्हेत तर लाभाची पदे (मंत्रीपद, महामंडळाचे अध्यक्षपद वगैरे) यासाठी. तसेच श्रेयवादावरुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जाहीरपणे वादविवाद सुरु आहेत. सिधुदुर्ग जिल्ह्यातील याचे ठळक उदाहरण म्हणजे कोकण रेल्वेचे टर्मिनस. ते सावंतवाडी रोडला व्हावे की मडुरे येथे यावरुन दोन्ही पक्षांचे तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवरील कार्यकर्ते बाह्या सरसावून उभे आहेत.

रस्त्यावरील खड्डे हा विषय खरे तर सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात वादाचा असला पाहिजे. तसा तो आहेही. पण आता मुंबई-कोकण-गोवा महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचे जाहीर कार्यक्रम करुन राष्ट्रीवादीनेही नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाविरुद्ध आघाडी उघडून घरचा अहेर दिला आहे.

आता रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारे समजा कधी सत्तेवर आले तर त्यावेळी असाच रस्ता खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आज सत्ताधारी असलेले काँग्रेस आघाडीतील कार्यकर्ते हाती घेतील. एकूण काय तर रस्ते आहेत तेथे खड्डे हे राहणारच!

-श्रीधर मराठे

।। सण आणि उत्सव ।।

अश्विन मास

नऊ दिवस व्रत करुन upavaa करुन स्वतःवर आधी विजय मिळवायचा व दहाव्या दिवशी सीमा ओलांडून पराक्रम करायला बाहेर पडायचे आणि सीमेबाहेर असलेल्या शत्रूंशी युद्ध करुन मुबलक संपत्ती गोळा करायची, समृद्धी आणायची याला म्हणतात दसरा. विजयादशमी. ह्या नऊ दिवसांचा प्रारंभ होतो आश्विन शुद्ध प्रतिपदेला. युद्धावरुन परत आल्यावर सर्व संपत्तीची पूजा करुन ती आप्त स्वकीयांमध्ये वाटून टाकायची. याला म्हणायचे दिवाळी. आज दसरा व दिवाळीचा सण म्हणजे केवळ आनंदोत्सव मजाच मजा असते.

गणपतीचा सण संपला की, म्हाळवस सुरु होतो. म्हणजे पितृपक्ष सुरु होतो. पितरांच्या स्मृती जागृत करताना, गावामध्ये तर वाडीतील सर्व माणसांना जेवयाला बोलावले जाते. सर्वसाधारणपणे खीर व उडीद तांदुळाचे तळलेले वडे हा मेनू असतो. हे पचायला चांगलेच जड जेवण मात्र वातावरणाच्या परिणामामुळे सहज पचून जाते.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र. नवरात्रामध्ये देवीसमोर अखंड नंदादीप म्हणजे तेलाचा दिवा लावलेला असतो. पेटता दिवा हे समृद्धीचे प्रतिक आहे. त्यापासून प्रसन्नता मिळते. शांतीची अनुभूती येते. दिवा हे तेजाचे प्रतिक आहे. अग्निपेक्षा शुद्ध काहीही नाही. अग्निमध्ये जे जाते ते शुद्ध होऊनच येते. या ज्योतीकडे पाहून अशी प्रार्थना केली जाते की, ‘माझ्या मनातील वाईट विचार या अग्नित जळून भस्म होऊ देत. माझं मन शुद्ध होऊ दे.‘ ‘शुभं करोती कल्याणम्, आरोग्यम् धन संपदाया ओळीत धनाबरोबरच आरोग्याची प्राप्ती दडलेली आहे. कोणीतरी अनुभव घेतल्याशिवाय या श्लोकांची निर्मिती केलीच नसणार, याचा अर्थ दिवा लावल्यामुळे आयुष्यात वाढ नक्की होत असली पाहिजे, ती कशी होत असेल ते आपण शोधले पाहिजे.

नवरात्रात नऊ दिवस देवासमोर सात प्रकारच्या धान्याचे रुजवण घालतात. म्हणजे घटस्थापनेला परातीमध्ये माती घेऊन त्यात हळदीचे पाणी टाकून सात प्रकारची धान्ये त्यात पेरली जातात. नऊ दिवस त्यांना रोज हळदीचे पाणी घातले जाते. नऊ दिवसांची वाढलेली ही रोपे दस-याच्या दिवशी देवाला वाहिली जातात किवा सुहासिनींना डोक्यात माळण्याकरिता वाटली जातात. केवळ एवढाच याचा अर्थ नाही. आज गव्हांकुर या औषधीला कॅन्सरसारख्या आजारात अतिशय छान गुण येत आहेत. केवळ गव्हाचेच नव्हे तर उपलब्ध सर्व कडधान्याचे पूर्ण वाढ झालेले अंकुर पोषणाचे उत्तम काम करतात. देवासमोरील हे रुजवण प्रसाद म्हणून भक्षण केले जावे किवा त्याचे तीर्थ करुन प्यावे म्हणजे नवरात्रीला पूर्णअर्थ प्राप्त होईल.

दस-याच्या दिवशी शमी तसेच आपटा या वनस्पतीचे पूजन, खंडे नवमीला शस्त्र पूजन केले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वांचार्यांनी वनस्पतींमध्ये देव शोधला व त्याचे पूजन केले. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेअसा अभंग लिहून वनस्पतींची किर्ती अजरामर केली आहे. वड, दुर्वा, बेल, तुळस, कडुनिब, शमी इ. कितीतरी वनस्पती पूजेकरिता वापरल्या जातात. एक तर वनस्पतींचे पूजन तरी केले जाते किवा वनस्पतींचा वापर देवतांच्या पूजनाकरिता केला जातो. जे देवाला ते देहालाहा नियम लावून पाहिल्यास प्रत्येक वनस्पतीचा औषधी गुण सणाच्या निमित्ताने चर्चेला यावा. पुढील पिढीला त्याची योग्य ओळख व्हावी हा त्या पूजनामागील हेतू आहे. अखंड वडाच्या झाडाच्या पूजनाऐवजी वडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करायला कोणत्याही धार्मिक ग्रंथात सांगितलेले नाही. हे मुद्दाम या ठिकाणी सांगावेसे वाटते.

दस-याच्या निमित्ताने सीमोल्लंघन केले जाते ते वाईट विचारांचे असावे. शरीरातून वाईट विचारांना हद्दपार करणे म्हणजे सीमोल्लंघन होय. काम, क्रोध, भय, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना मनातून योग्य वेळी बाहेर काढायला शिकले पाहिजे. निदान त्यांच्यावर नियंत्रण असलेच पाहिजे. आज तरुण वर्गाचा विचार केला तर त्यांचा राग कायम डोक्यातच असतो. तळपायाची आग मस्तकात पोचली असे त्यांना कधीच म्हणता येणार नाही. कारण ती आग त्यांच्या तळपायात कधी असतच नाही. नेहमी डोक्यातच असते.

शरद ऋतुतील आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या ऋतूत वातावरण पित्त वाढविणारे असते. चंद्रप्रकाशात पसरुन ठेवलेले व आटवलेले दूध, ज्यामध्ये वेलची, जायफळ, केशर, साखर इ. सुगंधीत पदार्थ घातलेले असतात, मनाला प्रिय असलेले नातेवाईक, मित्रमंडळी बरोबर असतात, एखाद्या तलावाच्या काठी किवा नदीच्या किनारी सर्वजण बसून हास्यविनोद, गायन, वादन, नृत्य आदि करमणूक करीत असतात. ही सिच्युएशनपित्त प्रकोप कमी करणारी असते. सणाच्या निमित्ताने आपल्याकडून आरोग्य पालन करुन घेतले जाते. ते असे-

याच दिवशी मोठ्या मुलाला आईकडून ओवाळले जाते. नातेसंबंध जोपासले जाणे एवढा सामाजिक दृष्टिकोन यातून जपला जातो. आज वृद्धाश्रम संस्कृती सगळीकडे फोफावते आहे हे चांगले लक्षण नाही. चांगल्या नातेसंबंधांची वाट लागल्याने वृद्धाश्रमांची गरज वाटू लागली आहे. जेव्हा मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले हे वृद्धाश्रम वृद्धांच्या अभावी बंद पडतील तेव्हा समाज सुधारला असे ख-या अर्थाने म्हणता येईल. हे नातेसंबंध टिकविण्यासाठी सणांच्या माध्यमातून हे भावसंबंध वेगळ्या भावनिक पातळीवर घट्ट केले जातात. म्हणून तर दरवर्षी भाऊबीज, पाडवा असे सण साधून ओवाळणी करुन पवित्र अश्या दिव्याच्या साक्षीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

-वैद्य सुविनय दामले,

कुडाळ, भ्रमणध्वनी- ९४२११४७४२०

।। विशेष बातम्या ।।

झेंडामार्च

काँग्रेसला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेसतर्फे ग्राम ते सेवाग्राम उपक्रमांतर्गत झेंडामार्चचा शुभारंभ २९ सप्टेंबरला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. शिरोडा-मीठागर येथून वेंगुर्ले - कुडाळ मार्गे विदर्भातील वर्घा जिल्ह्यातल्या विनोबाजींच्या ज्या सेवाग्राममध्ये म. गांधींचे वास्तव्य झाले. तेथपर्यंत काँग्रेसचा झेंडा नेण्याचा हा अभिनव उपक्रम घेण्यात आला होता. सुरुवातीस वेंगुर्ले येथे खर्डेकर कॉलेज ते साई मंगल कार्यालयामार्फत रॅली काढण्यात आली.

या समारंभात काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दिवंगत कु. राणी वैभवी आंगचेकर आणि कु. राज वैभव आंगचेकर यांच्या स्मरणार्थ श्री. ज्ञानेश्वर आंगचेकर व कुटुंबियांतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेचा विषय होता असा आहे काँग्रेस पक्षयातील विजेते पुढीलप्रमाणे १) हेमंत पाटकर (कणकवली), २) भक्ती बल्लाळ (कुडाळ), ३) रेश्मा मेस्त्री (देवगड), उत्तेजनार्थ - तेजस्विनी जाधव व सुप्रिया गावडे (कणकवली)

भंडारी पतपेढीच्या चेअरमनपदी श्रीकृष्ण पेडणेकर

सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्लेच्या चेअरमनपदी श्रीकृष्ण दत्ताराम पेडणेकर, तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश गडेकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या व्हाईस चेअरमन अॅड.चारुशिला तांबोसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक रमेश नार्वेकर, नंदन वेंगुर्लेकर, जगन्नाथ डोंगरे, अनिल कासकर, सारिका काळसेकर, रमण दाभोलकर, नीलेश चमणकर, शंकर केरकर तसेच कर्मचारी चित्रा दाभोलकर, दीपाली सापळे, हेमंत साळगांवकर आदी उपस्थित होते.

पंडीत वसंतराव गाडगीळ आणि सहाध्यायी यांचा सत्कार कार्यक्रम

वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलमधील पन्नास वर्षापूर्वीचा अकरावीचा वर्ग. या वर्गातील वेंगुर्ल्यातील वर्ग मित्रांचा एकत्र येण्याचा योग एका अनोख्या कार्यक्रमामुळे आला. पुण्यातील प्रसिद्ध संस्कृत पंडीत व या वर्गातील माजी विद्यार्थी पंडीत वसंतराव गाडगीळ यांच्या वेंगुर्ला भेटी निमित्त सर्व सहाध्यायी एकत्र आले होते. पंडीत गाडगीळ यांचेसह श्री. आत्माराम नाईक व श्री. बबन गावसकर यांच्या वयाची ऐशी वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्याचे प्रसिद्ध पंडीत पांडे शास्त्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सर्वांतर्फे सत्कार करण्यांत आला. श्री. शशिकांत कर्पे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास श्री. मनमोहन दाभोलकर, श्री. गजानन राजाध्यक्ष, श्री. जनार्दन चौकेकर हे सहाध्यायी आणि सौ. गाडगीळ, सौ. पांडे हजर होत्या. याप्रसंगी सर्वांनी सत्कारमूर्तींचा गौरव करुन त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी दशेतील अनेक सुखद आठवणींना या निमित्त उजाळा मिळाला आणि उपस्थीतांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

।। नवरात्रौत्सव ।।

श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले

प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात दि. ८ ऑक्टोबर २०१० ते १७ ऑक्टोबर २०१० पर्यंत नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रोज संध्या. ५ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत अभंग, भक्तिगीत गायन,संगित,वारकरी, भजन, आरती. दि.१५ रोजी रात्रौ ११ वा. दिडी प्रदक्षिणा, दि. १६ रोजी सकाळी १० वा. नवचंण्डी होमहवन व पूर्णाहूती उत्सवाची सांगता.

श्री देवी सातेरी मंदिरातील नवरात्र महोत्सव पारंपारिक पद्धतीने केला जातो. सिधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी मंडळांचा बहारदार भजनांचा कार्यक्रम हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानिमित्त प्रतिदिनी श्री देवीच्या नऊ रुपांचे दर्शन, आकर्षक, सजावट, पुष्पपुजा, संपूर्ण मंदिरास विद्युत रोषणाई अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तजनांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

मातोश्री कला क्रिडा मंडळ नवरात्रौत्सव

मातोश्री कला-क्रिडा मंडळ आयोजित नवरात्रौत्सव समिती अध्यक्षपदी सचिन शेटये तर उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद आजगांवकर यांची निवड झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दि. ८ ते दि.१७ ऑक्टोबर २०१० या कालावधीत मातोश्री कला-क्रीडा मंडळच्यावतीने दाभोली नाका, वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रौत्स-वाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम खालिलप्रमाणे -

दि. ८ रोजी श्री देवी दुर्गामातेचे पूजन, रात्रौ ८ वा. सुधीर कलिगण यांच्या कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळाचा सदाबहार नाट्यप्रयोग, दि. ९ रोजी ७ ते ८ रेकॉर्ड डान्स, रात्रौ ८ ते १० वेशभूषा स्पर्धा (वयोगट ३ ते ७ आणि ८ ते १५), दि. १० रोजी ७ ते ८ रेकॉर्ड डान्स, रात्रौ ८ वा. ओमकार दशावतार नाट्यमंडळ, उभादांडा यांचा नाट्यप्रयोग., दि. ११ रोजी रात्रौ ८ वा. जादूगार अवधूतयांचे जादूचे प्रयोग, (सुपरहिट-मॅजिक शो), दि. १२ रोजी रात्रौ ८ ते १० सरस्वती संगीत विद्यालय निर्मित लहान मुलांची संगीत रजनी स्वरपूजा‘ (संयोजक -सौ.अनघा गोगटे), दि. १३ व गुरुवार दि. १४ रोजी रात्रौ ७ ते १० दांडीया स्पर्धा, दि. १५ रोजी रात्रौ ८ वा. ऑर्केस्ट्रा झंकार‘ (सुतार बंधू, कोल्हापूर), दि.१६ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, रात्रौ ७ ते ८ विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण व मान्यवरांचा सत्कार, रात्रौ ८ वा. गौतमेश्वर प्रासादिक नाट्यमंडळाचा अर्धी मस्ती अर्धा ढाँगहा तीन अंकी नाट्यप्रयोग, दि. १७ रोजी संध्या. ५ वा. श्री देवी दुर्गामातेची विसर्जन. रोज रात्रौ ६ ते ७ भजन तसेच विविध दांडीया ग्रुपचा दांडीया व गरबा नृत्य होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री कला क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कॅम्प - कॉर्नर मित्र मंडळ

प्रतिवर्षाप्रमाणे कॅम्प कॉर्नर मित्रमंडळातर्फे श्री दुर्गा मातेचे पूजन व नवरात्रौत्सव दि. ८ ते १७ ऑक्टोबरपर्यंत संपन्न होणार आहे. त्यानिमित्त ६ ते ९ भजन,९ ते १० दांडिया तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कॅम्प कॉर्नर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

तांबळेश्वर मित्र मंडळ

तांबळेश्वर मित्रमंडळातर्फे गाडीअड्डा येथे श्री दुर्गामातेचे पूजन व नवरात्रौत्सव दि. ८ ते १७ ऑक्टोबरपर्यंत संपन्न होणार आहे. त्यानिमित्त भजन, दांडिया तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.

भटवाडी येथे शतकोत्तर शारदोत्सव

वेंगुर्ले-भटवाडी येथील सांदेकर बालमंडळातर्फे साजरा होणारा सार्वजनिक शारदोत्सवाचे हे १०० वे वर्ष असून या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.१७ ते २३ ऑक्टोबर २०१० या कालावधीत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ रोजी सरस्वती पूजन, दि.१८ रोजी सायं.६ वा. ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार, दि. १९ रोजी सकाळी ८ वा. चित्रकला स्पर्धा, सायं. ६ वा. लग्नास २५ वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सत्कार, दि.२० रोजी श्रीसत्यनारायण महापूजा, सायं. ४ पासून तीर्थप्रसाद, सायं.६वा.स्वरपूजा-सरस्वती संगीत विद्यालय, वेंगुर्ले यांच्या छोट्या मुलांचा गायनाचा कार्यक्रम, दि. २१ रोजी सायं. ४ वा. महिलांसाठी पाककला स्पर्धा, सायं. ६ वा. सत्कार सोहळा-उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सायं.७वा. जिल्हा-स्तरीय नृत्य स्पर्धा, दि. २२ रोजी सायं. ६ वा. वेशभूषा स्पर्धा, सायं. ७ वा. कला-क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणार्‍या मुलांचा सत्कार, दि. २३ रोजी रात्रौ ९ वा. सरस्वती विसर्जन. तसेच कार्यक्रम कालावधीत रोज रात्रौ ८ वा. भजन तसेच दांडीया कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमांचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सांदेकर बालमंडळातर्फे करण्यात आले आहे.

।। ठेवणितला लोणचा ।।

ह्येंचो कौल कधी फेल नाय!

‘‘काय गो सोमन्या, तुजो घरवालो म्हणजे एकदम भारी हा!‘‘

‘‘व्हय तर! खयल्या गावकाराचो कौल देवी लावन घ्येना नाय, पण ह्येंचो खयलोव कौल ताबडतोब घ्येता. म्हणान तर सोमवार, गुरुवाराक आमच्याकडे हीऽऽ गर्दी आसता.‘‘

‘‘अगो तांच म्हणतय, तुज्याच घोवाचा कसा काय आयकता देवी? योक कौल घ्येवक नाय म्हटला तरी दोन-चार तास जातत. कधी कधी तर इरड मोडता. पण तुजो घोव धा-बारा मिन्टात दोघा-तिघांचे कौल लावन मोकळो. नाय म्हटला तरी सोमवार आणि गुरुवारचे शंबरेक नारळ लागी जातत आणि वरसून कोन काय दितत तां निराळाच!‘‘

‘‘व्हय बाये, लॉक दितत खुशीन. त्येंचा काम पटकन व्हता नाय? शेवटी आमचे ह्ये पण गावकारणीकच जलामलेहत मा! ह्येंचो कौल पण लॉक मानतत.‘‘

‘‘अगो पन तुजो घरवालो एकदम सादो, त्येचाच देवी कसा काय आयकता?‘‘

‘‘कोणाक तू सांगाचस नाय तर तुका सांगतय.‘‘

‘‘अगो मी कित्याक सांगा? सांग बघुया काय ता?‘‘

‘‘अगो, माज्या आयेन ह्येंका कौल कसो लावचो ता सांगल्यान.‘‘

‘‘काय सांगतहस काय? कसो गो?‘‘

‘‘अगो झाड तोडूचा आसा तर ता तोडूचा काय नको असो कौल मागायचो नाय, तर झाड मुळातसून तोडूचा तर उजवो दी आनि एक फूट सोडून तोडूचा तर डावो दी, असो देवीकडे कौल मागायचो. शेवटी देवी खयलोतरी कौल दितलीच आणि खयलोक कौल दिल्यान तरी तो घेणा-याच्या फायद्याचोच आसतलो.‘‘

‘‘अगो झोळग्या, म्हणजे तुमी लोकांका बनयताहास मगो!‘‘

‘‘अगो लागो-या, तू माका काय शिकयतस? अगो कौल आपल्या मनाचो घ्येवचो आसता. जी मानसा कौल घ्येवक येतत ती ब-या मनाची थोडीच आसतत? म्हणान तर आमचे ह्ये माज्या आवशीन दिललो सल्लो वापरतहत. थयसून आमका बरे दिवस इलेहत!‘‘

Saturday, 9 October 2010

अंक ३५वा, २३ सप्टेंबर २०१०

किरात साप्ताहिक

संपादकिय

पर्यटन महामंडळाचे खाजगीकरण

२७ सप्टेबरला जागतिक पर्यटन दिन. या निमित्ताने सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणा-या व करु इच्छिणा-यांची एक सभा सिधुदुर्गनगरीत होणार आहे. अनेकजण या सभेत आपले विचार मांडतील. पर्यटन जिल्हा होऊन एक तप उलटले तरी सिधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही पायाभूत सोयींचा अभाव का? हा प्रत्येक वर्षी सरकारला विचारला जाणारा प्रश्न याहीवेळी विचारला जाईल. त्यावर सरकारचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर ते यातील आपल्या अडचणी तरी सांगतील किवा काही थातुर-मातूर आश्वासने देतील. प्रत्यक्षात काहीच होणार नाही.

सिंधुदुर्गची तुलना नजिकच्या गोवा राज्याशी केली जाते. परंतू गोवा हे राज्य स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांची वसाहत होती. हिंदू संस्कृतीच्या अंगभूत सामर्थ्यामुळे गोव्यात हिदू संस्कृती टिकून राहिली तरी ख्रिश्चन धर्मियांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होता व अजूनही आहे. पूर्वी पोर्तुगीजांची वसाहत असल्यामुळे गोव्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पूर्वीपासूनच होता आणि जागतीक पर्यटन नकाशावर गोव्याला पूर्वीपासून स्थान होते.

गोवा भारतात विलीन झाल्यावर तेथील संस्कृती, जीवनशैली (म्हणजे पाश्चात्य) जपली जाईल असे आश्वासन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी तेव्हा दिले होते. स्वतः जवाहरलाल पाश्चात जीवनशैली अंगिकारलेले, त्यामुळे त्यांचे आश्वासन म्हणजे आज्ञाच होती. परंतू त्यामुळेच महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष बहुमताने सत्तेवर येऊनही जनतेच्या सार्वमतात गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही. केंद्रशासित प्रदेश राहिला आणि नंतर त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. असो-हे थोडे विषयांतर झाले.

मुख्य मुद्दा पर्यटनामुळे विकसित झालेल्या गोव्याप्रमाणे पर्यटन प्रवण सिधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होईल काय? होकारार्थी उत्तर देणारे म्हणतील गोवा आणि सिंधुदुर्ग सख्खे शेजारी आहेत. गर्दीच्या हंगामात गोव्यात रहायला जागा मिळत नाही म्हणून, किनारे अस्वच्छ म्हणून किवा शहरी गजबजाटापासून दूर रहावे म्हणून गोव्यात येणारे देशी-विदेशी पर्यटक सिधुदुर्गातही मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. दोन्हीकडे भरपूर वनराई आणि सुंदर किनारपट्टी आहे. उघडपणे बाटलीची आणि छुपेपणाने बाईचीही सोय दोन्ही ठिकाणी आहे. पण ही काही मोजकी साम्य सोडली तर गोवा आणि सिधुदुर्गाच्या पर्यटन विकास प्रक्रियेत फार मोठे अंतर आहे आणि ते बरेचसे सरकारी नाकर्तेपणामुळे निर्माण झालेले आहे.

हा सरकारी नाकर्तेपणा कधी संपणारा नाही. तेव्हा केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे अनेक सरकारी उद्योगांचे जसे खाजगीकरण झाले. तसे पर्यटन महामंडळाचेही खाजगीकरण झाले पाहिजे. नाहीतरी पर्यटन महामंडळ हे एक मर्यादित क्षेत्र आहे. वर्दळीच्या पर्यटन क्षेत्रीच ते थोडेफार नफ्यात असते. अन्यत्र तोटाच तोटा! अधिकारी आणि कर्मचा-यांचे पगार मात्र चालूच. - आता वेतनवाढ आयोगामुळे ते फायद्यातच! - पर्यटन महामंडळ आणि खाजगी पर्यटन सेवा यांच्या दरात फारशी तफावत नाही. उलट खाजगीकरणामुळे खाजगी सेवेत स्पर्धा वाढून सर्वसामान्य जनतेला परवडणा-या दरात पर्यटन करता येईल ही शक्यताच जास्त.

पर्यटन व्यावसायीकांना पर्यटन महामंडळ हे एक असून अडचण आणि नसून खोळंबा ठरलेले आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या या पर्यटन महामंडळाचा मक्ता एखाद्या पर्यटन क्षेत्रातील अनुभवी उद्योग समुहाकडे दिला तर त्याच्या माध्यमातून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा (उत्तम रस्ते,पाणी,वीज इ.) जलदगतीने आणि दर्जेदार होतील. पर्यटन व्यवसायासाठी विविध प्रकारचे परवाने, सवलती संबंधीत व्यावसायीकांना विनाविलंब मिळतील. मोठ्या हॉटेल्स बरोबरच छोट्या प्रमाणावर निवास, न्याहारी योजना राबविणा-या व अन्य प्रकारच्या सेवा देणा-यांना रोजगार मिळेल. तेव्हा सिधुदुर्गचा पर्यटन विकास घडवू पाहणा-यांनी पर्यटन महामंडळाचा हा अडथळा दूर करण्यास प्राधान्य द्यावे यासाठी लोकप्रतिनिधींचेही सहाय्य घ्यावे हे झाले. तरच आपला पर्यटन सिधुदुर्ग जिल्हा गोव्याप्रमाणे जागतिक नकाशावर येऊ शकेल.

अधोरेखित

अजुनही गावकुसाबाहेर

गेली ३० वर्षे कातकरी (वानरमारे) समाजातील दहा ते बारा कुटुंबे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-खरी भागात राहत आहेत बरीच वर्षे एकाच ठिकाणी राहत असूनही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा ही कुटुंबे आजही पूर्ण करु शकत नाहीत. गेली ३ वर्षे सातत्याने या वस्तीवर गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो. पण यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. आपली समाजव्यवस्थाही त्यांच्या पुढच्या पिढीला मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला तयार नाही हे जळजळीत वास्तव एका घटनेने पुढं आलंय.

कातकरी समाजाची मुले शिक्षणापासून वंचित

जून २०१० मध्ये केंद्राचा सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा कायदा आला. या वस्तीवर १५ ते १६ शिकण्याचं वय असलेली मुले आहेत. त्यांना शिक्षणाची सक्ती करणे तर सोडाच पण शाळेत जाण्याची इच्छा असलेल्या या मुलांना मुख्याध्यापकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे. शाळेत जात नसल्याने पोषण आहार मिळत नाही. बहुसंख्य मुले कुपोषणग्रस्त आहेत.

मुलांना प्रवेश देण्यास तांत्रिक अडचणी

आरोंदा-तळवणे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुलं जात होती. मुलांना शाळेची ओळख होण्याअगोदर मुलांना नीट नावेही सांगता येत नाहीत, पालक शाळेत येत नाहीत. तळवणेपेक्षाही गुळदुवे शाळा जवळची आहे. त्यामुळे मुलांनी त्या शाळेत जावे असा सल्ला मुख्याध्यापकांनी दिल्याने मुलांची शाळा सुटली ती कायमचीच. हाता-पायाच्या काड्या आणि पोटाचे नगारे झालेली आणि अर्धवट कपड्यांमध्ये भटकणारी मुलं हक्काचं शिक्षण मागतायत. परंतु निर्ढावलेली लाल फितीतली प्रशासन यंत्रणा त्यांना माणसासारखे जगणेही नाकारत आहे.

ना रेशन ना घर

या वस्तीतल्या कुटुंबांची व्यथाही या मुलांपेक्षा वेगळी नाही. मोलमजुरी आणि वनौषधी गोळा करुन कसेबसे दिवस ढकलणा-या या लोकांची नावे अद्याप दारिद्र्यरेषेखाली नाहीत त्यामुळे रेशनकार्डावरील सरकारी सोयी-सवलतींचा लाभ घेता येत नाही. डोक्यावर स्थिर छप्पर मिळणं तर फारच लांबची गोष्ट.

पणशीकर गुरुजी, अभिनव फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष ओंकार तुळसुलकर, सचिव हेमंत मराठे समाजातील समविचारी लोकांसमवेत या समाजातील लोकांना काही प्रामाणात मदत करीत आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी कातकारी समाजाच्या मुलांना हव्या त्या शाळेत प्रवेश देवू असे आश्वासन दिले आहे. सावंतवाडीच्या तहसिलदारांनी पिवळ्या शिधापत्रिका देवू आणि शिक्षण, आरोग्याचा प्रश्न सोडवू असे सांगितले आहे.

गरज समाजाने स्विकारण्याची

कातकरी (वानरमारे) समाजाच्या प्राथमिक गरजा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुटतीलही. पण इथेच हा प्रश्न थांबणार नाही. ज्योतिबा फुलेंनी सर्वांसाठी खुली केलेली शिक्षण व्यवस्था आज या मुलांना शिक्षण नाकारते आहे. ही बाब आपण फारच लाईटलीघेत आहोत. संबंधीत अधिकारीही साचेबद्ध उत्तरे देत आहेत. कुणाकडेच याचे ठोस उत्तर नाही. वर्षानुवर्षे भटके जीवन जगल्यामुळे ही मुले अस्वच्छ रहातही असतील, त्यांची आकलन क्षमताही कमी असेल, पण हे समजून घेऊन किवा असं गृहीत धरुनच समाजाने त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन मुख्य प्रवाहात स्विकारणे आवश्यक आहे.

दोन वर्षांपूर्वी सा. किरातने वानरमारे-कातकरी समाजातील लोकांची समस्या मांडली होती. वेंगुर्ले तालुक्यातील काही मुले शालेय शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत. पण एकूण जिल्ह्याचा विचार करता हा समाज विकासाच्या प्रवाहात सामील झालेला नाही. यामध्ये त्यांचे प्रतिनिधीत्व राजकीय व्यासपीठावर करणा-या व्यक्तीही जबाबदार आहेत. या समाजातील लोकांमध्ये असलेली व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, राहणीमानाचे दारिद्र्य यासाठी समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. या गोष्टीसाठी पुढारलेला समाज जरुर ती आर्थिक मदत करीलही. पण खरी गरज आहे ती सरकारी लालफितीच्या कारभारातून त्यांचे प्रश्न सुटण्याची.

-अॅड. शशांक मराठे

बातम्या

उद्बोधक व्याख्यानसत्र

राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांचे पुतणे, सुप्रसिद्ध वक्ते, प्रवचनकार आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे श्री. मोहनराव कुलकर्णी हे त्यांचे गुरुबंधू प्रसिद्ध उद्योजक श्री.दादासाहेब परुळकर यांच्या खास निमंत्रणावरुन वेंगुर्ले - मालवण भेटीसाठी आले होते. त्यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचा लाभ वेंगुर्ले तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन युवकांना व्हावा यासाठी वेंगुर्ले येथे खर्डेकर महाविद्यालय, न्यू इंग्लीश स्कूल उभादांडा, तुळस येथील शिवाजी हायस्कूल, मालवण येथील भंडारी, हायस्कूल आणि वेंगुर्ल्याचे रामेश्वर मंदिर या ठिकाणी श्री. दादासाहेबांनी श्री.मोहनराव कुलकर्णी आणि दादासाहेबांच्या समवेत आलेले मालवण भंडारी हायस्कूल संस्थेचे पदाधिकारी आणि उद्योग, व्यवसाय स्पर्धा परीक्षा यांबाबत प्रभावी मार्गदर्शन करणारे श्री. विजय पाटकर यांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

५ सप्टेंबरला श्री देव रामेश्वर मंदिरात रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे झालेल्या व्याख्यानात श्री.मोहनराव कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता या विषयावर बोलतांना त्यांची जाज्वल्य देशभक्ती,द्रष्टेपण,त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांचे वर्णन केले. प्रारंभी देवस्थान ट्रस्टचे श्री.दाजी परब यांनी स्वागत केले. श्रीधर मराठे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. ट्रस्टतर्फे कुलकर्णी व पाटकर यांचा सत्कार करण्यात आला.

७ सप्टेबरला खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानामध्ये श्री. विजय पाटकर यांनी पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या नोकरी-व्यवसाय संधी आहेत. याविषयी मार्गदर्शन करतांना स्पर्धा, परीक्षा, मुलाखती यामध्ये कसे यशस्वी व्हावे, याविषयी महत्त्वाच्या टीप्सदिल्या. श्री. मोहनराव कुलकर्णी यांनी सापांविषयी समज, गैरसमज याविषयावर विनोदी ढंगदार शैलीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्र.प्राचार्य प्रदीप होडावडेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

शिवाजी हायस्कूल, तुळस आणि न्यू इंग्लीश स्कूल उभादांडा या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी श्री. विजय पाटकर आणि मोहनराव कुलकर्णी यांनी उद्बोधक मार्गदर्शन केले. तसेच मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्येही उभय वक्त्यांची व्याख्याने झाली.

न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संस्थेतर्फे दादासाहेब परुळकर यांचा सत्कार

मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर २०१० रोजी वेंगुर्ले रत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक दादासाहेब परुळकर यांचा सत्कार सोहळा न्यू एज्युकेशन सोसायटी, उभादांडा संस्थेतर्फे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्था खजिनदार विलास मेस्त्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन दीनानाथ वेर्णेकर, अधिक्षक देवेंद्र गिरप हे उपस्थित होते.

लोहार सर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दीनानाथ वेर्णेकर यांनी स्वागत केले. सुप्रसिद्ध वक्ते आणि राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांचे पुतणे, दादासाहेबांचे गुरुबंधू मोहनराव कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरांचे पसायदान या विषयावर तर विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांच्या समोरील आजची आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोहनराव कुलकर्णी व विजय पाटकर यांचा दीनानाथ वेर्णेकर व देवेंद्र गिरप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दादासाहेब परुळकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,‘जगातील इतर देश सर्वच क्षेत्रात पुढे गेले आहेत. मात्र शिस्तीचा अभाव व पूर्वांपार टिकून राहिलेल्या अंधश्रद्धेमुळे आपला देश मागे राहिला आहे. म्हणून सर्वप्रथम घरातील पालकांनी शिस्त पाळली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त निर्माण होऊन राष्ट्राचा विकास होईल.

कार्यक्रमास विष्णू मांजरेकर, सावंतवाडीचे निवृत्त प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव सौ. शुभांगी कनयाळकर, सदस्या सौ.शुभलक्ष्मी चौकेकर, सौ. साळगांवकर, सदस्य अजित गवंडे तसेच महादेव परुळकर-तुळस, शिरोडकर-वेंगुर्ला हे उपस्थित होते.

श्रुतीगंधच्या सीडीचे प्रकाशन

संगीत हे एक असे औषध आहे की, त्यामुळे आजारी व्यक्ती बरी होऊ शकते. शेखर कोयंडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार घेऊन ‘‘सिंधुदुर्गचा आवाज‘‘ ही स्वरसिधुडिओ सीडी काढली ही बाब गौरवास्पद आहे असे प्रतिपादन सावंतवाडी येथील प्रसिद्ध डॉ. राजेश नवांगुळ यांनी वेंगुर्ले येथे श्रुतीगंध निर्मित व चंद्रशेखर कोयंडे प्रस्तुत सिधुदुर्गातील उदयोन्मुख गायक व वादक कलाकारांचा सहभाग असलेल्या स्वरसिंधुया ऑडिओ सीडीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले. १० सप्टेंबरला रात्रौ साई मंगल कार्यालयात एड. महेश पोकळे यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन झाले. त्यावेळी आरवली येथील वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुवीर मंत्री, श्रुतीगंधचे जुने कलाकार सुधीर नाईक, सामाजिक कार्यकर्ते सचीन वालावलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर कोयंडे, निवेदक संजय पुनाळेकर, गायक शेखर पणशीकर (आरवली), नुतन परब (कुडाळ), सौ. संगीता वालावलकर (वेंगुर्ले), ध्वनी मुद्रण करणारे सदा कुडाळकर (कुडाळ), डिझाईन करणारे विलास दळवी, संगीत साथ देणारे निलेश मेस्त्री, सचिन कुडतरकर, आनंदे मोर्ये तसेच तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कार प्राप्त संजय मालवणकर व महेंद्र मातोंडकर यांचा सत्कार करण्यात आला.

नुतन परब, संगीता वालावलकर, शेखर कोयंडे, शेखर पणशीकर यांनी अभंगवाणीहा भक्तीसंगीताचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास वेंगुर्ल्यातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी केले. अॅड. महेश पोकळे यांनी उद्घाटनची पहिली सीडी पाच हजार देऊन विकत घेतली. रघुवीर मंत्री यांनी १०० कॅसेट खरेदी केल्या. आमदार दिपक केसरकर यांनी स्वरसिधुच्या उपक्रमास एक हार्मोनियम देण्याचे जाहीर केले.

वेंगुर्ले व सावंतवाडीत नवीन प्रशासकीय इमारती आणि स्मारक इमारती

सिधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने काही बांधकामांच्या निविदा काढल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ले व सावंतवाडी येथे मुख्य प्रशासकीय इमारतींचे बांधकाम प्रत्येकी अंदाजपत्रक वेंगुर्ले ३२५ व सावंतवाडी ३३६.७९ लाखाचे आहे. शिरोडा येथे कै.वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर स्मारक इमारतीसाठी व सावंतवाडी - माजगांव येथे कै.भाईसाहेब सावंत स्मारक इमारतीसाठी प्रत्येकी ९५ लाखाचे अंदाजपत्रक असून चारही कामे २ वर्षाच्या आत पूर्ण करावयाची आहेत.

वाहन तपासणीतून सरकारला महसूल!

स्वयंचलित दुचाकी, तिचाकी, चारचाकी वाहनांचे परवाने व अन्य त्रुटींबाबत तपासणी करुन संबंधित वाहनधारकांकडून तत्काळ दंड आकारुन रक्कम वसुल करण्याची मोहिम पोलीस खात्याने ऐन गणेश चतुर्थीच्या दिवसांतच राबविली. त्यातून अधिकृत सरकारी पावत्या फाडल्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे.

आर.टी.ओ.कडे नोंदणी न करताच वाहन वापरणे, वाहन चालकाकडे लायसन्स नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट नसणे, स्कूटर, मोटरसायकलवरुन तीन सीट नेणे. गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, गाडीची नंबर प्लेट नियमानुसार नसणे इत्यादी गुन्हे मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये येतात. सिधुदुर्ग जिल्ह्यात अशा शेकडो वाहनचालकांवर कारवाई करुन लाखो रुपयांचे महसूली उत्पन्न सरकार जमा झाले.

वनखात्याकडून नुकसान भरपाईत वाढ

वन्य प्राण्यांकडून होणा-या शेती, बागायतीच्या नुकसानीपोटी संबंधीत शेतक-यांना द्यावयाच्या नुकसान भरपाई रक्कमेत वनखात्याने वाढ केली असून हत्ती, रानगवे यांच्यामुळे होणा-या नुकसानीसाठी प्रतिझाड नारळ २ हजार,आंबा १६०० रु., सुपारी १२०० रु.,इतर फळझाडे २०० रु.,केळी ४८रु. याप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे. शेतीसाठी कमाल दोन ते १० हजार,किमान ५०० ते ६०० रु. (उसासाठी प्रतिटन ४०० रु.)

वन्य जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू आला किवा कायमचे अपंगत्व आले तर २ लाख, गंभीर जखमी ५० हजार, किरकोळ जखमी ७,५०० रु. पशुधनाचे नुकसान झाल्यास गाय, बैल,म्हैस यांना बाजार किमतीच्या ७५ टक्के किवा १०,०००, अपंगत्व आल्यास किमतीच्या ५० टक्के किवा ३०००, जखमींना किमतीच्या २५टक्के किवा १००० असे नवीन दर आहेत.

आतापर्यंत ३ कोटी रुपये नुकसान भरपाई दाखल शेतक-यांना देण्यात आले असून अजुनही काही प्रतिक्षेत आहेत.

प्रा. अरुण पणदूरकरना राज्य पुरस्कार

कुडाळ येथील राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक अरुण पणदूरकर यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपये देऊन सन्मानीत करण्यात आले. याखेरीज त्यांना दोन वेतनवाढीही मिळणार आहेत. त्यांच्या पत्नी सौ.अश्विनी यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यापूर्वी प्रा. अरुण यांना मुंबई विद्यापीठाचा (२००२) बेस्ट टीचरअॅवॉर्ड व अन्य पुरस्कार मिळाले आहेत. सिधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक सेवेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक व ग्रंथालय क्षेत्रातही प्रा. पणदूरकर हे सहभागी असतात.

खरा आदर्श शिक्षक!

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या पानोली, जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय काकडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतींच्या हस्ते हा २५ हजाराचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यातील १५ हजार रुपये त्यांनी पानोली शाळेतील मुलांना बक्षिसे देण्यासाठी तसेच १० हजार रुपये आपण ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या कानूर पठार शाळेतील मुलांना बक्षिसे देण्यासाठी त्या त्या शाळांकडे सुपूर्द केली.

व्यंगचित्र